"राष्ट्रपतींच्या अभिभाषणातून भारताच्या प्रगतीचा वेग आणि व्याप्ती दिसून आली "
“घराणेशाहीचे राजकारण हे भारताच्या लोकशाहीसाठी चिंतेचे कारण आहे”
“तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल ही मोदींची हमी आहे.”
"पहिल्या कार्यकाळात आम्ही आधीच्या सरकारांनी केलेले खड्डे भरत राहिलो, दुसऱ्या कार्यकाळात आम्ही नवभारताची पायाभरणी केली , तिसऱ्या कार्यकाळात आम्ही विकसित भारताच्या निर्मितीला गती देऊ"
"उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत लोकांनी प्रलंबित प्रकल्प कालबद्ध रीतीने पूर्ण होताना पाहिले आहेत"
"अयोध्येतील राम मंदिर भारताच्या महान संस्कृती आणि परंपरेला ऊर्जा देत राहील"
"सरकारचा तिसरा कार्यकाळ पुढील 1000 वर्षांसाठी भारताचा पाया रचेल"
"आता भारतात असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे देशातील मुलींसाठी दरवाजे बंद आहेत"
"भारतमाता आणि तिच्या 140 कोटी नागरिकांच्या विकासासाठी मी तुमचा पाठिंबा मागतो"

मी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचे आभार मानण्यासाठी उभा आहे. जेव्हा आदरणीय राष्ट्रपती संसदेच्या या नवीन इमारतीत आम्हा सर्वांना संबोधित करण्यासाठी आल्या आणि ज्या अभिमानाने आणि आदराने सेंगोल संपूर्ण मिरवणुकीचे नेतृत्व करत होता आणि आपण सर्व त्याच्या पाठी चालत होतो.  नवीन सभागृहातील ही नवी परंपरा भारताच्या स्वातंत्र्याच्या त्या पवित्र क्षणाचे प्रतिबिंब बनते तेव्हा लोकशाहीची प्रतिष्ठा अनेक पटींनी वाढते.  हा 75वा प्रजासत्ताक दिन, त्यानंतरची संसदेची नवीन इमारत, सेंगोलचे नेतृत्व, हा सारे दृश्य अत्यंत प्रभावी होते. जेव्हा मी तिथे संपूर्ण कार्यक्रमात सहभागी होत होतो.  इथून तर आपल्याला तितकी भव्यता दिसत नाही. परंतु, तिथून जेव्हा मी पाहिले की खरेच या नव्या सभागृहाच्या गौरवशाली उपस्थितीत, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे मान्यवर, तेव्हा ते दृश्य आपल्या सर्वांच्या मनावर ठसले, जे आपल्या कायमचे लक्षात राहील. राष्ट्रपतींच्या आभार प्रस्तावावर ज्या 60 हून अधिक सन्माननीय सदस्यांनी आपली मते मांडली. आपले विचार व्यक्त करणाऱ्या आपल्या सर्व सन्माननीय खासदारांचे मी नम्रपणे आभार मानतो.  विरोधकांनी घेतलेल्या संकल्पाचे मी विशेष कौतुक करतो.  त्यांच्या भाषणातील प्रत्येक शब्दाने माझा आणि देशाचा आत्मविश्वास पक्का केला आहे की त्यांनी दीर्घकाळ तेथे राहण्याचा संकल्प केला आहे.

तुम्ही जसे अनेक दशके इथे बसला होता, तसेच अनेक दशके तिथे बसण्याचा तुमचा संकल्प. आणि जनता जनार्दन तर ईश्वराचे रूपच असते. आणि तुम्ही लोक ज्याप्रकारे सध्या मेहनत करत आहात. मला पक्के वाटते की ईश्वररूपी जनता जनार्दन तुम्हाला नक्की आशीर्वाद देईल. आणि तुम्ही ज्या उंचीवर आहात, त्याहीपेक्षा अधिक उंची नक्की गाठाल. तसेच येणाऱ्या निवडणूकीत प्रेक्षक गॅलरीत दिसाल. अधीर रंजन जी यंदा तुमचे कंत्राट तुम्ही त्यांना दिले आहे काय? तुम्ही याच बाबी पोहचवल्या आहेत. 

आदरणीय अध्यक्ष जी महोदय,

मी पाहतो आहे की तुमच्यापैकी अनेकांनी निवडणूक लढवण्याची उमेदही गमावली आहे. आणि मी ऐकले आहे की गेल्या वेळीही अनेकांनी जागा बदलली, यावेळीही अनेक लोक जागा बदलण्याच्या विचारात आहेत. आणि मी ऐकले आहे, अनेक लोकांना आता लोकसभेऐवजी राज्यसभेत जायचे आहे, म्हणून ते परिस्थितीचे मूल्यांकन करून स्वतःचा मार्ग शोधत आहेत.

आदरणीय अध्यक्ष जी,

राष्ट्रपतीजींचे भाषण हे एक प्रकारे तथ्यांवर आधारित, वास्तविकतेवर आधारित एक खूप महत्वाचा दस्तऐवज आहे, जो राष्ट्रपतींनी देशासमोर ठेवला आहे. आणि तुम्ही या संपूर्ण दस्तऐवजात पहाल, देश किती वेगाने प्रगती करत आहे, किती प्रमाणात उपक्रम विस्तारत आहेत याचा लेखा-जोखा मांडून राष्ट्रपतींनी वास्तविकता उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. आदरणीय राष्ट्रपतींनी भारताचे उज्ज्वल भविष्य लक्षात घेऊन चार मजबूत स्तंभांवर आपले संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे आणि देशाचे चार स्तंभ जितके मजबूत असतील, ते जितके विकसित असतील, जितके अधिक समृद्ध असतील, आपला देश तितका समृद्ध होईल, तितका वेगाने समृद्ध होईल, असे त्यांचे योग्य मूल्यांकन आहे. आणि त्यांनी या 4 स्तंभांचा उल्लेख करत देशाची नारी शक्ती, देशाची युवा शक्ती, देशातील आपले गरीब बंधू - भगिनी आणि देशातील आपले शेतकरी, आपले मच्छीमार, आपले पशुपालक याबद्दल चर्चा केली आहे.

आदरणीय राष्ट्रपतीजींनी यांच्या सक्षमीकरणाच्या माध्यमातून राष्ट्राचे विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्याचा जो मार्ग आहे त्याचे स्पष्ट दिशानिर्देश दिले आहेत. चांगले झाले असते, होऊ शकते की तुमच्या इथे मच्छिमार अल्पसंख्याक नसतील, होऊ शकते की तुमच्या इथे पशुपालक अल्पसंख्याक, होऊ शकते की तुमच्या इथे शेतकरी  अल्पसंख्याक नसतील, होऊ शकते की तुमच्या इथे महिला अल्पसंख्याकात मोडत नसतील, होऊ शकते की तुमच्या इथे तरुण अल्पसंख्याक नसतील. काय झालंय दादा? इथे काय या देशातील तरुणांबद्दल बोलले जात आहे.समाजात सर्व वर्ग नसतात का. देशातील महिलांची चर्चा होते का. देशातील सर्व महिला नसतात का. कधीपर्यंत तुकड्यांमध्ये विचार करत राहणार? कधीपर्यंत समाजाला तोडत राहणार? शब्दांना मर्यादा घाला, मर्यादा घाला, देशाला खूप विभागलंत.

आदरणीय अध्यक्ष जी,

चांगले झाले असते जर जाता जाता किमान या चर्चे दरम्यान काही सकारात्मक चर्चा झाली असती.

काही सकारात्मक सूचना आल्या असत्या, परंतु नेहमीप्रमाणे तुम्ही सहकाऱ्यांनी देशाला खूप निराश केले आहे. कारण, तुमच्या विचारांची मर्यादा देश जाणून आहे. त्याला पुन्हा पुन्हा वेदना होतात की यांचे असे विचार आहेत. यांच्या विचारांची धाव येथवरच आहे.

आदरणीय अध्यक्ष जी,

नेते तर बदलले, पण टेप रेकॉर्डर तीच वाजत आहे. तेच मुद्दे, कोणतेच नवे मुद्दे येत नाहीत. आणि  तेच ते जुनेच राग आळवले जातात, तेच सुरु राहते तुमचे. निवडणूकीचे वर्ष होते, थोडी मेहनत केली असती, काही नवे घेऊन आले असते, जनतेला जरा संदेश देऊ शकले असते, त्यातही तुम्ही नापास.  चला हेही मीच शिकवतो.

आदरणीय अध्यक्ष जी,

विरोधकांची आज जी अवस्था झाली आहे ना त्यासाठी सर्वात जबाबदार कॉंग्रेस पक्ष आहे. कांग्रेसला एक चांगला विरोधी पक्ष बनण्याची खूप मोठी संधी मिळाली, आणि 10 वर्ष काही कमी नसतात. मात्र 10 वर्षात ती जबाबदारी पार पाडण्यात ते पूर्णपणे अपयशी ठरले. आणि जेव्हा स्वतः अपयशी झाले, तेव्हा विरोधी पक्षात इतरही जे कर्तृत्ववान लोक आहेत, त्यांनाही पुढे येऊ दिले नाही, कारण मग मोठीच गडबड झाली असती, यासाठी प्रत्येक वेळी ते हेच करत राहिले, की विरोधी पक्षात जे तेजस्वी लोक आहेत त्यांना दडपून टाकले जावे. सभागृहात आमचे अनेक माननीय तरुण खासदार आहेत. उत्साह देखील आहे, उमेदही आहे. पण ते जर बोलले, तर त्यांची प्रतिमा उंचावेल, मग कदाचित कोणाची तरी प्रतिमा झाकोळली जाईल. त्या चिंतेने या तरुण पिढीला संधी मिळू दिली नाही, सभागृह चालू दिले गेले नाही.

म्हणजेच एक प्रकारे कितीतरी मोठे नुकसान केले आहे. स्वतःचेही, विरोधी पक्षाचेही संसदेचेही आणि देशाचे देखील. आणि म्हणूनच, आणि माझी सदैव अशी ईच्छा आहे की देशाला एका स्वस्थ आणि चांगल्या विरोधी पक्षाची गरज आहे. देशाने आजवर घराणेशाहीचे जितके दुष्परिणाम सोसले आहेत. आणि त्याचे दुष्परिणाम स्वतः कॉंग्रेसला देखील सहन करावे लागले आहेत. हे दुष्परिणाम अधीर बाबू यांनी देखील सहन केले आहेत. आता अधीर बाबू यांची परिस्थिती आपण पाहतच आहोत. नाहीतर ही काही संसदेत असण्याची वेळ आहे. पण, घराणेशाहीची चाकरी तर करावीच लागणार.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

आताची परिस्थिती पहा, आपले खरगे जी या सदनातून त्या सदनात विस्थापित झाले आहेत, आणि गुलाम नबी आझाद तर पक्षातूनच विस्थापित झाले आहेत. हे सर्व घराणेशाहीचे बळी आहेत. एकच उत्पादन पून्हा पून्हा लॉंच करण्याच्या नादात कॉंग्रेसच्या दुकानाला टाळे लागण्याची पाळी आली आहे. आणि हे दुकान, असे आम्ही म्हणत नाही आहोत, असे तुम्हीच म्हणत आहात. तुम्हीच म्हणता की दुकान उघडले आहे, असे सर्व ठिकाणी म्हटले जाते. दुकानाला कुलुप लागण्याची पाळी आली आहे. इथे आमचे दादासाहेब आपली सवय सोडू शकत नाहीत आणि तेथून, ते तिथेच बसून घराणेशाहीवर टिप्पणी करत आहेत, मी जरा समजावून सांगतो. अध्यक्ष महोदय, माफ करा, आज मी जरा जास्त वेळ घेत आहे. आपण कोणत्या घराणेशाहीची चर्चा करत आहोत. जर एखाद्या घराण्याने स्वतःच्या सामर्थ्यावर, जनसामर्थ्यावर, एकाहून अधिक अनेक लोक जर राजकारणाच्या क्षेत्रात देखील प्रगती करतात. त्याला आम्ही कधीच घराणेशाही असे संबोधले नाही. आम्ही अशा घराणेशाहीची चर्चा करत आहोत, ज्यात एक पक्ष एखाद्या घराण्यातील सदस्यांनाच प्राधान्य देतो. आणि त्याच घराण्यातील लोक पक्षासाठीचे सगळे निर्णय घेत असतात. ही आहे घराणेशाही. ना राजनाथ सिंह यांचा कोणता राजकीय पक्ष आहे, ना अमित शहा यांचा कोणता राजकीय पक्ष आहे. आणि म्हणूनच जिथे एका घराण्याचे दोन पक्ष आहेत असे म्हटले जाते हे लोकशाहीमध्ये योग्य नाही. लोकशाहीत, पक्षात पद, अनेकजण, एका घराण्यातले दहा लोक राजकारणात असतील तर काही वाईट नाही. आमची इच्छा आहे की तरुणांनी राजकारणात यावे. आमची देखील अशी इच्छा आहे की यावर आमच्या सोबत -सर्वांसोबत चर्चा व्हावी. देशाच्या लोकशाहीसाठी घराणेशाहीचे राजकारण, घराणेशाहीचे अनुसरण करणाऱ्या पक्षांचे राजकारण या सर्व बाबी सर्वांच्या चिंतेचा विषय असल्या पाहिजेत. आणि म्हणूनच एखाद्या घराण्यातील दोन लोक प्रगती करत आहेत त्याचे मी स्वागत करेन, दहा लोक प्रगती करत आहेत मी त्यांचे स्वागत करेन. देशात जितके नव्या पिढीतील चांगले लोक राजकारणात येतील तितकी ही बाब स्वागत करण्याजोगी आहे. पण अडचण ही आहे की काही घराणेच पक्ष चालवतात. हे ठरलेले आहे की हीच व्यक्ती अध्यक्ष अध्यक्ष होणार आणि जर ती व्यक्ती झाली नाही तर तिचा मुलगा अध्यक्ष होणार. हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे. आणि म्हणूनच, हे चांगले झाले, दादा! धन्यवाद, या विषयावर मला बोलायचे नव्हते पण मी आज बोललो.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

एकच उत्पादन पुन्हा पुन्हा लॉन्च करण्याचा भरपूर प्रयत्न केला जात आहे.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

काँग्रेस एकाच घराण्यात गुंतून राहिली आहे. देशातील करोडो कुटुंबांच्या अपेक्षा आणि उपलब्धी काँग्रेस पाहूच शकत नाही, काँग्रेसचे तिकडे लक्षच नाही, आपल्या घराण्याबाहेर पाहण्याची त्यांची तयारीच नाही. आणि काँग्रेसमध्ये काहीही असो, ते खोडून काढण्याची संस्कृती विकसित झाली आहे. काहीही असो - खोडून काढा, काहीही असो - खोडून काढा. एका अशा प्रकारच्या खोडून काढण्याच्या संस्कृतीमध्ये काँग्रेस अडकली आहे. आम्ही म्हणतो -आत्मनिर्भर भारत, तर काँग्रेस म्हणते - रद्द, आम्ही म्हणतो व्होकल फोर लोकल, काँग्रेस म्हणते - रद्द, आम्ही म्हणतो वंदे भारत रेल्वे - काँग्रेस म्हणते - रद्द, आम्ही म्हणतो संसदेची नवीन इमारत - काँग्रेस म्हणते - रद्द. म्हणजे या गोष्टीने मी आश्चर्यचकित झालो आहे, या काही मोदीच्या उपलब्धी नाहीत तर या देशाच्या उपलब्धी आहेत. इतका तिरस्कार किती दिवस करणार आहात तुम्ही, आणि त्या कारणाने देशाचे यश, देशाच्या उपलब्धी, त्याही तुम्ही खोडून काढत आहात.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

राष्ट्रपती जी नी विकसित भारताच्या आराखड्यावर चर्चा करताना आर्थिक पैलूवर अधिक विस्ताराने चर्चा केली. जे अर्थव्यवस्थेचे मूलभूत आधार आहेत त्यावरही तपशीलवार चर्चा केली. आणि आज भारताच्या मजबूत अर्थव्यवस्थेची संपूर्ण जगात प्रशंसा होत आहे, संपूर्ण जग त्यामुळे प्रभावित झाले आहे, आणि जेव्हा जग संकटाच्या परिस्थितीचा सामना करत आहे तेव्हा तर जगाला ही गोष्ट जास्तच प्रभावित करते. जी 20 शिखर परिषदेदरम्यान सगळ्या देशांनी पाहिले आहे, संपूर्ण जग भारताच्या बाबतीत काय विचार करते, काय म्हणते आणि काय करते. आणि या संपूर्ण दहा वर्षाच्या कार्यकाळातील अनुभवाच्या आधारावर, आजची मजबूत अर्थव्यवस्था पाहता ज्या गतीने भारत विकास करत आहे, त्याचे सारे तपशील चांगल्या प्रकारे जाणून मी विश्वासाने सांगतो, आणि म्हणूनच मी म्हणतो की, आमच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक ताकद बनेल आणि ही मोदीची हमी आहे.

माननीय अध्यक्ष महोदय,

यांना यापूर्वी संधी देण्यात आली नव्हती का ? सर्वांना संधी मिळाली आहे ना…!

आदरणीय अध्यक्ष महोदय,

जेव्हा आपण जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनून उदयास येऊ, असे जेव्हा मी म्हणतो, तेव्हा आमच्या विरोधी पक्षात असलेले आमचे काही साथीदार काही कुतर्क काढतात, कसे कुतर्क काढतात, ते म्हणतात - यात काय नवीन आहे, हे तर आपोआप घडणारच आहे. यात तुम्ही काय कमाल केली आहे, यात मोदीचे काय योगदान आहे, हे तर आपोआप घडणारच आहे. यात सरकारची भूमिका काय आहे, हे मी या सदनाच्या माध्यमातून देश आणि विशेषतः देशाच्या युवकातील मनाला सांगू इच्छितो, देशाच्या युवा शक्तीला सांगू इच्छितो की हे कसे घडते आणि यात सरकारची भूमिका काय आहे.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

दहा वर्षांपूर्वी 2014 मध्ये फेब्रुवारी महिन्यात जो अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता, त्यावेळी कोण कोण येथे बसले होते हे तर तुम्हाला माहीतच आहे आणि देशालाही माहित आहे. दहा वर्षांपूर्वी जो अंतरिम अर्थसंकल्प आला होता तो सादर करताना त्यावेळेच्या अर्थमंत्र्यांनी जे सांगितले होते ते मी उध्दृत करीत आहे, आणि यातला एक एक शब्द खूप मौल्यवान आहे. जेव्हा तुम्ही लोक म्हणतात ना की देश आपोआप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल, जे असे म्हणतात त्यांनी हे समजून घेतले पाहिजे.

त्यांनी सांगितलं की - “मला आता पुढे बघायच आहे आणि भविष्यासाठी एक दृष्टीकोन, भविष्यासाठीची दृष्टी तयार करायची आहे.” जगातले सर्वात महान अर्थशास्त्रज्ञ हे बोलत होते - “मला आता पुढे पहायचे आहे आणि भविष्यासाठी एक दृष्टीकोन तयार करण्याची इच्छा आहे.” ते पुढे म्हणाले की - “मला आश्चर्य वाटते की भारताची अर्थव्यवस्था राष्ट्रीय दरडोई उत्पन्नाच्या आकाराच्या बाबतीत जगात 11 व्या क्रमांकावर आहे,हे वास्तव किती जणांनी लक्षात घेतले आहे. म्हणजे 2014 मध्ये 11 व्या क्रमांकावर पोहोचल्यावर ही किती अभिमानाची बाब होती. आज 5 वर पोहोचलो आणि तुम्हाला काय होत आहे याची जाणीव आहे का?

आदरणीय अध्यक्ष महोदय,

मी पुढे वाचत आहे, गोगोई जी, धन्यवाद, तुम्ही छान बोललात. मी पुढे वाचतोय, नीट ऐका मित्रांनो, नीट ऐका. ते म्हणाले होते - “जगातील 11 व्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आहे, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. या मैलाच्या दगडात काही महान गोष्टी आहेत.मग पुढे ते म्हणतात – पुढील तीन दशकांमध्ये भारताचा नाममात्र  जीडीपी देशाला अमेरिका आणि चीननंतर तिसऱ्या क्रमांकावर नेईल असा तर्कसंगत दृष्टिकोन आहे. त्यावेळी विश्वातील हे मोठे अर्थतज्ञ सांगत होते की, 30 वर्षांत, आपण तिसऱ्या क्रमांकावर पोहोचू आणि तेव्हा ते म्हणाले की, ही माझी दृष्टी आहे. या विचारांत जगणारे अनेक लोक आहेत, ते विश्वाचे श्रेष्ठ अर्थतज्ज्ञ आहेत. हे लोक 2014 मध्ये म्हणत आहेत आणि 2044 पर्यंत तिसऱ्या अर्थव्यवस्थेची चर्चा म्हणजे, ही त्यांची विचारसरणी आहे, ही त्यांची प्रतिष्ठा आहे, अशी त्यांना काय दृष्टी दिसते आहे. या लोकांनी स्वप्न पाहण्याची क्षमता गमावली होती, कोणताही संकल्प तर लांबची गोष्ट आहे. माझ्या देशातील तरुण पिढीला तीस वर्षे वाट पाहा, असे त्यांनी सांगितले. पण आज आम्ही तुमच्यासमोर विश्वासाने उभे आहोत, या पवित्र सदनात उभे आहोत आणि मी तुम्हाला खात्री देतो की आम्ही 30 वर्षे लागू देणार नाही - ही मोदींची हमी आहे, माझ्या तिसऱ्या कार्यकाळात देश जगातील तिसरी आर्थिक शक्ती बनेल. त्यांनी ध्येय कसे ठरवले, त्यांची विचारसरणी कुठपर्यंत गेली, याची मला दया येते. तुम्हाला 11 व्या क्रमांकाचा खूप अभिमान होता, आणि आम्ही 5 व्या क्रमांकावर पोहोचलो. पण जर तुम्ही 11 व्या क्रमांकावर पोहोचल्याबद्दल आनंदी असाल, तर आता तुम्ही 5 व्या क्रमांकावर पोहोचल्याचा आनंद घ्या, देश 5 व्या क्रमांकावर पोहोचला आहे, तुम्ही आनंदी असले पाहिजे, आणि तुम्ही तर वेगळ्याच कोणत्या आजारात अडकला आहात.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

भाजप सरकारच्या कामाचा वेग किती आहे, आमची उद्दिष्टे किती मोठी आहेत, आमचे धैर्य किती मोठे आहे, हे आज संपूर्ण जग पाहत आहे.

आणि आदरणीय अध्यक्ष महोदय,

एक म्हण आहे, ही म्हण विशेषत: आपल्या उत्तर प्रदेशात बोलली जाते - नऊ दिन चले अढाई कोस आणि मला वाटते ही म्हण काँग्रेसची पूर्ण व्याख्या करते. काँग्रेसच्या संथ गतीची काही बरोबरी नाही होऊ शकत. आज देशात ज्या वेगाने काम सुरू आहे, त्याची काँग्रेस सरकार कल्पनाही करू शकत नाही.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

शहरी गरिबांसाठी आम्ही 4 कोटी घरे बांधली. याच शहरी गरिबांसाठी 80 लाख पक्की घरे बांधली. ही घरे काँग्रेसच्या गतीने बांधली असती तर काय झाले असते याचा मी हिशेब मांडतो.काँग्रेसच्या गतीने ही घरे बांधली असती तर एवढी कामे पूर्ण व्हायला 100 वर्षे लागली असती, 100 वर्षे. म्हणजे पाच पिढ्या निघून जातील.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

10 वर्षात 40 हजार किलोमीटर रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण झाले. काँग्रेसच्या गतीने देश चालला असता तर हे काम पूर्ण व्हायला 80 वर्षे लागली असती, एक प्रकारे 4 पिढ्या निघून गेल्या असत्या.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

आम्ही 17 कोटी गॅस जोडणी दिल्या. मी 10 वर्षांचा हिशोब देत आहे. जर आपण काँग्रेसच्या मार्गाचा अवलंब केला असता तर ही जोडणी देण्यासाठी आणखी 60 वर्षे लागली असती आणि 3 पिढ्यांचा वेळ धुरात स्वयंपाक करण्यात गेला असता.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

आमच्या सरकारच्या काळात गटारी झाकण्याचे काम 40 ते 100 टक्के पर्यंत झाले आहे. काँग्रेसची गती असती तर हे काम होण्यासाठी अजून 60-70 वर्षे लागली असती आणि किमान तीन पिढ्या निघून गेल्या असत्या, पण तरी ते काम झाले नसते याची शाश्वती नाही.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

काँग्रेसच्या मानसिकतेमुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे. काँग्रेसचा देशाच्या ताकदीवर कधीच विश्वास नव्हता, त्यांनी स्वत:ला राज्यकर्ते मानले आणि नेहमीच जनतेला कमी लेखले आणि तुच्छ लेखले.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

देशातील नागरिकांबद्दल ते कसा विचार करतात हे मला माहीत आहे, मी त्यांचे नाव घेतले तर त्यांना थोडे टोचेल. पण 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नेहरू काय म्हणाले होते ते मला वाचू द्या - भारताचे पहिले पंतप्रधान नेहरूजी लाल किल्ल्यावरून काय म्हणाले होते ते मी वाचत आहे, ते म्हणाले होते, "भारतात सहसा खूप मेहनत  करण्याची सवय नाही. युरोप, जपान, चीन, रशिया, अमेरिका या देशांनी जेवढे काम केले तेवढे काम आम्ही केले नाही. नेहरूजी लाल किल्ल्यावरून बोलत आहेत. "ते जादूने समृद्ध झाले आहेत असे समजू नका, ते कठोर परिश्रम आणि बुद्धिमत्तेने समृद्ध झाले आहेत." ते त्यांना प्रमाणपत्र देत आहेत आणि भारतातील लोकांचा अपमान करत आहेत. म्हणजेच नेहरूजींची भारतीयांबद्दलची विचारसरणी अशी होती की भारतीय आळशी आहेत. नेहरूजींची भारतीयांबद्दलची विचारसरणी अशी होती की भारतीय हे कमी बुद्धीचे लोक आहेत.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

इंदिराजींची विचारसरणीही यापेक्षा फार वेगळी नव्हती. 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून इंदिराजी काय बोलल्या होत्या - इंदिराजी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून म्हणाल्या होत्या - "दुर्दैवाने आपली सवय अशी आहे की जेव्हा एखादे शुभ कार्य पूर्ण होणार आहे, तेव्हा आपल्याला आत्मसंतुष्टतेची भावना येते. आणि कोणतीही अडचण आली की आपण हताश होतो.”

कधी कधी तर असे वाटू लागते की संपूर्ण देशानेच पराजयाच्या भावनेला आपलंसं केलं आहे.आज काँग्रेसच्या लोकांना पाहून वाटतं आहे की इंदिराजी जरी देशातल्या लोकांचे मूल्यांकन योग्य प्रकारे करू  शकल्या नाही, परंतु काँग्रेस बाबत एकदम तंतोतंत असे मूल्यांकन त्यांनी केले होते. काँग्रेसच्या शाही कुटुंबातले लोक माझ्या देशातल्या लोकांना सुद्धा असेच समजत होते कारण ते सर्व असेच होते आणि आजही तीच विचारसरणी बघायला मिळते आहे.

माननीय अध्‍यक्ष जी,

काँग्रेसचा विश्वास नेहमीच केवळ एका परिवारावर राहिलेला आहे. या एका परिवाराशिवाय ते ना काही विचार करू शकत ना काही पाहू शकत. काही दिवस आधी भानुमतीचे कुटुंब जोडून पाहिले परंतु पुन्हा एकला चलो रे करू लागले. काँग्रेसच्या लोकांनी नवा नवा मोटर मेकॅनिकचे काम शिकले आहे.आणि यासाठीच अलाइनमेंट (alignment) काय असते हे तरी त्यांच्या ध्यानात आले असेल. परंतु मी बघतो आहे अलायन्सचीच अलाइनमेंट बिघडलेली आहे. त्यांना आपल्या या कुटुंबात जर एक दुसऱ्यावर विश्वास नाही आहे तर हे लोक  देशावर कसा विश्वास ठेवणार आहेत.

आदरणीय अध्‍यक्ष जी,

आम्हाला देशाच्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास आहे, आम्हाला लोकांच्या ताकदीवर विश्वास आहे.

आदरणीय अध्‍यक्ष जी,

देशाच्या जनतेने जेव्हा आम्हाला पहिल्या वेळेला सेवा करण्याची संधी दिली, तेव्हा आम्ही पहिल्या कार्यकाळात यूपीए सरकारच्या काळात जे खड्डे होते ते खड्डे भरण्यामध्ये आमचा खूप वेळ आणि शक्ती वाया गेली.आम्ही पहिल्या कार्यकाळात ते खड्डे भरत राहिलो.आम्ही दुसऱ्या कार्यकाळात नव्या भारताची पायाभरणी केली आणि तिसऱ्या कार्यकाळात आम्ही विकसित भारत निर्माण करण्याच्या कामाला गती देणार आहोत.

आदरणीय अध्‍यक्ष जी,

पहिल्या कार्यकाळात आम्ही स्वच्छ भारत, उज्वला, आयुष्मान भारत, बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ… याच प्रकारे सुगम्य भारत, डिजिटल इंडिया अशा कितीतरी जनहित कार्याला अभियानाचे रूप देऊन त्याला पुढे घेऊन गेलो. कर व्यवस्था सुलभ असावी यासाठी जीएसटी सारखे निर्णय घेतले आणि आमचे हेच काम पाहून जनतेने आम्हाला भरपूर पाठिंबा दिला.जनतेने खूप खूप आशीर्वाद दिले.पहिल्यापेक्षा अधिक आशीर्वाद दिले,आणि आमचा दुसरा कार्यकाळ सुरू झाला. दुसऱा कार्यकाळ हा संकल्प आणि वचनपूर्तीचा कार्यकाळ राहिला.ज्या सोयी सुविधांसाठी देश खूप मोठ्या कालावधीपासून वाट पाहत होता ती सर्व कामे आम्ही आमच्या दुसऱ्या कार्यकाळात पूर्ण होताना पाहत आहोत. आम्ही सर्वांनी कलम 370 रद्द होताना पाहिले आहे. याच माननीय सदस्यांच्या डोळ्यासमोर आणि त्यांच्याच मतांच्या ताकदीवर कलम 370 रद्द झाले. नारीशक्ती वंदन अधिनियम ला दुसऱ्या कार्यकाळात कायद्याचे स्वरूप प्राप्त झाले.

आदरणीय अध्‍यक्ष जी,

अंतराळापासून ते ऑलम्पिक पर्यंत, सक्षम सैन्यदलांपासून  संसदेपर्यंत सर्वत्र नारीशक्तीच्या सामर्थ्याची चर्चा होत आहे.या  नारीशक्तीच्या सक्षमीकरणाला आज देशाने पाहिले आहे.

आदरणीय अध्‍यक्ष जी,

उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, पूर्वेपासून पश्चिमे पर्यंत लोकांनी दशकांपासून अटकलेली, भटकलेली, लटकलेल्या योजनांना योजनाबद्ध पद्धतीने पूर्ण होताना पाहिलेले आहे.

आदरणीय अध्‍यक्ष जी,

इंग्रज शासन काळातल्या जुन्या कायद्यांना जे दंड विधान होते, त्या दंडविधान कायद्यांना रद्द करून आम्ही न्यायप्रणालीपर्यंत प्रगती केलेली आहे.आमच्या सरकारने शेकडो अशा कायद्यांना रद्द केले आहे जे कालबाह्य झाले होते. सरकारने 40 हजारापेक्षा जास्त कंफ्लाईन्सेस अनुपालन (नियम) संपवून टाकले आहेत.

आदरणीय अध्‍यक्ष जी,

भारताने अमृत भारत आणि नमो भारत रेल्वे गाड्यांच्या माध्यमातून भविष्याच्या उन्नतीचे भरभराटीचे स्वप्न पाहिलेले आहे.

आदरणीय अध्‍यक्ष जी,

देशातील गावागावांनी, देशातल्या कोटी कोटी लोकांनी विकसित भारताची संकल्प यात्रा पाहिलेली आहे आणि सॅच्युरेशन (संपृक्तता) मिळवण्याच्या पाठीमागे केवढी मेहनत घेतली जाते, त्यांच्या हक्कांच्या गोष्टी त्यांना मिळाव्यात त्यांच्या दरवाजांवर ठोकून त्यांचे हक्क देण्याचा प्रयत्न देशाने पहिल्या वेळेस पाहिलेला आहे.

आदरणीय अध्‍यक्ष जी,

भगवान राम न केवळ आपल्या घरी परत आले आहेत, तर एक अशा मंदिराची स्थापना झालेली आहे जे मंदिर भारताची महान संस्कृती, परंपरा यांना नवीन ऊर्जा प्राप्त करून देईल.

आणि आदरणीय अध्यक्ष जी,

आता आमच्या सरकारचा तिसरा कार्यकाळ सुद्धा खूप दूर  राहिलेल्या नाही. जास्तीत जास्त शंभर सव्वाशे दिवस बाकी आहेत. आणि या वेळेस मोदी सरकार, संपूर्ण देश म्हणत आहे अबकी बार मोदी सरकार, खडगे जी हे सुद्धा म्हणत आहेत अबकी बार मोदी सरकार. परंतु अध्यक्ष जी, मी सर्वसाधारणपणे या आकड्यांच्या बाकड्यांच्या चक्रात अडकून पडत नाही, परंतु मी पाहत आहे देशाचा कल एनडीएला 400 पलीकडे घेऊन नक्कीच जाणार आहे. परंतु भारतीय जनता पार्टीला 370 जागा अवश्य देणार आहे. बीजेपीला 370 जागा आणि एनडीएला 400  हुन अधिक.

आदरणीय अध्यक्ष जी,

आमचा तिसरा कार्यकाळ खूप मोठ्या निर्णयांचा असणार आहे. मी लाल किल्ल्यावरून म्हटले होते आणि राम मंदिर प्राणप्रतिष्ठा च्या वेळेस सुद्धा मी त्याचा पुनर्विचार केला होता. मी म्हटले होते, देशाला पुढच्या हजार वर्षांमध्ये समृद्ध आणि सिद्धीच्या शिखरावर जाताना पाहायचे आहे.

तिसरा कार्यकाळ आगामी एक हजार वर्षांसाठी मजबूत आधारशीला ठेवण्याचा कार्यकाळ बनेल.

आदरणीय अध्यक्ष जी,

मी भारतवासीयांसाठी त्यांच्या भविष्यासाठी खूपच विश्वासाने भरून गेलेलो आहे. माझा देशातल्या 140 कोटी नागरिकांच्या सामर्थ्यांवर पूर्ण विश्वास आहे, खूप खूप विश्वास आहे. मागील दहा वर्षांमध्ये 25 कोटी लोक गरिबी मुक्त झालेले आहेत  यातूनच हे सामर्थ्य दिसून येते.

आदरणीय अध्यक्ष जी,

मी नेहमीच म्हटलेले आहे की गरिबाला जर साधन मिळाले, गरिबाला जर संसाधने अर्थात सोयी सुविधा मिळाल्या, गरिबाला जर स्वाभिमान मिळाला तर आपला गरीब, गरिबी वर मात करण्याचे सामर्थ्य ठेवतो आहे. आणि आम्ही तोच मार्ग निवडलेला आहे आणि माझ्या गरीब बांधवांनी गरिबीवर मात करून दाखवलेली आहे. आणि हाच विचार करून आम्ही गरिबाला साधने दिली, संसाधने अर्थात सोयी सुविधा पुरवल्या, सन्मान दिला स्वाभिमान दिला. 50 कोटी गरिबांचे आज बँकेमध्ये खाते आहे. कधी हेच गरीब बँकेच्या जवळ सुद्धा पोचले नव्हते. 4 कोटी गरिबांना आज पक्के घर मिळाले आहे आणि ते घर त्यांच्या स्वाभिमानाला एक नव्याने आत्मविश्वास देते आहे. 11 कोटी पेक्षा जास्त कुटुंबीयांना पिण्याचे शुद्ध पाणी नळाच्या माध्यमातून मिळत आहे. 55 कोटी पेक्षा अधिक गरिबांना आयुष्मान भारत कार्ड मिळालेले आहे. घरामध्ये कोणताही आजार येऊ द्या त्या आजाराच्या कारणाने पुन्हा गरिबीच्या विळख्यात सापडायचे नाही, त्यांना विश्वास आहे केवढा ही आजार येऊदे मोदी बसलेले आहेत. 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्याची सुविधा प्राप्त झालेली आहे.

आदरणीय अध्यक्ष जी,

ज्यांना यापूर्वी कोणी विचारलेही नव्हते त्यांना मोदींनी विचारात घेतले. देशात प्रथमच रस्त्यावरच्या विक्रेत्यांचा विचार करण्यात आला. पीएम स्वनिधी योजनेमुळे ते आज व्याजाच्या चक्रातून बाहेर आले आहेत,  बँकेतून पैसे घेऊन आपला व्यवसाय विस्तारत आहेत. देशात प्रथमच, ज्यांच्याकडे हस्तकौशल्य आहे आणि जे राष्ट्र घडवतात, अशा माझ्या विश्वकर्मा सहकाऱ्यांचा विचार केला गेला. माझ्या विश्वकर्मा बांधवांना आधुनिक साधने, आधुनिक प्रशिक्षण, आर्थिक मदत देऊन, त्यांच्यासाठी आम्ही जागतिक बाजारपेठ खुली करून दिली आहे. देशात प्रथमच, PVTG अर्थात जमातींमध्ये सुद्धा अत्यंत मागासलेले आमचे बंधू-भगिनी, जे संख्येने खूपच कमी आहेत आणि मतांसाठीही त्यांची दखल कोणी घेत नाहीत. पण आम्ही मतांच्या पलीकडे विचार करणारे आहोत, आम्ही हृदयांशी जोडलेले आहोत. आणि म्हणूनच पीव्हीटीजी जातींसाठी पंतप्रधान जनमन योजना बनवून त्यांच्या हिताचे काम प्राधान्याने हाती घेण्यात आले आहे. एवढेच नाही तर सीमेवरची जी गावे आहेत, जी शेवटची गावे म्हणून दुर्लक्षित राहिली होती, आम्ही त्या शेवटच्या गावांना पहिली गावे म्हणून विकासाची संपूर्ण दिशाच बदलून टाकली.

आदरणीय अध्यक्ष जी,

मी जेव्हा-जेव्हा भरड धान्यांची भलामण करतो, तेव्हा मी भरड धान्यांच्या जगात जाऊन चर्चा करतो, जी-20 देशांमधल्या लोकांना अभिमानाने भरड धान्यांचे पदार्थ खाऊ घालतो, तेव्हा त्यामागे माझ्या मनात 3 कोटीपेक्षा जास्त लहान शेतकऱ्यांचा विचार असतो, जे ही भरड धान्ये पिकवतात, त्यांच्या हिताप्रती आम्ही कटीबद्ध आहोत.

आदरणीय अध्यक्ष जी,

जेव्हा मी ‘वोकल फॉर लोकल’ म्हणत स्थानिकांसाठी आवाज उठवतो, जेव्हा मी मेक इन इंडियाबद्दल बोलतो तेव्हा मी कोट्यवधी गृह उद्योग, लघु उद्योग, कुटीर उद्योग आणि त्यांच्याशी संबंधित माझ्या लाखो कुटुंबांच्या कल्याणाचा विचार करतो.

आदरणीय अध्यक्ष जी,

खादी, काँग्रेस पक्ष विसरला आहे, सरकारे विसरली आहेत. आज मी खादीला पाठबळ देण्यासाठी यशस्वीपणे पुढे आलो आहे, कारण कोट्यवधी विणकरांचे जीवन खादी आणि हातमाग यांच्याशी जोडलेले आहे, मी त्यांचे हीत पाहतो आहे.

आदरणीय अध्यक्ष जी,

आमचे सरकार देशाच्या कानाकोपऱ्यातून गरिबी हटविण्यासाठी आणि गरीबांना समृद्ध करण्यासाठी विविध प्रयत्न करत आहे. ज्यांच्यासाठी फक्त व्होट बँक होती, त्यांनी या वर्गाच्या हीताबद्दल विचार करणे शक्य नव्हते. आमच्यासाठी त्यांचे कल्याण हेच राष्ट्राचे कल्याण आहे आणि म्हणूनच आम्ही तोच मार्ग स्वीकारला आहे.

आदरणीय अध्यक्ष जी,

काँग्रेस पक्ष आणि यूपीए सरकारने ओबीसी समाजाला कोणताही न्याय दिला नाही, त्यांच्यावर अन्याय केला आहे. या लोकांनी ओबीसी नेत्यांचा सातत्याने अपमान केला. काही दिवसांपूर्वी कर्पूरी ठाकूर जी यांना भारतरत्न देण्यात आला, आम्ही हा सन्मान बहाल केला. पण लक्षात घ्या, अत्यंत मागासलेल्या समाजातील, ओबीसी समाजातील महापुरुष कर्पूरी ठाकूर यांना कशी वागणूक दिली गेली, ते आठवा. कशा प्रकारे त्यांचा छळ झाला. 1970 साली ते बिहारचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना पदावरून हटवण्यासाठी कसले आणि किती खेळ खेळले गेले. त्यांचे सरकार अस्थिर करण्यासाठी काय काय करण्यात आले.

आदरणीय अध्यक्ष जी,

अत्यंत मागास वर्गातील व्यक्ती काँग्रेसला सहन झाली नव्हती. 1987 मध्ये काँग्रेसचा झेंडा देशभर फडकत होता, त्यांची सत्ता होती. तेव्हा त्यांनी कर्पूरी ठाकूर यांना विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्यास नकार दिला आणि ते संविधानाचा आदर करू शकत नाहीत, असे कारण दिले. लोकशाहीची तत्त्वे आणि संविधानाच्या प्रतिष्ठेसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या कर्पूरी ठाकूर यांचा अशा प्रकारे काँग्रेस पक्षाकडून अपमान करण्यात आला.

आदरणीय अध्यक्ष जी,

आजकाल काँग्रेसमधले आमचे सहकारी, सरकारमध्ये किती ओबीसी लोक आहेत, किती पदांवर आहेत, कुठे आहेत याचा हिशोब ठेवतात. पण मला आश्चर्य वाटते की त्यांना सर्वात मोठे ओबीसी दिसत नाही का? डोळे मिटून कुठे बसतात.

आदरणीय अध्यक्ष जी,

मला फक्त, अशा जगभरातल्या गोष्टी करत राहतात, त्यांना मला सांगायचे आहे. यूपीएच्या कार्यकाळात एक अतिरिक्त संवैधानिक संस्था निर्माण झाली होती, ज्या संस्थेसमोर सरकारचेही काही चालत नसे. राष्ट्रीय सल्लागार परिषद, त्यात काही ओबीसी होते का, ते कृपया शोधा बरे. फक्त संदर्भ बाहेर काढा आणि पहा. एवढी मोठी शक्तीशाली संस्था स्थापन केली होती आणि तिथे नियुक्ती करत होते.

आदरणीय अध्यक्ष जी,

गेल्या 10 वर्षांत महिला सक्षमीकरणासाठी अनेक पावले उचलली गेली आहेत. महिलांच्या नेतृत्वाखाली समाजाच्या सक्षमीकरणासाठी काम करण्यात आले आहे.

आदरणीय अध्यक्ष जी,

आता देशाची मुलगी,  भारतात आता असे एकही क्षेत्र नाही जिथे देशाच्या मुलींसाठी दरवाजे बंद असतील. आज आपल्या देशाच्या मुलीही लढाऊ विमाने चालवून आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित ठेवत आहेत.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

ग्रामीण व्यवस्था, अर्थव्यवस्था, आपल्या महिला बचत गटांतील 10 कोटी भगिनींसोबत जोडलेल्या आहेत आणि त्या आर्थिक उलाढाली करतात, आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ देत आहेत आणि आज मला आनंद वाटतो की या प्रयत्नांचे फलित म्हणजे आज देशात सुमारे 1 कोटी लखपती दीदी तयार झाल्या आहेत. आणि जेव्हा मी त्यांच्याशी बोलतो तेव्हा मला त्यांचा आत्मविश्वास दिसतो,   मला ठाम विश्वास वाटतो की आपण ज्या पद्धतीने पुढे जात आहोत, त्याच पद्धतीने आगेकूच करत येत्या काळात आपल्या देशात तीन कोटी लखपती दिदी पाहायला मिळतील. गावाच्या अर्थव्यवस्थेत किती मोठा बदल होईल, याची कल्पना तुम्ही करू शकता.

आदरणीय अध्यक्ष जी,

आपल्या देशात मुलींबाबतचे जे पूर्वीचे विचार होते, ते समाजातील घरांमध्ये शिरले होते आणि मनांमध्येही शिरले होते. ती विचारसरणी आज किती वेगाने बदलते आहे. जरा बारकाईनं पाहिले तर किती मोठा सुखद बदल होतो आहे, हे लक्षात येईल. याआधी मुलगी झाली तर खर्च कसा भागवायचा, यावर चर्चा होत असे. आपण तिला कसे शिक्षण देऊ, तिचे भावी आयुष्य एक प्रकारे ओझे असावे,  अशा प्रकारे चर्चा होत असत. आज मुलगी जन्माला येते तेव्हा विचारले जाते की सुकन्या समृद्धी खाते उघडले आहे की नाही. बदल झाला आहे.

सन्माननीय अध्यक्ष जी,

आधी प्रश्न असायचा की, जर तुम्ही गर्भवती झालात तर नोकरी करू शकाल का  ?   पण आज 26 आठवड्यांची पगारी रजा आहे आणि नंतरही रजा हवी असेल तर मिळेल, हा बदल आहे. महिला असल्यामुळे नोकरी का करायची आहे, असे प्रश्न पूर्वी समाजात विचारले जायचे,नवऱ्याचा पगार कमी पडतोय का, असेही प्रश्न असायचे. आज लोक विचारतात, मॅडम, तुमचा स्टार्टअप खूप प्रगती करत आहे, मला नोकरी मिळेल का? हा बदल आला आहे.

सन्माननीय अध्यक्ष जी,

एक काळ असा होता जेव्हा, मुलीचे वय वाढत आहे लग्न कधी करणार असा प्रश्न विचारला जायचा. आज विचारले जाते की,  मुली, तू वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही कामांमध्ये किती समतोल साधतेस, ते कसे काय करतेस ?

सन्माननीय अध्यक्ष जी,

एक वेळ अशी होती, घरात विचारले जायचे की घरमालक आहेत की नाही असे विचारले जायचे. घरच्या प्रमुखाला बोलवा, असे म्हटले जायचे. आज आपण कोणाच्या घरी गेलो की घर महिलेच्या नावावर असते आणि वीज देयक तिच्या नावावर येते. पाणी आणि गॅस सर्व काही तिच्या नावावर आहे, आज त्या कुटुंबाच्या प्रमुखाची जागा माझ्या माता-भगिनींनी घेतली आहे. हा बदल झाला आहे. हा बदल अमृत काळातील विकसित भारतासाठीच्या आमच्या संकल्पाचे मोठे सामर्थ्य म्हणून उदयास येणार आहे. आणि मला ते सामर्थ्य दिसत आहे.

सन्मानानीय अध्यक्ष महोदय,

शेतकऱ्यांसाठी अश्रू ढाळण्याची सवय मी खूप पाहिली आहे. शेतकऱ्यांसोबत कशाप्रकारचा विश्वासघात झाला आहे हे देशाने पाहिले आहे. काँग्रेसच्या काळात कृषी क्षेत्रासाठीची एकूण वार्षिक तरतूद 25 हजार कोटी रुपये होती आदरणीय अध्यक्ष महोदय, आमच्या सरकारची आर्थिक तरतूद सवा लाख कोटी रुपये आहे.

सन्माननीय अध्यक्ष जी,

काँग्रेसने आपल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांकडून 7 लाख कोटी रुपयांचे धान आणि गहू खरेदी केला होता. आम्ही 10 वर्षांत सुमारे 18 लाख कोटी रुपयांचे धान आणि गहू खरेदी केला आहे. काँग्रेस सरकारने नावापुरतीच डाळ आणि तेलबियांची खरेदी केली असेल. आम्ही 1.25 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या डाळी आणि तेलबियांची खरेदी केली आहे. आमच्या काँग्रेसच्या मित्रांनी पीएम किसान सन्मान निधीची खिल्ली उडवली आणि जेव्हा मी माझ्या पहिल्या कार्यकाळात ही योजना सुरू केली तेव्हा मला आठवते की, असत्य कथनाची फॅशन सुरू झाली आहे, गावागावात जाऊन सांगण्यात येत होते की, हे मोदींचे पैसे घेऊ नका. निवडणूक जिंकल्यानंतर तुमच्याकडून व्याजासह सर्व पैसे परत मागतील, असा खोटा प्रचार करण्यात आला. शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न झाला.

सन्माननीय अध्यक्ष जी,

आम्ही पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत 2 लाख 80 हजार कोटी रुपये पाठवले आहेत. पीएम पीक विमा योजनेअंतर्गत 30 हजार रुपयांचा प्रीमियम आणि त्यापोटी माझ्या शेतकरी बंधू-भगिनींना 1.5 लाख कोटी रुपये दिले आहेत. काँग्रेसच्या राजवटीत कधीही मच्छीमार आणि पशुपालकांचा विचारच केला गेला नाही. या देशात प्रथमच मच्छिमारांसाठी स्वतंत्र मंत्रालय आणि पशुसंवर्धनासाठी वेगळे मंत्रालय तयार करण्यात आले. पहिल्यांदाच पशुपालक आणि मच्छीमारांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात आले, जेणेकरून त्यांना कमी व्याजावर बँकांकडून पैसे मिळावेत, जेणेकरून ते त्यांचा व्यवसाय ते वाढवू शकतील. शेतकरी आणि मच्छिमारांना केवळ प्राण्यांचीच चिंता नसते तर तो त्यांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आर्थिक चक्र चालवण्यातही या पशूंचा मोठा वाटा आहे. आम्ही आपल्या पशूंना  लाळ्या खुरकूत आजारापासून वाचवण्यासाठी 50 कोटींहून अधिक लसी दिल्या आहेत, ज्याचा यापूर्वी कोणीही विचार केला नव्हता.

सन्माननीय अध्यक्ष जी,

आज भारतात तरुणांसाठी ज्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत, त्या पूर्वी कधीच निर्माण झाल्या नव्हत्या. आज संपूर्ण शब्दसंग्रह बदलला आहे, जे शब्द पूर्वी कधीच ऐकले नव्हते ते संवादासह जगात आले आहेत. आज सर्वत्र स्टार्टअप्सची चर्चा आहे, युनिकॉर्न चर्चेत आहेत. आज डिजिटल निर्मात्यांचा खूप मोठा वर्ग आपल्यासमोर आहे. आज हरित अर्थव्यवस्थेची चर्चा होत आहे. तरुणांच्या वाणीमध्ये नव्या भारताचा हा नवा शब्दसंग्रह आहे. हे नवीन आर्थिक साम्राज्याचे नवीन वातावरण आहे, नवीन ओळख आहे. ही क्षेत्रे तरुणांसाठी लाखो नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करत आहेत. 2014 पूर्वी डिजिटल अर्थव्यवस्थेचा आकार नगण्य होता, त्याची फारशी चर्चाही झाली नाही. आज भारत जगातील डिजिटल अर्थव्यवस्थेत आघाडीवर आहे. लाखो तरुण त्याच्याशी जोडले गेले आहेत आणि येणाऱ्या काळात ही डिजिटल इंडिया चळवळ देशातील तरुणांसाठी अनेक संधी, अनेक नोकऱ्या आणि अनेक व्यावसायिकांसाठी संधी घेऊन येणार आहे.

सन्माननीय अध्यक्ष जी,

आज मेड इन इंडिया फोन जगभर पोहोचत आहेत. जगात आपण दुसऱ्या क्रमांकावर आलो आहोत आणि एकीकडे स्वस्त मोबाईल फोन उपलब्ध झाले आहेत आणि दुसरीकडे स्वस्त डेटा, या दोन्ही गोष्टींमुळे मोठी क्रांती झाली आहे. देशात आणि जगात आज ज्या किंमतीला आम्ही आपल्या तरुणांना हे प्राप्त करून देत आहोत ते सर्वात कमी किमतीत ते देत आहोत आणि ते एक कारण बनले आहे. आज देश मेड इन इंडिया अभियान, विक्रमी उत्पादन, विक्रमी निर्यात पाहत आहे.

सन्माननीय अध्यक्ष जी,

ही सर्व कामे आपल्या तरुणांना सर्वाधिक रोजगार मिळवून देणारी आणि सर्वाधिक रोजगाराच्या संधी निर्माण करणारी आहेत.

सन्माननीय अध्यक्ष जी,

गेल्या 10 वर्षात पर्यटन क्षेत्रात अभूतपूर्व उभारी आली आहे. आपल्या देशातील ही वृद्धी आणि पर्यटन क्षेत्र असे आहे की कमीत कमी भांडवली गुंतवणुकीत जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी आहे. आणि सर्वसामान्यांनाही रोजगार देण्याची ही संधी आहे. पर्यटन हे स्वयंरोजगाराची सर्वाधिक क्षमता असलेले क्षेत्र आहे.

 

गेल्या 10 वर्षात पर्यटन क्षेत्रात अभूतपूर्व तेजी आली आहे. पर्यटन क्षेत्र असे आहे की त्यात कमीत कमी भांडवली गुंतवणुकीत जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी आणि सर्वसामान्यांनाही रोजगार देण्याची ही संधी आहे. पर्यटन हे स्वयंरोजगाराची सर्वाधिक क्षमता असलेले क्षेत्र आहे. गेल्या 10 वर्षात उभारण्यात आलेल्या विमानतळांची संख्या दुप्पट झाली आहे. भारतात केवळ विमानतळच उभारण्यात आले नाहीत, तर भारत हे जगातले तिसरे मोठे देशांतर्गत हवाई वाहतूक क्षेत्र बनले आहे. या गोष्टीचा आपणा सर्वांना आनंद झाला पाहिजे. भारताच्या हवाई वाहतूक कंपन्यांनी 1 हजार नव्या विमानांची ऑर्डर दिली आहे. देशात इतकी विमाने वाहतुकीसाठी उपलब्ध होऊ लागतील तेव्हा सारे विमानतळ किती झळाळून उठतील. कितीतरी  वैमानिकांची, कर्मचाऱ्यांची, अभियंत्यांची गरज भासेल. ग्राउंड सेवेसाठी लोक लागतील. म्हणजेच रोजगाराची  नव- नवी क्षेत्रे खुली होत आहेत. हवाई वाहतूक क्षेत्र भारतासाठी एक मोठी संधी म्हणून सामोरे आले आहे.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

अर्थव्यवस्था औपचारिक करण्याच्या दिशेने ठोस पावले उचलण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे. युवकांना नोकरी आणि सामाजिक सुरक्षा या दोन्ही गोष्टी मिळाव्यात यासह ज्या मुद्द्यांवर आधारित निर्णय आम्ही घेतला आणि देशातही मानला गेला तो म्हणजे ईपीएफओ डेटाचा. ईपीएफओचे 10 वर्षात सुमारे 18 कोटी नवे सदस्य झाले आहेत आणि ही तर थेट पैशाशी संबंधित बाब आहे. यामध्ये बनावट नावे नसतात. मुद्रा कर्ज घेणाऱ्यांमधे 8 कोटी लोक असे आहेत ज्यांनी आयुष्यात प्रथमच आपला व्यवसाय सुरू केला आहे. मुद्रा कर्ज घेतल्यानंतर स्वतःबरोबरच ती व्यक्ती आणखी एक किंवा दोन लोकांनाही रोजगार देते. आम्ही लाखो फेरीवाल्यांना सहाय्य केले आहे. 10 कोटी महिलाही अशा बाबींशी जोडल्या गेल्या आहेत. मी सांगितले आहे त्याप्रमाणे, एक लाख लखपती दीदी आहेत. एक कोटी, ही मोठी संख्या आहे आणि मी म्हटले आहे त्याप्रमाणे आपण आपल्या  देशात 3 कोटी लखपती दीदी पाहाल.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

काही आकडेवारी फक्त तज्ज्ञांनाच नाही तर  सामान्य जनतेलाही समजते. 2014 पूर्वी 10 वर्षांच्या पायाभूत सुविधा निर्मितीसाठी सुमारे 12 लाख कोटी रुपयांचे बजेट होते. म्हणजे 10 वर्षात 12 लाख कोटी रुपये. गेल्या दहा वर्षात पायाभूत सुविधा निर्मितीसाठीचे बजेट 44 लाख कोटी होते. रोजगारात कशी वाढ होते हे यातून तुम्हाला समजेल.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

या रकमेतून किती मोठ्या प्रमाणात काम झाले आहे, त्यातून किती जणांना रोजी-रोटी मिळाली आहे याचा आपण अंदाज बांधू शकाल. भारत उत्पादनाचे, संशोधनाचे, नवोन्मेशाचे केंद्र बनावे यासाठी आम्ही देशाच्या युवा शक्तीला प्रोत्साहन देत आहोत. व्यवस्था विकसित करत आहोत. आर्थिक मदतीच्या योजना आखत आहोत.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

उर्जा क्षेत्रात आपण नेहमीच दुसऱ्यांवर अवलंबून राहिलो आहोत. उर्जा क्षेत्रात आपल्याला आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने खूप काही करण्याची आवश्यकता आहे. हरित उर्जेच्या दिशेने, हायड्रोजन संदर्भात आपण मोठ्या प्रमाणात आगेकूच करत आहोत, त्यामध्ये अभूतपूर्व गुंतवणूक होत आहे. अशाच प्रकारे ज्यामध्ये भारताला आघाडी घ्यावी लागेल असे दुसरे क्षेत्र आहे सेमीकंडक्टर. पूर्वीच्या सरकारांनी प्रयत्न केले, पण त्यांना त्यात यश मिळाले नाही. आता आपण ज्या स्थितीमध्ये आहोत, आपली तीन दशके भले खराब राहिली असतील, मात्र येणारा काळ आपलाच आहे हे मी खात्रीने सांगतो. सेमीकंडक्टर क्षेत्रात मी अभूतपूर्व गुंतवणूक पहात आहे आणि भारत या क्षेत्रात जगासाठी मोठे योगदान देईल. या सर्व कारणांमुळे, आदरणीय अध्यक्ष महाराज, दर्जेदार रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. आम्ही कौशल्य मंत्रालय हे एक वेगळे मंत्रालय निर्माण केले आहे. त्यामागे देशातल्या युवकांना कौशल्य प्राप्त व्हावे आणि संधी मिळाव्यात हाच  उद्देश आहे. औद्योगिक क्रांती 4.0 साठी मनुष्यबळ सज्ज करत आम्ही पुढच्या दिशेने काम करत आहोत.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

महागाईबाबत इथे खूप काही बोलले गेले. मी देशासमोर सत्य परिस्थिती मांडू इच्छितो. काँग्रेस येते तेव्हा महागाई घेऊन येते, याला इतिहास साक्ष आहे. मी या सदनात सांगू इच्छितो की मी कोणावर टीका करत नाही. आम्ही सांगतो ते ज्यांना समजत नाही ते कदाचित आपल्या लोकांचे म्हणणे समजून घ्यायचा प्रयत्न करतील. कधी म्हटले गेले होते आणि कोणी म्हटले होते ते मी नंतर सांगेन. ‘प्रत्येक गोष्टीची किंमत वाढल्याने समस्या निर्माण झाल्या आहेत आणि सर्वसामान्य जनता त्यात अडकली आहे’. हे पंडित नेहरूंनी त्या वेळी लाल किल्यावरून सांगितले होते. ‘प्रत्येक गोष्टीची किंमत वाढल्याने समस्या निर्माण झाल्या आहेत आणि  सर्वसामान्य जनता त्यात अडकली आहे’, ही त्या काळातली गोष्ट आहे. महागाई वाढली आहे हे त्यांनी लाल किल्ल्यावरुन मान्य केले होते. आता या वक्तव्यानंतर 10 वर्षांनंतरचे त्यांचेच आणखी एक वक्तव्य मी आपल्यासमोर मांडतो. त्यात ते म्हणतात, ‘सध्या आपण काही समस्यांमध्ये आहोत, त्रासात आहोत, महागाईमुळे काही विवशता आहे. महागाई पूर्णपणे आटोक्यात येत नाही. मात्र ती आटोक्यात येईल’. 10 वर्षानंतरही ते महागाईचा हाच सूर आळवत होते आणि हे कोणी म्हटले आहे, तर नेहरूंनीच त्यांच्याच कार्यकाळात म्हटले आहे. तेव्हा देशाच्या पंतप्रधानपदी राहून त्यांना 12 वर्षे झाली होती मात्र ते दर वेळी महागाई आटोक्यात येत नाही, महागाईमुळे आपल्याला समस्या येत आहेत, हाच सूर आळवत राहिले.     

आदरणीय अध्यक्ष महोदय,

आता मी आणखी एका भाषणाचा भाग वाचून दाखवत आहे. देश आगेकूच करत असतो तेव्हा काही प्रमाणात किंमतीही वाढतात. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कशा आटोक्यात राहतील हे आपल्याला पहायचे आहे, असे इंदिरा गांधी यांनी म्हटले होते. 1974 मध्ये त्यांनी संपूर्ण देशातले सारे दरवाजे बंद केले होते, लोकांना तुरुंगात टाकले होते. महागाई थोडीथोडकी नाही, 30 टक्के होती.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

भाषणात काय म्हटले होते, त्याने आपण आश्चर्यचकित व्हाल. त्यांनी म्हटले होते, पीक घ्यायला जमीन नसेल तर कुंड्या आणि डब्यात भाज्या पिकवा. असे सल्ले उच्च पदावर बसलेले लोक देत असत. आपल्या देशात महागाई संदर्भात 2 गाणी गाजत होती, घरा-घरात म्हटली जात होती. एक म्हणजे, 'महंगाई मार गई' आणि दुसरे 'महंगाई डायन खाय जात है।' ही दोन्ही गाणी काँग्रेसच्या शासन काळात आली.

माननीय अध्यक्ष महोदय,

संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या कार्यकाळात महागाई दुपटीने वाढली होती, हे आपण नाकारू शकत नाही. यूपीए सरकारचे म्हणणे काय होते...  असंवेदनशीलता. महागडे आईस्क्रीम खाऊ शकत असाल तर महागाईच्या नावाने गळे का काढता, असे सांगितले गेले होते. जेव्हा जेव्हा काँग्रेसचे सरकार आले तेव्हा तेव्हा महागाईच वाढली आहे.

माननीय अध्यक्ष महोदय,

आमच्या सरकारने महागाईवर सातत्याने नियंत्रण ठेवले आहे. दोन-दोन युद्धांनंतरही आणि शंभर वर्षातून एकदा आलेल्या महासंकटानंतरही (कोरोना) महागाई नियंत्रणात आहे आणि आम्ही हे करू शकलो आहोत.

माननीय अध्यक्ष महोदय,

इथे खूप राग व्यक्त केला गेला, जितका शक्य होईल तितक्या कठोर शब्दांमध्ये राग व्यक्त केला गेला. त्यांचे दुःख मी समजतो. त्यांची अडचण आणि राग मी समजतो, कारण बाण वर्मी लागला आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक संस्था भ्रष्टाचारावर कारवाई करत आहेत. यामुळे देखील किती राग… काय काय शब्दांचा प्रयोग केला जात आहे!

माननीय अध्यक्ष महोदय,

दहा वर्षांपूर्वी, आपल्या सभागृहात, संसदेत काय चर्चा व्हायची! सभागृहाचा संपूर्ण वेळ घोटाळ्यांवर चर्चा करण्यात वाया जात असे. भ्रष्टाचारावरील चर्चेत जात असे. सतत, कारवाईची मागणी होत असे. सभागृहाची नेहमी हीच मागणी असे, कारवाई करा… कारवाई करा… कारवाई करा! हा कालखंड देशाने पाहिला आहे. चहू दिशांना भ्रष्टाचाराच्याच बातम्या, रोजच्याच झाल्या होत्या. आणि आज भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई केली जात आहे, तर लोक त्यांच्या समर्थनार्थ गोंधळ घालत आहेत.

माननीय अध्यक्ष महोदय,

त्यांच्या काळात, भ्रष्टाचार प्रतिबंधक संस्थांचा वापर केवळ राजकीय हेतूंसाठी केला जात असे. त्यांना इतर कोणतेही काम करू दिले जात नसे. आता त्यांच्या काळात काय घडले ते तुम्ही पाहा. पीएमएलए कायद्यांतर्गत, आम्ही पूर्वीपेक्षा दुप्पट प्रकरणे नोंदवली आहेत. काँग्रेसच्या काळात ईडीने 5 हजार कोटींची संपत्ती जप्त केली होती. आमच्या कार्यकाळात ईडीने 1 लाख कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली, देशाची लुबाडलेली ही संपत्ती परत करावी लागेल. आणि ज्यांचा माल प्रचंड प्रमाणात पकडला जातो, त्यांच्याकडून चलनी नोटांच्या राशी जप्त केल्या जातात…  अधीर बाबू बंगालमधून आले आहेत… नोटांच्या राशी त्यांनी तर पाहिल्या आहेत.  कुणाकुणाच्या घरातून त्या मिळाल्या होत्या, कोणत्या राज्यात पकडण्यात आल्या! नोटांच्या या राशीच राशी पाहून देश स्तंभित झाला आहे. पण आता तुम्ही जनतेला मूर्ख बनवू शकत नाही, जनता पाहत आहे की यूपीए सरकारमध्ये भ्रष्टाचार कसा झाला, त्याची एकूण रक्कम 10-15 लाख कोटी रुपये होती, अशी कुजबूज झाली.

आम्ही लाखो कोटींचे घोटाळे थांबवले, पण ते सगळे पैसे गरिबांच्या कल्याणासाठी वापरले. आता गरिबांना लुटणे दलालांना अवघड झाले आहे. आम्ही थेट लाभ हस्तांतरण, जन धन खाते, आधार, मोबाइलची ताकद ओळखली आहे. 30 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम, आम्ही लोकांच्या खात्यात थेट हस्तांतरीत केली आहे. आणि एक रुपया पाठवलात तर 15 पैसे पोहोचतात, असे एका काँग्रेसच्या पंतप्रधानाने सांगितले होते. त्यानुसार बघायचे झाले, तर आम्ही जे 30 लाख रुपये पाठवले आहेत. त्यांचा कार्यकाळ असता तर किती पैसे कुठे गेले असते याचा हिशेब करा! लोकांपर्यंत 15 टक्केच जेमतेम पोहोचले असते, बाकीचे कुठे गेले असते?

माननीय अध्यक्ष महोदय,

आम्ही 10 कोटी खोटी नावे काढून टाकली, आता लोक विचारतात की, पूर्वी ही संख्या इतकी होती, ती का कमी झाली? तुम्ही अशी व्यवस्था केली होती की, ज्या मुलीचा जन्मच झाला नाही, तिला तुमच्याकडून विधवा पेन्शन देण्यात आली. अशा सरकारी योजनांचा दुरुपयोग करण्याचे जे मार्ग होते, 10 कोटी बनावट नावे आम्ही काढून टाकली ही जी दुखरी नस आहे ना, ती याबाबतीतली आहे. कारण त्यांचे रोजचे उत्पन्न बंद झाले आहे.

माननीय अध्यक्ष महोदय,

ही बनावट नावे हटवल्यामुळे जवळपास तीन लाख कोटी रुपये बनावट लोकांच्या हाती लागण्यापासून वाचले आहेत. अयोग्य लोकांच्या हातामध्ये जाण्यापासून राहिले आहेत. देशातील करदात्याची पै न पै वाचवणे आणि योग्य त्या कामासाठी वापरणे यासाठी आम्ही आमचे जीवन पणाला लावत आहोत.

माननीय अध्यक्ष महोदय,

सर्व राजकीय पक्षांनीही विचार करण्याची गरज आहे. समाजातील लोकांनीही याकडे पाहण्याची गरज आहे. आज देशाचे दुर्दैव आहे की, याआधी वर्गातही कोणी चोरी किंवा कॉपी केली, तर ते 10 दिवस कोणाला तोंड दाखवत नसत. आज ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, ज्यांच्यावर सिद्ध झाले आहेत, जे तुरुंगवास भोगून पॅरोलवर बाहेर आले आहेत, आज अशा चोर लोकांचे सार्वजनिक जीवनात वॉशिंग मशीनने शुभ्रता येणार नाही एवढे उदात्तीकरण केले जात आहे. तुम्ही देश कुठे घेऊन जात आहात? शिक्षा झाली, आरोप झाले आहेत इथपर्यंत ठीक आहे… याबद्दल तुम्ही विचार करू शकता हे मी समजू शकतो, पण ज्यांचे गुन्हे सिद्ध झाले आहेत, ज्यांना शिक्षा झाली आहे, जे शिक्षा भोगत आहेत... तुम्ही अशांचाही महिमा गाता!  देशाच्या भावी पिढीला तुम्हाला कोणती संस्कृती आणि कोणती प्रेरणा द्यायची आहे? कोणते असे मार्ग आहेत आणि तुम्हाला अशी कोणती असहाय्यता  आहे? आणि अशा लोकांचा मानसन्मान  केला जात आहे, त्यांना महान म्हटले जात आहे. जिथे राज्यघटनेचे राज्य आहे, जिथे लोकशाही आहे, माननीय  अध्यक्ष महोदय, तिथे अशा गोष्टी फार काळ चालू शकत नाहीत, हे लोकांनी लिहून ठेवावे. हा जो ज्यांचा उदोउदो सुरू आहे, ते लोक स्वत:च स्वतःची कबर खोदत आहेत.

माननीय अध्यक्ष महोदय,

तपास करणे हे तपास यंत्रणांचे काम आहे. या संस्था स्वतंत्र आहेत आणि संविधानाने त्यांना स्वतंत्र ठेवले आहे. न्याय देणे हे न्यायाधीशांचे काम आहे आणि ते त्यांचे काम करत आहेत. अध्यक्ष महोदय, या पवित्र सभागृहात मी पुनरुच्चार करू इच्छितो की माझ्यावर कितीही अन्याय झाला, टीका झाली तरी भ्रष्टाचाराविरुद्धचा माझा लढा सुरूच राहील. ज्यांनी देश लुटला त्यांना लूट परत करावीच लागेल, ज्यांनी देश लुबाडला आहे त्यांना परत करावेच लागेल. या सभागृहाच्या पवित्र स्थानावरून मी देशाला हे वचन देतो. ज्यांना जे आरोप करायचे असतील त्यांनी ते करावेत, पण देश लुटू देणार नाही आणि जे लुटले गेले ते परत करावेच लागेल.

माननीय अध्यक्ष महोदय,

देश सुरक्षितता आणि शांतता अनुभवत आहे. गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत सुरक्षेच्या बाबतीत आज देश खरोखरच समर्थ झाला आहे. दहशतवाद आणि नक्षलवाद आता एका छोट्या क्षेत्रापुरता मर्यादित राहिला आहे. मात्र दहशतवादाबाबत भारताच्या शून्य सहिष्णुता धोरणामुळे आज संपूर्ण जगाला भारताच्या या धोरणाच्या दिशेने चालणे भाग पडत आहे. सीमांपासून ते समुद्रापर्यंत आज, भारताचे सैन्य त्याच्या सामर्थ्यासाठी ओळखले जात आहे. आपल्या सैन्याच्या शौर्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी माझा माझ्या सैन्यावर विश्वास आहे, त्यांचे सामर्थ्य मी पाहिले आहे. काही राजकीय नेते सैन्याबद्दल अपशब्द वापरतील आणि त्याने माझ्या देशाचे सैन्य खचून जाईल, अशी कोणी स्वप्ने पाहत असेल तर विसरून जा. देशाचा मूड ते बिघडवू शकत नाही आणि कोणाचे तरी एजंट बनून कुठूनही अशा प्रकारची भाषा वापरली जात असेल तर देश कधीच ते स्वीकारू शकत नाही. जे खुलेआम देशाचे विभाजन करून स्वतंत्र देश निर्माण करण्याचे समर्थन करतात, जोडण्याचे सोडा, तोडण्याचे प्रयत्न करतात... तुमच्या आत काय दडले आहे? इतके तुकडे करूनही तुमचे मन तृप्त झाले नाही का? तुम्ही देशाचे इतके तुकडे केलेत, तुम्हाला आणखी तुकडे करायचे आहेत, आणखी किती काळ असे करत राहणार आहात?

माननीय अध्यक्ष महोदय,

या सभागृहात काश्मीरवर चर्चा व्हायची, तर नेहमी चिंतेचा सूर यायचा. हेटाळणी व्हायची, आरोप-प्रत्यारोप व्हायचे. आज जम्मू-काश्मीरमध्ये अभूतपूर्व विकासाची चर्चा होत आहे आणि अभिमानाने होत आहे. पर्यटनात सातत्याने वाढ होत आहे. जी 20 शिखर परिषद तिथे होते, आज संपूर्ण जग त्याचे कौतुक करत आहे. कलम 370 बाबत त्यांनी काय हाहाकार माजवला होता. काश्मिरच्या जनतेने ज्या पद्धतीने ते स्वीकारले आहे, आणि शेवटी ही समस्या कोणामुळे उद्भवली होती? देशाच्या मस्तकावर कुणी प्रहार केला होता? भारताच्या राज्यघटनेत अशा प्रकारची दरी कोणी निर्माण केली होती ?

माननीय अध्यक्ष महोदय,

नेहरूजींचे नाव घेतले तर त्यांना वाईट वाटते, परंतु काश्मीरला ज्या समस्यांना सामोरे जावे लागले त्याच्या मुळाशी त्यांची विचारसरणी होती आणि त्याचेच परिणाम या देशाला भोगावे लागत आहेत. जम्मू-काश्मीरच्या जनतेला आणि देशातील जनतेला नेहरूजींच्या चुकांची खूप मोठी किंमत चुकवावी लागली आहे.

माननीय अध्यक्ष महोदय,

त्यांच्याकडून भले चुका झाल्या असतील, मात्र अडचणींचा सामना करूनही चुका सुधारण्यासाठी आमचे प्रयत्न सुरूच राहतील. आम्ही थांबणार नाही. आम्ही देशासाठी काम करण्यासाठी बाहेर पडलेले लोक आहोत. आमच्यासाठी राष्ट्र प्रथम आहे.

माननीय अध्यक्ष महोदय,

मी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना विनंती करतो, मी सर्व सन्माननीय सदस्यांना विनंती करतो, भारताच्या जीवनात एक मोठी संधी आली आहे. जागतिक स्तरावर  भारतासाठी मोठी संधी आली आहे, नव्या आत्मविश्वासाने पुढे जाण्याची संधी चालून आली आहे. राजकारण असते, आरोप-प्रत्यारोप असतात, मात्र देशापेक्षा मोठे काहीही नसते. आणि म्हणूनच या, मी तुम्हाला निमंत्रण देतो, देशाच्या उभारणीसाठी खांद्याला खांदा लावून पुढे जाऊ या. राजकारणात कुठेही असलात तरी राष्ट्र उभारणीसाठी पुढे जाण्यात कोणताही अडथळा येत नाही. तुम्ही हा मार्ग सोडू नका. मला तुमची साथ हवी आहे. भारत मातेच्या कल्याणासाठी मी तुमची साथ मागत आहे. जगात आलेल्या संधीचे सोने करण्यासाठी मला तुमची साथ हवी आहे. 140 कोटी देशवासीयांचे जीवन अधिक समृद्ध आणि आनंदी करण्यासाठी मला तुमचे सहकार्य हवे आहे. मात्र तुम्ही सहकार्य करू शकत नसाल आणि तुमचा हात विटा फेकण्यासाठीच असेल तर तुम्ही लिहून ठेवा, मी तुमची प्रत्येक वीट विकसित भारताचा पाया मजबूत करण्यासाठी उचलेन. तुमचा प्रत्येक दगड मी विकसित भारताची जी स्वप्ने आम्ही पाहत आहोत, त्या स्वप्नाचा पाया मजबूत करण्यासाठी वापरेन आणि देशाला त्या समृद्धीच्य दिशेने आम्ही घेऊन जाऊ. तुम्हाला जितकी दगडफेक करायची आहे करा, मी तुम्हाला खात्री देतो की तुमचा प्रत्येक दगड भारताचे, समृद्ध भारताचे, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी मी वापरात आणेन.

माननीय अध्यक्ष महोदय,

माझ्या सहकाऱ्यांच्या समस्या मी जाणतो. मात्र ते जे काही बोलतात त्याने मी दु:खी होत नाही आणि दु:खी होऊ देखील नये. कारण मला माहित आहे की ते नामदार आहेत, आम्ही कामगार आहोत. आणि आम्हा कामगारांना नामदारांकडून ऐकावेच लागते. त्यामुळे नामदार काहीही बोलू द्या, त्यांना काहीही बोलण्याचा जन्मजात अधिकार आहे आणि आम्हा कार्यकर्त्यांनी ऐकायचे असते, आम्ही ऐकत राहू आणि देशाला सावरत राहू आणि देशाला पुढे नेत राहू.

माननीय अध्यक्ष महोदय,

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचे समर्थन करण्यासाठी तुम्ही मला या पवित्र सभागृहात बोलण्याची संधी दिली. आदरणीय राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला समर्थन देत आणि आभारदर्शक प्रस्तावाबद्दल आभार व्यक्त करून मी माझे भाषण संपवतो.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet extends One-Time Special Package for DAP fertilisers to farmers

Media Coverage

Cabinet extends One-Time Special Package for DAP fertilisers to farmers
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
We strongly condemn the cowardly terrorist attack in New Orleans: Prime Minister
January 02, 2025

Terming the terrorist attack in New Orleans as cowardly, the Prime Minister today strongly condemned it.

In a post on X, he said:

“We strongly condemn the cowardly terrorist attack in New Orleans. Our thoughts and prayers are with the victims and their families. May they find strength and solace as they heal from this tragedy.”