“क्रीडापटूंच्या कठोर परिश्रमांमुळे एका प्रेरणादायी कामगिरीसह देश स्वातंत्र्याच्या अमृतकाळात प्रवेश करत आहे.”
“क्रीडापटू, केवळ क्रीडा क्षेत्रामध्येच नव्हे तर इतरही क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा देशातील युवा वर्गाला देत असतात”
“तुम्ही देशाला विचार आणि लक्ष्य यांच्या एकीमध्ये गुंफता जी आपल्या स्वातंत्र्य संग्रामाची सर्वात मोठी क्षमता होती”
“युक्रेनमध्ये तिरंग्याच्या सामर्थ्याचे दर्शन घडले, जिथे केवळ भारतीयांसाठीच नव्हे तर इतर देशांच्या नागरिकांना युद्धभूमीतून बाहेर पडण्यासाठी तो संरक्षक कवच बनला होता”
“जागतिक पातळीवर सर्वोत्तम, समावेशक, विविधतापूर्ण आणि गतिमान असलेली क्रीडा क्षेत्रासाठीपूरक प्रणाली निर्माण करण्याची आपली जबाबदारी आहे, कोणत्याही गुणवत्तेकडे दुर्लक्ष होता कामा नये”

सर्वांशी बोलणं माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायक असतं, मात्र  सर्वांशी बोलणं शक्य नसतं. तरी वेगवेगळ्या वेळी आपल्यापैकी अनेक जणांशी कोणत्या ना कोणत्या स्वरुपात संपर्कात राहण्याची मला संधी मिळाली आहे, बोलण्याची संधी मिळाली आहे, पण माझ्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे, की वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या निवासस्थानी आलात आणि परिवाराच्या सदस्याच्या रुपात आले आहात. तर, तुमच्या यशाचा जसा प्रत्येक हिंदुस्तानी नागरिकाला अभिमान आहे, तसाच मला देखील तुमच्याशी जोडले जाण्याचा अभिमान आहे. तुम्हां सर्वांचं माझ्याकडे खूप-खूप स्वागत आहे.

दोन दिवसांनंतर देश स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण करणार आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे की, तुमच्या सर्वांचे परिश्रम आणि प्रेरणादायी यशासह देश स्वातंत्र्याच्या अमृत काळात प्रवेश करत आहे.

 

मित्रांनो,

गेल्या काही आठवड्यांमध्ये देशाने खेळाच्या मैदानावर 2 मोठे टप्पे गाठले आहेत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधील ऐतिहासिक कामगिरीबरोबरच देशाने पहिल्यांदाच बुद्धिबळ ऑलिम्पियाडचं आयोजन केलं आहे. केवळ एक यशस्वी आयोजन केलं नाही, तर बुद्धिबळात आपली समृद्ध परंपरा कायम राखत सर्वोत्कृष्ट कामगिरी देखील केली आहे. बुद्धिबळ ऑलिम्पियाड मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंचं आणि सर्व पदक विजेत्यांचं देखील आजच्या या प्रसंगी मी खूप-खूप अभिनंदन करतो. 

 

मित्रांनो,

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरु होण्यापूर्वी मी तुम्हा सर्वांना म्हटलं होतं, एक प्रकारे आश्वासन दिलं होतं की तुम्ही जेव्हा परत याल, तेव्हा आपण सर्व जण एकत्र येऊन विजयोत्सव साजरा करू. माझा हा आत्मविश्वास होता, की तुम्ही सर्व जण विजयी होऊन परतणार आहात, आणि माझं हे नियोजन देखील होतं की कितीही व्यस्त असलो, तरी तुम्हां सर्वांसाठी वेळ काढीन आणि विजयोत्सव साजरा करीन. आज हा विजयाच्या उत्सवाचाच प्रसंग आहे. आत्ता मी जेव्हा तुमच्याशी बोलत होतो, तेव्हा तोच आत्मविश्वास, तोच उत्साह बघत होतो आणि तीच तुम्हा सर्वांची ओळख आहे, तेच तुमच्या ओळखीशी जोडले गेले आहे. ज्यांनी पदक जिंकलं ते ही आणि जे पुढे पदक जिंकणार आहेत ते देखील आज कौतुकासाठी पात्र आहेत. 

 

मित्रांनो,

तसं मलाही तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची आहे. तुम्ही सर्व जण तर तिथे स्पर्धेत लढत होतात, पण हिंदुस्तानात, वेळेचं अंतर असल्यामुळे, या ठिकाणी कोट्यवधि भारतीय रात्र जागवत होते. रात्री उशीरापर्यंत तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक खेळी याकडे देशवासीयांचं लक्ष होतं. अनेक जण गजर लावून झोपत होते, की ज्यामुळे तुमच्या खेळाची ताजी स्थिती जाणून घेता येईल. किती तरी जण परत-परत जाऊन बघत होते, की गुण-तालिका काय आहे, किती गोल झाले, किती गुण मिळाले. खेळाप्रति ही आवड वाढवण्यात, आकर्षण वाढवण्यामध्ये तुम्हा सर्वांची मोठी भूमिका आहे आणि यासाठी तुम्ही सर्व जण अभिनंदनासाठी पात्र आहात.

मित्रांनो,

यावेळी आपली जी कामगिरी राहिली आहे, त्याचं प्रामाणिक आकलन केवळ पदकांच्या संख्येने शक्य नाही. आपले किती तरी खेळाडू यावेळी अटी-तटीचा सामना खेळताना दिसून आले. हे देखील एखाद्या पदका पेक्षा कमी नाही. ठीक आहे, पॉइंट एक सेकंद, पॉइंट एक सेंटीमीटर चा फरक राहिला असेल, पण आपण तो देखील भरून काढू. तुमच्या सर्वांबद्दल मला हा विश्वास आहे. यासाठी देखील मी उत्साहित आहे, की जो खेळ आपलं बलस्थान आहे, त्याला तर आपण आणखी मजबूत करत आहोत पण नव्या खेळांमध्ये देखील आपली छाप सोडत आहोत. हॉकी मध्ये ज्या प्रकारे आपण आपला वारसा पुन्हा मिळवत आहोत, त्यासाठी मी दोन्ही संघांचे प्रयत्न, त्यांचे परिश्रम, त्यांची मानसिकता, याचं की खूप-खूप कौतुक करतो, मनापासून कौतुक करतो. मागच्या वेळेच्या तुलनेत या वेळी आपण 4 नवीन खेळांमध्ये यशाचा नवा मार्ग खुला केला आहे. लॉन बाउल्स पासून ते अॅथलेटिक्सपर्यंत अभूतपूर्व कामगिरी राहिली आहे. या यशामुळे देशात नव्या खेळांकडे तरुणांचा कल मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. नवीन खेळांमध्ये आपल्याला याच पद्धतीने आपल्या कामगिरीत सुधारणा करत राहायची आहे. मी पाहत आहे, सर्व जुने चेहरे माझ्या समोर आहेत, शरत असो, किदंबी असो, सिंधू असो, सौरभ असो, मीराबाई असो, बजरंग असो, विनेश, साक्षी, सर्व ज्येष्ठ खेळाडूंनी माझ्या अपेक्षेप्रमाणे उत्तम कामगिरी केली आहे. प्रत्येकाचा उत्साह आणखी मजबूत केला आहे. आणि त्याच वेळी आपल्या युवा खेळाडूंनी तर कमालच केली आहे. स्पर्धा सुरु होण्यापूर्वी मी ज्या युवा सहकाऱ्यांशी बोललो होतो, त्यांनी आपलं वचन पूर्ण केलं आहे. ज्यांनी पदार्पण केलं आहे, त्यांच्यापैकी 31 सहकाऱ्यांनी पदक जिंकलं आहे. यामधून हे दिसून येतं की आज आपल्या युवा खेळाडूंचा आत्मविश्वास किती वाढत आहे. जेव्हा अनुभवी शरत वर्चस्व गाजवतो आणि अविनाश, प्रियंका आणि संदीप पहिल्यांदाच जगातल्या श्रेष्ठ खेळाडूंचा सामना करतात, तेव्हा नव्या भारताची ऊर्जा दिसून येते.

उत्साह, चैतन्य असे आहे की - आपण प्रत्येक शर्यतीमध्ये , प्रत्येक स्पर्धेमध्ये अगदी ठामपणाने उभे आहोत, सिद्ध आहोत. अॅथलेटिक्समध्‍ये विजयानंतर उच्च स्थानी  एकाच वेळी दोन- दोन ठिकाणी तिरंगा ध्वजाला सलामी देणारे भारतीय खेळाडू आपण कितीतरी वेळा पाहिले आहे. आणि मित्रांनो, आपल्या कन्यांनी जे कौशल्य दाखवले आहे, ते पाहून संपूर्ण देश जणू अगदी आनंदाने गहिवरला आहे. आत्ता ज्यावेळी मी पूजाबरोबर संवाद साधत होतो, त्यावेळी मी उल्लेखही केला, पूजाचा ती अतिशय भावूक करणारी चित्रफीत पाहिल्यानंतर समाज माध्यमातून मी म्हणालोही होतो की, तुम्ही क्षमा मागण्याची काहीच आवश्यकता नाही. देशाच्या दृष्टीने तुम्हीच विजेता आहात. तुम्ही प्रामाणिकपणे परिश्रम करण्याचे काम कधीच सोडू नये. ऑलिंपिकनंतर विनेशलाही मी हेच सांगितले होते. आणि मला आनंद वाटतोय की, त्यांनी निराशेला मागे टाकून सर्वोत्कृष्ट खेळ केला. मुष्टीयुद्ध असो, ज्युदो असो, कुस्ती असो, ज्या ज्या प्रकारांमध्ये आपल्या कन्यांनी वर्चस्व दाखवले आहे, ते खरोखरीच नवलपूर्ण, अद्भूत  आहे. नीतूने प्रतिस्पर्धी खेळाडूला मैदान सोडायला भाग पाडले. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच क्रिकेटमध्ये आपण उत्तम कामगिरी केली आहे. सर्व खेळाडूंची कामगिरी चांगली झाली आहे. मात्र रेणुकाच्या ‘स्विंग’ला कुणाकडेही अजूनही उत्तर नाही. दिग्गजांमध्ये ‘टॉप विकेट टेकर’ असणे, ही काही कमी कामगिरी नाही. त्यांच्या चेह-यावर भलेही सिमल्याची शांती कायम रहात असेल, पर्वतीय प्रदेशात दिसणारे निष्पाप हास्य त्यांच्या चेह-यावर कायम विलसत असेल, मात्र त्यांचा खेळातून होणारा जोरदार मारा मोठ-मोठ्या पट्टीच्या फलंदाजांचे धैर्य कमकुवत करत असणार. ही कामगिरी निश्चितच दूर-दुर्गम भागातल्या मुलींना प्रेरणा देणारी आहे, त्यांना प्रोत्साहन देणारी आहे.

मित्रांनो,

तुम्ही सर्वजण देशाला काही फक्त एक पदक मिळवून देता किंवा यश साजरे करण्याची, अभिमान व्यक्त करण्याची संधी देता असे नाही. तर  ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ ही भावना तुम्ही अधिक सशक्त करीत आहात. तुम्ही मंडळी खेळामध्येच नाही, इतर क्षेत्रामध्येही देशातल्या युवकांना काहीतरी  अधिक चांगले निर्माण करण्यासाठी प्रेरणा देत आहात. तुम्ही सर्वजण देशाला एका  संकल्पाने, एका लक्ष्याने जोडण्याचे काम करीत आहात. असेच कार्य आपल्या स्वातंत्र्य लढ्याच्या काळामध्ये खूप मोठी शक्ती बनले होते. महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, मंगल पांडे, तात्या टोपे, लोकमान्य टिळक, सरदार भगत सिंह, चंद्रशेखर आझाद, अशफाक उल्ला खाँ आणि रामप्रसाद बिस्मिल, असे असंख्य सेनानी, असंख्य क्रांतीवीर होते, त्यांचे कार्यप्रवाह वेगवेगळे होते, परंतु सर्वांचे लक्ष्य एकच होते. राणी लक्ष्मीबाई, झलकारी बाई, दुर्गा भाभी, राणी चेनम्मा, राणी गाइदिनल्यू आणि वेलू नचियार यांच्यासारख्या अगणित वीरांगनांनी त्यावेळी रूढींचे बंधन तोडून स्वातंत्र्यासाठी लढा दिला. बिरसा मुंडा असो आणि अल्लूरी सीताराम राजू असो, गोविंद गुरू असो, यांच्यासारख्या महान आदिवासी सेनानींनी फक्त आणि फक्त आपल्या धैर्याने, धाडसाने प्रचंड ताकदीच्या सेनेला जोरदार टक्कर दिली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू, सरदार पटेल, बाबासाहेब आंबेडकर, आचार्य विनोबा भावे, नानाजी देशमुख, लालबहादूर शास्त्री, श्यामाप्रसाद मुखर्जी, यांच्यासारख्या अनेक महनीय लोकप्रतिनिधींनी स्वतंत्र भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. स्वातंत्र्याच्या लढ्यापासून स्वतंत्र भारताच्या नवनिर्माणामध्ये ज्याप्रमाणे संपूर्ण भारताने एकजूट होऊन प्रयत्न केला आहे, त्याच भावनेने तुम्ही मंडळीही मैदानात उतरत असता. तुम्हां सर्वांचे राज्य, जिल्हा, गाव, भाषा भलेही कोणतेही असो, मात्र खेळाच्यावेळी तुम्ही भारताचा मान, अभिमानासाठी, देशाच्या प्रतिष्ठेसाठी आपल्या सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन मैदानात करता. आपलीही प्रेरणाशक्ती तिरंगा ध्वज आहे. आणि या तिरंगा ध्वजाची ताकद काय असते, हे आपण काही काळापूर्वीच युक्रेनमध्ये पाहिले आहे. युद्धक्षेत्राच्या बाहेर पडण्यासाठी तिरंगा ध्वज भारतीयांचेच नाही तर इतर देशांच्या लोकांचेही सुरक्षा कवच बनला होता.

मित्रांनो,

गेल्या काही दिवसात आपण इतर सामन्यांमध्ये, स्पर्धांमध्येही चांगली कामगिरी केली आहे. जागतिक अॅथलेटिक्स विजेतेपद स्पर्धेत आपण आत्तापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी करून दाखविली आहे. ‘वर्ल्ड अंडर -20 अॅथलेटिक्स चँपियनशिप’ स्पर्धेतही आपल्या खेळाडूंनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. याच प्रकारे ‘वर्ल्ड कॅडेट रेसलिंग चॅंपियनशिप’ आणि ‘पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल टुर्नामेंट्स’ मध्येही अनेक नवीन विक्रम स्थापित केले आहेत.  या गोष्टी भारतीय क्रीडाविश्वाला निश्चितच उत्साहीत     करणा-या आहेत.  इथे अनेक प्रशिक्षकही आहेत. प्रशिक्षण संस्थांचे कर्मचारी, सदस्यही आहेत. आणि देशातल्या क्रीडा प्रशासनाशी संबंधित व्यक्तीही आहेत. या यशामध्ये या मंडळींनीही खूप चांगली भूमिका पार पाडली आहे. तुम्हा मंडळींची भूमिका खूप महत्वपूर्ण असते. तरीही माझ्या हिशेबाने म्हणाल तर ही फक्त सुरूवात आहे. आपण एवढ्यावरच आनंद मानून शांत बसणा-यांपैकी नाही. भारतातल्या क्रीडाविश्वाला सुवर्णयुगाचा काळ जणू दार ठोठावत आहे. मित्रांनो, मला खूप आनंद वाटतो की, ‘खेलो इंडिया’ च्या मोहिमेमुळे पुढे आलेल्या अनेक खेळाडूंनी यावेळी खूप चांगली कामगिरी करून दाखवली आहे. ‘टीओपीएस’- टॉप्सचाही सकारात्मक प्रभाव दिसून येत आहे. नवीन प्रतिभांचा शोध आणि त्यांना विजेत्याच्या उच्च स्थानापर्यंत  पोहोचविण्यासाठी आपण केलेले प्रयत्न आता आपल्याला अधिक वाढवायचे आहेत. विश्वातील सर्वश्रेष्ठ, सर्वसमावेशक, गतीमान, वैविध्यपूर्ण क्रीडा परिसंस्था निर्माण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. देशात असलेली प्रतिभा यापासून वंचित राहू नये, कारण असे प्रतिभावान खेळाडू हे देशाची संपत्ती आहेत, देशाची मालमत्ता आहेत. सर्व खेळाडूंना माझे आग्रहपूर्वक सांगणे आहे की, तुमच्यासमोर आता अशियाई स्पर्धा आहेत, ऑलिंपिक स्पर्धा आहेत. त्यांची तुम्ही अगदी जोरदार तयारी करावी. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षामध्ये माझा तुम्हा सर्वांना आणखी एक आग्रह असणार आहे. गेल्यावेळी मी तुम्हाला देशातल्या 75 शाळांना, शैक्षणिक संस्थांमध्ये जावून मुलांना प्रोत्साहन देण्याचा आग्रह केला होता. ‘मीट द चॅंपियन’ या अभियानाअंतर्गत अनेक खेळाडूंनी आपल्या व्यग्र कार्यक्रमामध्येही हे काम केले आहे. हेच अभियान सर्वांनी असेच पुढे सुरू ठेवावे. जे खेळाडू आत्तापर्यंत शाळांमध्ये जाऊ शकले नाहीत, त्यांनाही माझा आग्रह आहे की, त्यांनी जरूर जावे. तुम्हा मंडळींना देशातली युवा वर्ग ‘रोल मॉडेल’ या रूपात पहात आहेत. आणि म्हणूनच तुम्ही जे काही बोलता ते ही मंडळी अगदी लक्षपूर्वक ऐकत असतात. तुम्ही जो काही सल्ला देणार आहे, त्याचा मनापासून स्वीकार करण्यासाठी, तसे वागण्यासाठी नवीन पिढी उतावळी झाली आहे. आणि म्हणूनच तुमच्यामध्ये हे जे सामर्थ्य निर्माण झाले आहे, तुम्ही जे काही करणार, जे काही म्हणणार त्याचा स्वीकार केला जाणार आहे. तुमचा जो मान, सन्मान वाढला आहे, तो देशाच्या युवा पिढीची मदत करणारा ठरला पाहिजे. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना, या विजय यात्रेला अनेक- अनेक शुभेच्छा देतो.

सर्वांचे खूप - खूप अभिनंदन करतो! धन्यवाद!!

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi