“कोणत्याही तणावाशिवाय उत्सवाच्या भावनेने परीक्षेला सामोरे जा”
"तंत्रज्ञानाचा वापर संधी म्हणून करा, आव्हान म्हणून नाही"
"राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठीची सल्लामसलत झाली पूर्ण. याबाबत भारतभरातील लोकांचा घेतला सल्ला.
“20 व्या शतकातील शिक्षण व्यवस्था आणि संकल्पना 21 व्या शतकातील आपला विकासमार्ग ठरवू शकत नाहीत. काळानुरूप बदलायला हवे"
“शिक्षक आणि पालकांची अपूर्ण स्वप्ने विद्यार्थ्यांवर लादली जाऊ शकत नाहीत. मुलांनी स्वतःच्या स्वप्नांचा पाठपुरावा करणे महत्वाचे आहे”
“प्रेरणेसाठी कोणतेही इंजेक्शन किंवा सूत्र नाही. त्याऐवजी, स्वतःचा अधिक चांगला शोध घ्या, तुम्हाला कशामुळे आनंद होतो ते शोधा आणि त्यावर कार्य करा”
“तुम्हाला आनंद मिळतो ते करा आणि तेव्हाच तुम्हाला जास्तीत जास्त परिणाम मिळेल”
“तुम्ही एका खास पिढीतील आहात. होय, इथे स्पर्धा जास्त आहे पण संधीही जास्त आहेत”
"मुलगी ही कुटुंबाची शक्ती आहे. आपल्या नारी शक्तीची जीवनाच्या विविध क्षेत्रांमधील उत्कृष्ट कामगिरी पाहण्यापेक्षा चांगले काय असू शकते”
संपूर्ण संवादात पंतप्रधानांनी संवादात्मक, आनंदी आणि संभाषणात्मक वातावरण कायम ठेवले.
त्यांना आता जे प्रश्न कार्यक्रमात सहभागी करुन घेता येणार नाहीत त्यांची उत्तरे व्हिडीओ, ऑडिओ किंवा लिखित स्वरुपात नमो अॅपवर दिली जातील, असे त्यांनी सांगितले.

तुम्हा सर्वांना नमस्कार, खरंतर हा माझा अतिशय आवडता कार्यक्रम आहे पण कोरोनामुळे मधल्या काळात मला तुम्हा सहकाऱ्यांना भेटता आलं नव्हतं. माझ्यासाठी आजचा कार्यक्रम विशेष आनंदाचा आहे. कारण एका प्रदीर्घ कालावधीनंतर तुम्हा सर्वांना भेटण्याची संधी मिळाली आहे. तुम्हाला परीक्षेचा ताण आला असेल, असे मला नाही वाटत... मी बोलतोय ते खरं आहे ना? मी बरोबर बोलतोय ना? तुमच्यावर काही ताण आलेला नाही ना? जर ताण आला असेल तर तो तुमच्या आई वडिलांना असेल. की हा काय करेल. खरं सांगा तुमच्यावर ताण आहे की, तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांवर ताण आला आहे? ज्यांना स्वतःला ताण आला असेल त्यांनी आपला हात वर करा. अच्छा अजूनही लोक आहेत, बरं आणि ज्यांना ठामपणे असं वाटतंय की आपल्या आई बाबांना ताण आला आहे असे किती जण आहेत? त्यांचीच संख्या जास्त आहे. उद्या विक्रम संवत नवीन वर्ष सुरू होत आहे आणि तसेही आपल्या देशात एप्रिल महिन्यात सणांची रेलचेल असते. आगामी काळात येणाऱ्या सर्व सणांसाठी तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. पण सणांच्या काळातच परीक्षा देखील असते आणि म्हणूनच सणांचा आनंद घेता येत नाही. पण जर परीक्षेलाच सण बनवलं तर मग त्या सणामध्ये अनेक रंग भरले जातील आणि म्हणूनच आजचा आपला कार्यक्रम, आपण आपल्या परीक्षांमध्ये उत्सवी वातावरण कसे तयार करायचे, त्यामध्ये कशा प्रकारे रंग भरायचे, आकांक्षा, उत्साहाने आपण परीक्षा देण्यासाठी कसे निघायचे? याच सर्व गोष्टींविषयी आपण चर्चा करणार आहोत. अनेक सहकाऱ्यांनी अनेक प्रश्न मला सुद्धा पाठवले आहेत. काही लोकांनी मला ऑडियो संदेश पाठवले आहेत. काही लोकांनी व्हिडिओ संदेश पाठवले आहेत. प्रसारमाध्यमांमधील सहकाऱ्यांनी देखील ठिकठिकाणी विद्यार्थ्यांशी चर्चा करून अनेक प्रश्न काढले आहेत. पण वेळेच्या मर्यादेमध्ये मला जितके करता येईल तितके नक्कीच करेन. पण या वेळी मी एक नवीन धाडस करणार आहे. कारण गेल्या पाच वेळचा अनुभव आहे की नंतर काही लोकांची तक्रार असते की माझे म्हणणे सांगायचे राहून गेले. माझे म्हणणे मांडलेच नाही वगैरे. तर मग यावेळी मी एक काम करेन की आज जितके होईल तितका वेळ आपण वेळेच्या मर्यादेत चर्चा करुया. पण नंतर तुमचे जे प्रश्न आहेत. त्यांना मी जर वेळ मिळाला तर व्हिडिओच्या माध्यमातून, कधी प्रवास करताना मला वेळ मिळाला तर ऑडिओच्या माध्यमातून किंवा मग लिखित मजकुराच्या रुपात मी नमो ऍपवर संपूर्ण चर्चेला पुन्हा एकदा तुमच्या समोर ज्या गोष्टी या ठिकाणी बाकी राहतील त्या सर्व मांडेन जेणेकरून तुम्ही नमो ऍपवर जाऊन ते पाहाल आणि त्यातही या वेळी एक नवा प्रयोग केला आहे, मायक्रो साईट बनवली आहे. तर तिथे जाऊन देखील तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. चला तर मग आपल्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करुया. सर्वात आधी कोण आहे?

सूत्रसंचालकः धन्यवाद माननीय पंतप्रधान सर, माननीय पंतप्रधान महोदय तुमचे प्रेरक आणि ज्ञानवर्धक मार्गदर्शन आम्हाला नेहमीच सकारात्मक उर्जा आणि विश्वास प्रदान करत असते. तुमच्या व्यापक अनुभवी आणि ज्ञानी मार्गदर्शनाची आम्ही सर्व उत्सुकतेने प्रतीक्षा करत आहोत. माननीय, तुमच्या आशीर्वादाने आणि अनुमतीने मी कार्यक्रमाचा शुभारंभ करू इच्छितो. धन्यवाद मान्यवर. माननीय पंतप्रधान महोदय, भारताची राजधानी ऐतिहासिक शहर दिल्लीच्या विवेकानंद शाळेची बारावी इयत्तेत शिकणारी विद्यार्थिनी खुशी जैन हिला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. खुशी जैन कृपया तुमचा प्रश्न विचारा.

ही खरोखरच चांगली गोष्ट आहे की खुशी पासून प्रारंभ होत आहे आणि आमची देखील हीच इच्छा आहे की परीक्षा पूर्ण होईपर्यंत सर्वत्र खुशीच खुशी टिकून राहावी.

खुशी : माननीय पंतप्रधान महोदय नमस्कार, माझे नाव खुशी जैन आहे. मी विवेकानंद स्कूल आनंद विहार दिल्ली ची इयत्ता बारावीची विद्यार्थिनी आहे. मान्यवर, माझा प्रश्न आहे जेव्हा आपल्या मनात भीती निर्माण झालेली असते अशा परिस्थितीमध्ये आपण परीक्षेची तयारी कशी करायची? धन्यवाद.

सूत्रसंचालक: धन्यवाद खुशी, मान्यवर साहित्यिक परंपरांच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध प्रदेश असलेल्या छत्तीसगडच्या बिलासपुरच्या इयत्ता बारावीमधील विद्यार्थी ए. श्रीधर शर्मा काहीशा अशाच प्रकारच्या समस्येला तोंड देत आहे. पंतप्रधानांसमोर आपले म्हणणे मांडण्यासाठी तो अतिशय उत्सुक आहे. श्रीधर कृपया तुमचा प्रश्न विचारा.
 
ए. श्रीधर शर्मा: नमस्कार माननीय पंतप्रधान महोदय, मी ए. श्रीधर शर्मा दक्षिण पूर्व मध्य रेलवे सर्वोच्च माध्यमिक विद्यालय क्र.1 छत्तीसगड बिलासपुरचा बारावी इयत्तेत शिकणारा विद्यार्थी आहे. महोदय माझा प्रश्न काहीसा असा आहे- मी परीक्षेच्या तणावाला कशा प्रकारे तोंड देऊ? जर मला चांगले गुण मिळाले नाहीत तर काय होईल? जर मला अपेक्षेइतके गुण मिळाले नाहीत तर काय होईल?  आणि सर्वात शेवटी जर मला चांगली श्रेणी मिळवता आली नाही तर माझ्या कुटुंबियांना येणाऱ्या निराशेचा सामना कसा करू?
 
सूत्रसंचालक : धन्यवाद श्रीधर, साबरमतीचे संत महात्मा गांधी यांनी ज्या भूमीपासून सत्याग्रहाच्या चळवळीचा प्रारंभ केला त्या भूमीतील वडोदऱ्याच्या केनी पटेल या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला मी आमंत्रित करतो ज्याला अशाच प्रकारच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रामाणिकपणे तुमचे मार्गदर्शन हवे आहे. केनी कृपया आपला प्रश्न विचारा.

केनी पटेलः पंतप्रधान महोदयांना माझा नमस्कार! सर माझे नाव केनी पटेल आहे. मी गुजरातमधील वडोदऱ्याच्या ट्री हाऊस हाय स्कूलचा दहावी इयत्तेत शिकणारा विद्यार्थी आहे. माझा प्रश्न हा आहे की संपूर्ण अभ्यासक्रमाचा अभ्यास पूर्ण करून त्याची योग्य रिव्हिजन करण्याच्या आणि निकालामध्ये उत्तम गुण मिळवण्याच्या ताणावर मात कशी करायची आणि परीक्षेच्या काळात आराम कसा करायचा. धन्यवाद सर.
 
सूत्रसंचालक : धन्यवाद केनी, माननीय पंतप्रधान महोदय खुशी, श्रीधर शर्मा तसंच केनी पटेल परीक्षाच्या तणावामुळे चिंताग्रस्त आहेत. त्यांच्याप्रमाणेच देशभरातील अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या ताणाविषयीचे प्रश्न विचारले आहेत. परीक्षेच्या ताणामुळे जवळपास सर्वच विद्यार्थ्यांना समस्या निर्माण होत असतात आणि तुमच्या मार्गदर्शनाची ते वाट पाहत आहेत. माननीय पंतप्रधान महोदय,

पंतप्रधान: एकाच वेळी तुम्ही लोकांनी इतके प्रश्न विचारले आहेत की असं वाटू लागलं आहे की मीच गोंधळून तर जाणार नाही ना. तुम्ही विचार करा, तुमच्या मनात भीती का निर्माण होते. हा प्रश्न माझ्या मनात आहे. तुम्ही परीक्षा पहिल्यांदाच देणार आहात का? तुमच्यापैकी कोणीच असा नसेल जो पहिल्यांदाच परीक्षा देणार आहे. म्हणजेच तुम्ही यापूर्वी अनेकदा परीक्षा दिल्या आहेत आणि आता तर एका प्रकारे परीक्षांच्या या मालिकेत तुम्ही तर शेवटच्या टोकाला पोहोचलेला आहात. एवढा मोठा समुद्र ओलांडल्यानंतर काठावर बुडण्याची भीती निर्माण होण्याचे कारण मला तरी समजत नाही. तर सर्वात पहिली बाब म्हणजे तुम्ही तुमच्या मनात एक गोष्ट पक्की करा की परीक्षा आयुष्यातील एक सोपा भाग आहे. आपल्या विकासाच्या या प्रवासाचे लहान-लहान टप्पे आहेत आणि या टप्प्यांमधून आपल्याला वाटचाल करायची आहे आणि आपण त्यातून वाटचाल केलेली आहे. जर आपण इतक्या वेळा परीक्षा दिली आहे तर परीक्षा देत देत आपण एक प्रकारे एग्झामप्रुफ झालेलो आहोत आणि जर आपल्यामध्ये हा आत्मविश्वास निर्माण झालेला असेल तर केवळ हीच परीक्षा नव्हे तर आगामी काळात कोणत्याही परीक्षेसाठी हा अनुभवच एका प्रकारे तुमचे सामर्थ्य बनतो. याला, तुमच्या या अनुभवाला, ज्या प्रक्रियांमधून तुम्ही गेला आहात त्यांना तुम्ही अजिबात कमी मानू नका. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या मनात जो गोंधळ असतो. असेही नाही की तुमच्या तयारीमध्ये काही कमतरता आहे. म्हणायला तर आपण काहीही म्हणू शकतो. पण मनात राहून जातंच. मी तुम्हाला एक गोष्ट सुचवतो. आता परीक्षांच्या दरम्यान तसा फार वेळ नाही आहे, मग हा ताण कमी करायचा असेल तर जितका अभ्यास केला आहे त्यावरच आपल्याला विश्वास ठेवून पुढे वाटचाल करायची आहे. एखाद दुसऱ्या काही गोष्टी करायच्या राहून गेल्या असतीलही. एखाद्या विषयाच्या काही भागांचा जितका अभ्यास करायला हवा होता तितका झाला नसेल. तरीही काही हरकत नाही. मी जितका अभ्यास केला आहे त्याविषयी मला पुरेपूर आत्मविश्वास आहे. तर मग साहजिकच बाकीच्या गोष्टींवर देखील मात करता येते आणि म्हणूनच मी तुम्हाला असे आवर्जून सांगेन की तुम्ही या दबावाखाली राहू नका. खूप गोंधळून जायला होईल, असे वातावरण तयार व्हायलाच देऊ नका. तुमची दिनचर्या जितकी सहज असेल, तशाच प्रकारच्या नेहमीच्या दिनचर्येमध्ये परीक्षेचा काळ व्यतीत करा. काही तरी अतिरिक्त करण्याचा किंवा काही तरी कमी करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या संपूर्ण मनस्थितीमध्ये त्यामुळे अस्थिरता निर्माण होईल. तो अमुक करतो म्हणून मी पण हे करेन. माझा एक मित्र असे करतो म्हणून त्याला चांगले मार्क्स मिळतात म्हणून मी पण तेच करेन. तुम्ही कुठेतरी  काही तरी ऐकले आहे म्हणून ते करण्याचा प्रयत्न करू नका. इतका काळ जे तुम्ही आतापर्यंत करत आला आहात तेच करा आणि त्यावरच विश्वास ठेवा. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही अगदी सहजतेने, तुमच्या अपेक्षांनुरुप, उत्साहाने एका उत्सवी वातावरणामध्ये परीक्षा द्याल आणि यशस्वी व्हाल.

सूत्रसंचालक : धन्यवाद माननीय पंतप्रधान सर, आम्हाला परीक्षांव्यतिरिक्त आपल्या स्वतःवर  विश्वास ठेवण्याच्या नैसर्गिक अनुभवाची शिकवण दिल्याबद्दल तुमचे आभार मानतो. पुढचा प्रश्न कर्नाटकमधील वारसास्थळे आणि राष्ट्रीय उद्यानांसाठी प्रसिद्ध असलेल्या मैसूरु येथून आलेला आहे. इयत्ता 11 वीमध्ये शिकणाऱ्या तरुण एमबी याला त्याच्या समस्येवर उपाय हवा आहे. तरुण कृपया तुमचा प्रश्न विचारा.

तरुण : गुड मॉर्निंग सर, मी कर्नाटकमधल्या मैसूरू येथील जवाहर नवोदय विद्यालयात 11 वी इयत्तेत शिकत आहे. परीक्षा पे चर्चा 2022 च्या पाचव्या पर्वामध्ये सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल मी आभार मानतो. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सर यांना माझा असा प्रश्न आहे की यूट्युब, व्हॉटसऍप आणि इतर समाज माध्यम ऍप सारख्या लक्ष विचलित करणाऱ्या अनेक गोष्टी असताना सकाळच्या वेळी विद्यार्थी अभ्यासावर लक्ष कसे काय केंद्रित करु  शकतील? या सर्व गोष्टींमुळे ऑनलाईन अभ्यास करणे अतिशय कठीण आहे सर, यावर काही उपाय आहे का? धन्यवाद सर
 
सूत्रसंचालक: धन्यवाद तरुण, माननीय पंतप्रधान सर, दिल्ली कॅन्टॉनमेंट बोर्डच्या सिल्वर ओक स्कूलमध्ये दहावीत शिकणाऱ्या शाहीद अली याला अशाच प्रकारच्या विषयावर प्रश्न विचारायचा आहे. शाहीद कृपया तुमचा प्रश्न विचारा.
 
शाहीद : नमस्कार महोदय, माननीय पंतप्रधान जी, मी शाहीद अली सिल्वर ओक्स स्कूल दिल्ली केंटोन्मेंट बोर्डचा 10वी इयत्तेत शिकणारा विद्यार्थी आहे. गेली दोन वर्षे आम्ही आमचा अभ्यास ऑनलाईन माध्यमातून करत आहोत. इंटरनेटच्या वापरामुळे आमच्यापैकी अनेक मुले सोशल मीडिया आणि ऑनलाइन गेमिंगच्या अधीन झाली आहेत. त्याचे व्यसन लागल्यासारखे झाले आहे. यातून बाहेर पडण्यासाठी काय केले पाहिजे. कृपया आम्हाला मार्गदर्शन करा.
 
सूत्रसंचालक : धन्यवाद शाहीद, माननीय सर तिरुवनंतपुरम, केरळ येथील दहावीत शिकणारी कीर्तना नायर याच समस्येला तोंड देत आहे आणि तुमच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा करत आहे. सर, कीर्तनाचा प्रश्न टाईम्स नाऊकडून प्राप्त झाला आहे. कीर्तना कृपया तुमचा प्रश्न विचारा.
 
कीर्तना : हाय, मी कीर्तना, क्रिसाल स्कूल, तिरुवनंतपुरम, केरळ या शाळेत दहावीत शिकत आहे. महामारीच्या काळात आम्हाला ऑनलाईन वर्गांमधून शिकावे लागले याची आपल्या सर्वांना कल्पना आहेच. आमच्या घरामध्ये मोबाईल फोन, सोशल मीडिया इत्यादी प्रकारच्या साधनांच्या रुपात लक्ष विचलित करणारी अनेक साधने आहेत. सर म्हणूनच माझा प्रश्न असा आहे की आम्ही ऑनलाईन वर्गांमध्ये शिकण्याच्या पद्धतीत कशा प्रकारे सुधारणा करायची?

सूत्रसंचालक : धन्यवाद कीर्तना, माननीय सर ऑनलाईन शिक्षणामुळे केवळ विद्यार्थ्यांसमोरच नव्हे तर शिक्षकांसमोर देखील मोठे आव्हान निर्माण केले आहे. कृष्णगिरी येथील श्री. चंद्रचुडेश्वरन एम यांना या संदर्भात तुमच्याकडून मार्गदर्शनाची आणि निर्देशांची अपेक्षा आहे. सर कृपया तुमचा प्रश्न विचारा.

चंद्रशेखर एम: नमस्कार, माननीय पंतप्रधानजी, होसूर तामिळनाडू इथल्या अशोक लल्लन शाळेमधून मी चंदचुडेश्वरन बोलतो आहे. माझा प्रश्न आहे-शिक्षक म्हणून ऑनलाईन शिकवणे आणि शिकणे हे एक आव्हान बनले आहे. याला सामोरे कसे जायचे, सर, धन्यवाद महोदय.

सूत्रसंचालक: धन्यवाद सर, माननीय पंतप्रधान सर,  तरुण, शाहीद, कीर्तना आणि चंद्रचुडेश्वरन आणि इतर सर्वानी समस्या मांडली आहे की ऑनलाइन शिक्षणामुळे ते समाजमाध्यमांच्या आहारी गेले आहेत आणि अभ्यासावर लक्ष केंद्रीत करु शकत नाहीत. माननीय सर, देशाच्या विविध भागातून आपल्याकडे असे अनेक प्रश्न आले आहेत. यातील, हे निवडक प्रश्न आहेत आणि जी  प्रत्येकाची चिंता आहे. कृपया त्यांना मार्गदर्शन करावे ही विनंती सर.

पंतप्रधान: माझ्या मनात एक प्रश्न येतो की तुम्ही सर्वांनी म्हटलं की, इथे-तिथे भरकटतात. म्हणून थोडे स्वतःला विचारा की जेंव्हा तुम्ही ऑनलाईन असता तेंव्हा खरोखरच वाचत असता की रिल पाहता. आता मी तुम्हाला हात वर करायला नाही सांगणार. मात्र तुम्हाला समजलं असेल, मी तुम्हाला पकडले आहे. खरे तर दोष ऑनलाईन किंवा ऑफलाईनचा नाही. तुम्ही अनुभव घेतला असेल, वर्गात देखील अनेकदा तुमचे शरीर वर्गात असते, तुमचे डोळे शिक्षकांकडे असतात, मात्र एकही गोष्ट लक्षात राहत नाही, कारण तुमचे मन दुसरीकडेच कुठेतरी असते. शरीराला कुठलाही दरवाजा लावलेला नाही, खिडकी नाही मात्र मन कुठेतरी दुसरीकडेच आहे तेंव्हा ऐकणे देखील बंद होऊन जाते. कुठलीही गोष्ट लक्षात राहत नाही. ज्या गोष्टी ऑफलाईन होतात त्या गोष्टी ऑनलाईन देखील होतात. याचा अर्थ माध्यम ही समस्या नाही मन हीच समस्या आहे,   माध्यम ऑनलाइन असो किंवा ऑफलाइन जर माझं मन पूर्णपणे त्यात बुडाले असेल, त्याने काही फरक पडत नाही. शोधक मन आहे जे यातल्या बारीक  गोष्टी पकडण्याचा प्रयत्न करत आहे. तर तुमच्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मला नाही वाटत काही फरक पडू शकतो आणि म्हणून आज युग बदलते तसे माध्यम देखील बदलते. आता पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धत होती, अनेक वर्षांपूर्वी, सत्तर वर्षांपूर्वी छपाईचे पेपर देखील नव्हते, तेंव्हा त्या काळी पुस्तके देखील नव्हती. तेंव्हा सगळं तोंडपाठ केलं जायचं. तेंव्हा त्यांची श्रवणशक्ती इतकी जबरदस्त होती की ऐकायचे ते लगेच मुखोद्गत केले जायचे  आणि पिढ्यानपिढ्या श्रवण शक्तीद्वारे शिकल्यानंतर, काळ बदलला छपाई सामग्री आली, पुस्तके  आली तेंव्हा लोकांनी त्या अनुरूप स्वतःला बदलून घेतलं.  ही उत्क्रांती निरंतर सुरू आहे आणि हेच तर मानवी जीवनाचे वैशिष्ट्य आहे. या उत्क्रांतीचा एक भाग आहे. आज आपण डिजिटल उपकरणांच्या माध्यमातून,  नवीन तंत्रज्ञान टूल्सच्या माध्यमातून अतिशय सहजपणे अनेक गोष्टी प्राप्त करू शकतो आणि मोठ्या प्रमाणात प्राप्त करू शकतो. याला आपण एक संधी म्हणून स्थान देऊ शकतो. मला पूर्ण विश्वास आहे तुम्ही तुमच्या शिक्षकांकडून मिळालेल्या नोट्स आणि अभ्यासाचे इतर साहित्य तुम्हाला जे ऑनलाईन उपलब्ध आहे, या दोन्ही एकत्र केल्या आणि व्यवस्थित लक्ष दिलं तर तुम्ही त्याचा योग्य उपयोग करू शकता. तुम्ही म्हणाल की सरांनी मला एवढंच सांगितलं होतं, मला तर एवढच लक्षात आहे, मात्र आता इथे मला आणखी दोन तीन गोष्टी चांगल्या मिळाल्या  आहेत,  खूप छान पद्धतीने मिळाल्यात. या दोन्हींचा समावेश मी केला तर ताकद आणखीन वाढेल, ऑनलाईनचा आणखी लाभ हा आहे की हा एक शिक्षणाचा भाग आहे, ज्ञान प्राप्त करण्याचा. ऑनलाईन आणि ऑफलाईनचा सिद्धांत काय असू शकतो, मला वाटतं ऑनलाईन हे मिळवण्यासाठी आहे,  ऑफलाइन हे बनण्यासाठी आहे. मला किती ज्ञान मिळालं आहे, मिळवायचे आहे, किती प्राप्त करायचे आहे, मी ऑनलाईन जाऊन जगभरातून जे काही उपलब्ध आहे ते माझ्या मोबाईल फोनवर किंवा माझ्या आयपॅडवर घेऊ शकतो, मी आत्मसात करेन आणि ऑफलाईन जे मला मिळाले आहे त्याचा विश्लेषण करण्यासाठी मी वापर करेन. दक्षिण भारतातल्या माझ्या मित्रांनी मला विचारलं, मी वडक्कम म्हणत संवाद साधला. शिक्षकांनी मला विचारलं तर मी सांगेन की मी ऑनलाईन डोसा कसा बनवतात, त्यात काय काय घालतात, त्याची प्रक्रिया कशी असते सगळे पाहिले आहे. मात्र त्यामुळे पोट भरेल का, उत्कृष्ट डोसा तुम्ही संगणकावर बनवला, सर्व सामग्रीचा वापर केला त्याने पोट भरेल का.  मात्र ते ज्ञान जर तुम्ही प्रत्यक्षात वापरलं तर तुमचं पोट भरेल की नाही. तर ऑनलाईनचा तुमचा आधार मजबूत करण्यासाठी वापर करा,  ऑफलाइनमध्ये तुम्हाला ते प्रत्यक्ष आयुष्यात साकार करायचे आहे.  शिक्षणाचे देखील असेच आहे. यापूर्वी तुमची पुस्तकं होती, तुमचे शिक्षक आहेत तुमचे आसपासचे-आजूबाजूचे वातावरण आहे, ती खूप मर्यादित साधने होती ज्ञान मिळवण्याची, मात्र आज अमर्याद साधने आहेत.  म्हणूनच तुम्ही स्वतःचा किती विस्तार करू शकता तेवढ्या गोष्टी तुम्ही आत्मसात करत जा आणि म्हणूनच ऑनलाईन ही संधी समजा. इथे-तिथे भटकून  काम केलं तर मग टूल्स उपलब्ध आहेत, तुम्ही पाहिले असेल प्रत्येक उपकरणात टूल्स असतात ज्या तुम्हाला  सूचना देते  की हे करा, हे करू नका, आता थांबा, थोडा वेळ आराम करा, आता पंधरा मिनिटानंतर पुन्हा यायचं आहे, पंधरा मिनिटानंतर येणार/ तुम्ही या टूल्सचा वापर करून स्वतःला शिस्त लावू शकता, अनेक मुलं आहेत जी ऑनलाइन मोठ्या प्रमाणात याचा वापर करतात, स्वतःला बंधन घालून घेतात.  दुसरी गोष्ट म्हणजे आयुष्यात स्वतःशी जोडले जाणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे,  जेवढा आनंद तुम्हाला मोबाईलमध्ये गेल्यावर, आयपॅडमध्ये घुसल्यावर मिळतो, त्यापेक्षा हजार पट आनंद तुम्हाला अंतर्मनात डोकावल्यावर मिळेल. तर दिवसभरात काही क्षण असे निवडा, जेंव्हा तुम्ही ऑनलाइन नसाल, ऑफलाईन देखील नसाल, इनर लाईन असाल. जेवढे तुम्ही अंतर्मनात जाल, तेवढीच तुम्हाला ऊर्जेची अनुभूती येईल. जर तुम्ही या गोष्टी केल्या तर मला नाही वाटत की ही सर्व संकटे तुमच्यासाठी अडचणी निर्माण करतील. 

सूत्रसंचालक: माननीय पंतप्रधानांनी आपल्याला मूलमंत्र दिला आहे की जेंव्हा आपण एकाग्र होऊन आपला अभ्यास करू तेंव्हा आपल्याला नक्की यश मिळेल. धन्यवाद महोदय, माननीय पंतप्रधान जी, वैदिक संस्कृती आणि सिंधू संस्कृतीचे  मुख्य निवासस्थान पानिपत हरियाणा इथून शिक्षिका सुमन राणी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितात, सुमन राणी मॅडम, कृपया आपला प्रश्न विचारा.

सुमन रानी: नमस्कार, पंतप्रधान महोदय जी, मी सुमन राणी, टी.जी.टी सोशल सायन्स, डीएव्ही पोलीस पब्लिक स्कूल पानीपत इथून, सर माझा तुम्हाला  प्रश्न आहे की नवीन शिक्षण धोरण विद्यार्थ्यांना त्यांचे कौशल्य विकसित करण्यात नव्या संधी कशा प्रकारे प्रदान करेल? धन्यवाद महोदय.

सूत्रसंचालक: धन्यवाद मॅडम, मान्यवर, पूर्वेचे स्कॉटलंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध मेघालयच्या ईस्ट खासी हील्स येथील इयत्ता 9 वी ची विद्यार्थिनी शीला वैष्णवी तुम्हाला याच विषयावर प्रश्न विचारू इच्छिते. शीला कृपया आपला प्रश्न विचारा.

शीला वैष्णव : सुप्रभात सर, मी जवाहर नवोदय विद्यालय ईस्ट खासी हिल्स मेघालयची शीला वैष्णव, इयत्ता 9 वीत शिकत आहे. माननीय पंतप्रधानांना माझा प्रश्न आहे- राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदी विद्यार्थ्यांचे जीवन आणि सामान्यतः समाजाचे जीवन आणि नवीन भारताचा मार्ग कसे सक्षम बनवतील. धन्यवाद सर

सूत्रसंचालक: धन्यवाद  शीला,  माननीय पंतप्रधानजी, नवीन शिक्षण धोरण संबंधी या प्रकारचे अनेक प्रश्न देशभरातून प्राप्त झाले आहेत, यामध्ये विद्यार्थ्यांनी आपलं मत व्यक्त केलंय की आमची आवड काही वेगळी असते आणि आम्ही शिकतो ते विषय वेगळे असतात. अशावेळी काय करायचे, कृपया मार्गदर्शन करून कृतार्थ करा.

पंतप्रधान: जरा गंभीर प्रकारचा प्रश्न विचारला आहे आणि एवढ्या कमी वेळेत याचे विस्तृतपणे उत्तर देणं जरा कठीण आहे. पहिली गोष्ट ही आहे की नवीन शिक्षण धोरणाऐवजी आपण असं म्हणू या की हे राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे. काही लोक ‘एन’ला नवीन असे म्हणतात खरं तर हे राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे आणि मला बरं वाटलं की तुम्ही हे विचारलं. कारण जगात असं क्वचितच शिक्षण धोरण असेल, ज्यात इतक्या लोकांचा सहभाग, इतक्या व्यापक स्तरावर हे झाले असेल हा खरोखरच खूप मोठा विश्वविक्रम आहे. 2014 पासून यावर काम आम्ही सुरू केलं होतं. गेली 6- 7 वर्ष यावर खूप विस्तृत चर्चा झाली, प्रत्येक स्तरावर झाली, गावांमधील शिक्षकांमध्ये झाली, गावांमधल्या विद्यार्थ्यांमध्ये झाली, शहरांतील शिक्षकांमध्ये झाली, शहरांतल्या विद्यार्थ्यांमध्ये देखील झाली, विद्यार्थी-विद्यार्थिनी, सुदूर, डोंगराळ भाग, वनक्षेत्रातली मुले   म्हणजेच भारतातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून अनेक वर्ष या विषयावर विचारमंथन झाले. या सगळ्याचा सारांश तयार केला गेला आणि देशातल्या अनेक उत्तमोत्तम विद्वान आणि ते देखील आजचे युग लक्षात घेऊन, जे लोक विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी निगडित आहेत अशा लोकांच्या नेतृत्वाखाली याची  विशेष चर्चा झाली. त्याचा एक मसुदा तयार झाला. हा मसुदा नंतर जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आला आणि पंधरा ते वीस लाख सूचना यावर मिळाल्या.  एवढा मोठा अभ्यास, एवढा मोठा व्यापक उपक्रम, त्यानंतर शिक्षण धोरण समोर आले आहे. हे शिक्षण धोरण मी पाहिले आहे. राजकीय पक्ष, सरकार यांनी काही केलं तरी कुठून ना कुठून तरी त्याला विरोधाचा सूर उमटतो,  प्रत्येक जण संधी शोधत असतो, आज माझ्यासाठी आनंदाची गोष्ट ही आहे की राष्ट्रीय शिक्षण  धोरणाचे  भारतातल्या प्रत्येक स्तरातून मोठ्या प्रमाणात स्वागत झालं आणि म्हणूनच हे काम करणारे सगळेजण अभिनंदनासाठी पात्र आहेत. लाखो लोक आहेत ज्यांनी ते तयार करण्यात सहभाग नोंदवला आहे. हे सरकारने बनवलेले नाही, देशाच्या नागरिकांनी तयार केले आहे, देशाच्या विद्यार्थ्यांनी बनवले आहे, देशाच्या शिक्षकांनी बनवले आहे आणि देशाच्या भविष्यासाठी बनवले आहे. आता एक छोटासा विषय, पूर्वी आपल्याकडे खेळ, क्रीडा स्पर्धा अवांतर उपक्रम म्हणून मानले जायचे. तुमच्यातले जे पाचवी, सहावी, सातवीमध्ये शिकले असतील, त्यांना माहीत असेल. मात्र आता राष्ट्रीय शिक्षण धोरणात ते शिक्षणाचा भाग बनवण्यात आले आहेत. म्हणजे खेळ, क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेणे हे अनिवार्य होत आहे. खेळल्याशिवाय कोणाचाही विकास होऊ शकत नाही जर तुम्हाला विकसित व्हायचे असेल, खुलायचे असेल तर मैदानी खेळ खेळणे आयुष्यात खूप आवश्यक आहे. खेळामुळे सांघिक भावना येते, साहस येते, आपल्या प्रतिस्पर्ध्याला समजण्याची ताकद येते. या सर्व बाबी ज्या पुस्तकातून शिकतो, त्या खेळाच्या मैदानात सहजपणे शिकू शकता. यापूर्वी खेळ हा विषय आपल्या शिक्षण व्यवस्थेबाहेर होता. अवांतर उपक्रम होता. त्याला प्रतिष्ठा दिली, आता तुम्ही पाहता की,परिवर्तन घडणार आहे आणि सध्या खेळाच्या बाबतीत जी रुची वाढत आहे, त्याला एक प्रतिष्ठा मिळाली आहे. मी आता तुम्हाला अशी एक गोष्ट सांगतो जी तुमच्या लक्षात येईल, सांगण्यासाठी तर माझ्याकडे खूप काही आहे. आपण विसाव्या शतकातील धोरणे राबवून 21 व्या शतकाची निर्मिती करू शकतो का? मी तुम्हा लोकांना विचारत आहे. 20 व्या शतकातील दृष्टीकोन, 20 व्या शतकातील व्यवस्था, 20 व्या शतकाचे धोरण घेऊन तुम्ही 21 व्या शतकात पुढे जाऊ शकता का? जरा मोठ्याने सांगा. 

सूत्रसंचालक: नाही सर.

पंतप्रधान: नाही जाऊ शकत ना, मग आपल्याला 21 व्या शतकाला अनुकूल आपल्या सर्व व्यवस्था, सर्व धोरणे आखायला हवीत की नकोत? जर आपण स्वतःमध्ये बदल केले नाही तर आपल्यात साचलेपण येईल. आपण नुसते थांबणार नाही तर मागे पडू आणि म्हणूनच, मधल्या काळात जेवढा वेळ जायला हवा होता त्यापेक्षा जास्त गेला, त्यामुळे देशाचे नुकसान झाले आहे. मात्र आता आपण 21 व्या शतकात पोहचलो असताना, आता जसे आपण पाहतो की कधीकधी माता-पित्यांच्या इच्छेमुळे, संसाधनांमुळे, व्यवस्थेमुळे आपण आपल्या आवडत्या शिक्षणासाठी पुढे जाऊ शकत नाही आणि तणावामुळे आणि प्रतिष्ठेमुळे एका संकुचित झालो आहोत की नाही, आपल्याला डॉक्टर बनायचे आहे, मात्र जी रुची आहे ती वेगळी आहे. मला वन्यजीव मध्ये रुची आहे, मला चित्रे काढायला आवडतात. मला तंत्रज्ञानाची आवड आहे, मला विज्ञान देखील आवडते. मला संशोधनात रस आहे, मात्र अन्य कारणामुळे मी वैद्यकीय शाखेकडे वळलो. आता यात प्रवेश केला आहे, तर या पाईपलाइनच्या दुसऱ्या टोकातूनच बाहेर पडावे लागेल. मात्र आता आम्ही म्हटले आहे की, असे आवश्यक नाही की तुम्ही प्रवेश घेतला, मात्र 1- 2 वर्षानंतर वाटले की नाही, हा माझा मार्ग नाही. मला तर ते आवडते, मला तिथे जायचे आहे. तर आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तुम्हाला नव्या मार्गावर जाण्याची संधी देते, सन्मानाने संधी देते. आज आपल्याला माहीत आहे, जगभरात खेळाचे महत्व खूप वाढले आहे. केवळ शिक्षण, ज्ञानांचे भांडार एवढे पुरेसे नाही. कौशल्य देखील असायला हवे. आता त्याला आम्ही अभ्यासक्रमाचा भाग बनवले आहे. जेणेकरून त्याच्या पूर्ण विकासासाठी त्याला स्वतःला संधी मिळेल. मला आनंद झाला, आताच मी एक प्रदर्शन पाहून आलो. राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे प्रतिबिंब काय आहे, ते एका छोट्याशा स्वरूपात शिक्षण विभागाच्या लोकांनी सादर केले होते, मी शिक्षण विभागाच्या लोकांचे अभिनंदन करतो, खूपच प्रभावी होते. आनंद झाला की आपली आठवी-दहावी इयत्तेतील मुले 3D प्रिंटर बनवत आहेत. आनंद होतोय की आपली आठवी-दहावी इयत्तेतील मुले वैदिक गणिताचे ऍप चालवत आहेत आणि जगभरातील विद्यार्थी त्यांच्याकडून शिकत आहेत. नंदिता आणि निवेदिता या दोन बहिणी मला भेटल्या. मी खूपच अचंबित झालो. आपल्याकडे या गोष्टी वाईट मानणारा एक वर्ग असतो. मात्र त्यांनी जगभरात आपले विद्यार्थी शोधले आहेत. त्या स्वतः विद्यर्थी आहेत, मात्र गुरु बनल्या आहेत. बघा, त्यांनी तंत्रज्ञानाचा भरपूर उपयोग केला आहे. त्या तंत्रज्ञानाला घाबरल्या नाहीत, तंत्रज्ञानाचा त्यांनी उपयोग केला. त्याचप्रमाणे मी पाहिले,  काही शिल्पे बनवली होती. काही सुंदर चित्रे काढलेली होती. आणि एवढेच नाही, त्यात दूरदृष्टी होती. असेच काहीतरी करायचे म्हणून केले नव्हते. मला ती दूरदृष्टी जाणवत होती. याचा अर्थ असा झाला की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व्यक्तिमत्व विकासासाठी अनेक संधी पुरवत आहे आणि मी म्हणेन की जेवढ्या बारकाईने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समजून घेऊ आणि प्रत्यक्षात ते साकार होईल. तुम्ही बघाल, अनेक लाभ तुम्हाला दिसून येतील. मी देशभरातील शिक्षकांना, देशभरातील शिक्षण तज्ज्ञांना, देशभरातील शाळांना विनंती करतो की तुम्ही त्यातील बारीक सारीक तपशील प्रत्यक्षात उतरवण्यासाठी नवनव्या पद्धती विकसित करा, आणि जितक्या जास्त पद्धती असतील, तेवढ्याच जास्त संधी प्राप्त होतील. माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत.

सूत्रसंचालक: माननीय पंतप्रधान महोदय, राष्ट्रीय शिक्षण धोरण आपल्यासाठी   शिक्षणाचा अर्थ पुन्हा परिभाषित करेल आणि आपले भविष्य उज्ज्वल आहे, यावर आता आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आम्ही खेळलो तर नक्कीच बहरू.  आदरणीय सर, गाझियाबाद औद्योगिक शहरातील गव्हर्नमेंट गर्ल्स इंटर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या रोशनीला काही मुद्द्यांवर आदरणीय पंतप्रधानांकडून  मदत आणि मार्गदर्शन हवे आहे. रोशनी, कृपया तुमचा प्रश्न विचारा.

रोशनी: नमस्कार महोदय. माननीय पंतप्रधान जी, मी रोशनी..उत्तरप्रदेशातील गाझियाबादमधील गव्हर्नमेंट गर्ल्स इंटर कॉलेज विजय नगर येथे इयत्ता 11 वी ची विद्यार्थिनी आहे. महोदय माझा प्रश्न असा आहे की, मला आश्चर्य वाटते की, विद्यार्थी परीक्षेला घाबरतात की त्यांच्या पालक आणि शिक्षकांना? आपले पालक किंवा शिक्षक आपल्याकडून ज्या अपेक्षा करतात त्याप्रमाणे आपण परीक्षेला खूप गांभीर्याने घ्यावे की उत्सवांप्रमाणे परीक्षेचा आनंद लुटावा? कृपया मार्गदर्शन करा, धन्यवाद.

सूत्रसंचालक: धन्यवाद रोशनी, पाच नद्यांच्या प्रदेशात वसलेले, गुरूंची भूमी असलेले समृद्ध राज्य पंजाबच्या भटिंडामधील दहावीची विद्यार्थिनी किरणप्रीतला याच विषयावर प्रश्न विचारायचा आहे. किरणप्रीत, कृपया प्रश्न विचारा.

किरणप्रीत: सुप्रभात माननीय पंतप्रधान महोदय, माझे नाव किरणप्रीत कौर आहे. मी 10 वीत शिकत आहे. मी ब्लूम पब्लिक सीनियर सेकंडरी स्कूल, कल्याणसुखा, जिल्हा भटिंडा, पंजाब या शाळेची विद्यार्थिनी आहे. सर, माझा तुम्हाला प्रश्न आहे की, माझा निकाल चांगला आला नाही तर माझ्या कुटुंबाच्या अपेक्षाभंगाचा सामना मी कसा करू, माझ्या पालकांबद्दल मी नकारात्मक नाही कारण मला माहित आहे की त्यांना माझ्यापेक्षा अधिक दिलासा देण्याची  आवश्यकता आहे. धन्यवाद सर, कृपया मला मार्गदर्शन करा.

सूत्रसंचालक: धन्यवाद किरणप्रीत. माननीय पंतप्रधान महोदय, आपल्यापैकी बर्‍याच जणांप्रमाणेच रोशनी आणि किरणप्रीत यांनाही त्यांच्या पालकांच्या आणि शिक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आव्हान आहे, आम्हाला तुमच्याकडून सल्ला अपेक्षित आहे. माननीय सर

पंतप्रधान: रोशनी, तू हा प्रश्न विचारल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला, काय कारण आहे? मला असे वाटते की, तुम्ही हा प्रश्न विद्यार्थ्यांसाठी विचारला नाही, हुशारीने तुम्ही तो पालक आणि शिक्षकांसाठी विचारला आहे. मला वाटते की, तुमची इच्छा आहे की, मी येथून प्रत्येकाच्या पालकांना आणि शिक्षकांना काहीतरी सांगावे जेणेकरुन ते तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. म्हणजे तुमच्यावर शिक्षकांचा दबाव आहे, तुमच्यावर पालकांचा दबाव आहे आणि मी माझ्यासाठी काहीतरी करावे की त्यांनी सांगितले आहे म्हणून मी काहीतरी करावे याबाबत तुम्ही संभ्रमात आहात. आता त्यांना समजावू शकत नाही आणि मी माझे सोडू शकत नाही, ही तुमची काळजी मला समजते आहे. सर्वप्रथम मी पालकांना आणि शिक्षकांना हे सांगू इच्छितो की, एकतर तुम्ही मनात स्वप्न घेऊन जगता किंवा स्वतःची अपूर्ण राहिलेली स्वप्ने, विद्यार्थीदशेत तुम्हाला जे करायचे होते, ते तुम्ही तुमच्या आयुष्यात करू शकला नाहीत आणि म्हणूनच रात्रंदिवस तुम्हाला असे वाटते की, मुलाला मी तसे बनवूनच दाखवेन. म्हणजेच, तुम्ही तुमचे मन, तुमची स्वप्ने, तुमच्या अपेक्षा आणि आकांक्षा तुमच्या मुलांवर  लादण्याचा प्रयत्न करता. तुमचे मूल तुमचा आदर करते, आई वडिलांच्या  बोलण्याला खूप महत्त्व देते, दुसरीकडे शिक्षक म्हणतात, हे बघ तुला हे करावे लागेल, ते  करावे  लागेल, आमच्या शाळेत असे असते, आमच्या शाळेची ही परंपरा आहे. तुमचे मन उत्साहित होते, आणि मुख्यतः आपल्या मुलांच्या विकासात हा गोंधळ आणि संभ्रम ज्याच्या प्रभावातून त्याला जावे लागते. ही त्याच्यासाठी मोठी चिंतेची बाब आहे. त्यासाठी पूर्वीच्या काळात शिक्षकांचा मुलांच्या कुटुंबाशी संपर्क असायचा. कुटुंबातील प्रत्येकाला शिक्षक ओळखत होते आणि कुटुंब आपल्या मुलांसाठी काय विचार करते हे शिक्षकांना देखील माहिती असायचे. शिक्षक काय करतात आणि ते कसे करतात याची पालकांना कल्पना होती. म्हणजे एकप्रकारे शिक्षण शाळेत सुरु असेल किंवा घरी सुरु असेल  सर्वजण एकाच व्यासपीठावर असायचे मात्र आता काय झाले आहे? मुल दिवसभरात काय करते, पालकांना वेळ नसतो, त्यांना माहीतच नसते, शिक्षकांना अभ्यासक्रमाशी देणेघेणे आहे, माझा अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झाला म्हणजे  माझे काम झाले. मी चांगले शिकवले, ते खूप मेहनतीने शिकवतात असे नाही की ते शिकवत नाही, तर त्यांना वाटते की, अभ्यासक्रम पूर्ण करणे ही माझी जबाबदारी आहे. हीच  माझी जबाबदारी आहे पण मुलाचे मन काहीतरी वेगळेच करत असते आणि म्हणून जोपर्यंत पालक किंवा शिक्षक किंवा शाळेचे वातावरण आहे तोपर्यंत आपण मुलाची ताकद आणि त्याच्या मर्यादा, त्याची आवड आणि त्याचा कल, त्याच्या अपेक्षा, त्याच्या आकांक्षा समजून घेऊ शकतो. म्हणूनच पालक असो किंवा शिक्षक किंवा शाळेचे वातावरण असो, आपण मुलाची बलस्थाने आणि मर्यादा, त्याच्या आवडीनिवडी आणि त्याची प्रवृत्ती, त्याच्या अपेक्षा, त्याच्या आकांक्षा यांचे बारकाईने निरीक्षण करत नाही, आपण त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही आणि आपण त्याला पुढे ढकलत राहिलो त्यामुळे  कुठेतरी तो अडखळतो आणि म्हणूनच मी रोशनीच्या माध्यमातून सर्व पालकांना सर्व शिक्षकांना सांगू इच्छितो की, तुमच्या मनाच्या अपेक्षेनुसार तुमच्या मुलांवरचे वाढणारे ओझे टाळण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक मुलामध्ये एक ताकद असते, प्रत्येक पालकाने हे मान्य केले पाहिजे की, तो तुमच्या तराजूमध्ये बसू शकेल किंवा नसेल, परंतु परमात्म्याने त्याला काही विशेष शक्ती देऊन पाठवले आहे. त्याच्यात काहीतरी शक्ती आहे, तुमचा दोष आहे तुम्ही त्याची शक्ती ओळखू शकत नाही हा तुमचा दोष आहे.

सूत्रसंचालक: आदरणीय पंतप्रधान महोदय, पालक आणि शिक्षकांच्या आशा-अपेक्षांमध्ये तुम्ही मुलांची आवड आणि आकांक्षा यांना नवीन बळ दिले आहे, तुमचे खूप खूप आभार. माननीय पंतप्रधान महोदय, सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध  दिल्ली शहरातील, केंद्रीय विद्यालय जनकपुरीचा 10 वीचा विद्यार्थी वैभव, त्याच्या समस्येबद्दल प्रामाणिकपणे तुमचा सल्ला घेऊ इच्छितो. वैभव कृपया तुमचा प्रश्न विचारा.

वैभव: नमस्कार पंतप्रधान, माझे नाव वैभव कनोजिया आहे. मी दहावीचा विद्यार्थी आहे. मी जनकपुरीतील केंद्रीय विद्यालयात शिकतो. सर माझा तुम्हाला एक प्रश्न आहे की, आपल्याकडे इतका अनुशेष असताना प्रेरित कसे राहायचे आणि यशस्वी कसे व्हावे?

सूत्रसंचालक: धन्यवाद वैभव, माननीय पंतप्रधान महोदय, केवळ आम्हा मुलांचीच नाही तर आमच्या पालकांनाही वाटते आहे की, की तुम्ही त्यांच्या समस्या सोडवाव्यात. ओदिशातील झारसुगुडाचे सुजित कुमार प्रधान जी पालक आहेत, त्यांना या संदर्भात तुमच्याकडून मार्गदर्शन अपेक्षित आहे, सुजित प्रधान जी, कृपया तुमचा प्रश्न विचारा.

सुजीत प्रधान: पंतप्रधान जी नमस्कार. माझे नाव सुजित कुमार प्रधान आहे. माझा प्रश्न असा आहे की, अभ्यासक्रमेतर उपक्रम करण्यासाठी मुलांना कसे प्रेरित करावे? धन्यवाद.

सूत्रसंचालक: धन्यवाद सर. आदरणीय पंतप्रधान जी, स्थापत्य आणि चित्रकलेचे लेणे असलेल्या राजस्थानमधील जयपूरमधून इयत्ता 12वी ची विद्यार्थिनी कोमल शर्मा हिला तुमच्याकडून तिच्या समस्येचे निराकरण हवे आहे. कृपया तुमचा प्रश्न विचारा.

कोमल: नमस्कार माननीय पंतप्रधान जी, महोदय मी जयपूरच्या बागरू येथील  सरकारी कन्या उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता 12 वी ची विद्यार्थिनी आहे, माझा तुम्हाला प्रश्न आहे की, माझ्या एका वर्गमित्राला पेपर चांगला गेला नाही तर मी त्याला दिलासा कशाप्रकारे देऊ ?

सूत्रसंचालक: धन्यवाद कोमल. माननीय पंतप्रधान महोदय, अरेन एपेन, कतारमधील 10 वी चा विद्यार्थी अशाच समस्येने दडपून गेला आहे, अरेन कृपया प्रश्न विचारा.

अरेन: नमस्कार सर, एमईएस  इंडियन स्कूल, दोहा, कतार येथून शुभेच्छा. माझे नाव अरेन एपेन आहे मी इयत्ता 10 वी मध्ये शिकत आहे. भारताच्या माननीय पंतप्रधानांना माझा प्रश्न आहे की - स्वतःला दिरंगाई करण्यापासून कसे थांबवायचे आणि परीक्षेची भीती आणि कमी तयारी झाल्याच्या भावनेपासून कसे दूर राहायचे?

सूत्रसंचालक: धन्यवाद अरेन. माननीय पंतप्रधान महोदय, प्रेरणेचा अभाव कशाप्रकारे हाताळायचा आणि शैक्षणिक बांधिलकी कशी टिकवायची यावर वैभव, प्रधान जी, कोमल आणि अरेन हे तुमच्या कडून जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. तसेच, संपूर्ण भारतातील इतर अनेक विद्यार्थ्यांना हे जाणून घ्यायचे आहे की, ते चांगल्या प्रकारे एकात्मिक व्यक्ती होण्यासाठी अभ्यासेतर अभ्यासक्रमात सहभाग कसा घ्यावा. कृपया आपणा सर्वांना मार्गदर्शन करावे सर.

पंतप्रधान: कोणीतरी असा विचार करतो की प्रेरणेचे एखादे इंजेक्शन मिळते आणि ते इंजेक्शन मिळाले की प्रेरणेची खात्री मिळते, कुणाला तरी वाटते की,   हा उपाय मिळाला तर कधीच प्रेरणेसंदर्भात अडचण येणार नाही, तर ती खूप मोठी चूक होईल, हे मी समजतो. मात्र सगळ्यात आधी स्वतःचे निरीक्षण करा, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्ही पूर्णपणे प्रेरणा गमावून बसत आहात, तुम्हाला समजेल तुम्ही दिवसभर पाहा, आठवडाभर पाहा, महिनाभर पाहा की जेंव्हा हे घडते तेंव्हा मला असे वाटते की मी काहीही करू शकत नाही हे माझ्यासाठी कठीण आहे मात्र स्वतःला जाणून घेणे आणि त्यात कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे मी निराश होतो, मला त्या निराश करतात हे जाणून घ्यावे. एकदा का तुम्हाला ते कळाले  की  त्या  नंबर बॉक्समध्ये टाका.  ठीक आहे, की मग ती गोष्ट कोणती आहे जी तुम्हाला सहज प्रेरित करते. तुम्ही  नैसर्गिकरित्या प्रेरित करणाऱ्या गोष्टी ओळखा. समजा तुम्ही एखादे खूप चांगले गाणे ऐकले असेल, फक्त त्याचे संगीतच नाही, त्याच्या शब्दांमध्येही काही गोष्टी आहेत, की तुम्हाला असे वाटते की हो यावर विचार करण्याची पद्धतही अशी असू शकते? त्यामुळे तुमच्या लक्षात आले असेल की, तुम्ही अचानक नव्याने विचार करायला सुरुवात करता हे कोणी तुम्हाला सांगितलेले नाही पण तुम्ही स्वतःला तयार केले होते की, ती कोणती गोष्ट आहे जी मला प्रेरित करते, जर तुम्ही ती ओळखली तर तुमच्या मनाला असे वाटेल की हो, ही माझ्यासाठी खूप उपयुक्त गोष्ट आहे, म्हणूनच मला वाटते की, तुम्ही स्वतःबद्दल विश्लेषण करत राहायला हवे. त्यात दुसर्‍याला मदत करण्याच्या फंदात पडू नका. हे पुन्हा पुन्हा कोणाला जाऊन सांगू नका की, यार, माझा मूड नाही, मला मजा येत नाही, मग अशी एक कमजोरी तुमच्यात निर्माण होईल. आणि प्रत्येक वेळी तुम्हाला सहानुभूती हवी असेल. मग तुम्हाला वाटेल की आई वडिलांनी माझ्या बाजूला बसावे त्यांनी मला लाडीगोडी लावावी, प्रोत्साहित करावे, माझे लाड करावे तेंव्हा एक कमजोरी तुमच्यात हळूहळू विकसित होईल. काही क्षण तर चांगले जातील. मात्र सहानुभूती मिळविण्यासाठी त्या गोष्टींचा कधीही वापर करू नका. कधीही करू नका. होय, आयुष्यात संकटे आली, समस्या आल्या, निराशा आली तर मी स्वतः त्याला सामोरे जाईन, मी त्याविरोधात जिद्दीने लढा देईन आणि माझी निराशा, माझी उदासीनता, मीच संपवून टाकीन, मी तिला थडग्यात पुरेन. हा विश्वास निर्माण झाला पाहिजे. दुसरे म्हणजे, आपण ज्या गोष्टींचे निरीक्षण करतो. कधीकधी काही गोष्टींचे निरीक्षण केल्याने आपल्याला खूप प्रेरणा मिळते. आता समजा तुमच्या घरात एक 3 वर्षाचा मुलगा आहे, 2 वर्षाचा मुलगा आहे, त्याला काहीतरी घ्यायचे आहे पण ते त्याच्यासाठी खूप अवघड आहे, तुम्ही दुरूनच पहात राहा.. तो पडेल, पोहोचू शकणार नाही, थकेल थोड्या वेळाने तो पुन्हा येईल, पुन्हा प्रयत्न करेल याचा अर्थ तो तुम्हाला शिकवत आहे की, ठीक आहे माझ्यासाठी हे अवघड आहे पण मी माझे प्रयत्न सोडणार नाही, ही प्रेरणा कोणीही कोणत्या शाळेत शिकवली आहे का? त्या दोन वर्षांच्या मुलांना कोणी पंतप्रधान सांगायला गेले होते का? कोणत्या पंतप्रधानांनी त्यांना समजावले का? अरे बेटा, उभा राहा, धावत जा, असे कुणी म्हटले का, नाही? देवाने आपल्या सगळ्यांना एक उपजत गुण दिला आहे, जो आपल्यासाठी काहीतरी करण्यासाठी एक प्रेरक शक्ती बनतो. अगदी लहान मुलामध्येही हे असते, या गोष्टी आपण कधीतरी पाहिल्या आहेत. तुम्ही पाहिले असेल की एक दिव्यांग व्यक्ती आपली काही कामे करतो, त्याने स्वतःचा मार्ग शोधला आहे, तो ती कामे खूप चांगल्या प्रकारे करतो. पण मी ते बारकाईने निरीक्षण केले आहे की, हे बघ भाऊ, देवाने शरीरात कितीतरी उणीवा दिल्या, पण त्याने हार मानली नाही, स्वतःच्या उणिवांना ताकद दिली. ती शक्ती स्वतःकडे धावून येते, ती शक्ती पाहणाऱ्याला आणि निरीक्षण करणाऱ्यालाही प्रेरणा देत असेल तर आपण प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या आजूबाजूच्या गोष्टींचे आपण त्या पद्धतीने निरीक्षण करायला हवे. त्याच्या कमकुवतपणाचे निरीक्षण करू नका, त्याने त्याच्या उणिवांवर मात कशी केली, त्या उणीवांवर तो कसा मात करतो, या प्रक्रियेकडे बारकाईने लक्ष द्या. मग तुम्ही स्वतःला त्याच्याशी जोडाल, जर मी असा असतो तर कदाचित मी सुद्धा हे करू शकलो असतो. देवाने तर मला हात-पाय दिले आहेत सर्व काही खूप चांगले दिले आहे. माझ्यात काही कमी नाही, तरी मी गप्प का बसलो आहे. तुम्ही स्वतः धावायला सुरुवात कराल आणि म्हणूनच मला वाटते की, दुसरा एक विषय आहे, तुम्ही कधी स्वतःची परीक्षा घेता का? तुम्ही तुमची परीक्षा स्वतः घ्या, तुमची परीक्षा कोणी का घ्यावी? जसे मी माझ्या एक्झाम वॉरियर्स या पुस्तकात एके ठिकाणी लिहिले आहे की, तुम्ही परीक्षेलाच पत्र लिहा, हे  प्रिय परीक्षा आणि तिला लिहा तुला काय वाटते, मी ही तयारी केली आहे, ही मी तयारी केली आहे, मी खूप मेहनत केली आहे, मी खूप प्रयत्न केले आहेत, मी हे वाचले आहे, मी खूप वह्या भरल्या आहेत, मी इतके तास शिक्षकांसोबत बसलो आहे, मी माझ्या आईसोबत इतका वेळ घालवला आहे, मी माझ्या शेजारच्या विद्यार्थ्यासोबत  चांगले काम केले आहे, तर मी  म्हणेन, अरे, मी इतके  शिकून आलो आहे  की तू कोण आहेस माझ्याशी स्पर्धा करणारा, माझी परीक्षा घेणारा तू कोण, मी तुझी परीक्षा घेत आहे. मी पाहतोच की तू मला खाली पाडून दाखव, मी तुला खाली पाडून दाखवीन. कधीतरी हे करा. कधी कधी तुम्हाला वाटते भाऊ मी जो विचार करतो तो चूक आहे की बरोबर आहे. तुम्ही हे करा, पुन्हा मैदानात उतरण्याची सवय लावा. पुन्हा मैदानात उतरण्याची सवय लावली तर नवी दृष्टी मिळेल. जणू काही शिकून तुम्ही वर्गात आला आहेत तुमचे तीन-चार मित्र आहात, बसा आणि आज तुमच्या तीन मित्रांना शिक्षक बनून तुम्ही जे शिकलात ते शिकवा. मग दुसरा मित्र आणखी तीन मित्रांना शिकवेल तसेच तिसरा मित्र आणखी तिघांना शिकवेल मग चौथा मित्र....म्हणजे एकप्रकारे ज्याला जेवढे मिळाले आहे तितके तो पुढे देईल. प्रत्येकाच्या लक्षात येईल, त्याने हा मुद्दा पकडला होता, माझ्याकडून हा मुद्दा सुटला होता, त्याने हा सुद्धा मुद्दा पकडला होता, तो माझ्याकडून सुटला होता, जेंव्हा चारही लोक ती गोष्ट पुन्हा  बोलतील आणि स्वतः पुन्हा करतील, तिथे कोणतेही पुस्तक नाही, काहीही नाही, ते ऐकलेले आहे. पण आता बघा ते तुमचे स्वतःचे होईल. काही गोष्टी तुम्ही पाहिल्याच असतील, कुठे ना कुठे हे घडत असते. टीव्हीवाले बूम घेऊन उभे राहतात तेंव्हा मोठमोठे राजकीय नेते सुद्धा उत्तर देताना गडबडतात हे तुम्ही पाहिले असेलच. काही लोकांना मागून सांगावे लागते, हे तुम्ही पाहिलेच असेल. पण एका गावातील एक बाई आहे आणि कुठेतरी अपघात झाला आहे आणि कुणीतरी टीव्हीचा माणूस तिथे पोहोचला त्या बिचारीला टीव्ही म्हणजे काय हेही माहीत नाही आणि तिला याबद्दल विचारले असता तुम्ही बघा, संपूर्ण घटना ती अतिशय आत्मविश्वासाने सांगते. हे कसे घडले, मग ते घडले, असे झाले, तसे झाले म्हणजे सगळ्या गोष्टी तिने योग्य रीतीने सांगितल्या. का, कारण जे ज्याने ते अनुभवले आहे ते तो आत्मसात करतो आणि त्यामुळेच आपण ते अगदी सहज पुन्हा मांडू शकतो. आणि म्हणूनच माझा विश्वास आहे की, जर तुम्ही खुल्या मनाने या गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवून ठेवले तर निराशा कधीच तुमचा दरवाजा ठोठवू शकत नाही.

सूत्रसंचालक: माननीय पंतप्रधान महोदय, आम्हाला विचार करण्याचा, निरीक्षणाचा आणि विश्वासाचा मंत्र दिल्याबद्दल धन्यवाद. शिखर कितीही उंच असले तरी आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की आम्ही कधीही हार मानणार नाही. 

माननीय पंतप्रधान, आपल्या कला, संस्कृती आणि परंपरांसाठी प्रसिद्ध, खम्मन तेलंगणातील इयत्ता 12 वी च्या विद्यार्थिनी, यादव अनुषा, यांना आपल्या प्रश्नाचे आपल्याकडून उत्तर हवे आहे. अनुषा, कृपया तुमचा प्रश्न विचारा.

अनुषा: नमस्कार माननीय पंतप्रधान. माझे नाव अनुषा आहे. मी शासकीय कनिष्ठ महाविद्यालयात बारावीत शिकत आहे. मी खम्मन तेलंगणाची आहे.  सर, माझा प्रश्न असा आहे की जेंव्हा शिक्षक शिकवतात तेंव्हा आम्हाला सर्वकाही समजते. पण काही काळानंतर किंवा काही दिवसांनी आम्ही ते विसरतो.  कृपया याबद्दल मला मदत करा. धन्यवाद सर.

सूत्रसंचालक: धन्यवाद अनुषा.  मान्‍यवर, आम्हाला नमो अॅपद्वारे आणखी एक प्रश्न प्राप्‍त झाला आहे. यात प्रश्नकर्ता गायत्री सक्सेना यांना जाणून घ्यायचे आहे, परीक्षा देताना अनेकदा त्यांच्यासोबत असे घडते की, ज्या विषयांचा अभ्यास केला आणि लक्षात ठेवलेले असते तेही परीक्षा केंद्रात विसरायला होते. मात्र परीक्षेच्या आधी किंवा परीक्षेनंतर मित्रांशी बोलताना ती उत्तरे आठवत असतात. अशी परिस्थिती बदलण्यासाठी काय केले पाहिजे? मान्यवर, अनुषा आणि गायत्री सक्सेना यांनी विचारलेल्या प्रश्नांसारखे प्रश्न अनेकांच्या मनात आहेत.  त्यांचा संबंध स्मरणशक्तीशी आहे.  कृपया या दिशेने मार्गदर्शन करुन, कृतार्थ करावे माननीय पंतप्रधानजी.

पंतप्रधान: कदाचित हा विषय कधी ना कधी प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात समस्या म्हणून उभा राहतोच. मला आठवत नाही, हे मी विसरलो, असे प्रत्येकाला वाटते. पण तसं पाहिलं तर परीक्षांच्या वेळी अचानक अशा गोष्टी तुमच्यातून बाहेर पडायला लागतील की तुम्ही, परीक्षेनंतर तुमच्या मनात येईल की अरे, गेल्या आठवड्यात या विषयाला मी कधी हात लावला नव्हता, अचानक प्रश्न आला. पण उत्तर मी खूप चांगले लिहिले, म्हणजे कुठेतरी ते स्मरणात नोंदले होते.  तुमच्या ते लक्षातही आलं नाही, आत कुठेतरी त्याची नोंद होती.  आणि ती नोंद का होती? कारण ते भरत असताना दरवाजे उघडे होते, कपाट उघडे होते, म्हणून ते आत गेले. कपाट बंद केले तर कितीही भरायचा प्रयत्न केला तरी काही जाणार नाही. आणि म्हणूनच, कधी कधी ध्यान हा शब्द असा आहे की लोक त्याला योग, ध्यान, हिमालय, ऋषी, तिथल्या लोकांशी जोडू जातात. माझे अगदी साधे मत आहे, ध्यानधारणेचा अर्थ काय. तुम्ही इथे आहात पण आता तुम्हाला वाटत असेल की आई घरी टीव्ही बघत असेल, मी कोणत्या कोपऱ्यात बसलोय ते शोधत असणार. म्हणजे तुम्ही इथे नाहीत, तुम्ही घरी आहात. आई टीव्ही बघत असेल, बघत नसेल, असे मनात सुरु आहे. मी इथे बसलेले त्यांना दिसत असेल की नाही. तुमचे ध्यान इकडे असायला हवे होते पण तुमचे ध्यान तिकडे आहे, याचा अर्थ तुम्ही अध्यान आहात. जर तुम्ही इथे असाल तर तुम्ही ध्यानात आहात. जर तुम्ही तिथे असाल तर तुम्ही अध्यान आहात.  आणि म्हणून जीवनात ध्यानाचा इतक्या सहजतेने स्वीकार करा, तुम्ही ते सहज स्वीकारा. हे खूप मोठं शास्त्र आहे आणि कुणीतरी खूप मोठं नाक धरून हिमालयात बसावं, असं नाही. खूप सोपे आहे. तुम्ही तो क्षण जगण्याचा प्रयत्न करा.  तो क्षण तुम्ही पूर्ण जगलात तर ती तुमची शक्ती बनते.

तुम्ही बरेच लोक पाहिले असतील, ते सकाळी चहा पीत असतील, वर्तमानपत्र वाचत असतील, घरातील लोक म्हणतात अरे पाणी गरम आहे, चला लवकर आंघोळीला जा.  मला नाही, मला वर्तमानपत्र वाचायचे आहे.  मग ते म्हणतील नाश्ता गरम आहे, थंड होईल, तरीही ते म्हणतील नाही, मला वर्तमानपत्र वाचायचे आहे. म्हणूनच मला अशा संकटात सापडलेल्या मातांना सांगायचे, त्यांनी फक्त वर्तमानपत्रात काय वाचले ते संध्याकाळी विचारावे. मी सांगतो,  99% लोक आजच्या वर्तमानपत्राचा मथळा काय होता हे ते सांगू शकणार नाहीत.  का तर, तो ना जागृत आहे ना तो तो क्षण जगत आहे. तो सवयीने पानं उलटतोय, डोळे पाहताहेत, नुसतेच वाचले जात आहे, काहीही नोंद होत नाहीये.  जर नोंद होत नसेल तर ते "मेमरी चिपर" मध्ये जात नाही. त्यामुळे आता तुमच्यासाठी पहिली गरज ही आहे की, तुम्ही जे काही कराल ते त्या वर्तमानासाठी….आणि मला अजूनही विश्वास आहे की परमात्‍म्याच्या या सृष्टीला सर्वात मोठी देणगी कोणती आहे, असे जर कोणी मला विचारले तर मी म्हणेन की ती देणगी आहे वर्तमान.  जो हा वर्तमान जाणून घेतो, जो हा वर्तमान जगतो, जो हा वर्तमान आत्मसात करतो, त्याच्यासाठी, भविष्याकरिता प्रश्नचिन्ह कधीच उद्भवत नाही.  मेमरी अर्थात स्मरणाबाबतचे कारणही तेच आहे, तो क्षण आपण जगत नाही. आणि त्यामुळे आपण तो गमावतो.

दुसरे म्हणजे, स्मृती जीवनाशी संबंधित आहे. जर तुम्हाला असे वाटत असेल की ते केवळ परीक्षे संबंधित आहे, तर तुम्हाला त्याची किंमत कळत नाही, त्याचे मूल्य समजत नाही. समजा तुम्हाला तुमच्या मित्राचा वाढदिवस आठवत असेल आणि तुम्ही त्याला त्याच्या वाढदिवसाला फोन केला असेल.  तुमची ती आठवण होती जिच्यामुळे तुम्हाला वाढदिवस लक्षात राहिला. पण ते लक्षात राहणेच तुमच्या आयुष्याच्या विस्ताराचे कारण बनते जेंव्हा त्या मित्राला तुमचा फोन जातो, अरे व्वा! त्याला माझा वाढदिवस इतका लक्षात होता. म्हणजे त्याच्या जीवनात माझे महत्त्वाचे स्थान आहे. तुम्ही आयुष्यभर त्यांचे होऊन जाता, कारण काय होतं, ती आठवण. स्मृती जीवन विस्ताराचे प्रमुख उत्प्रेरक घटक आहे आणि म्हणून आपण आपली स्मरणशक्ती केवळ परीक्षा, प्रश्न आणि उत्तरांपुरती मर्यादित ठेवू नये. तुम्ही त्याचा विस्तार करत जा. तुम्ही जितके विस्ताराल तितक्या गोष्टी आपोआप जोडल्या जातील.

आणखी म्हणजे, कधी तुम्ही दोन भांडी घ्या. दोन भांड्यांमध्ये पाणी भरा.  पाण्याने भरुन दोन्हीमध्ये एक नाणे ठेवा. पाणी शुद्ध आहे, स्वच्छ आहे, दोन्हीकडे सारखेच पाणी आहे, दोन्ही भांडी सारखीच आहेत, दोन्हीमध्ये एकच नाणे आहे आणि तुम्ही ते पहा. पण एक भांडे हलते आहे, पाणी इकडे तिकडे हिंदकळत आहे, तळाशी एक नाणे आहे, दुसरे स्थिर आहे. तुम्हाला दिसेल की स्थिर पाणी असलेले नाणे तुम्हाला परिपूर्ण दिसत आहे, कदाचित त्यावर लिहिलेलेही दिसू शकेल आणि हिंदकळणाऱ्या पाण्यात तेच नाणे आहे, त्याच आकाराचे आहे, तितकेच खोल आहे परंतु दिसत नाही, का? पाणी हिंदकळत आहे. भांडे अस्थिर आहे. जर मनही असेच डोलत राहिले आणि आपल्याला वाटते की त्यातले नाणे आपल्याला दिसावे आहे.. तुम्ही पाहिले असेलच की परीक्षेत तुमची अडचण ही आहे की पाहा, ही व्यक्ती वर पाहतही नाही, लिहितच राहतेय, आता मी मागे राहीन… म्हणजे मन त्यातच अडकून राहते. तुमचं मन इतकं धडपडत असतं की आत एक स्मरणरुपी असलेलं नाणं तुम्हाला दिसत नाही. एकदा मन स्थिर करा. मन स्थिर होण्यास अडचण येत असेल तर दीर्घ श्वास घ्या, तीन ते चार वेळा दीर्घ श्वास घ्या. अगदी छाती भरून, डोळे बंद करून काही क्षण बसा, मन स्थिर होताच जसे नाणे दिसू लागते, स्मरणातली प्रत्येक गोष्ट समोर यायला लागते. आणि म्हणूनच ज्याची स्मरणशक्ती जास्त आहे त्याला देवाने काही अतिरिक्त ऊर्जा दिली आहे, असे नाही.  आपण सर्व, जे आपली अंतर्गत उत्पादने आहेत, देवाने ते नियतीने निर्माण केलेले आहेत.  आपण काय कमी करतो आणि काय वाढवतो यावर ते अवलंबून आहे. त्यामुळे तुम्ही हे अगदी सहज करू शकता.

तुमच्यापैकी काहींना जुने शास्त्र माहित असतील. काही वेळा काही गोष्टी युट्यूबवर देखील उपलब्ध असतात. काही शतावधानी लोक असतात, त्यांना एकाच वेळी शंभर गोष्टी आठवतात. आपल्या देशात कधीकाळी या गोष्टींचे मोठे प्रचलन होते. तर आपण ते प्रशिक्षणाने साध्य करू शकतो, आपण आपल्या मनालाही प्रशिक्षित करू शकतो. पण, आज तुम्ही परीक्षेसाठी जात असल्याने मी तुम्हाला त्या दिशेने नेणार नाही, पण मी सांगतो की मन स्थिर ठेवा. तुमच्या स्मरणात बरेच काही साठलेले आहे, ते स्वतःहून बाहेर यायला लागेल, तुम्हाला ते दिसू लागेल, तुम्हाला ते आठवायला लागेल आणि तीच एक मोठी शक्ती बनेल.

सूत्रसंचालक: माननीय पंतप्रधानजी, तुम्ही ज्या प्रेमळ साधेपणाने आम्हाला ध्यान करण्याची पद्धत शिकवली, त्यामुळे माझ्यासारख्या सर्वांचे मन नक्कीच कृतार्थ झाले आहे.  धन्यवाद महोदय.  माननीय पंतप्रधान, खनिज संपत्तीने समृद्ध राज्य, एक सुंदर पर्यटन स्थळ, रारामगड, झारखंडमधील दहावीची विद्यार्थिनी, श्वेता कुमारी, आपल्या प्रश्नाचे आपल्याकडून उत्तर हवे आहे. श्वेता, कृपया तुमचा प्रश्न विचारा.

श्वेता: नमस्कार, माननीय पंतप्रधानजी. मी श्वेता कुमारी केंद्रीय विद्यालय पटराटूची 10वी ची विद्यार्थिनी आहे. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. माझा अभ्यास रात्री चांगला होतो (माझ्या अभ्यासात उत्पादनक्षमता रात्री जास्त असते) पण प्रत्येकजण मला दिवसा अभ्यास करायला सांगतो. मी काय करू?  धन्यवाद.

सूत्रसंचालक: धन्यवाद श्वेता.  आदरणीय पंतप्रधानजी, नमो अॅपद्वारे प्राप्त झालेल्या प्रश्नात राघव जोशी यांच्यापुढे विचित्र संभ्रम आहे. पालक नेहमी म्हणतात, आधी अभ्यास मग खेळ.  पण त्यांना वाटतं की खेळून अभ्यास केला तरच अभ्यास चांगल्या पद्धतीने होतो. कृपया राघव आणि श्वेता तसेच यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी काय करावे ते समजावून सांगा जेणेकरून त्यांची उत्पादकता उत्तम राहील. कृपया आपल्या सर्वांचा संभ्रम दूर करावा, माननीय पंतप्रधानजी.

पंतप्रधान: प्रत्येकाला आपल्या वेळेचा सदुपयोग व्हावा असे वाटते हे खरे आहे.  ज्या कामासाठी त्यांनी आपला वेळ दिला आहे, त्याचा फायदा त्यांना मिळायला हवा, हा चांगला विचार आहे.  हाही विचार जाणीवपूर्वक करणे आवश्यक आहे की मी जो वेळ देत आहे, जो वेळ व्यतित करत आहे, त्याचे फळ मला मिळते की नाही हे आपण प्रयत्न केले पाहिजे. इच्छित परिणाम तर मिळतील, आऊटकम दिसणार नाही. त्यामुळे सर्वात आधी स्वत:ला एक सवय लावली पाहिजे की, मी जितकी गुंतवणूक केली आहे तितके मला मिळाले की नाही.  आता आपण याचा हिशोब करू शकतो आणि ही सवय लावायला हवी की आज मी गणिताच्या मागे एक तास मेहनत केली आहे. त्या एका तासात मला जे करायचे होते ते मी करू शकलो की करू शकलो नाही. त्यात मला जे प्रश्न अवघड वाटायचे, ते आता मला सोपे झाले आहेत की नाही. म्हणजे माझा आऊटकम सुधारत आहे. ही विश्लेषण करण्याची सवय लावली पाहिजे. खूप कमी लोकांना विश्लेषणाची सवय असते. ते एकामागून एक पूर्ण करत राहतात, ते करत राहतात, ते करतच राहतात आणि नंतर, नंतर, लक्षातच येत नाही की याकडे थोडे जास्त लक्ष देण्याची गरज होती, त्याला जास्त लक्ष देण्याची गरज नव्हती.  कधी कधी काय होते आपल्या वेळापत्रकात, जे सर्वात सोपे असते, जे सर्वात प्रिय असते, आपण फिरुन पुन्हा तिथेच येतो. मनाला वाटतं की हे करूया, का, आनंद होतो. आता त्यामुळे जे कमी आवडते, जरा अवघड आहे, ते टाळण्याचा प्रयत्न करता.  

तुम्‍ही पाहिले असेलच की, आपले शरीर असते ना, ती बॉडी (शरीर)... हा शब्द चांगला नाही, पण सोपे जावे म्हणून वापरतोय. कधीकधी मला असे वाटते की माझे शरीर फसवणूक करणारे आहे. तुम्ही ठरवा मला असे बसायचे आहे. हे असे कसे होतं, हे तुम्हाला कळणारही नाही. म्हणजे तुमचे शरीर तुमची फसवणूक करत आहे. तुम्ही मनाशी ठरवले आहे की मला असेच बसायचे आहे, पण थोड्याच वेळात तुम्ही ढिले पडता, म्हणजे तुमचे शरीर मूळ स्वभावानुसार  वागायला लागते. मग तुम्ही जागृत होऊन असे कराल आणि तुम्ही पुन्हा नीट व्हाल.  तात्पर्य, हे शरीर जसे फसवणूक करणारे आहे, त्याचप्रमाणे मन देखील कधीकधी फसवणूक करते. आणि म्हणून आपण ही फसवणूक टाळली पाहिजे.  आपले मन फसवे होऊ नये. मनाला आवडेल त्याच गोष्टीत आपण करु जातो हे कसे होते? आपल्याला जे आवश्यक आहे… महात्मा गांधी श्रेयस्‍कर आणि प्रिय याबद्दल सांगत असत. जे श्रेयस्कर आहे आणि जे प्रिय आहे. व्यक्ती श्रेयस्कर ऐवजी  प्रियकडे जाते. जे श्रेयस्कर आहे त्याला चिकटून राहायला हवे, ते खूप आवश्यक आहे आणि मन फसवणूक करत असेल, ते तिथे घेऊन जात असेल तर त्याला खेचून घेऊन या. त्यामुळे तुमची उत्पादकता, तुमचा आऊटकम वाढेल, आणि त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

दुसरे म्हणजे, असा विचार करणे की मी रात्री अभ्यास करेन, तर अधिक चांगला होईल. कोणी म्हणतात, मी सकाळी अभ्यास करेन तर चांगला होईल. कोणाला वाटतं, मी जेवून अभ्यास केला, तर चांगला होतो, तर कोणाला वाटतं, उपाशी राहून अभ्यास करावा. हा प्रत्येकाचा आपापला स्वभाव, शारीरिक सवयी असतात. आपणच स्वतःचे निरीक्षण करा, की कोणत्या गोष्टीत आपल्याला अधिक चांगलं वाटतं, आरामदायी वाटतं. खरं सांगायचं तर, आपण मोकळे, स्वस्थ असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला तिथे बसून जर आरामदायी वाटत नसेल तर ते आपण कदाचित करु शकणार नाही. आता काही लोक असे असतात, ज्यांना एकाच वातावरणात, एकाच ठिकाणी झोप येते. मला आठवते, खूप वर्षांपूर्वी मी एक चित्रपट बघितला होता. त्यात एक दृश्य होते. एक व्यक्ति झोपडपट्टी जवळ आपले सगळे आयुष्य घालवते. आणि नंतर अचानक ती व्यक्ति, कुठल्या तरी चांगल्या जागी राहायला जाते. त्याचे नशीब पालटते, मात्र त्याला झोप येत नाही. आता, सगळी सुखं असतांना आपल्याला झोप का येत नाही, म्हणून तो आपला विचार करत बसतो. मग त्याला एक सुचतं. तो रेल्वे स्टेशनवर जातो आणि रेल्वेगाडीचा जो आवाज येतो ना, खटाखट, तो रेकॉर्ड करतो, आणि घरी येऊन टेप रेकॉर्डरवर तो आवाज ऐकतो, आणि झोपतो, तेव्हा त्याला झोप लागते. म्हणजे त्याच्या सवयीमुळे त्याला तो आवाज आरामदायी वाटतो. जोपर्यंत तो गाडीचा आवाज ऐकत नाही, त्याला झोप लागत नाही. आता प्रत्येकासाठी तर असे नसेल ना, की गाडीचा आवाज ऐकला तरच तुम्हाला झोप येते. प्रत्येकासाठी हे आवश्यक नाही. मात्र, त्याला त्यात आराम मिळतो.ही प्रत्येकाची सवय असते.

मला असं वाटतं की आपल्यालाही हे माहिती असायला हवं, की आपण कुठे आणि कसे स्वस्थपणे अभ्यास करु शकतो. त्याचे दडपण अजिबात घेऊ नका. जी गोष्ट करण्यात आपल्याला आनंद मिळतो. त्यासाठी आपल्याला स्वतःला कमीतकमी तडजोड करावी लागते. तो मार्ग सोडण्याची गरज नाही, मात्र जेव्हा आपण स्वस्थ, आरामदायी अवस्थेत असतो, तेव्हा आपले काम असते, आपला अभ्यास करणे. आपले काम असते- जास्तीत जास्त उत्तम परिणाम साध्य करणे. त्या आपल्या साध्यापासून जराही विचलित न होणे. आणि मी पहिले आहे. लोक कसे काम करतात. कधी कधी आपल्याला ऐकायला बरे वाटते, की अमुक व्यक्ति 12 तास काम करते, 14 तास काम करते, 18 तास काम करते. हे सगळे ऐकायला चांगले वाटते. मात्र, खरोखर दिवसातले 18 तास काम करणे काय असते, याचा सर्वात मोठा धडा मी प्रत्यक्ष माझ्या आयुष्यात पाहिला आहे. जेव्हा मी गुजरातला होतो, तेव्हा केका शास्त्री जी नावाचे एक खूप मोठे विद्वान होते. ते स्वतः तर फक्त पाचव्या-सातव्या वर्गापर्यंतच शिकले होते. पण त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले होते, डझनभर ग्रंथ लिहिले होते. त्यांना पद्मपुरस्काराने देखील गौरवण्यात आले होते. ते 103 वर्षे जगले. आणि जेव्हा मी तिथे होतो, तेव्हा सरकारतर्फे त्यांच्या शताब्दी कार्यक्रमाची व्यवस्था मी पहिली होती.माझा त्यांच्याशी अतिशय जवळचा संबंध होता. त्यांना माझ्याविषयी फार ममत्व होते. ही खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, तेव्हा मी मुख्यमंत्री देखील नव्हतो. तर आम्ही एकदा असा कार्यक्रम ठरवला होता, की त्यांना घेऊन. राजस्थानच्या तीर्थक्षेत्रांचे दर्शन करण्यासाठी मी त्यांना घेऊन जाईन. तर मी त्यांना घेऊन जात होतो. आम्ही सगळे एका गाडीत बसलो होतो. मी बघितले की त्यांचे सामान अगदीच कमी होते. मात्र, जेवढे केवढे होते. त्यात अभ्यास-लिखाणाचेच सामान अधिक होते. कुठे रेल्वेचे फाटक येत असे, तर रस्ता बंद होत असे. जोपर्यंत गाडी जात नाही, तोपर्यंत दार उघडत नसे, आपण पुढे जाऊ शकत नाही. आता असे रेल्वे फटाकापाशी थांबलो, तर आपण काय करतो? आपण खाली उतरून थोडी चक्कर मारतो, किंवा कोणी दाणे-चणे विकत असेल, तर आपण ते घेऊन खातो. आपण आपला वेळ घालवत असतो. पण मी बघायचो, जशी गाडी उभी राहायची, तेव्हा ते त्यांच्या पिशवीतून कागद काढत असे, आणि लगेच लिहायला सुरुवात करत. त्यावेळी त्यांचे वय कदाचित 80 असावं असं मला वाटतं. म्हणजे वेळेचा सदुपयोग कसा करावा, इच्छित परिणाम संपूर्णपणे कसा साध्य करावा,याकडे मी अगदी बारकाईने लक्ष देत होतो. आणि तीर्थयात्रेच्या वेळी  आरामात राहणे, फिरणे, आजूबाजूला बघणे, हे सगळे बाजूला ठेवून आपले काम करत राहणे, कोणत्याही परिस्थितीत आपले काम करत राहणे, हे अत्यंत आवश्यक आहे, असं मला वाटतं. त्यातून आयुष्यात बरंच काही मिळू शकतं.

सूत्रसंचालक: माननीय सर, आम्हाला आत्मपरीक्षणचे महत्त्व समजावून सांगितल्याबद्दल आणि काहीही उत्तम साध्य करायचं असल्यास, आपण आनंदाने शिक्षण घ्यावं याची जाणीव करुन दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ! माननीय पंतप्रधान महोदय, जम्मू-कश्मीरच्या वनसंपदेने नटलेल्या हिरव्यागार उधमपूर इथली 9 व्या वर्गात शिकणारी एरिका जॉर्ज हिला, तुमच्याकडून मार्गदर्शन हवे आहे. एरिका, कृपया तुझा प्रश्न विचार..

एरिका जॉर्ज: माननीय पंतप्रधान महोदय, मी एरिका जॉर्ज, जम्मू कश्मीरच्या उधमपूर इथल्या एपीएस शाळेत शिकते. मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे, की आज काल भारतासारख्या देशात सगळीकडे, विशेषतः शिक्षणक्षेत्रात स्पर्धा खूपच वाढली आहे. असं असतांना, असे अनेक लोक आहेत, ज्यांच्यात खरोखर गुणवत्ता आहे, ज्यांना उत्तम ज्ञान आहे. मात्र काही ना काही कारणाने, ते परीक्षेला बसू शकत नाहीत.

कदाचित त्यांना योग्य वेळी, योग्य मार्ग निवडता आला नाही, किंवा त्यांना कोणी योग्य सल्ला देणारं नसेल.मग सर, असं असेल तर अशा लोकांसाठी आपण काय करु शकतो, जेणेकरुन या लोकांकडे असलेली गुणवत्ता वाया जाणार नाही, उलट तिचा सदुपयोग करता येईल. धन्यवाद सर.

सूत्रसंचालक: धन्यवाद एरिका. माननीय पंतप्रधान महोदय, हरिओम मिश्रा, हा उद्योगनगरी गौतम बुद्ध नगर इथे 12 वीत शिकणारा विद्यार्थी आहे. त्याला झी-टीव्ही ने आयोजित केलेल्या एका स्पर्धेच्या माध्यमातून, अशाच आशयाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे.  हरिओम, कृपया आपला प्रश्न विचार.. 

हरिओम: नमस्कार ! माझं नाव हरिओम मिश्रा  आणि मी कॅम्ब्रिक स्कूल नोएडा इथे 12व्या वर्गात शिकतो. आज मी पंतप्रधानांना प्रश्न विचारू इच्छितो की ज्याप्रमाणे या वर्षी कॉलेजच्या प्रवेश प्रक्रियेत अनेक बदल करण्यात आले आहेत आणि या वर्षी बोर्ड परीक्षेच्या पद्धतीत देखील अनेक बदल करण्यात आले आहेत. तर हे सगळे बदल होत असताना, आम्हा विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेवर लक्ष द्यावं की कॉलेजच्या प्रवेश प्रक्रियेवर लक्ष द्यावं. आम्ही कुठल्या गोष्टीवर, आपली तयारी कशा प्रकारे करावी?

सूत्रसंचालक: धन्यवाद हरिओम!  माननीय पंतप्रधान साहेब, एरिका आणि हरिओम प्रमाणेच, देशाच्या विविध भागातील अनेक विद्यार्थ्यांनी अशाच शंका आणि चिंता व्यक्त केल्या आहेत अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे की स्पर्धा परीक्षांवर, बोर्ड परीक्षांवर की कॉलेज प्रवेशावर. आपण सगळ्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं, माननीय पंतप्रधान साहेब.

पंतप्रधान: हे दोन वेगवेगळे प्रश्न आहेत. एक विषय आहे स्पर्धा आणि दुसरा विषय आहे ही परीक्षा द्यावी की ती परीक्षा द्यावी. आणि दोन्ही परीक्षा एकदमच आल्या तर काय करायचं. मला असं वाटत नाही तुम्ही परीक्षेचा अभ्यास करायला हवा. इथेच सगळी गफलत होते. मी या परीक्षेसाठी अभ्यास करीन, मग मी त्या परीक्षेचा अभ्यास करीन, याचा अर्थ असा झाला की तुम्ही अभ्यास करत नाही आहात, तर तुमचं काम सोपं करणारी युक्ती शोधत आहात, आणि कदाचित यामुळेच वेगवेगळ्या परीक्षा वेगळ्या वाटतात, कठीण वाटतात. वस्तुस्थिती ही आहे की जो काही अभ्यास आपण करतो आहोत, तो आपण पूर्णपणे मन लावून केला पाहिजे, मग ती बोर्डाची परीक्षा असो, अथवा प्रवेश परीक्षा असो, अथवा नोकरीसाठी मुलाखत किंवा परीक्षा असो, कुठेही परीक्षा होऊ शकते. जर तुम्ही शिक्षण पूर्णपणे आत्मसात केलं असेल, पूर्णपणे शिकला असाल तर परीक्षा कुठली आहे, हा अडथळा बनूच शकत नाही. आणि म्हणूनच स्वतःला परीक्षेसाठी तयार करण्यासाठी डोक्याला ताण देण्याऐवजी स्वतःला योग्य, सुशिक्षित व्यक्ती बनविण्यासाठी, विषयातले तज्ञ बनण्यासाठी आपण मेहनत करायला हवी. मग जो काही निकाल लागेल तो लागेल. जी परीक्षा आधी येईल ती आधी द्यायची, तिचा सामना आधी करायचा, नंतर जी येईल, तिचा सामना नंतर करायचा. पण सामना यासाठी करायचा.... आता खेळाडूबद्दल,  तुम्ही खेळाडू बघितला असेल, ज्या पातळीवर खेळायचं असतं, त्यासाठी मेहनत करत नाही. तो खेळाडू हा त्याच्या  खेळात पारंगत असतो. जर तो तालुका स्तरावर खेळत असेल तर तिथे आपले कौशल्य दाखवेल, जिल्हा स्तरावर खेळत असेल तर तिथे कौशल्य दाखवेल, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळेल तर तिथे आपले कौशल्य दाखवेल. आणि स्वतः देखील उत्क्रांत होत जाईल. म्हणून मला असं वाटतं की अमूक परीक्षेसाठी ही युक्ती, तमुक परीक्षेसाठी ती युक्ती या चक्रातून बाहेर पडून, माझ्याकडे ही गोळी आहे, मी घेऊन जातो आहे जर मी त्यातून बाहेर पडलो तर ठीक, नाही पडू शकलो तर मी आणखी कुठला मार्ग शोधीन. तर मला असं वाटतं की यात असा विचार केला पाहिजे.

दुसरी गोष्ट, स्पर्धा,

बघा मित्रांनो, स्पर्धा ही आपल्या आयुष्यातली सर्वात मोठी भेट समजली पाहिजे. जर स्पर्धाच नसेल तर आयुष्य काय कामाचं? मग तर आपण असेच आनंदात राहू, बस, बाकी काही नाही फक्त आपणच राहू. असं व्हायला नको. खरंच विचारलं तर आपण आयुष्यात स्पर्धेला तोंड दिलं पाहिजे. तेव्हाच तर खरी कसोटी असते. मी तर असं म्हणेन  की घरी सुद्धा, जेव्हा सुट्टीचा दिवस असतो, अभ्यास नाही, परीक्षा नाही तर भाऊ बहिण बसून स्पर्धा करा. तू चार पोळ्या खातोस, मी पाच खातो. तू पाच खोस, मी सहा खातो. अरे, स्पर्धा करून तर बघा. आयुष्यात आपण स्पर्धेला आमंत्रण दिलं पाहिजे. आयुष्य पुढे नेण्याचे प्रभावी मध्यम म्हणजे स्पर्धा, ज्यात आपण स्वतःचेच मूल्यमापन करायला शिकतो.

दुसरी गोष्ट, मी ज्या पिढीचा आहे, तुमचे आई वडील ज्या पिढीतले आहेत, त्यांना हे सगळं मिळालं नाही जे तुम्हाला मिळतं आहे. तुमची पिढी भाग्यवान आहे, तुम्ही या भाग्यवान पिढीतले आहात, इतकं भाग्य तुमच्या आधीच्या कुठल्याच पिढीला मिळालं नाही आणि ते म्हणजे जास्त स्पर्धा  आहे तर संधी देखील अनेक आहेत. तुमच्या कुटुंबाला इतक्या संधी मिळाल्या नव्हत्या. तुम्ही बघितलं असेल दोन शेतकरी असतात, समजा एकाकडे दोन एकर जमीन आहे, दुसऱ्याकडे सुद्धा दोन एकर जमीन आहे, पण एक शेतकरी असतो, तो असा विचार करतो, चरितार्थ चालवायचा आहे, उसाची शेती करत राहा, आपला चरितार्थ चालत राहील. दुसरा शेतकरी आहे, तो असा विचार करतो, नाही - नाही, दोन एकर जमीन आहे, मी असं करतो, एक तृतीयांश जमिनीत हे पिक घेतो, एक तृतीयांश जमिनीत हे पिक घेतो. मागच्या वर्षी ते केलं होतं, या वर्षी हे करीन, या दोन गोष्टी करणर नाही. तुम्ही बघाल की जो दोन एकर जमिनीतच आरामात बसून चरितार्थ चालवतो आहे, त्याचं आयुष्य थांबून जातं. जो जोखीम घेतो, प्रयोग करतो, नव्या गोष्टी करतो, नव्या गोष्टी आणतो, तो इतका पुढे जातो, की आयुष्यात कधीच थांबायचं नाव घेत नाही. त्याचप्रमाणेच आपलं आयुष्य आहे. इतक्या स्पर्धात्मक जगात स्वतःला सिद्ध करत असल्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आणि आपल्याकडे अनेक पर्याय आहेत. ही स्पर्धा नाही तर ती स्पर्धा, हा मार्ग नाही तर तो मार्ग, हा मार्ग नाही तर तो मार्ग. मला असं वाटतं की ही एक संधी आहे असा आपण विचार केला पाहिजे. आणि मी ही संधी सोडणार नाही, मी ही संधी वाया जाऊ देणार नाही, ही भावना जर निर्माण झाली, तर मला पक्का विश्वास आहे स्पर्धा म्हणजे या युगातील सर्वात मोठी भेट आहे, याचा तुम्ही अनुभव घ्याल.

सूत्रसंचालक: माननीय पंतप्रधान जी, जीवनात यशस्वी होण्यासाठी तुम्ही आम्हाला ज्ञान आत्मसात करण्याची प्रेरणा दिली. आपले मनःपूर्वक धन्यवाद. आदरणीय पंतप्रधान जी, गुजरातच्या नवसारी येथील पालक सीमा चिंतन देसाई, आपल्याला एक प्रश्न विचारू इच्छिते. मॅडम, कृपया तुमचा प्रश्न विचारा.

सीमा चिंतन देसाई: जय श्री राम, पंतप्रधान मोदी जी, नमस्ते. मी नवसारी येथील सीमा चिंतन देसाई आहे, एक पालक. सर, तुम्ही अनेक तरुणांचे आदर्श आहात. कारण. तुम्ही फक्त बोलत नाही, तुम्ही जे बोलता ते करून दाखवता. सर, एक प्रश्न असा कि ग्रामीण भागातील मुलींसाठी अनेक योजना सुरू आहेत. आपला समाज त्याच्या प्रगतीत काय योगदान देऊ शकतो. कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद.

सूत्रसंचालक: धन्यवाद मॅडम. आदरणीय महोदय, सीमा चिंतन देसाई जी ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाबाबत चिंतित आहेत, आणि या दिशेने आपले मत काय आहे हे श्री. माननीय पंतप्रधान महोदयांकडून जाणून घ्यायचे आहे.

पंतप्रधान: तसं तर मला वाटतं कि परिस्थिती खूप बदलली आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा शिक्षणाचा विषय येत असे तेव्हा पालकांना वाटायचे की मुलाला शिकवावे. आपल्या मर्यादित साधनांमुळे त्यांना वाटायचे कि अशी परिस्थिती आहे, मुलाने अभ्यास केला तर काहीतरी कमावेल आणि कधी कधी काही पालक असेही म्हणायचे की अरे, मुलींना शिकवून काय करायचे, तिला थोडीच नोकरी करायची आहे. आणि ती तर तिच्या सासरी जाईल आणि आपले आयुष्य जगेल. या मानसिकतेचा एक काळ होता. कदाचित आजही काही गावांमध्ये ही मानसिकता कुठेतरी आढळू शकते, पण आज परिस्थिती बदलली आहे आणि मुलींची ताकद जाणून घेण्यात समाज मागे राहिला तर तो समाज कधीच प्रगती करू शकत नाही. कधीतरी तुम्ही अशी कुटुंबे पाहिली असतील, जिथे भाऊ-मुलगा असायलाच हवे, म्हणजे म्हातारपणात उपयोगी पडेल, असे म्हटले जाते. मुलीला काय, ती सासरी जाणार, तिचा काय उपयोग? अशीही मानसिकता आपल्या समाजात आहे. आणि एकेकाळी होती, पण इतिहास या गोष्टी अनुभवतो, आता मी या गोष्टी अगदी बारकाईने पाहतो. मी अशा अनेक कन्या पाहिल्या आहेत, ज्यांनी आई-वडिलांच्या सुखासाठी, म्हातारपणी त्यांची काळजी घेण्यासाठी लग्न न करता, आई-वडिलांच्या सेवेत आयुष्य वेचले. जे मुलगा करू शकला नसता ते मुलींनी करून दाखवले आहे आणि मी अशीही कुटुंबे पाहिली आहेत कि ज्यांच्या घरात चार मुलगे आहेत. चार मुलांचे चार बंगले आहेत. सुख चैनीचे आयुष्य आहे. दु:ख कधी अनुभवलेले नाही. मात्र आई-वडील वृद्धाश्रमात जीवन जगत आहेत. असेही पुत्र मी पाहिले आहेत. म्हणूनच पहिली गोष्ट म्हणजे समाजात मुलगा-मुलगी समान आहेत, त्यांच्यात भेदभाव नाही. ही आजच्या युगाची गरज आहे आणि प्रत्येक युगाची गरज आहे. आणि भारतात काही विकृती निर्माण झाल्या आहेत. त्या येण्यामागे काहीतरी कारण असावे. पण या देशाला अभिमान वाटू शकतो. राज्यकारभाराविषयी बोलायचे झाले तर एकेकाळी अहिल्या देवींचे नाव घेतले जायचे उत्कृष्ट प्रशासनासाठी. शौर्याविषयी बोलायचे झाले तर राणी लक्ष्मीबाई यांचे नाव यायचे शौर्यासाठी. मुलीच तर होत्या त्या .

म्हणजेच असे कोणतेही युग नाही आणि इथे मुलींनी आपल्याला जादुई ज्ञानाचे भांडार दाखवले आहे. प्रथम आपली स्वतःची मानसिकता आहे. दुसरे म्हणजे, आज परिस्थिती बदलली आहे. आज तुम्ही पाहाल की जी नवीन मुले शाळेत येतात त्यात मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त असते. हा मेळ राखला जात आहे. आज मुलींच्या इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, काहीतरी करून दाखवण्याचा ध्यास आहे. किंबहुना कोणत्याही भारतीयाला अभिमान वाटावा, असेच आहे आणि आपण त्यांना संधी दिली पाहिजे आणि संधीचे संस्थात्मक रूप धारण केले पाहिजे. कोणतेही एक कुटुंब ते स्वतःच्या पद्धतीने करेल असे नाही, हे तुम्ही खेळात पाहिले असेलच. आज कोणत्याही स्तरावरील खेळ खेळला तरी भारताच्या कन्या सर्वत्र आपले नाव उज्ज्वल करत आहेत. विज्ञानाच्या क्षेत्रातच बघा, विज्ञानातून एवढी मोठी कामगिरी झाली, त्यात बघितले तर निम्म्याहून अधिक आपल्या मुलींनी विज्ञान क्षेत्रात काहीतरी करून दाखवले आहे. आता दहावी-बारावीचा निकाल बघा, मुलींना मुलांपेक्षा जास्त गुण मिळतात. उत्तीर्ण होणाऱ्यात मुलींची संख्या अधिक असते. त्यामुळे आज मुलगी ही प्रत्येक कुटुंबासाठी खूप मोठी संपत्ती बनली आहे, एका विशाल कुटुंबाची शक्ती बनली आहे आणि हा बदल चांगला आहे, हा बदल जितका अधिक होईल तितका तो अधिक फायदेशीर ठरेल. आता तुम्ही बघा त्या गुजरातच्याच आहेत ज्यांनी प्रश्न विचारला आहे. गुजरातमध्ये जी पंचायती राज व्यवस्था आहे, ती चांगली पंचायतराज व्यवस्था आहे. निवडून आलेल्यांमध्ये 50% महिला आहेत. कायद्याने 50 टक्के राखीव आहे. पण प्रत्यक्षात निवडणुकीनंतर परिस्थिती अशी बनते की महिला निवडून येण्याचे प्रमाण 53 टक्के 54 टक्के 55 टक्के आहे. म्हणजेच ती तिच्या राखीव जागेवरून जिंकते पण कधी कधी सर्वसाधारण जागेवरून जिंकून 55 टक्क्यांपर्यंत जाते आणि पुरुष 45 टक्क्यांपर्यंत खाली येतात. याचाच अर्थ समाजाचाही माता-भगिनींवरील विश्वास वाढला आहे. म्हणूनच तर त्या लोकप्रतिनिधी म्हणून येतात. आज आपण स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहोत. आज भारताच्या संसदेत आजपर्यंतच्या काळातील सर्वाधिक महिला खासदार आहेत आणि खेड्यापाड्यात देखील ज्या  सुशिक्षित मुली आहेत त्यांना निवडून देणे लोकांना जास्त आवडते. मग ती पाचवी उत्तीर्ण असली तर सातवी उत्तीर्ण असलेल्या महिलेला तसेच सातवी ऐवजी अकरावी शिकलेली असेल तर तिला निवडून देतील. म्हणजेच शिक्षणाविषयी आदराची भावना समाजातही प्रत्येक स्तरावर दिसून येते. आज तुम्ही शिक्षण क्षेत्राकडे बघा. कदाचित कधीतरी पुरुषांकडून मागणी येण्याची शक्यता आहे. मी कोणालाच, राजकीय पक्षाच्या लोकांना मार्ग दाखवत नाही. पण कधी कधी शक्यता असते कि पुरुष आंदोलन करतील की शिक्षक भर्ती मध्ये आमचे इतके टक्के आरक्षण निश्चित करावे. कारण बहुतेक शिक्षक या आपल्या माता-भगिनी आहेत. त्याचप्रमाणे, नर्सिंगमध्ये, जास्त करून सेवाभाव, मातृत्व असते. आज ते नर्सिंगच्या क्षेत्रात भारताची शान वाढवत आहे. भारतातील परिचारिका जगात जिथे जात आहेत तिथे भारताचा अभिमान, गौरव वाढवत आहेत. पोलीस क्षेत्रातही, आज आपल्या मुली मोठ्या प्रमाणात पोलीस सेवेत दाखल होत आहेत. आता आमच्याकडे मुली राष्ट्रीय छात्र सेनेत आहेत, मुली सैनिक शाळेत आहेत, मुली सैन्यात आहेत, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आहेत आणि या सर्व गोष्टी म्हणूनच संस्थात्मक होत आहेत आणि मी समाजालाही ही विनंती करतो की तुम्ही मुलगा आणि मुलगी असा भेद करू नका. दोघांना समान संधी द्या. आणि मी म्हणतो, कदाचित समान गुंतवणुकीने, जर मुलगा समान संधीने एकोणीस करेल, तर मुलगी 20 करेल.

सूत्रसंचालक: आदरणीय पंतप्रधान जी, मुली या घर, समाज आणि राष्ट्राचे सौंदर्य आहे. तुमच्या प्रेरणेने त्यांच्या आकांक्षांना नवीन भरारी मिळाली आहे, आपल्याला धन्यवाद. माननीय पंतप्रधान महोदय, आज तुमच्याकडून आम्हाला मोलाचे मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळाल्याने आम्ही कृतकृत्य झालो. तुमचा मौल्यवान वेळ लक्षात घेऊन मी आता शेवटचे दोन प्रश्न विचारतो. दुमपाला पवित्रा राव ही केंद्रीय विद्यालय सेक्टर-8 आर.के. पुरम, नवी दिल्ली येथील बारावीचा विद्यार्थिनी प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे. पवित्र राव कृपया तुमचा प्रश्न विचारा.

पवित्रा राव: नमस्कार पंतप्रधान जी, मी पवित्रा राव, केंद्रीय विद्यालय, सेक्टर-8, आर.के. पुरम, नवी दिल्ली येथे इयत्ता 12 वी ची विद्यार्थिनी आहे. माननीय पंतप्रधान जी, आपला भारत जसजसा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे, ती टिकवण्यासाठी आमच्या नवीन पिढीला आणखी कोणती पावले उचलावी लागतील? तुमच्या मार्गदर्शनाने भारत स्वच्छ झाला असून पुढील पिढीने पर्यावरण रक्षणासाठी काय योगदान द्यावे, कृपया मार्गदर्शन करा, धन्यवाद सर.

सूत्रसंचालक: धन्यवाद पवित्रा, महोदय, नवी दिल्ली येथील इयत्ता 11 वीचा विद्यार्थी चैतन्य लेले त्याच्या मनात निर्माण झालेला असाच आणखी एक प्रश्न सोडवू इच्छितो. चैतन्य कृपया तुमचा प्रश्न विचारा. 

चैतन्य: नमस्कार, माननीय पंतप्रधान जी, माझे नाव चैतन्य आहे. मी डीएव्ही शाळेचा 11वीचा विद्यार्थी आहे. माझा तुम्हाला प्रश्न आहे की आपण आपले वातावरण स्वच्छ आणि चांगले कसे बनवू शकतो? धन्यवाद. 

सूत्रसंचालक: धन्यवाद चैतन्य, माननीय पंतप्रधान महोदय, पवित्रा आणि चैतन्य यांच्याप्रमाणेच भारतातील तरुणांना स्वच्छ आणि हरित भारतात श्वास घ्यायचा आहे. तुमचे सर्वात आवडते असलेले एक स्वप्न, भारत आणि आपले वातावरण जगाच्या प्रत्येक अर्थाने प्राचीन आणि परिपूर्ण कसे ठेवायचे हे जाणून घेण्याची आम्हा सर्वांना इच्छा आहे, आम्ही सर्वजण तुमच्या मार्गदर्शनाची वाट पाहत आहोत. सर,

पंतप्रधान महोदय: तसा तर हा परीक्षेशी संबंधित विषय नाही.मात्र, जसे परीक्षेसाठी उत्तम वातावरण हवे, तसेच पृथ्वीलाही चांगल्या वातावरणाची गरज असते. आणि आपण सगळे तर, पृथ्वीला माता मानणारे लोक आहोत. तर आज सर्वात आधी, मला संधी मिळाली आहे, तर मी सार्वजनिक मंचावरून आपल्या देशातल्या बालक-बालिकांना, मुलांना मनापासून धन्यवाद देतो. मला आठवतं जेव्हा मी पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदा लाल किल्ल्यावरुन भाषण केलं होतं, तेव्हा, माझ्या भाषणानंतर बहुतांश लोकांनी त्याबद्दल, प्रश्न, शंका व्यक्त केल्या होत्या. की ठीक आहे, मोदीजी बोलले तर आहेत, पण हे सगळं प्रत्यक्षात होऊ शकेल का? आणि त्यावेळी मी स्वच्छते विषयी बोललो होतो. त्यामुळे लोकांना थोडं आश्चर्य पण वाटलं होतं, की देशाचा पंतप्रधान.. आज इथे जागा तर अशी आहे की इथे अवकाशाविषयी बोललं जावं, परराष्ट्र धोरणाविषयी बोललं पाहिजे, सैन्यशक्तिविषयी बोललं पाहिजे. हा कसा माणूस आहे जो लाल किल्ल्यावरुन स्वच्छतेविषयी बोलतो. अनेकांना आश्चर्य वाटले होते. मात्र ज्या काही शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. त्या सगळ्या चुकीच्या असल्याचे सिद्ध करण्याचे काम जर कोणी केलं असेल, तर ते माझ्या देशातल्या बालक-बालिकांनी केलं आहे. स्वच्छतेच्या या प्रवासात आज आपण जिथे पोहोचलो आहोत,त्याचं सर्वाधिक श्रेय जर कुणाला द्यायचं असेल, तर मी ते देशाच्या बालक-बलिकांना देतो. इथल्या पांच-पांच, सहा-सहा वर्षांच्या मुलांनी आपल्या आजी-आजोबांनाही कचरा टाकतांना थांबवलं आहे, अगदी सारखं सारखं, की मोदीजीनी नाही सांगितलं आहे, इकडे फेकू नका, मोदीजीना आवडणार नाही. ही खूप मोठी ताकद आहे. आणि कदाचित तुम्ही देखील त्याच पिढीचे आहात, म्हणून त्याच भावनेनं तुम्ही हा प्रश्न विचारला आहे. मी आपल्या प्रश्नाचं स्वागत करतो. हे खरं आहे, की आज संपूर्ण जग तापमानवाढीमुळे, पर्यावरणातील बदलामुळे त्रस्त झाले आहेत आणि त्याचे मूळ कारण आहे की आपण आपल्याजवळच्या स्त्रोतांचा गैरवापर केला आहे. आपल्याला निसर्गाने जे काही दिलं, ते आपण वाया घालवलं आहे. आता आपली जबाबदारी आहे, की आज जर मी पाणी पितो आहे, किंवा माझ्या नशिबात पाणी आहे. आज जर मी कुठे नदी बघतो आहे. आज जर मी कुठल्या झाडाच्या सावलीत उभा आहे, तर त्यात माझे काही योगदान काही नाही. माझ्या पूर्वजांनी हे माझ्यासाठी सोडलं आहे. ज्या गोष्टींचा आज मी उपभोग घेतो आहे, ते माझ्या पूर्वजांनी माझ्यासाठी ठेवलं आहे. माझ्यानंतर येणाऱ्या माझ्या पिढीसाठी मलाही काही द्यायला हवी की नाही? द्यायला हवी ना ? आणि जर मी पर्यावरणाचं रक्षण केलं नाही, तर काय देणार आपण नव्या पिढीला? आणि म्हणूनच, आमच्या पूर्वजांनी आपल्याला जे दिले त्याचे कर्ज स्वीकारुन आणि हे वैभव पुढच्या पिढीकडे सोपवणे ही जबाबदारी समजून आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. हेच आपले कर्तव्य आहे. आणि हे सरकारी कार्यक्रमातून यशस्वी होऊ शकणार नाही. जसे की समजा, मी सांगतो आहे. एकल वापराच्या प्लॅस्टिकपासून आपण दूर राहायला हवं. आपल्याच कुटुंबात आपण हे बोलत असतो की आपल्याला एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकपासून दूर राहायला हवे. पण आपल्या घरात कोणाच्या लग्नाची पत्रिका येते, तेव्हा त्यावर प्लॅस्टिकचे सुंदर वेष्टन असते.आपण ते काढून फेकून देतो. आता, आपण जो विचार करतो, त्याच्या हे विरुद्ध आहे. मग आपल्या या सवयी कशा बदलतील? किमान, माझ्या कुटुंबात तरी, मी एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकचा घरात अजिबात वापर होऊ देणार असा जर आपण निश्चय केला, तर आपण पर्यावरणासाठी काहीतरी मदत करु शकू. आणि जर आपल्या सगळ्या मुलांनी हे काम मनावर घेतलं, तर हे मिशन नक्की यशस्वी होईल. आपण पहिले असेल, की गुजरातमध्ये मी पशुआरोग्य मेळावे भरवत असे, आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की गुजरातमध्ये पशूंच्या दंतचिकित्सा करत असे, पशूंचे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया देखील करत असे, काही पशूंच्या इतर शस्त्रक्रिया देखील कराव्या लागत. मी बघितलं होतं की एका गाईच्या पोटातून किमान 40 किलो प्लॅस्टिक निघालं होतं. असं होणं माणूसकीच्या विरोधातील काम आहे, एवढी संवेदना जरी आपल्या मनात निर्माण झाली, तर, आज आपल्याला जसं वाटतं की, हलकी फुलकी पिशवी आहे, बाहेर घेऊन जाणं चांगलं आहे, वापरुन नंतर फेकून देईन. आता आपल्याला या ‘वापरा आणि फेकून द्या’ संस्कृतीपासून दूर व्हायला हवे. आणि आपल्याला, पुनर्वापर, पुनर्प्रक्रिएकडे वळावं लागेल. आणि भारतात हे काही नवं नाही. आपल्याकडे कित्येक वर्षांपासून या सवयी आहेत. आपण आपल्या संसाधनांचा जितका अधिक गैरवापर करु, तेवढा आपण पर्यावरणाची अधिक हानी करू. मात्र, आपण जर आपल्याकडच्या संसाधनांचा पूरेपूर वापर केला तर आपण पर्यावरणाचे रक्षण करु शकू. आज बघा, आपल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू देखील पर्यावरणासाठी संकट ठरत आहेत. आपण पाहिले असेल, भारत सरकारने आता गाड्या भंगारात टाकण्याचे स्क्रॅपविषयक  धोरण आणले आहे, ज्यामुळे, जुन्या गाड्यां ज्या प्रदूषण निर्माण करतात. त्या गाड्या नष्ट करता याव्यात. त्या गाड्या भंगारात काढा, त्यातूनही काही कमाई करा आणि नवी गाडी घ्या. या दिशेने मोठ्या प्रमाणात काम होणार आहे. त्याचप्रमाणे, त्याचप्रमाणे आपल्याला कल्पना आहे, की पाण्याची  काय किंमत आहे, झाडांचे काय महत्त्व, निसर्गाचे काय महत्त्व आहे, आपण त्याबद्दल संवेदनशील आहोत का? आज आपला सहज स्वभाव असायला हवा. आपण पहिले असेल, कॉप-26 मध्ये मी एक विषय मांडला होता. इंग्लंडमध्ये परिषद झाली होती, त्यात मी म्हटले होते, की जीवनशैली ही समस्या आहे आहे. आपली लाईफस्टाइल चुकीची आहे आणि आपल्याला मिशन लाईफची अवश्यकतात आहे. मी मिशन लाईफसाठी तिथे एक संकल्पना मांडली होती. की ‘पर्यावरणासाठी जीवनशैली’. मला असं वाटतं की आपल्या आयुष्यात, खूप छोट्या वयात देखील आपण चार मजली इमारत असेल, तरीही आपण लिफ्टचा वापर करतो. आपण प्रयत्न करु शकतो का की आपण जिने चढून जाऊ. त्यामुळे आपल्या तब्येतीलाही फायदा होईल, आणि आपण पर्यावरण रक्षणात देखील हातभार लावू शकू. आपल्या आयुष्यात आपण हे लहान लहान बदल केले आणि म्हणूनच मी म्हटलं होतं की आपल्याला जगात ही- पी-3 चळवळ चालवण्याची गरज आहे. -प्रो -पीपल, प्लॅनेट. या पी-3 चळवळीत जास्तीत जास्त लोक सहभागी व्हावे, आणि जाणीवपूर्वक यासाठी प्रयत्न केले तर आपण या गोष्टी साध्य करु शकू, असा मला विश्वास वाटतो.

दुसरी गोष्ट आज जेव्हा देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहे. स्वातंत्र्याचे 75 वर्ष,आजची जी पिढी आहे. ती आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या यशातून गेलेली असेल तेव्हा देश स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करत असेल. म्हणजे हे 25 वर्ष आपल्या आयुष्यातले आहेत. तुमच्यासाठी आहेत, तुमचे योगदान या 25 वर्षात काय असावे, किती असावे, जेणेकरून आपला देश अशा ठिकाणी पोचेल, आपण अभिमानानं देशाच्या स्वातंत्र्याची शताब्दी मोठ्या दिमाखात, जगासमोर ताठ मानेने साजरी करू शकू, आपण हे आपल्या जीवनात आत्मसात करायचे आहे. आणि याचा सोपा मार्ग म्हणजे, कर्तव्यावर भर देणे हाच आहे. जर मी माझं कर्तव्य पार पाडलं, माझ्या जबाबदाऱ्या पार पडल्या. म्हणजे असं की, मी कुणाच्या तरी अधिकारांचे रक्षण करतो. पुन्हा त्यांना आपल्या अधिकारांसाठी झगडावं लागणारच नाही. आज आपली समस्या ही आहे की आपण आपल्या कर्तव्यांचं पालनच करत नाही. म्हणूनच अधिकारांसाठी त्यांना झगडावं लागतं, संघर्ष करावा लागतो. आपल्या देशात कुणालाच आपल्या अधिकारांसाठी झगडावं लागायला नको. हे आपलं कतर्व्य आहे आणि त्या कर्तव्याचा उपाय म्हणजे, आपलं कर्तव्य पालन आहे. जर आपण आपलं कर्तव्य पार पाडलं, आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या पार पाडल्या. आता बघा, आपल्या देशाने संपूर्ण जगातले लोक आपल्या इथल्या तीन गोष्टींची चर्चा करतात तेव्हा लोकांना भीती वाटते की याचं श्रेय मोदींना मिळेल, मोदींची वाह वाह होईल, जयजयकार होईल म्हणून हात आखडता घेतात. हा जयजयकार करण्यात मात्र आपल्या देशात जे लसीकरण झालं, त्यातही जेव्हा मी शाळकरी मुलांसाठी लसीकरण सुरु केलं आणि ज्या वेगाने मुलांनी जाऊन जाऊन लास घेतली, ही एक फार मोठी घटना होती. आपणा सर्वांचे देखील, कुणा कुणाचे लसीकरण झाले आहे, हात वर करा, सर्वांचे लसीकरण झाले आहे? जर जगातल्या कुठल्याही देशात असे प्रश्न विचारायची कुणी हिंमत देखील करू शकणार नाही, हिंदुस्तानच्या मुलांनी देखील हे दाखवून दिलं आहे म्हणजे असं की आपण आज आपल्या कर्तव्याचं पालन केलं आहे. हे कर्तव्याचं पालन भारताचा मान सन्मान वाढण्याचं कारण बनलं आहे, त्याचप्रकारे आपल्या देशाला पुढे घेऊन जाणं असो, निसर्गाचं रक्षण करणं असो, मला पूर्ण विश्वास आहे की आपण आपली कर्तव्ये सजगतेने पार पाडली, कामं केली, तर इप्सित परिणाम साध्य करू शकतो.

सूत्रसंचालक: माननीय पंतप्रधानांनी परीक्षा पे चर्चा 2022 मध्ये आपल्यासारख्या कोट्यवधी मुलं, शिक्षक, पालकांची अस्वस्थता उत्साह आणि सफलतेची आकांक्षा यात परिवर्तीत केली आहे. आम्ही कृतज्ञ आहोत, मानानीय पंतप्रधान जी आपण जे स्वर्णिम उद्बोधन केलंत त्यासाठी आम्ही अत्यंत आभारी आहोत. या सोबतच आपण या नेत्रदीपक कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलो आहोत. आजच्या सकाळी जे प्रोत्साहन आणि प्रेरणा देणारे क्षण अनुभवले ते नेहमी करता आपल्या स्मरणात राहणार आहेत. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आपला अमुल्य वेळ आम्हाला दिला आणि आपल्यामध्ये येऊन आपल्या चुंबकीय व्यक्तिमत्वाने प्रेरणा दिली त्याबद्दल मनापासून आभार मानतो. आपले खूप आभार सर.

पंतप्रधान : आपण सगळे, आपले उद्घोषक, सगळे इथे या, सर्वाना बोलवून घ्या. काही इकडे या, काही इकडे या. बघा, आज मी सर्वात पहिले या लोकांचे अभिनंदन करू इच्छितो. या सर्वांनी इतक्या सुंदरतेने सगळ्या गोष्टी केल्या, कुठेच आत्मविश्वास जराही कमी नव्हता. तुम्ही देखील बारीक लक्ष दिलं असेल, मी तर पूर्णवेळ लक्ष ठेऊन होतो. असे सामर्थ्य इथे बसलेल्या प्रत्येकात असेल, जे टीव्हीवर बघत आहेत, त्यांच्यात देखील असेल आणि जे बघत नसतील त्यांच्यात देखील असेल. आयुष्यात ज्यांना प्रश्न पडत नसतील, मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की जर खरोखरच आपल्याला जीवनात आनंदाची अनुभूती घ्यायची असेल तर आपल्यात एक गुण विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर आपण तो गुण विकसित केला तर आपण नेहमी आनंदी राहू आणि तो म्हणजे गुणांचा पुजारी बनणे. कुणामध्ये आपणकाही  गुण बघतो, गुणवत्ता बघतो आणि आपण त्याचे पुजारी बनतो. या मुळे त्यांना ताकद तर मिळत असतेच, आपल्यालाही ताकद मिळते, आपला स्वभाव बनून जातो की जिथे बघू तिथे चांगल्या गोष्टींचं निरीक्षण करायला हवं,  काय चांगलं आहे, कसं चांगलं आहे, याचं निरीक्षण करायला हवं, त्याचा स्वीकार करण्याचा प्रयत्न करायला हवा, स्वतःला त्याच्या अनुकूल बनवण्याचा प्रयत्न करायला हवा, नवीन काही तरी कारण्याचा प्रयत्न करायला हवा, लोकांना जोडण्याचा प्रयत्न करायला हवा, जर आपण इर्षा वाढू दिली तर, बघा, हा तर माझ्या पुढे निघून गेला, बघा त्याचे कपडे माझ्यापेक्षाही चांगले आहेत, बघा, यांच्या कुटुंबात तर इतकं चांगलं वातावरण आहे, त्याला तर काहीच त्रास नाही. जर हीच स्पर्धा मनात घर करून राहिली तर, आपण हळू – हळू – हळू – हळू स्वतःला आणखी आणखी लहान करत जातो, आपण कधीच मोठे होऊ शकत नाही. आपण दुसऱ्याचे सामर्थ्य आणि दुसऱ्याच्या  विशेष गुणांना आणि दुसऱ्यांची शक्ती जाणून घेण्याचे, समजून घेण्याचं सामर्थ्य विकसित केलं तर ते गुण आपल्या अंगी बनविण्याचं सामर्थ्य आपोआप विकसित होऊ लागेल. आणि म्हणूनच मी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आपणा सर्वांना माझं आग्रहाचं सांगणं आहे की आयुष्यात कुठेही संधी मिळाली, जी खास आहे, जी उत्तम आहे, जी सामर्थ्यवान आहे, त्याकडे तुमचा कल असायला हवा. ते समजून घेण्यासाठी, त्याचा स्वीकार करण्यासाठी खूपच सुंदर मन असायला हवं. मनात कधीच इर्ष्येची भावना यायला नको, आपल्या मनात कधीच बदला घेण्याची भावना निर्माण व्हायला नको. आपण देखील खूप सुखी आणि आनंदी जीवन जगू शकू. याच अपेक्षेने मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो. सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो आणि मी आता शिक्षण विभागाचे अभिनंदन करतो, आपण सर्वांनी मिळून इतका सुंदर कार्यक्रम आयोजित केला आणि आपणा सर्व तरुणांना भेटण्याची संधी मला मिळाली. काही लोकांना वाटत असेल की मोदी परीक्षेवर चर्चा का करतात, परीक्षेत तर ठीक आहे, शिक्षकांनी खूप काही समजावलं असेल तुम्हाला फायदा होतो कि नाही मला कल्पना नाही, मला खूप फायदा होतो. मला हा फायदा होतो की जेव्हा मी तुमच्यात असतो, तेव्हा मी 50 वर्ष लहान होतो. आणि मी स्वतःला तुमच्या वयात आणून काही शिकून स्वतः वाढायचा प्रयत्न करतो, म्हणजे मी माझी पिढी बदलत नाही, मी तुमच्याशी जोडून घेण्यामुळे तुमच्या मनात काय सुरु आहे, हे समजून घेऊ शकतो, तुमच्या आशा आकांक्षा समजून घेऊ शकतो, माझं आयुष्य त्यानुसार बनविण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच हा कार्यक्रम मला स्वतःला घडवण्याच्या कमी येतो आहे, माझे सामर्थ्य वाढविण्याच्या कमी येतो आहे आणि म्हणूनच मी तुमच्यात येतो, मला आज स्वतःला घडविण्याची, स्वतःला विकासती करण्याची, शिकण्याची संधी आपण सर्वांनी दिली त्यासाठी मी आपला आभारी आहे.

खूप खूप धन्यवाद !!

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world

Media Coverage

PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi