




आपण सर्व मंडळींनी, ज्या गोष्टी सांगितल्या, जे अनुभव सांगितले, ते अतिशय महत्वपूर्ण आहेत. माझ्या लक्षात आले आहे की, आपले राज्य, आपला जिल्हा, आपला भाग शक्य तितक्या लवकर या संकटातून मुक्त व्हावे, असेच तुम्हा सर्वांना वाटत आहे, हीच भावना सगळ्यांची आहे. सध्या दिवाळीचा सण आहे, मुख्यमंत्री मंडळी कामात अतिशय व्यग्र आहेत; हे मी समजू शकतो; तरीही सर्वजण वेळात वेळ काढून या बैठकीमध्ये सहभागी झाले आहेत. त्याबद्दल मी , सर्व मुख्यमंत्र्यांचे खूप आभार व्यक्त करतो.
मला जिल्हाधिकार्यांशी संवाद साधायचा होता आणि मुख्यमंत्र्यांना त्रास होवू नये, असेही मला वाटत होते, ही गोष्ट खरी आहे. मात्र ही "कमिटमेंट" आहे. मुख्यमंत्र्यांच्या मनातही आपल्या राज्याचे 100% लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य साध्य करायचे आहे. त्यामुळेच तेही आज आपल्याबरोबर उपस्थित राहिले आहेत. त्यांची उपस्थिती आपल्या जिल्हा अधिकार्यांना एक नवा विश्वास देणार आहे. त्यांनी या गोष्टीला इतके महत्व देऊन वेळात वेळ काढला. सणाच्या दिवशीही ते आपल्यासमवेत आहेत आणि म्हणूनच मी मुख्यमंत्र्यांचे विशेषत्वाने आभार व्यक्त करतो.
अगदी मनापासून मी सर्व मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो. आज ज्या ज्या गोष्टींवर चर्चा झाली, आणि आता मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादानंतर हे काम वेगाने पुढे जाईल त्याचे चांगले परिणामही आपल्याला दिसून येतील असा मला पूर्ण विश्वास आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे, आत्तापर्यंत आपण जी काही प्रगती केली आहे ती, तुम्ही सर्वांनी घेतलेल्या परिश्रमामुळेच झाली आहे. आज जिल्ह्यातला, गावातला लहान..मोठा सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग, आमच्या 'आशा वर्कर' अशा सर्वांनी कितीतरी परिश्रम केले आहेत. दूर दुर्गम भागात पायी जाऊन त्यांनी लस पोहोचवली आहे. मात्र एक अब्ज लसींच्या मात्रा दिल्यानंतर आपण थोडे सुस्तावलो तर नवीनच संकट उभे राहु शकते. आणि म्हणूनच आपल्याकडे असे म्हणतात की, शत्रू आणि आजार..रोग या दोन्ही संकटाना कधीही हलके...कमी मानू नये. त्यांचे गांभीर्य ओळखावे. त्यांचा पूर्ण अंत होईपर्यंत लढाई सुरू ठेवली पाहिजे. आणि म्हणूनच मला वाटते की, आपण अगदी किंचितही ढिलाई दाखवून चालणार नाही.
मित्रांनो,
शतकामधून येणार्या इतक्या मोठ्या महामारीमध्ये देशाने अनेक आव्हानांचा सामना केला. कोरोनाच्या विरोधात लढताना देशाने अनेक नवनवे पर्याय शोधले. नवसंकल्पना स्वीकारल्या.प्रत्येक विभागातल्या लोकांनी आपापल्या बुद्धीचा वापर करून नवनवीन गोष्टी केल्या.तुम्हालाही आता, आपल्या जिल्ह्यात लसीकरण वाढविण्यासाठी नविन संकल्पना वापरून आणखी जास्त काम करावे लागणार आहे. कामाची नवीन पद्धत, नवा उत्साह, नवे तंत्र...तंत्रज्ञान यामुळे काम करताना नवा जोश येतो. आपण आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ज्या राज्यांनी पहिल्या मात्रेच्या लसीकरणाचे शंभर टक्के लक्ष्य पूर्ण केले आहे, त्यांनाही वेगवेगळ्या टप्प्यावर विविध आव्हाने उभी राहिली होती. काही ठिकाणी भौगोलिक परिस्थितीमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या.तर काही ठिकाणी साधने आणि स्रोतांची कमतरता भासत होती. तरीही या जिल्ह्यांनी अशी सर्व प्रकारची आव्हाने पार करून पुढे मार्गक्रमण केले. लसीकरणाचे काम आता गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे, त्याचा अनुभव आपल्या सर्वांकडे आहेच. एका अनाम शत्रूच्या विरोधात कसे लढायचे हे तर आता आमच्या आशा वर्कर्सही शिकल्या आहेत. आता आपल्याला "मायक्रो स्ट्रॅटेजी" तयार करून पुढे जावे लागणार आहे. आता तुम्ही राज्याचा हिशेब, जिल्ह्याचा हिशेब विसरून जा, आपण प्रत्येक गाव, गावातही प्रत्येक विभाग...गल्ली, आणि त्यामध्ये जर चार घरे राहिली असतील तर ते चार घरे याकडे लक्ष द्यावे. इतक्या बारकाईने आपण पाहिले तर त्याचा परिणाम जाणवणार आहे आणि ज्या ठिकाणी, जे जे कमी आहे,ज्या ज्या गोष्टींचा अभाव आहे, त्यांची तातडीने पूर्तता करण्याचा, ती कामे पूर्ण केली पाहिजेत. आत्ता आपल्या चर्चेत विशेष मेळावे घेण्याचा,कॅम्प लावण्याचा विषय निघाला.हा विचार खूप चांगला आहे. तुम्ही आपल्या जिल्ह्यासाठी, प्रत्येक गावातल्या विभागांसाठी अशी योग्य ती रणनीती बनवावी. आपल्या क्षेत्राचा विचार करून 20-25 लोकांचा गट..समूह बनवू शकता. जे गट बनवले जातील, त्यांच्यामध्येही एक सुदृढ स्पर्धा निर्माण करण्याचा प्रयत्नही करता येईल. आपले एनसीसी, एनएसएसचे जे तरूण सहकारी आहेत, त्यांचीही जास्तीत जास्त मदत घेता येईल. तुम्ही आपल्या जिल्ह्यांचे क्षेत्रनिहाय वेळापत्रक तयार करू शकता. मी अगदी खालच्या स्तरावर कार्यरत असणार्या आमच्या सरकारी कर्मचारीवर्गाबरोबर संवाद साधत असतो. माझ्या लक्षात आले आहे की, ज्या महिला कर्मचारी लसीकरणाच्या कामात आहेत, त्या अगदी पूर्ण समर्पणाने हे काम करीत आहेत, त्याचे परिणामही खूप चांगले मिळाले आहेत. आपल्या सरकारमध्ये महिला कर्मचारी आहेत, अगदी पोलिस खात्यातही आमच्या महिला आहेत, त्यांनाही अधून ..मधून पाच दिवस, सात दिवस या कामासाठी बरोबर घ्यावे. कामाचा वेग वाढेल आणि यामुळे चांगला परिणाम मिळतोय, हे तुमच्याच लक्षात येईल. तुमचा जिल्हा शक्य तितक्या लवकर राष्ट्रीय सरासरीच्या जवळ पोहोचावा, असे मला वाटतेय. मला तर असेही वाटतेय की, तुम्ही सरासरीच्याही पुढे जावे. मात्र यासाठी तुम्हाला पूर्ण ताकद लावली पाहिजे. मला हेही माहिती आहे की, तुमच्यापुढे असलेल्या आव्हानांपैकी एक आव्हान म्हणजे पसरलेल्या अफवा आणि लोकांमध्ये असलेले संभ्रम आहेत. जसंजसे आपण पुढे जाणार आहोत, तसतस कदाचित ही समस्या आपल्याला विशिष्ट, ठराविक विभागात जास्त जाणवणार आहे. आत्ता चर्चेतही आपल्यापैकी काहीजणांनी या समस्येचा उल्लेख केला. यावर एक मोठा उपाय म्हणजे लोकांमध्ये जास्तीत जास्त जागरूकता निर्माण करणे. तुम्ही या कामासाठी स्थानिक धर्मगुरूंनाही सहभागी करून घेवू शकता. त्यांचे लहान..लहान व्हिडिओ बनवावीत, दोन दोन...तीन तीन मिनिटांचे व्हिडिओ बनवून ते लोकप्रिय करावेत.
प्रत्येक घरामध्ये त्या धर्मगुरूंचे व्हिडिओ पोचवावेत. धर्मगुरूंनी त्यांना समजवावे, यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत. मी तर सातत्याने वेगवेगळ्या धर्म गुरूंना भेटत असतो. मी खूप आधीच सर्व धर्म गुरूंशी बोलून या कामामध्ये मदत करण्याचे आवाहन केले होते. सर्वांनी लसीकरणाचे महत्व असल्याचे सांगितले आहे अणि कोणीही यासाठी विरोध केलेला नाही. अलिकडेच अगदी दोन दिवसांपूर्वी माझी व्हॅटिकन येथे पोप फ्रांसिस जी यांच्याशी भेट झाली. लसीकरणाविषयी धर्मगुरूंचे संदेशही आपण जनतेपर्यंत पोहोचविण्यावर भर दिला पाहिजे.
मित्रांनो,
आपल्या जिल्ह्यात राहणार्या लोकांच्या मदतीसाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी,लसीकरण मोहीम आता प्रत्येक घरापर्यंत नेण्याची तयारी आहे.ज्या ठिकाणी लसींच्या दोन मात्रांचे संपूर्ण सुरक्षा कवच मिळालेले नाही, तिथे हाच मंत्र जपत प्रत्येक घराच्या दारावर थाप दिली जाईल. आत्तापर्यंत तुम्ही सर्वांनी लोकांना लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी नियोजन, व्यवस्थापन करून तिथे सुरक्षित लसीकरण करण्याचे कार्य केले असणार. आता प्रत्येक घरामध्ये लस, घराघरात लस, या उद्देशाने आपल्या सर्वांना प्रत्येक घरात
पोहोचायचे आहे.
मित्रांनो,
या अभियानामध्ये यशस्वी होण्यासाठी संपर्क यंत्रणा म्हणून तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या समाज माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करायचा आहे. आपल्याकडे देशातल्या अनैक राज्यांमध्ये, अनेक जिल्ह्यांमध्ये अशी माॅडेल्स आहेत, जी दूर..दुर्गम गावांपासुन ते शहरांपर्यंत शंभर टक्के लसीकरणासाठी वापरली गेली आहेत. सामाजिक आणि भौगोलिक परिस्थितीचा विचार करून , त्यापैकी आपल्या भागासाठी किंवा कोणत्या एखाद्या क्षेत्रासाठी जे अनुकूल, योग्य असेल ते जरूर स्वीकारले पाहिजे. आणखी एक काम तुम्ही लोक नक्कीच करू शकता. तुमच्याच सहकारी मंडळींनी, तुमच्याच साथीदारांनी इतर जिल्ह्यांमध्ये वेगाने लसीकरण केले आहे. तुमच्यासमोर ज्या समस्या उभ्या आहेत, कदाचित ते ही अशाच प्रकारच्या आव्हानांना सामोरे गेले असतील. तुम्ही त्यांच्याकडूनही माहिती घेवून त्यांनी लसीकरणाचा वेग कसा वाढवला, हे जाणून घेवू शकता. त्यांनी समस्येवर कसा तोडगा काढला हे जाणून घेवू शकता. त्यांनी कोणती नवीन उपाय योजना केली, याची माहिती तुम्ही फक्त एक फोन काॅल करून घेवू शकता. या एका काॅलमुळे तुमच्या जिल्ह्यामध्ये परिवर्तन घडवून आणू शकता. जर त्यांनी आपल्या जिल्ह्यात नवसंकल्पना राबविली असेल तर, काही नवा पायंडा पाडला असेल तर, तुम्हीही ते करू शकता. ज आपले आदिवासी, वनवासी सहकारी आहेत,त्यांचे लसीकरण करण्यासाठीही आपल्याला विविध आणि अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत. आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की, स्थानिक नेतृत्व आणि त्यांचे सहकार्य घेणे हा खूप मोठा, महत्वाचा घटक आहे. आपल्याला काही विशिष्ट दिवस निश्चित करावे लागतील. जसे की, आता बिरसा मुंडा यांची जयंती येणार आहे. त्याआधीच संपूर्ण आदिवासी क्षेत्रामध्ये वातावरण निर्मिती करून लसीकरण मोहिमेतून बिरसा मुंडा यांना श्रद्धांजली वाहता येईल. अशा प्रकारे या अभियानाला भावनिक जोड देवून संपूर्ण लसीकरण करणे शक्य आहे. असे धोरण ध्येयपूर्तीसाठी खूप मदत करणारे ठरणार आहे.
लसीकरणाच्या बाबतीत संपर्क यंत्रणा आपण सहज, सुकर, सोपी करूया, स्थानिक भाषेत, बोलीभाषेत करूया.मी पाहिलंय की काही लोकांनी तर लसीकरणाचे गीत बनवले आहेत. ग्रामीण भाषेत गीत गाताना लसीकरणाविषयी बोलले जाते. याचे खूप चांगले परिणाम मिळतील.
मित्रांनो,
प्रत्येक घरावर थाप देताना, पहिल्या मात्रेबरोबरच आपण दुसरी मात्रा देण्यावरही तितकेच लक्ष देण्याची गरज आहे. कारण ज्यावेळी संक्रमणाच्या केसेस कमी होतात त्यावेळी आणि त्यानंतर अनेकदा "अर्जन्सी"ची भावना कमी होत जाते. लोकांना वाटायला लगते की, आता इतकी काय घाई आहे? मला आठवते की, ज्यावेळी आपण एक अब्जाचा आकडा पार केला, त्यावेळी मी तर रूग्णालयामध्ये गेलो होतो, तिथे मला एक सज्जन भेटले. त्यांच्याशी मी संवाद साधला. इतके दिवस का लस टोचून घेतली नाही? असे विचारल्यावर ते म्हणाले, नाही..नाही, मी तर पैलवान आहे, मला काय गरज आहे असे मनात येत होते. परंतु आता ज्यावेळी एक अब्ज जणांनी लस घेतली त्यावेळी मी एकटाच वेगळा, अस्पृश्य मानला जाईन. लोक मला विचारतील तेव्हा माझी मान खाली जाईल. मग माझ्या मनात आले की, आपणही लस टोचून घेतली पाहिजे म्हणून आज आलो; आणि म्हणूनच मी म्हणतोय की, आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकांच्या विचारशक्तीला सुस्तावून चालणार नाही. लोक लसीचा विषय अतिशय किरकोळ मानतात, यामुळेच जगातल्या समृद्ध देशांकडे तुम्ही जरूर पहा. चांगल्या- चांगल्या समृद्ध देशांमध्ये पुन्हा कोरोना बळावत असल्याच्या येणा-या बातम्या चिंतेचा विषय बनत आहेत. आपल्यासारख्या देशाने तर थोडा कानाडोळा केलेलाही आपल्याला परवडणारा नाही. आपण हे संकट पुन्हा सहन करू शकणार नाही. म्हणूनच लसीच्या दोन्ही मात्रा निश्चित वेळेवर घेणे अतिशय गरजेचे आहे. आपल्या क्षेत्रामध्ये ज्या लोकांनी अद्याप निश्चित केलेली कालमर्यादा पूर्ण झाल्यानंतरही दुसरी मात्रा घेतली नाही, त्यांनाही तुम्ही प्राधान्य देवून संपर्क करा, त्यांना दुसरी मात्रा जरूर दिली पाहिजे.
मित्रांनो,
सर्वांना लस, मोफत लस अभियानाअंतर्गत आपण एका दिवसात जवळपास अडीच कोटी लसीच्य मात्रा दिल्या आहेत. आपली क्षमता किती जास्त आहे, याचा अंदाजही आपण घेतला आहे. यावरून आपली क्षमता किती आहे हे दिसून येते. आपले सामर्थ्य समजते. लस घरा-घरामध्ये पोहोचवण्यासाठी जी काही आवश्यक असेल ती पुरवठा साखळी तयार आहे. या महिन्यामध्ये लसीकरणासाठी किती मात्रा उपलब्ध होणार आहेत, याची विस्तृत माहितीही प्रत्येक राज्याला आधीच दिली गेली आहे. म्हणूनच तुम्ही आपापल्या सुविधेनुसार, गरजेनुसार या महिन्यासाठी आपले लक्ष्य आधीच निश्चित करू शकता. मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, यावेळी एक अब्जावी मात्रा दिल्यानंतर दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी एक प्रकारचा उत्साह आला आहे. आपल्याला नवीन लक्ष्य पार करून ख्रिसमस उत्साहाने साजरा करण्यासाठी पुढे जायचे आहे.
अखेरीस, मी आपणा सहकारी मंडळींना एका गोष्टीचे स्मरण करून देवू इच्छितो. आपण ज्यावेळी सरकारी सेवेमध्ये आलात, त्या पहिल्या दिवसाची आठवण कारावी. मी सर्व जिल्हा अधिका-यांबरोबर सहभागी झालेल्या सर्व टीम्सना अगदी मनापासून, हृदयापासून आवाहन करू इच्छितो. तुम्ही कल्पना करा, ज्या दिवशी तुमच्या कार्यारंभाचा, कामाचा पहिला दिवस होता, ज्यादिवशी तुम्ही मसुरी येथून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडले होता, त्यावेळी तुमच्या मनामध्ये कोणत्या भावना होत्या? मनामध्ये ध्येयनिश्चिती कशी केली होती, कोणती स्वप्ने मनात होती. मला पूर्ण विश्वास आहे, तुमच्या मनानेही असेच काही वेगळे करण्याचा ठाम निर्धार केला असणार. खूप काही चांगले आणि नवीन करण्याचा, समाजासाठी कार्य करण्याचा निर्धार केला असणार. समाजाच्या भल्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे मनोमन ठरविले असणार. त्या संकल्पांचे स्मरण तुम्ही जरूर करावे, आणि आपण निश्चय करावा, समाजामध्ये जे मागे पडले आहेत, जे वंचित आहेत, त्यांच्यासाठी आपले जीवन समर्पित करण्याइतकी मोठी संधी दुसरी मिळणार नाही. त्याच भावनेचे स्मरण करून कामाला लागावे. मला विश्वास आहे, तुमच्या प्रयत्नांमुळे अतिशय लवकरच तुमच्या जिल्ह्याची लसीकरणाची स्थिती सुधारणार आहे. चल तर मग, प्रत्येक घरा घरावर थाप देवून, घराघरामध्ये जावून लसीकरणाच्या मोहिमेला यशस्वी बनवू या. आज देशातले जे लोक माझे बोलणे ऐकत आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्हीही पुढे या. तुम्ही जर लस घेतली असेल तर चांगलीच गोष्ट आहे. त्याचबरोबर आता ज्यांनी लस घेतली नाही, त्यांनी ती घ्यावी यासाठी जरूर प्रयत्न करा. दररोन पाच , दहा लोकांना, दोन लोकांना या कामाशी जोडून घ्या. हे मानवतेचे काम आहे. भारत मातेची ही एक सेवाच आहे. 130 कोटी देशवासियांच्या कल्याणाचे काम आहे. यामध्ये आपण कुठल्याही प्रकारची हयगय, चालढकल करून चालणार नाही. आपली ही दिवाळी या संकल्पाची दिवाळी ठरावी. स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापनदिन आपण साजरा करीत आहोत. हे स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष आनंदाने भरलेले असावे, आत्मविश्वासाने भरलेले असावे, एका नवीन उत्साहाने, आनंदाने भरलेले असावे, यासाठी आपल्या सर्वांला अतिशय कमी वेळेत परिश्रम घ्यावे लागतील. माझा तुम्हा सर्वांवर पूर्ण विश्वास आहे. आपल्यासारखे काम करणा-या युवा टीमवर माझा विश्वास आहे आणि म्हणूनच मी मुद्दाम परदेश दौ-यावरून आल्यानंतर माझ्या देशाच्या या सहकारी मंडळींना भेटण्याचा विचार केला. सर्व मुख्यमंत्रीही यावेळी उपस्थित राहिले. या विषयाचे गांभीर्य किती आहे, हे आज मुख्यमंत्र्यांनीही दाखवून दिले आहे. मी सर्व आदरणीय मुख्यमंत्र्यांचाही आभारी आहे. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप- खूप धन्यवाद देतो. नमस्कार !!