नमस्कार,
या कार्यक्रमाला उपस्थित असलेले विविध राज्यांचे राज्यपाल, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, साथी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, राज्यातील मंत्री, खासदार, आमदार, इतर लोकप्रतिनिधी आणि माझ्या कुटुंबीयांनो,
देशातील आधुनिक कनेक्टिव्हिटीच्या विस्ताराचा हा अभूतपूर्वक क्षण आहे. पायाभूत सोयी सुविधांच्या विकासाचा हा वेग आणि ही उंची 140 कोटी भारतीयांच्या अपेक्षांबरोबर अगदी जुळून येत आहे आणि वर्तमानातील भारताला हेच तर अपेक्षित आहे. हाच नवीन भारत युवक, उद्योजक, महिला, व्यावसायिक, व्यापारी आणि नोकरीधंद्यांमधील लोकांचे उद्दिष्ट आहे. आज एकाच वेळी नऊ वंदे भारत गाड्यांचा आरंभ होणे हे सुद्धा याचेच उदाहरण आहे. आज एकाच वेळी राजस्थान, गुजरात, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक आणि केरळ या राज्यातील लोकांना वंदे भारत एक्सप्रेसची सुविधा उपलब्ध झाली आहे. आज ज्या गाड्या सुरू केल्या गेल्या आहेत त्या आधी गाड्यांच्या तुलनेत अधिक आधुनिक आणि आरामदायक आहेत. या वंदे भारत गाड्या म्हणजे नव्या भारतासाठीच्या नवीन उत्साह, नवीन जोश आणि नवीन आशा यांचे प्रतीक आहे. वंदे भारतची क्रेज सातत्याने वाढत आहे या गोष्टीचा मला आनंद आहे. यातून आत्तापर्यंत एक कोटी अकरा लाखांहून जास्त प्रवाशांनी प्रवास केला आहे आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
मित्र हो,
देशातील विविध राज्यें आणि केंद्रशासित प्रदेशांतील लोकांना आत्तापर्यंत 25 वंदे भारत गाड्यांची सुविधा मिळत होती. आता यात अजून नऊ वंदे भारत एक्सप्रेसची भर पडणार आहे. तो दिवस दूर नाही ज्या दिवशी वंदे भारतने देशाचा हर एक भाग जोडला जाईल. वंदे भारत एक्सप्रेस आता आपला उद्देश अगदी व्यवस्थित साध्य करत आहे, याचा मला आनंद आहे. ज्या लोकांना एखाद्या शहरात काही तासांचे काम करून त्याच दिवशी परतायचे असते त्या लोकांसाठी ही गाडी अगदी मोठी गरजेचीच आहे. वंदे भारत गाड्यांनी पर्यटन आणि आर्थिक उलाढालींमध्ये सुद्धा वेग आणला आहे. ज्या ठिकाणी वंदे भारत एक्सप्रेसची सोय आहे आहे तिथे पर्यटकांची संख्या वाढत आहे. पर्यटकांची संख्या वाढणे याचा अर्थ तिथे व्यापार दुकानदारांच्या मिळकतीमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे तिथे नवीन नवीन रोजगार संधी उपलब्ध होत आहेत.
माझ्या कुटुंबीयांनो,
भारतात आज जे उत्साह आणि आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे तसे गेल्या कित्येक दशकांमध्ये दिसून येत नव्हते. आज प्रत्येक भारतीयास होत असलेल्या लाभांमुळे आपला हा नवीन भारत गौरवास्पद वाटत आहे. चंद्रयान तीनच्या यशाने सामान्य मानवी इच्छांना आभाळाच्या उंचीवर देऊन ठेवले. आदित्य एल वन चा लॉन्चिंगमुळे हा विश्वास मिळाला आहे की जर इच्छा मजबूत असेल तर कठीणातील कठीण लक्ष्य सुद्धा गाठता येऊ शकते. टी 20 शिखर परिषदेच्या यशाने हा विश्वास दिला. भारताकडे लोकशाही लोकसंख्या आणि वैविध्याची केवढी अद्भुत ताकद आहे. आज भारताच्या कूटनितीतील कौशल्याची जगभरात चर्चा आहे. आमच्या स्त्री- केंद्रित विकासाची दूरदृष्टी जगभरात नावाजली जात आहे आपल्या या दूरदृष्टीने मार्गक्रमणा करत असताना सरकारने संसदेत नारी शक्ती वंदना अधिनियम मांडले. नारी शक्ती वंदना अधिनियम आल्यानंतर प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचे योगदान आणि त्यांची वाढती भूमिका याची चर्चा होत आहे. आज कित्येक रेल्वे स्टेशनांतील व्यवस्थापन पूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे. अशी पावले उचलल्याबद्दल मी रेल्वेचे कौतुक करतो. देशातील सर्व महिलांचे मी नारी शक्ती वंदना अधिनियमासाठी पुन्हा एकदा अभिनंदन करतो.
मित्रहो,
आत्मविश्वासाने परिपूर्ण अशा या वातावरणात अमृत काळातील भारत आपल्या वर्तमान आणि भविष्यातील गरजांसाठी एकत्र काम करत आहे. नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंत प्रत्येक संबंधितांमध्ये ताळमेळ रहावा यासाठी पीएम गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लान आखला गेला आहे. देशात वाहतुकीचा खर्च कमी व्हावा आमचे निर्यातीवर होणारे खर्च कमीत कमी व्हावे यासाठी नवीन वाहतूक धोरण लागू केले आहे. देशात वाहतुकीच्या एका माध्यमाने दुसऱ्याला सहकार्य करावे यासाठी मल्टीमोडल ( बहुमुखी ) कनेक्टिव्हिटीवर भर दिला जात आहे. या साऱ्या प्रयत्नांचे अंतिम लक्ष्य हेच आहे की भारतातील नागरिकांची प्रवास सुलभता वाढावी त्यांचा मौल्यवान वेळ वाचावा. वंदे भारत रेल्वेगाड्या या याच भावनांचे एक प्रतिबिंब आहे.
मित्रहो,
भारतीय रेल्वे भारत देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय सर्वाची भरवशाची सहयात्री आहे. आमच्याकडे एका दिवसात जितके लोक ट्रेन मधून प्रवास करतात तेवढी तर काही देशांची लोकसंख्या देखील नसेल. परंतु आता आमचे सरकार भारतीय रेल्वेत बदल घडवून आणण्यासाठी कार्यरत आहे सरकारने रेल्वेसाठी निधीत अभूतपूर्वक वाढ केली आहे. 2014 मध्ये रेल्वेचे जेवढे बजेट होते त्यापेक्षा आठ पट जास्त बजेट यावर्षी मिळालं आहे. रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण, विद्युतीकरण, नवीन गाड्या चालवणे, नवीन मार्ग निर्माण करणे या सर्वांवर वेगाने काम सुरू आहे.
मित्रांनो,
भारतीय रेल्वेच्या प्रवाशांसाठी जर ट्रेन चालते फिरते घर असेल तर आपली रेल्वे स्थानके देखील त्यांच्या तात्पुरत्या घरासारखीच आहेत. तुम्ही आणि मी आपण सर्व जण जाणतो की आपल्या देशात हजारो रेल्वे स्थानके अशी आहेत जी गुलामगिरीच्या काळातील आहेत, ज्यामध्ये स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांच्या काळात फार काही बदल झाले नाहीत. विकसित होत असलेल्या भारताला आता आपल्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करावेच लागेल. याच विचाराने भारतात प्रथमच रेल्वे स्थानकांच्या विकासाचे आणि आधुनिकीकरणाचे अभियान सुरू करण्यात आले आहे. आज देशात रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी विक्रमी संख्येने पादचारी पूल, लिफ्ट्स आणि सरकते जिने यांची निर्मिती केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच देशातील 500 हून अधिक मोठ्या रेल्वेस्थानकांच्या पुनर्निर्माणाचे काम सुरू करण्यात आले आहे. अमृत काळात तयार झालेली ही स्थानके अमृत भारत स्थानक नावाने ओळखली जातील. भविष्यात ही स्थानके नव्या भारताची ओळख बनतील.
माझ्या कुटुंबीयांनो,
कोणतेही रेल्वे स्थानक असो, त्याचा एक स्थापना दिवस नक्कीच असतो, जन्मदिवस नक्कीच असतो. रेल्वे विभागाने आता रेल्वे स्थानकांचा जन्मोत्सव म्हणजेच स्थापना दिवस साजरा करण्याची परंपरा सुरू केली आहे याचा मला आनंद आहे. तामिळनाडू मधील कोइंबतूर, मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, पुणे यांच्यासह अनेक रेल्वेस्थानकांचा स्थापना दिवस नुकताच साजरा करण्यात आला. कोइंबतूर रेल्वे स्थानकाने तर प्रवाशांच्या सेवेची वर्षे 150 पूर्ण केली आहेत. तेथील लोकांना अशा उपलब्धींचा अभिमान वाटणे स्वाभाविक आहे. आता रेल्वे स्थानकांचा जन्मदिवस साजरा करण्याच्या या परंपरेचा आणखीन विस्तार केला जाणार आहे, यामुळे जास्तीत जास्त लोक यामध्ये सहभागी होतील.
माझ्या कुटुंबीयांनो,
अमृतकाळात देशाने 'एक भारत-श्रेष्ठ भारत' या दृष्टिकोनाला संकल्पापासून सिद्धी पर्यंत पोहोचण्याचे माध्यम बनवले आहे. 2047 साली जेव्हा देश स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करेल, 2047 पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्यासाठी प्रत्येक राज्य आणि प्रत्येक राज्यातील लोकांचा विकासही तितकाच आवश्यक आहे. पूर्वीच्या सरकारच्या कार्यकाळात जेव्हा मंत्रिमंडळाची स्थापना केली जात होती तेव्हा रेल्वे मंत्रालय कोणाला मिळणार, याची सर्वात जास्त चर्चा होत होती. रेल्वेमंत्री ज्या राज्यातील असेल त्याच राज्यात सर्वात जास्त रेल्वे धावतील, अशी त्या काळात मान्यता होती. आणि त्यातही असे व्हायचे की, बऱ्याच नव्या रेल्वे गाड्यांची घोषणा तर केली जायची, मात्र प्रत्यक्षात त्यापैकी खूप कमी गाड्या रेल्वे मार्गावर धावायच्या. या स्वार्थी विचाराने केवळ रेल्वेचेच नाही तर संपूर्ण देशाचे खूप मोठे नुकसान केले आहे. देशातील लोकांचे नुकसान केले आहे. आता देश कोणत्याही राज्याला मागास ठेवण्याची जोखीम घेऊ शकत नाही. आपल्याला 'सबका साथ-सबका विकास' या दृष्टिकोनानुसार मार्गक्रमण करायचे आहे.
माझ्या कुटुंबीयांनो,
आज मी रेल्वेमध्ये कार्यरत असणाऱ्या आपल्या परिश्रमी कर्मचाऱ्यांना देखील एक गोष्ट सांगू इच्छितो. जेव्हा कोणी दुसऱ्या शहरातून किंवा दुसऱ्या ठिकाणाहून प्रवास करून येतो, तेव्हा त्याला सर्वप्रथम हेच विचारले जाते की, तुमचा प्रवास कसा झाला. त्यावेळी ती व्यक्ती फक्त आपल्या प्रवासाचा अनुभव कथन करत नाही तर घरून निघाल्यापासून गंतव्यस्थानी पोहचण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रवासाचे वर्णन करते. रेल्वे स्थानकाचे रूप किती पालटले आहे हे देखील ती व्यक्ती सांगते, ती व्यक्ती सांगते की रेल्वे गाड्यांचे क्रियान्वयन किती सुव्यवस्थापित झाले आहे. त्या व्यक्तीच्या अनुभवामध्ये तिकीट तपासनीसाचे वर्तन, त्याच्या हातात कागदांऐवजी टॅबलेट असणे, सुरक्षेची व्यवस्था, भोजनाचा दर्जा या सर्वांचे वर्णन असते. म्हणूनच प्रवाशांचा प्रवास सुलभ व्हावा आणि प्रवाशांना प्रवासात चांगला अनुभव मिळावा यासाठी तुम्हाला, रेल्वेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला निरंतर संवेदनशील राहणे आवश्यक आहे. आणि आजकाल सगळीकडून जेव्हा किती चांगले झाले आहे, किती चांगले झाले आहे, किती चांगले झाले आहे हे शब्द कानावर पडतात तेव्हा मनाला एक वेगळ्याच प्रकारचा आनंद होतो. आणि म्हणूनच मी रेल्वेचे जे समर्पित कर्मचारी आहेत त्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.
माझ्या कुटुंबीयांनो,
भारतीय रेल्वेने स्वच्छते संबंधी जे नवीन आदर्श स्थापित केले आहेत, त्याची देखील प्रत्येक देशवासीयाने नोंद घेतली आहे. पूर्वीच्या तुलनेत आता आपली स्थानके, आपल्या रेल्वे गाड्या खूप जास्त स्वच्छ असतात. तुम्ही जाणताच गांधी जयंती फार दूर नाही. स्वच्छतेबाबत गांधीजींचा जो आग्रह होता तो देखील आपण सर्वजण जाणतोच. स्वच्छतेसाठी करण्यात आलेला प्रत्येक प्रयत्न गांधीजींना खरी श्रद्धांजली ठरेल. याच भावनेने काही दिवसानंतर 1 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता स्वच्छतेच्या एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. हे आयोजन देशाच्या कानाकोपऱ्यात होत आहे. आणि देशवासीयांच्या नेतृत्वाखाली होत आहे. मी आपल्याला आवाहन करतो की तुम्ही सर्वांनी स्वच्छतेच्या या अभियानात अवश्य सहभागी व्हावे. 1 तारीख, सकाळी 10 वाजताची वेळ, हे सर्वांनी मनात पक्के करून ठेवा. गांधी जयंतीच्या निमित्ताने प्रत्येक देशवासीयाने खादी आणि स्वदेशी उत्पादनांच्या खरेदीच्या मंत्राचा देखील पुनरुच्चार केला पाहिजे. 2 ऑक्टोबरला गांधी जयंती आहे तर 31 ऑक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे. याप्रकारे आपण पुढचा संपूर्ण महिना जाणीवपूर्वक खादीच्या वस्तूंची खरेदी, हातमागावर विणलेल्या कापडाची खरेदी, हस्तकला खरेदी करू शकतो. आपण स्थानिक उत्पादनांना जास्तीत जास्त समर्थन दिले पाहिजे.
मित्रांनो,
भारतीय रेल्वे आणि समाजाच्या प्रत्येक स्तरात होत असलेला बदल, विकसित भारताच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल सिध्द होईल. मी पुन्हा एकदा नव्या वंदे भारत रेल्वे गाड्यांसाठी देशातील जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो.
खूप खूप धन्यवाद.