स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशवासियांना खूप खूप शुभेच्छा. खूप-खूप शुभेच्छा. केवळ हिंदुस्तानच्या कानाकोपऱ्यातल्या नव्हे तर जगभरातल्या ठिकठिकाणी  आज कोणत्या ना कोणत्या स्वरुपात भारतीयांद्वारा किंवा भारताप्रती अपार प्रेम असणाऱ्या जगातल्या कानाकोपऱ्यात आपला तिरंगा आन-बान-शान दर्शवत डौलाने फडकत आहे. जगभरातल्या भारतप्रेमी, भारतीयांना स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.आजचा हा दिवस ऐतिहासिक दिवस आहे. एक पुण्य टप्पा , एक नवा मार्ग, एक नवा संकल्प,आणि नव्या सामर्थ्याने  पुढे वाटचाल करण्याची  ही  शुभ संधी आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यात, गुलामीचा संपूर्ण कालखंड, संघर्षात गेला आहे. हिंदुस्तानचा कोणता भाग असा नव्हता, कोणता काळ असा नव्हता,जेव्हा देशवासीयांनी शेकडो वर्षापर्यंत गुलामी विरोधात लढा दिला नाही, आयुष्य वेचले नाही, यातना झेलल्या नाहीत, आहुती दिली नाही. आज आपणा सर्व देशवासीयांसाठी अशा प्रत्येक महान व्यक्तींना, हुतात्म्यांना नमन करण्याची ही वेळ आहे.त्यांचे ऋण मानण्याची ही वेळ आहे. आणि त्यांचे स्मरण करत त्यांची स्वप्ने लवकरात लवकर पूर्ण करण्याचा संकल्प करण्याचीही वेळ आहे.पूज्य बापू,नेताजी सुभाषचंद्र बोस,बाबासाहेब आंबेडकर,वीर सावरकर,यांच्याप्रती आपण सर्व देशवासीय कृतज्ञ आहोत,ज्यांनी,कर्तव्य पथावर वाटचाल करत आपले आयुष्य वेचले,कर्तव्य पथ हाच त्यांचा जीवन पथ राहिला. हा देश कृतज्ञ आहे,मंगल पांडे,तात्या टोपे,भगतसिंह, सुखदेव, राजगुरू,चंद्रशेखर आझाद,अश्फाक उल्ला खान,राम प्रसाद बिस्मिल, अशा आपल्या अगणित क्रांतीवीरांनी,इंग्रजांच्या साम्राज्याचा पाया डळमळीत केला. हे राष्ट्र कृतज्ञ आहे,त्या वीरांगनाप्रती,राणी लक्ष्मीबाई  असू दे,झलकारीबाई, दुर्गाभाबी,राणी  गाइदिन्ल्यू, राणी चेनम्मा, बेगम हजरत महल, वेलु नाच्चियार.

भारताची नारीशक्ती काय असते , भारताच्या नारी शक्तीचा संकल्प काय असतो, भारताची स्त्री त्याग आणि बलिदान यांची काय पराकाष्ठा करू शकते, अशा अगणित वीरांगनांचे स्मरण करताना प्रत्येक हिंदुस्थानी व्यक्तीचा ऊर अभिमानाने भरून येतो.स्वातंत्र्याचा लढा देणारे,स्वातंत्र्यानंतर देशाची जडणघडण करणारे डॉ राजेंद्रप्रसाद जी असोत, नेहरू जी असोत,सरदार वल्लभभाई पटेल, श्यामा प्रसाद मुखर्जी, लाल बहादूर शास्त्री,दीनदयाल उपाध्याय,जय प्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, आचार्य विनोबा भावे,  नानाजी देशमुख, सुब्रमण्यम भारती,  अशा अगणित महापुरुषांना आज नमन करण्याची ही वेळ आहे. स्वातंत्र्याच्या लढ्याविषयी आपण जेव्हा बोलतो, तेव्हा आपण जंगलात जीवन कंठणाऱ्या,आपल्या आदिवासी समाजाचाही गौरव करण्याचे विसरू शकत नाही.त्यांचे योगदान विसरू शकत नाही. भगवान बिरसा मुंडा, सिद्धो कानो, अलुरी सीताराम राजू,गोविंद गुरु, अगणित नावे आहेत.ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीचा आवाज बनून दुर्गम जंगलातही माझ्या आदिवासी बंधू-भगिनींमध्ये, मातांमध्ये, युवकांमध्ये, मातृभूमीसाठी आपले जीवन अर्पण करण्याची प्रेरणा जागृत केली. या देशाचे हे भाग्य राहिले आहे, की स्वातंत्र्य लढ्याची अनेक रूपे राहिली आहेत,त्यामध्ये एक रूप हे ही होते,ज्यामध्ये नारायण गुरु होते, स्वामी विवेकानंद होते,महर्षी अरविंदो होते, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर होते,असे अनेक महापुरुष,हिंदुस्तानच्या प्रत्येक भागात, प्रत्येक काळात भारताची चेतना जागृत करत राहिले.भारताला  चैतन्यमय करत राहिले.

अमृत महोत्सवाच्या काळात देशाने, संपूर्ण एक वर्ष आपण पाहत आहोत, 2021 मध्ये दांडीयात्रेपासून सुरु होत, हिंदुस्तानच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात, प्रत्येक जिल्ह्यात,देशवासियांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त लक्षावधी कार्यक्रम केले.कदाचित इतिहासात    इतका विशाल, व्यापक , दीर्घ, एक उद्दिष्ट ठेवत उत्सव साजरा करण्यात आला अशी पहिली घटना असावी आणि हिंदुस्तानच्या प्रत्येक भागात या सर्व महापुरुषांचे स्मरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला,ज्यांना  कोणत्या ना कोणत्या कारणाने  ज्यांना इतिहासात स्थान मिळाले नाही, किंवा ज्यांना विस्मरणात ठेवण्यात आले, आज देशाने शोधून-शोधून प्रत्येक कानाकोपऱ्यात अशा वीरांना, महापुरुषांना, त्याग करणाऱ्यांना, हुतात्म्यांना , सत्याग्रहीचे स्मरण केले,त्यांना  नमन केले.अमृत महोत्सवादरम्यान या सर्व थोर पुरुषांना नमन करण्याची वेळ आहे. काल 14 ऑगस्टला भारताने फाळणी वेदना स्मृती दिवस, जड अंतःकरणाने, हृदयात खोलवर झालेल्या जखमांचे स्मरण करत  पाळला. कोट्यवधी जनतेने खूप काही सहन केले होते. तिरंगा ध्वजाची शान राखण्यासाठी सहन केले होते. मातृभूमीच्या मातीवरच्या प्रेमासाठी सहन केले होते. पण धैर्य गमावले नव्हते. 

भारताप्रती प्रेमाने नव्या जीवनाची सुरवात करण्याचा संकल्प नमन करण्याजोगा आहे, प्रेरणा घेण्याजोगा आहे. आज जेव्हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे,तेव्हा मागच्या 75 वर्षात देशासाठी आपले आयुष्य वेचणारे, देशाचे संरक्षण करणारे,देशाच्या संकल्पांची पूर्तता करणारे,सैन्यदलाचे जवान असोत,पोलीस कर्मचारी असोत, नोकरशहा असोत, लोकप्रतिनिधी असोत, स्थानिक स्वराज संस्थांचे शासक-प्रशासक असोत, राज्यांचे शासक-प्रशासक असोत, केंद्रातले शासक-प्रशासक असोत, 75 वर्षात या सर्वांचे योगदानही स्मरण करण्याची ही वेळ आहे आणि देशाच्या कोटी-कोटी नागरिकांनाही, ज्यांनी 75 वर्षे अनेक प्रकारच्या आव्हानांमधूनही देशाला प्रगती पथावर नेण्यासाठी आपल्याकडून जे शक्य ते सर्व करण्याचा प्रयत्न केला.

माझ्या प्रिय देशबांधवानो,

75 वर्षांच्या  आपल्या  या प्रवासात  अनेक चढ-उतार आले.  सुख आणि दुःखाचे अनेक प्रसंग राहिले आणि यामधूनही आपल्या देशवासीयांनी मोठी कामगिरी केली. हार मानली नाही. संकल्प डळमळू दिले नाहीत,म्हणूनच हेही सत्यच आहे की शेकडो वर्षांच्या गुलामीच्या कालखंडाने भारताच्या मनावर  भारताच्या मानवी भावनांवर  खोलवर घाव केले आहेत, खोल जखमा केल्या आहेत.मात्र त्या मध्ये   एक जिद्दही होती , एक जिजीविषा होती, एक निर्धार होता,एक जोम होता त्यामुळे अभाव असूनही , उपहास असूनही स्वातंत्र्याचा लढा अंतिम टप्प्यात होता तेव्हा देशाला भीती दाखवण्यासाठी, निराश , हताश करण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आले . स्वातंत्र्य मिळाले, इंग्रज निघून गेले तर देश  डूबेल, विखुरला जाईल,लोकं आपसात लढाई करून मृत्यूमुखी पडतील, काहीच उरणार नाही, भारत अंधकार युगात जाईल  अशा कितीतरी आशंका व्यक्त करण्यात आल्या मात्र त्यांना माहित नव्हते ही हिंदुस्तानची माती आहे, या मातीमध्ये ते सामर्थ्य आहे,जे शासकांपेक्षाही वर  वेगळ्या सामर्थ्याचा एक अंतरप्रभाव घेऊन जगत आहे, शतकांपासून जीवन जगत आहे.

