भारत माता की जय!

भारत माता की जय!

भारत माता की जय!

नमस्कार अमेरिका, आता आपले नमस्ते देखील बहुराष्ट्रीय बनले आहे, स्थानिक ते जागतिक, आणि हे सर्व तुम्ही केले आहे. भारताला हृदयात ठेवणाऱ्या प्रत्येक भारतीयाने ते केले आहे.

मित्रांनो,

तुम्ही इथपर्यंत खूप लांबून आला आहात, काही जुने चेहरे आहेत, काही नवीन चेहरे आहेत. तुमचे हे प्रेम माझे मोठे भाग्य आहे. मला ते दिवस आठवतात. जेव्हा मी पंतप्रधानही नव्हतो, मुख्यमंत्रीही नव्हतो, नेताही नव्हतो. त्यावेळी मी तुम्हा सर्वांमध्ये एक जिज्ञासू म्हणून यायचो. ही धरती पाहिली, समजून घेतली, अनेक प्रश्न मनात घेऊन येत होतो. जेव्हा मी कोणत्याही पदावर नव्हतो. त्याआधीही मी अमेरिकेतील जवळपास 29 राज्यांना भेटी दिल्या होत्या. त्यानंतर मी मुख्यमंत्री झालो, तेव्हाही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुमच्याशी जुळण्याची प्रक्रिया सुरूच होती. पंतप्रधान झाल्यानंतरही मला तुमच्याकडून अपार प्रेम आणि आपुलकी मिळाली आहे. 2014 मध्ये मॅडिसन स्क्वेअर, 2015 मध्ये सॅन जोस, 2019 मध्ये ह्यूस्टन, 2023 मध्ये वॉशिंग्टन आणि आता 2024 मध्ये न्यूयॉर्क..... आणि तुम्ही प्रत्येक वेळी गर्दीचे मागील विक्रम मोडता.

 

मित्रांनो,

मला तुमची क्षमता, अनिवासी भारतीयांची क्षमता नेहमीच समजली आहे. मी कोणतेही सरकारी पद भूषवले नसतानाही मला ते समजले आणि आजही समजते. तुम्ही सर्व नेहमीच माझ्यासाठी भारताचे सर्वात मजबूत प्रतिमादूत आहात. आणि म्हणूनच मी तुम्हा सर्वांना राष्ट्राचे राजदूत म्हणतो. तुम्ही अमेरिकेला भारताशी आणि भारताला अमेरिकेशी जोडले आहे. तुमची कौशल्य, तुमची प्रतिभा, तुमची बांधिलकी, याला काही तोड नाही. तुम्ही सातासमुद्रापार गेला असाल. पण इतका खोल महासागर नाही की तो तुमच्या हृदयात खोलवर वसलेल्या भारताला तुमच्यापासून हिरावून घेईल. भारत मातेने आपल्याला जे शिकवले ते आपण कधीही विसरू शकत नाही. आपण कुठेही गेलो तरी प्रत्येकाला कुटुंबाप्रमाणे वागवतो आणि त्यांच्यात मिसळतो. विविधता समजून घेणे, विविधता जगणे, ती आपल्या जीवनात अंमलात आणणे, हे आपल्या मूल्यांमध्ये आहे, आपल्या नसानसांमध्ये आहे. आपण ज्या देशाचे रहिवासी आहोत, त्या देशाकडे शेकडो भाषा आहेत, शेकडो बोलीभाषा आहेत. जगात सर्व धर्म आणि पंथ आहेत. तरीही आम्ही एकजुटीने आणि उदात्तपणे पुढे जात आहोत. इथे या आवारामध्येच बघा, कुणी तामिळ बोलतो, कुणी तेलगू, कुणी मल्याळम, कुणी कन्नड, कुणी पंजाबी, कुणी मराठी, कुणी गुजराती.... भाषा अनेक आहेत, पण भावना एकच आहे. आणि ती भावना आहे – भारत माता की जय. ती भावना आहे - भारतीयत्व. जगाशी जोडले जाण्याची ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. ही मूल्ये साहजिकच आपल्याला विश्वबंधू बनवतात. आपल्या ठिकाणी म्हटले आहे - तेन त्यक्तें भुंजिथा. म्हणजे त्याग करणाऱ्यांनाच भोग मिळतात. इतरांचे भले करून आणि त्याग करून आपल्याला आनंद मिळतो. आणि आपण कोणत्या देशात राहतो हे महत्त्वाचे नाही, ही भावना बदलत नाही. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजासाठी आपण शक्य तितके योगदान देतो. इथे अमेरिकेत तुम्ही डॉक्टर म्हणून, संशोधक म्हणून, तंत्रज्ञान व्यावसायिक म्हणून, वैज्ञानिक म्हणून किंवा इतर व्यवसायात जो ध्वज फडकवला आहे, ते त्याचेच प्रतीक आहे. काही काळापूर्वी, टी-20 क्रिकेट विश्वचषक येथे आयोजित करण्यात आला होता आणि अमेरिकन संघ किती आश्चर्यकारक खेळला आणि त्या संघात येथे राहणाऱ्या भारतीयांचे योगदान जगाने पाहिले.

मित्रांनो,

जगासाठी एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. पण माझा असा विश्वास आहे की एआय म्हणजे अमेरिका-इंडिया. अमेरिका-भारत ही एकसंघ अशी भावना आहे आणि ही नव्या जगाची एआय शक्ती आहे. ही एआय भावना भारत-अमेरिका संबंधांना नवीन उंची देत आहे. अनिवासी भारतीयांनो, मी तुम्हा सर्वांना सलाम करतो. मी तुम्हा सर्वांना नमस्कार करतो.

मित्रांनो,

मी जगात कुठेही गेलो तरी प्रत्येक नेत्याकडून मी अनिवासी भारतीयांबद्दल प्रशंसा ऐकतो. कालच राष्ट्राध्यक्ष बायडेन मला त्यांच्या डेलावेर येथील घरी घेऊन गेले. त्यांची आत्मीयता, त्यांचा जिव्हाळा हा माझ्यासाठी हृदयस्पर्शी क्षण होता. हा सन्मान 140 कोटी भारतीयांचा आहे, हा सन्मान तुमचा आहे, तुमच्या प्रयत्नांचा आहे, हा सन्मान इथे राहणाऱ्या करोडो भारतीयांचा आहे. मी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे आभार मानेन आणि तुमचे आभारही मानेन.

 

मित्रांनो,

2024 हे वर्ष संपूर्ण जगासाठी खूप महत्त्वाचे आहे. एकीकडे जगातील अनेक देशांमध्ये संघर्ष आणि तणावाचे वातावरण आहे, तर दुसरीकडे अनेक देशांमध्ये लोकशाही दिन साजरा केला जात आहे. लोकशाहीच्या या उत्सवात भारत आणि अमेरिकाही एकत्र आहेत. इथे अमेरिकेत निवडणुका होणार आहेत आणि भारतात आधीच निवडणुका झाल्या आहेत. भारतात झालेल्या या निवडणुका मानवी इतिहासातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या निवडणुका होत्या, तुम्ही कल्पना करू शकता, अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जवळपास दुप्पट मतदार होते, इतकेच नव्हे तर संपूर्ण युरोपच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार होते, इतक्या लोकांनी मतदान केले. संपूर्ण भारताने आपले मत दिले. भारताच्या लोकशाहीचे प्रमाण पाहिल्यावर आणखीनच अभिमान वाटतो. तीन महिन्यांची मतदान प्रक्रिया, 15 दशलक्ष म्हणजे 1.5 कोटी लोकसंख्येइतके मतदान कर्मचारी, एक मिलियन म्हणजेच 10 लाखांहून अधिक मतदान केंद्रे, अडीच हजारांहून अधिक राजकीय पक्ष, 8 हजारांहून अधिक उमेदवार, विविध भाषांमधील हजारो वर्तमानपत्रे, शेकडो नभोवाणी केंद्रे, शेकडो टीव्ही वृत्तवाहिन्या, करोडो सोशल मीडिया खाती, लाखो सोशल मीडिया चॅनेल्स, या सर्वांमुळे भारताची लोकशाही चैतन्यशील आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विस्ताराचा हा काळ आहे. आपल्या देशाची निवडणूक प्रक्रिया या छाननीच्या पातळीवरून जाते.

आणि मित्रांनो,

या प्रदीर्घ निवडणूक प्रक्रियेतून गेल्यावर भारतात अभूतपूर्व असे काहीतरी घडले आहे. काय झालंय? काय झालंय? काय झालंय? काय झालंय? अबकी बार -  अबकी बार -  अबकी बार ।

मित्रांनो,

तिसऱ्यांदा आमचे सरकार परतले आहे. आणि गेल्या 60 वर्षांत भारतात असे घडले नव्हते. भारतातील जनतेने दिलेल्या या नव्या जनादेशाचे अनेक अर्थ आहेत आणि ते खूप मोठेही आहेत. तिसऱ्या टर्ममध्ये आपल्याला खूप मोठी उद्दिष्टे साध्य करायची आहेत. तिप्पट ताकद आणि तिप्पट वेगाने पुढे जायचे आहे, तुम्हाला पुष्प (PUSHP) हा शब्द आठवेल. कमळ आठवलं तरी मला आक्षेप नाही. 'पुष्प' आणि मी या पुष्पाची व्याख्या करतो. पी फॉर प्रोग्रेसिव्ह भारत, यू फॉर अनस्टॉपेबल भारत! एस फॉर स्पिरीचुअल (Spiritual) भारत!  एच फॉर ह्युमिनिटी म्हणजेच प्रथम मानवतेला समर्पित भारत!   पी फॉर प्रोस्परस (समृद्ध) भारत. म्हणजेच पुष्प- फुलाच्या फक्त पाच पाकळ्या एकत्र येऊन विकसित भारत घडवतील.  

मित्रांनो,

मी भारताचा पहिला पंतप्रधान आहे, ज्यांचा जन्म स्वातंत्र्यानंतर झाला. स्वातंत्र्य चळवळीत कोट्यवधी भारतीयांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले होते, त्यांनी स्वतःचे हित पाहिले नाही, आपल्या 'कम्फर्ट झोन'ची चिंता केली नाही, ते सर्व काही विसरून देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी लढायला गेले. त्या प्रवासात कुणाला फाशी देण्यात आली, कुणाच्या अंगावर गोळ्या झाडल्या गेल्या, कुणाचा तुरुंगात छळ सहन करून मृत्यू झाला, अनेकांनी तर आपले अवघे तारुण्य तुरुंगात घालवले.

 

मित्रांनो,

आपण देशासाठी प्राणांचे बलिदान देऊ  शकलो नाही, मात्र आपण देशासाठी नक्कीच जगू शकतो. मरणे हे आपल्या नशिबी नव्हते, जगणे आपल्या नशिबी आहे. पहिल्या दिवसापासून माझे मन आणि माझे ध्येय अगदी स्पष्ट आहे. स्वराज्यासाठी मी माझे जीवन देऊ शकलो नाही, मात्र सुराज्य आणि समृद्ध भारतासाठी मी माझे जीवन समर्पित करण्याचे ठरवले आहे. माझ्या आयुष्याचा खूप मोठा काळ असा होता की ज्यात मी वर्षानुवर्षे देशभर फिरत राहिलो, भटकत राहिलो, जिथे जेवायला  मिळाले तिथे जेवलो, जिथे झोपायला मिळाले तिथे झोपलो , समुद्रकिनाऱ्यापासून ते पर्वतापर्यंत, वाळवंटापासून बर्फाच्छादित शिखरांपर्यंत, मी प्रत्येक भागातील लोकांना भेटलो आणि त्यांना समजून घेतले. मी आपल्या देशातील जीवन, आपल्या  देशाची संस्कृती, आपल्या देशाची आव्हाने यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.  तोही एक काळ होता जेव्हा मी माझी दिशा काही वेगळी ठरवली होती, परंतु नियतीने मला राजकारणात आणले.

कधीच विचार केला नव्हता की एक दिवस मी मुख्यमंत्री बनेन आणि जेव्हा बनलो तेव्हा मी गुजरातचा सर्वाधिक काळ मुख्यमंत्री बनलो. मी 13 वर्षे गुजरातचा मुख्यमंत्री होतो, त्यानंतर लोकांनी मला बढती देऊन पंतप्रधान बनवले . परंतु अनेक दशके देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन मी जे शिकलो, त्याने मग ते राज्य असो किंवा केंद्र, माझे सेवेचे मॉडेल आणि माझे गव्हर्नन्स मॉडेल इतके यशस्वी बनवले आहे. गेल्या 10 वर्षात या गव्हर्नन्स मॉडेलचे यश तुम्ही पाहिले आहे, संपूर्ण जगाने पाहिले आहे आणि आता देशातील जनतेने माझ्यावर मोठ्या विश्वासाने हा तिसरा कार्यकाळ सोपवला आहे. या तिसऱ्या कार्यकाळात मी तिप्पट जबाबदारी घेऊन पुढे जात आहे.

मित्रांनो,

आज भारत हा जगातील सर्वात तरुण देशांपैकी एक आहे. भारत उर्जेने भरलेला आहे, स्वप्नांनी भरलेला आहे. रोज नवे विक्रम , रोज नवनवीन बातम्या, आज आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे. भारताने  बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये पुरुष आणि महिला,  अशा दोन्ही गटांमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. आणखी एक गोष्ट सांगतो मात्र जास्त टाळ्या वाजवाव्या लागतील.  जवळपास शंभर वर्षांच्या इतिहासात हे प्रथमच घडले आहे. संपूर्ण देशाला, प्रत्येक भारतीयाला आपल्या बुद्धिबळपटूंचा अभिमान आहे. आणखी एक  एआय आहे जो भारताला प्रेरित करत आहे आणि ते कोणते एआय आहे? ते आहे - ए फॉर ऍस्पिरेशनल , आय फॉर इंडिया , ऍस्पिरेशनल इंडिया. ही एक नवी शक्ती आहे , नवी ऊर्जा आहे. आज कोट्यवधी भारतीयांच्या आकांक्षा भारताच्या विकासाला चालना देत आहेत. प्रत्येक आकांक्षा नवीन उपलब्धीना जन्म देते. आणि प्रत्येक उपलब्धी नवीन आकांक्षासाठी पोषक तत्व बनत आहे. एका दशकात भारत 10 व्या स्थानावरून 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला. आता भारताने लवकरात लवकर तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनावे अशी प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. आज देशातील एका खूप मोठ्या वर्गाच्या मूलभूत गरजा पूर्ण होत आहेत. गेल्या 10 वर्षात कोट्यवधी लोकांना स्वच्छ स्वयंपाकाच्या गॅसची सुविधा मिळाली आहे, त्यांच्या घरापर्यंत पाईपद्वारे स्वच्छ पाणी  पोहोचू लागले आहे, त्यांच्या घरात  वीज जोडणी पोहोचली आहे, त्यांच्यासाठी कोट्यवधी शौचालये बांधण्यात आली आहेत. अशा कोट्यवधी लोकांना आता गुणवत्तापूर्ण आयुष्य हवे आहे.

मित्रांनो,

आता भारतातील जनतेला केवळ रस्ते नकोत तर उत्तम द्रुतगती मार्ग  हवे आहेत. आता भारतातील लोकांना केवळ रेल्वे कनेक्टिव्हिटी नको आहे, त्यांना अतिजलद गाड्या  हव्या आहेत.भारतातील प्रत्येक शहराची अपेक्षा आहे तिथे मेट्रो चालावी, भारतातील प्रत्येक शहराला स्वतःचे विमानतळ हवे  आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक गावाला आणि शहराला तिथे जगातील सर्वोत्तम सुविधा मिळाव्यात असे वाटते.आणि त्याचे परिणाम आपण पाहत आहोत. 2014 मध्ये भारतात फक्त 5 शहरांमध्ये मेट्रो होती, आज 23 शहरांमध्ये मेट्रो आहे. आज भारतात जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे मेट्रो जाळे आहे. आणि ते दिवसेंदिवस विस्तारत आहे.

 

मित्रांनो,

2014 मध्ये, भारतातील केवळ 70 शहरांमध्ये विमानतळ होते, आज 140 हून अधिक शहरांमध्ये विमानतळ आहेत. 2014 मध्ये, 100 पेक्षा कमी ग्रामपंचायतींमध्ये ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी होती, 100 पेक्षा कमी, आज 2 लाखांहून अधिक पंचायतींमध्ये ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी आहे. 2014 मध्ये, भारतात 140 दशलक्ष किंवा सुमारे 14 कोटीच्या आसपास एलपीजी ग्राहक होते. आज भारतात 310 दशलक्ष म्हणजेच 31 कोटींहून अधिक एलपीजी ग्राहक आहेत. पूर्वी जे काम व्हायला अनेक वर्षे लागायची ते काम आता काही महिन्यांत पूर्ण होत आहे. आज भारतातील लोकांमध्ये एक आत्मविश्वास आहे, एक संकल्प आहे, ध्येयापर्यंत पोहोचण्याची जिद्द आहे, भारतात विकास ही लोकचळवळ बनत आहे. आणि विकासाच्या या चळवळीत प्रत्येक भारतीय समान भागीदार बनला आहे. भारताच्या यशावर, भारताच्या कामगिरीवर त्यांचा विश्वास आहे.

 मित्रांनो,

भारत आज संधींची भूमी आहे. आता भारत संधीची वाट पाहत नाही, आता भारत संधी निर्माण करतो. गेल्या 10 वर्षांत, भारताने प्रत्येक क्षेत्रात संधींचे एक नवीन लॉन्चिंग पॅड तयार केले आहे. तुम्ही बघा, केवळ एका दशकात आणि याचा तुम्हाला अभिमान वाटेल, केवळ  एका दशकात 25 कोटी लोक, 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. हे कसे घडले?  हे यामुळे घडले कारण आम्ही आमची जुनी विचारसरणी बदलली , दृष्टिकोन बदलला. आम्ही गरीबांना सक्षम बनवण्यावर लक्ष केंद्रित केले.  50 कोटी म्हणजेच  500 दशलक्षहून अधिक  लोकांना बँकिंग प्रणालीशी जोडले,  55 कोटींहून अधिक म्हणजे 550 दशलक्षहून अधिक  लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत वैद्यकीय उपचार दिले , 4 कोटी म्हणजेच 40 दशलक्षांहून अधिक कुटुंबांना पक्की घरे दिली , तारणमुक्त कर्जाची व्यवस्था निर्माण करून  कोट्यवधी लोकांना कर्ज सुलभतेशी  जोडले , अशी अनेक कामे झाली, तेव्हा इतक्या लोकांनी स्वत:च गरिबीवर मात केली. आणि आज गरिबीतून बाहेर पडून हा नव-मध्यमवर्ग भारताच्या विकासाला गती  देत आहे.

मित्रांनो,

आम्ही महिलांच्या कल्याणाबरोबरच महिलांच्या नेतृत्वाखालील विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. सरकारने जी कोटय़वधी घरे बांधली, त्यांची नोंदणी महिलांच्या नावावर झाली आहे. जी कोट्यवधी बँक खाती  उघडली, त्यापैकी निम्म्याहून अधिक खाती महिलांची उघडली आहेत. 10 वर्षात भारतातील 10 कोटी महिला सूक्ष्म उद्योजकता योजनेशी जोडल्या आहेत. मी तुम्हाला आणखी एक उदाहरण देतो. आम्ही भारतात शेतीला तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहोत. भारतात आज शेतीमध्ये ड्रोनचा वापर मुबलक प्रमाणात होताना दिसत आहे.

कदाचित ड्रोन तुमच्यासाठी नवे नाहीत. पण नवी गोष्ट अशी आहे,  याची जबाबदारी कोणाला, समजलेय तुम्हाला ठाऊक आहे? ती ग्रामीण महिलांकडे आहे. आम्ही हजारो महिलांना ड्रोन पायलट म्हणून तयार करत आहोत. शेतीतील तंत्रज्ञानाची ही मोठी क्रांती, गावांमधील महिला घडवत आहेत. 

 

मित्रांनो,

जे परिसर एकेकाळी दुर्लक्षित राहिले होते, तेच आज देशाची प्राथमिकता आहेत. आज भारत जितका जोडला गेला आहे तितका या आधी कधीच नव्हता. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, आज भारताची 5जी बाजारपेठ, सांगू,  वाईट नाही वाटणार ना? आता भारताची 5जी बाजारपेठ अमेरिकेपेक्षाही मोठी झाली आहे. आणि हे फक्त 2 वर्षांच्या कालावधीतच घडले आहे. आता तर भारत 'मेड इन इंडिया' 6जी वर काम करत आहे. हे कसे घडले? हे घडले कारण आम्ही या क्षेत्राला पुढे नेण्यासाठी धोरणे आखली. आम्ही 'मेड इन इंडिया' तंत्रज्ञानावर काम केले. आम्ही स्वस्त डेटावर,  मोबाइल फोन उत्पादनावर लक्ष केंद्रित केले. आज जगातील जवळपास प्रत्येक मोठा मोबाइल ब्रँड 'मेड इन इंडिया' आहे. भारत आता जागातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाइल उत्पादक देश बनला आहे. एक काळ होता, माझ्या येण्याआधी,  जेव्हा आपण मोबाइल आयातदार होतो, पण आता आपण मोबाइल निर्यातदार झालो आहोत.
 
मित्रांनो,

आता भारत मागे नाही राहात, आता भारत नव नवीन व्यवस्था निर्माण करतो, आता भारत नेतृत्व करतो. भारताने डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर (DPI) ही नवी संकल्पना जगाला दिली आहे. डीपीआयने समानतेला प्रोत्साहन दिले आहे, हे भ्रष्टाचार कमी करण्याचेही एक महत्त्वाचे साधन बनले आहे. भारताचे यूपीआय आता संपूर्ण जगाला आकर्षित करते आहे. आपल्या खिशात पाकीट असताना, पण भारतातील लोकांकडे खिशा सोबतच फोनवर देखील एक पाकीट असते - ई-वॉलेट असते. अनेक भारतीय आता आपली कागदपत्रे, फिजिकल फोल्डरमध्ये ठेवत नाहीत, त्यांच्याकडे डिजिटल लॉकर आहेत. ते विमानतळावर जातात तेव्हा, डिजी यात्राच्या माध्यमातून विनाअडथळा प्रवास करतात. या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, नोकऱ्या, नवोन्मेष आणि त्याच्याशी संबंधित प्रत्येक तंत्रज्ञानाचा प्रारंभ करणारे मंच बनले आहेत.

मित्रांनो,

भारत, भारत आता थांबणार नाही, भारत आता थांबणार नाही. भारताची अशी इच्छा आहे की, जगभरात जास्तीत जास्त उपकरणे मेड इन इंडिया चिप्सवर चालावीत. आम्ही सेमीकंडक्टर क्षेत्रालाही भारताच्या वेगवान विकासाचा पाया बनवले आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात भारताने सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी प्रोत्साहनपर उपायोजना जाहीर केल्या होत्या. त्यानंतर काही महिन्यांतच मायक्रॉनच्या पहिल्या सेमीकंडक्टर युनिटचा भूमिपूजन सोहळाही पार पडला. आतापर्यंत भारतात अशा 5 युनिट्सना मंजुरी दिली गेली आहे. तो दिवस दूर नाही, जेव्हा तुम्हाला मेड इन इंडिया चिप्स अमेरिकेतही दिसू लागतील. ही छोटी चिप विकसित भारताच्या उड्डाणाला नव्या उंचीवर घेऊन जाईल आणि ही मोदीची ग्यॅरंटी आहे.

मित्रांनो,

आज भारतात सुधारणांसाठी जे Conviction (कन्विक्शन) जी बांधिलकी दिसते, ती अभूतपूर्व आहे. आमला हरित उर्जा संक्रमण कार्यक्रम, हे याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. जगाच्या लोकसंख्येत 17 टक्के वाटा असूनही, जागतिक कार्बन उत्सर्जनात भारताचा वाटा केवळ 4 टक्के आहे. जगाचा विनाश करण्यात आपली कोणतीही भूमिका नाही. संपूर्ण जगाच्या तुलनेत एकतऱ्हेने, म्हणजेच हे बोलू शकतो की तुलनेने नगण्य प्रमाण आहे. आपणही केवळ कार्बन इंधन जाळून आपल्या विकासाला पाठबळ देऊ शकलो असतो. पण आपण हरित संक्रमणाचा मार्ग निवडला. निसर्गावर प्रेम करण्याच्या आपल्यावरच्या संस्कारांनीच आपल्याला मार्गदर्शन केले.

त्यामुळे आपण सौर, पवन, जलविद्युत, हरित हायड्रोजन आणि अणुऊर्जेमध्ये गुंतवणूक करत आहोत. भारत हा जी20 मधील असा देश आहे ज्याने पॅरिस हवामान उद्दिष्टांची सर्वात आधी पूर्तता केली.  2014 नंतर भारताने आपली सौर ऊर्जेची स्थापित क्षमता 30 पटीने वाढवली आहे. 

आम्ही देशातील प्रत्येक घराला सौर ऊर्जेवर चालणारे घर बनवण्याच्या कामात जुंपून घेतले आहे. त्यासाठी छतावरील सौर उर्जा व्यवस्थेची मोठी मोहीम आपण सुरू केली आहे. आज आपली रेल्वे स्थानके आणि विमानतळांचे सौरीकरण होत आहे. भारत घरांपासून रस्त्यांपर्यंत ऊर्जा - कार्यक्षम प्रकाशनाच्या दिशेने वाटचाल करत आहे. या सर्व प्रयत्नांमुळे भारतात मोठ्या प्रमाणात हरित रोजगार निर्माण होत आहेत.

 

मित्रांनो,

21 व्या शतकातील भारत शिक्षण, कौशल्य, संशोधन आणि नावोन्मेषाच्या जोरावर पुढे वाटचाल करतो आहे. तुम्हा सर्वांनाच नालंदा विद्यापीठाचे नाव ठाऊक असेलच. काही काळापूर्वी भारतातील प्राचीन नालंदा विद्यापीठ नव्या स्वरुपात उदयाला आले आहे. आज केवळ विद्यापीठाचेच नव्हे, तर नालंदा भावनेचेही पुनरुज्जीवन होत आहे. संपूर्ण जगभरातील विद्यार्थी भारतात शिकायला यावेत, आम्ही यासाठीची आधुनिक परिसंस्था घडवत आहोत. गेल्या दहा वर्षांत भारतात, ही पण तुम्ही लक्षात ठेवावी अशीच गोष्ट सांगतोय मी. गेल्या दहा वर्षांत भारतात, दर आठवड्याला एक नवे विद्यापीठ स्थापन झाले आहे. दररोज दोन नवीन महाविद्यालये उभी राहात आहेत. दररोज एक नवीन आयटीआयची (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) स्थापना झाली आहे.  गेल्या दहा वर्षांत आयआयटीची संख्या 9 वरून वाढून 25 वर गेली आहे. आयआयएमची संख्या 13 वरून वाढून 21 झाली आहे. एम्सची संख्या, तीन पटीने वाढून 22 वर पोहोचली आहे. दहा वर्षांत वैद्यकीय महाविद्यालयांची संख्याही जवळपास दुप्पट झाली आहे. जागतिक पातळीवरील अव्वल विद्यापीठेही आता भारतात येत आहेत, आता भारताचे नाव होते आहे. आत्तापर्यंत जगाने भारताच्या डिझायनर्सचे कर्तृत्व पाहिले, आता जग डिझाइन इन इंडिया' ची जादू पाहील.

मित्रांनो,

आज संपूर्ण जगासमवेत आमची भागीदारी वाढत आहे. याआधी सर्वांपासून समान अंतर या धोरणानुसार भारत वाटचाल करत होता - Equal Distance. मात्र आता भारत सर्वांसमवेत समान जवळीक या धोरणाच्या आधारे वाटचाल करत आहे.आम्ही ग्लोबल साउथचाही बुलंद आवाज बनलो आहोत.भारताच्या पुढाकाराने जी-20 शिखर परिषदेत आफ्रिकन महासंघाला स्थायी सदस्यता मिळाली.आज जागतिक मंचावर भारताचे म्हणणे संपूर्ण जग लक्षपूर्वक ऐकते. काही वेळापूर्वी मी, हे युद्धाचे युग नाही असे म्हटले तेव्हा त्याचे गांभीर्य सर्वांनी जाणले.  

मित्रांनो,

आज जगात कोठेही संकट आले तर सर्वप्रथम मदतीचा हात भारताचा असतो.कोरोनाच्या काळात आम्ही 150 पेक्षा जास्त देशांना लस, औषधे पाठवली.कोठे भूकंप असो, चक्रीवादळ असो,कोठे गृह युद्ध असो, मदतीसाठी आम्ही सर्वात आधी पोहोचतो.हीच आमच्या पूर्वजांची शिकवण आहे, हेच आमचे संस्कार आहेत.

मित्रांनो,

आजचा भारत जगात नवा उत्प्रेरक म्हणून पुढे येत आहे आणि याचा प्रभाव प्रत्येक क्षेत्रात दिसेल.जागतिक विकासाच्या प्रक्रियेला वेग देण्यात भारताची भूमिका महत्वाची असेल,जागतिक शांततेच्या प्रक्रियेला वेग देण्यात भारताची भूमिका महत्वाची असेल, हवामान बदलासंदर्भातल्या जागतिक उपाययोजनांना गती देण्यात भारताची भूमिका महत्वाची असेल, जागतिक कौशल्य तफावत दूर करण्यात भारताची भूमिका महत्वाची असेल, जागतिक नवोन्मेशाला नवी दिशा देण्यात भारताची भूमिका महत्वाची असेल, जागतिक पुरवठा साखळीच्या स्थैर्यामध्ये भारताची भूमिका महत्वाची असेल.

 

मित्रांनो,

भारतासाठी शक्ती आणि सामर्थ्य याचा अर्थ आहे  - “ज्ञानाय दानाय च रक्षणाय”म्हणजे ज्ञान हे सामायिक करण्यासाठी, संपत्ती काळजी घेण्यासाठी आणि सामर्थ्य हे रक्षणासाठी असते. म्हणूनच जगामध्ये आपला दबाव वाढवण्याला नव्हे तर आपला प्रभाव वाढवण्याला भारताचे प्राधान्य आहे. आम्ही आगीप्रमाणे भस्मसात करणारे नव्हे तर आम्ही सूर्य किरणाप्रमाणे प्रकाश देणारे लोक आहोत.आम्ही जगावर वर्चस्व निर्माण  करू इच्छित नाही.जगाच्या समृद्धीत आपला सहयोग आम्ही वाढवू  इच्छितो.योग प्रोत्साहन असो,भरड धान्याला प्रोत्साहन देणे असो,मिशन लाईफ म्हणजे पर्यावरण अनुकूल जीवनशैलीचा दृष्टीकोन असो भारत,सकल राष्ट्रीय उत्पादन केंद्रित विकासासह मानव केंद्रित विकासालाही प्राधान्य देत आहे. मिशन लाईफला  या मंचावर जास्तीत जास्त प्रोत्साहन  देण्याचे आवाहन मी करतो. आपल्या जीवन शैलीत थोडासा बदल करूनही आपण पर्यावरण रक्षणाला हातभार लावू शकतो.शैलीमध्ये थोडासा बदल करूनही पर्यावरणाला सहाय्य करू शकतो.आपण कदाचित ऐकले असेल, आपल्यापैकी काही लोकांनी यासाठी पुढाकारही घेतला असेल, सध्या भारतात एक पेड मां के नाम, आपल्या आईच्या स्मरणार्थ एक झाड लावण्याचे,आई हयात असेल तर तिच्यासमवेत, हयात नसेल तर तिचा फोटो  घेऊन झाड लावण्याचे एक पेड मां के नाम अभियान देशाच्या कानाकोपऱ्यात  सुरु आहे. आपण सर्वानीही असे अभियान चालवावे अशी माझी इच्छा आहे.या अभियानामुळे आपली जन्मदाती आई आणि धरती माता या दोन्हींची कीर्ती वृद्धिंगत होईल.

मित्रांनो,

आजचा भारत मोठी-मोठी स्वप्ने पाहतो,मोठी स्वप्ने साकार करण्यासाठी काम करतो.काही दिवसांपूर्वीच पॅरीस ऑलिम्पिक समाप्त झाले. पुढच्या ऑलिम्पिकचे यजमान पद अमेरिकेकडे आहे. लवकरच आपण भारतातही ऑलिम्पिकचे  साक्षीदार बनाल. 2036 च्या ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.क्रीडा स्पर्धा असोत,व्यापार असो किंवा मनोरंजन क्षेत्र, आज भारत मोठे आकर्षण केंद्र आहे. आज आयपीएल सारखी भारताची लीग, जगातल्या सर्वोच्च लीग पैकी एक आहे. भारताचे चित्रपट जागतिक स्तरावर गाजत आहेत.जागतिक पर्यटन क्षेत्रातही भारत आज नाव कमावत आहे. जगामधल्या वेगवेगळ्या देशांमध्ये भारताचे सण साजरे करण्याची चढाओढ आहे. सध्या प्रत्येक शहरात लोक नवरात्रीसाठी गरबा   शिकत आहेत.हे  भारताप्रती त्यांचे असलेले प्रेम आहे.

 

मित्रांनो,

आज प्रत्येक देश भारताला जास्तीत जास्त समजू इच्छितो, जाणू इच्छितो.आपल्याला आणखी एका गोष्टीचा आनंद होईल.अमेरिकेने कालच, आपल्या सुमारे 300 प्राचीन मूर्ती, शिलालेख होते, जे कधी हिंदुस्तानमधून  तस्करीमार्गे गेले होते, त्या परत केल्या आहेत. यामध्ये 1500 वर्षे प्राचीन, 2000 वर्षे प्राचीन,300 शिलालेख आणि मूर्तींचा समावेश आहे. आतापर्यंत अमेरिकेने अशा सुमारे 500 प्राचीन वारसा वस्तू भारताला परत केल्या आहेत. ही छोटीशी वस्तू  परत करण्याची गोष्ट नाही, हजारो वर्षांच्या आपल्या वारश्याचा हा सन्मान आहे.हा भारताचा सन्मान आहे आणि हा आपलाही सन्मान आहे. अमेरिकेच्या सरकारचा मी यासाठी खूप आभारी आहे.

मित्रांनो,

भारत आणि अमेरिका यांच्यातली भागीदारी  सातत्याने मजबूत होत आहे. आमची भागीदारी जागतिक कल्याणासाठी आहे.प्रत्येक क्षेत्रात आम्ही सहकार्य वाढवत आहोत. यामध्ये आपल्या सोयीही ध्यानात घेण्यात आल्या आहेत. सियेटल इथे आमचे सरकार नवा दूतावास उघडेल अशी घोषणा मी गेल्या वर्षी केली होती. आता हा दूतावास सुरु झाला आहे. मी आणखी दोन दूतावास सुरु करण्यासाठी प्रस्ताव मागितले होते. आपल्याला हे सांगताना मला आनंद होत आहे की आपल्या सुचनानंतर भारताने बोस्टन आणि लॉस एंजिल्स इथे नवे दूतावास उघडण्याचा निर्णय घेतला आहे. हुस्टन  विद्यापीठात थिरूवल्लूवर चेअर ऑफ तमिळ स्टडीज जाहीर करतानाही मला आनंद होत आहे. महान तमिळ  संत थिरूवल्लूवर यांचे तत्वज्ञान जगापर्यंत पोहोचण्यासाठी याची आणखी मदत होईल.

 

 

मित्रांनो,

आपले हे आयोजन खरोखरच शानदार राहिले आहे. इथे जो सांस्कृतिक कार्यक्रम झाला तो वाखाणण्याजोगा होता. या कार्यक्रमासाठी आणखी हजारो लोक येऊ इच्छित होते. मात्र जागा छोटी पडली.ज्यांना मी इथे भेटू शकलो नाही त्यांची मी क्षमा मागतो. त्या सर्वांशी पुढच्या वेळी भेट होईल, आणखी एखाद्या दिवशी,आणखी एखाद्या ठिकाणी. मात्र उत्साह असाच असेल, जोश असाच असेल हे मी जाणतो. आपण असेच आरोग्यवान रहा, समृद्ध रहा,भारत-अमेरिका मैत्री अशीच बळकट करत रहा अशी कामना बाळगत आपणा सर्वाना खूप-खूप धन्यवाद.माझ्यासमवेत जयघोष करा -  

भारत माता की जय

भारत माता की जय

भारत माता की जय

खूप-खूप धन्यवाद !

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India’s organic food products export reaches $448 Mn, set to surpass last year’s figures

Media Coverage

India’s organic food products export reaches $448 Mn, set to surpass last year’s figures
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister lauds the passing of amendments proposed to Oilfields (Regulation and Development) Act 1948
December 03, 2024

The Prime Minister Shri Narendra Modi lauded the passing of amendments proposed to Oilfields (Regulation and Development) Act 1948 in Rajya Sabha today. He remarked that it was an important legislation which will boost energy security and also contribute to a prosperous India.

Responding to a post on X by Union Minister Shri Hardeep Singh Puri, Shri Modi wrote:

“This is an important legislation which will boost energy security and also contribute to a prosperous India.”