नमस्कार !
आज आपल्या सर्वांसाठी श्रद्धेय आणि स्नेहमूर्ती अशा लता दिदींची जयंती आहे. आणि योगायोगाने आज नवरात्रीचा तिसरा दिवस, म्हणजे माता चंद्रघंटेच्या उपासनेचा दिवसही आहे. असं म्हणतात की जेव्हा कोणी साधक- साधिका जेव्हा कठोर साधना करतात, तेव्हा आई चंद्रघंटेच्या कृपेने त्यांना दिव्य स्वरांची अनुभूती होत असते.
लताजी सरस्वती मातेच्या अशा साधिका होत्या, ज्यांनी संपूर्ण जगाला आपल्या दैवी सुरांनी न्हाऊ घातले. साधना लताजींनी केली आणि त्याचं फळ आपल्या सगळ्यांना मिळालं. अयोध्येत लता मंगेशकर चौकात स्थापन करण्यात आलेली सरस्वती मातेची ही विशाल वीणा, संगीताच्या त्या साधनेचं प्रतीक बनेल. मला सांगण्यात आलं आहे की, चौकाच्या परिसरात सरोवराच्या प्रवाही पाण्यात 92 संगमरवरी कमळ, लताजींचं वय दर्शवतात. या अभिनव प्रयत्नासाठी मी योगीजींच्या सरकारचे, अयोध्या विकास प्राधिकरणाचे आणि अयोध्येच्या जनतेचे मनापासून अभर मानतो. या प्रसंगी मी सर्व देशबांधवांच्या वतीने भारत रत्न लताजींना भावपूर्ण श्रद्धंजली अर्पण करतो. मी श्री प्रभू रामाच्या चरणी प्रार्थना करतो, त्यांच्या आयुष्याचा जो लाभ आपल्याला मिळाला, तोच लाभ त्यांच्या सुरांच्या माध्यमातून येणाऱ्या पिढ्यांना देखील मिळत राहो.
मित्रांनो,
लता दीदींसोबतच्या माझ्या कितीतरी आठवणी आहेत, कितीतरी भावूक आणि प्रेमळ आठवणी आहेत. मी जेव्हाही त्यांच्याशी बोलत असे, तेव्हा त्यांच्या बोलण्यातला जग प्रसिद्ध गोडवा प्रत्येक वेळी मला मंत्रमुग्ध करत असे. दीदी मला नेहमी म्हणत असत - "मनुष्य वयाने नाही, तर कर्तृत्वाने मोठा होतो, आणि जो देशासाठी जितकं जास्त काम करेल, तो तितकाच मोठा आहे." मी असं मानतो की अयोध्येतील हा लता मंगेशकर चौक, आणि त्यांच्याशी निगडित सर्व आठवणी आपल्याला देशाप्रती कर्तव्यांची देखील जाणीव करून देतील.
मित्रांनो,
मला आठवतं, जेव्हा अयोध्येत राम मंदिराच्या कामाचं भूमिपूजन झालं, तेव्हा मला लता दिदिंचा फोन आला होता. त्या अतिशय भावूक झाल्या होत्या, खूप आनंदात होत्या, त्यांना खूप आनंद झाला होता आणि खूप आशीर्वाद देत होत्या. त्यांना विश्वास होत नव्हता की शेवटी राम मंदिराचं काम सुरू होत आहे. आज मला लता दीदींनी गायलेलं ते भजन देखील आठवत आहे - ''मन की अयोध्या तब तक सूनी, जब तक राम ना आए'' अयोध्येच्या भव्य मंदिरात श्री राम येणार आहेत. आणि त्याच्या आधीच कोट्यवधी लोकांच्या मनात राम नामाची प्राण प्रतिष्ठा करणाऱ्या लता दिदिंचे नाव अयोध्या शहराशी कायमचे जोडले गेले आहे. रामचरितमानस मध्ये म्हटलेच आहे - 'राम ते अधिक राम कर दासा'. म्हणजे, रामाचे भक्त रामाच्या आधीच येतात. कदाचित म्हणूनच, भव्य राम मंदिर निर्माण होण्यापूर्वीच, त्याची आराधना करणारी त्यांची भक्त लता दीदींच्या स्मृती प्रित्यर्थ हा चौक देखील मंदिराच्या आधीच तयार झाला आहे.
मित्रांनो,
प्रभू राम तर आपल्या संस्कृतीचे प्रतीक पुरुष आहेत. राम आपल्या नैतिकतेचे, आपल्या मूल्यांचे, आपल्या मर्यादेचे, आपल्या कर्तव्याचे जिवंत आदर्श आहेत. अयोध्ये पासून रामेश्वरम् पर्यंत, राम भारताच्या कणा - कणात सामावलेले आहेत. भगवान रामाच्या आदर्शाने आज ज्या वेगाने भव्य राम मंदिर बनत आहे, ते बघून संपूर्ण देश रोमांचित होत आहे. ही आपल्या वारशाच्या अभिमानाची पुनर्स्थापना देखील आहे, आणि विकासाचा नवा अध्याय देखील आहे.
