शासन व्यवस्थेत खूप मोठी भूमिका पार पाडणारी आपली तरुण चाकोरीबाहेरचा विचार करण्यासाठी सज्ज आहे. नवीन करून दाखवण्याचा त्यांचा निर्धार आहे. मला या संवादातून एक नवी आशा जागृत झाली आहे आणि म्हणूनच मी तुमचे अभिनंदन करतो. गेल्या वर्षी आजच्याच दिवशी केवडीया इथे तुमच्या आधीच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांबरोबर माझी सविस्तर चर्चा झाली होती. आणि असे ठरले होते कि दरवर्षी आरंभ या विशेष आयोजनासाठी इथेच सरदार पटेल यांचा जो पुतळा आहे, नर्मदा नदीचा किनारा आहे तिथेच आपण भेटू आणि सगळे एकत्रितपणे चिंतन-मनन करू आणि प्रारंभिक अवस्थेतच आपण आपल्या विचारांना एक आकार देण्याचा प्रयत्न करू. मात्र कोरोनामुळे यावेळी हे शक्य झाले नाही. यावेळी तुम्ही सर्वजण मसुरीत आहात, व्हर्चुअल पद्धतीने जोडलेले आहात. या व्यवस्थेशी निगडित सर्व लोकांना माझी विनंती आहे कि जेव्हा कोरोनाचा प्रभाव आणखीन कमी होईल, मी सर्व अधिकाऱ्यांना देखील सांगून ठेवतो कि तुम्ही सर्वजण एक छोटेसे शिबीर इथे सरदार पटेलांच्या या भव्य प्रतिमेच्या सान्निध्यात आयोजित करा, थोडा वेळ इथे व्यतीत करा, आणि भारताचे हे अनोखे शहर म्हणजेच एक पर्यटन स्थळ कसे विकसित होत आहे त्याचाही तुम्ही जरूर अनुभव घ्या.
मित्रानो, एक वर्षांपूर्वी जी स्थिती होती आणि आज जी स्थिती आहे, त्यात खूप मोठा फरक आहे. मला विश्वास आहे कि संकटाच्या या काळात देशाने ज्याप्रमाणे काम केले, देशातील व्यवस्थांनी ज्याप्रकारे काम केले त्यातून तुम्ही देखील खूप काही शिकला असाल. जर तुम्ही नुसते पाहिले असेल, व्यवस्थित निरीक्षण केले असेल तर तुम्हाला देखील खूप काही आत्मसात केल्यासारखे वाटत असेल. कोरोना विरुद्ध लढाईसाठी अशा अनेक गोष्टी ज्यासाठी देश दुसऱ्यांवर अवलंबून होता. आज भारत त्यापैकी अनेक देशांना निर्यात करण्याच्या स्थितीत आला आहे. संकल्पातून सिद्धिचे खूप शानदार उदाहरण आहे.
