केंद्रीय मंत्री परिषदेचे माझे सहकारी हरदीपसिंह पुरी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री भाई शिवराज, राज्य मंत्रिमंडळातील इतर सदस्य, प्रशासनाशी निगडित लोक, पंतप्रधान स्वनिधी योजनेचे सर्व लाभार्थी आणि या कार्यक्रमात सहभागी झालेले मध्य प्रदेश व मध्य प्रदेश बाहेरील माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो.
सर्वात आधी, मी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. थोड्यावेळापूर्वी मला काही सहकाऱ्यांशी बोलण्याची संधी मिळाली. त्यांच्या बोलण्यात एक प्रकारचा विश्वास पण आहे आणि एकप्रकारची आशा देखील जाणवते. हा विश्वास म्हणजे माझ्या मते पंतप्रधान स्वनिधी योजनेचे सर्वात मोठे यश आहे, सर्वात मोठे सामर्थ्य आहे. तुमच्या श्रमाचे सामर्थ्य, तुमचा स्वाभिमान आणि तुमच्या आत्मविश्वासाला मी आदरपूर्वक प्रणाम करतो.
पंतप्रधान स्वनिधी योजनेद्वारे देशभरातील जे सहकारी पुढे मार्गक्रमण करीत आहेत त्यांना सुद्धा मी शुभेच्छा देतो. विशेषत: मध्य प्रदेश आणि शिवराज जी यांच्या टीमचे मी अभिनंदन करतो, त्यांच्या प्रयत्नांमुळे केवळ 2 महिन्यांच्या कालावधीत मध्य प्रदेशातील 1 लाखाहून अधिक पथ विक्रेत्यांना – फेरीवाल्यांना स्वनिधी योजनेचा लाभ मिळाला आहे.
कोरोना असूनही, अल्पावधीत साडेचार लाख फेरीवाल्यांना ओळखपत्रे, विक्रेत्यांचे प्रमाणपत्र देणे ही माझ्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट आहे. मध्य प्रदेशच्या या प्रयत्नातून इतर राज्येही नक्कीच प्रेरणा घेऊन प्रोत्साहित झाली असतील आणि आमच्या हिंदुस्थानमधील प्रत्येक शहरामध्ये आमचे जे फेरीवाले बंधू-भगिनी आहेत त्यांना बँकेकडून पैसे मिळविण्यासाठी आपण सक्रिय प्रयत्न कराल याची मला खात्री आहे.
मित्रांनो, जगात जेव्हा जेव्हा असे मोठे संकट किंवा महामारी येते तेव्हा त्याचा सर्वात आधी आणि सर्वात जास्त परिणाम हा आपल्या गरीब बंधू-भगिनींवर होतो. जास्त पाऊस पडला तरी गरीबांनाच त्रास, कडाक्याची थंडी पडली तरी गरीबांना त्रास होतो आणि कडक उन्हाळ्याचा देखील गरिबांनाच त्रास होतो. गरिबांना रोजगाराची समस्या असते, खाण्यापिण्याची समस्या असते, त्यांच्याकडचे साठविलेले पैसे देखील संपतात. महामारी, ही सर्व संकटे स्वतःबरोबर घेऊन येते. आमची जी गरीब भावंडे आहेत, जे मजूर सहकारी आहेत, जे फेरीवाले आहेत या सर्वानीच महामारीची झळ सर्वाधिक अनुभवली आहे.
असे बरेच साथीदार आहेत ज्यांनी दुसऱ्या शहरात काम केले, परंतु महामारीच्या काळात त्यांना त्यांच्या गावी परत जावे लागले आणि म्हणूनच, कोरोना जागतिक महामारीच्या काळात पहिल्या दिवसापासून, गरिबांच्या समस्या शक्य तितक्या कमी करण्यासाठी सक्रियपणे कार्य करण्याचा सरकारचा, देशाचा प्रयत्न सुरु आहे. या काळात देशाने अशा संकटग्रस्त लोकांच्या भोजनाची, रेशनची, मोफत गॅस सिलिंडर देण्याची काळजी घेतली.