लता चौक विकसित केला गेला आहे ते ठिकाण अयोध्येतील विविध सांस्कृतिक महत्त्व असलेल्या स्थळांना जोडणाऱ्या प्रमुख स्थळांपैकी एक आहे, याचा मला आनंद आहे. हा चौक राम की पैडीजवळ आहे आणि शरयू नदीचा पवित्र प्रवाहही यापासून फार दूर नाही. लता दीदींच्या नावाने चौक बांधण्यासाठी याहून चांगली जागा कोणती? ज्याप्रमाणे अयोध्येने इतक्या युगांनंतरही आपल्या मनात राम जपून ठेवला आहे, त्याचप्रमाणे लतादीदींच्या भजनाने आपला विवेक राममय ठेवला आहे. मानसचा मंत्र 'श्री रामचंद्र कृपालु भज मन, हरण भव भय दारुणम' असो, किंवा मीराबाईंची 'पायो जी मैने राम रतन धन पायो' असो अशी असंख्य भजने आहेत. बापूंचे आवडते भजन 'वैष्णव जन तो तेने कहिए' असो, किंवा 'तुम आशा विश्वास हमारे राम' हे जनाजनांच्या मनातले गोड गाणे असो! लताजींच्या आवाजात ही गाणी ऐकून अनेक देशवासीयांना जणु रामाचेच दर्शन झाले आहे. लता दीदींच्या आवाजातील दिव्य माधुर्यातून रामाचे अलौकिक माधुर्यही आपण अनुभवले आहेत.
आणि मित्रांनो,
संगीतात हा प्रभाव केवळ शब्द आणि गायनातून साधला जात नाही. भजन गाणाऱ्या व्यक्तीच्या मनात ती भावना, ती भक्ती, ते रामाशी असलेले तादात्म्य, ती नाती, तो रामाप्रति समर्पण भाव असेल तरच गाण्यात ती उत्कटता येत असते. लताजींनी म्हटलेल्या भजनामध्ये, केवळ त्यांचे गायनच नाही तर त्यांची श्रद्धा, अध्यात्म आणि पवित्रता प्रतिध्वनित होते.
मित्रांनो,
आजही लतादीदींच्या आवाजातील 'वंदे मातरम'ची हाक ऐकली की भारतमातेचे विशाल रूप डोळ्यांसमोर दिसू लागते. लतादीदी ज्याप्रमाणे नागरिकांच्या कर्तव्याबाबत सदैव जागरूक होत्या, त्याचप्रमाणे हा चौक अयोध्येत राहणाऱ्या लोकांना आणि अयोध्येत येणाऱ्या लोकांना कर्तव्यनिष्ठेसाठी प्रेरणा देईल. हा चौक, ही वीणा अयोध्येच्या विकासाला आणि अयोध्येच्या प्रेरणेला आणखी उभारी देईल.
लता दीदींच्या नावावर असलेला हा चौक आपल्या देशातील कलाविश्वाशी निगडित लोकांसाठी प्रेरणास्थान म्हणूनही काम करेल. भारताच्या मुळाशी जोडलेले राहून, आधुनिकतेकडे वाटचाल करत, भारताची कला आणि संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात नेणे हेही आपले कर्तव्य आहे, हे सांगेल. भारताच्या हजारो वर्ष जुन्या वारशाचा अभिमान बाळगत, भारताची संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारीही आपली आहे. यासाठी लतादीदींसारखे समर्पण आणि आपल्या संस्कृतीबद्दल अपार प्रेम आवश्यक आहे.
मला खात्री आहे की, भारतातील कलाविश्वातील प्रत्येक साधकाला या चौकातून खूप काही शिकायला मिळेल. लतादीदींचा आवाज देशाच्या कणाकणाला युगानुयुगे जोडून ठेवेल. या विश्वासानेच अयोध्येतील जनतेकडूही माझ्या काही अपेक्षा आहेत. नजीकच्या काळात राम मंदिर बांधले जाणार आहे, मोठ्या संख्येने लोक अयोध्येत येणार आहेत. अयोध्येला किती भव्य, किती सुंदर, किती स्वच्छ बनवायला लागेल, याची तुम्ही कल्पना करू शकता.
त्याची तयारी आजपासूनच झाली पाहिजे. हे काम अयोध्येतील प्रत्येक नागरिकाने करायचे आहे, प्रत्येक अयोध्यावासीयाने करायचे आहे. तसे केले तरच अयोध्येत आलेल्या भाविकाला तिच्या वैभवाचा अनुभव घेता येईल. राम मंदिराच्या पूजनासह, अयोध्येतील व्यवस्था अयोध्येची भव्यता, अयोध्येतील आदरातिथ्य याची त्याला जाणीव होईल. माझ्या अयोध्येतील बंधू आणि भगिनींनो, आतापासूनच तयारी सुरू करा आणि लता दीदींचा जन्मदिवस तुम्हाला सदैव प्रेरणा देत राहो. चला, खूप काही बोललो, तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद !