केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी धर्मेंद्र जी, अन्नपूर्णा देवी जी,देशभरातून आलेला शिक्षक वर्ग, तुमच्या माध्यमातून एक प्रकारे देशातल्या सर्व शिक्षकांशी मी संवाद साधत आहे.
भारताचे माजी राष्ट्रपती आणि शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर राधाकृष्णन जी यांच्या जयंतीनिमित्त देश त्यांना आज आदरांजली अर्पण करत आहे आणि आपल्या विद्यमान राष्ट्रपतीही शिक्षिका आहेत, हे आपले भाग्य आहे. त्यांनी आयुष्यातल्या सुरूवातीच्या काळात शिक्षिका म्हणून काम केले आणि तेही ओदिशाच्या दुर्गम भागात. अशा शिक्षिका राष्ट्रपतींच्या हस्ते झालेला सन्मान ही आपणासाठी अभिमानाची बाब आहे आणि आमच्यासाठी सुखद योगायोग आहे.
आज देश स्वातंत्र्याच्या अमृतकाळासाठीची आपली भव्य स्वप्ने साकार करण्यासाठी झटत आहे तेव्हा शिक्षण क्षेत्रात राधाकृष्णन जी यांचे प्रयत्न आपल्या सर्वांना प्रेरित करतात. या प्रसंगी मी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आपणा सर्व शिक्षकांना,राज्यांमध्येही अशा प्रकारचे पुरस्कार प्राप्त करणा-या सर्वांचे मी अभिनंदन करतो.
मित्रहो,
शिक्षकांशी संवाद साधण्याची मला आत्ताच संधी मिळाली.सर्वांची भाषा वेगवेगळी आहे, विविध प्रयोग करणारे हे लोक आहेत. भाषा वेगवेगळी असेल, प्रदेश वेगवेगळे असतील, समस्या वेगवेगळ्या असतील मात्र आपण सर्वांमध्ये एक समानता आहे ती म्हणजे आपले कार्य, विद्यार्थ्यांविषयी आपले समर्पण, आपणा सर्वांमधली ही समानता फार मोठी बाब आहे. तुम्ही पाहिलं असेल जे यशस्वी शिक्षक असतात , तेमुलांना हे तू करू शकत नाहीस, हे तुला जमणार नाही असे कधीच म्हणत नाहीत. शिक्षकाचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे ते म्हणजे सकारात्मकता. एखादा विद्यार्थी लेखन-वाचन अशा सर्व गोष्टींमध्ये आघाडीवर असेल तरीही.... अरे अमुक गोष्ट कर, तू करू शकशील, बघ तर त्याने केले आहे, तुलाही करता येईल हा विश्वास शिक्षक त्या विद्यार्थ्याला देतात. शिक्षकांचा हा गुण आहे. शिक्षक नेहमी सकारात्मक बोलतील,नकारात्मक बोलून कोणाला निराश करणे, हताश करणे हे त्यांच्या स्वभावातच नसते. व्यक्तीला मार्गदर्शन करणे ही शिक्षकाची भूमिका असते. शिक्षक,विद्यार्थ्यांना स्वप्ने पाहायला शिकवतात,प्रत्येक मुलामध्ये स्वप्ने पाहण्याची वृत्ती जागृत करून त्या स्वप्नांचे संकल्पात रुपांतर करायला शिक्षक शिकवतात.हे स्वप्न पूर्ण होऊ शकते, एकदा तू संकल्प कर आणि कामाला लाग.त्याप्रमाणे तो विद्यार्थी आपल्या स्वप्नाला संकल्पाचे रूप देऊन शिक्षकांनी दाखवलेल्या मार्गावरून वाटचाल करत ते पूर्णत्वाला नेतो हे आपण पाहिले असेल. म्हणजेच स्वप्नापासून ते स्वप्न साध्य करण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास हा त्या प्रकाशमार्गाने होतो,जो स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांनी दाखवलेला असतो, जे स्वप्न शिक्षकांनी त्याला पाहायला शिकवले होते आणि त्यासाठी दीप उजळला होता. कितीही आव्हाने आली आणि कितीही अंधार दाटून आला तरी त्यातूनही हा दीप, त्या विद्यार्थ्याला मार्ग दाखवत राहतो.
