नारीशक्ती वंदन अधिनियमाला एकमताने पाठिंबा देण्याचे राज्यसभेच्या सदस्यांना केले आवाहन
"नवी संसद ही केवळ नवीन इमारत नाही तर ती नव्या प्रारंभाचे प्रतीक आहे" - पंतप्रधान
“राज्यसभेतील चर्चा नेहमीच अनेक महान व्यक्तींच्या योगदानाने समृद्ध झाली आहे. हे सन्माननीय सभागृह भारतीयांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी ऊर्जा देईल - पंतप्रधान
"सहकारी संघराज्यवादाने अनेक गंभीर बाबींसंदर्भात आपली ताकद सिद्ध केली आहे"
"जेव्हा आपण नवीन संसद भवनात स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करू, तेव्हा ती विकसित भारताची सुवर्ण शताब्दी असेल."
“ महिलांच्या अव्यक्त गुणांना संधी मिळायला हवी. त्यांच्या आयुष्यातील ‘जर आणि तर’ चा काळ संपला आहे”
“जेव्हा आपण जीवनातील सहजतेबद्दल बोलतो तेव्हा त्या सहजतेवर पहिला हक्क स्त्रियांचा असतो”

 

आदरणीय सभापती महोदय,

आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अविस्मरणीय आहे. ऐतिहासिकही आहे. याआधी मला लोकसभेत माझे मत मांडण्याची संधी मिळाली. आता तुम्ही मला आज राज्यसभेत माझे मत मांडण्याची संधी दिलीत यासाठी मी तुमचा ऋणी आहे.

आदरणीय सभापती महोदय,

आपल्या राज्यघटनेत राज्यसभेची संकल्पना संसदेचे उच्च सभागृह म्हणून मांडण्यात आली आहे. हे सभागृह राजकारणाच्या गदारोळातून उठून राष्ट्राला दिशा देण्याचे आणि गंभीर बौद्धिक चर्चेचे समर्थ केंद्र बनले पाहिजे, अशी राज्यघटनेच्या रचनाकारांची अपेक्षा होती. ही एखाद्या देशाची नैसर्गिक अपेक्षा असते आणि ती लोकशाहीच्या समृद्धीसाठी हातभारही लावू शकते.

आदरणीय सभापती महोदय,

या सभागृहात अनेक महान व्यक्ती झाल्या आहेत. मी त्या सर्वांची नावे घेऊ शकत नसलो तरी, लाल बहादूर शास्त्री जी, गोविंद वल्लभ पंत साहेब, लालकृष्ण अडवाणी जी, प्रणव मुखर्जी साहेब, अरुण जेटली जी आणि इतर असंख्य व्यक्तींनी या सदनाची शोभा वाढवून देशाला मार्गदर्शन केले आहे. असे असंख्य सदस्य देखील आहेत ज्यांनी एक प्रकारे स्वतंत्र प्रबुद्ध मंडळ म्हणून काम केले आहे, ते स्वतः अगदी एका संस्थेप्रमाणेच त्यांच्या शहाणपणाने आणि योगदानाने देशाचा फायदा करण्यास सक्षम आहेत. संसदेच्या इतिहासाच्या सुरुवातीच्या काळात, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जी यांनी राज्यसभेच्या महत्त्वावर भर देत सांगितले होते की संसद ही केवळ विधानमंडळ नसून एक विचारप्रणाली विकसित करणारी संस्था आहे. राज्यसभेकडून लोकांच्या अनेक उच्च आणि उदात्त अपेक्षा आहेत. त्यामुळे माननीय सदस्यांच्या सोबतीने महत्त्वाच्या विषयांवर गंभीर चर्चा करणे आणि चर्चा ऐकायला मिळणे खूप आनंददायी आहे. नवीन संसद भवन ही केवळ नवीन रचना नव्हे तर ते नव्या आरंभाचे प्रतीक आहे. आपण आपल्या वैयक्तिक जीवनात देखील याचा अनुभव घेतो की जेव्हा आपण एखाद्या नवीन गोष्टीशी जोडले जातो तेव्हा आपले मन नैसर्गिकरित्या त्याचा चांगल्या प्रकारे वापर करण्याचा, त्याच्या अनुकूल वातावरणात कार्य करण्याचा प्रयत्न करते. ‘अमृत काळाच्या’ प्रभात समयी या इमारतीचे बांधकाम आणि त्यात आपला प्रवेश, एक नवीन ऊर्जा प्रदर्शित करते, जी आपल्या देशाच्या 140 कोटी नागरिकांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करेल. ही उर्जा आपल्याला नवीन आशा आणि नवीन आत्मविश्वास देईल.