पंतप्रधान गरीब कल्याण रोजगार अभियानामार्फत लाखो लोकांना या काळात रोजगार देखील देण्यात आला. गरिबांसाठी सातत्याने होणाऱ्या या कामांच्या दरम्यान एक मोठा वर्ग होता ज्यावर विशेष लक्ष देण्याची गरज होती. हे होते माझे रस्त्यावरील, पदपथावरील, हातगाडीवरील भावंडे. अशा फेरीवाले, हातगाडीवाले आमचे जे लाखो सहकारी आहेत त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह दैनंदिन कष्ट करूनच होतो. कोरोनामुळे बाजार बंद झाले होते, लोक आपला जीव वाचविण्यासाठी त्यांच्या घरात अधिक राहू लागले, त्याचा सर्वाधिक परिणाम या पथ विक्रेत्यांच्या, फेरीवाल्यांच्या कारभारावर झाला. त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठीच पंतप्रधान स्वनिधी योजना सुरू करण्यात आली आहे.
हे लोक नवी सुरुवात करू शकतील, स्वतःचे काम पुन्हा चालू करू शकतील यासाठी त्यांना सहजगत्या भांडवल उपलब्ध करून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे जेणेकरून त्यांना जास्त व्याजाने बाहेरून निधी उभारण्यास भाग पाडले जाणार नाही. पथविक्रेते, फेरीवाले यांच्या लाखोंच्या समुदायाला प्रणालीशी जोडण्याची, त्यांना ओळख देण्याची ही पहिलीच वेळ आहे. स्वनिधीतून स्वयंरोजगार, स्वयंरोजगारामधून स्वावलंबन आणि स्वावलंबनातून स्वाभिमान या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे स्वनिधी योजना.
मित्रांनो तुम्हाला स्वनिधी योजनेविषयी माहिती दिली गेली आहे. ज्या सहकाऱ्यांशी मी नुकताच संवाद साधला त्यांना याची माहिती आहे. परंतु हे अत्यंत महत्वाचे आहे की प्रत्येक गरजू, प्रत्येक पथ विक्रेता, फेरीवाला याला या योजनेबद्दलच्या सर्व उपयुक्त गोष्टी योग्यरीत्या समजल्या पाहिजेत. तरच आमचे गरीब बंधू-भगिनी त्याचा फायदा घेण्यास सक्षम असतील.
ही योजना इतकी सोपी केली गेली आहे की सामान्य लोकदेखील त्याच्याशी जोडले जाऊ शकतात. जसे कि आमच्या भगिनी अर्चना जी सांगत होत्या की त्यांचे काम खूपच सहजरित्या झाले, त्यांना कोणतीही अडचण आली नाही. यात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अशी व्यवस्था केली गेली आहे की रस्त्यांवरील विक्रेत्यांना आणि हातगाडीवाल्याना कागदपत्रे सादर करण्यासाठी लांब रांगा लावण्याची गरज भासणार नाही. आपण कॉमन सर्व्हिस सेंटर, नगरपालिका कार्यालयात, बँक शाखेत जाऊन आपला अर्ज अपलोड करू शकता. इतकेच नाही तर बँकेचा व्यवसाय संवाददाता आणि पालिकेचे कर्मचारीदेखील आपल्याकडे येऊन आपल्याकडून अर्ज घेऊ शकतात. जी सुविधा तुम्हाला योग्य वाटते त्याचा तुम्ही अवलंब करा. संपूर्ण यंत्रणा सहज सुलभ बनविण्याचा प्रयत्न केलेला आहे.
मित्रांनो, ही एक अशी योजना आहे ज्यात तुम्हाला व्याजातून पूर्णपणे मुक्ती मिळू शकते. तसेही या योजनेअंतर्गत व्याजात 7 टक्के व्याज सूट देण्यात येत आहे. परंतु जर आपण काही छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर आपल्याला ते देखील देण्याची गरज नाही. आता जर तुम्ही बँकेतून घेतलेले पैसे एका वर्षाच्या आत परत केले तर तुम्हाला व्याजात सूट मिळेल. इतकेच नव्हे तर जेव्हा तुम्ही डिजिटल व्यवहार करता तेव्हा तुमच्या मोबाईल फोनवरून पैशांची देवाण घेवाण करा, घाऊक व्यापा-यालादेखील मोबाईलवरून द्या आणि जे तुमच्याकडून खरेदी करण्यासाठी येतील त्यांच्याकडून मोबाईलवरच पैसे स्वीकार करा; असे केल्यास सरकारकडून बक्षीस म्हणून तुमच्या खात्यात काही पैसे कॅशबॅक म्हणून पाठविले जातील. म्हणजेच सरकार आपल्या खात्यात काही पैसे स्वतंत्रपणे जमा करेल. अशा प्रकारे आपली एकूण बचत व्याजापेक्षा जास्त असेल.
याशिवाय दुसऱ्यांदा कर्ज घेतल्यास तुम्हाला अधिक कर्जाची सुविधा मिळेल. या वेळी जर तुम्हाला 10 हजार रुपये कर्ज मिळाले असेल आणि तुम्ही चांगले काम केले असेल व तुम्हाला 15 हजारांची गरज असेल तर 15 हजार मिळू शकतात, पुन्हा चांगले काम केल्यास 20 हजार होऊ शकतात, कदाचित 25 हजार, 30 हजार सुद्धा मिळू शकतात. आणि आत्ता सुरुवातीला आमचे छगनलाल जी सांगत होते की त्यांना दहा पट करायचे आहे, एक लाखपर्यंत पोहोचायचे आहे. जेव्हा मी हे ऐकतो तेव्हा खूप आनंद होतो.
मित्रांनो, गेल्या 3-4 वर्षात देशात डिजिटल व्यवहारांचा कल वेगाने वाढत आहे. हे किती महत्वाचे आहे याचा अनुभव आपण कोरोना काळात घेत आहोत. आता ग्राहक रोख पैसे देण्याचे टाळतात. सरळ मोबाइलवरून देयक चुकते करतात. म्हणूनच, आमचे पथ विक्रेते या डिजिटल दुकानदारीमध्ये अजिबात मागे पडता कामा नयेत आणि आपण हे करू शकता. आमच्या कुशवाहाजींच्या हातगाडीवर आम्ही पाहिले कि त्यांना क्यूआर कोड देण्यात आला आहे. आता मोठ्या मॉल्समध्येही असे होत नाही. आपला गरीब माणूस सर्व काही नवीन शिकण्यास तयार आहे आणि यासाठी, बँक आणि डिजिटल देयक सुविधा देणाऱ्यांच्या साथीने एक नवीन सुरुवात केली गेली आहे. आता बँका आणि संस्थांचे प्रतिनिधी आपल्या पत्त्यावर येतील, आपल्या पदपथावर, हातगाडीवर येतील आणि क्यूआर कोड देतील. ते कसे वापरावे हे देखील ते आपल्याला सांगतील. मी माझ्या पथ विक्रेत्यांना आवाहन करतो की त्यांनी अधिकाधिक व्यवहारांचे डिजिटलायझेशन करावे आणि संपूर्ण जगासमोर एक नवीन उदाहरण ठेवावे.
मित्रांनो, तंत्रज्ञानाच्या मदतीने आमचे जे खायचे पदार्थ विकणारे व्यावसायिक आहेत, ज्यांना आपण रस्त्यावरील खाद्य विक्रेते म्हणूनही ओळखतो त्यांना ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याची देखील योजना तयार करण्यात आली आहे. म्हणजेच, मोठ्या रेस्टॉरंट्सप्रमाणेच, पथ विक्रेते देखील आपल्या ग्राहकांना ऑनलाइन खाद्य पुरवठा करू शकतात, अशा प्रकारची सोय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि जर आपण काही दिवसात पुढे आलात तर आम्ही या योजनेचा आणखी विस्तार करू शकू. मला खात्री आहे की अशा प्रयत्नांमुळे पथ विक्रेते, हातगाडीवाले, फेरीवाल्यांचे काम आणखी वाढेल, त्यांची कमाई आणखी वाढेल.
मित्रांनो, फेरीवाल्यांशी निगडित आणखी एका योजनेवर शीघ्रतेने काम सुरु आहे. पंतप्रधान स्वनिधी योजनेशी संबंधित असलेल्या सर्व पथ विक्रेते, फेरीवाल्यांचे आयुष्य सुलभ होईल, त्यांना मूलभूत सुविधा मिळतील, याचीही खात्री केली जाईल. म्हणजेच या पथ विक्रेते किंवा फेरीवाल्यांकडे, उज्ज्वला गॅस जोडणी आहे की नाही, त्यांच्याकडे विजेची जोडणी आहे की नाही, आयुष्मान भारत योजनेशी ते जोडलेले आहेत की नाही, त्यांना दररोज 90 पैसे आणि महिन्याला एक रुपया विमा योजनेचा लाभ मिळतो की नाही, त्यांच्याकडे स्वतःचे पक्के घर आहे कि नाही या सर्व गोष्टींवर लक्ष दिले जाईल आणि जिथे काही उणीव भासेल तिथे ती भरून काढण्यासाठी सरकार सक्रीय प्रयत्न करेल. ज्यांच्याकडे हे सर्व नाही, त्यांचे काम प्राधान्याने केले जाईल.
मित्रांनो, आपल्या देशात गरीबांबद्दल बर्याच चर्चा झाल्या आहेत, परंतु गरिबांसाठी गेल्या 6 वर्षात जेव्हढे काम झाले आहे आणि संपूर्ण नियोजन करून करण्यात आले आहे, एकातून दुसरी गोष्ट, दुसऱ्याशी निगडित तिसरी गोष्ट,प्रत्येक गोष्टीची भरपाई झाली पाहिजे आणि गरिबीशी लढा देण्याचे सामर्थ्य त्याला प्राप्त झाले पाहिजे आणि दारिद्र्यापासून स्वतःच स्वत: ला पराभूत करून दारिद्र्यातून बाहेर पडणे, या दिशेने एकापुढे एक पावले उचलली आहेत, अनेक नवीन पुढाकार घेतलेले आहेत आणि यापूर्वी हे कधीही घडलेले नव्हते. प्रत्येक ठिकाण, प्रत्येक क्षेत्र जिथे गरीब-पीडित-शोषित-वंचित-दलित-आदिवासी दुर्लक्षित होता तिथे सरकारी योजना त्याचा आधार ठरल्या आहेत.
तुम्हाला आठवतंय का, कागदपत्रांच्या भीतीमुळे आमच्या देशातील गरीब बँकेच्या दारापर्यंत सुद्धा जाऊ शकत नव्हता. प्रधानमंत्री जन धन योजनेच्या माध्यमातून देशभरात 40 कोटीहून अधिक गरीब, निम्न मध्यमवर्गीय लोकांची बँक खाती उघडली गेली आहेत. या जनधन खात्यांमुळे आमचा गरीब बँकेशी जोडला गेला आणि त्यानंतरच त्याला सहज कर्ज मिळत आहे, सावकारांच्या कचाट्यातून तो बाहेर आला आहे. या बँक खात्यांमुळे गरिबांना लाच न घेता घरे मिळत आहेत, शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात मदत मिळत आहे. कोरोना कालखंडातच जन धन योजनेमुळे संपूर्ण देशातील 20 कोटींहून अधिक बहिणींच्या जनधन खात्यात सुमारे 31 हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. त्याचप्रमाणे पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत देशभरातील 10 कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात 94 हजार कोटींपेक्षा जास्त रुपये थेट हस्तांतरित करण्यात आले आहेत.
मित्रांनो, या वर्षात जनधन खाते आणि बँकिंग प्रणालीशी ज्या प्रकारे आपले गरीब जोडले गेले आहेत, त्यामुळे एक नवीन सुरुवात झाली आहे. आता लवकरच शहरांप्रमाणेच आमची गावेही ऑनलाइन बाजाराशी जोडली जातील, जागतिक बाजारपेठ आपल्या खेड्यांपर्यंत पोहोचेल. यासाठी देशाने यावेळी 15 ऑगस्ट रोजी प्रतिज्ञा केली आहे. पुढील एक हजार दिवसांत देशातील सर्व गावे ऑप्टिकल फायबरशी जोडली जातील. म्हणजेच, गावागावांमध्ये, घराघरांमध्ये वेगवान इंटरनेट सेवा पोहोचेल. याद्वारे, डिजिटल क्रांतीचे फायदे गावात आणि गरीबांपर्यंत तितकेच जलदगतीने पोहोचतील. त्याचप्रमाणे देशानेही डिजिटल आरोग्य अभियान देखील सुरू केले आहे. म्हणजेच आता देशातील प्रत्येक नागरिकाला एक आरोग्य ओळखपत्र मिळेल. आपली सर्व माहिती तेथे सुरक्षित असेल. या ओळखपत्राच्या मदतीने, आपण डॉक्टरांशी ऑनलाइन भेट घेण्यास सक्षम असाल आणि आरोग्य तपासणी आणि अहवाल देखील ऑनलाइन दर्शविण्यास सक्षम असाल. म्हणजेच, एक प्रकारे, प्रथम प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेद्वारे विमा संरक्षण मिळाले, त्यानंतर आयुष्मान भारत अंतर्गत पाच लाखांपर्यंत नि:शुल्क उपचार मिळाले आणि आता डिजिटल आरोग्य अभियानाद्वारे सहज उपचार सुविधा मिळणार आहे.
मित्रांनो, देशातील प्रत्येकाचे जीवन सुसह्य करणे, प्रत्येक देशवासी सक्षम, सामर्थ्यवान आणि महत्त्वाचे म्हणजे आत्मनिर्भर करण्यासाठी देशाचा प्रयत्न आहे. अलीकडेच, सरकारने आपल्यासारख्या सहकाऱ्यांना वाजवी भाड्याने शहरांमध्ये चांगल्या निवास व्यवस्था देण्यासाठी एक मोठी योजना देखील सुरू केली आहे. एक देश एक रेशन कार्ड सुविधेद्वारे आपण देशात कोठेही गेलात तरी तुमच्या वाट्याचे स्वस्त रेशन तुम्हाला त्या शहरातही मिळू शकेल. तुम्ही जिथे जाल तिथे तुमच्या बरोबर तुमचा हक्क सुद्धा असेल.
मित्रांनो, आता आपण आपला व्यवसाय नव्याने सुरू करता आहात तेव्हा आपण काही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जोपर्यंत कोरोनाची लस येत नाही, कोणताही मार्ग निघत नाही, तोपर्यंत कोरोनाचा धोका कायम असेल. अशा परिस्थितीत आपल्याला स्वतःची तसेच ग्राहकांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घ्यावी लागेल. मग मास्कचा वापर असो, हाताची स्वच्छता, आपल्या जागेभोवतीची स्वच्छता असो, दोन गज (मीटर) अंतर ठेवणे असो या गोष्टींची कोणत्याही परिस्थितीत तडजोड करू नका. एकदा वापरता येणाऱ्या प्लास्टिकचा वापर न करण्याचा देखील प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या हातगाडीवर, पदपथावर कोरोनापासून रक्षण करण्यासाठीच्या जितक्या उपाययोजना कराल तितका लोकांचा विश्वास वाढेल आणि तुमचा व्यवसाय सुद्धा वाढेल. आपल्यालाही या नियमांचे स्वतः पालन करावे लागेल आणि समोरच्या लोकांना त्यांचे अनुसरण करण्यास उद्युक्त करत रहावे लागेल. मी पुन्हा एकदा नवीन सुरुवात केल्याबद्दल आपले अभिनंदन करतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आपण निरोगी रहा, आपले कुटुंब निरोगी राहूदे, आपल्या व्यवसायाचीदेखील भरभराट होईल; याच एका अपेक्षेने, माझ्या खूप खूप शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद!