कोरोनाच्या दुस-या लाटेच्याविरोधात लढणारे, जिल्ह्यातले तुम्ही सर्वात प्रमुख योद्धा आहात. शंभर वर्षांत इतक्या मोठ्या प्रमाणावर आलेल्या या आपत्तीमध्ये आपल्याकडे जी काही साधन सामुग्री होती, त्यांचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करून आपण इतक्या मोठ्या लाटेचा सामना केला आहे.
मित्रांनो,
तुम्ही ज्यावेळी या सेवेमध्ये येण्याची तयारी करीत होता, त्या दिवसांची आठवण करावी, अशी माझी इच्छा असल्याचे संवाद सुरू करतानाच मी नमूद करतो. ज्यावेळी तुम्ही नागरी सेवा अथवा इतर परीक्षांसाठी तयारी करीत होता, त्यावेळी तुम्ही करीत असलेल्या मेहनतीवर, आपण ज्या पद्धतीने काम करतोय, त्या पद्धतीवरच तुमचा जास्त विश्वास होता, याचीही तुम्हाला आठवण असेल, असे मला वाटते. तुम्ही ज्या कोणत्या क्षेत्रात कार्यरत असाल, तिथल्या लहान-लहान, अगदी बारीक-सारीक गोष्टींचा तुम्हाला परिचय असतानाही, तुम्ही विचार करीत असणार की, अशी समस्या निर्माण झाली तर मी अशा पद्धतीने त्या प्रसंगाला सामोरे जाईन.
तुमची हीच विचारपद्धती यशाची शिडी बनली. सध्याच्या परिस्थितीमुळे तुम्हाला आपल्याकडील क्षमतांची अशा त-हेने नव्याने परीक्षा देण्याची संधी दिली आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली लहानात लहान समस्या दूर करण्यासाठी, संपूर्ण संवेदनशीलतेने आपल्या लोकांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आपल्यातल्या क्षमता, भावना कामी येणार आहेत.
होय, कोरोनाच्या या काळाने तुमचे काम आधीपेक्षा खूप जास्त आव्हानात्मक बनले आहे आणि भरपूर कामाची मागणी करणारा हा काळ आहे. महामारीसारख्या विपत्तीला तोंड देताना सर्वात जास्त महत्व आमच्यामध्ये असलेल्या संवेदनशीलतेला आणि आपल्याकडे असलेल्या धैर्याला असते. याच भावनेने आपण प्रत्येक व्यक्ती-व्यक्तीपर्यंत पोहोचून ज्याप्रमाणे काम करीत आहात, तेच काम आणखी जास्त ताकद लावून आपल्याकडची सर्वाधिक क्षमता वापरून अधिक मोठ्या प्रमाणावर करीत रहायचे आहे.
मित्रांनो,
नवनवीन आव्हानांच्यामध्ये आपल्याला काम करण्याच्या नवनवीन पद्धती आणि तोडगे, उपाय योजना करण्याची आवश्यकता असते. आणि एक देश म्हणून सर्वांनी मिळून काम केले पाहिजे.
अलिकडेच म्हणजे दोन दिवसांपूर्वीच इतर काही राज्यांच्या अधिकारी वर्गाबरोबरही संवाद साधण्याची संधी मला मिळाली होती. त्या बैठकीमध्ये अनेक सल्ले, शिफारसी, अनेक पर्यायी उपाय योजना वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या मित्रांकडून आले. आजही इथे काही जिल्ह्यांच्या अधिका-यांनी आपल्या जिल्ह्याची स्थिती आणि आपण आखलेली रणनीती याविषयीची माहिती सामायिक केली आहे.
ज्यावेळी फील्डवर कार्यरत असलेल्या लोकांबरोबर संवाद साधला जातो, त्यावेळी अशा अभूतपूर्व परिस्थितीला तोंड देण्यासाठी खूप जास्त मदत मिळते. गेल्या काही दिवसांपासून असे अनेक सल्ले मिळत आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये स्थानिक परिस्थितीनुसार अनेक नवसंकल्पना राबवून वेगवेगळ्या पद्धतीने कामे केल्याची माहिती तुम्हा लोकांकडून मिळाली आहे. गावांमध्ये कोरोना चाचणीची सुविधा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोबाईल व्हॅन वापरण्याचा प्रयोग अनेक लोकांनी केला आहे. शाळा, पंचायत भवनांचे कोविड दक्षता केंद्रांमध्ये परिवर्तन करण्यासाठी काही लोकांनी पुढाकार घेतला आहे.
तुम्ही सर्वजण स्वतः गावांगावांमध्ये जात आहात, तिथल्या व्यवस्थेची देखरेख, पाहणी करता, तुम्ही ग्रामीण लोकांबरोबर संवाद साधता, बोलता, त्यामुळे गावांतल्या सामान्य नागरिक असो, अथवा तिथले स्थानिक पातळीवरचे एकप्रकारे नेते असो, पाच लोक असतील, 10 असतील, 15जण असतील, वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक असतात. त्या लोकांना निर्माण झालेल्या शंकांचे समाधान तुमच्याबरोबर बोलून होते आणि ते लोक थेट तुमच्याबरोबर जोडले जातात. या गोष्टींमुळे त्यांचा आत्मविश्वास अनेकपटींनी वाढतो. त्यांच्या मनातल्या शंकांची जागा आत्मविश्वास घेतो.
तुमच्या उपस्थितीत, तुम्ही जो संवाद साधता, त्यामुळे गावांमध्ये निर्माण झालेली भीती निघून जाते. आणि काही झाले तर आपण कुठे जायचे, आपले काय होणार? या प्रश्नांना उत्तरे त्यांना मिळतात. तुम्हाला पाहून त्यांच्या मनातले सर्व विचार बदलतात. यामुळे लोकांमध्ये धाडसाबरोबरच आपल्या गावाला वाचविण्याविषयी जागरूकता वाढते. आपल्याला आपला गाव कोरोनापासून मुक्त ठेवायचा आहे, हा संदेश आपण गावां-गावांपर्यंत नेटाने पोहोचवला पाहिजे, असा माझा आग्रह आहे. आणि गावाला कोरोनामुक्त ठेवण्याचा प्रयत्न दीर्घकाळ पर्यंत करावा लागणार आहे.
मित्रांनो,
मागील काही दिवसांपासून देशामध्ये अॅक्टिव्ह केसेस- सक्रिय प्रकरणे येणे कमी होत आहे. आपणही आपल्या जिल्ह्यामध्ये केसेस कमी झाल्याचा अनुभव करीत असणार. 20 दिवसांपूर्वी प्रचंड केसेस येत होत्या, त्यामुळे तुमच्यावर एकदम दबाव आला होता. आता बदल घडत असल्याचे तुम्हालाही जाणवत असेल. परंतु आपण सर्वांनी गेल्या दीड वर्षात अनुभव घेतला आहे की, जापर्यंत संक्रमण अगदी थोड्या प्रमाणावरही असले तरीही ते एक आव्हान बनलेले असते. अनेकवेळा कोरोनाची प्रकरणे कमी यायला लागतात, त्यावेळी लोकांना वाटायला लागते की, आता चिंता करण्याची काही गरज नाही. कोरोना तर निघून गेला. परंतु प्रत्यक्षात वेगळाच अनुभव आहे. चाचणी आणि सामाजिक अंतर पालन करण्यासारखे उपाय करण्याच्याबाबतीत लोकांमध्ये गांभीर्य नसते. यासाठी सरकारी व्यवस्था, सामाजिक संघटन, लोक-प्रतिनिधी, या सर्वांची एक सामूहिक जबाबदारीची भावना आपल्याला निर्माण करावी लागेल आणि प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढणार आहे.
कोविडयोग्य वर्तनशैली, जसे की- मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, यापैकी कशातही कमी येता कामा नये त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यामध्ये, जिल्ह्यांच्या बाजारांमध्ये, गावांमध्ये कोविड प्रकरणे कमी येत असली तरीही आणि त्यानंतरही सर्व मार्गदर्शक नियमांचे पालन केले जात असेल तर, मग ही कोरोनाची लढाई लढताना खूप मदत होणार आहे. परिस्थितीवर सातत्यानं, निरंतर लक्ष ठेवले पाहिजे. जिल्ह्याचे सर्व प्रमुख विभाग, जसे की, पोलिस विभाग असो, स्वच्छतेची गोष्ट असो, अशा सर्व व्यवस्थेचा, आणि या सर्व विभागांमध्ये योग्य पद्धतीेने प्रभावी संतुलन राखले गेले तर स्वाभाविक रूपाने परिणाम साधला जाणार आहे.
आपल्या अनेक जिल्ह्यांनी या रणनीतीप्रमाणे काम केल्यानंतर चांगले परिणाम मिळाले आहेत, अशी माहिती मला मिळत असते. या गावांमध्ये तुम्ही खरोखरीच खूप मोठ्या संख्येने लोकांचे जीवन वाचवले आहे.
मित्रांनो,
फील्डमध्ये करण्यात येण-या आपल्या कार्यामुळे, आपल्या अनुभवांनी आणि येणा-या प्रतिक्रियांनीच तर प्रत्यक्षात आणि परिणामकारी निकाल मिळण्यास मदत होत आहे. लसीकरणाच्या रणनीतीमध्येही प्रत्येक स्तरावर राज्ये आणि संबंधित अनेक सहभागीदार यांच्याकडून येणा-या सल्ल्यांचा समावेश करून आपण पुढे जात आहोत.
याच क्रमाने आरोग्य मंत्रालयाच्यावतीने लसीकरणासाठी 15 दिवसांसाठी उपलब्ध असलेल्या लसींच्या साठ्याची माहिती राज्यांना दिली जात आहे. लस पुरवठा वेळापत्रकामध्ये पुरेशी स्पष्टता निर्माण झाली तर लसीकरणाशी संबंधित व्यवस्थापन करणे तुम्हा सर्वांनाच अधिक सोपे जाणार आहे.
मला विश्वास आहे की, प्रत्येक जिल्हा आणि लसीकरण केंद्र स्तरावर पुरवठा व्यवस्था अधिक सुदृढ होईल. यामुळे लसीकरणासंबंधित असलेली अनिश्चितता दूर करण्यात, संपूर्ण प्रक्रियेचे वेळापत्रक निश्चित करण्यासाठी मदत मिळेल. लसीकरणाचा जे नियोजन आहे, जे दैनंदिन वेळापत्रक निश्चित केले आहे, ते आपण नियमित स्वरूपात वेगवेगळ्या प्रसिद्धी माध्यमातून अधिकाधिक सामायिक केले तर त्रास कमीत कमी होवू शकणार आहे.
मित्रांनो,
आगोदर आलेल्या महामारी असो अथवा आता आलेली महामारी असो, या दोन्हीमुळे आपल्याला एक गोष्ट शिकवली आहे. महामारीबरोबर रोजचा संबंध येत असल्यामुळे आपल्या कार्यपद्धतीत, जीवनशैलीत निरंतर परिवर्तन, निरंतर नवेपण, निरंतर अद्यतन अतिशय आवश्यक आहे. या विषाणू नवीन प्रकारांमध्ये परिवर्तीत होण्यात कुशल आहे. एकप्रकारे हा विषाणू बहुरूपी ही आहे आणि हा विषाणू अतिशय धूर्तही आहे. त्यामुळे त्याच्याशी दोन हात करताना आपणही व्यूहरचनात्मक सुरक्षा प्रकारांची अंमलबजावणी केली पाहिजे.
वैज्ञानिक स्तरावर आपले संशोधक विषाणूच्या बदलत्या स्वरूपांशी दोन हात करण्याचे कार्य रात्रंदिवस करीत आहेत. लस बनविण्याच्या कामापासून ते मार्गदर्शक कार्यप्रणाली आणि नवीन औषध बनविण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. ज्यावेळी आपल्या प्रशासनाचे कार्यही इतके नाविन्यपूर्ण आणि ‘डायनॅमिक’ असेल तर मग आपल्याला अव्दितीय परिणाम तर मिळणारच आहेत. आपल्या जिल्ह्यांपुढे असणारी आव्हाने वेगळी असतील, त्यामुळेच या आव्हानांवर तोडगाही तितकाच वेगळा, अव्दितीय असला पाहिजे. एक विषय लस वाया जाण्याचाही आहे. लसीची एक मात्रा वाया जाणे म्हणजे, कोणा एकाला जीवनासाठी जरूरी असणारे सुरक्षा कवच आपण देवू शकलो नाही, असे आहे. म्हणूनच लस वाया जाणे पूर्णपणे रोखणे अतिशय गरजेचे आहे.
मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे. तुम्ही आपल्या जिल्ह्यांच्या आकडेवारीची समीक्षा करीत असणार मग त्यामध्ये शहरी आणि ग्रामीण, यावरही वेगवेगळे गट असणार. म्हणून तुम्ही लक्ष केंद्रीत करून अगदी दुस-या आणि तिस-या स्तरावरच्या शहरांचे वेगळे विश्लेषण करावे. त्यामुळे तुम्हाला व्यूव्हरचनात्मक काम करता येणार आहे. कुठे, किती जोर, ताकद लावावी लागणार आहे, कोणत्या प्रकारच्या क्षमतांचा वापर तिथे करावा लागणार आहे, या गोष्टी तुम्हाला अगदी सहजतेने करता येतील. आणि त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की, ग्रामीण भागामध्ये कोरोनामुक्तीला मदत मिळत आहे.
आणि मीसुद्धा दीर्घ काळापासून आपल्याप्रमाणेच काही ना काही काम करीत-करीतच इथे पोहोचलो आहे. माझा अनुभव असा आहे की, गावांतल्या लोकांना जर योग्य गोष्ट वेळेवर, आणि योग्य प्रकारे पोहोचवली तर ते त्याचे पालन अतिशय चांगल्या पद्धतीने करतात. गावामध्ये एक टीम बनवली पाहिजे. त्याचे परिणाम किती चांगले मिळतील, हे तुम्हाला दिसून येईल.
मित्रांनो,
दुस-या लाटेमध्ये विषाणूच्या नवीन प्रकारामुळे आता युवा वर्ग आणि मुलांविषयी जास्त चिंता व्यक्त केली जात आहे. आत्तापर्यंत आपली रणनीती अशी होती की, तुम्ही ज्या पद्धतीने फील्डमध्ये काम केले आहे, त्यामुळे या चिंता तितकी गंभीर बनली नव्हती. मात्र आपल्याला यापुढे अधिक सज्ज रहावेच लागणार आहे. आणि सर्वात पहिले काम तुम्ही करू शकता की, आपल्या जिल्ह्यातल्या युवकांमध्ये, मुलांमध्ये होणारे संक्रमण आणि त्यांचे गांभीर्य याविषयीचे आकडे व्यवस्थित जाणून घेतले पाहिजे. या विषयाचे वेगळे, स्वतंत्रपणे आणि नियमित विश्लेषण करण्याचे काम तुम्ही करावे. तुम्ही स्वतःही... माझा तुम्हा सर्व प्रमुख अधिकारी मंडळींना आग्रह आहे की, तुम्ही स्वतः या आकडेवारीचे आकलन करून घ्यावे. त्याची यापुढे काही तयारी करायची असेल तर मदत होईल.
मित्रांनो,
मागच्या वेळच्या बैठकीमध्ये मी सांगितले होते की, जीवन वाचविण्याबरोबरच आपले प्राधान्य जीवन सहज, सोपे बनविणे, यालाही आहे. गरीबांसाठी मोफत धान्याची सुविधा असावी, इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित, सुरळीत असावा, काळाबाजार रोखण्यात यावा. ही लढाई जिंकण्यासाठी या सर्व गोष्टी करणेही आवश्यक आहे. आणि पुढे जाण्यासाठीही जरूरीच्या आहेत. तुमच्याकडे मागील काळात काम केल्याचा अनुभव ही एक ताकद आहे. आणि मागील प्रयत्नांमध्ये मिळालेले यश प्रेरणादायीही आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, तुम्ही सर्वजण आपआपल्या जिल्ह्यांना संक्रमण मुक्त करण्यात यशस्वी होणार आहात.
