अमृत काळातील हा पहिला अर्थसंकल्प विकसित भारताचा भव्य संकल्प पूर्ण करण्यासाठी एक मजबूत पाया तयार करेल. हा अर्थसंकल्प वंचितांना प्राधान्य देतो. हा अर्थसंकल्प आजचा आकांक्षित समाज- गाव-गरीब, शेतकरी, मधम वर्ग, सर्वांची स्वप्न पूर्ण करेल.
या ऐतिहासिक अर्थसंकल्पाबद्दल मी अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी आणि त्यांच्या संपूर्ण चमूचं अभिनंदन करतो.
मित्रहो,
परंपरेनुसार, आपले हात, अवजारं आणि उपकरणं वापरून काही ना काही निर्माण करणारे करोडो विश्वकर्मा या देशाचे निर्माते आहेत. लोहार, सोनार, कुंभार, सुतार, शिल्पकार, कारागीर, गवंडी अशा असंख्य लोकांची मोठी यादी आहे. या सर्व विश्वकर्मांची मेहनत आणि सृजनासाठी, देश यंदा पहिल्यांदाच या अर्थसंकल्पात अनेक प्रोत्साहनपर योजना घेऊन आला आहे. अशा लोकांसाठी प्रशिक्षण, तंत्रज्ञान, कर्ज आणि बाजार सहाय्य याची व्यवस्था करण्यात आली आहे. पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान, म्हणजेच पीएम विकास, कोट्यवधी विश्वकर्मांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणेल.
मित्रांनो,
शहरी भागातल्या महिला असोत, की गावात राहणाऱ्या महिला असोत, कामकाजात नोकरीत व्यस्त महिला असोत, की घर कामात व्यस्त महिला असोत, त्यांच जीवन सुकर करण्यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये सरकारने अनेक पावलं उचलली आहेत. जल जीवन मिशन असो, उज्ज्वला योजना असो, पीएम-आवास योजना असो, अशी अनेक पावलं आहेत, या सर्व प्रयत्नांना मोठ्या ताकतीनं पुढे नेलं जाईल. त्याबरोबरच, महिला सेल्फ हेल्प ग्रुप (बचत गट) या मोठ्या सामर्थ्यशाली क्षेत्रानं आज भारतात मोठं स्थान मिळवलं आहे, त्यांना जर थोडंसं बळ मिळालं, तर ते चमत्कार करू शकेल. आणि म्हणूनच, महिला बचत गट हा उपक्रम महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा एकदा नव्यानं या अर्थसंकल्पाला मोठा आयाम देणार आहे. महिलांसाठी एक विशेष बचत योजना देखील सुरु केली जाणार आहे. आणि जन धन खात्या नंतर ही विशेष बचत योजना सामान्य कुटुंबातल्या महिला, माता-भगिनींना मोठं बळ देणार आहे.
हा अर्थसंकल्प सहकार क्षेत्राला ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासाचा परीघ बनणारा आहे. सरकारने सहकार क्षेत्रामध्ये जगातील सर्वात मोठी अन्नधान्य भंडार योजना बनवली आहे - ही साठवण क्षमता आहे. अर्थसंकल्पामध्ये नवीन प्राथमिक सहकारी संस्था बनविण्याच्या एका महत्वाकांक्षी योजनेचीही घोषणा करण्यात आली आहे. त्या योजनेमुळे शेतीबरोबरच दूध आणि मासे उत्पादन क्षेत्राचा विस्तार होवू शकेल. शेतकरी बांधव, पशुपालक आणि मच्छीमार यांना आपल्या उत्पादनाला अधिक चांगला दर मिळेल.
मित्रांनो,
आता आपल्याला डिजिटल पेमेंटला मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती कृषी क्षेत्रामध्ये करायची आहे. म्हणूनच या अंदाजपत्रकामध्ये आम्ही डिजिटल कृषी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी एक खूप मोठी योजना घेवून आलो आहोत. यंदा संपूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे केले जात आहे. भारतामध्ये भरड धान्याचे अनेक प्रकार आहेत, त्यांना अनेक नावेही आहेत. आज ज्यावेळी घरोघरी ही भरडधान्ये पोहोचत आहेत, संपूर्ण जगामध्ये लोकप्रिय होत आहेत, त्याचा सर्वाधिक लाभ भारतातल्या अल्प भूधारक शेतकरी बांधवांच्या नशिबात असणार आहे. आणि म्हणूनच आता, या गोष्टी नाविन्यपूर्ण पद्धतीने पुढे घेवून जाण्याची आवश्यकता आहे. भरड धान्याला एक नवीन ओळख, विशेष परिचय मिळणे, गरजेचे आहे. म्हणूनच आता या सुपर-फूडचे ‘श्री-अन्न’ असे नवीन नामाभिधान करण्यात आले आहे. श्री-अन्न वापराला प्रोत्साहन देण्यासाठीही अनेक योजना बनविण्यात आल्या आहेत. श्री-अन्नला प्राधान्य देण्यात आल्यामुळे देशातल्या लहान शेतकरी बांधवांना, शेती करणा-या आपल्या आदिवासी बंधू-भगिनींना आर्थिक पाठबळ मिळेल आणि देशवासियांना एक आरोग्यपूर्ण जीवन मिळेल.
मित्रांनो,
हा अर्थसंकल्प शाश्वत भविष्यासाठी आहे, हरित विकास, हरित अर्थव्यवस्था, हरित ऊर्जा, हरित पायाभूत सुविधा आणि हरित नोक-या यांच्यामध्ये एक अभूतपूर्व विस्तार करणारा आहे. अर्थसंकल्पामध्ये आम्ही तंत्रज्ञान आणि नवीन अर्थव्यवस्थेवर खूप जास्त भर दिला आहे. आकांक्षित भारत, आज रस्ते, रेलमार्ग, मेट्रो, बंदर, जलमार्ग अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करू इच्छितो. ‘नेक्स्ट जनरेशन इन्फास्ट्रक्चर‘ पाहिजे. 2014 च्या तुलनेमध्ये पायाभूत सुविधांवरील गुंतवणूकीमध्ये 400 टक्के जास्त वृद्धी केली आहे. यावेळी पायाभूत सुविधांवर होणारी दहा लाख कोटी इतकी प्रचंड, अभूतपूर्व गुंतवणूक, भारताच्या विकासाला नवीन ऊर्जा देईल आणि देशाला अधिक वेगवान बनवणार आहे. या गुंतवणूकीमुळे युवकांना रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. एका खूप मोठ्या लोकसंख्येला उत्पन्न कमावण्याच्या नवीन संधी उपलब्ध होतील. या अंदाजपत्रकामध्ये ईज ऑफ डुइंग बिझनेस म्हणजे उद्योग सुलभतेबरोबरच आपल्या उद्योगांसाठी पत पुरवठ्याचे पाठबळ आणि सुधारणा अभियानाला पुढे नेण्यात आले आहे. एमएसएमईसाठी 2लाख कोटी रूपयांच्या अतिरिक्त कर्जाची हमी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आता अनुमानित प्राप्तीकराची मर्यादा वाढविण्यात आल्यामुळे एमएसएमईच्या विकासाला मदत मिळेल. मोठ्या कंपन्यांकडून एमएसएमईला वेळेवर पेमेंट मिळावे, यासाठी नवीन व्यवस्था बनविण्यात आली आहे.
मित्रांनो,
अतिशय वेगाने परिवर्तन होत असलेल्या भारतामध्ये मध्यम वर्ग, विकास असो अथवा व्यवस्था असो, साहस असो किंवा संकल्प करण्याचे सामर्थ्य असो, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आज भारतातला मध्यम वर्ग एक मुख्य प्रवाह बनला आहे. समृद्ध आणि विकसित भारताच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मध्यम वर्ग एक खूप मोठी ताकद आहे. ज्याप्रमाणे भारतातील युवा शक्ती म्हणजे भारताचे विशेष सामर्थ्य आहे, तशाच प्रकारे पुढची मार्गक्रमणा करणा-या भारतामध्ये मध्यम वर्ग ही खूप मोठी शक्ती आहे. मध्यम वर्गाला सशक्त बनविण्यासाठी आमच्या सरकारने गेल्या वर्षांमध्ये अनेक निर्णय घेतले आहेत आणि ‘ईज ऑफ लिव्हिंग’ सुनिश्चित केले आहे. आम्ही प्राप्ती कराचे दर कमी केले आहेत, त्याचबरोबर प्रक्रिया अधिकाधिक सोपी-सुलभ, पारदर्शक आणि वेगवान बनवली आहे. नेहमीच मध्यम वर्गाबरोबर उभे राहणा-या आमच्या सरकारने मध्यम वर्गाला प्राप्तीकरामध्ये मोठा दिलासा दिला आहे. या सर्वस्पर्शी आणि विकसित भारताच्या निर्माणाला वेग देणा-या अर्थसंकल्पासाठी मी पुन्हा एकदा निर्मला जींचे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन करतो आणि देशवासियांचेही अभिनंदन करून त्याबरोबर त्यांना आवाहन करतो, ‘या, आता नवीन अर्थसंकल्प तुमच्यासमोर आहे, नवीन संकल्प करून पुढे जावूया. 2047 मध्ये समृद्ध भारत, समर्थ भारत, सर्व प्रकारांनी संपन्न भारत आपण तयार करूया. चला, या; या वाटचालीत, प्रवासात आपण पुढे जाऊ या. खूप -खूप धन्यवाद !!