त्याचाच परिणाम आहे, आपण काय झेलले नाही ,कधी  अन्न संकट झेलले,कधी युद्ध झेलावे लागले,दहशतवादाने  जागोजागी आव्हाने निर्माण केली. निर्दोष नागरिकांना मृत्युमुखी पडावे लागले,छुपे युध्द सुरु राहिले, नैसर्गिक संकटे येत राहिली,यश-अपयश, आशा- निराशा असे कितीतरी चढ-उतार आले.मात्र यातूनही भारत आगेकूच करत राहिला.भारताची विविधता, जी दुसऱ्यांना भारताचे ओझे आहे असे वाटत होती ती भारताची विविधताच भारताची अनमोल शक्ती आहे. शक्तीचा एक निरंतर प्रवाह आहे .

विश्वाला ठाऊक नव्हते की भारताकडे एक अंतर्निहित सामर्थ्य आहे. एक संस्कार सरीता आहे. एक मनोभूमिकेचे, एक विचारांचे बंधन आहे. आणि ते आहे, भारत लोकशाहीची जननी आहे. लोकशाहीची जन्मदात्री आहे. ज्यांच्या मनात लोकशाही असते, ते जेंव्हा संकल्प मनाशी धरुन पुढे जाऊ लागतात, ते सामर्थ्य जगातील मोठमोठ्या राजवटींसाठीही आव्हान घेऊन उभे ठाकतात. ही आहे लोकशाहीची जन्मदात्री, ही आहे लोकशाहीची जननी. आपल्या भारताने हे सिद्ध करुन दाखवले की आमच्याकडे एक अनमोल सामर्थ्य आहे.

माझ्या प्रिय देशवासीयांनो, 

75 वर्षाच्या प्रवासात, आशा, अपेक्षा, चढउतार या सगळ्यांमधे प्रत्येकाच्या प्रयत्नांमुळे जिथवर पोहचू शकलो होतो, पोहचलो होतो. आणि 2014 मधे देशवासीयांनी मला जबाबदारी दिली. स्वातंत्र्यानंतर जन्म झालेला मी पहिला व्यक्ती होतो, ज्याला लाल किल्ल्यावरुन देशवासीयांचे गौरवगान करण्याची संधी मिळाली होती. परंतु माझ्या मनात, जे काही आपल्याकडून शिकू शकलो, जितके आपल्याकडून समजून घेऊ शकलो आहे. माझ्या प्रिय देशवासीयांनो, तुमच्या सुखदुःखाला जाणून घेऊ शकलो आहे. देशाच्या आशा, अपेक्षांमधे तो कोणता आत्मा वास करतोय, त्याला जितका मी समजू शकलो आहे, त्यावरुन मी माझा संपूर्ण कालखंड देशातील त्या लोकांना सक्षम करण्यासाठी व्यतीत केला. माझे दलित असोत, शोषीत असोत, पिडीत असो, वंचित असो, आदिवासी असो, महिला असो, तरुण असो, दिव्यांग असो, शेतकरी असो, पूर्व असो , पश्चिम असो, उत्तर असो, दक्षिण असो, समुद्रतट असो, 

हिमालयातील पर्वतरांगा असो प्रत्येक कानाकोपऱ्यात महात्मा गांधींजीचे जे स्वप्न होते, प्रत्येक माणसाची काळजी घेण्याचे, महात्मा गांधी यांची जी आकांक्षा होती. शेवटच्या घटकातील व्यक्तीला समर्थ बनवण्याची, मी स्वतःला त्यासाठी समर्पित केले. आणि त्या आठ वर्षांची फलश्रुती, आणि स्वातंत्र्याच्या इतक्या दशकांचा अनुभव, आज 75 व्या वर्षात, जेव्हा आपण अमृतकाळात पाऊल ठेवत आहोत, अमृतकाळाची ही पहिली सकाळ आहे तेव्हा मी एका अशा सामर्थ्याला पाहतोय आणि मी ज्यामुळे गौरवाने भारुन जात आहे.

देशवासीयांनो, 

मी आज देशाचे सर्वात मोठे सौभाग्य पाहतोय की भारताचे जनमन आकांक्षित जनमन आहे. अभिव्यक्त होणारा समाज कोणत्याही देशाचा सर्वात मोठा ठेवा असतो. आणि  आम्हाला अभिमान आहे की आज हिंदुस्थानच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात, समाजाच्या प्रत्येक वर्गात, प्रत्येक घटकात आकांक्षा उधाणावर आहेत. देशाचा प्रत्येक नागरिक परिस्थिती बदलताना पाहू इच्छीतोय, बदलू पाहतोय. त्याला आता वाट बघायची नाही. हे सारे आपल्या डोळ्यासमोर बदलताना त्याला पाहायचे आहे. तो कर्तव्यात सहभागी होऊन हे करु इच्छितो आहे. त्याला गती हवी आहे. त्याला प्रगती हवी आहे. 75 वर्षात उराशी बाळगलेली स्वप्ने आपल्याच डोळ्यांसमोर साकार होताना पाहण्यासाठी तो आतूर आहे, उत्साहित आहे. अधीर देखील आहे. काही लोकांना यामुळे अडचणही होऊ शकते. कारण जेव्हा अभिव्यक्त समाज असतो तेव्हा सरकारांनाही तलवारीच्या धारेवर चालावं लागते. सरकारांनाही काळासोबत धावावे लागते. आणि मला विश्वास आहे केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, स्थानिक स्वराज्य संस्था असोत, कोणत्याही प्रकारची शासन व्यवस्था का असेना, या प्रत्येक व्यवस्थेला, आपल्या अभिव्यक्त समाजाला उत्तर द्यावे लागेल. त्यांच्या आकांक्षासाठी आपण अधिक प्रतिक्षा करु शकत नाही. आपल्या या अभिव्यक्त समाजाने बराच काळ वाट पाहिली आहे. पण आता ती आपल्या येणाऱ्या पिढीला वाट बघायला लावू देण्यासाठी तयार नाही. आणि यासाठी या अमृतकाळाची ही पहिली पहाट, आपण या अभिव्यक्त समाजाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी ही खूप मोठी सुवर्णसंधी बनून आली आहे.

माझ्या प्रिय देशवासीयांनो,

आपण गेल्या काही दिवसात पाहिले आहे. एका प्रचंड सामर्थ्याचा अनुभव घेतला आहे. आणि ते आहे, भारतात एका सामूहिक चेतनेचे पुनर्जागरण झाले आहे. एका सामूहिक चेतनेचे पुनर्जागरण. स्वातंत्र्याच्या इतक्या संघर्षाचे जे अमृत होते, आता ते एकत्रित केले जात आहे, संकलित केले जात आहे, संकल्पात परिवर्तीत होत आहे. पुरुषार्थाच्या पराकाष्ठेची साथ लाभत आहे आणि सिद्धीचा मार्ग दिसू लागला आहे. ही चेतना.. मला वाटते की ही चेतनेची जागृती, हे पुनर्जागरण हा आपला सर्वात मोठा ठेवा आहे. हे पुनर्जागरण बघा, 10 ऑगस्ट पर्यंत कदाचित लोकांना ठाऊकही नसेल की देशाच्या गाभ्यात कोणती ताकद आहे. मात्र गेल्या तीन दिवसांपासून ज्याप्रकारे तिरंग्यासंदर्भात, तिरंग्याची ही यात्रा घेऊन देश ज्याप्रकारे मार्गस्थ झाला आहे, मोठमोठे समाज अभ्यासक, सामाजिक विषयातले तज्ञ, ते ही कदाचित कल्पना करुन शकत नसतील की माझ्या देशात किती प्रचंड सामर्थ्य आहे. हे एका तिरंगा ध्वजाने दाखवून दिले आहे. हा पुर्नचेतना, पुनर्जागरणाचा क्षण आहे. काही लोक समजू शकले नाही  

जेव्हा जनता कर्फ्यू  म्हटले जाते, हिंदुस्थानातील प्रत्येक कानाकोपऱ्यात त्याचे पालन होते. ही त्या चेतनेची अनुभूती आहे. देश जेव्हा टाळी, थाळी वाजवून कोरोना योद्ध्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहतो तेव्हा चेतनेची अनुभूती होते. जेव्हा दिवे उजळून देश कोरोना योद्ध्यांना शुभकामना देण्यासाठी उभा ठाकतो तेव्हा त्या चेतनेची अनुभूती होते. कोरोनाच्या काळात सारे जग, लस घ्यायची की नाही, लस उपयोगी आहे की नाही या संभ्रमात होती त्यावेळी माझ्या गावातील गरीबही 200 कोटी लस मात्रा घेत जगाला थक्क करुन टाकणारे काम करुन दाखवतात. ही चेतना आहे. हेच सामर्थ्य आहे. या सामर्थ्याने आज देशाला नवी ताकद दिली आहे. 

माझ्या देशवासीयांनो, माझ्या प्रिय बंधू भगिनींनो,

एक महत्वपूर्ण सामर्थ्य मी पाहतोय. जसा आकांक्षित समाज, जसे पुनर्जागरण, तसेच स्वातंत्र्याच्या इतक्या दशकांनंतर, संपूर्ण विश्वाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. जग भारताकडे गौरवाने पाहत आहे. अपेक्षेने पाहत आहे. भारताच्या या मातीत समस्यांचे समाधान जग शोधत आहे मित्रांनो. जगाचा बदल, जगाच्या दृष्टीकोनातील हे परिवर्तन, 75 वर्षांच्या आपल्या अनुभव प्रवासाचा परिणाम आहे.

आपण ज्याप्रकारे संकल्प घेऊन मार्गस्थ झालो आहोत, जग हे बघत आहे, आणि जगही याबाबत आशा बाळगून जगत आहे. आशा पूर्ण करण्याचे सामर्थ्य कुठे एकवटले आहे हे त्याला दिसू लागले आहे. मी यास त्रिशक्तीच्या रुपात बघतो. तीन सामर्थ्याच्या रुपात बघतो. आणि ही त्रीशक्ती आहे, अभिव्यक्तीची,  पुनर्जागरणाची, आणि जगाच्या आशेची. आणि हे पूर्ण करण्यासाठी.., आम्हाला माहित आहे.