आदरणीय सभापती महोदय,

आपण निश्चित कालमर्यादेत आपली उद्दिष्टे साध्य केली पाहिजेत कारण मी आधी सांगितल्याप्रमाणे, देशाला यापुढे प्रतीक्षा करणे परवडणारे नाही. एक काळ असा होता की लोकांना वाटायचे की हे योग्य आहे; आपल्या पालकांनी अशा संकटांना तोंड दिले आणि आपल्यालाही ते करावे लागले असते. या सर्वातून आपल्याला नशीब कसे तरी तारेल असा विश्वास होता. आज समाजाची, विशेषतः तरुण पिढीची मानसिकता वेगळी आहे. त्यामुळे, सामान्य नागरिकांच्या आशा आणि आकांक्षांशी एकरूप होऊन नवीन दृष्टिकोन ठेवून आपण आपल्या कार्याची व्याप्ती वाढवली पाहिजे. आपण आपल्या विचारांच्या मर्यादा ओलांडल्या पाहिजेत आणि आपल्या क्षमता वाढवल्या पाहिजेत. जसजशी आपली क्षमता वाढत जाईल, तसतसे देशाच्या क्षमता वाढविण्यात आपले योगदानही वाढत राहील.

आदरणीय सभापती महोदय,

मला विश्वास आहे की या नवीन इमारतीमध्ये, वरच्या सभागृहात, आपण संसदीय शिष्टाचाराचे प्रतीक म्हणून काम करू शकतो, आपल्या देशाच्या विधिमंडळ संस्थांना, स्थानिक स्वराज्य संस्थांना आणि आपल्या आचरणातून आणि वर्तनातून संपूर्ण व्यवस्थेला प्रेरणा देऊ शकतो. माझा विश्वास आहे की या ठिकाणी कमालीची क्षमता आहे आणि देशाने त्याचा फायदा घेतला पाहिजे. त्याचा फायदा लोकप्रतिनिधींना झाला पाहिजे, मग ते ‘ग्रामप्रधान’ म्हणून निवडून आले असोत अथवा संसदेत निवडून आलेले असो. ही परंपरा कशी पुढे चालवायची याचा आपण विचार करायला हवा.

आदरणीय सभापती महोदय,

गेल्या नऊ वर्षांपासून मला तुमच्या सहकार्याने देशसेवा करण्याची संधी मिळाली आहे. या काळात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले, त्यातील काही निर्णय अनेक दशकांपासून प्रलंबित होते. यातील काही निर्णय अत्यंत आव्हानात्मक आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानले गेले. मात्र, या आव्हानांना न जुमानता त्या दिशेने पुढे जाण्याचे धाडस आम्ही दाखवले. आमच्याकडे राज्यसभेत आवश्यक संख्याबळ नव्हते, पण राज्यसभा पक्षपातळी ओलांडून राष्ट्रहिताचे निर्णय घेईल, असा विश्वास आम्हाला होता. आज मी समाधानाने सांगू शकतो की तुमचा व्यापक दृष्टिकोन, तुमची समज, तुमची राष्ट्राप्रती जबाबदारीची भावना आणि तुमच्या सहकार्यामुळे आम्हाला हे कठीण निर्णय घेता आले. या निर्णयांनी राज्यसभेची प्रतिष्ठा केवळ संख्याबळाने नव्हे तर बुद्धी सामर्थ्याने देखील वाढली आहे. यापेक्षा मोठे समाधान काय असू शकते? म्हणून, मी या सभागृहातील सर्व माननीय सदस्यांचे, वर्तमान आणि भूतकाळातील सदस्यांचे आभार मानतो.

आदरणीय सभापती महोदय,

लोकशाहीत कोण सत्तेवर येतो, कोण नाही आणि कधी सत्तेवर येतो ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. हे नैसर्गिक आणि अंतर्भूत असून लोकशाहीचे स्वरूप आणि चारित्र्य या दोन्हीत समाविष्ट आहे. मात्र, जेव्हा-जेव्हा राष्ट्राशी संबंधित प्रश्न निर्माण होतात, तेव्हा आपण सर्वांनी राजकारण त्यागून देशहिताला प्राधान्य देत एकत्र काम करण्याचा प्रयत्न केला आहे.

आदरणीय सभापती महोदय,

राज्यसभा ही एक प्रकारे राज्यांचे प्रतिनिधीत्व म्हणून काम करते. हा सहकारी संघराज्यवादाचा एक प्रकार आहे आणि आता आपण पाहतो की स्पर्धात्मक सहकारी संघराज्यवादावर अधिक भर दिला जात आहे. आपण अनेक समस्यांना सामोरे जात असतानाही देशाने अफाट सहकार्याच्या जोरावर प्रगती केल्याचे आपण पाहू शकतो. कोविड संकट लक्षणीय होते. जगालाही या संकटाचा सामना करावा लागला. मात्र, आपल्या संघराज्यवादाच्या बळावरच केंद्र आणि राज्य सरकारांना देशाला गंभीर संकटातून सोडवण्यासाठी एकत्र काम करण्याची संधी दिली. हे उदाहरण आपल्या सहकारी संघराज्याची ताकद दाखवते. आपल्या संघीय रचनेने केवळ संकटकाळातच नव्हे तर उत्सवाच्या काळातही अनेक आव्हानांचा सामना केला आहे, परंतु आपण आपली ताकद जगासमोर मांडली आहे, आणि जगाला प्रभावित देखील केले आहे. भारताची विविधता, त्यातील असंख्य राजकीय पक्ष, मीडिया हाऊस, भाषा आणि संस्कृती - या सर्व पैलूंनी जी 20 शिखर परिषद आणि विविध राज्यस्तरीय शिखर परिषदांसारख्या कार्यक्रमांद्वारे जगाला प्रभावित केले आहे. शिखर परिषद आयोजित करणारे दिल्ली हे शेवटचे शहर होते त्याआधी, देशभरातील 60 हून अधिक शहरांमध्ये 220 हून अधिक परिषदांचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते आणि त्याचा जगावर पडलेला प्रभाव, आमचे आदरातिथ्य आणि विचारमंथनातून जगाला दिशा देण्याची आपली क्षमता दर्शवते. हीच आपल्या संघराज्याची ताकद आहे आणि सहकारी संघराज्यामुळेच आज आपण प्रगती करत आहोत.

