महामहीम, राष्ट्रपती इरफान अली,
पंतप्रधान मार्क फिलिप्स,
उपराष्ट्रपती भरत जगदेव,
माजी राष्ट्रपती डोनॉल्ड रामोतार,
गयाना मंत्रिमंडळाचे सदस्य,
इंडो-गयाना समुदायाचे सदस्य,
पुरुष आणि महिलावर्ग,
नमस्कार !
सीताराम !
आपणा सर्वांसमवेत इथे उपस्थित राहताना मला आनंद होत आहे. आपल्यासमवेत इथे उपस्थित राहिल्याबद्दल राष्ट्रपती इरफान अली यांचे मी सर्वप्रथम आभार मानतो. इथे दाखल झाल्यापासून मला दिलेला स्नेह आणि आपुलकी यामुळे मी भारावून गेलो आहे. राष्ट्रपती अली यांनी आपल्या निवासस्थानी केलेल्या माझ्या स्वागताबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांच्या कुटुंबियांचा स्नेह आणि आपुलकी यासाठीही मी आभारी आहे. आदरातिथ्य हा आपल्या संस्कृतीचा गाभा आहे, गेले दोन दिवस मी याचा अनुभव घेत आहे. राष्ट्रपती अली आणि त्यांच्या आजीसमवेत आम्ही वृक्षारोपणही केले. ‘एक पेड मां के नाम’ म्हणजेच आईसाठी वृक्षारोपण या आमच्या उपक्रमाचा हा भाग आहे. हा भावनिक क्षण माझ्या नेहमीच स्मरणात राहील.
मित्रहो,
‘ऑर्डर ऑफ एक्सिलन्स’ हा गयानाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त होणे, हा माझा सन्मान आहे. यासाठी गयानाच्या जनतेचे मी आभार मानतो. 1.4 अब्ज भारतीयांचा हा सन्मान आहे. भारत-गयाना समुदायाचे तीन लाख लोक आणि गयानाच्या विकासात त्यांनी दिलेल्या योगदानाची पोचपावती आहे.
मित्रहो,
दोन दशकांपूर्वी आपल्या सुंदर देशाला मी दिलेल्या भेटीच्या स्मृती माझ्या मनात रेंगाळत आहेत. त्यावेळी उत्सुकतेपोटी एक प्रवासी म्हणून मी भेट दिली होती. अनेक नद्यांच्या या भूमीला भारताचे पंतप्रधान या नात्याने मी आता भेट देत आहे. तो काळ आणि आताचा काळ यामध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये बदल झाला आहे. मात्र माझ्या गयानी बंधू-भगिनीचे प्रेम आणि आपुलकी तशीच कायम आहे! तुम्ही भारतीयांना भारताबाहेर नेऊ शकता, मात्र भारतीयांच्या हृदयातून भारत हलवू शकत नाही, याची पुष्टी मी अनुभवली.
मित्रहो,
आज मी भारतीय आगमन स्मारकाला भेट दिली. सुमारे दोन शतकांपूर्वी तुमच्या पूर्वजांनी केलेला अवघड आणि प्रदीर्घ प्रवास इथे उलगडतो. भारताच्या विविध भागांमधून ते इथे आले. आपल्यासमवेत विविध संस्कृती, भाषा आणि परंपरा त्यांनी इथे आणल्या. काळाच्या ओघात त्यांनी या नवीन भूमीला आपले घर मानले. आज ही भाषा, कहाण्या आणि परंपरा गयानाच्या समृद्ध संस्कृतीचा भाग झाल्या आहेत. भारत - गयाना समुदायाच्या चैतन्याची त्यांनी प्रशंसा केली. स्वातंत्र्य आणि लोकशाहीसाठी आपण लढा दिलात. गयाना हा देश वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरावा यासाठी आपण काम केले. सर्वसाधारण सुरवात करत आपण सर्वोच्च स्थानी आलात. श्री चेद्दी जगन म्हणत असत : ‘व्यक्ती कोण म्हणून जन्माला आली हे महत्वाचे नाही तर त्या व्यक्तीने कोण व्हायचे ठरवले आहे हे महत्वाचे आहे’. त्यांनी स्वतः हे तत्व आचरले. कामगार कुटुंबातला मुलगा जागतिक स्तरावरचा नेता ठरला. राष्ट्रपती इरफान अली, उपराष्ट्रपती भरत जगदेव, माजी राष्ट्रपती डोनॉल्ड रामोतार हे सर्वजण भारत-गयाना समुदायाचे राजदूत आहेत. भारत-गयाना समुदायाच्या ज्ञानवंतांपैकी एक जोसेफ रुहोमन, प्रारंभिक भारत - गयाना कवीपैकी एक रामचरितार लल्ला, प्रसिद्ध महिला कवयित्री शाना यार्दन अशा अनेक भारत – गयानावासियांनी शिक्षण, कला, संगीत आणि औषधोपचार क्षेत्रात आपला ठसा उमटवला.