मित्रांनो, 

माझ्या देशवासीयांची खूप मोठी भूमिका आहे. 130 कोटी देशवासीयांनी, अनेक दशकांच्या अनुभवानंतर स्थिर सरकारचे महत्व काय असते, राजकीय स्थिरतेचे महत्व काय असते, राजकीय स्थिरता जगात कशाप्रकारची ताकद दाखवू शकते, धोरणांमधे कसे सामर्थ्य असते, त्या धोरणांवर जग कसे विश्वासते हे भारताने दाखवले आहे. आणि जगही हे जाणते आहे. आणि जेव्हा राजकीय स्थिरता असेल, धोरणांमधे वेग असेल, निर्णयांमधे गतिशीलता असेल, सर्वव्यापकता  असेल, सर्वसमावेशकता असेल तर विकासासाठी प्रत्येकजण भागीदार होतो. आम्ही सबका साथ सबका विकासाचा मंत्र घेऊन निघालो होतो. पण बघता बघता देशवासीयांनी त्यात सबका विश्वास आणि सबका प्रयास यासह त्यात आणखी रंग भरले आहेत. आणि यासाठी, आम्ही बघितले आहे, आमच्या सामुहिक शक्तीला, आमच्या सामुहिक सामर्थ्याला आम्ही पाहिले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ज्याप्रकारे साजरा केला गेला. ज्या प्रकारे प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवर बनवण्याचा संकल्प केला गेला. गावागावातील लोक यात सहभागी होत आहेत. अभियान चालवले जात आहे. प्रत्येकजण सेवा करत आहे. आपल्या गावात आपल्या प्रयत्नातून जलसंवर्धनासाठी मोठे अभियान चालवत आहेत. आणि यामुळे प्रिय बंधू भगिनींनो, मग ते स्वच्छतेचे अभियान असो, मग ते गरीब कल्याणाचे काम असो. देश आज पूर्ण शक्तीने पुढे जात आहे. परंतु, बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या अमृतकाळात, स्वातंत्र्याच्या 75 वर्षात त्याचे गौरवगानच करत राहाणार? आपलीच पाठ थोपटून घेणार? तर आपली स्वप्ने कुठे तरी दूर निघून जातील. आणि यासाठी 75 वर्षांचा कालखंड कितीही शानदार राहिला असो, कितीही संकटाचा राहिला असो, कितीही आव्हानांचा राहिला असो, कितीही स्वप्ने अपूर्ण दिसत असतील, तरीही आपण आज जेव्हा अमृतकाळात प्रवेश करत आहोत, येणारी 25 वर्ष आमच्या देशासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहेत. आणि यासाठी जेव्हा मी आज, माझ्या समोर जेव्हा लाल किल्ल्यावरुन 130 कोटी देशवासीयांच्या सामर्थ्याचे स्मरण करतो. त्यांची स्वप्ने बघतो, त्यांच्या संकल्पांची अनुभूती करतो. आणि 

मित्रांनो,

मला वाटते येणाऱ्या 25 वर्षांसाठी आपण त्या पाच, त्या पंचप्रणांवर आपल्या शक्ती केंद्रित करायला हव्यात. आपल्या संकल्पांना केंद्रित करायला हवे. आपल्या सामर्थ्याला केंद्रित करावे लागेल. आणि आपल्याला त्या पंचप्रणांना घेऊन, 2047.. जेव्हा स्वातंत्र्याची शंभर वर्षे पूर्ण होतील. स्वातंत्र्याच्या देशप्रेमींची स्वप्ने साकारण्याची जबाबदारी घेऊन पुढे जायला हवे. आणि जेव्हा मी पंचप्रणांबद्दल बोलतो, तेव्हापहिला पंचप्रण   

आता देश मोठे संकल्प घेऊनच पुढे जाणार,  मोठे संकल्प घेऊन पुढे जावे लागणार आहे. आणि तो मोठा संकल्प आहे, विकसित भारत. आता त्यापेक्षा काहीच कमी नाही. मोठा संकल्प. आता दुसरा प्रण,  

आहे, कोणत्याही मनाच्या कोपऱ्यात, आपल्या आत, आपल्या सवयीत गुलामीचा एकही अंश अजूनही असेल तर त्यास कोणत्याही अवस्थेत राहू द्यायचे नाही.

गुलामीने आपल्याला शत प्रतिशत जखडून टाकलं होतं. आपल्या मानसिकतेला बांधून टाकलं होतं. आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत विकृती निर्माण केल्या होत्या. आपल्याला गुलामीशी जोडलेल्या छोट्या छोट्या गोष्टी जर कुठे दिसल्या, आपल्या अंतरात असल्याचं दिसलं, आपल्या आसपास दिसल्या…. तर आपल्याला त्यापासून आता मुक्त व्हावंच लागेल, पंचप्रणांपैकी हाच आपला दुसरा प्रण आहे.

तिसरा पंचप्रण

आपल्याला आपल्या वैभवशाली वारशाचा अभिमान असला पाहीजे. कारण हाच वारसा आहे, ज्यामुळे भारताने कधी काळी सुवर्णकाळ अनुभवला होता. आणि हाच वारसा आहे ज्यात काळानुरुप बदलण्याची सवय जडलेली आहे. आणि हाच वारसा आहे, ज्यानं कालबाह्य झालेल्या गोष्टींचा त्याग केला आहे, नाविन्यतेचा स्वीकार केला आहे. आणि त्यामुळेच या वारशाचा आपल्याला गर्व असायला हवा.

आणि चौथा पंचप्रण...तोही तितकाच महत्वपूर्ण आहे.तो आहे, एकता आणि एकजुटता. 130 कोटी देशवासीयांमधली एकता, देशात कोणी परका नसला पाहिजे. ही एकतेची ताकद एक भारत श्रेष्ठ भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी आपला चौथा पंचप्रण आहे पाचवा पंचप्रण आहे तो म्हणजे नागरिकांचे कर्तव्य.नागरिकांचे कर्तव्य…. ज्यातून पंतप्रधानांनाही सवलत नाही, मुख्यमंत्र्यांनाही सवलत नाही.. ते ही नागरिक आहेत. नागरीकांचे कर्तव्य… ही बाब आपल्या आगामी 25 वर्षांमधली स्वप्न पूर्ण करण्याच्यादृष्टीने एक खूप मोठी प्रणशक्ती आहे.

माझ्या प्रिय देशबांधवांनो

जेव्हा स्वप्न मोठी असतात, जेव्हा संकल्प मोठे असतात.. तेव्हा पुरुषार्थही खूप मोठा असतो.. ताकदही मोठ्या प्रमाणात एकत्र येत असते.आता कोणी कल्पना करू शकतो का? की देश?1940-42 च्या दशकातला कालखंड आठवून पाहा.. देश जागृत झाला होता. कोणी हातात झाडू घेतला होता, कोणी हातात  चरखा घेतला होता.कोणी सत्याग्रहाचा मार्ग निवडला होता, कोणी संघर्षाचा मार्ग निवडला होता… कोणी क्रांतीचा.. वीरतेचा मार्ग स्वीकारला होता..मात्र संकल्प मोठा होता… स्वातंत्र्य आणि त्याची ताकद पाहा. मोठा संकल्प होता म्हणून आपण स्वातंत्र्य मिळवलंच.आपण स्वतंत्र झालो.जर संकल्प छोटा असता… मर्यादित असता, तर कदाचित आजही संघर्ष करत राहण्याचे दिवस कायम राहीले असते.पण संकल्प मोठा होता.. आणि आपण तो तडीसही नेला.

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

आता, जेव्हा आज ही अमृतकाळाची पहिली पाहाट आहे, तेव्हा आपल्याला आगामी 25 वर्षात विकसीत भारत घडवायचाच आहे….. तो ही आपल्या नजरेसमोर. 20-22-25 वर्षांचे माझ्या देशाचे जे युवक माझ्या समोर आहेत..

माझ्या देशाच्या युवकांनो, जेव्हा देश स्वातंत्र्याची 100 वर्ष साजरा करत असेल, तेव्हा तुम्ही 50-55 वर्षांचे झालेले असाल. म्हणजे आपल्या आयुष्याचा हा सुवर्णकाळ, तुमच्या वयोमानातली ही 25-30 वर्षे भारताची स्वप्न पूर्ण करण्याचा कालावधी आहे. आता संकल्प घेऊन, माझ्या सोबत वाटचाल सुरु करा माझ्या सहकाऱ्यांनो.. तिरंग्यांची शपथ घेऊन वाटचाल सुरु करा.आपण सगळे पूर्ण ताकदीनं वाटचाल सुरु करू.मोठा संकल्प, माझा देश विकसीत देश होईल, विकसित (Developed Country) होईल. विकासाच्या प्रत्येक मानकाने पाहा. आपण मानवकेंद्री व्यवस्था विकसित करूया, आपल्या केंद्रस्थानी मानव असेल, आपल्या केंद्रस्थानी मानवाच्या आशा आकांक्षा असतील. आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे, भारत जेव्हा मोठे संकल्प हाती घेतो, तेव्हा तो ते संकल्प पूर्णत्वास नेतो.

जेव्हा मी इथूनच स्वच्छतेबद्दल बोललो होतो.. माझ्या पहिल्या भाषणात. देशानं त्या दिशेनं वाटचाल सुरु केली, ज्याला जिथून शक्य झालं त्यानं तिथून स्वच्छतेच्या दिशेनं वाटचाल सुरु केली, आणि अस्वच्छतेविषयीचा तिटकारा हे आपलं स्वभाव वैशिष्ट्यच झालं.हाच तर देश आहे.  या देशानं करून दाखवलं आणि करून दाखवतही आहे.हाच तो देश आहे.. ज्यानं लसीकरण.. ज्याबाबतीत जग द्विधा मनस्थितीत असताना, 200 कोटी लसमात्रांचा टप्पाही ओलांडून दाखवला… निश्चित कालमर्यादेत हा टप्पा ओलांडला…आधीचे सर्व विक्रम मोडून काढत हा टप्पा ओलांडला.. हा देश करू शकतो..आम्ही ठाम संकल्प केला होता.देश आखाती देशातील खनिजतेलावर  अवलंबून आहे.. अशावेळी  त्याला वनस्पतींच्या अवशेषांपासून निघणाऱ्या तेलाच्या वापराच्या दिशेनं कसं वळवावं? 10% इथेनॉल ब्लेंडींगचं स्वप्न… मोठं वाटत होतं. आपला पूर्वइतिहास लक्षात घेता, असं दिसत होतं की शक्यच नाही आहे.. मात्र नियोजित कालमर्यादेआधीच 10% इथेनॉल ब्लेंडींग करून, देशानं हे स्वप्नही पूर्ण करून दाखवलं. 

बंधु आणि भगिणींनो,

अडीच कोटी लोकांपर्यंत इतक्या कमी कालावधीत वीजेची जोडणी पोहचवणं हे छोटं काम नव्हतं. देशानं करून दाखवलं.  लाखो कुटुंबियांच्या घरात नळाद्वारे पीण्याचं पाणी पोहोचवण्याचं काम आज देश वेगानं करतो आहे. उघड्यावर शौचाला जाण्याच्या परिस्थितीतून सुटका करून घेणं, आज आपल्या भारतात शक्य झाली आहे. 

माझ्या प्रिय देशबांधवांनो

अनुभव सांगतो, की एकदा का आपण सगळेच संकल्प घेऊन त्या दिशेनं वाटचाल सुरु केली, की आपण निश्चित केलेली ध्येय नक्कीच गाठू शकतो.नवीकरणीय उर्जेचं ध्येय असो, देशात नवी वैद्यकीय महाविद्यालयं उभारण्याचा संकल्प असो, डॉक्टरांना प्रशिक्षित करणं असो….. प्रत्येक क्षेत्राचा वेग आधीच्या तुलनेत प्रचंड वाढला आहे. आणि त्यामुळेच मी हे बोलतो की,आगामी 25 वर्षे ही मोठ्या संकल्पाची असायला हवीत.हाच आपला निश्चय आणि हाच आपला प्रणही असायला हवा.

एक दुसरी गोष्ट देखील बोललो आहे, त्या प्रणशक्तीबद्दल मी चर्चाही केली आहे, की, गुलामीची मानसिकता…जरा विचार करा माझ्या बाधवांनो..

कधीपर्यंत जग आपल्याकडून प्रमाणपत्र मागत राहणार आहे..? कधीपर्यंत आपण जगानं दिलेल्या प्रमाणपत्रावरच जगत राहणार आहोत..? आपण आपली स्वतःची मानकं तयार करणार आहोत की नाही..?130 कोटींचा हा देश आपली स्वतःची मानकं पार करून दाखवण्यासाठी पुरुषार्थ नाही दाखवू शकत का..?  आपल्याला कोणत्याही परिस्थितीत इतरांसारखे दिसण्यासाठी प्रयत्न करत राहण्याची काही गरज नाही. आपण जसे आहोत तसेच.. पण सामर्थ्यानिशी उभे राहो.. आणि हाच आपला विचार असला पाहीजे..आपल्याला गुलामीपासून मुक्त व्हायचं आहे…आपल्या मनाच्या अंतरंगात… अगदी खोलवर सात समुद्रांच्या तळाशीदेखील गुलामीचा अंश उरला नाही पाहीजे..आणि मला आशा आहे..ज्या रितीनं नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार झालं आहे. ज्या पद्धतीच्या विचार मंधनातून हे धोरण तयार झालं आहे. कोट्यवधी लोकांची मतं विचारात घेऊन हे धोरण तयार झालं आहे. आणि भारताच्या मातीशी नाळ सांगणारं शैक्षणिक धोरण तयार झालं आहे. या धोरणातला प्रत्येक अंश आपल्या मातीशी नाळ सांगणारा आहे, यातून आम्ही ज्या रितीनं कौशल्यांवर भर दिला आहे, हे एक अशाप्रकारचं सामर्थ्य आहे, जे आपल्याला गुलामीपासून मुक्तता मिळूवून देण्यासाठीची ताकद देईल.

आपण पाहिलंच आहे…कधी कधी तर आपल्यातल्या अनेक क्षमता भाषेच्या बंधनात अडकून पडतात. हे गुलामीच्या मानसिकतेचाच दुष्परीणाम आहे. आपल्याला आपल्या देशातल्या प्रत्येक भाषेचा अभिमान असायला हवा. भले ती भाषा आपल्याला अवगत असेल किंवा नसेल, पण ती माझ्या देशातली भाषा आहे, माझ्या पूर्वजांनी जगाला दिलेला वारसा आहे.. याचा आपल्याला अभिमान असायला हवा.

माझ्या सहकाऱ्यांनो,

आज आपण डिजीटल इंडियाचं रुप पाहतोय, स्टार्टअप पाहतोय..हे कोण लोक आहेत.ही ती क्षमता आहे, जी टिअर टू, टिअर थ्री शहरांध्ये, कुठल्याशा गावामध्ये, गरीबाच्या कुटुंबामध्ये राहात असलेल्या लोकांमधे वसलेली आहे. हे आपले युवक आहेत, जे आज नव नव्या शोधांसह जगासमोर आपलं अस्तित्व दाखवत आहेत. गुलामीची मानसिकता.. याला आपल्याला तिलांजली द्यावीच लागेल.. आपल्या सामर्थ्यावर विश्वास दाखवावा लागेल. दुसरी एक गोष्ट जी मी बोललो..

मी तिसऱ्या पंचप्रणाबद्दल बोललो होतो.. ती म्हणजे.. आपल्या वारशाचा… आपल्याला अभिमान असला पाहिजे. जेव्हा आपण आपल्या मातीशी जोडले जाऊ….. जेव्हा आपण आपल्या मातीशी जोडले जाऊ….. तेव्हाच तर आपण उंच उड्डाण घेऊ शकू… आणि जेव्हा आपण उंच उड्डाण घेऊ.. तेव्हाच आपण जगाच्याही समस्या सोडवू शकू. आपण पाहिलं आहे. जेव्हा आपल्याला आपल्या स्वतःच्या गोष्टींचा अभिमान असतो…आता जग सर्वसमावेषक आरोग्यव्यवस्थेविषयी चर्चा करू लागलं आहे..पण जेव्हा ते सर्वसमावेषक आरोग्यव्यवस्थेविषयी चर्चा करतात, तेव्हा त्यांचं लक्ष भारताच्या योगाभ्यासावर असतं, त्यांचं लक्ष भारताच्या आयुर्वेदावर असतं, त्यांच लक्ष भारताच्या सर्वसमावेशक जीवनपद्धतीवर असतं. हा आपला वारसा आहे, जो आपण जगालाही देत आहोत. आज जग या वारशाकडे आकर्षित होऊ लागलं आहे.आणि आपली ताकद पाहा.. आपण ते लोक आहोत ज्यांना निसर्गासोबत जगणं माहीत आहे, निसर्गावर प्रेम करणं माहीत आहे. आज जग पर्यावरणीय समस्यांचा सामना करत आहे… अशावेळी आपल्याकडे तो वारसा आहे… जागतिक तापमान वाढीच्या समस्येवरची उपाययोजना दिशेनं जाणारा मार्ग आपल्याकडे आहे, तो आपल्याला आपल्या पूर्वजांनी दाखवला आहे… 

जेव्हा आपण जीवनपद्धतीविषयी बोलतो, पर्यावरणाला अनुकुल जीवनपद्धतीविषयी बोलतो.. आपण लाईफ मिशनविषयी बोलतो, तेव्हा आपण जगाचं लक्ष वेधून घेत असतो, आपल्याकडे जे सामर्थ्य आहे.आपल्याकडचा बारीक भात, जाडा भात, भरडधान्य / डाळी / कडधान्य या आपल्या घराघरात आढळणाऱ्या गोष्टी आहेत.. आपला वारसा आहे. आपल्या छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमातून, आपल्याकडच्या जमीनींच्या छोट्या छोट्या तुकड्यामध्ये उगवणारी आपली खाद्यान्नं.  जग आंतरराष्ट्रीय स्तरावर भरडधान्य वर्ष साजरं करण्याच्या दिशेनं विचार करू लागली आहे. म्हणजे जग आज आपल्या वारसा… आपण त्याचा अभिमान बाळगायला शिकलं पाहीजे. आपल्याकडे जगाला देण्यासारखं खूप काही आहे. आपली कौटुंबिक मूल्य…..जगभरातल्या सामाजिक तणावाच्या परिस्थितीबद्दल जेव्हा चर्चा होते, व्यक्तिगत तणावाबद्दल जेव्हा चर्चा होते.. तेव्हा लोकांना योगाभ्यास आठवतो. सामुहिक पातळीवरच्या तणावाची चर्चा होते तेव्हा भारताची कौटुंबिक व्यवस्था आठवते. संयुक्त कुटुंबासारखा मौल्यवान वारसा, जो वर्षानुवर्षे आपल्या माता भगिणींनी केलेल्या त्यागातून आपल्याकडे जी कुटुंब नावाची व्यवस्था विकसित झाली आहे.. हा आपला वारसा आहे.. या वारशाचा अभिमान आपल्याला का वाटू नये..?आपण तर ते लोक आहेत जे प्रत्येक सजिवात शीव रुप पाहतो.आपण तर ते लोक आहेत जे नरामध्ये नारायणाचं रुप पाहतात.आपण तर ते लोक आहेत जे नारी तू नारायणी असं संबोधतोआपण तर ते लोक आहेत जे वनस्पतीला परमात्म्याचं रुप मानतातआपण तर ते लोक आहेत जे नदीला मातेसमान मानतात
आपण तर ते लोक आहेत जे प्रत्येक दगडात शंकराचं रुप पाहतातहे आपलं सामर्थ्य आहे की, आपण प्रत्येक नदीत आईचं रुप पाहतो, पर्यावरणाची ही व्यापकता विशालता…. आपल्या या अभिमानास्पद गोष्टींबाबत जेव्हा आपण स्वतःहून जगासमोर अभिमान बाळगू, तेव्हा जगालाही त्याबाबत आपोआपच अभिमान वाटू लागेल.

बंधु आणि भगिनींनो..

आपण तर ते लोक आहेत ज्या जगाला ‘वसुधैव कुटुंबकम’ हा मंत्र दिला.. आपण तर ते लोक आहेत जे जगाला म्हणतात एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति।’आज जे ‘holier than thou’ चं संकट उभं ठाकलं आहे, तुझ्यापेक्षा मी श्रेष्ठ या वृत्तीमुळे जी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. जगाला एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति चा संदेश देणारा वारसा आपल्याकडे आहे.. हा वारसा सांगतो की सत्य केवळ एकच आहे.. विद्वान लोक हीच बाब वेगवेगळ्यापद्धतीने मांडतात.. पण हा वारसा आपला आहेआपण तर ते लोक आहेत जे म्हणतात यत् पिण्डे तत् ब्रह्माण्डे हा केवढा मोठा विचार आहे.. जे ब्रम्हांडात आहे, ते प्रत्येक सजीवात आहे  असं म्हणणारे आपण लोक आहोत….आपण तर ते लोक आहेत ज्यांनी जगाच्या कल्याणाचा विचार केला आहे. आपण जग कल्याण ते जन कल्याणाच्या विचारांवर चालणारे पाईक आहोत.  जग कल्याण ते जन कल्याणाच्या मार्गावर वाटचाल करणारे आपण, जेव्हा जगासाठी प्रार्थना करतो तेव्हा आपण बोलतो की सर्वे भवन्तु सुखिनः। सर्वे सन्तु निरामयाः। सर्वांच्या सुखाची, सर्वांच्या आरोग्याविषयी काळजी करणं हाच आपला वारसा आहे. त्यामुळेच आपण अगदी सन्मानानं आपल्या या वारशाचा अभिमान करायला शिकलं पाहीजे. ही आपली प्रणशक्ती आहे. जी आगामी 25 वर्षांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी गरजेची आहे. त्याचप्रकारे

माझ्या प्रिय देशबांधवांनो आणखी एक महत्वाचा विषय आहे. एकता.. एकसंधता इतक्या मोठ्या देश, त्यातली विविधता आपल्याला साजरी करायची आहे.कितीतरी बंध, परंपरा हे आमचे आन-बान शान आहेत. कुणीही उच्च नाही कुणीही नीच नाही सगळेजण समान आहेत. कोणी माझा नाही कोणी परका नाही. सगळेच आपले आहेत ही भावना एकते साठी खूप आवश्यक आहे. घरातही एकता तेव्हाच जपली जाते जेव्हा आपण मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करत नाही. जर मुलगा मुलगी असा भेदभाव केला तर एकतेचा मंत्र जपता येणार नाही. जेंडर इक्वलिटी ही  आपल्या एकतेची पहिली अट आहे. जेव्हा आपण एकतेची गोष्ट करतो, जर आपण एकच पॅरामीटर वापरला एकच मानक वापरलं,ते मानक आपण मानलं इंडिया फर्स्ट,  मी जे काही करतोय जो काही विचार करतोय जे बोलतोय ते इंडिया फर्स्ट ला अनुकूल असेल तर एकतेचा समानतेचा मार्ग खुला होईल.आम्हाला एकतेच्या सूत्रात बांधणारा हा मंत्र आहे. आपल्याला तोच मंत्र जपायचा आहे. मला पूर्ण विश्वास आहे की आपण समाजातून उच्च नीच हा भेदभाव, आपला परक्याचा भेदभाव मिटवणं, आपल्या सर्वांची ही पूजा असली पाहिजे. आपण सत्यमेव जयते असे म्हणतो, श्रमिकांचा सन्मान हा आपला स्वभाव धर्म असला पाहिजे.

मात्र बंधू-भगिनींनो

लाल किल्ल्यावरून मी माझी आणखी एक व्यथा तुम्हाला सांगू इच्छितो, माझं दुःख तुम्हाला सांगावसं वाटतं. मला माहित आहे कदाचित हा लाल किल्ल्या वरून बोलण्याचा विषय होऊ शकणार नाही पण माझ्या मनातलं हे दुःख मी कुठे सांगू. देशवासियांसमोर सांगायचं नाही तर कुठे सांगू. आणि ते आहे, काही ना काही कारणाने आपल्यात अशी एक विकृती निर्माण झाली आहे. आपल्या वागण्या बोलण्यात आपल्या व्यवहारात, आपल्या काही शब्दांमध्ये, आपण स्त्रीचा अपमान करतो. आपण स्वभावानं संस्काराने आपल्या दैनंदिन जीवनात स्त्रीचा अपमान करणाऱ्या प्रत्येक गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवण्याचा संकल्प करू शकतो का? स्त्रीचा गौरव, राष्ट्राचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीची खूप मोठी ठेव असणार आहे. हे सामर्थ्य मी पाहतोय आणि म्हणूनच मी ह्या गोष्टीचा आग्रह धरतो.

माझ्या प्रिय देश वासियांनो, 

मी पाचव्या पंचप्रणाविषयी बोलतोय

आणि ती पाचवा  पंचप्रण आहे.. नागरिकाचे कर्तव्य. जगात, ज्या ज्या देशांनी प्रगती केली आहे, ज्या ज्या देशांनी काही मिळवलं आहे, वैयक्तिक जीवनातही आपण जे काही मिळवलं आहे, यातून  काही मुद्दे समोर येतात. एक शिस्तबद्ध जीवन, दुसरा कर्तव्यासाठी झोकून देणे. व्यक्तीच्या जीवनातलं यश असो, समाजाचं यश असो, कुटुंबाचं यश असो, राष्ट्राचं यश असो, हा मूलभूत मार्ग आहे.. हा  मूलभूत पंचप्रण आहे आणि म्हणूनच आपल्याला कर्तव्यावर जोर द्यावाच लागेल. हे शासनाचं काम आहे की 24 तास वीज पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. मात्र दुसरीकडे नागरिकाचे हे कर्तव्य आहे की जेवढी जास्तीत जास्त युनिट वीज वाचवता येईल तेवढी वाचवली पाहिजे. प्रत्येक शेतापर्यंत पाणी पोहोचवणं ही सरकारची जबाबदारी आहे हा सरकारचा प्रयत्न आहे… पण per drop more drop  तत्वानुसार पाण्याची बचत करत, पाणी वाचवत काम करत राहणं हे माझ्या प्रत्येक शेतातलं धोरण असलं पाहिजे.रसायन विरहित शेती सेंद्रिय शेती नैसर्गिक शेती हे आपलं कर्तव्य आहे.

मित्रांनो, पोलीस असो नाहीतर सामान्य जनता, शासक असो अथवा प्रशासक, हे सर्व घटक नागरिकांना लागू असलेल्या कर्तव्यांपासून वेगळे असू शकत नाहीत. प्रत्येकानं आपापलं नागरिक कर्तव्य बजावलं तर मला विश्वास आहे की आपण आपलं ठरवलेलं उद्दिष्ट, वेळेच्या आधी गाठण्याची सिद्धी प्राप्त करू शकतो.

माझ्या प्रिय देशावासियांनो, 

आज महर्षी अरविंद यांची जयंती सुद्धा आहे. मी या महापुरुषाच्या चरणांना वंदन करतो. मात्र आपल्याला या महापुरुषाचे स्मरण करावे लागेल. त्यांनी सांगितलं होतं स्वदेशीतून स्वराज्य, स्वराज्यातून सुराज्य हा त्यांचा मंत्र आहे .आपल्या सर्वांना यावर विचार करायचा आहे की आपण कुठवर जगातल्या इतर लोकांवर अवलंबून रहायचं. जर आपल्या देशाला अन्नाची आवश्यकता असेल तर आपण आउट सोर्सिंग करायचं का अशी वेळ आली, तेव्हा देशानं ठरवलं की आपलं पोट आपण स्वतः भरू आणि देशाने हे करून दाखवलं की नाही? एकदा का संकल्प केला तर नक्की होतं. आणि म्हणूनच आत्मनिर्भर भारत ही प्रत्येक नागरिकाची, प्रत्येक सरकारची, समाजातल्या प्रत्येक घटकाची जबाबदारी बनते. आत्मनिर्भर भारत हा केवळ सरकारी अजेंडा, सरकारी कार्यक्रम नाही. ही समाजाची चळवळ आहे जी आपण पुढे घेऊन जायची आहे.

माझ्या मित्रांनो, 

आज आपण ही जी गोष्ट ऐकली स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर आपण जो आवाज ऐकायला उत्सुक आहोत 75 वर्षानंतर तो आवाज आपल्या कानावर पडला आहे. 75 वर्षानंतर लाल किल्ल्यावरून तिरंग्याला सलामी देण्याचे काम पहिल्यांदाच मेड इन इंडिया तोफे ने  केला आहे. असा कुठला भारतीय नागरिक असेल ज्याला या आवाजाने नवी ताकद दिली नसेल. माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो मी आज आपल्या देशातल्या सैन्याच्या जवानांचं मनापासून अभिनंदन करू इच्छितो. माझ्या आत्मनिर्भर भारत या मुद्द्याला, संघटित स्वरूपात, एका धाडसाच्या स्वरूपात माझ्या लष्कराच्या जवानांनी, सेना नायकांनी ज्या जबाबदारीनं आपल्या खांद्यावर पेललं आहे त्यांना मी जेवढ्या वेळा सलाम करेन तेवढा कमीच आहे. त्यांना मी मनापासून सलाम करतो. कारण लष्करातला आपला जवान मृत्यूला सोबत घेऊन फिरत असतो त्याच्या बाबतीत जीवन आणि मृत्यू यात अंतरच उरलेलं नसतं. आणि अशा विपरीत परिस्थितीतच तो निर्धाराने उभा राहतो.

आणि माझ्या सेनेच्या जवानांनी हे निश्चित करावं की आपण तीनशे अशा गोष्टींची यादी बनवावी ज्या आपण परदेशातून आणणार नाही.  आपल्या देशाचा हा संकल्प छोटा नाही. 

मला या संकल्पात, भारताच्या, आत्मनिर्भर भारताच्या,  उज्वल भविष्याची अशी बीजं दिसताहेत, जी या स्वप्नांचं विशाल वटवृक्षात रूपांतर करणार आहेत.अभिवादन अभिवादन. माझ्या सेनाधिकाऱ्यांनाही अभिवादन. मी माझ्या छोट्या छोट्या बालकांना पाच सात वर्षांची बालं त्यांना सुद्धा सलाम करू इच्छितो. जेव्हा देशामध्ये एक चेतना जागृत झाली, मी शेकडो कुटुंबांकडून हे ऐकलं आहे, पाच पाच सात सात वर्षांची मुले घरात असं म्हणताहेत की  आम्ही परदेशी खेळणी वापरणार नाही. पाच वर्षाचं मुल जेव्हा हा संकल्प करतं ना,  की घरात परदेशी खेळणी वापरणार नाही, तेव्हा आत्मनिर्भर भारत त्याच्या नसानसात भिनलेला असतो.आपण बघा, पी एल आय स्कीम, एक लाख कोटी रुपये, जगातले लोक भारतात आपलं नशीब आजमावण्यासाठी येत आहेत. तंत्रज्ञान घेऊन येत आहेत. रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करत आहेत. भारत उत्पादनाचं एक मोठं हब, केंद्र बनत आहे. आत्मनिर्भर भारताचा पाया घडवला जातोय. आज इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन असो, मोबाईल फोनचं उत्पादन असो, आज देश खूप वेगाने प्रगती करत आहे. माझ्या प्रिय देश वासियांनो, आपल्याला आत्मनिर्भर बनायचं आहे आपल्या ऊर्जा क्षेत्रात. आपण कुठवर ऊर्जा क्षेत्रात दुसऱ्यांवर अवलंबून रहायचं. आणि आपल्याला,  उर्जा क्षेत्र असो पवन ऊर्जेचे क्षेत्र असो, नवीकरणीय ऊर्जेचे जे काही अन्य पर्याय असतील,  मिशन हायड्रोजन असो, जैव इंधनाचा प्रयत्न असो,  इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराची गोष्ट असो आपल्याला आत्मनिर्भर होऊन या  सगळ्या व्यवस्थांना चालना द्यावी लागेल. 

माझ्या प्रिय देशवासियानो , 

आज नैसर्गिक शेती सुद्धा आत्मनिर्भरतेचा एक मार्ग आहे. खतांना जेवढं शक्य असेल तेव्हढे  दूर ठेवू, आज देशात नॅनो फर्टीलायझरचे कारखाने एक नवीन आशा घेऊन आले आहेत. मात्र नैसर्गिक शेती रसायन विरहित शेती ही आत्मनिर्भरतेला बळ पुरवू शकते. आज देशात रोजगाराच्या क्षेत्रात हरित रोजगाराच्या संधी खूप वेगाने उपलब्ध होत आहेत. भारताने काही धोरणं राबवून अंतराळ क्षेत्र खुलं केलं आहे. ड्रोनच्या बाबतीत जगातलं सगळ्यात प्रगतिशील धोरण घेऊन आपण आलो आहोत. आपण देशातल्या युवा वर्गासाठी नवे दरवाजे उघडले आहेत. 

माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो,

मी खाजगी क्षेत्राला सुद्धा आवाहन करतो, की,  या, आपल्याला जगावर आपला ठसा उमटवायचा आहे. भारताचं हे सुद्धा स्वप्न आहे की जगाला असलेल्या गरजा सुद्धा पूर्ण करण्यात भारत मागे राहणार नाही. आपले लघुउद्योग, असो सूक्ष्म उद्योग असो, कुटीर उद्योग असो, झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट करून आपल्याला जगात जावं लागेल. आपल्याला स्वदेशीचा अभिमान बाळगावा लागेल.

माझ्या प्रिय देशावासीयांनो, 

आपण वेळोवेळी लालबहादूर शास्त्रीजींचं स्मरण करतो. जय जवान जय किसान चा त्यांचा मंत्र आजही देशाला प्रेरणादायी आहे. नंतर अटल बिहारी वाजपेयीजींनी जय विज्ञान असं म्हणून आणखी एक घोषवाक्य त्यात समाविष्ट केलं. आणि देशाने त्याला प्राधान्य दिलं होतं. मात्र आता अमृत काळासाठी आणखी एक अनिवार्यता आहे. आणि ती आहे जय अनुसंधान  जय जवान जय किसान जय विज्ञान जय अनुसंधान-इनोव्हेशन (नवोन्मेष). आणि मला आपल्या देशाच्या युवा वर्गावर विश्वास आहे. नवोन्मेषाची ताकद पहा, आज आपलं यूपीआय भीम, आपलं डिजिटल पेमेंट, फिनटेकच्या विश्वातलं आपलं स्थान, आज जगभरात रिअल टाईम चाळीस टक्के जर डिजिटल अर्थव्यवहार  होत असेल, तर ते माझ्या देशात होत आहे. भारताने हे करून दाखवलं आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, 

आता आपण 5 जी च्या विश्वात पाऊल ठेवत आहोत. आपल्याला फार वाट बघावी लागणार नाही. नव्या बदलांशी आपण लवकरच जुळवून घेणार आहोत. प्रत्येक गावापर्यंत आपण ऑप्टीकल फायबर पोहोचवत आहोत. डिजीटल भारताचे स्वप्न गावांमधून प्रवास करणार आहे, याची मला कल्पना आहे. आज भारतातील गावांमध्ये चार लाख कॉमन सर्व्हीस सेंटर विकसित होत आहेत, याचा मला मनापासून आनंद होतो आहे. गावातील युवा वर्ग, मुले – मुली ही कॉमन सर्व्हीस सेंटर चालवत आहेत. देशाच्या ग्रामीण भागामध्ये चार लाख डिजीटल उद्योजक तयार होणे, ही देशासाठी खचितच अभिमानाची बाब आहे. सर्व सेवांचा लाभ घेण्यासाठी ग्रामस्थ या केंद्रामध्ये जाऊ लागले आहेत. यावरून तंत्रज्ञानाचे मुख्य केंद्र होण्याची भारताची क्षमता अगदी सहज अधोरिखित होते. 

माझ्या प्रिय देशवासियांनो, 

डिजीटल भारताची ही चळवळ आता व्यापक होते आहे आणि आपण 5 जी च्या युगात प्रवेश करत आहोत, ऑप्टीकल फायबरच्या जाळ्याचा विस्तार करत आहोत, हे फक्त आधुनिकतेचे प्रतिक नाही. यामुळे तीन मोठी उद्दिष्ट्ये साध्य होणार आहेत. डिजीटल माध्यमातूनच शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र क्रांती घडून येणार आहे, डिजीटल माध्यमातूनच आरोग्य क्षेत्रातही आमूलाग्र क्रांती घडून येणार आहे, डिजीटल माध्यमातूनच आपल्या अवघ्या जीवनात आमूलाग्र क्रांती घडून येणार आहे. एक नवे विश्व साकारते आहे. भारत त्या नव्या विश्वासाठी मार्गदर्शक ठरतो आहे. हे दशक अवघ्या मानवतेसाठी तंत्रज्ञानाचे दशक आहे, हे मला दिसते आहे. हे तंत्रज्ञानाचे दशक आहे. भारताच्या दृष्टीकोनातून बोलायचे झाले तर या दशकाची नाळ तंत्रज्ञानाशी जुळलेली आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने आपला दबदबा तयार केला आहे. म्हणजेच या दशकाच्या सामर्थ्याची गुरूकिल्ली भारतापाशी आहे. आपले अटल इनोव्हेशन मिशन, आपली इनक्युबेशन केंद्रे, आपले स्टार्ट अप्स एक नवे क्षेत्र विकसित करत आहेत, युवा पिढीसाठी एक नवी संधी घेऊन येत आहेत. आपली अवकाश मोहिम असो किंवा सागरी मोहिम असो, समुद्राच्या तळाशी जायचे असो किंवा आकाशाला गवसणी घालायची असो, अशी अनेक नवीन क्षेत्रे आहेत आणि सर्वच क्षेत्रांत आपण जोमाने आगेकूच करत आहोत. 

