नमस्कार!
देवभूमीच्या सर्व जनतेला हिमाचल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी हिमाचल प्रदेश देखील आपला 75 वा स्थापना दिवस साजरा करत आहे हा अतिशय आनंददायी योगायोग आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात हिमाचल प्रदेशातील विकासाचे अमृत राज्यातील प्रत्येक रहिवाशांपर्यंत पोहोचत राहावे, यासाठी आमचे सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत.
अटलजींनी एकदा हिमाचलबाबत लिहिले होते-
बर्फ ढंकी पर्वतमालाएं,
नदियां, झरने, जंगल,
किन्नरियों का देश,
देवता डोलें पल-पल !
सुदैवाने, मलाही निसर्गाची अनमोल देणगी, मानवी क्षमतेची अत्युच्च पातळी अजमावण्याची आणि अतिशय कष्टात आपले भाग्य घडवणाऱ्या हिमाचलच्या लोकांमध्ये राहण्याची संधी मिळाली.
मित्रांनो,
सन 1948 मध्ये हिमाचल प्रदेशची निर्मिती झाली तेव्हा पर्वतासारखी आव्हाने समोर होती.
लहान डोंगराळ प्रदेश असल्याने, कठीण परिस्थिती आणि आव्हानात्मक भौगोलिक रचनेमुळे, शक्यतांपेक्षा अधिक साशंकता होती. पण हिमाचलच्या कष्टाळू, प्रामाणिक आणि मेहनती लोकांनी या आव्हानाचे संधीत रूपांतर केले. फलोत्पादन, वीज अधिशेष राज्य, साक्षरता दर, गावागावात रस्ता सुविधा, घरोघरी पाणी आणि वीज सुविधा यासारख्या अनेक बाबी या डोंगराळ राज्याची प्रगती दर्शवतात.
हिमाचलची क्षमता, तिथल्या सोयी-सुविधा अधिक चांगल्या कराव्यात, असा केंद्र सरकारचा गेल्या 7-8 वर्षांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहे. डबल इंजिन सरकारने आमचे तरुण सहकारी हिमाचलचे लोकप्रिय मुख्यमंत्री जयराम जी यांच्या सहकार्याने ग्रामीण रस्ते, महामार्ग रुंदीकरण, रेल्वेचे जाळे विस्तारण्यासाठी पुढाकार घेतला आहे, त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. संपर्क व्यवस्था चांगली होत असल्याने हिमाचलचे पर्यटन हे नवीन क्षेत्र, नवीन प्रदेश खुणावत आहे. प्रत्येक नवीन प्रदेश पर्यटकांसाठी निसर्ग, संस्कृती आणि साहसाचे नवीन अनुभव घेऊन येत आहे आणि स्थानिकांसाठी रोजगार, स्वयंरोजगाराच्या अनंत शक्यता दिसू लागल्या आहेत. ज्या प्रकारे आरोग्य सुविधा सुधारल्या जात आहेत, त्याचा परिणाम आपल्याला कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या वेगाद्वारे दिसून आला आहे.
मित्रांनो,
आता आपल्याला हिमाचलची पूर्ण क्षमता दृष्टीपथात आणण्यासाठी वेगाने काम करावे लागेल. येत्या 25 वर्षात हिमाचलच्या निर्मितीला आणि देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. हा आमच्यासाठी नवीन संकल्पांचा अमृतकाळ आहे. या काळात पर्यटन, उच्च शिक्षण, संशोधन, माहिती तंत्रज्ञान, जैव-तंत्रज्ञान, अन्न-प्रक्रिया आणि नैसर्गिक शेती यांसारख्या क्षेत्रात हिमाचलला अधिक गतीने पुढे न्यायचे आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या व्हायब्रंट व्हिलेज योजना आणि पर्वतमाला योजनेचा हिमाचल प्रदेशलाही मोठा फायदा होणार आहे. या योजनांमुळे हिमाचल प्रदेशातील दुर्गम भागात संपर्क वाढेल, पर्यटनाला चालना मिळेल आणि रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होतील. आपल्याला हिमाचलची हिरवळ वाढवायची आहे, जंगले अधिक समृद्ध करायची आहेत. स्वच्छतागृहांबाबत केलेल्या उत्कृष्ट कामामुळे आता स्वच्छतेच्या इतर बाबींना प्रोत्साहन मिळायला हवे, त्यासाठी लोकसहभाग आणखी वाढवावा लागेल.
मित्रांनो,
जयराम जी यांचे सरकार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केंद्राच्या कल्याणकारी योजनांचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला आहे. विशेषतः सामाजिक सुरक्षेच्या बाबतीत हिमाचलमध्ये कौतुकास्पद काम केले जात आहे. प्रामाणिक नेतृत्व, शांतताप्रिय वातावरण, देवी-देवतांचे आशीर्वाद आणि कठोर परिश्रम करणारी हिमाचलचे लोक, हे सर्व अतुलनीय आहे. हिमाचलमध्ये वेगवान विकासासाठी आवश्यक असलेले सर्व काही आहे. समृद्ध आणि बलशाली भारताच्या उभारणीत हिमाचल आपले योगदान देत राहो, हीच माझी सदिच्छा!
खूप खूप धन्यवाद!