मित्रहो,
आपल्यातली साम्यस्थळे आपल्या मैत्रीला भक्कम आधार देतात. संस्कृती, भोजन आणि क्रिकेट या तीन गोष्टी भारत आणि गयाना यांना अगदी मनापासून जोडतात. काही आठवड्यापूर्वीच आपण सर्वांनी दिवाळी साजरी केली असेल याचा मला विश्वास आहे. काही महिन्यात जेव्हा भारतात होळी साजरी केली जाईल तेव्हा गयाना फगवा साजरा करेल. यावर्षीची दिवाळी विशेष होती, कारण 500 वर्षानंतर रामलल्ला अयोध्येत विराजमान झाले. अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणीसाठी गयानामधून पवित्र जल आणि शिळा पाठवण्यात आल्या होत्या, याचे भारतीयांना स्मरण आहे. महासागराचे अंतर असूनही भारत मातेशी आपला सांस्कृतिक संबंध दृढ राहिला आहे, हे आज आर्य समाज स्मारक आणि सरस्वती विद्या निकेतन शाळेचा मी दौरा केला तेव्हा मला जाणवले. भारत आणि गयाना या दोन्ही देशांना आपल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीचा अभिमान आहे. आपण वैविध्य केवळ सामावून घेत नाही तर ते साजरेही करतो. सांस्कृतिक विविधता हे आपले सामर्थ्य आहे, याची प्रचीती आपले देश देत आहेत.
मित्रहो,
भारताचे लोक जिथे जातात, तिथे ते आपल्यासमवेत एक गोष्ट घेऊन जातात, भोजन! भारत - गयाना समुदायाची अनोखी खाद्य संस्कृती परंपरा आहे, ज्यामध्ये भारतीय आणि गयाना दोन्हींचा स्वाद आहे. इथे जेवणात डाळ लोकप्रिय आहे हे मी जाणतो. राष्ट्रपती अली यांच्या निवासस्थानी मी सात-करी स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतला. माझ्यासाठी ही सुखद आठवण आहे.
मित्रहो,
क्रिकेट प्रेम हा दुवाही आपल्या देशांमधले संबंध अधिक दृढ करतो. हा केवळ एक क्रीडा प्रकार नाही, जीवन जगण्याची ही पद्धत आहे जी आपल्या राष्ट्रीय ओळखीमध्ये सामावलेली आहे. गयानाचे प्रोव्हिडन्स नॅशनल क्रिकेट स्टेडियम हे आपल्या मैत्रीचे प्रतीक आहे. कन्हाय, कालीचरण, चंद्रपॉल ही सर्व भारतात ओळखली जाणारी प्रसिद्ध नावे आहेत. क्लाइव्ह लॉईड आणि त्यांचा संघ अनेक पिढ्यांचा आवडता संघ राहिला होता. या भागातल्या युवा खेळाडूंचाही भारतात मोठा प्रशंसक वर्ग आहे. यापैकी काही महान क्रिकेटपटू आज आपल्या समवेत आहेत. यावर्षी आपण आयोजित केलेल्या टी-20 विश्व चषकाचा आनंद आमच्या अनेक क्रीडा प्रेमींनी घेतला. गयानामधल्या सामन्यात ‘टीम इन ब्लू’ साठी आपला जयघोष भारतातही ऐकता येत होता.
मित्रहो,
आज सकाळी, गयानाच्या संसदेला संबोधित करण्याचा सन्मान मला प्राप्त झाला. लोकशाहीच्या जननीशी जोडलेले असल्यामुळे कॅरेबियन क्षेत्रातल्या सर्वात सळसळत्या लोकशाहीपैकी एक असलेल्या लोकशाहीसमवेत आध्यात्मिक बंध मला जाणवला. वसाहतवादी राजवटीविरोधात समान संघर्ष, लोकशाही मूल्यांचा आदर आणि विविधतेचा सन्मान असा आपला एक सामाईक इतिहास आहे जो आपल्याला एकत्र जोडतो. विकास आणि वृद्धीच्या आकांक्षा, अर्थव्यवस्था आणि पर्यावरणाप्रती कटीबद्धता आणि न्याय्य आणि समावेशी जागतिक व्यवस्थेवरचा विश्वास यासह आपले सामायिक भविष्य आहे जे आपण घडवू इच्छितो.
मित्रहो,
गयानामधली जनता भारताची हितचिंतक आहे हे मी जाणतो. भारतात होणारी प्रगती आपण बारकाईने पहात असाल. गेल्या एका दशकातला भारताचा प्रवास व्यापक, वेगवान आणि स्थैर्याचा राहिला आहे. दहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था या स्थानावरून भारत केवळ दहा वर्षात पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. लवकरच आपण तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहोत. आपल्या युवकांनी आम्हाला सर्वात मोठी तिसरी स्टार्ट अप परिसंस्था बनवली आहे. ई-कॉमर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, कृषी, तंत्रज्ञान आणि अनेक क्षेत्रात भारत जागतिक केंद्र आहे. आम्ही मंगळ आणि चंद्रावर पोहोचलो आहोत. महामार्गापासून आय-वे पर्यंत, हवाई मार्गापासून ते रेल्वे पर्यंत आम्ही अत्याधुनिक पायाभूत ढाचा उभारत आहोत. आमच्याकडे भक्कम सेवा क्षेत्र आहे. उत्पादन क्षेत्रातही आम्ही बळकट होत आहोत. भारत हा जगातला दुसरा सर्वात मोठा मोबाईल निर्माता देश बनला आहे.
मित्रहो,
भारताचा विकास प्रेरणादायी तर आहेच त्याच बरोबर तो समावेशकही आहे. आमचा डिजिटल सार्वजनिक पायाभूत ढाचा गरिबांना सक्षम बनवत आहे. आम्ही 500 दशलक्ष पेक्षा जास्त बँक खाती उघडली आहेत. डिजिटल ओळख आणि मोबाईल द्वारे ही खाती आम्ही जोडली आहेत. यामुळे लोकांच्या थेट बँक खात्यात मदत जमा होते. आयुष्मान भारत जगातली सर्वात मोठी निःशुल्क आरोग्य विमा योजना आहे. याचा लाभ 500 दशलक्ष पेक्षा जास्त लोकांना मिळत आहे. आम्ही गरजूंसाठी 30 दशलक्ष पेक्षा जास्त घरे उभारली आहेत. केवळ एका दशकात आम्ही 250 दशलक्ष लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहेत. गरिबांमधेही आमच्या उपक्रमाचा सर्वात जास्त लाभ महिलांना मिळाला आहे. लाखो महिला उद्योजक बनत रोजगार आणि संधी निर्माण करत आहेत.
मित्रहो,
जेव्हा मोठ्या प्रमाणात विकास सडला जात होता तेव्हा आम्ही शाश्वततेवरही लक्ष केंद्रित केले. केवळ एका दशकात आमची सौर उर्जा क्षमता 30 पटीने वाढली आहे. आपण कल्पना करू शकता का? पेट्रोल मध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणासह हरित मोबिलिटीच्या दिशेने आम्ही आगेकूच करत आहोत. हवामान बदलाचा मुकाबला करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरही अनेक उपक्रमात आम्ही महत्वाची भूमिका बजावली आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, जागतिक जैव इंधन आघाडी, आपत्ती रोधक पायाभूत ढाचा यासाठी आघाडी, यापैकी अनेक उपक्रमांमध्ये ग्लोबल साउथ देशांना सबळ करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बिग कॅट आघाडीसाठीही आम्ही पाठींबा दिला आहे. गयानाला आपल्या जग्वार सह याचा लाभ होत आहे.
मित्रहो,
गेल्या वर्षी आम्ही अनिवासी भारतीय दिवसाचे प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रपती इरफान अली यांचे आदरतिथ्य केले होते. पंतप्रधान मार्क फिलिप्स, उपराष्ट्रपती भरत जगदेव यांचे आम्ही स्वागत केले. अनेक क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहयोग बळकट करण्यासाठी आपण एकत्रित काम केले आहे. आज आपण आपल्या सहयोगाच्या कक्षा उर्जेपासून ते उद्योगापर्यंत, आयुर्वेदापासून ते कृषी क्षेत्रापर्यंत, पायाभूत ढाच्यापासून ते नवोन्मेषापर्यंत, आरोग्यसेवेपासून ते मनुष्यबळापर्यंत आणि डेटापासून विकासापर्यंत व्यापक करण्यावर सहमती दर्शवली आहे. आपली भागीदारी व्यापक क्षेत्रासाठीही महत्वाची आहे. काल झालेली दुसरी भारत-कॅरिकॉम शिखर परिषद याचाच दाखला आहे. संयुक्त राष्ट्राचे सदस्य या नात्याने आपण दोन्ही, सुधारित बहुपक्षवादावर विश्वास ठेवतो. विकसनशील राष्ट्र म्हणून आपण ग्लोबल साउथचे सामर्थ्य जाणतो. आम्ही धोरणात्मक स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते आहोत आणि समावेशक विकासाला पाठींबा देतो. शाश्वत विकास आणि हवामान विषयक न्याय याला आम्ही प्राधान्य देतो. जागतिक संकटे दूर करण्यासाठी चर्चा आणि मुत्सद्देगिरीचे आवाहन आम्ही जारी ठेवतो.
मित्रहो,
अनिवासी समुदायांना मी नेहमीच राष्ट्रदूत म्हणतो. एक राजदूत एक राष्ट्रदूत असतो मात्र माझ्यासाठी आपण सर्व जण राष्ट्रदूत आहात. भारतीय संस्कृती आणि मूल्यांचे राजदूत आहात. आईच्या कुशीत मिळणारी उब याची कोणत्याही सांसारिक सुखाशी तुलनाच होऊ शकत नाही, असे म्हणतात. भारत - गयाना समुदाय म्हणून दोन्हीकडून आपणाला आशीर्वाद प्राप्त होत आहे. आपली मातृभूमी गयाना आहे तर पितृभूमी भारत माता आहे. आज भारत संधींची भूमी आहे तर आपल्यापैकी प्रत्येक जण दोन्ही देशांना जोडण्यासाठी मोठी भूमिका बजावू शकतो.
मित्रहो,
‘भारत को जानिये’ प्रश्न मंजुषा सुरु करण्यात आली आहे. यामध्ये आपण सहभाग घ्यावा, असे आवाहन मी करतो. त्याच बरोबर गयानामधल्या आपल्या मित्र वर्गालाही प्रोत्साहित करा. भारत, त्याची मुल्ये, संस्कृती आणि विविधता जाणण्यासाठी ही एक उत्तम संधी असेल.
मित्रहो,
पुढच्या वर्षी 13 जानेवारी पासून ते 26 फेब्रुवारी पर्यंत प्रयागराज इथे महाकुंभ आयोजित करण्यात येईल. आपले कुटुंब आणि मित्र परिवारासह आपण या सोहोळ्यात सहभागी व्हावे, यासाठी मी आपल्याला आमंत्रित करत आहे. आपण बस्ती किंवा गोंडा इथे जाऊ शकता जिथून आपणापैकी काही लोक आले आहेत. आपण अयोध्येमध्ये राम मंदिरही पाहू शकता. आणखी एक निमंत्रण अनिवासी भारतीय दिवसासाठीही आहे जो जानेवारी मध्ये भुवनेश्वर इथे आयोजित करण्यात येईल. आपण त्या वेळी आलात तर पुरी इथे महाप्रभू जगन्नाथ यांचा आशीर्वादही आपण प्राप्त करू शकता. इतके सर्व कार्यक्रम आणि निमंत्रणे यातून आपल्यापैकी काही जण लवकरच भारतात येतील अशी मला आशा आहे. आपण दिलेला स्नेह आणि आपुलकी यासाठी आपणा सर्वाना पुन्हा एकदा धन्यवाद. खूप खूप आभार.
माझे मित्र अली यांचे विशेष आभार
खूप खूप धन्यवाद.