माझ्या प्रिय देशवासियांनो, 

देशात काही आदर्शवत कामांची आवश्यकता असते, उत्तुंग शिखरांची आवश्यकता असते, मात्र त्याच वेळी माणसाचे पाय जमिनीशी घट्ट रोवलेले असले पाहिजेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. भारताने गेल्या कित्येक शतकांपासून हे अनुभवले आहे. आपले पाय जमिनीशी घट्ट रोवलेले असणे, हे भारताच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने गरजेचे आहे. आणि म्हणूनच, आपल्या लहान शेतकऱ्यांचे सामर्थ्य, आपल्या लघु उद्योजकांचे सामर्थ्य, आपले लघु उद्योग, कुटीर उद्योग, सुक्ष्म उद्योग, फिरते विक्रेते, घरकाम करणारे मनुष्यबळ, ऑटो रिक्षा चालक, बस सेवा पुरवठादार, आपल्या समाजाचा फार मोठा भाग असणारा हा वर्ग सक्षम असणे हीच भारताच्या सामर्थ्याची हमी आहे. आणि म्हणूनच आपल्या आर्थिक विकासासाठी आवश्यक असणारे हे जे मूलभूत घटक आहेत, त्यांना अधिक सक्षम करण्याच्या दिशेने आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. 

माझ्या प्रिय देशवासियांनो, 

75 वर्षांचा समृद्ध अनुभव आपल्या गाठीशी आहे. या 75 वर्षांमध्ये आपण विविध क्षेत्रात मोठे यश प्राप्त केले आहे. या 75 वर्षांत आपण नवी स्वप्नेही पाहिली आहेत, नवे संकल्प केले आहेत. मात्र या अमृत काळात आपल्या मनुष्यबळाचा जास्तीत जास्त वापर कशा प्रकारे करून घेता येईल, आपल्याकडे उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीचा सर्वोत्तम वापर कशा प्रकारे करून घेता येईल, हे विचारात घेऊन आपण पुढची वाटचाल केली पाहिजे. माझ्या अनुभवावरून मी सांगू शकतो. आपली न्यायालये बघा, वकिली क्षेत्रात कार्यरत असणारी आपली नारीशक्ती किती सक्षम दिसते आहे. ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी बघा, आपली नारीशक्ती किती आत्मविश्वासाने आणि समर्पित वृत्तीने आपल्या गावातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 

आज ज्ञानाचे क्षेत्र बघा, विज्ञानाचे क्षेत्र बघा, आपल्या देशातील नारीशक्ती आघाडीवर दिसून येते आहे. पोलीसांचे क्षेत्र बघा, आपली नारीशक्ती लोकांच्या संरक्षणाची जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहे. आपल्या जगण्याशी संबंधित कोणतेही क्षेत्र घ्या, क्रीडा क्षेत्र असो वा रणभूमी, भारताची नारीशक्ती एका नव्या सामर्थ्यासह, एका नव्या विश्वासासह आगेकूच करते आहे. भारताच्या 75 वर्षांच्या प्रवासात या नारीशक्तीने जे योगदान दिले आहे, त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त योगदान, त्या पुढच्या 25 वर्षांत देतील, असा विश्वास मला वाटतो. माझ्या माता, भगिनी आणि मुली भारताच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देतील, असा विश्वास मला वाटतो. आणि म्हणूनच त्यांच्या योगदानाचा हिशोब करता येणार नाही, त्यांना कोणतेही निकष लावता येणार नाहीत. आपण नारीशक्तीच्या सक्षमीकरणाकडे जितके जास्त लक्ष देऊ, जितक्या जास्त संधी त्यांच्यासाठी उपलब्ध करून देऊ, जितक्या सुविधा आपल्या मुलींसाठी उपलब्ध करून देऊ, त्याच्या कित्येक पट मोबदला त्या देतील, असा विश्वास मला वाटतो. त्या आपल्या देशाला यशाची नवी शिखरे गाठून देतील. या अमृत काळात आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ज्या मेहनतीची आवश्यकता भासणार आहे, त्याला आपल्या नारीशक्तीची जोड मिळाली तर अपेक्षापेक्षा कमी काळात आपल्याला आपली स्वप्ने साकार करणे शक्य होईल. आपली स्वप्ने जास्त तेजस्वी होतील, आणखी ओजस्वी होतील, आणखी दैदिप्यमान होतील. 

आणि म्हणून माझ्या सहकाऱ्यानो  

म्हणून आपण आपल्या जबाबदाऱ्या ओळखून पुढची वाटचाल करू या. मी आज भारताच्या संविधानाची निर्मिती करणाऱ्यांचेही आभार मानू इच्छितो. त्यांनी आमच्यासाठी जो आराखडा तयार करून दिला, त्याच्या तत्वांशी प्रामाणिक राहत, त्याच्या भावना जपत आम्ही परस्परांच्या खांद्याला खांदा भिडवून या अमृत काळात आगेकूच करत राहिलो तर आपली स्वप्ने निश्चितच साकार होतील. कार्यक्रम वेगळे असू शकतात, कार्यशैली वेगळी असू शकते, पण संकल्प वेगळे असू शकत नाहीत. राष्ट्रासाठीची स्वप्ने वेगवेगळी असू शकत नाहीत. 

या, आपण एका नव्या युगात पुढे जाऊ. मला आठवते आहे. जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा केंद्रात आमच्या विचारधारेचे सरकार नव्हते. मात्र तेव्हाही माझ्या गुजरातमध्ये मी एकाच मंत्रासह कारभार करत होतो, तो म्हणजे भारताच्या विकासासाठी गुजरातचा विकास. भारताचा विकास. आपण कुठेही असलो तरी आपल्या सर्वांच्या मनात, विचारात, ही भावना कायम असली पाहिजे. आपल्या देशात अनेक राज्ये आहेत, ज्यांनी देशाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे, नेतृत्व केले आहे. अनेक क्षेत्रांमध्ये आदर्शवत काम केले आहे. हीच आपल्या लोकशाहीची ताकत आहे. मात्र आज आपल्याला सहकारी संघराज्यवादाच्या बरोबरीने सहकारी आणि स्पर्धात्मक संघराज्यवादाची आवश्यकता आहे, ही काळाची गरज आहे. विकासाच्या बाबतीत आपल्याला स्पर्धात्मकतेची आवश्यकता आहे. 

विकासाच्या बाबतीत ते राज्य आपल्या पुढे जाते आहे, आता मी जास्त मेहनत करून त्यांच्या पुढे जाईन, ही स्पर्धात्मकतेची भावना राज्यांमध्ये असली पाहिजे. त्या राज्याने दहा चांगली कामे केली तर मी पंधरा चांगली कामे करून दाखवेन. त्याने तीन वर्षांत साध्य केले आहे, मी दोन वर्षांत करून दाखवेन. आमच्या राज्यांमध्ये परस्परांमध्ये, आमच्या सरकारच्या सर्व विभागांमध्ये स्पर्धात्मकतेचे वातावरण असले पाहिजे, जे आम्हाला विकासाची नवी शिखरे गाठण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल.

माझ्या प्रिय देशवासियांनो, 

25 वर्षांच्या आगामी अमृतकाळाबद्दल जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा आपल्यासमोर अनेक आव्हाने आहेत, याची मला कल्पना आहे. अनेक मर्यादांमध्ये राहून आपल्याला काम करायचे आहे. अडचणी सुद्धा आहेतच, असे बरेच काही आहे. आम्ही त्याकडे दुर्लक्ष करत नाही. आम्ही मार्ग काढतो. सातत्याने प्रयत्न करत आहोत. मात्र, दोन विषयांबद्दल मला आज येथे चर्चा करायची आहे. खरे तर अनेक विषयांवर चर्चा करता येईल, पण वेळेची मर्यादा लक्षात घेत मी येथे दोन विषयांवर चर्चा करतो. 25 वर्षांच्या या अमृत काळात जर आपण आपल्यासमोर असणाऱ्या या सर्व आव्हानांवर, विकृतींवर, आजारांवर वेळीच उपाय योजले नाहीत तर त्याचे स्वरूप हळूहळू गंभीर होत जाईल, असे मला वाटते. आणि म्हणून सर्वच मुद्द्यांवर न बोलता मी केवळ दोनच बाबींवर चर्चा करणार आहे. पहिले म्हणजे भ्रष्टाचार. दुसरे म्हणजे घराणेशाही. भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात, एकीकडे लोक दारिद्र्यात खितपत पडले आहेत, त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. एकीकडे असे लोक आहेत, ज्यांच्याकडे राहायला घर नाही तर दुसरीकडे असेही लोक आहेत, ज्यांच्याकडे चोरीचे सामान ठेवण्यासाठी जागा नाही. हे योग्य नाही. आणि म्हणूनच आपल्याला भ्रष्टाचारा विरोधात संपूर्ण ताकतीनिशी लढा दिला पाहिजे. मागच्या आठ वर्षांमध्ये थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून आधार आणि मोबाईलसारख्या आधुनिक यंत्रणाचा वापर करून दोन लाख कोटी रूपये, जे आजवर अपात्र लोकांच्या हाती जात होते, ती रक्कम वाचवून देशाच्या कल्याणासाठी तीचा वापर करण्यात आम्ही यशस्वी ठरलो. यापूर्वीच्या सरकारांच्या काळात जे लोक देशाला लुटून पळून गेले, त्यांची संपत्ती जप्त करून त्यांना परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यापैकी अनेकजण तुरूंगात आहेत. ज्यांनी या देशाला लुटले आहे, त्यांनी केलेली लूट परत करावी लागेल, अशी परिस्थिती आम्ही निर्माण करत आहोत.

बंधु आणि भगिनींनो, 

आता भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या या लढ्यात आपण एका निर्णायक वळणावर आलो आहोत, असे मला वाटते. कितीही अट्टल बदमाश असले तरी ते आता वाचू शकणार नाहीत. आज या ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून आज मी जबाबदारीच्या भावनेतून हे विधान करतो आहे.

आणि म्हणूनच, बंधु आणि भगिनींनो, भ्रष्टाचार वाळवीप्रमाणे आपल्या देशाला पोखरतो आहे. मला त्याविरोधात लढा द्यायचा आहे. हा लढा गतिमान करायचा आहे. निर्णायक वळणावर हा लढा न्यायचा आहे. आता माझ्या 130 कोटी देशवासियांनो, तुम्ही मला आशिर्वाद द्या, तुम्ही मला साथ द्या. मी आज तुमची साथ मागायला आलो आहे, तुमचे सहकार्य मागायला आलो आहे, जेणेकरून या समस्येशी मला दोन हात करता यावेत, देशाला ही लढाई जिंकता यावी. सर्वसामान्य माणसाचे आयुष्य या भ्रष्टाचाराने पोखरून टाकले आहे. मला माझ्या नागरिकांचे आयुष्य पुन्हा एकदा मार्गी लावायचे आहे. आणि म्हणूनच, माझ्या प्रिय देशवासियांनो, आज देशात भ्रष्टाचाराप्रती तिरस्काराची भावना दिसते, व्यक्त सुद्धा केली जाते, मात्र भ्रष्टाचारी लोकांबद्दल उदार दृष्टीकोन दिसून येतो, हे काळजी करण्यासारखे आहे.हा चिंतेचा विषय आहे की आज देशात भ्रष्टाचाराबद्दल तिरस्कार दिसून येतो, व्यक्तदेखील होतो. पण कधीकधी भ्रष्टाचाऱ्यांना औदार्याने वागविले जाते. कोणत्याही देशात हे शोभून दिसत नाही.

न्यायालयाने शिक्षा ठोठावली,  भ्रष्टाचारी म्हणून सिद्ध झाला, तुरुंगात जाणे नक्की झाले, तुरुंगातही असला तरीसुद्धा काही काही माणसे अशा व्यक्तीचा गौरव करीत राहतात, गुणगान करीत राहतात, प्रतिष्ठा जपत राहतात. जोपर्यंत समाजात घाणीबद्दल तिरस्कार निर्माण होत नाही तोपर्यंत स्वच्छता करण्याची प्रेरणा उत्पन्न होत नाही. तसेच जोपर्यंत भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाऱ्यांबद्दल तिरस्काराची भावना निर्माण होत नाही, त्यांना सामाजिक रूपात खाली दाखविण्यासाठी भाग पाडत नाही तोपर्यंत ही मानसिकता संपणार नाही.  म्हणूनच भ्रष्टाचाराविरोधात आणि भ्रष्टाचाऱ्यांविरोधात आपल्याला अतिशय जागरूक व्हायला हवे. 

दुसरी एक चर्चा मी करू इच्छितो – भाईभतीजावाद, घराणेशाही, असे मी जेव्हा बोलतो तेव्हा सगळ्यांना वाटते की मी राजकारणाबद्दल बोलत आहे.  नाही, नाही.  दुर्दैवाने, राजकारणातील या वाईट प्रकाराने देशातील प्रत्येक संस्थेत घराणेशाही जोपासली आहे. घराणेशाहीने आपल्या अनेक संस्थांना वेढून टाकले आहे आणि याच कारणामुळे माझ्या देशातील बुद्धिमत्तेचे नुकसान होत आहे, माझ्या देशाच्या सामर्थ्याचे नुकसान होत आहे. ज्याच्याजवळ संधीची शक्यता आहेत, तो घराणेशाही, भाईभतिजामुळे बाहेर राहतो. भ्रष्टाचाराचे हेही एक कारण असते. भाईभतिजाशाहीचा आश्रय नसेल तर त्याला वाटते की चला, काहीतरी खरेदी करून आपले स्थान बनवू.घराणेशाहीबद्दल, भाईभतिजाशाहीबद्दल प्रत्येक संस्थेत आपल्याला तिरस्कार निर्माण केला पाहिजे. तेव्हाच आपण आपल्या सर्व संस्था वाचवू शकू‌. हे संस्थांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक आहे. 

त्याचप्रमाणे राजकारणातही घराणेशाहीने देशाच्या सामर्थ्याला खीळ घातली आहे. घराणेशाही ही कुटुंबाच्या भल्यासाठी असते, देशासाठी तिचे काही देणेघेणे नसते. आणि याचसाठी, लाल किल्ल्याच्या प्राचीरवरुन तिरंगी झेंड्याची मानमर्यादा अन् प्रतिष्ठा राखून भारताच्या संविधानाचे स्मरण करत  मी देशवासियांना खुल्या मनाने सांगू इच्छितो की या,  हिंदुस्तानातील राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी, हिंदुस्तानातील सर्व संस्थांच्या शुद्धीकरणासाठी देखील आपल्या देशाला या घराणेशाहीच्या मानसिकतेतून मुक्ती मिळवून योग्यतेच्या आधारावर देशाची प्रगती करण्यासाठी पुढे जायला हवे.  हे आवश्यक आहे.  नाहीतर प्रत्येक वेळी मनात राहते की मी यासाठी योग्य होतो पण मला हे मिळाले नाही. माझा कोणी काका, मामा, पिता, आजोबा, वगैरे तिथे नव्हता. ही मनस्थिती कोणत्याही देशासाठी चांगली नाही.

देशातील नवयुवकांनो,  तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी, तुमच्या स्वप्नांसाठी भाऊपुतण्याशाहीविरोधातील लढाईमध्ये मला तुमचे सहकार्य हवे आहे, घराणेशाही विरोधातील लढाईमध्ये मला तुमचे सहकार्य हवे आहे. ही घटनात्मक जबाबदारी मानतो, ही लोकशाहीची जबाबदारी मानतो , ही लाल किल्ल्यावरुन सांगितलेली ताकद मानतो, यासाठी आज मीही संधी मानतो. 

आपण मागील दिवसांमध्ये पाहिलं, असे तर नव्हते की देशात आधी काही प्रतिभा नव्हती, असे तर नव्हते की खेळप्रकारांमध्ये देशाची मुलेमुली काही करू शकत नव्हती. पण खेळाडूंची निवड भाईभतिजा वादाचच्या वाहिनीतून होत असे. खेळाच्या मैदानापर्यंत तर ते पोहोचत असत. पण जय-पराजयाशी त्यांचे काही देणेघेणे नव्हते. परंतु जेव्हा पारदर्शकता आली, योग्यतेचा आधारावर खेळाडूंची निवड होऊ लागली, तेव्हा खेळाच्या मैदानात सामर्थ्याचा सन्मान होऊ लागला. आज पाहा, खेळाच्या मैदानात भारताचा तिरंगा फडकतो, भारताचे राष्ट्रगीत गायले जाते.

तेव्हा अभिमान वाटतो. घराणेशाही, भाऊ पुतण्याशाहीपासून मुक्ती मिळते तेव्हाच हे परिणाम मिळतात. माझ्या प्रिय देशवासियांनो, हे ठीक आहे की आव्हाने अनेक आहेत. जर देशासमोर कोट्यवधी संकटे आहेत तर कोट्यवधी उपायही आहेत आणि माझा 130 कोटी देशवासियांवर विश्वास आहे. 130 कोटी देशवासी निर्धारित लक्ष्यासह संकल्पाच्या दिशेने समर्पणासह  जेव्हा एक पाऊल पुढे टाकतात तेव्हा हिंदुस्तान 130 पावले पुढे जातो. या सामर्थ्यासह आपल्याला पुढे जायचे आहे. या अमृतकाळात, जेव्हा ही अमृतकाळाची पहिली पहाट आहे, पहिली प्रभात आहे. आम्हाला आगामी 25 वर्षात एक क्षणही हे विसरायचे नाही की एकेक दिवस , वेळेचा प्रत्येक क्षण, जीवनाचा प्रत्येक कण मातृभूमीसाठी जगायचा आहे. तीच स्वातंत्र्यासाठी वेडे झालेल्यांना खरीखुरी श्रद्धांजली ठरेल. 75 वर्षांमध्ये देशाला इथवर पोहोचवण्यात ज्यांचे योगदान होते, त्यांचे पुण्यस्मरण आपल्याला उपयोगी पडेल. 

मी देशवासियांना विनंती करतो की सर्व शक्यता आजमावून पाहत, संकल्पांना पार करत पुढे जाण्याचा विश्वास घेऊन अमृतकाळाचा आरंभ करण्याचा. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे आज अमृत काळात रूपांतर झाले आहे, तेव्हा या अमृतकाळात सर्वांचे प्रयत्न अनिवार्य आहेत. सर्वांचे प्रयत्नच परिणामकारक ठरणार आहेत. एका कुटुंबाची, टीम इंडियाची भावनाच देशाला पुढे घेऊन जाईल. 130 कोटी देशवासियांची एक टीम इंडिया एका संघाच्या स्वरूपात सर्व स्वप्ने साकार करेल. हा पूर्ण विश्वासासह 

माझ्यासोबत म्हणा , 

जय हिन्‍द।

जय हिन्‍द।

जय हिन्‍द।

भारत माता की जय,

भारत माता की जय,

भारत माता की जय

वंदे मातरम,

वंदे मातरम,

वंदे मातरम,

खूप खूप धन्यवाद. 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India's export performance in several key product categories showing notable success

Media Coverage

India's export performance in several key product categories showing notable success
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister greets valiant personnel of the Indian Navy on the Navy Day
December 04, 2024

Greeting the valiant personnel of the Indian Navy on the Navy Day, the Prime Minister, Shri Narendra Modi hailed them for their commitment which ensures the safety, security and prosperity of our nation.

Shri Modi in a post on X wrote:

“On Navy Day, we salute the valiant personnel of the Indian Navy who protect our seas with unmatched courage and dedication. Their commitment ensures the safety, security and prosperity of our nation. We also take great pride in India’s rich maritime history.”