मित्रांनो, आज भारताच्या विकास यात्रेच्या ज्या महत्वपूर्ण कालखंडात तुम्ही आहात, ज्या काळात तुम्ही नागरी सेवेत आला आहात, तो खूप खास आहे. तुमची तुकडी, जेव्हा कामाला सुरुवात करेल, जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष ठिकाणांना भेट द्यायला सुरुवात कराल तेव्हा भारत आपल्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात असेल, हा खूप मोठा मैलाचा दगड आहे. म्हणजे तुमचा या व्यवस्थेत प्रवेश आणि भारताचे 75 वे स्वातंत्र्याचे पर्व आणि मित्रांनो, तुम्हीच ते अधिकारी आहात, माझे हे म्हणणे विसरू नका, आज शक्य असेल तर खोलीत जाऊन डायरीत लिहून ठेवा, मित्रानो, तुम्हीच ते अधिकरी आहात जे त्यावेळी देखील देशसेवेत असतील, आपल्या कारकीर्दीच्या, आपल्या जीवनातील महत्वपूर्ण टप्प्यावर असतील, जेव्हा भारत आपल्या स्वातंत्र्याची 100 वर्ष साजरी करेल. स्वातंत्र्याची 75 वर्ष ते 100 वर्ष यामधील ही 25 वर्षे, भारतासाठी खूप महत्वाची आहेत आणि तुम्ही ती भाग्यशाली पिढी आहात, तुम्ही ते लोक आहात जे या 25 वर्षात सर्वात महत्वपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेचा भाग असतील. पुढील 25 वर्षात देशाची रक्षा-सुरक्षा, गरीबांचे कल्याण, शेतकऱ्यांचे कल्याण, महिला-युवकांचे हित, जागतिक स्तरावर भारताचे एक उचित स्थान, खूप मोठी जबाबदारी तुम्हा लोकांवर आहे. आमच्यापैकी अनेक लोक तेव्हा तुमच्याबरोबर नसतील, मात्र तुम्ही असाल, तुमचे संकल्प असतील. तुमच्या संकल्पाची सिद्धी असेल, आणि म्हणूनच आजच्या या पवित्र प्रसंगी तुम्हाला स्वतःला खूप सारी वचने द्यायची आहेत, मला नाही, स्वतःला. ती वचने ज्यांचे साक्षीदार केवळ आणि केवळ तुम्हीच असाल , तुमचा आत्मा असेल. माझी तुम्हाला विनंती आहे कि आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला अर्धा तास जरूर द्या. मनात जे चालले आहे, आपले कर्तव्य, आपले दायित्व, आपल्या निर्धाराबाबत तुम्ही जो विचार करत आहात, ते लिहून ठेवा.
मित्रांनो, ज्या कागदावर तुम्ही तुमचे संकल्प लिहाल, ज्या कागदावर तुम्ही तुमची स्वप्ने शब्दबद्ध कराल, कागदाचा तो तुकडा केवळ कागदाचा नव्हे तर तुमच्या हृदयाचा एक तुकडा असेल. हा तुकडा आयुष्यभर तुमचे संकल्प साकार करण्यासाठी तुमच्या हृदयाचा ठोका बनून तुमच्याबरोबर राहील. जसे तुमचे हृदय, शरीरात निरंतर प्रवाह घेऊन येते त्याप्रमाणे या कागदावर लिहिलेला प्रत्येक शब्द तुमच्या जीवनाच्या संकल्पना, त्याच्या प्रवाहाला निरंतर गती देत राहतील.प्रत्येक स्वप्नाला संकल्प आणि संकल्प ते सिद्धिच्या प्रवाहात पुढे घेऊन जातील. मग तुम्हाला कुठलीही प्रेरणा, कुठल्याही शिकवणीची गरज भासणार नाही. हा तुमचाच लिहिलेला कागद तुमच्या हृदयातून प्रकट झालेले शब्द, मन मंदिरातून बाहेर आलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला आजच्या दिवसाची आठवण करून देईल, तुमच्या संकल्पांची आठवण करून देत राहील.
मित्रांनो, एक प्रकारे सरदार वल्लभ भाई पटेल हेच देशाच्या नागरी सेवेचे जनक होते. 21 एप्रिल 1947 प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या पहिल्या तुकडीला संबोधित करताना सरदार पटेल यांनी नागरी सेवकांना देशाची पोलादी चौकट म्हटले होते. त्या अधिकाऱ्यांना सरदार साहेबांनी सल्ला दिला होता कि देशाच्या नागरिकांची सेवा आता तुमचे सर्वोच्च कर्तव्य आहे. माझाही तुम्हाला हाच आग्रह आहे कि नागरी सेवक जे काही निर्णय घेतील ते राष्ट्रीय संदर्भातील असावेत, देशाची एकता अखंडता मजबूत करणारे असावेत. राज्य घटनेची भावना कायम राखणारे असावेत. तुमचे क्षेत्र भले ही छोटे असेल, तुम्ही जो विभाग संभाळाल त्याची व्याप्ती भलेही कमी असेल, मात्र निर्णयांमध्ये नेहमीच देशाचे हित, जनतेचे हित असायला हवे, एक राष्ट्रीय दृष्टिकोन असायला हवा.
मित्रांनो, पोलादी चौकटीचे काम केवळ आधार देणे, विद्यमान व्यवस्था सांभाळणे एवढेच नसते. पोलादी चौकटीचे काम देशाला ही जाणीव करून देणे देखील असते कि कितीही मोठे संकट आले किंवा मोठे परिवर्तन झाले, तुम्ही एक ताकद बनून देशाला पुढे घेऊन जाण्यात आपली जबाबदारी पार पाडाल. तुम्ही मदतनीसाप्रमाणे यशस्वीपणे आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण कराल. गावागावात जाऊन, विविध प्रकारच्या लोकांच्या गोतावळ्यात राहून आपली ही भूमिका निरंतर स्मरणात ठेवायची आहे, विसरायची चूक कधी करू नका. तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचे आहे कि फ्रेम कुठलीही असो, गाडीची, चष्म्याची किंवा फोटोची, जेव्हा ती एकजूट राहते तेव्हाच सार्थक ठरते. तुम्ही ज्या स्टील फ्रेमचे प्रतिनिधित्व करत आहात त्याचाही अधिक प्रभाव तेव्हाच राहील जेव्हा तुम्ही टीम मध्ये असाल, संघटितपणे काम कराल. पुढे जाऊन तुम्हाला संपूर्ण जिल्हे सांभाळायचे आहेत, विविध विभागांचे नेतृत्व करायचे आहे. भविष्यात तुमही असेही निर्णय घ्याल ज्याचा प्रभाव संपूर्ण राज्यावर पडेल. संपूर्ण देशावर पडेल. त्यावेळी तुमची ही टीम भावना तुम्हाला अधिक उपयोगी ठरेल. जेव्हा तुम्ही वैयक्तिक संकल्पांबरोबर देशहिताचे बृहत उद्दिष्ट जोडाल, भलेही कुठल्याही सेवेतील असतील,एखाद्या टीमप्रमाणे संपूर्ण ताकद लावेल, तेव्हा तुम्ही देखील यशस्वी व्हाल आणि मी विश्वासाने सांगतो कि देशही कधी असफल होणार नाही.
मित्रांनो, सरदार पटेल यांनी एक भारत-श्रेष्ठ भारताचे स्वप्न पाहिले होते. त्यांचे हे स्वप्न ‘आत्मनिर्भर भारत’ शी जोडलेले होते. कोरोना जागतिक महामारी दरम्यान आपल्याला जो सर्वात मोठा धडा मिळाला आहे तो आत्मनिर्भरतेचाच आहे. आज ‘एक भारत-श्रेष्ठ भारत' भावना, ‘आत्मनिर्भर भारत’ ची भावना, एक ‘नवीन भारत’ निर्माण होताना पाहत आहे. नवीन होण्याचे अनेक अर्थ असू शकतात. अनेक भाव असू शकतात. मात्र माझ्यासाठी नवीनचा अर्थ एवढाच नाही कि तुम्ही जुने बाजूला साराल आणि काहीतरी नवे घेऊन याल . माझ्यासाठी नवीनचा अर्थ आहे, कायाकल्प करणे, सर्जनशील बनणे, ताजेतवाने होणे, आणि ऊर्जाशील बनणे. माझ्यासाठी नवीन होण्याचा अर्थ आहे, जे जुने आहे ते अधिक प्रासंगिक बनवणे, जे कालबाह्य आहे ते सोडून पुढे जाणे. सोडण्यासाठी देखील साहस लागते. आणि म्हणूनच आज नवीन, श्रेष्ठ आणि आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी काय आवश्यक आहे, ते तुमच्या माध्यमातून कसे पूर्ण होईल यावर तुम्हाला निरंतर मंथन करावे लागेल. मित्रांनी ही गोष्ट खरी आहे कि आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञानाची गरज भासणार आहे, संसाधने आणि आर्थिक सहाय्य लागणार आहे. मात्र महत्वपूर्ण हे देखील आहे कि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक नागरी सेवक म्हणून तुमची भूमिका काय असेल. लोकांच्या आकांक्षा पूर्ण करताना, आपल्या कामाचा दर्जा कायम राखताना गती कायम राखताना तुम्हाला देशाचे हे उद्दिष्ट चोवीस तास लक्षात ठेवावे लागेल.
मित्रांनो, देशात नव्या परिवर्तनासाठी, नवीन उद्दिष्टाच्या प्राप्तीसाठी नवीन मार्ग आणि नवीन पद्धती स्वीकारण्यासाठी प्रशिक्षणाची खूप मोठी भूमिका असते. कौशल्य विकासाची देखील मोठी भूमिका असते. पूर्वीच्या काळी यावर एवढा भर दिला जात नव्हता. प्रशिक्षणात आधुनिक दृष्टिकोन कसा येईल, यावर जास्त विचार झाला नाही.मात्र आता देशात मनुष्यबळाच्या योग्य आणि आधुनिक प्रशिक्षणावर देखील भर दिला जात आहे. तुम्ही स्वतःदेखील पाहिले आहे कि कसे मागील दोन-तीन वर्षात नागरी सेवेच्या प्रशिक्षणाचे स्वरूप खूप बदलले आहे. हा ‘आरंभ’ केवळ आरंभ नाही तर, एक प्रतीक देखील आहे. आणि एक नवीन परंपरा देखील आहे. असेच सरकारने काही दिवसांपूर्वी आणखी एक अभियान सुरु केले- मिशन कर्मयोगी।मिशन कर्मयोगी, क्षमता निर्मितीच्या दिशेनं एक नवीन प्रयोग आहे. या अभियानाच्या माध्यमातून, सरकारी कर्मचाऱ्यांना, त्यांचे विचार -दृष्टिकोन आधुनिक बनवायचे आहे, त्यांचे कौशल्य सुधारायचे आहे. त्यांना कर्मयोगी बनण्याची संधी द्यायची आहे.
मित्रांनो, गीतेत भगवान कृष्णाने म्हटले आहे – ‘यज्ञ अर्थात् कर्मणः अन्यत्र लोकः अयम् कर्म बंधनः’। अर्थात, यज्ञ म्हणजे सेवेशिवाय स्वार्थासाठी केलेले काम, कर्तव्य नसते.ते उलट आपल्याला बांधणारे काम असते. कर्म ते आहे जे मोठ्या दूरदृष्टीसह केले जाते. एका मोठ्या उद्दिष्टासाठी केले जाते. याच कर्माचा कर्मयोगी आपण सर्वाना बनायचे आहे, मलाही बनायचे आहे. तुम्हालाही बनायचे आहे. आपल्या सर्वाना बनायचे आहे. मित्रानो, तुम्ही सर्वजण ज्या मोठ्या प्रदीर्घ प्रवासाला निघाला आहात त्यात नियमांचे मोठे योगदान आहे.मात्र त्याचबरोबर तुम्हाला भूमिकेवर देखील अधिक लक्ष द्यायचे आहे. नियम आणि भूमिका, कायम संघर्ष सुरु राहील अनेकदा तणाव निर्माण होईल. नियमांचे आपले महत्व आहे. भूमिकेची आपली महत्वपूर्ण जबाबदारी आहे. या दोन्हीचे संतुलन हेच तर तुमच्यासाठी डोंबाऱ्याचा खेळ आहे. मागील काही काळात सरकारने देखील भूमिका आधारित दृष्टिकोनावर खूप भर दिला आहे त्याचे परिणामही दिसून येत आहेत. एक, नागरी सेवेत क्षमता आणि स्पर्धात्मकतेसाठी नवीन व्यवस्था निर्माण झाली आहे. दोन – शिकण्याच्या पद्धतीत लोकशाही आहे. आणि तीन – प्रत्येक अधिकाऱ्यांसाठी त्याच्या क्षमता आणि अपेक्षेनुसार त्याचे दायित्व ठरत आहे. या दृष्टिकोनासह काम करण्यामागे हा विचार आहे कि जेव्हा तुम्ही प्रत्येक भूमिका योग्य रीतीने पार पाडाल तेव्हा तुम्ही तुमच्या एकंदर आयुष्यात देखील सकारात्मक राहाल. हीच सकारात्मकता तुमच्या यशाचे मार्ग खुले करेल, तुमच्या एक कर्मयोगी म्हणून जीवनात समाधानाचे एक खूप मोठे कारण बनेल
मित्रांनो, असे म्हटले जाते कि आयुष्य एक धडाडीची स्थिती आहे. प्रशासन हे देखील एक धडाडीपुर्ण संकल्पना आहे. म्हणूनच आपण प्रतिसादात्मक प्रशासनाबाबत बोलतो. एका नागरी सेवकासाठी सर्वप्रथम आवश्यक आहे कि तुम्ही देशातील सामान्य माणसाशी जोडलेले असायला हवे.जेव्हा तुम्ही लोकांशी जोडले जाल तेव्हा लोकशाहीत काम करणे अधिक सुलभ होईल. तुम्ही लोक फाउंडेशन ट्रेनिंग आणि प्रोफेशनल ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर फील्ड ट्रेनिंगसाठी जाल मी पुन्हा तुम्हाला सल्ला देईन, तुम्ही तिथे लोकांमध्ये सहभागी व्हा, दूर राहू नका. डोक्यात कधीही बाबू येऊ देऊ नका. तुम्ही ज्या भूमीवरून आला आहात, ज्या कुटुंब, समाजातून आला आहात ते कधीही विसरू नका. समाजाशी जोडलेले राहा. एक प्रकारे सामाजिक जीवनात विलीन व्हा. समाज तुमच्या शक्तीचा आधार बनेल. तुमचे दोन हात सहस्त्र बाहू बनतील. हे सहस्त्र बाहू जन-शक्ति असते. त्यांना समजण्याचा, त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न जरूर करा. मी नेहमी म्हणतो, सरकार सर्वोच्च नेत्यामुळे चालत नाही. धोरणे ज्या जनतेसाठी आहेत, त्यांचा समावेश खूप आवश्यक आहे. जनता केवळ सरकारच्या धोरणांची, कार्यक्रमांची लाभार्थी नाही, जनता जनार्दन हाच खरा क्रियाशील घटक आहे. म्हणूनच आपल्याला सरकारकडून प्रशासनाकडे वळण्याची गरज आहे.
मित्रांनो, या अकादमीतून बाहेर पडल्यावर जेव्हा तुम्ही पुढे वाटचाल कराल, तेव्हा तुमच्यासमोर दोन मार्ग असतील. एक मार्ग सोपा, सुविधा असलेला, नाव आणि प्रतिष्ठेचा मार्ग असेल. एक मार्ग असेल जिथे आव्हाने असतील, संकटे असतील, संघर्ष असेल, समस्या असतील. मात्र मी माझ्या अनुभवातून तुम्हाला आज एक गोष्ट सांगू इच्छितो. तुम्हाला खरी अडचण तेव्हा भासेल जेव्हा तुम्ही सोपा मार्ग निवडाल. तुम्ही पाहिले असेल, जो रस्ता सरळ असतो, कुठेही वळणे नसतात, तिथे सर्वात जास्त दुर्घटना होतात. मात्र नागमोडी वळणे असलेले जे रस्ते असतात तिथे चालक खूप सतर्क असतो. तिथे अपघात कमी होतात. म्हणूनच सोपा -सरल मार्ग कधी ना कधी खूप कठीण बनतो. राष्ट्र निर्माण, आत्मनिर्भर भारताचे जे उद्दिष्ट घेऊन तुम्ही पुढे पाऊल टाकत आहात त्यात सोपे मार्ग मिळतील हे जरुरी नाही आणि मनात तशी इच्छा देखील बाळगू नये. तुम्ही जेव्हा प्रत्येक आव्हानाचा सामना करत पुढे जाल, लोकांचे जीवनमान सुलभ बनवण्यासाठी निरंतर काम कराल, तेव्हा त्याचा लाभ केवळ तुम्हाला नाही तर संपूर्ण देशाला होईल. आणि तुमच्याच नजरेसमोर स्वातंत्र्याच्या 75 वर्षांपासून 100 वर्षांचा प्रवास समृद्ध भारत पाहण्याचा कालखंड असेल. आज देश ज्या पद्धतीने काम करत आहे, त्यात तुम्हा सर्व नोकरशहाची भूमिका "किमान सरकार, कमाल प्रशासन (minimum government maximum governance)ची आहे. तुम्हाला हे सुनिश्चित करायचे आहे कि नागरिकांच्या जीवनात तुमचा हस्तक्षेप कसा कमी होईल. सामान्य माणसाचे कसे सशक्तिकरण होईल.
आपल्याकडे उपनिषदात म्हटले आहे – ‘न तत् द्वतीयम् अस्ति’। अर्थात, कुणी दुसरे नाही आहे, कुणी माझ्यापेक्षा वेगळे नाही. जे काही काम कराल, ज्या कुणासाठी कराल, आपले समजून करा. आणि मी माझ्या अनुभवातून सांगतो कि जेव्हा तुम्ही तुमच्या विभागाला, सामान्य जनतेला आपले कुटुंब समजून काम कराल, तेव्हा तुम्हाला थकवा जाणवणार नाही. तुम्ही नेहमी ऊर्जेने प्रफुल्लित असाल. मित्रांनो, फील्ड पोस्टिंग दरम्यान आम्ही हे देखील पाहतो कि अधिकार्यांची ओळख यातूनही बनते की ते अतिरिक्त काय काम करतात. जे सुरु आहे त्यात वेगळे काय करत आहेत. तुम्ही देखील ,फील्ड मध्ये फायलींमधून बाहेर येऊन रोजच्या कामापेक्षा वेगळे आपल्या क्षेत्राच्या विकासासाठी , लोकांसाठी जे काही कराल त्यांचा प्रभाव वेगळा असेल, त्याचे परिणाम वेगळे असतील.
उदाहरणादाखल, तुम्ही ज्या जिल्ह्यात, ज्या तालुक्यात काम कराल, त्याठिकाणी काही अशा वस्तू असतील, काही उत्पादने असतील, ज्यात जागतिक पातळीवर पोहोचायचे सामर्थ्य असेल. मात्र, त्या जागतिक उत्पादनांना, त्या कलाकृतींना, त्या कलाकारांना ग्लोबल होण्यासाठी स्थानिक पाठिंब्याची आवश्यकता आहे. हा पाठिंबा देण्याचे काम तुम्हाला करावे लागणार आहे. अशाप्रकारची दूरदृष्टी तुम्हाला प्रदान करावी लागेल. अशाप्रकारे, तुम्ही एखाद्या स्थानिक संशोधकाला (इनोव्हेटरला) शोधून एक सहकारी म्हणून तुम्ही त्याची मदत करु शकता. तुमच्या सहकार्याने हे संशोधन समाजासाठी फार मोठे योगदान म्हणून समोर येईल. तुम्ही विचार करत असाल, हे सर्व तर करु पण मध्येच बदली झाली तर काय होईल? मी सुरुवातीला सांघिक कार्याविषयी सांगितले होते ना ते हेच. जर आज तुम्ही एका ठिकाणी आहात, उद्या दुसरीकडे असाल, तरी त्या क्षेत्रातील तुमचे प्रयत्न सोडू नका, तुमचे ध्येय विसरु नका. तुमच्यानंतर ज्या व्यक्ती येतील त्यांना विश्वासात घ्या. त्यांचा विश्वास वाढवा, त्यांना प्रोत्साहित करा. तुम्ही ज्याठिकाणी असाल तिथून त्यांना मदत करा. तुमच्या स्वप्नांना पुढील पिढीसुद्धा पूर्ण करेल. जे नवीन अधिकारी येतील, त्यांनासुद्धा तुमच्या ध्येयाचे भागीदार बनवू शकता.
मित्रांनो, तुम्ही जिथेही जाल, तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तुम्ही ज्या कार्यालयात असाल, त्या कार्यालयात लावलेल्या फलकावरील कार्यकाळातून तुमची ओळख नसली पाहिजे. तुमची ओळख तुमच्या कामाने झाली पाहिजे. ओळख निर्माण झाल्यास तुम्हाला माध्यमे आणि समाजमाध्यमे आकर्षित करतील. कामाची माध्यमांमध्ये चर्चा होणे हे वेगळे आणि माध्यमांमध्ये चर्चेसाठी काम करणे ही वेगळी बाब आहे. तुम्हाला दोन्हींमधील फरक लक्षात घेऊन पुढे वाटचाल करायची आहे. तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल की, सनदी अधिकाऱ्याने अनाम राहून काम केले पाहिजे. स्वातंत्र्यानंतरचा कालखंड पाहा जे ओजस्वी-तेजस्वी चेहरे कधी कधी आपण त्यांना ऐकतो, ते पूर्ण कार्यकाळात अनाम होते. कोणी नाव ओळखत नव्हते, निवृत्तीनंतर कोणी काही लिहिले त्यानंतर कळते की, अरे या बाबूंनी देशाला एवढे काही दिले आहे, तुमच्यासाठीसुद्धा हे आदर्श आहेत. तुमच्याआधी 4-5 दशकांत जे तुमचे ज्येष्ठ आहेत त्यांनी मोठ्या अनुशासनासह त्याचे अनुसरण केले आहे, तुम्हालाही हे लक्षात ठेवले पाहिजे.
मित्रंनो, जेंव्हा मी माझे तरुण राजकीय सहकारी जे आमदार आहेत, खासदार आहेत त्यांना सांगतो की, ‘दिखास’ आणि ‘छपास’ म्हणजे दिखाऊपणा आणि छापून येण्याच्या दोन आजारांपासून दूर राहा. मी तुम्हालाही सांगतो की, दिखाऊपणा आणि छापून येणे हे दोन रोग आहेत, ज्यामुळे तुमचे ध्येय तुम्ही पूर्ण करु शकणार नाही, ज्यासाठी तुम्ही नागरी सेवेत आला आहात.
मित्रांनो, मला खात्री आहे की, तुम्ही सर्वजण तुमच्या सेवेने, तुमच्या समर्पणाने देशाच्या विकासयात्रेत, देशाला आत्मनिर्भर बनवण्यात मोठे योगदान द्याल. माझे भाषण संपवण्यापूर्वी मी तुम्हाला एक काम देऊ इच्छितो, तुम्ही कराल का, सर्वांनी हात वर करुन सांगितले तर मला वाटेल की, तुम्ही हे कराल. सर्वांचे हात वर होतील का, कराल, मग ऐका तुम्हालाही व्होकल फॉर लोकल ऐकायला चांगले वाटत असेल, वाटते ना, नक्की वाटत असेल, तुम्ही एक काम करा, येणाऱ्या दोन-चार दिवसांत तुमच्याजवळ दैनंदिन वापराच्या ज्या वस्तू आहेत, त्यापैकी किती वस्तू भारतीय बनावटीच्या आहेत, ज्याला भारतीय नागरिकाच्या घामाचा गंध आहे. ज्यात भारतीय युवकाची प्रतिभा दिसते, त्या सामानाची यादी तयार करा आणि दुसरी यादी तुमच्या बुटांपासून डोक्याच्या केसांपर्यंत लागणाऱ्या विदेशी वस्तुंच्या वापराची यादी तयार करा, तुमच्या बॅगेत काय आहे, कशा-कशाचा वापर करता, हे पाहा. आणि मनात ठरवा की, जे अगदीच अनिवार्य आहे, जे भारतात उपलब्ध होऊ शकत नाही, शक्यता नाही, जे ठेवले पाहिजे, मी मानतो की 50 पैकी 30 वस्तू अशा आहेत, ज्या स्थानिक पातळीवर उपलब्ध आहेत. मी त्याच्या प्रचाराच्या प्रभावाखाली आलो नसेल, मी यापैकी किती कमी करु शकतो.
पाहा, आत्मनिर्भरतेची सुरुवात स्वतःपासून झाली पाहिजे. तुम्ही व्होकल फॉर लोकलसाठी काय सुरु करु शकता. दुसरे-ज्या संस्थेचे नाव लाल बहादुर शास्त्री यांच्याशी जोडले आहे, त्या संस्थेत, तुमच्या खोल्यांमध्ये, सभागृहात, वर्गखोल्यात, प्रत्येक जागेवर असलेल्या परदेशी वस्तुंची यादी तयार करा आणि विचार करा की, देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी आला आहात, ज्याठिकाणाहून देशाला पुढे नेणारी एक पिढी निर्माण होते. ज्याठिकाणी बीजधारणा होते, त्या जागेवर व्होकल फॉर लोकल हा आपल्या दिनचर्येचा भाग आहे की नाही पाहा, तुम्हाला मजा येईल. मी असे नाही सांगत की, तुमच्या सहकाऱ्यांसाठी हा मार्ग अनुसरा, हे स्वतःसाठी आहे. तुम्ही पाहा, तुमच्याकडे विनाकारण अशा वस्तू असतील ज्या भारतातील असूनही तुम्ही बाहेरुन खरेदी केली असेल. तुम्हाला माहितीही नसेल की हे बाहेरचे आहे. पाहा, भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी आपण सर्वांनी आत्म पासून सुरुवात करुन देशाला आत्मनिर्भर बनवले पाहिजे.
माझ्या प्रिय सहकाऱ्यांनो, माझ्या युवा सहकाऱ्यांनो, देशाच्या स्वातंत्र्याची 100 वर्षे, स्वातंत्र्याचे 100 वर्षांचे स्वप्न, स्वातंत्र्याचा 100 वर्षांचा संकल्प, स्वातंत्र्याच्या आगामी पिढ्या त्यांना देश तुमच्या हातामध्ये सोपवत आहे. देश आगामी 25-35 वर्षे तुम्हाला सुपुर्द करत आहे. एवढी मोठी भेट तुम्हाला मिळत आहे. तुम्ही याला जीवनाचे अहोभाग्य समजून हाती घ्या, तुमच्या करकमलांमध्ये घ्या. कर्मयोगी भावना जागवा. कर्मयोगाच्या वाटेवर चालण्यासाठी तुम्ही पुढे चाला, या शुभेच्छांसह तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन. तुमचे खूप-खूप धन्यवाद. मी तुम्हाला विश्वास देतो की, मी प्रत्येक क्षण तुमच्यासोबत आहे. क्षणोक्षणी तुमच्यासोबत आहे. जेंव्हा आवश्यकता वाटेल तेंव्हा तुम्ही माझ्याकडे येऊ शकता. जोपर्यंत मी आहे, ज्याठिकाणी असेन, मी आपला मित्र आहे, आपला साथीदार आहे, आपण सर्व मिळून देशाच्या स्वातंत्र्याच्या 100 वर्षाचे स्वप्न साकार करण्यास आतापासून प्रारंभ करु. चला आपण सर्व मार्गक्रमण करु.
खूप-खूप धन्यवाद !