देशाच्या नागरिकाचे जीवन वाचविण्यासाठी, देशाला विजयी बनविण्यात, आपण सर्वजण यशस्वी ठरणार आहोत. आणि मला आज काही मित्रांकडून त्यांचे अनुभव ऐकण्याची संधी मिळाली मात्र तुमच्याकडे, अगदी प्रत्येकाकडे काही ना काही यशोगाथा आहेच. खूप चांगले नवोन्मेषी प्रयोग तुम्ही सर्व मंडळीनी करून काही ना काही वेगळे केले आहे. जर तुम्ही केलेले हे वेगळे काम माझ्यापर्यंत पोहोचवले तर त्याची माहिती संपूर्ण देशभर पोहोचविण्यासाठी सुविधा मिळेल. कारण बुद्धिजीवी स्तरावर चर्चा-संवाद घडवून कितीही नवीन संकल्पना तयार केल्या तरी त्या सर्वांपेक्षा जास्त ताकद प्रत्यक्ष फील्डवर केलेल्या कामामध्ये असते. ज्याने या गोष्टीचा अनुभव घेतला आहे आणि ज्याने हा मार्ग शोधून काढला आहे, तो खूप ताकदीचा असतो. आणि म्हणूनच तुम्हा सर्वांची भूमिका या लढ्यात खूप मोठी आहे. आणि म्हणूनच माझा तुम्हा सर्वांना आग्रह आहे की, तुम्ही अशा नवसंकल्पना आणा.
दुसरी गोष्ट म्हणजे, गेल्या शंभर वर्षांमध्ये कोणाच्या जीवनामध्ये इतके मोठ्या संकटाबरोबर संघर्ष करण्याची जबाबदारी आलेली नाही. तुम्ही जिल्ह्याच्या स्थानी बसले आहात, तुमच्यावर खूप मोठ्या जबाबदारीचा भार आला आहे. अनेक गोष्टी तुम्ही जवळून पाहिल्या असतील, मानवी मनाला अगदी जवळून अनुभवले असेल. व्यवस्थेची मर्यादा तुमच्या नजरेस आली असेल, कमीत कमी साधन सामुग्रीचा जास्तीत जास्त उपयोग करून तुम्ही नवीन विक्रम प्रस्थापित केला असेल. ज्यावेळी केव्हा संधी मिळेल, त्यावेळी या सर्वांची नोंद आपल्या रोजनिशीत करून ठेवा. आगामी पिढीला तुमच्या अनुभवाचा लाभ होईल. कारण गेल्या शताब्दीमध्ये, शंभर वर्षांपूर्वी जी सर्वात मोठी महामारी आली होती, त्याविषयी जास्त नोंदी उपलब्ध नाहीत. त्या महामारीचे स्वरूप कसे होते, संकट किती भयानक होते, कुठे काय झाले, त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी कसे मार्ग शोधण्यात आले, याच्या नोंदी नाहीत. परंतु आज आपल्या जिल्ह्याचे अधिकारी जर जिल्हा गॅजेटप्रमाणे आजाराच्या नोंदी ठेवतील तर भविष्यात येणा-या पिढ्यांनाही आपण केलेल्या परिश्रमाची, आपल्या अनुभवाची मदत मिळू शकेल.
आणि मी तुम्हालाही या यशासाठी, या परिश्रमासाठी , तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला, ज्या प्रकारे तुम्ही लोकांनी याचे नेतृत्व केले आहे, त्यासाठी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. तुमच्या प्रयत्नांचे कौतुक करतो आणि मी आशा करतो की, तुम्ही यापेक्षाही जास्त यश प्राप्त करावे. या लढ्यात तुम्हाला वेगाने यश मिळावे, आणि त्यामुळे जनसामान्यांमध्ये तुम्ही विश्वास निर्माण करू शकणार आहे.
सामान्य व्यक्तीचा विश्वास हाच औषधासारखा उपाय आहे. यापेक्षा मोठा उपाय असू शकत नाही, आणि हे काम तुम्ही मंडळी अगदी सहजतेने करणार आहात. तुम्ही सर्वांनी आरोग्यदायी रहावे, कामाचा भार तुमच्यावर जास्त आहे, याचा मी अनुभव घेत आहे. आता पावसाळा ऋतू सामोरा आहे. आणि त्यासंबंधित कामाचाही दबाव असतोच, तो आता तर जास्तच वाढणार आहे. मात्र या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही निरोगीही राहिले पाहिजे.... तुमचा परिवार आरोग्यदायी राहिला पाहिजे आणि तुमचा जिल्हा जास्तीत जास्त वेगाने निरोगी व्हावा. प्रत्येक नागरिक निरोगी असावा, अशी आपल्या सर्वांची कामना ईश्वराने पूर्ण करावी.... आपल्याकडे असलेल्या पुरुषार्थामुळे ही इच्छा पूर्ण होईल.
माझ्यावतीने तुम्हा
सर्वांना खूप शुभेच्छा!
खूप-खूप धन्यवाद!!