"अध्यात्मिक पैलूंसह सामाजिक जाणिवा जागृत करण्यात श्रद्धा केंद्रे महत्त्वाची भूमिका बजावतात”,
''अयोध्येत आणि संपूर्ण देशात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.''
जल संवर्धन आणि नैसर्गिक शेतीच्या महत्त्वावर दिला भर
"कुपोषणाच्या वेदनेचे पूर्णपणे निर्मूलन करणे आवश्यक आहे"
"कोविड विषाणू अत्यंत फसवा आहे आणि आपण त्याविरूद्ध दक्ष राहिले पाहिजे"

उमिया माता की जय !

 

गुजरातचे लोकप्रिय, मृदू आणि  कणखर  मुख्यमंत्री भूपेन्द्रभाई पटेल, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी  पुरुषोत्तम रूपाला, राज्य सरकारमधील सर्व मंत्री, संसदेतील माझे सहकारी , अन्य सर्व आमदार गण, पंचायती, नगरपालिकांमधील  निर्वाचित सर्व लोक प्रतिनिधी , उमा धाम घाटिलाचे  अध्यक्ष वालजीभाई फलदु, अन्य पदाधिकारी आणि देशभरातून आलेले  सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने  उपस्थित माता आणि भगिनी - यांना मी आज माता  उमियाच्या  14 व्या  पाटोत्सव निमित्त  विशेष वंदन करतो. तुम्हा सर्वांना या शुभ प्रसंगी अनेक शुभेच्छा आणि अभिनंदन.

 

गेल्या डिसेंबर महिन्यात माता उमिया धाम मंदिर आणि  उमिया धाम संकुलाची पायाभरणी करण्याचे  सौभाग्य मला लाभले होते. आणि आज घाटिला येथील या  भव्य आयोजनात तुम्ही मला निमंत्रित केले, याचा मला आनंद आहे. प्रत्यक्ष तिथे आलो असतो तर मला अधिक आनंद झाला असता ,  परंतु प्रत्यक्ष भेट देऊ शकलो नाही , मात्र तरीही दुरून सर्व जुन्या  महापुरुषांचे दर्शन होत आहे, हा देखील माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे.

 

आज चैत्र नवरात्रीचा नववा दिवस आहे. माता सिद्धदात्री तुमच्या सर्व  मनोकामना पूर्ण करो अशी मी प्रार्थना करतो. आपली गिरनारची भूमी जप आणि तप याची भूमी  आहे. गिरनार धाम मध्ये माता  अंबा विराजमान  आहे. आणि शिक्षण व दिक्षा यांची भूमी देखील हे  गिरनार धाम आहे. आणि भगवान दत्तात्रेय जिथे विराजमान आहेत, त्या पुण्यभूमीला मी वंदन करतो. हा देखील मातेचा  आशीर्वाद आहे की आपण सर्वजण मिळून नेहमी गुजरातच्या कल्याणाचा विचार केला आहे,  गुजरातच्या विकासासाठी प्रयत्नशील राहिलो,  गुजरातच्या विकासासाठी नेहमीच काही ना काही योगदान देत आलो आहोत आणि एकत्रितपणे करतही आहोत.

 

मी तर या सामूहिक शक्तीचा  नेहमीच अनुभव घेतला आहे . आज प्रभू रामचंद्र यांचा प्रकट  महोत्सव देखील आहे , अयोध्येत भव्यपणे हा उत्सव साजरा केला जात आहे,  देशभरातही साजरा केला जात आहे , ही देखील आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट  आहे .

 

माझ्या साठी तुम्हा सर्वांमध्ये  उपस्थित राहणे ही काही नवीन गोष्ट नाही,  माता उमियाच्या  चरणी नतमस्तक होणे ही देखील नवीन गोष्ट नाही,  गेल्या पस्तीस वर्षात असं कधीच झालं नाही की कुठे ना कुठे,  कधी ना कधी मी तुमच्या बरोबर सहभागी झालो नाही. आता कुणीतरी म्हणाले होते की 2008 मध्ये इथे लोकार्पण करण्यासाठी येण्याचे भाग्य मला लाभलं होतं . हे  पवित्र धाम एक प्रकारे श्रद्धेचे केंद्र आहे. मात्र मला अशी माहिती मिळाली की हे एक सामाजिक चेतनेचे आणि पर्यटनाचे केंद्र देखील बनले आहे.  60 पेक्षा अधिक खोल्या  येथे बांधल्या आहेत . विवाहासाठी अनेक मंगल कार्यालये बांधली  आहेत,  भव्य भोजनालय उभारले आहे.  एक प्रकारे माता उमियाच्या आशीर्वादाने माता उमियाचे  भक्त आणि समाजात चेतना जागवण्यासाठी ज्या काही आवश्यक बाबी आहेत, त्या सर्व पूर्ण करण्याचा प्रयत्न तुम्ही  सर्वांनी केला आहे.  आणि चौदा वर्षांच्या एवढ्या  कमी काळात जो व्याप वाढलेला आहे त्यासाठी देखील  सर्व ट्रस्टी , कार्यवाहक आणि माता उमियाच्या  भक्तांचे मी खूप खूप अभिनंदन करतो

 

आताच आपल्या मुख्यमंत्र्यांनी खूप भावनिक  भाषण केलं.  ते म्हणाले की ही धरती आपली माता आहे आणि मी जर या मातेचा भक्त आहे तर मला या धरती मातेला दुःख पोहचवण्याचे काहीच कारण नाही. घरात आपण आपल्या आईला विनाकारण औषध देऊ का , विनाकारण रक्त वगैरे देऊ  का ? आपल्याला माहिती आहे की आईला जेवढे हवे आहे तेवढेच द्यायचे आहे, परंतु  आपण धरती माते साठी असं मानून चाललो आहोत  की तिला हे हवे आहे, ते हवे आहे, मग तिलाही याचा उबग येईल  की नाही .

 

आणि यामुळे किती संकटे येत आहेत हे आपण पाहत आहोत . या धरती मातेचे  संरक्षण करणे हे  एक मोठे  अभियान आहे.  भूतकाळत  आपण पाण्याच्या  संकटात आयुष्य व्यतीत करत होतो.  दुष्काळ हा नेहमीच  चिंतेचा विषय होता . मात्र जेव्हा आपण चेकडॅम अभियान सुरू केलं,  जलसंधारणाचे  अभियान सुरू केलं,  'पर ड्रॉप मोअर क्रॉप',  ठिबक सिंचन सारखे अभियान चालवलं, सौनी योजना लागू केली , पाण्याच्या उपलब्धतेसाठी  खूप प्रयत्न केले.

 

गुजरात मध्ये मी जेव्हा  मुख्यमंत्री होतो आणि दुसर्‍या एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलताना सांगायचो की  आपल्याकडे पाण्यासाठी एवढा खर्च करावा लागतो आणि एवढी सारी मेहनत करावी लागते . आपल्या सरकारचा बहुतांश वेळ पाणी पोचवण्यात  व्यतीत होतो.  तेव्हा अन्य राज्यांना आश्चर्य वाटायचं कारण त्यांना या संकटाचा अंदाज नव्हता .  त्या संकटातून आपण हळूहळू बाहेर पडलो . कारण आपण लोक चळवळ सुरू केली . तुम्हा सर्वांच्या साथीने सहकारातून  लोकचळवळ सुरु केली. आणि लोकचळवळ लोककल्याणासाठी केली. आणि आज पाण्याबाबत जागरूकता  आली आहे . मात्र तरीही माझे  असं मत आहे की जलसंधारणाबाबत आपण जरा देखील उदासीन राहू नये . कारण दरवर्षी पावसाळ्यापूर्वी करण्याची ही कामे आहेत. तलावांची खोली वाढवायची आहे,  नालेसफाई करायची आहे , ही सर्व कामं जेव्हा होतील तेव्हाच पाण्याचा साठा होईल आणि पाणी देखील जमिनीत  झिरपेल.  अशाच प्रकारे आता रसायनांपासून मुक्ती  कशी मिळवायची याचा देखील विचार करावा लागणार आहे . एक दिवस धरतीमाता म्हणेल,  आता खूप झालं ,तुम्ही जा,  मला तुमची सेवा करायची नाही आणि कितीही घाम गाळला,  कितीही महागडी बियाणे पेरली तरीही  कोणतेही पीक येणार नाही . या धरती मातेला आपल्याला वाचवावे लागेल आणि यासाठी गुजरात मध्ये आपल्याला असे राज्यपाल मिळाले आहेत जे  पूर्णपणे सेंद्रिय शेतीसाठी समर्पित आहेत. मला  अशी माहिती मिळाली आहे की त्यांनी गुजरातच्या प्रत्येक तालुक्यात जाऊन सेंद्रिय शेतीसाठी अनेक शेतकरी संमेलनं घेतली आहेत . मला आनंद आहे , रूपाला जी सांगत होते की लाखोंच्या संख्येने शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत आणि त्यांना सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्याचा अभिमान वाटत आहे . ही गोष्ट देखील खरी आहे की यामुळे खर्च देखील वाचत आहे.  आता मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे,  अतिशय मृदू आणि कणखर मुख्यमंत्री लाभले आहेत,  तेव्हा आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की त्यांची स्वप्ने  आपण साकार करू.  गुजरातच्या गावागावांमधील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीसाठी  पुढे यावे.  मी आणि केशूभाई यांनी ज्या प्रकारे पाण्यासाठी खूप मेहनत घेतली, तशीच मेहनत  भूपेंद्रभाई आता या धरती मातेसाठी घेत आहेत.

  या धरती मातेला वाचवण्यासाठी ते जी  मेहनत घेत आहेत,  त्यात गुजरातच्या सर्व लोकांनी सहभागी व्हायला हवे. आणि मी  पाहिले आहे की तुम्ही जे काम हातात घेता, त्यात तुम्ही कधीही मागे हटत नाही . मला आठवत आहे की उंझा इथे बेटी बचाओ बाबत मला खूप चिंता वाटत होती. माता  उमियाच्या तीर्थक्षेत्रात मुलींची संख्या कमी होत होती. मग मी एकदा  माता उमियाच्या चरणी समाजाच्या सर्व लोकांना एकत्र बोलावले आणि सांगितले की  तुम्ही सर्व मला वचन द्या की मुलींना वाचवायचे आहे. आणि मला अभिमान वाटतो की  गुजरातमध्ये माता उमियाच्या भक्तांनी , माता  खोडल धामच्या भक्तांनी आणि संपूर्ण  गुजरातने यासाठी पुढाकार घेतला. आणि गुजरातमध्ये मुलींना वाचवण्यासाठी ,स्त्री भ्रूण हत्या रोखण्याबाबत  खूप जागरूकता आली. आज आपण पाहत आहोत,  गुजरातच्या मुली काय कमाल करत आहेत, आपली  महेसाणाची सुपुत्री , दिव्यांग, ऑलिंपिक जाऊन भारताचा गौरव वाढवून आली. यावेळी ऑलिम्पिकसाठी जे खेळाडू गेले होते त्यात गुजरातच्या  6 मुली होत्या. कुणाला याचा अभिमान वाटणार नाही - म्हणूनच मला वाटते की  माता उमियाच्या खऱ्या भक्तीमुळे ही शक्ती आपल्यात येते. आणि या शक्तीच्या मदतीने आपण पुढे वाटचाल करू. नैसर्गिक  शेतीवर आपण जेवढा भर देऊ , तेवढीच भूपेन्द्रभाई यांना  मदत होईल. आपली ही  धरती माता सुजलाम सुफलाम होईल, गुजरात समृद्ध होईल. आज पुढे तो  गेलाच आहे, आणखी भरभराट होईल.

 

आणि माझ्या मनात एक दुसरा विचारसुद्धा येतो की आपल्या गुजराथेत मुलं कुपोषित असणे, हे योग्य नाही. घरात आई म्हणते हे खा, पण ते मूल खात नाही. गरिबी नाही, पण खाण्याच्या सवयी अशा असतात की शरीराला पोषण मिळत नाही. मुलीला एनिमिया असतो आणि विसांव्या-बावीसाव्या चोविसाव्या वर्षी लग्न करतात, तर तिच्या पोटातल्या मुलांची वाढ कशी होईल. आईच जर सशक्त नसेल तर बाळाचे काय होणार म्हणूनच मुलींच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि त्याबरोबरच  ईतर सगळ्या लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.

 

माझं असं म्हणणं आहे की माता उमियाच्या सगळ्या भक्तांनी गावागावात जाऊन – जी पाच दहा कुपोषित  मुलं मिळतील- ती कोणत्याही समाजाची असोत- तीही आता कुपोषित राहणार नाहीत असा निर्धार आपण करायला हवा. कारण मूल सशक्त होईल तर कुटुंब सशक्त होईल आणि समाज सशक्त होईल अर्थातच त्यामुळे देश सुद्धा सशक्त होईल. आपण पाटोत्सव साजरा करत आहात, आज रक्तदानासारखे कार्यक्रम सुद्धा केलेत. आता असं करा गावा गावात मा उमिया ट्रस्टच्या माध्यमातून निरोगी बालक स्पर्धा घ्या. दोन, तीन, चार वर्षाच्या सर्व बालकांची तपासणी होऊन जाऊ दे आणि जे आरोग्यसंपन्न आहे त्याला बक्षीस दिले जावे. सगळे वातावरणच बदलून जाईल काम छोटे आहे पण आपण ते उत्तम प्रकारे पार पाडू.

 

मला आत्ताच कळते आहे की इथे लग्नासाठीचे अनेक हॉल बांधले गेले आहेत. लग्न काय बाराही महिने होत नसतात, मग त्या जागांचा काय उपयोग करता?  तिथे आपण कोचिंग क्लास चालवू शकतो. गरीब मुलं तिथे यावीत, समाजाच्या लोकांनी शिकवावे, तास- दोन तास. या जागेचा व्यवस्थित वापर होईल. त्याच प्रमाणे योगाचे केंद्र होईल. दर सकाळी मा उमिया चे दर्शन सुद्धा होईल. तास दोन तास योगाचा कार्यक्रम होईल. अजूनही काही चांगले उपयोग या जागेचे होऊ शकतील. जागेचा  अधिक चांगला उपयोग होईल . तेव्हा हे योग्य प्रकारे सामाजिक चेतनेचे केंद्र बनेल. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला हवेत.

हा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा कालखंड आहे. एका प्रकारे आपल्यासाठी हा मोठा महत्वाचा कालखंड आहे. 2047 मध्ये जेव्हा देश शंभरावा स्वातंत्र्य महोत्सव साजरा करत असेल तेव्हा आपण कुठे असू, आपले गाव कुठे असेल, आपला समाज कुठे असेल, आपला देश कुठे पोहोचला असेल याचे स्वप्न आणि संकल्प प्रत्येक नागरिकांमध्ये जागले पाहिजे. आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापासूनच अशा प्रकारचे चैतन्य आपण जागवू शकतो, ज्यामुळे समाजात उपयुक्त कामे होतील. ती केल्यामुळे मिळणारा आनंद नव्या पिढीला कळेल. म्हणूनच माझ्या मनात एक साधा विचार आला आहे की आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या काळात प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्त्याने म्हणून 75 अमृत सरोवरे तयार करता येतील, जुनी सरोवरे आहेत त्यांना मोठे, खोल आणि जास्त उत्तम बनवावे. एका जिल्ह्यात 75, आपणच विचार करा आजपासून पंचवीस वर्षांनंतर जेव्हा स्वातंत्र्याची शताब्दी साजरी होत असेल तेव्हा त्या पिढीच्या नजरेस पडेल की 75 वर्ष झाली तेव्हा आमच्या गावातील लोकांनी हे तलाव बांधले होते. याशिवाय ज्या गावात तलाव असतो तो त्या गावाचे सामर्थ्य दर्शवतो.  तलाव असेल तर पाटीदार  हा पाणीदार म्हणून ओळखला जाईल. म्हणून या 75 तलावांची मोहीम माता उमियाच्या सोबतीने आपण हाती घेऊ शकतो. आणि हे काही फार अशक्य काम नाही. आपण तर लाखोंच्या संख्येने चेक डॅम्स बनवले आहेत. असे आहोत आपण. विचार करा, केवढी मोठी सेवा असेल ही. 15 ऑगस्ट 2023 च्या आधी हे काम पूर्ण करू. समाजाला प्रेरणा देणारे कामअसेल . मी तर म्हणतो की प्रत्येक 15 ऑगस्टला तलावाशेजारी झेंडा फडकवण्याचा कार्यक्रम सुद्धा गावातल्या ज्येष्ठ मंडळींना बोलवून केला गेला पाहिजे. आमच्यासारख्या नेत्यांना बोलवू नका. गावातील जेष्ठ मंडळींना बोलवून ध्वजवंदनाचा कार्यक्रम करावा.

आज भगवान रामचंद्रांचा जन्मदिवस आहे. आपण भगवान रामचंद्रांची स्मृती जागवतो तेव्हा आपल्याला शबरी सुद्धा आठवते, केवट आठवतो, निषादराज आठवतो. समाजातील अशा छोट्या-छोट्या मंडळींची नावे अशी स्मरतात की जणू भगवान राम म्हणजेच हे सर्वजण. याचा अर्थ हा की समाजातील मागास समुदायाला जे सांभाळतात ते भविष्यात लोकांच्या मनात आदराचे स्थान मिळवतात. माता उमियाच्या भक्तांनी मागास लोकांना आपले मानले पाहीजे. दुःखी, गरीब जो कोणी असेल, कोणत्याही समाजाचा असेल त्याला आपले मानले पाहिजे.  भगवान राम हे देव आणि पूर्ण पुरुषोत्तम म्हणून ओळखले जातात, त्याच्या मुळाशी ते समाजातील छोट्या छोट्या लोकांसाठी ज्याप्रकारे आणि जशाप्रकारे राहिले त्याचं महत्त्व कमी नाही. माता उमियाच्या भक्तांनी स्वतः पुढे जावे आणि कोणीही मागे राहू नये याचीही काळजी घ्यावी. तेव्हा कुठे आमच्या पुढे जाण्यास अर्थ लाभेल. नाहीतर जे मागे पडतात ते पुढे जाणाऱ्यानासुद्धा पाठी खेचतात. त्यावेळी पुढे जाण्यासाठी आपणास जास्त जोर लावावा लागेल. म्हणूनच पुढे जात असतानाच  मागे राहिलेल्यांना सुद्धा पुढे घेत रहाल तर आपण प्रगती करू.

 

माझी आपल्या सर्वांना सूचना आहे की हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, आज भगवान रामांचा प्रकट दिन आणि त्याचा उत्सव आणि इतक्या विशाल संख्येने लोक एकत्र आले आहेत, आपण ज्या वेगाने पुढे जाऊ इच्छिता... आता आपणच बघा करोनासारखं एवढं मोठं संकट आलं आणि ते संकट टळलं असं आपण मानता कामा नाही. कारण आताही ते कुठे कुठे दर्शन देऊन जाते.   हा आजार बहुरूपी आहे. त्याच्याशी टक्कर घेण्यासाठी जवळपास 185 कोटी मात्रा, जगातील लोक जेव्हा हे ऐकतात तेव्हा त्यांना आश्चर्य वाटते. हे कसे काय साध्य झाले, तर आपल्या सर्व समाजाने दिलेल्या सहकार्यामुळे. म्हणूनच आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर जागरुकता निर्माण कराल. आता स्वच्छतेची मोहीम हा आपला सहज स्वभाव का बनवू नये? प्लास्टिक वापरणार नाही हे आपल्या स्वभावाचा भाग का होऊ नये? एकदा वापरुन फेकायचे प्लास्टिक आपण वापरणार नाही. गाईची पूजा करतो, तिचे भक्त आहोत. या प्राण्याबाबत आपणास आदर आहे. पण ती जेव्हा प्लास्टिक खाते तेव्हा माता उमियाच्या भक्तांसाठी ही भूषणावह बाब नाही. अश्या सर्व गोष्टी ध्यानी घेऊन आपण पुढे जाऊ तर... आणि मला आनंद होत आहे की आपण सामाजिक कार्याशी जोडून घेतले आहे. पाटोत्सवासोबत पूजा, पाठ, श्रद्धा, आस्था, धार्मिक जे काही असेल ते होते पण त्याच्याही पुढे जात आपण समग्र सर्व तरुण पिढीला सोबत घेऊन रक्तदानासारखी कामे केली आहेत. माझ्या भरपूर शुभेच्छा. आपल्यामध्ये उपस्थित राहण्याची, भले दुरूनच का होईना आपल्यामध्ये येण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी मोठी आनंदाची गोष्ट आहे. आपणा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. माता उमियाला चरणवंदन. धन्यवाद.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world

Media Coverage

PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi