या दशकातीलच नव्हे तर पुढील दशकातील गरजांच्या दृष्टीने सज्ज असणे आवश्यक : पंतप्रधान

कार्यक्रमात माझ्यासह सहभागी होत असलेले मंत्रीमंडळातील माझे सहकारी निर्मला सीतारमण जी, पीयूष गोयल जी, डॉ हर्षवर्धन जी, प्रधान वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन जी, CSIR चे महासंचालक डॉ शेखर मंडे जी, सर्व वैज्ञानिक, उद्योग आणि शिक्षण जगातील सन्मानित प्रतिनिधी आणि मित्रांनो! 

CSIR ची आजची ही महत्वपूर्ण बैठक एका अतिशय महत्वाच्या कालखंडात होत आहे. कोरोना जागतिक महामारी, संपूर्ण जगासमोर या शतकातील सर्वात मोठे आव्हान म्ह्णून उभी ठाकली आहे. परंतू इतिहास साक्षी आहे, जेव्हा जेव्हा मानवतेवर कुठलं मोठं संकट आलं तेव्हा विज्ञानाने भविष्यासाठीच्या आणखी चांगल्या वाटा तयार केल्या. संकटात समाधान आणि शक्यता शोधणं, एका नवीन सामर्थ्याचे सृजन करणं , हाच तर विज्ञानाचा मुलभूत स्वभाव आहे. जगातील आणि भारतातील वैज्ञानिकांनी अनेक शतकांपासून हेच काम केलं आहे, आणि आज पुन्हा एकदा ते करत आहेत. एखादी संकल्पना मांडणं, प्रयोगशाळेत त्यावर प्रयोग करणं, मग अंमलबजावणी करत समाजाला उपलब्ध करणं, हे काम गेल्या दीड वर्षांपासून आपल्या वैज्ञानिकांनी ज्या प्रमाणावर आणि वेगानं केलं ते थक्कं करणारं आहे. इतक्या मोठ्या संकटातून मानवतेला सावरण्यासाठी एका वर्षाच्या आत लस तयार करून लोकांना देणं, हे इतकं मोठं काम इतिहासात बहुधा पहिल्यांदाच झालं असावं. गेल्या शतकातला अनुभव असा आहे, जेव्हा एखादा शोध जगातल्या दुसऱ्या देशात लागत असे, भारताला त्यासाठी अनेक वर्ष वाट बघावी लागत असे. परंतु आज आपल्या देशातले शास्त्रज्ञ दुसऱ्या देशांसोबत खांद्याला खांदा लावून मानवतेची सेवा करत आहेत, पुढे चालत आहेत. त्याच वेगानं काम करत आहेत. आपल्या शास्त्रज्ञांनी एका वर्षातच मेड इन इंडिया अर्थात स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लस तयार केली आणि देशवासियांकरता उपलब्धही केली. एका वर्षातच आपल्या शास्त्रज्ञांनी कोविड चाचणी कीट्स आणि आवश्यक उपकरणांनी देशाला आत्मनिर्भर बनवलं. आपल्या शास्त्रज्ञांनी कोरोना विरोधातल्या लढाईसाठी नवनवी प्रभावी औषधं शोधली. ऑक्सिजन निर्मितीचा वेग वाढवण्यासाठी नवे मार्ग शोधले. आपल्या या योगदानामुळे, या असाधारण प्रतिभेमुळेच देश आज इतकी मोठी लढाई लढत आहे. CSIR च्या वैज्ञानिकांनीही, याकाळात वेगवेगळ्या क्षेत्रात अभूतपूर्व योगदान दिलंं आहे. मी तुमच्या सगळ्यांचे, सर्व वैज्ञानिक , आपल्या संस्थेचे , उद्योगाचे संपूर्ण देशाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. 

 

मित्रांनो,

कोणत्याही देशातील विज्ञान, तंत्रज्ञान तितकीच प्रगती करु शकतं, जितका त्याचा उत्तम संबंध तिथल्या उद्योग, बाजाराशी असतो, समन्वय असतो, परस्परांशी जोडलेली अंतर्गत व्यवस्था असते. आपल्या देशात CSIR , विज्ञान, समाज आणि उद्योगाची हीच व्यवस्था कायम राखण्यासाठी एक संस्थात्मक व्यवस्था म्हणून काम करत आहे. आपल्या या संस्थेने देशाला कितीतरी प्रतिभावान दिले आहेत. कितीतरी वैज्ञानिक दिले आहेत. शांतीस्वरूप भटनागर यांच्यासारख्या महान वैज्ञानिकांनी या संस्थेचं नेतृत्व केलं आहे. जेव्हाही मी इथे आलो, आणि याचसाठी , प्रत्येकवेळी यावर भर दिला की जेव्हा एखादया संस्थेचा वारसा इतका महान असेल तेव्हा भविष्याकरता त्यांची जबाबदारीही तितकीच वाढते. आजही माझ्या, देशाच्या, अगदी मानवजातीच्याही आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. वैज्ञानिकांकडून, तंत्रज्ञांकडून खूप अपेक्षा आहेत.

 

मित्रांनो ,

CSIR कडे संशोधन आणि पेटंटची एक शक्तिशाली इकोसिस्टम आहे. देशातील अनेक समस्या सोडवण्यासाठी तुम्ही काम करत आहात. परंतु आज देशाचं लक्ष्य आणि देशवासीयांची स्वप्नं 21 व्या शतकाच्या पायावर आधारीत आहेत. आणि यासाठी CSIR संस्थांची लक्ष्यही असाधारण आहेत. भारताला आज कृषी पासून ते खगोलशास्त्रापर्यंत, आपत्ती व्यवस्थापनापासून ते संरक्षण तंत्रज्ञानापर्यंत, लस विकसित करण्यापासून ते आभासी वास्तवापर्यंत, जैवतंत्रज्ञानापासून ते बॅटरी तंत्रज्ञानापर्यंत प्रत्येक दिशेनं आत्मनिर्भर व्हायचं आहे. भारत आज शाश्वत विकास आणि स्वच्छ उर्जा क्षेत्रात जगाला मार्ग दाखवत आहे. आपण आज सॉफ्टवेयरपासून उपग्रहापर्यंत, दुसऱ्या देशांच्या विकासालाही गती देत आहोत. जगाच्या विकासात प्रमुख इंजिनाची भूमिका वठवत आहोत. यासाठी आपली ध्येयं देखील वर्तमानापासून दोन पावलं पुढे असायला हवीत. आपण या दशकांच्या गरजांबरोबरच येणाऱ्या दशकांची तयारी आतापासूनच करायला हवी. आपत्तीवरल्या उपायांच्या दिशेनंही. कोरोना सारखी महामारी आज आपल्या समोर आहे, परंतू अशी अनेक आव्हानं भविष्याच्या गर्भात दडलेली असू शकतात. उदाहरणच द्यायचं झालं तर, हवामान बदलाबद्दल एक मोठी भीती जगभरातील तज्ञ व्यक्त करत आहेत. आपल्या सगळ्या वैज्ञानिक, सर्व संस्था यांनी भविष्यातल्या या आव्हानांसाठी आतापासूनच वैज्ञानिक दृष्टिकोनातून तयारी करायला हवी. कार्बन कॅप्चर ते उर्जा साठवणूक आणि हरीत हायड्रोजन तंत्रज्ञाना पर्यंत प्रत्येक दिशेनं आपण आघाडी घ्यायला हवी. 

 

मित्रांनो,

आता तुम्ही सगळ्यांनी उद्योगाबरोबर सहयोग अधिक चांगला करण्यावर विशेष भर दिला. पण जसं मी म्हटलं, CSIR ची भूमिका याच्याही एक पाऊल पुढची आहे. तुम्ही उद्योगांबरोबरच समाजालाही सोबत घेऊन पुढे जायला हवं. मला आनंद आहे की गेल्या वर्षी मी जे सूचवलंं होतं, CSIR ने त्यावर अंलबजावणी करत समाजाकडून संवाद आणि सूचना जाणून घेणं सुरुही केलं आहे. देशाच्या गरजा की केंद्रस्थानी ठेवून आपले हे प्रयत्न कोटी कोटी देशवासीयांची भविष्य बदलत आहेत. उदाहरण द्यायचं तर, 2016 मधे देशानं ॲरोमा मिशन लॉंच केलं होतं, आणि CSIR ने यात महत्वपूर्ण भूमिका वठवली होती. देशातले हजारो शेतकरी आज फुलशेतीच्या सहाय्यानं आपलं भविष्य घडवत आहेत. हिंगासारखे पदार्थ अनेक शतकांपासून भारतीयांच्या स्वयंपाकघरातील अविभाज्य घटक राहिलेले आहेत. भारत हिंगासाठी नेहमीच जग आणि इतर देशांच्या आयातीवर अवलंबून राहिला आहे. CSIR ने याबाबत पुढाकार घेतला आणि आज देशात हिंगाचे उत्पादन सुरु झालं आहे. अशा कितीतरी शक्यता आपल्या प्रयोगशाळेत वास्तवात साकार होतात, विकसित होतात. अनेकदा तर आपण इतकं मोठं काम करता की सरकार आणि मंत्रालयाला याची माहिती मिळते तेव्हा थक्क व्हायला होतं. तुम्ही तुमची ही सगळी माहिती लोकांसाठी सोपी बनवायला हवी असा माझा सल्ला आहे. कोणालाही, CSIR च्या संशोधनाबाबत, तुमच्या कामाबाबत शोध घेता यावा, इच्छुकांना भाग घ्यायचा असेल तर घेता यावा यावरही तुम्ही सगळ्यांनी निरंतर भर द्यायला हवा. यामुळे तुमचं काम आणि उत्पादनांना पाठिंबाही मिळेल तसंच समाज आणि उद्योगात एक वैज्ञानिक दृष्टिकोनही वाढीला लागेल.

 

मित्रांनो,

देश आज जेव्हा स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण करण्याच्या निकट पोहचला आहे. आपण लवकरच या टप्प्यावर पोहचू. तेव्हा आपल्याला स्वातंत्र्याच्या 75 वं वर्ष लक्षात घेऊन स्पष्ट संकल्पांसह, कालबद्ध आराखड्यासह, निश्चित दिशेनं पथदर्शी आराखड्यासह पुढे जाणं, आपली कार्यसंस्कृती बदलण्यासाठी खूपच उपयोगी ठरेल. कोरोनाच्या संकटानं वेग भले थोडा कमी असेल पण आजही आपला संकल्प आहे. आत्मनिर्भर भारत, सशक्त भारत। आज MSME पासून ते नवनव्या स्टार्टअप्सपर्यंत, कृषीपासून ते शिक्षण क्षेत्र, प्रत्येक क्षेत्रात देशासमोर अगणित शक्यतांचा डोंगर आहे. हे साकारण्याची जबाबदारी तुम्हाला घ्यायची आहे. देशासोबत मिळून ही स्वप्नं पूर्ण करायची आहेत. आपल्या वैज्ञानिकांनी, आपल्या उद्योगांनी कोरोनाकाळात जी भूमिका निभावली, आपण हे यश पुढे प्रत्येक क्षेत्रात पुन्हा मिळवायचं आहे. 

मला विश्वास आहे, आपली प्रतिभा आणि आपल्या संस्थेची परंपरा तसंच परिश्रमामुळे देश याच गतीनं नित्य-नवीन लक्ष्य प्राप्त करेल, आणि 130 कोटींहूनही अधि‍क देशवासियांची स्वप्नं पूर्ण करतील. मला आपल्या सगळ्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळाली, खूप व्यावहारिक बाबी आपण सांगितल्या, आपल्या अनुभवाच्या जोरावर तुम्ही सगळं सांगितलं. या कामाची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे , आपण सगळ्या मित्रांनी ज्या सूचना केल्या, ज्या अपेक्षा व्यक्त केल्या, त्या पूर्ण करण्यात विलंब होऊ नये अशी माझी इच्छा आहे. प्रत्येक गोष्ट एकत्र, मोहिम म्हणून लयीत पूर्ण करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. कारण जेव्हा इतका वेळ देऊन आपण सगळे बसला आहात, तर उत्तम विचार येणं स्वाभाविक आहे, आणि याच मंथनातून जे अमृत निघेल, ते जनसामान्यांपर्यंत पोहचवण्याचं काम संस्थात्मक व्यवस्थेद्वार सतत अद्ययावत करत, सुधारणा करत, आपल्याला त्याची अंलबजावणीही करायची आहे. मी तुम्हा सगळ्यांना अनेकानेक शुभेच्छा देतो आणि याच शुभेच्छांसह, तुम्हा सगळ्यांच्या उत्तम आरोग्याची कामना करतो. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद! नमस्कार!

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world

Media Coverage

PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi