महामहिम,
महोदय,
महिला आणि पुरुषहो,
16 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या शानदार आयोजनाबद्दल मी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे अभिनंदन करतो.
आणि, पुन्हा एकदा मी ब्रिक्सशी जोडल्या गेलेल्या नवीन मित्रांचे मनापासून स्वागत करतो. नवीन स्वरूपातील ब्रिक्स, जगातील 40 टक्के मानवतेचे आणि सुमारे 30 टक्के अर्थव्यवस्थेचे प्रतिनिधित्व करते.
गेल्या जवळजवळ दोन दशकांमध्ये ब्रिक्स ने मोठे यश संपादन केले आहे. मला विश्वास आहे, की आगामी काळात ही संघटना जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी अधिक प्रभावी माध्यम म्हणून उदयाला येईल.
मित्रहो,
मी न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या अध्यक्ष, माननीय दिलमा रुसेफ यांचे अभिनंदन करतो. गेल्या दहा वर्षांत ही बँक ग्लोबल साउथमधील देशांच्या विकासासाठी महत्त्वाचा पर्याय म्हणून उदयाला येत आहे. भारतातील गिफ्ट सिटी (GIFT City) बरोबरच, आफ्रिका आणि रशियामध्ये प्रादेशिक केंद्रे सुरू झाल्याने या बँकेच्या उपक्रमांना बळ मिळाले आहे. आणि, सुमारे 35 अब्ज डॉलर्स किमतीच्या विकास प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.
एनडीबी (NDB) ने मागणीवर आधारित तत्त्वावर आपले काम सुरूच ठेवायला हवे, आणि बँकेचा विस्तार करताना, दीर्घकालीन आर्थिक शाश्वतता, निरोगी क्रेडिट रेटिंग (पत मानांकन) आणि बाजारपेठेतील प्रवेश सुनिश्चित करणे, याला प्राधान्य द्यायला हवे.
मित्रहो,
नव्या स्वरूपातील ब्रिक्स (BRICS), 30 ट्रिलियन डॉलर्स पेक्षा जास्त मोठी अर्थव्यवस्था आहे. ब्रिक्स बिझनेस कौन्सिल (व्यापार परिषद) आणि ब्रिक्स विमेन बिझनेस अलायन्सने (महिला व्यापार गट) आमच्यातील आर्थिक सहयोग वाढवण्यात विशेष भूमिका बजावली आहे. यंदाच्या BRICS मधील WTO सुधारणा, कृषी क्षेत्रातील व्यापार सुलभता, लवचिक पुरवठा साखळ्या, ई-कॉमर्स आणि विशेष आर्थिक क्षेत्रांबाबत झालेली सहमती आपल्यातील आर्थिक सहकार्य अधिक मजबूत करेल. या सर्व प्रयत्नांमध्ये, आपण लघु आणि मध्यम उद्योगांच्या हितावर लक्ष केंद्रित करायला हवे. मला आनंद आहे, की 2021 मध्ये भारताच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात प्रस्तावित ब्रिक्स (BRICS) स्टार्टअप फोरमचे या वर्षी उद्घाटन होईल.
भारताच्या पुढाकाराने सुरु झालेले रेल्वे संशोधन नेटवर्क देखील ब्रिक्स देशांमधील लॉजिस्टीक आणि पुरवठा साखळीची कनेक्टिव्हिटी वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या वर्षी, ब्रिक्स (BRICS) देशांमध्ये, यूनिडो (UNIDO) च्या सहकार्याने, इंडस्ट्री 4.0 साठी कुशल वर्क फोर्स (मनुष्यबळ) तयार करण्याबाबत झालेली सहमती अत्यंत महत्त्वाची आहे. 2022 मध्ये सुरू करण्यात आलेले ब्रिक्स (BRICS) लस संशोधन आणि विकास (R&D) केंद्र सर्व देशांची आरोग्य सुरक्षा वाढवण्यात उपयोगी ठरत आहे. डिजिटल हेल्थमधील यशाचा अनुभव ब्रिक्स भागीदारांबरोबर शेअर करायला आम्हाला आनंद वाटेल.
मित्रहो,
हवामान बदल, हा आपला सर्वोच्च प्राथमिकतेचा विषय आहे. रशियाच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स (BRICS) ओपन कार्बन मार्केट पार्टनरशिपसाठी झालेल्या सहमतीचे स्वागत आहे.
भारतातही हरित विकास, हवामानाशी जुळवून घेणाऱ्या पायाभूत सुविधा आणि हरित संक्रमण यावर विशेष भर दिला जात आहे.आंतरराष्ट्रीय सौर गट,आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा गट, मिशन LiFE म्हणजेच पर्यावरणाला अनुकूल जीवनशैली, एक पेड़ माँ के नाम, यासारखे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. गेल्या वर्षी COP-28 दरम्यान आम्ही ग्रीन क्रेडिटसारखे महत्त्वाचे उपक्रम सुरू केले.
मी ब्रिक्स भागीदारांना या उपक्रमांमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित करतो.
सर्व ब्रिक्स देशांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर विशेष भर दिला जात आहे. भारतात मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटी वेगाने वाढवण्यासाठी आम्ही गति-शक्ती पोर्टल तयार केले आहे. यामुळे पायाभूत सुविधांच्या विकासासाठी एकात्मिक नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात मदत झाली आणि लॉजिस्टिक खर्च कमी झाला. आमचे अनुभव तुमच्या सर्वांसोबत सामायिक करण्यात आम्हाला आवडेल.
मित्रहो,
ब्रिक्स देशांमधील आर्थिक एकात्मता वाढवण्याच्या प्रयत्नांचे आम्ही स्वागत करतो. स्थानिक चलनांमधील व्यापार आणि सीमापार सुलभ पेमेंट यामुळे आमचे आर्थिक सहकार्य मजबूत होईल.
भारताने तयार केलेले युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच युपीआय ही भारताची मोठी यशोगाथा आहे. अनेक देशांमध्ये ते स्वीकारले गेले आहे. गेल्या वर्षी, महामहिम शेख मोहम्मद यांच्यासमवेत, आम्ही ते संयुक्त अरब अमिरातीमध्ये देखील सुरू केले. इतर ब्रिक्स देशांशीही याबाबत सहयोग करता येईल.
मित्रहो,
ब्रिक्स अंतर्गत सहकार्य वाढवण्यासाठी भारत पूर्णतः कटिबद्ध आहे.
आपल्या विविधतेवर आणि बहुध्रुवीयतेवरचा आपला दृढ विश्वास हेच आपले सामर्थ्य आहे आणि मानवतेवरचा आपला सामायिक विश्वास आपल्या भावी पिढ्यांसाठी एक समृद्ध आणि सक्षम भविष्य घडविण्यात मदत करेल. आजच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि उपयुक्त चर्चेबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.
ब्रिक्स चे पुढील अध्यक्ष म्हणून मी राष्ट्राध्यक्ष लुला यांना हार्दिक शुभेच्छा देतो. तुमचा ब्रिक्स अध्यक्षीय कार्यकाळ यशस्वी होण्यासाठी भारत संपूर्ण पाठिंबा देईल.
पुन्हा एकदा अध्यक्ष पुतीन आणि सर्व नेत्यांचे खूप खूप आभार.