आपल्यापैकी काही जण म्हणतील नाही - नाही, आम्हाला अजिबात थकवा जाणवला नाही असो, माझ्या मनात आपला खुप वेळ घेण्याचा कोणताही विचार नाही. मात्र, इतक्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी झाले, देशाचे नाव उज्ज्वल झाले, चोहोबाजूंनी फक्त प्रशंसा आणि प्रशंसाच ऐकायला मिळते आहे, मग यामागे ज्यांचा पुरुषार्थ आहे, ज्यांनी आपले दिवस रात्र याच कामाला समर्पित केले आहेत आणि ज्यामुळे हे यश प्राप्त झाले आहे, ते सर्व तुम्हीच आहात. कधी कधी वाटते की जेव्हा एखादा खेळाडू ऑलिंपिक व्यासपीठावर जाऊन पदक घेऊन येतो आणि देशाचे नाव उज्वल करतो तेव्हा त्याची प्रशंसा बराच काळ होत राहते. मात्र तुम्ही सर्वांनी मिळून देशाचे नाव उज्ज्वल केले आहे.
कदाचित लोकांना माहीतीही नसेल. किती लोक असतील, किती काम केले गेले असेल, कशा परिस्थितीत केले असेल. आणि आपल्यापैकी बहुतांश लोक असे आहेत ज्यांना यापूर्वी इतक्या मोठ्या आयोजनाचे कार्य किंवा जबाबदारी सांभाळण्याची संधी मिळाली नव्हती. म्हणजेच, एका प्रकारे तुम्हाला कार्यक्रमाची कल्पना देखील करायची होती, समस्यांबाबत देखील विचार करायचा होता की काय होईल आणि काय नाही. असे झाले तर काय करावे लागेल आणि तसे झाले तर तसे करावे लागेल, हे देखील ठरवायचे होते. बऱ्याच गोष्टींवर तुम्हाला तुमच्या पद्धतीने लक्ष द्यावे लागले असेल. आणि म्हणूनच माझा तुम्हाला एक विशेष आग्रह आहे, आता तुम्ही म्हणाल की इतकी कामे करून घेतली, आताही आमची सुटका होणार नाही का!!
माझा असा आग्रह आहे की, जेव्हापासून तुम्ही या कामाशी जोडले गेलात, कोणी तीन वर्षापासून जोडले गेले असेल, कोणी चार वर्षापासून जोडले गेले असेल, कोणी चार महिन्यांपासून जोडला गेलेला असेल. पहिल्या दिवशी जेव्हा तुमच्याशी बोलणे झाले होते तेव्हापासून जे जे घडले ते जर तुम्ही एका ठिकाणी संकलित करून लिहिले आणि जे मध्यवर्ती व्यवस्थापन सांभाळत आहेत त्यांनी एखादी वेबसाईट तयार करावी. सर्वांनी आपापल्या भाषेत लिहावे, ज्याला जी भाषा सोयीस्कर वाटेल त्या त्या भाषेत त्यांनी हे काम कशा प्रकारे केले, काय पाहिले, काय उणिवा दिसल्या, कोणत्या समस्या आल्या आणि त्या कशा सोडवल्या. जर तुमचे अनुभव संपादित केले गेले तर त्यातून भविष्यातील अशा कामांसाठी योग्य मार्गदर्शक तत्वे तयार केली जाऊ शकतात आणि हे अनुभव एका संस्थेप्रमाणे काम करू शकतात.
आणि म्हणूनच, तुम्ही जितक्या बारकाईने एक एक बाब नमुद कराल, भले 100 पाने होऊ देत, तुम्हाला ते ठेवण्यासाठी कपाटाची गरज नाही, क्लाऊडवर ठेवले तर मग जागेचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र, या गोष्टी खुप उपयोगाच्या आहेत. माझी अशी इच्छा आहे की, एखादी व्यवस्था तयार व्हावी आणि तुम्हा सर्वांना त्याचा लाभ व्हावा. असो, मी आपले म्हणणे ऐकू इच्छितो, तुमचे अनुभव जाणू इच्छितो, तुमच्यापैकी कोणीतरी सुरुवात करा.
रोपांच्या कुंड्या सांभाळायच्या आहेत, म्हणजे माझ्या या कुंड्याच आहेत ज्या जी 20 ला सफल बनवतील. जर माझी कुंडी हलली तर जी 20 यशस्वी होणार नाही. जेव्हा ही भावना निर्माण होते, हे चैतन्य निर्माण होते की, मी एका खूप मोठ्या यशासाठी खूप महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळत आहे, कोणतेही काम माझ्यासाठी छोटे नाही, तर लक्षात घ्या सफलता तुमच्या पायाशी लोळण घेऊ लागते.
मित्रांनो,
याप्रकारे एकत्र भेटून आपापल्या विभागात देखील कधी कधी मोकळेपणाने गप्पा मारल्या पाहिजेत, एकत्र बसले पाहिजे, एकमेकांचे अनुभव ऐकले पाहिजेत, यामुळे खूप फायदा होतो. कधी कधी काय होते, जेव्हा आपण एकटे असतो, तेव्हा आपल्याला असे वाटते की आपण खूप काम केले आहे. जर मी नसतो तर जी 20 चे काय झाले असते. पण जेव्हा आपण एकत्र बसून हे सर्व ऐकतो, तेव्हा माहीत होते की खरे तर माझ्यापेक्षा त्या व्यक्तीने जास्त काम केले आहे, माझ्यापेक्षा जास्त काम ती व्यक्ती करत आहे. अनेक अडचणींमध्ये देखील ती व्यक्ती काम करत होती. तेव्हा आपल्याला वाटते की, नाही नाही मी जे केले ते तर चांगले होतेच, पण इतरांनी जे केले ते देखील खूप चांगले होते, आणि त्यामुळेच हे यश मिळाले आहे.
ज्या क्षणी आपण इतरांचे सामर्थ्य जाणून घेतो, त्यांचे प्रयत्न जाणून घेतो, तेव्हा आपल्याला ईर्ष्या होत नाही, आपल्याला आपल्या अंतरंगात डोकावण्याची संधी मिळते. अच्छा, मी काल असा विचार करत होतो की हे सगळे मीच केले आहे, पण आज समजले की कितीतरी लोकांनी हे काम केले आहे. हे खरे आहे की, तुम्ही लोक ना कोणत्या दूरचित्रवाणी वाहिनीवर दिसला असाल, ना तुमचा फोटो वर्तमानपत्रात छापून आला असेल, ना तुमचे नाव कुठे छापले गेले असेल. नाव तर त्या लोकांचे छापले जाते ज्यांनी कधीही घाम गाळलेला नाही, कारण त्यांना त्यातच प्राविण्य प्राप्त आहे.
आणि आपण सर्वजण तर श्रमिक आहोत, आणि आजचा कार्यक्रम देखील मजदूर एकतेचे समर्थन करणारा आहे. मी थोडा मोठा श्रमिक आहे आणि तुम्ही सर्वजण छोटे श्रमिक आहात, मात्र आपण सर्वजण श्रमिक आहोत.
या मेहनतीमुळे तुम्हाला आनंद मिळाल्याचे तुमच्या लक्षात आले असेल. म्हणजेच, त्या दिवशी रात्री देखील तुम्हाला कोणी बोलवून काही सांगितले असते, 10 तारखेला, 11 तारखेला, तर तुम्हाला असे वाटले नसते की काम तर पूर्ण झाले आहे, मग का मला उगाच त्रास देत आहेत. तुम्हाला वाटले असते की, नाही नाही, काहीतरी काम नक्की राहिले आहे. चला, आपल्याला जे काम सांगितले आहे तर ते मी पूर्ण करतो. हे चैतन्यच आपली सर्वात मोठी ताकद आहे.
मित्रांनो,
तुम्हाला माहिती असेल की पूर्वी देखील तुम्ही काम केले आहे. तुमच्यापैकी अनेक जणांना, जे 25 वर्ष, 20 वर्ष, 15 वर्षापासून सरकारी नोकरीत आहेत, ते आपल्या कामाच्या ठिकाणाशी जोडले गेलेले आहेत, आपल्या टेबलवरील फायलींशी जोडले गेलेले आहेत, असे होऊ शकते की फायलींची देवाण-घेवाण करतेवेळी आपल्या सहकाऱ्यांना तुम्ही नमस्कार करत असाल, असे होऊ शकते की कधीकधी जेवणाच्या सुट्टीत, चहाच्या वेळी तुम्ही चहा पीत असाल, कधी मुलांच्या शिक्षणाबाबत चर्चा करत असाल. मात्र कार्यालयाचे दैनंदिन कामकाज करताना आपल्याला आपल्या मित्रांच्या सामर्थ्याची कधीच जाण होत नाही. वीस वर्ष सोबत राहून देखील त्या व्यक्तीमध्ये आणखी काय काय वैशिष्ट्य आहेत, हे माहीत होत नाही. कारण आपण सर्वजण एका चाकोरीबद्ध कार्यपद्धतीशी जोडले गेलेले आहोत.
जेव्हा आपण या प्रकारच्या प्रसंगांमध्ये काम करतो तेव्हा प्रत्येक क्षणी नाविन्यपूर्ण विचार करणे आवश्यक असते. आपल्यावर नव्या जबाबदाऱ्या पडत असतात, नवीन आव्हाने समोर उभे राहतात, त्यांचे निराकरण करत असताना एखाद्या सहकाऱ्याला आपण पाहतो, तेव्हा वाटते की, आपल्या सहकाऱ्यामध्ये अनेक सर्वोत्कृष्ट गुण आहेत. म्हणजेच, हे कोणत्याही प्रशासनाच्या यशासाठी एखाद्या क्षेत्रात या प्रकारे खांद्याला खांदा लावून एकत्रित काम करण्यामुळे मनातील कप्पे नष्ट होतात. सर्व प्रकारचे उभे, आडवे कप्पे नष्ट होतात आणि आपसूकच एका संघाचा जन्म होतो.
तुम्ही गेली कित्येक वर्षे काम करत आहात, मात्र येथे जी 20 च्या काळात तुम्ही अनेक रात्री जागरण केले असेल, रात्रभर काम केले असेल, जवळपासच्या पदपथावर चहाची टपरी शोधली असेल. यादरम्यान ज्या नव्या मित्रांची भेट झाली असेल, तसे मित्र कदाचित वीस वर्षांच्या, पंधरा वर्षांच्या नोकरीच्या काळात तुम्हाला भेटले नसतील. असे नवे सामर्थ्यवान मित्र तुम्हाला या कार्यक्रमात नक्की भेटले असतील. आणि म्हणूनच एकत्र मिळून काम करण्याच्या संधी शोधल्या पाहिजेत.
आता जसे सर्व विभागांमध्ये स्वच्छता अभियान राबवले जात आहे. त्यात विभागातील सर्व लोकांनी एकत्र येऊन काम करावे, सचिवांनी देखील आपल्या कक्षातून बाहेर येऊन सर्वांच्या सोबतीने काम करावे, यामुळे वातावरण एकदम बदलून जाईल. मग ते काम काम राहणार नाही, तर तो एक उत्सव वाटू लागेल. चला, आज आपल्याला आपले घर आवरायचे आहे, आपले कार्यालय आवरायचे आहे, आपल्या कार्यालयातील फाईल निकाली काढायच्या आहेत, या कामामुळे एक प्रकारचा आनंद मिळतो. आणि माझे प्रत्येकाला हे सांगणे आहे, कधी कधी तर मी हे देखील सांगतो की, बंधुनो, वर्षातून एखाद्या वेळी आपल्या आपल्या विभागाची सहल काढा. जवळच कुठेतरी बस करून जा आणि 24 तास एकमेकांच्या सोबत राहा. सामुहिकतेमध्ये एक शक्ती असते. जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा कधी कधी तर मित्रांनो असं वाटतं काय फक्त मीच करायचं, काय माझ्याच वाट्याला हे सगळं येतं, पगार तर सगळेच घेतात, पण काम तर मलाच करावं लागतं! जेव्हा एकटे असतो तेव्हा असे विचार मनात येत राहतात. मात्र जेव्हा आपण सगळे एकत्र असतो तेव्हा लक्षात येतं की अरे नाही, माझ्यासारखे कितीतरी लोक आहेत, ज्यांच्यामुळे आपल्याला यश मिळत असतं. ज्यांच्यामुळे आपल्या सर्व व्यवस्था सुविहीत सुरू राहतात.
मित्रांनो,
आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला नेहमीच आपल्यापेक्षा वर जे लोक आहेत ते आणि आपण ज्यांच्याकडून काम करून घेतो ते, अशा श्रेणी, वर्गवारी, शिष्टाचाराच्या दुनियेतून बाहेर पडून विचार करायला पाहिजे! आपल्याला कल्पनाही नसते की या लोकांमध्ये असं काय सामर्थ्य असतं! आणि जेव्हा आपण आपल्या सहकाऱ्यांमधली ताकद ओळखतो तेव्हा आपल्याला काही अचाट असे परिणाम मिळायला लागतात. कधीतरी आपण आपल्या कार्यालयात हे आजमावून पहा. मी तुम्हाला एक छोटासा खेळ सांगतो तो करून पहा. असं धरून चाला की तुमच्याकडे तुमच्या विभागात तुम्ही वीस सहकाऱ्यांसह काम करत आहात. तर एक रोजनिशी घ्या, एक दिवस ती ठेवा आणि त्या 20 ही जणांना पाळीपाळीनं सांगा, नाहीतर एक मतदान खोक्यासारखं काहीतरी ठेवा, तर त्यांना सांगा की, त्या वीस जणांनी आपापली पूर्ण नावं, ते मूळ कुठले राहणारे आहेत, इथे काय काम करतात आणि त्यांच्यात एक असं काय वैशिष्ट्य आहे, असा कुठला विशिष्ट गुण आहे…. तुम्ही त्यांना हे विचारत बसायचं नाहीये. त्यांना सांगायचंय की तुम्ही जे निरीक्षण केलं आहे ते लिहून फक्त त्या खोक्यात टाका आणि तुम्ही कधीतरी त्या 20 लोकांचे ते कागद वाचा. तुम्हाला नवल वाटेल की एकतर तुम्हाला त्यांच्या गुणांविषयी माहिती नाहीये, जास्तीत जास्त आपण सांगाल त्याचं हस्ताक्षर छान आहे, जास्तीत जास्त तुम्ही म्हणाल तो वेळेवर येतो, जास्तीत जास्त तुम्ही सांगाल तो नम्र आहे, मात्र त्याच्या आत असे कुठले गुण आहेत त्या गुणांकडे आपली दृष्टीच वळलेली नाही, हे तुमच्या लक्षात येईल. एकदा प्रयत्न करा की खरोखरच तुमच्या आजूबाजूला जी लोकं आहेत त्यांच्या आत वेगळे असे काय गुण आहेत? जरा पहा तर खरं! तुम्हाला एक अकल्पनीय अनुभव मिळेल, कल्पनातीत अनुभव मिळेल.
मित्रांनो, वर्षानुवर्ष, माझ्यावर मनुष्यबळासोबत काम करण्याची वेळ आली आहे. मला कधी यंत्रावर काम करण्याची पाळी नाही आली, माणसांसोबत काम करायची आली. तर त्यामुळे मनुष्यबळाविषयीच्या या सर्व गोष्टी मी पुरेपूर जाणून आहे. हे निमित्त, क्षमता उभारणीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची संधी आहे. कुठलीही एखादी घटना जरा सुनियोजित पद्धतीने केली तर त्याचे काय परिणाम होतात आणि काय परिणाम व्हायचे असतात… चला, असं तर होतच राहतं, हे पण होईल अशा पद्धतीने काम केलं तर काय अवस्था होते? आपल्या या देशासमोर याचे दोन अनुभव आहेत. एक- काही वर्षांपूर्वी आपल्या देशात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन झालं होतं. या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांविषयी कुठेही काही बोललो, तर दिल्लीची, दिल्लीच्या बाहेरची व्यक्ती यांच्या मनावर या आपल्या देशातील राष्ट्रकुल स्पर्धेची एक काय प्रतिमा बनलेली दिसून येते? आपल्यापेक्षा वयाने जेष्ठ आहेत त्यांना त्या गोष्टी आठवत असतील. खरोखर, खरं तर तो एक असा प्रसंग होता की त्या माध्यमातून आपण देशाचं जगासमोर ब्रॅण्डिंग करू शकलो असतो, देशाची ओळख निर्माण करू शकलो असतो, देशाचं सामर्थ्य वाढवू शकलो असतो आणि देशाचं सामर्थ्य जगाला दाखवून देऊ शकलो असतो. मात्र दुर्भाग्य असं की काही अशा गोष्टींमुळे हा कार्यक्रम झाकोळला गेला की त्यावेळी जे लोक काही करण्या-धरण्यासारखे होते ते सुद्धा बदनाम झाले, देश सुद्धा बदनाम झाला आणि त्यातून सरकारी व्यवस्थेत आणि एकंदर स्वभावधर्मात असं काही नैराश्य पसरलं की… अरे यार असं तर आपण नाही करायला पाहिजे….. सगळीच गडबड झाली…..आपण संपूर्ण हिम्मत हरून बसलो.
दुसरं उदाहरण म्हणजे जी-20! असं काही नाहीये की या आयोजनत सुद्धा काहीच त्रुटी राहून गेली नसेल. असंही काही नाहीये की जे सगळं करू इच्छिलं होतं ते सर्व अगदी शंभर टक्के पूर्ण झालं असेल. कुणी 94% पर्यंत पोहोचला असेल, कुणी 99% पर्यंत,तर कुणी अचूक काम करण्याचे 102 टक्के पण गाठले असतील. मात्र एकंदर बघायला गेलं, तर हा एक सर्वांच्या योगदानाचा मिळून एकत्रित असा संचयात्मक परिणाम होता. हा परिणाम, देशाच्या सामर्थ्याला सर्व जगासमोर मांडण्यात आपल्याला यश देऊन गेला. हे जे यश आहे ते जी-20 चं यश आहे आणि जगभरात दहा वर्तमानपत्रांमध्ये त्याबाबत काही संपादकीय छापून आली असतील तर मोदीला त्याचं काही देणं घेणं नाही. माझ्यासाठी आनंदाचा विषय हा आहे की आता माझ्या देशात एक असा विश्वास निर्माण झाला आहे की अशा प्रकारचं कुठलही काम देश आता खूप चांगल्या पद्धतीनं करू शकतो.
यापूर्वी जगात कुठेही काही आपत्ती आली, कुठल्याही मानवी हितसंबंधांविषयी मुद्दांवर काम करायचं झालं, तर पाश्चिमात्य जगाचच नाव समोर येत असे. सतत असं समोर यायचं की भाई जगात कुठे काही घडलं, तर तो फलाणा देश, तो तमुक एक देश तिथे जाऊन पोहोचला, त्यानं अमुक करून दाखवलं…. आपण या सर्व चित्रांमध्ये कुठेच नसायचो… आपलं कुठेच नावही येत नसे. मोठमोठे देश, पाश्चिमात्त्य देश, यांचीच फक्त चर्चा व्हायची. मात्र आपण हे बघितलं की जेव्हा नेपाळमध्ये भूकंप आला आणि आपल्या लोकांनी ज्या प्रकारे तिथे बचावकार्य केलं, फिजीमध्ये जेव्हा वादळ आलं तेव्हा तिथे ज्या प्रकारे आपल्या लोकांनी काम केलं, श्रीलंकेवर संकट ओढवलं तेव्हा आपल्याला तिथे मदतीच्या चीजवस्तू पोहोचवायच्या होत्या, मालदीव मध्ये विजेचं संकट आलं, पिण्याचं पाणी नव्हतं, तेव्हा ज्या वेगानं आपल्या लोकांनी तिथे पाणी पोहोचवलं, येमेन मध्ये आपले लोक संकटात होते तेव्हा ज्या प्रकारे आपण त्यांना भारतात परत घेऊन आलो, तुर्कीयेमध्ये भूकंप झाला…. भूकंपानंतर त्वरित आपले लोक तिथे पोहोचले, या सर्व घटनांमधून आज जगात असा एक विश्वास निर्माण झाला आहे की मनुष्यहिताच्या कामांमध्ये आज भारत समर्थपणे उभा राहिला आहे. संकटाच्या प्रत्येक वेळी भारत जगात पोहोचू शकतो.
आता जेव्हा जॉर्डन मध्ये भूकंप आला, तेव्हा मी तर जी-20 शिखर परिषदेत व्यग्र होतो. मात्र तरीही मी सकाळी सकाळी सर्वप्रथम अधिकाऱ्यांना फोन केला की पहा आपण जॉर्डनमध्ये मदतीसाठी कसे पोहोचू शकतो ते बघा आणि तेव्हा सर्व सज्जता सिद्धता करून ठेवली… आपली कुठली जहाजं न्यावी लागतील, कोणकोणती साधनसामुग्री न्यावी लागेल, कोण जाईल, सर्व सिद्धता सज्ज झाली होती. एकीकडे जी-20 परिषद सुरू होती आणि दुसरीकडे जॉर्डनच्या मदतीसाठी पोहोचण्याची तयारी सुरू होती. हे सामर्थ्य आहे आपलं! हे ठीक आहे जॉर्डनने सांगितलं की त्यांची ज्या प्रकारची क्षेत्रीय रचना आहे, त्यानुसार त्यांना तशा प्रकारच्या मदतीची गरज भासणार नाही. त्यांना गरज भासली नाही आणि आपल्याला जावं लागलं नाही. आणि त्यांनी स्वतःची जी काही परिस्थिती आहे ती सांभाळून घेतली.
माझ्या सांगण्याचं तात्पर्य हे आहे की जिथे आपण कधीच दिसत नव्हतो, आपलं कुठे नाव सुद्धा घेतलं जायचं नाही, तर एवढ्या कमी वेळात आपण आता ती स्थिती पालटवून नवी स्थिती निर्माण केली आहे. आपल्याला एका जागतिक ओळखीची खूप आवश्यकता आहे. आता मित्रांनो, इथे आम्ही सर्व लोक बसलो आहोत, संपूर्ण मंत्रिमंडळ आहे, इथे सर्व सचिव आहेत आणि या कार्यक्रमाची रचना अशी आहे की तुम्ही सर्वजण पुढे आहात आणि ही सर्व मंडळी मागे आहेत, एरवी स्थिती उलट असते आणि मला यातच आनंद मिळतो, कारण जेव्हा मी आपल्याला इथे या ठिकाणी एक आधार म्हणून पाहतो तेव्हा मला जाणवतं की माझा पाया तर मजबूत आहे… वर थोडी उलथापालथ झाली तरी काही हरकत नाही!
आणि म्हणून मित्रांनो, आता आपण प्रत्येक कामाचा जागतिक संदर्भात विचार करू आणि ताकदीने काम करू. आता जी-20 परिषदेचच बघा, जगभरातून एक लाख लोक इथे आले आणि हे लोक त्या देशाच्या निर्णय घेणार्या चमुचाच भाग होते, धोरणकर्त्या चमुचा भाग होते. आणि त्यांनी येऊन भारत पाहिला, ओळखला आणि त्यातील विविधता अनुभवली. आपल्या देशात गेल्यावर ते या गोष्टी सांगणार नाहीत, असं नाही. ते नक्की सांगतील! याचा अर्थ ते तुमच्या पर्यटनाचा दूत म्हणून गेले आहेत.
तुम्हाला आठवत असेल की ते इथे आल्यावर तुम्ही त्यांना नमस्कार केला होता, त्यांना विचारले होते की, तुम्ही त्यांची काय सेवा करू शकता. तुम्ही त्याला विचारलं, बरं तुला चहा हवाय का? तुम्ही इतकं काम केलं, त्यांना अभिवादन करून, त्यांच्यासाठी चहा मागवून, त्यांना असलेली कुठलीही गरज पूर्ण करून तुम्ही त्यांच्यात भारताचे दूत होण्याचे बीज पेरले आहे. तुम्ही एवढी मोठी सेवा केली आहे. ते भारताचा राजदूत बनतील, जिथे जातील तिथे ते म्हणतील, अरे भाई, भारत पाहण्यालायक आहे, तिथे असं आहे, तसं आहे. तिथे असं घडत असतं. तंत्रज्ञानात भारत असा पुढे आहे, असं ते नक्कीच म्हणतील. माझ्या सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की आपल्याला संधी आहे, आपल्या पर्यटनक्षेत्राला नवीन उंचीवर नेण्याची!