एनआयडी फाउंडेशनचे आधारस्तंभ आणि चंदीगड विद्यापीठाचे कुलगुरू माझे मित्र श्री सतनाम सिंग संधुजी, एनआयडी फाउंडेशनचे सर्व सदस्य गण आणि सर्व सन्मानीय सहकारी गण! तुमच्या पैकी काही लोकांना या आधी भेटण्याची संधी मला मिळाली आहे. गुरुद्वारामध्ये जाणं, तिथे सेवा करायला वेळ देणं, लंगरमध्ये जेवणं, शीख कुटुंबांच्या घरी राहणं, हा माझ्या आयुष्याचा एक नैसर्गिक भाग राहिला आहे. इथं पंतप्रधान निवासात देखील वेळोवेळी शीख संतांचे पाय लागत राहिले आहेत आणि हे माझं मोठं सौभाग्य आहे. त्यांच्या सान्निध्यात मला वेळ घालवायची संधी मिळत राहिली आहे.
बंधू आणि भगिनींनो,
जेव्हा मी परदेश दौऱ्यावर जातो, तेव्हा तिथे देखील शीख समाजातल्या मित्रांना भेटतो, तेव्हा तर उर अभिमानाने भरून येतो. माझी 2015 ची कॅनडा भेट आपल्यातल्या अनेकांना आठवत असेल! आणि दलाईजींना तर मी मुख्यमंत्री नव्हतो, तेव्हापासून ओळखतो. ती भारताच्या पंतप्रधानांची गेल्या चार दशकांतली कॅनडाला पहिली स्वतंत्र द्विपक्षीय भेट होती आणि मी केवळ ओटावा आणि टोरांटोलाच गेलो नाही. मला आठवतं, मी तेव्हा म्हणालो होतो की व्हॅनक्युवरला देखील जाईन आणि मला तिथे जायची ईच्छा आहे. मी तिथे गेलो, गुरुद्वारा खालसा दिवानचं दर्शन घेण्याचं सौभाग्य मला मिळालं. तिथल्या कीर्तनकार सदस्यांशी चांगली चर्चा झाली. त्याचप्रमाणे 2016 मध्ये जेव्हा मी इराणला गेलो तेव्हा तिथं देखील तेहरानमध्ये भाई गंगा सिंग सभा गुरुद्वारा इथं जाण्याचं सौभाग्य मला मिळालं. माझ्या आयुष्यातला आणखी एक अविस्मरणीय क्षण फ्रांसला नवशपैल भारतीय स्मारकाला मी भेट दिली, हा देखील आहे. हे स्मारक महायुद्धात भारतीय सैनिकांच्या बलिदानासाठी त्यांना श्रद्धांजली देतं आणि यात देखील आपले शीख बंधू भगिनी मोठ्या संख्येनं होते. हे अनुभव याचं उदाहरण आहेत की कशा प्रकारे, आपला शीख समाज भारत आणि इतर देशांच्या संबंधांतला महत्वाचा दुवा आहे. माझं सौभाग्य आहे की आज मला हा दुवा अधिक मजबूत करण्याची संधी मिळाली आहे आणि मी यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करत देखील असतो.
मित्रांनो,
आपल्या गुरूंनी आपल्याला साहस आणि सेवा ही शिकवण दिली आहे. जगाच्या वेगवेगळ्या भागांत कुठल्याही स्रोतांशिवाय आपल्या भारताचे लोक गेले, आणि आपल्या परिश्रमाच्या जोरावर यशाची शिखरं गाठली. हीच भावना आज नव्या भारताची पटकथा बनली आहे. नवा भारत नव्या आयामांना गवसणी घालतो आहे, संपूर्ण जगावर आपली छाप सोडत आहे. कोरोना महामारीचा हा कालखंड याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. महामारीच्या सुरवातीला जुनी विचारसरणी असलेले लोक भारताविषयी चिंता व्यक्त करत होते. प्रत्येकजण काही न काही बोलत होता, मात्र आता लोक भारताचं उदाहरण देऊन जगाला सांगतात की बघा, भारतानं असं केलं आहे. आधी म्हटलं जायचं की भारतही इतकी मोठी लोकसंख्या, भारताला लस कुठून मिळेल, लोकांचे जीव कसे वाचवले जातील? पण आज भारत लसींचे सुरक्षा कवच तयार करणारा सर्वात मोठा देश म्हणून पुढे येत आहे. आपल्या देशात लसींच्या कोट्यवधी मात्रा देण्यात आल्या आहेत. तुम्हाला ऐकून अभिमान वाटेल यात देखील 99 टक्के लसीकरण आपल्या स्वतःच्या भारतात बनलेल्या लसींनी झालं आहे. याच कालखंडात आपण जगातली सर्वात मोठी स्टार्टअप व्यवस्थांपैकी एक बनून पुढे आलो आहोत. आपली युनिकॉर्नची संख्या सातत्यानं वाढत आहे. भारताचा हा वाढता मान, ही वाढती पत, या सर्वांमुळे सर्वात जास्त मान कुणाची उंचावते ती आपल्या भारतीय वंशाच्या लोकांची. कारण, जेव्हा देशाचा मान सन्मान वाढतो, तेव्हा लाखो कोट्यावधी भारतीय वंशाच्या लोकांचा सन्मान देखील तितकाच वाढतो. त्यांच्याकडे बघण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलून जातो. या सन्मानासोबत नव्या संधी देखील येतात, नव्या भागीदारी देखील बनत असतात आणि सुरक्षिततेची भावना देखील मजबूत होत जाते. आपल्या भारतीय वंशाच्या लोकांना तर मी भारताचे राष्ट्रदूत मानत आलो आहे. सरकार ज्यांना पाठवतं ते राजदूत असतात. पण तुम्ही लोक जे आहात ते राष्ट्रदूत आहात. आपण सगळे भारता बाहेर, भारत मातेचा आवाज बुलंद आवाज आहात, बुलंद ओळख आहात. भारताची प्रगती बघून आपली छाती देखील अभिमानानं फुलून येते, आपली मान देखील अभिमानानं उंच होते. परदेशात राहून देखील तुम्ही आपल्या देशाविषयी चिंता करत असता. म्हणून परदेशात राहून भारताचे यश पुढे नेण्यात, भारताची प्रतिमा अधिक मजबूत करण्यात देखील आपली भूमिका मोठी असते. आपण जगात कुठेही असलो तरी भारत प्रथम, राष्ट्र प्रथम ही आपली प्राथमिकता असायला हवी.
मित्रांनो,
आपल्या सर्व दहा गुरूंनी राष्ट्र सर्वोपरी ठेवून भारताला एका धाग्यात ओवलं आहे. गुरु नानकदेवजी यांनी पूर्ण देशाची चेतना जागृत केली होती, संपूर्ण राष्ट्राला अंधःकारातून काढून प्रकाशाची वाट दाखवली होती. आपल्या गुरूंनी पूर्वे पासून पश्चिमेपर्यंत, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत भारत भ्रमण केलं. प्रत्येक ठिकाणी, कुठेही जा, त्यांच्या खुणा आहे, त्यांच्या प्रेरणा आहेत, त्याविषयी आस्था आहे.
पंजाबमध्ये गुरूव्दारा हरमंदिर साहिबजीपासून ते उत्तराखंडमधल्या गुरूव्दारा हेमकुंड साहिबपर्यंत, महाराष्ट्रातल्या गुरूव्दारा हुजूर साहिबपासून ते हिमाचलमधल्या गुरूव्दारा पोंटा साहिबपर्यंत, बिहारमधल्या तख्त श्री पटनासाहिबपासून ते गुजरातमधल्या कच्छच्या गुरूव्दारा लखपत साहिबपर्यंत, आपल्या गुरूंनी लोकांना प्रेरणा दिली आहे. आपल्या चरणस्पर्शाच्या धुळीकणांनी या भूमीला पवित्र केले आहे. म्हणूनच शीख परंपरा वास्तवामध्ये ‘एक भारत, श्रेष्ठ भारता’ची जीवंत परंपरा आहे.
बंधू आणि भगिनींनो,
स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आणि स्वातंत्र्यानंतरही शीख समाजाने देशासाठी जे योगदान दिले आहे, त्याविषयी संपूर्ण भारत कृतज्ञतेचा अनुभव करतो. महाराजा रणजीत सिंह यांचे योगदान असो, इंग्रजांच्या विरोधात लढाई असो, जालियनवाला बाग असो, यांच्याशिवाय भारताचा इतिहास पूर्ण होत नाही की हिंदुस्तान पूर्ण होत नाही. आजही सीमेवर दक्ष असलेल्या शीख सैनिकांच्या शौर्यापासून ते देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये शीख समाजाची भागीदारी आणि शीख अनिवासी भारतीयांच्या योगदानापर्यंत, शीख समाज देशाचे धाडस, साहस, देशाचे सामर्थ्य आणि देशाचे श्रम यांचा पर्याय बनला आहे.
मित्रांनो,
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे आपल्या स्वातंत्र्य संग्रामाबरोबरच आपली संस्कृती आणि वारसा साजरा करण्याची संधी आहे. कारण, स्वातंत्र्यासाठी भारताने केलेला संघर्ष हा केवळ एका मर्यादित कालखंडातली घटना नाही. त्याबरोबर हजारों वर्षांची चेतना आणि आदर्श जोडले गेले होते. त्यामागे आध्यात्मिक मूल्य आणि कितीतरी महान तप-त्याग जोडले गेले होते, म्हणूनच आज देश ज्यावेळी एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहे, त्याचवेळी लाल किल्ल्यावर गुरू तेगबहादूर जी यांचा 400 वे प्रकाश पर्वही साजरा करीत आहे. गुरू तेगबहादूरजी यांच्या 400 व्या प्रकाश पर्वाच्या आधी आपण गुरू नानकदेव जी यांचा 550 वे प्रकाश पर्वही पूर्ण श्रद्धेने देश-विदेशांमध्ये साजरा केला होता. गुरू गोविंद सिंह जी यांचा 350 वे प्रकाश पर्व साजरा करण्याचे भाग्यही आपल्याला मिळाले होते.
मित्रांनो,
याचबरोबर, याच कालखंडामध्ये करतारपूर साहिब कॉरिडॉरची निर्मिती कार्य करण्यात आले. आज लाखो भाविकांना तिथे आपला माथा टेकविण्यासाठी जाण्याचे भाग्य मिळत आहे. लंगर करमुक्त करण्यापासून हरमिंदर साहिबला एफसीआरएची परवानगी देण्यापर्यंत, गुरूव्दारांच्या परिसरामध्ये अधिक स्वच्छता राखण्यापासून त्यांना अधिक चांगल्या पायाभूत सुविधांनी जोडण्यापर्यंत देशामध्ये आज सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आणि मी सतनाम जी यांचे आभार व्यक्त करतो, त्यांनी ज्या प्रकारे हे व्हिडिओ संकलित करून दाखवले आहेत, त्यावरून माहिती समजली की, संपूर्ण श्रद्धेने प्रत्येक क्षेत्रामध्ये कशा प्रकारे काम झाले आहे. तुम्हा लोकांकडून वेळो-वेळी जे सल्ले, सूचना येतात, आजही अनेक सूचना माझ्याकडे तुम्ही आणून दिल्या आहेत. माझा प्रयत्न असतो की, त्याआधारे देश; सेवेच्या मार्गावरून पुढे जात रहावा.
मित्रांनो,
आपल्या गुरूंच्या जीवनावरून जी सर्वात माठी प्रेरणा मिळते, ती म्हणजे आपल्याला होणारी कर्तव्यांची जाणीव ! स्वातंत्र्याच्या अमृतकाळामध्ये देशही आज कर्तव्यांना प्राधान्य देण्याविषयी चर्चा करीत आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास’ हा मंत्र आपल्या संपूर्ण भारताचे उज्ज्वल भविष्य सुनिश्चित करणारा आहे. हे कर्तव्य केवळ आपल्या वर्तमानासाठी नाही, हे आपल्या आणि आपल्या देशाच्या भविष्यासाठीही आहे. आपल्या येणा-या पिढ्यांसाठीही आहे. उदाहरण म्हणून एक सांगतो. - आज पर्यावरणाचा प्रश्न म्हणजे देश आणि संपूर्ण जगासमोर एक मोठे संकट बनले आहे. या प्रश्नाचे उत्तर भारताच्या संस्कृती आणि संस्कारामध्ये आहे. शीख समाज याचे जीवंत उदाहरण आहे. शीख समाजमध्ये आपण जितकी चिंता पिंडाची करतो, तितकीच पर्यावरण आणि या ग्रहाचीही केली जाते. प्रदूषणाच्या विरोधात केलेले प्रयत्न असो, कुपोषणाच्या विरोधातला लढा असो, आपल्या सांस्कृतिक मूल्यांचे रक्षण करायचे असो, आपण सर्वजण अशा प्रकारच्या प्रत्येक प्रयत्नांमध्ये जोडले गेले असल्याचे दिसून येते. याच मालिकेमध्ये माझा आपल्या सर्वांना एक आग्रह आहे. तुम्हाला माहिती आहेच अमृत महोत्सवामध्ये देशातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये 75 अमृत सरोवर बनविण्याचा संकल्प केला आहे. तुम्हीही सर्वजण आपल्या पिंडांमध्ये अमृत सरोवरांच्या निर्माणाचे अभियान चालवू शकता.
मित्रांनो,
आपल्या गुरूंनी आपल्याला आत्मसन्मान आणि मानवाच्या जीवनाचा गौरव करण्याची शिकवणूक दिली आहे. त्याचाही प्रभाव आपल्याला प्रत्येक शीखाच्या जीवनामध्ये दिसून येतो. स्वातंत्र्याच्या अमृतकाळामध्ये आज हाच देशाचाही संकल्प आहे. आपल्याला आत्मनिर्भर बनायचे आहे. गरीबातल्या गरीब व्यक्तीचे जीवन अधिक चांगले करायचे आहे. या सर्व प्रयत्नांमध्ये आपण सर्वांनी सक्रिय भागीदार बनावे आणि तुम्हा सर्वांच्या सक्रिय योगदानाची खूप आवश्यकताही आहे. मला पूर्ण विश्वास आहे, गुरूंच्या आशीर्वादाने आपण या संकल्पाला सिद्धीस नेण्यामध्ये यशस्वी होवू आणि लवकरच एका नवीन भारताचे लक्ष्य गाठू. याच संकल्पासह, आपल्या सर्वांना मी खूप-खूप धन्यवाद देतो. आपल्या सर्वांचे इथे येणे माझ्यासाठी -संगत म्हणजेच सत्संगापेक्षाही जास्त आहे. आणि म्हणूनच आपली कृपा कायम रहावी आणि मी नेहमी म्हणत असतो की, हे पंतप्रधानांचे निवास स्थान म्हणजे मोदी यांचे घर नाही. तर हे तुम्हा मंडळींचे अधिकार क्षेत्र आहे, हे तुमचे आहे. या भावनेने, आपलेपणाने वारंवार आपण भेटून भारत मातेच्या सेवेसाठी, आपल्या देशातल्या गरीबांसाठी, आपल्या देशातल्या प्रत्येक समाजाच्या उत्थानासाठी आपण आपले कार्य करीत राहू.
गुरूंचे आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम रहावेत.
याच एका भावनेने मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो.
वाहे गुरू का खालसा! वाहे गुरू की फतह!!