“This museum is a living reflection of the shared heritage of each government”
“This museum has come as a grand inspiration in the time of Azadi ka Amrit Mahotsav”
“Every government formed in independent India has contributed in taking the country to the height it is at today. I have repeated this thing many times from Red Fort also”
“It gives confidence to the youth of the country that even a person born in ordinary family can reach the highest position in the democratic system of India”
“Barring a couple of exceptions, India has a proud tradition of strengthening democracy in a democratic way”
“Today, when a new world order is emerging, the world is looking at India with a hope and confidence, then India will also have to increase its efforts to rise up to the occasion”

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, संसदेतील माझे इतर ज्येष्ठ सहकारी, विविध राजकीय पक्षांचे आदरणीय सहकारी, इतर मान्यवर, स्त्री-पुरुष.

आज देशाच्या विविध भागात सण आणि उत्सवांचे वातावरण आहे. आज बैसाखी, बोहाग बिहू आहेत. आजपासून ओडिया नववर्ष देखील सुरू होत आहे,  तामिळनाडूमधील आपले बंधू-भगिनी देखील नवीन वर्षाचे स्वागत करत आहेत, मी त्यांना 'पुतांथ' च्या शुभेच्छा देतो. याशिवाय अनेक भागात नवीन वर्ष सुरू होत असून, अनेक सण साजरे केले जात आहेत. मी सर्व देशवासियांना सर्व सणांच्या शुभेच्छा देतो. तुम्हा सर्वांना भगवान महावीर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!

 

मित्रांनो,

आजचा हा प्रसंग इतर कारणांमुळे आणखीनच विशेष झाला आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज संपूर्ण देश आदराने, श्रद्धेने त्यांचे स्मरण करत आहे. बाबासाहेब ज्या राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार होते, त्या राज्यघटनेने आपल्याला संसदीय पद्धतीचा आधार दिला. या संसदीय पद्धतीची मुख्य जबबादारी पंतप्रधानपदाची आहे.

पंतप्रधानांचे संग्रहालय राष्ट्राला समर्पित करण्याची संधी आज मला मिळाली आहे हे माझे मोठे भाग्य आहे. ज्या वेळी देश आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे, तेव्हा हे संग्रहालय एक महान प्रेरणा देणारे स्थान बनले आहे. या 75 वर्षांत देशाने अनेक अभिमानाचे क्षण पाहिले आहेत. इतिहासाच्या चौकटीत या क्षणांचे अतुलनीय महत्त्व आहे. अशा अनेक क्षणांची झलक पंतप्रधानांच्या संग्रहालयातही पाहायला मिळणार आहे. मी सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो. काही काळापूर्वी मला या प्रकल्पाशी संबंधित सर्व सहकाऱ्यांना भेटण्याची संधीही मिळाली. सर्वांनी अतिशय कौतुकास्पद काम केले आहे. यासाठी मी संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. मी आज या ठिकाणी माजी पंतप्रधानांच्या कुटुंबियांनाही पाहतोय. तुम्हा सर्वांना शुभेच्छा, तुमचे या ठिकाणी स्वागत आहे. पंतप्रधान संग्रहालयाच्या लोकार्पणाचा हा समारंभ तुम्हा सर्वांच्या उपस्थितीने अधिक भव्य झाला आहे. तुमच्या उपस्थितीने पंतप्रधान संग्रहालयाचे महत्त्व, त्याची प्रासंगिकता आणखी वाढली आहे.

 

मित्रांनो,

देश आज ज्या उंचीवर पोहोचला आहे, त्या उंचीपर्यंत देशाला नेण्यामध्ये स्वतंत्र भारतानंतर स्थापन झालेल्या प्रत्येक सरकारचे योगदान आहे. मी लाल किल्ल्यावरूनही याचा अनेकदा पुनरुच्चार केला आहे. आज हे संग्रहालय प्रत्येक सरकारच्या सामायिक वारशाचे जिवंत प्रतिबिंब बनले आहे. देशाच्या प्रत्येक पंतप्रधानाने आपल्या काळातील विविध आव्हानांवर मात करून देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाचे, सर्जनशीलतेचे, नेतृत्वाचे वेगवेगळे आयाम होते. या सर्व लोकांच्या स्मरणातील गोष्टी आहेत. देशातील जनतेला, विशेषत: तरुणांना, भावी पिढ्यांना सर्व पंतप्रधानांची माहिती मिळाली, तर त्यांना प्रेरणा मिळेल. इतिहास आणि वर्तमानापासून भविष्य निर्माण करण्याच्या मार्गावर राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर जी यांनी एके काळी लिहिले होते-

प्रियदर्शन इतिहास कंठ में, आज ध्वनित हो काव्य बने।

वर्तमान की चित्रपटी पर, भूतकाल सम्भाव्य बने।

याचा अर्थ असा आहे की आपल्या सांस्कृतिक जाणिवेमध्ये जो गौरवशाली इतिहास भरून राहिलेला आहे, त्याचे रुपांतर कवितेमध्ये होऊन त्याचा ध्वनी सर्वत्र घुमत रहावा, या देशाचा समृद्ध इतिहास आपण सद्यस्थितीतही घडवू शकू. येणारी 25 वर्षे, स्वातंत्र्याचा हा अमृतकाळ देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हे नव्याने बांधण्यात आलेले पंतप्रधान संग्रहालय देखील भविष्यातील बांधकामासाठी एक ऊर्जा केंद्र बनेल असा मला विश्वास आहे. वेगवेगळ्या काळात नेतृत्वासमोरील आव्हाने कोणती होती, त्यांना कशा प्रकारे तोंड देण्यात आले, हेही भावी पिढ्यांसाठी प्रेरणा देणारे माध्यम ठरेल. या ठिकाणी पंतप्रधानांशी संबंधित दुर्मिळ छायाचित्रे, भाषणे, मुलाखती, मूळ लिखाण आदी संस्मरणीय वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.

मित्रांनो,

सार्वजनिक जीवनात जे लोक उच्च पदावर आहेत, त्यांच्या जीवनाकडे आपण पाहत असतो, हा देखील एक प्रकारे इतिहासाचे अवलोकन करण्याचाच एक प्रकार आहे. त्यांच्या आयुष्यातील घटना, त्यांच्यासमोर निर्माण झालेली आव्हाने, त्यांचे निर्णय हे सर्व बरेच काही शिकवतात. म्हणजे एकप्रकारे त्यांचे जीवनकार्य सुरू असते आणि त्याचबरोबर इतिहास घडवण्याचे कामही सुरू राहते. त्यांच्या जीवनाची माहिती घेणे म्हणजे इतिहासाचा अभ्यास करण्यासारखे आहे. या संग्रहालयातून स्वतंत्र भारताचा इतिहास जाणून घेता येईल. आपण काही वर्षांपूर्वी संविधान दिन साजरा करून राष्ट्रीय चेतना जागृत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. त्याच दिशेने हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे.

 

मित्रांनो,

घटनात्मक लोकशाहीच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी देशाच्या प्रत्येक पंतप्रधानांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांचे स्मरण करणे म्हणजे स्वतंत्र भारताचा प्रवास जाणून घेणे होय. येथे येणार्‍या लोकांना देशाच्या आजी-माजी पंतप्रधानांचे योगदान, त्यांची पार्श्वभूमी, त्यांनी केलेले संघर्ष- विविध प्रकारची उभारणी या सर्व गोष्टींची माहिती मिळेल. लोकशाही असलेल्या आपल्या देशात वेगवेगळे पंतप्रधान कोणकोणत्या पार्श्वभूमीतून आले आहेत, याची देखील माहिती भावी पिढीला मिळेल. आपले बहुतेक पंतप्रधान हे अतिशय सामान्य कुटुंबातून होते, भारतीयांसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की आपले बहुतांश पंतप्रधान हे अगदी सामान्य कुटुंबातील आहेत. दुर्गम ग्रामीण भागातून येणे, अत्यंत गरीब कुटुंबातून येणे, अगदी शेतकरी कुटुंबातून येणे, पंतप्रधानपदापर्यंत पोहोचणे ही बाब भारतीय लोकशाहीच्या महान परंपरांवरील विश्वास दृढ करते. सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेली व्यक्तीही भारताच्या लोकशाही व्यवस्थेत सर्वोच्च पदावर पोहोचू शकते, असा विश्वासही यातून देशातील तरुणांमध्ये निर्माण होतो.

