आसामचे राज्यपाल जगदीश मुखी जी, आसामचे लोकप्रिय आणि उत्साही मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे वरिष्ठ सहकारी सर्बानंद सोनोवाल जी, श्री रामेश्वर तेली जी,देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणारे रतन टाटा जी, आसाम सरकारमधील मंत्री, केशब महंता जी, अजंता निओग जी, अतुल बोरा जी आणि या धरतीचे सुपुत्र आणि भारताच्या न्याय जगतात, ज्यांनी सर्वोत्तम सेवा दिली आणि आज आम्हाला कायदे बनवण्याच्या प्रक्रियेत सहकार्य करणारे रंजन गोगोई जी. खासदार, आमदार आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!
प्रोठोमोटे मोई रोंगाली बिहू, आरु ऑसोमिया नॉबो-बॉर्खोर शुब्भेस्सा जोनाइसु !
सण आणि उत्साहाच्या या काळात, आसामच्या विकासाच्या प्रवाहाला आणखी गती देण्यासाठी या भव्य समारंभात मला तुमच्यासोबत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.आज, या ऐतिहासिक शहरातून,मला आसामी अभिमान, आसामच्या विकासात योगदान देणार्या आसामच्या सर्व महान सुपुत्रांचे स्मरण होते आणि त्या सर्वांना आदरपूर्वक अभिवादन करतो.
मित्रांनो,
भारतरत्न भूपेन हजारिका यांचे गाणे आहे-
बोहाग माठो एटि ऋतु नोहोय नोहोय बोहाग एटी माह
अखोमिया जातिर ई आयुष रेखा गोनो जीयोनोर ई खाह !
आसामची जीवनरेषा अमिट आणि प्रखर बनवण्यासाठी आम्ही रात्रंदिवस तुमची सेवा करण्याचा प्रयत्न करत आहोत. हा संकल्प घेऊन मला तुमच्यामध्ये पुन्हा पुन्हा यावेसे वाटते.आसाम आज शांततेसाठी,विकासासाठी एकजूट होऊन उत्साहाने ओतप्रोत आहे आणि मी आत्ताच काही वेळापूर्वी कार्बी आंगलोंग मध्ये पाहिले आहे आणि मी अनुभवत होतो काय उत्साह,काय स्वप्ने, काय संकल्प.
मित्रांनो.
काही वेळापूर्वी मी दिब्रुगडमध्ये नव्याने बांधलेले कर्करोग रुग्णालय आणि तिथल्या सुविधाही पाहिल्या.आज येथे आसामच्या 7 नवीन कर्करोग रुग्णालयांचे लोकार्पण करण्यात आले आहे.एक काळ असा होता की, सात वर्षांत एक रुग्णालय सुरू झाले तरी तो मोठा उत्सव मानला जायचा.आज काळ बदलला आहे, राज्यात एका दिवसात 7 रुग्णालये सुरू होत आहेत.आणि मला सांगण्यात आले की, येत्या काही महिन्यांत आणखी 3 कर्करोग रुग्णालये तुमच्या सेवेसाठी सज्ज असतील. याशिवाय राज्यातील 7 नवीन आधुनिक रुग्णालयांच्या उभारणीचे कामही आजपासून सुरू होत आहे.या रुग्णालयांमुळे आसाममधील अनेक जिल्ह्यांमध्ये कर्करोगावरील उपचारांची सुविधा आणखी वाढणार आहे. रुग्णालये आवश्यक आहेत आणि सरकार रुग्णालये उभारतही आहे, पण मी जरा उलट शुभेच्छा देऊ इच्छितो. रुग्णालय तुमच्या पायाशी आहे, पण मला आसामच्या लोकांच्या आयुष्यात रुग्णालयामध्ये जाण्याचा त्रास नको आहे. मी तुम्हा सर्वांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा देतो.तुमच्या कुटुंबातील कोणालाही रुग्णालयात जावे लागणार नाही आणि मला आनंद होईल की, आपली सर्व नवीन बांधलेली रुग्णालये रिकामी राहतील.मात्र कर्करुग्णांना गैरसोयीमुळे मृत्यूला सामोरे जावे लागू नये म्हणून आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत.
बंधू आणि भगिनींनो,
आसाममध्ये कर्करोगाच्या उपचारासाठी अशी सर्वसमावेशक यंत्रणा महत्त्वाची आहे कारण येथे मोठ्या प्रमाणात कर्करोग आढळून आला आहे.कर्करोग ही केवळ आसाममध्येच नाही तर ईशान्येतही मोठी समस्या बनत आहे.आपली गरीब कुटुंबे, गरीब बंधू-भगिनी, आपली मध्यमवर्गीय कुटुंबे यांना याचा सर्वाधिक फटका बसतो. काही वर्षांपूर्वीपर्यंत कर्करोगाच्या उपचारासाठी रुग्णांना मोठ्या शहरांमध्ये जावे लागत होते.त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर मोठा आर्थिक बोजा पडायचा. गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या या समस्येवर मात करण्यासाठी,गेल्या 5-6 वर्षांपासून येथे जी पाऊले उचलण्यात आली त्यासाठी मी माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल जी आणि विद्यमान मुख्यमंत्री हिमंत जी आणि टाटा ट्रस्टला खूप खूप धन्यवाद देतो. मी तुमचे खूप खूप अभिनंदन करतो. आसाम कॅन्सर केअर फाऊंडेशनच्या रूपाने परवडणाऱ्या आणि प्रभावी कर्करोग उपचारांचे इतके मोठे नेटवर्क आता येथे तयार आहे. ही मानवतेची मोठी सेवा आहे.
मित्रांनो,
आसामसह संपूर्ण ईशान्येमध्ये कर्करोगाच्या या मोठ्या आव्हानाला तोंड देण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. राजधानी गुवाहाटीमध्ये कर्करोगाच्या उपचाराशी संबंधित पायाभूत सुविधाही बळकट केल्या जात आहेत.या वर्षीच्या अर्थसंकल्पात, ईशान्येच्या विकासासाठी 1500 कोटी रुपयांची विशेष योजना, पीएम - डिवाईनने (PM-DevINE) देखील कर्करोगाच्या उपचारांवर लक्ष केंद्रित केले आहे.या अंतर्गत, गुवाहाटीमध्ये कर्करोगाच्या उपचारांसाठी समर्पित सुविधा तयार केली जाईल.
बंधू आणि भगिनींनो,
कर्करोगासारखे गंभीर आजार कुटुंब आणि समाज म्हणून आपल्याला भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत करतात.त्यामुळे गेल्या 7-8 वर्षांपासून देशात आरोग्याशी संबंधित व्यापक काम केले जात आहे.आपल्या सरकारने सात विषयांवर किंवा आपण आरोग्याच्या सप्तऋषींवर लक्ष केंद्रित केले आहे असे म्हणू शकतो.
पहिला प्रयत्न म्हणजे आजार होण्याची शक्यताच उद्भवू नये. म्हणूनच आमच्या सरकारने प्रतिबंधात्मक आरोग्य उपाययोजनांवर खूप भर दिला आहे. यासाठी योगासने, तंदुरुस्ती, स्वच्छता, याच्याशी संबंधित अनेक कार्यक्रम सुरू आहेत.दुसरे म्हणजे, जर आजार झालाच तर त्याचे सुरुवातीलाच निदान झाले पाहिजे. यासाठी देशभरात नवीन चाचणी केंद्रे उभारली जात आहेत.तिसरे लक्ष्य हे आहे की, लोकांना त्यांच्या घराजवळ प्राथमिक उपचाराची चांगली सुविधा असावी.यासाठी देशभरात निरामयता केंद्रांच्या रूपाने प्राथमिक आरोग्य केंद्रांचे जाळे नव्या ताकदीने पुढे नेले जात आहे.चौथा प्रयत्न म्हणजे गरिबांना सर्वोत्तम रुग्णालयात मोफत उपचार मिळावेत.यासाठी आयुष्मान भारत सारख्या योजनांतर्गत आज भारत सरकारकडून 5 लाख रुपयांपर्यंतचे विनामूल्य उपचार दिले जात आहेत.
मित्रांनो ,
चांगल्या उपचारांसाठी मोठ्या शहरांवरील अवलंबित्व कमी करणे हे आमचे पाचवे लक्ष्य आहे. यासाठी आमचे सरकार आरोग्याच्या पायाभूत सुविधांवर अभूतपूर्व गुंतवणूक करत आहे.स्वातंत्र्यानंतर बांधलेली सर्व चांगली रुग्णालये मोठ्या शहरांमध्येच बांधल्याचे आपण पाहिले आहे. जर तुमची तब्येत थोडीशी जरी बिघडली तर मोठ्या शहरात धाव घ्या, हेच होत राहिले आहे. पण 2014 पासून आमचे सरकार ही परिस्थिती बदलण्यात व्यस्त आहे. 2014 पूर्वी देशात फक्त 7 एम्स होती. यातही दिल्लीतील लोक सोडले तर कुठे एमबीबीएसचा अभ्यासक्रम शिक्षणच नसायचे , बाह्य रुग्ण विभाग नाही , ही अपूर्णावस्थेत होती. आम्ही यात सुधारणा केली आणि देशात 16 नवीन एम्स घोषित केली.
एम्स गुवाहाटी हे देखील त्यापैकी एक आहे.देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय असावे, हे ध्येय पूर्ण करण्यासाठी आमचे सरकार कार्यरत आहे. 2014 पूर्वी देशात 387 वैद्यकीय महाविद्यालये होती. आता त्यांची संख्या सुमारे 600 झाली आहे.
मित्रांनो,
आपल्या सरकारचे सहावे लक्ष्य डॉक्टरांची संख्या जास्तीत जास्त वाढवण्यावर केंद्रित आहे.गेल्या सात वर्षांत एमबीबीएस आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 70 हजारांहून अधिक नवीन जागांची भर पडली आहे.5 लाखांहून अधिक आयुष डॉक्टरांना अॅलोपॅथी डॉक्टरांच्या बरोबरीने उपचार करण्याला आमच्या सरकारने मान्यता दिली आहे. यामुळे भारतातील डॉक्टर-रुग्ण गुणोत्तरही सुधारले आहे. नुकताच सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील 50 टक्के जागांसाठी कोणत्याही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाप्रमाणेच शुल्क आकारले जाईल, असा निर्णय सरकारने घेतला आहे.याचा लाभ हजारो तरुणांना मिळत आहे. स्वातंत्र्यानंतर देशाला जितके डॉक्टर्स मिळाले,त्यापेक्षाही अधिक डॉक्टर आमच्या सरकारच्या प्रयत्नाने येत्या 10 वर्षांत उपलब्ध होणार आहेत.
मित्रांनो,
आपल्या सरकारचे सातवे लक्ष्य आरोग्य सेवांचे डिजिटायझेशन आहे. उपचारासाठी लागणाऱ्या लांबलचक रांगा, उपचाराच्या नावाखाली होणाऱ्या त्रासातून सुटका व्हावी, असा सरकारचा प्रयत्न आहे.त्यासाठी एकापाठोपाठ एक योजना लागू करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ संपूर्ण देशातील नागरिकांना मिळावा, यासाठी देशात कुठेही कोणतेही बंधन नसावे, असा प्रयत्न आहे. एक राष्ट्र, एक आरोग्य ही भावना आहे. यामुळे 100 वर्षातील सर्वात मोठ्या महामारीतही देश सावरू शकला, आव्हानाला सामोरे जाण्याचे सामर्थ्य मिळाले.
केंद्र सरकारच्या योजनांमुळे देशात कर्करोगावरील उपचार सुलभ आणि स्वस्त होत आहेत. अजून एका महत्वपूर्ण गोष्टीचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे. गरिबांच्या मुलामुलींना डॉक्टर का होता येऊ नये, गावात राहणारे ज्यांना जीवनात इंग्रजीतून शिकण्याची संधी मिळाली नाही ते डॉक्टर का बनू नयेत, यासाठीच आता ज्यांना आपल्या मातृभाषेमध्ये, स्थानिक भाषेमध्ये वैद्यकीय शिक्षण घ्यायचे आहे त्यांच्यासाठी सुद्धा सरकारने सुविधा उभ्या कराव्यात जेणेकरून गरीबांचे मूलसुद्धा डॉक्टर होऊ शकेल, या दिशेने सरकार पावले उचलत आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये कर्करोगावरील अशा अनेक जीवनावश्यक औषधांच्या किमती जवळपास निम्म्यावर आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक वर्षी कर्करोगाच्या रुग्णांची जवळपास एक हजार कोटी रुपयांची बचत होत आहे. पंतप्रधान जन औषधी केंद्राच्या माध्यमातून 900 हून जास्त औषधे स्वस्त दरात उपलब्ध होत आहेत. जी औषधे शंभर रुपयात मिळत होती ती दहा रुपये वीस रुपये या किमतीमध्ये मिळावीत याची सोय केली गेली आहे. यामध्ये अनेक औषधे कर्करोगावरील उपचारांची आहेत. या सोयीमुळे रुग्णांचे शेकडो कोटी रूपये वाचत आहेत. एखाद्या कुटुंबात म्हातारे आई-वडील असतील, त्यांना मधुमेहासारखा आजार असेल तर मध्यमवर्गीय, निम्न मध्यम वर्गीय कुटुंबाचा दर महिन्याचा हजार, पंधराशे, दोन हजार रुपयांपर्यंतचा खर्च औषधांवर होत असतो. जनऔषधी केंद्रांमुळे तो खर्च 80, 90, 100 रुपयांपर्यंत खाली यावा ही काळजी घेतली गेली आहे.
एवढेच नव्हे तर आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत लाभ घेणाऱ्यांमध्ये मोठ्या संख्येने कर्करोगाचे रुग्ण आहेत. जेव्हा ही योजना नव्हती तेव्हा गरीब कुटुंबे कर्करोगावरील उपचारांसाठी जात नसत. त्यांना वाटत असे की रुग्णालयात गेलो तर मुलांना कर्ज होईल आणि ते कर्ज आपल्या मुलांना फेडावे लागेल. म्हातारे आई-वडील मुलांवर ओझे टाकण्यापेक्षा मरण पत्करत असत. रुग्णालयात जात नसत, उपचार घेत नसत. गरीब आई-वडील जर उपचारांच्या अभावी प्राण सोडत असतील तर आपण कशासाठी आहोत.. खास करून आमच्या माता भगिनी तर उपचार करुन घेतच नसत. त्यांना दिसत असे की उपचारांसाठी कर्ज घ्यावे लागते, घर तसेच जमीन विकावी लागते. आमच्या माता भगिनींना या काळजी पासून मुक्त करण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे.
बंधू-भगिनींनो,
आयुष्मान भारत योजनेमधून फक्त विनामूल्य उपचारच मिळत नाही तर कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे सुरूवातीपासूनच निदान करण्यासाठीसुद्धा मदत मिळत आहे. आसामसह संपूर्ण देशामध्ये जी हेल्थ आणि वेलनेस सेंटर्स उघडली जात आहेत त्यामध्ये 15 कोटींपेक्षा अधिक लोकांची कर्करोगाशी संबंधित तपासणी झाली आहे. कर्करोगामध्ये लवकरात लवकर आजाराचे निदान होणे फार आवश्यक असते. त्यामुळे आजार विकोपाला जाण्यापासून रोखता येतो.
मित्रहो,
देशात वैद्यकीय पायाभूत सुविधांना मजबूत करण्याची जी मोहीम सुरू आहे त्याचा फायदा सुद्धा आसामला मिळत आहे. हिमंत जी आणि त्यांचा चमू प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उघडण्याच्या राष्ट्रीय संकल्पासाठी प्रशंसनीय प्रयत्न करत आहेत.ऑक्सिजन पासून वेंटिलेटरपर्यंत सर्व सुविधा आसाम मध्ये वाढीला लागाव्यात यावर केंद्र सरकारने भर दिला आहे. क्रिटिकल केअर इन्फ्रास्ट्रक्चर आसाममध्ये लवकरात लवकर कार्यान्वित व्हावे यासाठी आसाम सरकारने उत्तम प्रकारे काम करण्याच्या दिशेने अनेक पावले उचलली आहेत.
बंधू-भगिनींनो ,
देश आणि विश्व कोरोना संक्रमणाशी सातत्याने झुंज देत आहे . भारतात लसीकरण मोहिमेची व्याप्ती खूप वाढली आहे. आता तर लहान मुलांसाठीसुद्धा अनेक लसी मंजूर झाल्या आहेत . प्रिकॉशन मात्रेला मंजुरी सुद्धा दिली. आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी ही आहे की वेळेवर स्वतः लस घ्या आणि लहान मुलांना सुद्धा या सुरक्षा कवचाचा लाभ द्या.
मित्रहो,
केंद्र आणि आसाम सरकार चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या लाखो कुटुंबांना जास्त उत्तम जीवन देण्यासाठी संपूर्ण तळमळीने काम करत आहे. मोफत रेशन देण्यापासून हर घर जल योजने पर्यंत ज्या सोयी आहेत त्या आसाम सरकार वेगाने चहाच्या मळ्या पर्यंत पोहोचवत आहे. शिक्षण आणि रोजगारांच्या संधी वाढवण्यासाठीसुद्धा सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. समाजातली कोणतीही व्यक्ती, कोणतेही कुटुंब विकासाचा लाभ मिळवण्यापासून दूर राहू नये असे आमचे प्रयत्न आहेत, हाच आमचा संकल्प आहे.
बंधू-भगिनींनो,
आज अशाप्रकारे विकासाच्या ज्या मार्गावर आम्ही पुढे जात आहोत, त्यामध्ये जनकल्याण या प्रकाराची व्याख्या अधिक व्यापक केली आहे. याआधी जनकल्याण या गोष्टीला संपूर्णपणे अनुदानाशी जोडूनच बघितले जात असे. पायाभूत सोयी सुविधा, कनेक्टिविटीचे प्रकल्प या गोष्टी जनकल्याणाशी संबंधित आहेत हा दृष्टिकोन नव्हता. उत्तम कनेक्टिव्हिटीचा अभाव असेल तर लोकांसाठीच्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचणे जास्त कठीण होते. आधीच्या शतकातील त्या अडचणीं मागे टाकून देश पुढे जात आहे. आज आपल्याला दिसते आहे की आसाममध्ये दुर्गम डोंगराळ भागांमध्ये रस्ते तयार होत आहेत. ब्रह्मपुत्रेवर पूल बांधले जात आहेत. रेल्वेचे जाळे विस्तृत होत आहे. या सगळ्यामुळे शाळेत, महाविद्यालयात, रुग्णालयात जाणे सोपे झाले आहे. रोजीरोटीच्या संधी उपलब्ध होत आहेत. गरिबातल्या गरीब माणसाला सुद्धा पैशाची बचत करता येत आहे. आज गरिबातल्या गरीब माणसाला मोबाईल फोनची सोय मिळते आहे, इंटरनेटशी जोडले जाता येत आहे. त्यामुळे त्याला सरकारने दिलेली प्रत्येक सेवा मिळवणे सोपे झाले आहे. भ्रष्टाचारापासून मुक्ती मिळाली आहे.
बंधू-भगिनींनो,
सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या विचारांनी आम्ही आसाम आणि देशाच्या विकासाला गती देत आहोत. आसाममध्ये कनेक्टिव्हिटी मजबूत होईल, इथे गुंतवणुकीच्या नव्या संधी उपलब्ध होतील हेच आमचे प्रयत्न आहेत. आसाम मध्ये गुंतवणुकीच्या अनेक शक्यता आहेत. या शक्यता आपण संधीत बदलायला हव्यात. चहा असो, सेंद्रिय शेती असो, इंधनाशी संलग्न उद्योगधंदे असोत किंवा पर्यटन, आसामचा विकास नव्या उंचीवर घेऊन जायचा आहे.
मित्रहो,
आज माझा आसाम दौरा अविस्मरणीय आहे. एका बाजूला मी अशा लोकांना भेटून आलो आहे जे बॉम्ब आणि बंदुकींचा मार्ग सोडून शांततेच्या मार्गाने विकासाच्या मार्गावर चालू इच्छित आहेत आणि आता मी आपल्यासारख्या लोकांमध्ये आहे,ज्यांना जीवनात आजारपणाशी झुंजावे लागू नये सुखासमाधानाची सोय व्हावी आणि त्यामध्ये आपण सर्वजण आशीर्वाद देण्यासाठी आला आहात. बिहू हा आधीच मोठ्या उत्साहाचा आणि उत्सवाचा सण आहे. मी आसाम मध्ये अनेक वर्षांपासून येत आहे. एखादाच बिहू चा काळ असा असेल जेव्हा त्या काळात मी आसामचा दौरा केलेला नाही. आज सर्व माताभगिनींना इतक्या मोठ्या संख्येने बिहूमध्ये आनंदात पाहिले. या प्रेमासाठी आशीर्वादासाठी खास करून आसामच्या माता-भगिनींना मी प्रणाम करतो, त्यांचे मनापासून आभार मानतो.
मित्रहो,
श्री रतन टाटाजी इथे आले आहेत. त्यांचे नाते चहापासून सुरू झाले आणि आता इतके विस्तारले असून आज आपल्या उत्तम आरोग्यासाठी ते सुद्धा आमच्याबरोबर सहभागी झाले आहेत. पुन्हा एकदा त्यांचे स्वागत करताना मी पुन्हा आपणा सर्वांना या नव्या सुविधांसाठी अनेक अनेक शुभेच्छा देत आहे.
खूप खूप धन्यवाद.
माझ्यासोबत जयघोष करा ,
भारत माता की जय !
भारत माता की जय !
भारत माता की जय !
खूप -खूप धन्यवाद !