नमो बुद्धाय!
नमो गुरुभ्यो !
आदरणीय राष्ट्रपती महोदय,
इतर मान्यवर पाहुणे,
बंधू आणि भगिनींनो !
आपल्या सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिवस आणि आषाढ पौर्णिमेच्या अनेक शुभेच्छा ! आज आपण गुरु पौर्णिमा देखील साजरी करतो. आजच्याच दिवशी भगवान बुद्धांनी बुद्धप्राप्ती नंतर आपले पहिले ज्ञान जगाला दिले होते.
आपल्याकडे म्हटले जाते, जिथे ज्ञान आहे तिथेच पूर्णत्व आहे, आणि तीच पौर्णिमा आहे आणि जेव्हा उपदेश देणारे स्वतः बुद्ध असतील तर हे ज्ञान संसाराच्या कल्याणाचा पर्याय ठरेल, हे तर स्वाभाविकच आहे. त्याग आणि तितिक्षा यातून तप:पूंज झालेले गौतम बुद्ध जेव्हा बोलतात, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ते धम्मचक्र प्रवर्तन असते. यामुळेच, त्यावेळी त्यांनी केवळ पाच शिष्यांना उपदेश केला होता, मात्र आज संपूर्ण जग त्यांच्या शब्दांचे, ज्ञानाचे अनुयायी झाले आहेत. बुद्धाच्या विचारांवर आस्था ठेवणारे लोक आहेत.
मित्रांनो,
सारनाथ इथे भगवान बुद्धाने संपूर्ण जीवनाचे, संपूर्ण ज्ञानाचे सार आपल्याला सांगितले होते. त्यांनी दुःखाविषयी सांगितले होते, दुःखाचे कारण सांगितले होते. दुःखांवर विजय मिळवता येतो, असेही आश्वस्त केले आहे. आणि विजयाचा मार्गही सांगितला होता. भगवान बुद्धांनी आपल्याला जीवनातील अष्टांग सूत्रे, हे आठ मंत्र दिले. सम्मादिट्ठी, सम्मा-संकप्पो, सम्मावाचा, सम्मा-कम्मन्तो, सम्मा-आजीवो, सम्मा-वायामो, सम्मासति, आणि सम्मा-समाधी. म्हणजेच, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक उपजीविका, सम्यक प्रयत्न, सम्यक मन आणि सम्यक समाधी म्हणजेच मनाची एकाग्रता. मन, वाणी आणि संकल्पात, आपल्या कर्मात आणि प्रयत्नांत जर हे संतुलन असेल, तर आपण दुःखापासून बाहेर येत प्रगती आणि सुख मिळवू शकतो. हेच संतुलन आपल्याला आपल्या उत्तम काळात लोककल्याणाची प्रेरणा देते आणि कठीण, संकट काळात संयम, धीर धरण्याची ताकद देते.
मित्रांनो,
आज कोरोना महामारीच्या रूपाने, मानवतेसमोर तसेच संकट उभे ठाकले आहे. अशावेळी भगवान बुद्ध आपल्यासाठी अधिकच प्रासंगिक ठरतात. बुद्धाच्या मार्गावरुन चालतच आपण मोठ्यात मोठ्या आव्हानावर कशी मात करु शकतो, हे भारताने आज करुन दाखवले आहे. बुद्धाचेच सम्यक विचार मनात घेत आज जगातील इतर देशही एकमेकांची साथ देत आहेत, एकमेकांची ताकद बनत आहेत. या दिशेने 'आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट महासंघाने सुरु केलेला 'केअर विथ प्रेअर' हा उपक्रम खूपच प्रशंसनीय आहे.
मित्रांनो,
धम्मपद आपल्याला सांगते-
न ही वेरेन वेरानि,
सम्मन्तीध कुदाचनम्।
अवेरेन च सम्मन्ति,
एस धम्मो सनन्ततो॥
म्हणजेच, वैराने वैर शांत होत नाही. तर वैर अवैराने, मोठ्या मनाने, प्रेमाने शांत होऊ शकते. विशेषतः संकट काळात जगाने नेहमीच या प्रेमाच्या सौहार्दाच्या शक्तीचा अनुभव घेतला आहे. बुद्धाचे हे ज्ञान, मानवतेचा हा अनुभव जस जसा अधिक समृद्ध होत जाईल, तसतसे जग अधिक यश आणि समृद्धीच्या नव्या उंचीवर पोहोचेल.
याच सदिच्छेसह पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा ! आपण निरोगी रहा आणि मानवतेची सेवा करत रहा.
धन्यवाद.