 

मित्रांनो,

या संग्रहालयात जितका इतिहास आहे तितकेच भविष्य देखील आहे. हे संग्रहालय देशातील जनतेला उलटून गेलेल्या कालखंडाची सफर घडवत असतानाच नव्या दिशेने, नव्या रुपात भारताच्या विकासाच्या प्रवासावर घेऊन जाईल. एक असा प्रवास जिथे तुम्हाला प्रगतीच्या मार्गावर पुढे जाणाऱ्या नव्या भारताचे स्वप्न जवळून पाहता येईल. या इमारतीत 40 हून अधिक प्रेक्षकक दीर्घा (गॅलरी) असून, सुमारे 4 हजार लोकांची एकाचवेळी आत फिरण्याची व्यवस्था आहे. व्हर्चुअल रिऍलिटी, रोबोट्स आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून झपाट्याने बदलणाऱ्या भारताचे चित्र हे संग्रहालय जगाला दाखवेल. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण खरोखर एकाच युगात जगत आहोत, त्याच पंतप्रधानांसोबत सेल्फी काढत आहोत, त्यांच्याशी संवाद साधत आहोत, असा अनुभव यातून मिळेल.

 

मित्रांनो,

आपल्याला आपल्या तरुण मित्रांना या वस्तुसंग्रहालयाला भेट देण्यासाठी अधिकाधिक प्रोत्साहन द्यायला हवे. हे वस्तुसंग्रहालय त्यांच्या अनुभवविश्वाचा अधिक विस्तार घडवून आणेल. आपले युवक सक्षम आहेत, देशाला नव्या उंचीवर घेऊन जाण्याची क्षमता त्यांच्यात आहे. आपल्या देशाबद्दल, स्वतंत्र भारतातील महत्त्वाच्या प्रसंगांबद्दल त्यांना जितकी अधिक माहिती मिळेल, त्या प्रसंगांना ते जितके अधिक समजून घेतील तितकेच ते अचूक निर्णय घेण्यासाठी अधिक सक्षम देखील होत जातील. हे संग्रहालय, येणाऱ्या पिढ्यांसाठी ज्ञानाचे, विचारांचे आणि अनुभवांचे नवे दालन उघडून देण्याचे कार्य करेल. या संग्रहालयामध्ये आल्यावर त्यांना जी महिती मिळेल, जे तथ्य त्यांच्या समोर येईल त्यातून त्यांना भविष्यातील निर्णय घेण्यासाठी मदत मिळेल. जे विद्यार्थी इतिहास विषयामध्ये संशोधन करु इच्छितात, त्यांच्यासाठी सुद्धा या संग्रहालयातील सामग्री उपयुक्त ठरेल.

 

मित्रांनो,

आपली भारतमाता म्हणजे लोकशाही व्यवस्थेची जननी आहे, लोकशाहीची जन्मदाती आहे. भारताच्या लोकशाहीचे आणखी एक वैशिष्ट्य हे देखील आहे की कालपरत्वे या व्यवस्थेमध्ये सतत बदल घडून आले आहेत. प्रत्येक युगात, प्रत्येक पिढीमध्ये लोकशाहीला अधिकाधिक आधुनिक स्वरूप देण्याचे आणि अधिक मजबूत करण्याचे अविरत प्रयत्न झाले आहेत. जाणाऱ्या काळासोबत ज्याप्रमाणे समाजात अनेक दोष राहून जातात त्याचप्रमाणे आपल्या लोकशाहीसमोर देखील वेळोवेळी अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. या दोषांचे निराकरण करत राहणे, स्वतःला सतत आधुनिक गोष्टींशी जोडून घेणे हे भारतीय लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे. आणि या कामात प्रत्येकाने स्वतःचे योगदान दिले आहे. एखाददुसरा अपवाद वगळता, आपल्याकडे लोकशाही व्यवस्था लोकशाही पद्धतीनेच बळकट करण्याची गौरवशाली परंपरा चालत आली आहे. म्हणूनच, आपल्या प्रयत्नांच्या माध्यमातून ही लोकशाही व्यवस्था आणखी मजबूत करणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे. आपल्या देशातील लोकशाहीसमोर आजही जी आव्हाने उभी ठाकलेली आहेत, कालपरत्वे जे दोष आपल्या लोकशाही प्रणालीमध्ये राहून गेले आहेत, त्यांचे निराकरण करत आपल्याला पुढे जायचे आहे. लोकशाहीची आणि आपल्या देशाची देखील आपणा सर्वांकडून हीच अपेक्षा आहे. आजचा हा ऐतिहासिक प्रसंग, आपल्या लोकशाहीला अधिक सशक्त आणि अधिक समृद्ध करण्याच्या निर्धाराचा पुनरुच्चार करण्याचा देखील प्रसंग आहे. आपल्या भारतीय लोकशाहीच्या संस्कृतीमध्ये, वेगवेगळ्या विचारधारांचा, विविध परंपरांचा समावेश होत राहिला आहे. आणि आपली लोकशाही प्रणाली आपल्याला अशी शिकवण देते की, कोणतीही एकच विचारधारा सर्वोत्तम असली पाहिजे असे काही बंधन नसते. आपण तर अशा संस्कृतीमध्ये मोठे झालो आहोत जिथे म्हटले जाते:-  

 

आ नो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः

याचा अर्थ असा की चोहोबाजूंनी उत्तम विचार आमच्याकडे येवोत. आपली लोकशाही आपल्याला नाविन्याचा स्वीकार करण्याची, नवे विचार आत्मसात करण्याची प्रेरणा देते. पंतप्रधान संग्रहालयाला भेट देणाऱ्या लोकांना लोकशाहीच्या या सामर्थ्याचे देखील दर्शन होईल. लोकशाहीमध्ये विचारांच्या बाबतीत मतभेद असू शकतात, वेगवेगळी राजकीय विचारसरणी असू शकते, पण सर्वांचे ध्येय मात्र एकच असते, ते म्हणजे देशाचा विकास. आणि म्हणूनच हे संग्रहालय केवळ विविध पंतप्रधानांचे कर्तुत्व आणि त्यांच्या योगदानापर्यंत मर्यादित नाहीये. तर हे संग्रहालय, अनेकदा प्रतिकूल परिस्थिती असतानादेखील अधिकाधिक अर्थपूर्ण होत जाणारी आपली लोकशाही, आपल्या परंपरेमध्ये हजारो वर्षांपासून जोपासना होत आलेल्या लोकशाही संस्कारांची दृढता आणि  संविधानाप्रती सशक्त होत असलेल्या विश्वासाचे देखील प्रतीक आहे.

 

मित्रांनो,

आपल्या वारशाची जोपासना करणे, हा वारसा भावी पिढीपर्यंत पोहोचविणे ही प्रत्येक देशाची जबाबदारी असते. आपला स्वातंत्र्य लढा, आपले सांस्कृतिक वैभव यांतील प्रत्येक प्रेरणादायी प्रसंग आणि प्रेरक व्यक्तिमत्त्वांना सर्वांसमोर, जनतेसमोर आणण्यासाठी आमचे सरकार सतत प्रयत्न करत आहे. आपल्या देशातून चोरीला गेलेल्या विविध मूर्ती आणि कलाकृती परत मिळवून देशात घेऊन येणे असो, जुन्या वस्तुसंग्रहालयाच्या पुनर्रचनेचे कार्य असो, नव्या संग्रहालयाची उभारणी असो, या सर्व कार्यांची एक मोठी मोहीम गेल्या 7-8 वर्षांपासून सतत सुरु आहे. आणि या सर्व प्रयत्नांच्या पाठीमागे आणखी एक मोठा उद्देश आहे. जेव्हा आपली तरुण पिढी इतिहासाची चैतन्यमय प्रतीके पाहते, तेव्हा त्यांना तथ्याचा देखील बोध होतो आणि सत्याचा देखील. जेव्हा एखादी व्यक्ती जालियनवाला बाग स्मारक पाहते तेव्हा त्यांना ज्या स्वातंत्र्याचा आनंद ते घेत आहेत त्याचे महत्त्व कळून येते. जेव्हा एखादी व्यक्ती आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांवर आधारित संग्रहालयाला भेट देते तेव्हा त्यांना समजते की देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठीच्या लढ्यामध्ये अतिदुर्गम जंगलात राहणाऱ्या आपल्या आदिवासी बंधू-भगिनींनी कशा प्रकारे प्रत्येक क्षेत्रात योगदान दिले आणि समाजातील प्रत्येक वर्गाने स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. तसेच जेव्हा कोणी व्यक्ती क्रांतिकारकांवर आधारित संग्रहालयातील माहिती जाणून घेतात तेव्हा त्यांना देशासाठी बलिदान देण्याचा खरा अर्थ काय आहे ते समजून येते. इथे दिल्लीमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण स्थळ जिथे आहे त्या अलीपूर रस्त्यावर बाबासाहेब स्मृती स्मारकाची उभारणी करण्याची संधी मिळणे हे आमच्या सरकारचे भाग्यच आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंचतीर्थांचा विकास करण्यात आला आहे तो प्रकल्प म्हणजे सामाजिक न्याय आणि अढळ देशनिष्ठा यांच्या प्रेरणेचे केंद्र आहे.

 

मित्रांनो,

हे पंतप्रधान संग्रहालय देखील जनतेने निवडून दिलेल्या पंतप्रधानांच्या वारशाचे दर्शन घडवून ‘सबका प्रयास’ म्हणजे सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याच्या भावनेचा उत्सव साजरा करत आहे. या संग्रहालयाचे जे बोधचिन्ह त्याकडे तुम्हां सर्वांचे नक्कीच लक्ष गेले असेल. या बोधचिन्हामध्ये अनेक कोटी भारतीयांच्या हातामध्ये एक चक्र दर्शविण्यात आले आहे. हे चक्र अहोरात्र सातत्याने कार्य करण्याचे तसेच संपन्नता मिळविण्याच्या निर्धारासाठी केल्या जाणाऱ्या परिश्रमांचे प्रतीक आहे. हीच प्रेरणा, हेच चैतन्य आणि हेच सामर्थ्य, येणाऱ्या 25 वर्षांत होऊ घातलेल्या भारताच्या विकासाची परिभाषा आहे.

 

मित्रांनो,

भारताच्या इतिहासाची महत्ता, भारताचा समृद्धीचा काळ यांच्याशी आपण सर्वजण परिचित आहोत आणि आपल्याला त्या काळाबद्दल खूप अभिमान देखील आहे. संपूर्ण विश्वाला भारताच्या समृद्ध वारशाची आणि भारताच्या वर्तमानकाळाची योग्य ओळख होणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आजच्या काळात जगाची नव्या पध्दतीने मांडणी होत असताना, संपूर्ण विश्व भारताकडे आशा आणि विश्वासाने पाहत आहे. अशा वेळी भारताला देखील प्रत्येक क्षणी नव्या उंचीवर पोहोचण्यासाठीचे प्रयत्न वाढवावे लागतील. आणि अशा परिस्थितीत स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची ही 75 वर्षे, भारताच्या विविध पंतप्रधानांचा कार्यकाळ आणि त्यावर आधारित हे पंतप्रधान संग्रहालय आपल्याला सतत प्रेरणा देत राहील. भारत देशासाठी मोठ्या निश्चयांची बीजे पेरण्याचे सामर्थ्य या संग्रहालयात आहे. हे संग्रहालय भारताचे भविष्य घडविणाऱ्या युवकांमध्ये काही भरीव कार्य करून दाखविण्याची इच्छाशक्ती निर्माण करेल. आगामी काळात, या संग्रहालयामध्ये जी नवी नावे समाविष्ट होतील, त्यांनी केलेल्या कार्यांचा या संग्रहालयात समावेश केला जाईल, त्या सर्वांमध्ये आपण सर्वजण एक विकसित भारताचे स्वप्न साकार झाल्याचे समाधान शोधू शकू. म्हणूनच आजचा काळ मेहनत करण्याचा काळ आहे. स्वातंत्र्याचा हा अमृतकाळ एकजुटीने, एकनिष्ठतेसह प्रयत्न करण्याचा आहे. देशवासियांना माझी आग्रहाची विनंती आहे की,तुम्ही स्वतः या संग्रहालयाला भेट द्या आणि तुमच्या मुलांना देखील याचे दर्शन घडवा. या आमंत्रणासोबत, या आग्रहासोबत मी पुन्हा एकदा पंतप्रधान संग्रहालयाच्या उभारणीबद्दल तुम्हां सर्वांचे अभिनंदन करतो. धन्यवाद!

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII

Media Coverage

PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 नोव्हेंबर 2024
November 21, 2024

PM Modi's International Accolades: A Reflection of India's Growing Influence on the World Stage