भारतीय फिजिओथेरपिस्ट संघटनेच्या 60 व्या वार्षिक परिषदेनिमित्त आपणा सर्वाना शुभेच्छा!
वैद्यकीय क्षेत्रातले इतक्या महत्वाच्या शाखेचे व्यावसायिक अहमदाबाद इथे एकत्र आले आहेत, याचा मला आनंद आहे. कोणाला इजा झाली असेल, वेदना होत असेल, मग तो तरुण असो वा वयोवृद्ध किंवा शारीरिक बलाकडे लक्ष पुरवणारा असो, प्रत्येक परिस्थितीत प्रत्येक वयोगटातल्या लोकांचा सहयोगी होऊन फिजिओथेरपिस्ट त्यांच्या वेदना दूर करतात. अवघड काळात आपण आशेचा किरण बनता. आपण आनंदाचे प्रतिक बनता, आपण वेदनामुक्तीचे प्रतिक बनता. कारण एखादी व्यक्ती अचानक दुखापत किंवा अपघातग्रस्त होते तेव्हा, त्या व्यक्तीसाठी तो केवळ शारीरिक आघात नसतो तर, मानसिक धक्काही असतो; अशा काळात फिजिओथेरपिस्ट त्या व्यक्तीवर उपचार तर करतोच, त्याचबरोबर त्या व्यक्तीला त्यातून बाहेर पडण्यासाठी उमेदही देतो.
मित्रांनो,
अनेकदा मलाही आपल्या व्यवसायातून, आपल्या व्यावसायिकतेतून अतिशय प्रेरणा मिळते. आपल्यामध्ये असलेले सामर्थ्य हे समोर आलेल्या आव्हानांपेक्षा भक्कम असते हे आपल्या व्यवसायात आपण नक्कीच शिकला असाल. प्रोत्साहन आणि थोडासा आधार यांच्या बळावर लोक अतिशय खडतर आव्हानांवरही मात करतात. प्रशासनातही आपल्याला काही प्रमाणात असेच पाहायला मिळते. आपल्या देशात गरिबांना आधाराची आवश्यकता होती, ज्यायोगे ते आपल्या दैनंदिन गरजा भागवू शकतील. बँक खाते उघडणे असो, शौचालय बांधणे असो, नळाद्वारे पाणी पुरवठा असो, अशा अनेक अभियानांद्वारे आम्ही लोकांना सहाय्य पुरवले. आयुष्मान भारत योजना असो किंवा आमच्या सरकारची सामाजिक सुरक्षा योजना, या योजनांद्वारे देशात सामाजिक सुरक्षेचे एक मजबूत जाळे निर्माण झाले आहे. याचे फलित आपण पाहतोच आहे; आज देशातल्या गरीब, मध्यम वर्गाच्या ठायी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्याचे बळ आले आहे. आपल्या सामर्थ्याने नवी झेप घेण्यासाठी आपण सक्षम आहोत हे तो जगाला दाखवून देत आहे.
मित्रांनो,
असे म्हटले जाते चांगला फिजिओथेरपिस्ट तोच असतो ज्याची रुग्णाला वारंवार गरज लागत नाही. म्हणजे एका अर्थाने आपला व्यवसायच आपल्याला आत्मनिर्भरतेचे महत्व सांगत असतो. लोकांना आत्मनिर्भर करणे हेच आपले उद्दिष्ट आहे असे आपण म्हणू शकतो. म्हणूनच आज देश आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत असताना आपल्या देशाच्या भविष्यासाठीचे याचे महत्व आपल्या व्यवसायातले लोक सहज समजू शकतात. सर्वात महत्वाचे म्हणजे डॉक्टर आणि फिजिओथेरपिस्टची आवश्यकता असलेले असे दोघे एकत्र काम करतील तेव्हाच सुधारणा शक्य आहे हे फिजिओथेरपिस्ट जाणतो. म्हणूनच विकासाला एक सामुहिक चळवळ करण्यासाठीच्या सरकारच्या प्रयत्नांचे महत्व आपण उत्तम रीतीने जाणू शकता. स्वच्छ भारत, बेटी बचाओ आणि इतर उपक्रमामधल्या जनभागीदारीत हीच भावना दिसून येते.
मित्रांनो,
फिजिओथेरपिस्टची जी भावना आहे त्यामध्ये प्रत्येकासाठी, देशासाठी अनेक महत्वाचे संदेश दडलेले आहेत. फिजिओथेरपिस्टची सर्वात मोठी अट असते ती म्हणजे सातत्याची! साधारणपणे लोक सुरवातीच्या उत्साहात 2-3 दिवस, चार दिवस व्यायाम करतात मात्र त्यानंतर हळूहळू त्यांचा उत्साह कमी होऊ लागतो. मात्र एक फिजिओथेरपिस्ट म्हणून आपण हे जाणता की सातत्याशिवाय अपेक्षित परिणाम साध्य होणार नाही. आवश्यक तो व्यायाम त्यात खंड पडू न देता होईल हे आपण सुनिश्चित करता. असेच सातत्य आणि दृढ निष्ठा देशासाठीही आवश्यक असते. आपल्या धोरणात सातत्य असेल, ते लागू करण्याची दृढ इच्छा शक्ती असेल तेव्हाच देशाच्या साऱ्या आवश्यकता पूर्ण होतात आणि देश प्रगतीसाठी सज्ज होऊन लांबवरचा पल्ला गाठू शकतो.
मित्रांनो,
देश सध्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अमृत महोत्सव साजरा करत आहे. मला आनंद होतोय की, आमच्या सरकारनं या अमृत महोत्सवात देशातील सर्व फिजिओथेरपिस्टना एक भेट दिली आहे, जिची ते 75 वर्षांपासून वाट पाहत होते. ती प्रतीक्षा होती, फिजिओथेरपी या उपचार पद्धतीला एक व्यवसाय म्हणून मान्यता मिळण्याची! तुम्हा सर्वांची ही प्रतीक्षा आमच्या सरकारनं संपवली आहे. नॅशनल कमिशन फॉर अलाइड अँड हेल्थकेअर प्रोफेशनल्स विधेयक अर्थात सहयोगी आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांसाठी राष्ट्रीय आयोग विधेयक आणून, आम्हाला तुम्हा सर्वांचा मान- सन्मान वाढवण्याची संधी मिळाली. त्यामुळे भारताच्या आरोग्य व्यवस्थेतील तुम्हा सर्वांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचीही दखल घेतली गेली. यामुळे तुम्हा सर्वांना भारतात तसच परदेशातही काम करणं सोपं झालं आहे. सरकारनं आयुष्मान भारत डिजिटल मोहिमेच्या प्रभावळीमध्ये फिजिओथेरपिस्ट व्यावसायिकांचा देखील समावेश केला आहे. यामुळे तुम्हाला रुग्णांपर्यंत पोहोचणं सोपं झालं आहे. आज खेलो इंडिया चळवळी सोबतच फिट इंडिया अर्थात तंदुरुस्त भारत चळवळही देशात वेगानं पसरत आहे. या सर्व क्षेत्रात होत असलेली वाढ थेट तुम्हा फिजिओथेरपिस्टशी निगडीत आहे. आता लहान शहरं आणि भागांमध्येसुद्धा क्रीडाविषयक पायाभूत सुविधांची उपलब्धता वाढत असल्यामुळे साहजिकच खेळांडुंच्या तंदुरुस्तीसाठी तुमची गरजही वाढत आहे. आपण पाहत आलोय की पूर्वी आपल्याकडे फॅमिली डॉक्टर (कुटुंबाचा वैद्यकीय निदान आणि उपचारांसाठी ठरलेला डॉक्टर) असायचे, त्याचप्रमाणे आता फॅमिली फिजिओथेरपिस्ट देखील दिसू लागले आहेत. यामुळे देखील तुमच्यासाठी नवीन संधी निर्माण होत आहेत.
मित्रहो,
तुम्ही आपल्या रुग्णांसोबत समाजासाठी सुद्धा देत असलेल्या योगदानाची मी प्रशंसा करतो. मात्र माझा तुम्हाला एक आग्रह सुद्धा आहे. माझा हा आग्रह आपल्या संघटनेच्या या सध्या सुरू असलेल्या परिषदेच्या संकल्पनेशी आणि फिट इंडिया मुव्हमेंट म्हणजेच तंदुरुस्त भारत चळवळीशी सुद्धा संलग्न आहे. दुखापत होऊ नये म्हणून शरीराची योग्य हालचाल कशी करायची याबाबत, तसंच योग्य सवयी, योग्य व्यायाम, आणि या सर्वांचं महत्त्व याबाबत लोकांना साक्षर करण्याचं काम आपण करू शकता का? आपल्या तंदुरुस्तीबाबत लोकांनी योग्य तो दृष्टिकोन बाळगणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्यात हा दृष्टिकोन निर्माण करण्याचं काम आपण लेखन आणि व्याख्यानांच्या माध्यमातून करू शकता आणि माझी तरुण मित्रमंडळी तर रील च्या माध्यमातूनही हे साध्य करू शकतात.
मित्रांनो,
मलाही कधीकधी फिजिओथेरपीची गरज भासते. त्यामुळे फिजिओथेरपीच्या घेतलेल्या अनुभवाअंती मी आणखी एक गोष्ट इथे सांगू इच्छितो. माझा अनुभव असा आहे की फिजिओथेरपीला योगाभ्यासाची जोड दिली तर आपल्या समस्येचं निराकरण करणारे सुपरिणाम कैकपटीनं अधिक दिसून येतात. फिजिओथेरपीची सातत्यानं गरज भासणार्या आपल्या शरीराच्या नेहमीच्याच दुखण्यांवर योगासनांमुळे सुद्धा उतारा मिळतो. त्यामुळेच आपल्याला फिजिओथेरपी सोबतच योग विद्या ही अवगत असेल तर आपला व्यवसाय आणि व्यावसायिक कौशल्य यांच्यात अधिक वृद्धी होईल.
मित्रहो,
वयस्कर नागरिकांची देखभाल, हे नागरीक, फिजिओथेरपी व्यवसायाचा मोठा भाग आहेत. त्यामुळे, या रुग्णांची काळजी घेताना आपल्या अनुभवाचा कस लावणं, तसच आपल्या व्यावसायिक कौशल्याची पुरेपूर जाण असणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतं. त्यासाठीच या बाबी लेखनात शब्दबद्ध कराव्यात अशी मी आपल्याला आग्रहपूर्वक विनंती करतो. आज जसजशी जगात ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे तसतशी त्यांची देखभाल अधिकाधिक आव्हानात्मक आणि महागडी होत चालली आहे. आजच्या युगात शोधनिबंध आणि विविध सादरीकरणांच्या माध्यमातून, आपला अनुभव संपूर्ण जगाला उपयुक्त ठरू शकतो. यामुळे भारतीय फिजिओथेरपीस्ट मंडळींचं कौशल्य सुद्धा जगाला कळेल.
मित्रांनो,
एक मुद्दा टेली मेडिसिनचा सुद्धा आहे. तुम्ही सर्वांनी, दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सल्ला देण्याची कला विकसित करायला हवी. कित्येक वेळा ही कला उपयुक्त सिद्ध होते. आता हेच पहा, तुर्कीएमध्ये एवढा मोठा भूकंप आला, सीरियामध्ये सुद्धा त्याचा परिणाम जाणवतोय. अशा प्रकारच्या आपत्तीमध्ये फिजिओथेरपीची खूप मोठ्या प्रमाणावर गरज भासते.अशा परिस्थितीत आपण मोबाईल फोन द्वारे सुद्धा मदत करू शकता. आपल्या फिजीओथेरपीस्ट संघटनेला सुद्धा या दृष्टीने विचार करायला हवा. मला पूर्ण खात्री आहे की तुमच्यासारख्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली भारत फीट आणि सुपरहीटही होईल. याबरोबरच आपणा सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप हार्दिक शुभेच्छा! धन्यवाद!