आज देश नवी स्वप्ने, नवे संकल्प घेऊन एका नव्या वळणावर आला आहे,आज जी पिढी विद्यार्थी दशेत आहे त्यांच्यावरच 2047 मध्ये हिंदुस्तान कसा असेल हे अवलंबून आहे आणि त्यांचे भविष्य आपल्या हाती आहे. याचाच अर्थ 2047 मधला भारत साकारण्याचे काम सध्या जो शिक्षक वर्ग आहे, जो 10 वर्षे, 20 वर्षे सेवा देणार आहे, त्यांच्या हाती आहे, 2047 चे भविष्य त्यांच्या हाती घडणार आहे.
म्हणूनच आपण एका शाळेत नोकरी करता, आपण एका वर्गाला मुलांना शिकवता, आपण एक अभ्यासक्रम घेता इतकाच मर्यादित अर्थ नाही. तर आपण समरस होऊन, विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्याचे आणि त्या जीवनाच्या माध्यमातून देश घडवण्याचे स्वप्न आपण बाळगता.
ज्या शिक्षकांचे स्वतःचे स्वप्न छोटे असते,10 ते 5 ही वेळ,आज चार तासिका घ्यायच्या आहेत हेच त्याच्या मनात घोळत असते. त्यासाठी तो वेतन घेत असला, एक तारखेची तो वाट बघत असला तरी त्याला त्यातून आनंद मिळत नाही, त्याला हे सर्व ओझे वाटते. मात्र विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी तो समरस झाल्यानंतर त्याला कोणत्या गोष्टीचे ओझे वाटत नाही. माझ्या या कामाने मी देशासाठी किती मोठे योगदान देईन हा विचार त्याच्या मनात असतो. खेळाच्या मैदानात मी खेळाडू घडवला आणि कोणत्या ना कोणत्या स्पर्धेत जगात कोठेही तिरंगा ध्वजासमोर तो उभा राहील हे स्वप्न जोपासले तर आपण कल्पना करू शकता की त्या शिक्षकाला त्याच्या कामात किती आनंद प्राप्त होईल. अहोरात्र काम करण्याचा किती आनंद होईल.
म्हणूनच शिक्षकाच्या मनात केवळ वर्ग,आपल्या तासिका,चार, पाच तासिका घ्यायच्या आहेत, एक शिक्षक आला नाही त्याच्या जागी मला जायचे आहे , या सर्व ओझ्यातून मुक्त होऊन, मी आपल्या अडचणी जाणतो म्हणूनच सांगतो...या ओझ्यातून मोकळे होत आपण जर या मुलांसमवेत, त्यांच्या आयुष्याशी समरस झालात.
![](https://cdn.narendramodi.in/cmsuploads/0.09774200_1662399988_684-text-of-pm-s-interaction-with-winners-of-national-awards-to-teachers-2022.jpg)
दुसरे म्हणजे आपल्याला मुलांना शिक्षण तर द्यायचे आहेच, ज्ञान द्यायचे आहेच मात्र आपल्याला त्यांचे आयुष्यही घडवायचे आहे. बंदिस्त राहून,विलग राहून जीवन घडत नाही.वर्गात एक, शाळेच्या परिसरात दुसरे, घरच्या वातावरणात आणखी वेगळे पाहिले तर मुले विरोधाभास आणि द्विधा मनस्थितीत अडकतात.त्यांना वाटते आई तर असे सांगत होती आणि गुरुजी तर असे सांगत होते आणि वर्गातली मुले तर असे बोलत होती. त्या विद्यार्थ्याला द्विधा अवस्थेतून बाहेर काढणे हे आपले काम आहे. त्यासाठी काही इंजेक्शन नसते, की चला हे इंजेक्शन घेतले की द्विधा अवस्था समाप्त. लस दिली कि द्विधा मनस्थितीतून बाहेर, असे तर नाही. म्हणूनच शिक्षकांसाठी आवश्यक आहे की त्याचा दृष्टीकोन एकीकृत असावा.
किती शिक्षक असतील, ज्यांचा विद्यार्थ्यांच्या कुटुंबांशी परिचय आहे, कधीतरी कुटुंबातल्या लोकांना भेटले आहेत, कधी त्यांना विचारलं आज की घरी येऊन मुलगा/मुलगी काय करतो? कसा करतो? आपल्याला काय वाटते? आणि कधी हे सांगितलं आहे का की माझ्या वर्गात तुमचा मुलगा शिकतो, याच्यात ही ताकद खूप चांगली आहे. तुम्ही घरातही जरा लक्ष द्या. अमुक कौशल्याच्या बळावर कुठच्या कुठे प्रगती करेल तो.मी तर आहेच, शिक्षक या नात्यानं मी काहीच कमी करणार नाही, पण तुम्हीही थोडी मदत करा.
असं करत असाल, तर त्या घरातल्या लोकांच्या मनात तुम्ही एका स्वप्नाचं बीज पेरलेलं असतं आणि मग तेही तुमच्या प्रवासात सहप्रवासी होऊन जातात. मग घरात देखील आपोआपच शाळेचे संस्कार दिले जातात. ज्या स्वप्नांची बीजे आपण शाळेच्या वर्गात पेरता, तीच स्वप्ने त्याच्या घरात मूळ धरून फुलायला लागतात, बहरायला लागतात. आणि म्हणूनच, आमचा प्रयत्न हा प्रयत्न आहे. आणि आपण पाहिले असेल एखादा विद्यार्थी आपल्याला फार त्रास देणारा आहे, असं दिसतं. मग हा असाच आहे, माझ्या वेळेची खोटी करतो, वर्गात गेल्यावर पहिली नजर त्याच्याकडे जाते आणि मग आपलं अर्ध डोकं तिथेच तापलेलं असतं. हो ना, मी तुमच्या मनातलं ओळखूनच बोलतो आहे. आणि असा नाठाळ विद्यार्थी पहिल्या बाकावरच बसतो, त्यालाही वाटत असतं या शिक्षकांना मी आवडत नाही त्यामुळे आधी तो समोर येतो. आणि यातच तुमचा अर्धा अधिक वेळ खर्च होतो.
अशावेळी त्या बाकी मुलांवर अन्याय होऊ शकतो, कारण काय, तर माझी आवड निवड. यशस्वी शिक्षक तो असतो, ज्याची आपल्या विद्यार्थ्याविषयी काही आवड-निवड, आपपर भाव नसतो. विद्यार्थ्याविषयी पसंती- नापसंती अशी काहीही भावना नसते. त्यांच्यासाठी सर्वजण समान असतात. मी असेही शिक्षक पाहिले आहे, ज्यांची स्वतःची मुलेही त्यांच्या वर्गात असतात. मात्र ते शिक्षक वर्गात आपल्या मुलांना इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच समान वागणूक देतात.
जर चार विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचे असतील तर त्यांच्या मुलाची पाळी आली तर त्यालाच फक्त विचारतात, असे कधीच करीत नाहीत . काही विशेष वागणूक देत आपल्या मुलाला सांगत नाहीत, की तू हे सांग, तू हे कर. कधीच नाही. कारण त्यांना माहीत असतं की आपल्या मुलाला एका चांगल्या आईची गरज आहे, चांगल्या पित्याची गरज आहे, मात्र त्यासोबतच चांगल्या शिक्षकाचीही गरज आहे. त्यामुळे ते ही तसा प्रयत्न करतात, घरी मी आई-वडलांची भूमिका पूर्ण करेन, मात्र वर्गात तर माझं त्याच्याशी नातं शिक्षक-विद्यार्थी असेच असले पाहिजे. तिथे घरातलं नातं मध्ये येता कामा नये. मात्र यासाठी शिक्षकाला मोठा त्याग करावा लागतो, तेव्हाच हे शक्य होते. आपल्या स्वतःला सांभाळून या प्रकारची कामे करणे, ते तेव्हाच शक्य होते. आणि म्हणूनच आमची जी शिक्षण व्यवस्था आहे, भारताची जी परंपरा राहिली आहे, ती केवळ पुस्तकी ज्ञानापर्यंत मर्यादित नाही. आणि ती कधीही नव्हती.
ही परंपरा आपल्यासाठी एक प्रकारचा आधार आहे. आपण खूप साऱ्या गोष्टी.. आणि आज तंत्रज्ञानामुळे हे सगळं शक्य झालं आहे. मी हे ही बघतो आहे की तंत्रज्ञानामुळे अनेक चांगल्या गोष्टी घडल्या. खूप मोठ्या संख्येनं आमच्या ग्रामीण भागातले शिक्षक भलेही त्यांना स्वतःला तंत्रज्ञानाचं शिक्षण घेता आलं नाही. मात्र एकेक करत ते स्वतः शिकत गेले. आणि त्यांनी देखील विचार केला की आपण हे शिकावे. कारण त्यांच्या मनात सतत विद्यार्थ्यांचा विचार असतो. अभ्यासक्रमाचा विचार असतो. त्यामुळे ते वेगवेगळ्या गोष्टी काही साहित्य तयार करतात, जे त्या विद्यार्थ्यांच्या कामी येतात.
इथे सरकारमध्ये बसलेल्या लोकांच्या मनात काय असतं, तर आकडे असतात, की किती शिक्षकांची भरती करायची बाकी आहे? किती विद्यार्थी शाळेतून गळती झालेत? मुलींची नोंदणी झाली की नाही? सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या डोक्यात एवढंच असतं. मात्र शिक्षकांच्या डोक्यात विद्यार्थ्यांचे संपूर्ण आयुष्य असते. हा खूप मोठा फरक आहे. आणि म्हणूनच, शिक्षकाने ह्या सगळ्या जबाबदाऱ्या उत्तम पद्धतीने निभावणं खूप आवश्यक आहे.
![](https://cdn.narendramodi.in/cmsuploads/0.73151900_1662400007_1-684-text-of-pm-s-interaction-with-winners-of-national-awards-to-teachers-2022.jpg)
आता आपले जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आले आहे, त्याचे खूप कौतुक केले जात आहे. सगळे लोक त्याला नावाजत आहेत. आता हे कौतुक का होत असेल? त्यात काही त्रुटी नसतील, असा दावा तर मी करु शकत नाही. पण लोकांच्या मनात ज्या शंका होत्या, काही खंत होती, त्यांना वाटलं की या धोरणातून काहीतरी मार्ग दिसतो आहे, योग्य दिशेने जात आहे. चला आपणही ह्या मार्गाने जाऊया. आपल्या डोक्यात जुन्या सवयी इतक्या घट्ट बसल्या आहेत, की हे नवीन शैक्षणिक धोरण एकदा वाचून-ऐकून काही होणार नाही. महात्मा गांधींना एकदा कोणीतरी विचारलं होतं, की जर तुमच्या मनात काही शंका असतील, संशय किंवा समस्या असतील तर तुम्ही अशावेळी काय करता? तर त्यावर ते म्हणाले होते, भगवद्गीतेतून मला खूप काही मिळते. याचआ अर्थ, तर ते वारंवार गीता वाचत असत, वारंवार तिचे वेगवेगळे अर्थ जाणून घेत असत. प्रत्येक वेळी त्यांना त्यातून नवी शिकवण मिळत असे. दरवेळी नवा प्रकाशाचा पूंज त्यांच्यासमोर उभा राहत असे. हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण देखील असेच आहे. शिक्षण क्षेत्रातील लोकांना जोपर्यंत त्यांच्या समस्यांवर, प्रश्नांवर उत्तर सापडत नाही, तोपर्यंत त्यांनी हे वाचत राहावे, 10 वेळा वाचा, 15 वेळा वाचा, त्यात काही उत्तर आहे का? तेव्हा त्यातले वेगवेगळे पैलू आपल्याला आढळतील. एकदा आले आहे, तर जशी इतर परिपत्रके येतात आणि आपण ती एकदा बघतो, तसेच याकडे बघून चालणार नाही?, आपल्याला हे धोरण आपल्या नसानसात भिनवावे लागेल. आपल्या मन-बुद्धीत उतरवावे लागेल. जर आपण हा प्रयत्न केला तर मला पूर्ण विश्वास आहे की जशी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण बनवण्यात आपल्या देशातल्या शिक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे, लाखो शिक्षकांनी याची रचना करतांना आपले मोठे योगदान दिले आहे. पहिल्यांदा देशात इतके मोठे मंथन झाले. आता ज्या शिक्षकांनी हे धोरण तयार केले आहे, त्यांच्यावर आणखी एक जबाबदारी आहे. सरकारी भाषा मुलांसाठी काही कामाची नाही. त्यामुळे हे सरकारी दस्तऐवज मुलांच्या आयुष्याचा आधार कसा बनू शकेल, याचे माध्यम तुम्हाला बनावे लागणार आहे. आपल्याला हा सरकारी धोरणाचा दस्तऐवज सोप्या भाषेत भाषांतरित करायचा आहे, त्यातले बारकावे, त्यातले अर्थ उलगडून सांगत सरळ सोप्या भाषेत तो मुलांसमोर मांडायचा आहे.
आणि मला असे वाटते की जसे काही नाट्यप्रयोग असतात, काही निबंध लेखन असतं, काही व्यक्तिमत्व स्पर्धा असतात त्यावेळी मुलांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर चर्चा करायला हव्यात. कारण शिक्षक जेव्हा त्यांना त्यासाठी बोलायला तयार करतील, जेव्हा ते बोलतील तेव्हा त्यांच्या बोलण्यातून काही नवे पैलू समोर येऊ शकतील. तर हा एक प्रयत्न करायला हवा.
आपल्याला माहीत असेल की आता 15 ऑगस्टला देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झालीत, त्यावेळी ते भाषण देताना माझ्या मनातही काही वेगळ्याच भावना होत्या. त्यामुळे त्या भाषणात मी जे काही बोललो, ते 2047 हे वर्ष मनात ठेवून बोललो. आणि मी त्यात काही आग्रह धरले, पंच-प्रणाविषयी बोललो. ते पंच-प्रण, त्या संकल्पाची आपण वर्गात चर्चा करु शकतो का? जेव्हा शाळेची सभा भरते, त्यावेळी आज कोणी विद्यार्थी, कोणी शिक्षक पहिल्या संकल्पाविषयी बोलतील, मंगळवारी दुसऱ्या प्रतिज्ञेविषयी, बुधवारी तिसऱ्या प्रतिज्ञेविषयी, गुरुवारी चौथ्या प्रतिज्ञेविषयी, शुक्रवारी पाचव्या आणि मग पुढच्या आठवड्यात पुन्हा वेगळे शिक्षक, वेगळे विद्यार्थी... म्हणजे वर्षभर हा उपक्रम सुरू ठेवला, तर आपल्याला काय करायचं आहे, से संकल्प नेमके काय आहेत? ते मुलांना समजेल. आपल्या सर्वांची सर्व नागरिकांची ती कर्तव्ये आहेत.
अशाप्रकारे आपण करू शकलो तर मला असं वाटतं त्याची प्रशंसाच होत आहे, सर्वजण म्हणतात हे पाच निश्चय असे आहेत की आम्हाला पुढील मार्ग दाखवतात. तर तर हे पाच निश्चय मुलांपर्यंत कसे पोहोचणार त्यांच्या जीवनात हे कसे आणायचे त्यांना त्यांच्याशी जोडण्याचे काम कसे करायचे
दुसरे म्हणजे म्हणजे हिंदुस्थानात आता कोणत्याही शाळेत असे मूल असता कामा नये ज्याच्या डोक्यात 2047 चे स्वप्न नसेल. त्याला विचारायला हवे की, सांग 2047 मध्ये तुझे वय काय असेल , हे त्याला विचारायला हवं. कर गणित, तुझ्यापाशी एवढी वर्षे आहेत तूच सांग एवढ्या वर्षांमध्ये तू तुझ्यासाठी काय करणार आणि देशासाठी काय करणार? 2047 येईपर्यंत तुझ्याकडे किती वर्षे आहेत, किती महिने आहेत, किती दिवस आहेत, किती तास आहेत याचे गणित काढ. एक एक तास मोजून सांग की तू काय करशील? याचा एक कॅनव्हास तयार होईल की हो, आज माझा एक तास गेला, 2047 तर जवळ आले, आज दोन तास गेले माझे 2047 जवळ आले. मला 2047 मध्ये असे जायचे आहे, तसे करायचे आहे.
अश्या भावना जर मुलाच्या मनोमंदिरात आपण भरल्या तर मुले एका नवीन उर्जेने भारुन, नवीन उत्साहाने याच्या मागे लागतील. आणि जगात त्यांचीच प्रगती होते जे मोठी स्वप्ने बघतात, मोठे संकल्प करतात आणि दूरचा विचार करून जीवन कारणी लावण्यासाठी तयार राहतात.
हिंदुस्तानात 1947 च्या आधी एक प्रकारे 1930 ची दांडी यात्रा आणि 1942 चे भारत छोडो आंदोलन, ही जी बारा वर्षे....आपण बघा संपूर्ण हिंदूस्तान जागा झाला होता, स्वातंत्र्य याशिवाय कोणता मंत्र नव्ह्ता. जीवनातील प्रत्येक कामात स्वातंत्र्य अशी एक ओढ लागली होती. अशीच ओढ असणारी भावना सुराज्य, राष्ट्राचा गौरव, माझा देश याबाबतीत उत्पन्न करायची हीच वेळ आहे.
आणि माझा जास्त विश्वास आहे तो माझ्या शिक्षक बांधवांवर, शिक्षण क्षेत्रावर. आपण जर या प्रयत्नांशी जोडले जाल तर आपण ही स्वप्ने केव्हाच प्रत्यक्षात आणू असा माझा विश्वास आहे. आणि आता गावा गावातून आवाज निनादेल, आता देशाला थांबायची इच्छा नाही. आता बघा दोन दिवसांपूर्वीच 250 वर्षे जे आपल्यावर राज्य करुन गेले, 250 वर्षे.... त्यांना मागे टाकत आपण जगाच्या अर्थव्यवस्थेत पुढे गेलो. सहाव्या क्रमांकावरून पाचव्यावर येण्यात जो आनंद असतो त्याहून आनंद .झाला. सहाव्यावरून पाचव्यावर आलो की होतोच आनंद पण हा 5 विशेष आहे. कारण आपण त्यांना पाठी टाकलं आहे. आपल्या डोक्यात तोच विचार आहे , तिरंग्याचा, 15 ऑगस्टचा
15 ऑगस्टचे जे तिरंग्यासाठीचे आंदोलन होते, त्या संदर्भात बघता हा पाचवा नंबर आला आहे आणि मनात हा दृढ अभिमान जागा झाला आहे की, बघा माझा तिरंगा अजून फडकतो आहे. हा अभिमान अतिशय आवश्यक आहे आणि म्हणूनच 1930 ते 1942 या वर्षांमध्ये देशाचा जो पवित्रा होता, देशासाठी जगण्याचा, देशासाठी झुंज घेण्याचा आणि गरज पडली तर देशासाठी मरण पत्करण्याचा. अश्या भावना आज असणे आवश्यक आहे.
माझ्या देशाला मी मागे राहू देणार नाही. हजारो वर्षांच्या गुलामीतून बाहेर पडलो आहोत. आता संधी वाट पहाते आहे, आपण थांबणार नाही तर मार्गक्रमणा करणार. या भावनेचा प्रसार करण्याचे काम आमच्या सर्व शिक्षकवृंदाकडून झाले तर ताकद खूप वाढेल, अनेक पटीने वाढेल .
मी पुन्हा एकदा,.. तुम्ही एवढे काम करून बक्षीस मिळवले आहे, पण बक्षीस मिळवले आहे म्हणून मी तुम्हाला जास्त काम देत आहे. जो काम करतो, त्यालाच काम देण्याचे मनात येते जो करत नाही त्याला कोण देणार. आणि शिक्षकांवर माझा विश्वास आहे की जी जबाबदारी घेतो ती पूर्ण करतो. म्हणूनच मी आपणा सर्वांना सांगतो, माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा
खूप खूप शुभेच्छा!