नमस्कार मित्रांनो,
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. आपण 15 ऑगस्ट पूर्वी भेटलो होतो, त्यामुळे हे सत्र महत्वाचं आहे. 15 ऑगस्टला आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि आता आपण सर्वजण अमृतकाळाच्या यात्रेत पुढे निघालो आहोत. आज आपण अशा वेळी भेटलो आहोत, जेव्हा देशाला, आपल्या भारताला जी-20 च्या अध्यक्षपदाचा सन्मान मिळाला आहे. जागतिक समुदायात ज्या प्रकारे भारताचं स्थान निर्माण झालं आहे, ज्याप्रकारे भारताकडून अपेक्षा वाढल्या आहेत आणि ज्याप्रकारे भारत जागतिक स्तरावर आपला सहभाग वाढवत आहे, अशा वेळी हे जी-20 चं अध्यक्षपद भारताला मिळणं ही एक खूप मोठी संधी आहे.
ही जी-20 परिषद म्हणजे केवळ एक राजनैतिक कार्यक्रम नाही, तर ही जी-20 परिषद भारताचं सामर्थ्य जगासमोर पूर्णपणे प्रदर्शित करण्याची संधी आहे. एवढा मोठा देश, लोकशाहीची जननी, एवढी विविधता, एवढं सामर्थ्य असलेल्या भारताला संपूर्ण जगाने जाणून घेण्याची एक खूप मोठी संधी आहे, आणि भारताला आपलं सामर्थ्य संपूर्ण जगासमोर दाखवण्याचीही खूप मोठी संधी आहे.
गेल्या काही दिवसांत, सर्व पक्षांच्या अध्यक्षांबरोबर माझी अत्यंत अनुकूल वातावरणात चर्चा झाली आहे. सभागृहातही त्याचं प्रतिबिंब नक्कीच दिसून येईल. सदनातूनही तोच स्वर निनादेल, जो जगासमोर भारताचं सामर्थ्य जगासमोर आणण्यास उपयोगी ठरेल. या सत्रात देशाला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी वर्तमानातल्या जागतिक परिस्थितीत, भारताला पुढे जाण्यासाठीचा नव्या संधी लक्षात घेऊन अनेक महत्वाचे निर्णय या सत्रात घेण्याचा प्रयत्न केला जाईल. मला विश्वास आहे की सर्व राजकीय पक्ष चर्चेमध्ये मोलाची भर घालतील, आपल्या विचारांनी निर्णयांना नवीन बळ देतील, दिशा अधिक स्पष्टपणे निश्चित करायला मदत करतील. संसदेच्या या सत्राचा जो कार्यकाळ शिल्लक आहे, सर्व पक्षांच्या नेत्यांना आणि कार्यरत असलेल्या सर्व नेत्यांना मी विनंती करू इच्छितो की, जे पहिल्यांदाच संसदेत आले आहे, जे नवीन खासदार आहेत, जे युवा खासदार आहेत, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि लोकशाहीची भावी पिढी तयार करण्यासाठी आपण त्या सर्वांना जास्तीत जास्त संधी देऊ, चर्चांमध्ये त्यांचा सहभाग वाढवा.
गेल्या काही दिवसांपासून सर्व पक्षांच्याच कोणत्या ना कोणत्या खासदाराशी माझी जेव्हा जेव्हा अनौपचारिक चर्चा जेव्हा झाली आहे, तेव्हा सर्व खासदार एकच बाब मला सांगतात, सभागृहात प्रचंड गोंधळ होतो आणि मग सभागृहाचं कामकाज स्थगित होते. त्यामुळे आम्हा खासदारांचे खूपच नुकसान होते. युवा खासदारांचे असे म्हणणे आहे की, सभागृहाचे कामकाज होत नसल्याने तसेच चर्चाच होत नसल्याने इथे आम्हाला जे शिकायचे आहे, जे समजून घ्यायचे आहे, ते मिळतच नाही. कारण ही संसद म्हणजे लोकशाहीचे सर्वात मोठे विद्यापीठ आहे. त्या शिक्षणापासून आम्ही वंचितच रहातो. आम्हाला ते सद्भाग्य मिळत नाही आणि म्हणून सभागृहाचे कामकाज चालणे अत्यंत आवश्यक आहे. असाच सुर सर्वच पक्षांच्या युवा खासदारांकडून व्यक्त झालेला दिसतो.
मला असं वाटतं की विरोधी पक्षांच्या खासदारांचेही असेच म्हणणे आहे की चर्चेत आम्हाला बोलण्याची संधी मिळत नाही.गदारोळ होतो, सभागृहाचे कामकाज तहकूब होते, प्रचंड गोंधळ होतो आणि आमचे खूप नुकसान होते. मला असे वाटते की सर्व सभागृह नेते, सर्व पक्षांचे नेते हे आमच्या या खासदारांची वेदना समजून घेतील. त्यांच्या स्वतःच्या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी स्वतःचे सामर्थ्य कारणी लावण्याचा त्यांच्यात जो उत्साह आहे, जी उमेद आहे, त्यांचा जो अनुभव आहे, त्या सर्वांचा लाभ देशाला मिळावा. निर्णयप्रक्रियेला मिळावा, निर्णयांमध्ये त्याचा लाभ मिळावा, हे लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक आहे. मी सर्व राजकीय पक्ष, सर्व खासदारांना असा आग्रहपूर्वक सांगेन की, हे अधिवेशनाचे सत्र जास्तीत जास्त कार्यक्षम आणि फलदायी बनवण्यासाठी सामूहिक प्रयत्न व्हावेत.
या अधिवेशनात, आणखी एक सद्भाग्य आम्हाला लाभले आहे आणि ते म्हणजे आज प्रथमच आमचे उपराष्ट्रपती, राज्यसभेचे सभापती या नात्याने आपला कार्यकाल सुरू करणार आहेत. त्यांच्यासाठी हे पहिलेच सत्र आहे आणि हा त्यांचा पहिलाच दिवस आहे. ज्याप्रकारे आमच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारताची महान परंपरा, आमच्या आदिवासी परंपरांसहित देशाचा गौरव वाढवण्यात अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे, त्याचप्रकारे शेतकऱ्याचा पुत्र आज देशाच्या उपराष्ट्रपतीपदावर आहे आणि आज राज्यसभेचे सभापती या नात्याने ते देशाचा लौकिक आणखी पुढे नेतील, खासदारांना प्रेरित करतील आणि प्रोत्साहन देतील. त्यांनाही माझ्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देतो.
खूप खूप धन्यवाद मित्रांनो..
नमस्कार.