आदरणीय सभापती महोदय,

या नवीन सभागृहात, तसेच आपल्या नवीन संसदेच्या इमारतीत, आम्ही खरोखरच संघराज्यवादाचा घटक पाहू शकतो. जेव्हा ही वास्तू बांधली जात होती तेव्हा राज्यांना त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध घटकांचे योगदान यामध्ये देण्याची विनंती करण्यात आली होती. देशातील सर्व राज्यांचे कोणत्या ना कोणत्या प्रकारे येथे प्रतिनिधित्व आहे याची खात्री करणे महत्त्वाचे होते. कलेच्या विविध प्रकार आणि भिंतींना सजवणारी असंख्य चित्रे यांनी या वास्तूची भव्यता वाढवत असल्याचे आपण पाहू शकतो. राज्यांनी येथे प्रदर्शित करण्यासाठी त्यांच्या उत्कृष्ट कलाकृतींची निवड केली आहे. एक प्रकारे, येथे राज्यांचे प्रतिनिधित्व केले जाते आणि त्यांची विविधता दिसून येते, ज्यामुळे या वातावरणात संघराज्यवादाचे सार जोडले जात आहे.

आदरणीय सभापती महोदय,

तंत्रज्ञानाने आपल्या जीवनावर अभूतपूर्व वेगाने प्रभाव टाकला आहे. तंत्रज्ञानात जे बदल व्हायला 50 वर्षे लागायची ते बदल आता काही आठवड्यांत घडत आहेत. आधुनिकता अत्यावश्यक बनली आहे, आणि ती टिकवून ठेवण्यासाठी, आपण निरंतर आणि गतिमानपणे स्वत:ला प्रगत केले पाहिजे. तरच आपण आधुनिकतेशी एकरूप होऊन पावलागणिक प्रगती करू शकतो.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

तुम्ही संविधान सदन असा उल्लेख केलेल्या जुन्या इमारतीत आपण स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ मोठ्या थाटामाटात साजरा केला. आम्ही आपल्या 75 वर्षांच्या प्रवासाकडे मागे वळून पाहिलं आणि आम्ही नवीन दिशा ठरवण्यासाठी आणि नवीन संकल्प करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तथापि, मला पूर्ण विश्वास आहे की जेव्हा आपण नवीन संसद भवनात स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करू, तेव्हा तो सुवर्णमहोत्सव विकसित भारताचाच असेल. जुन्या इमारतीत आपण जगातील 5 वी अर्थव्यवस्था बनलो. मला विश्वास आहे की नवीन संसद भवनात आपण जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक असू. जुन्या संसद भवनात गरिबांच्या कल्याणासाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले, अनेक कामे पूर्ण झाली. नवीन संसद भवनात, प्रत्येकाला त्यांचा हक्काचा वाटा मिळेल याची खात्री करून आपण आता 100% समाधान प्राप्त करू.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

या नवीन सदनाच्या भिंतींसोबतच, आपल्याला तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. आता आयपॅड  वर सर्व काही आपल्या समोर असेल. मी सुचवू इच्छितो की, शक्य असल्यास, उद्या थोडा वेळ काढून अनेक माननीय सदस्यांनी या तंत्रज्ञानाशी परिचित व्हावे. त्यांना बसून स्क्रीन पाहणे सोयीचे होईल. मी आज लोकसभेत पाहिलं की काही सहकाऱ्यांना ही उपकरणे चालवण्यात अडचणी आल्या. त्यामुळे याबाबतीत सर्वांनी एकमेकांना मदत करणे ही आपली जबाबदारी आहे. उद्या या कामासाठी थोडा वेळ दिला तर फायदा होईल.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

हे डिजिटलायझेशनचे युग आहे. या सदनातही सुद्धा आपण या सर्व गोष्टींचे एक भाग बनणे गरजेचे आहे. सुरुवातीला, यास थोडा वेळ लागू शकतो, परंतु आता बर्‍याच गोष्टी वापरकर्त्यासाठी अनुकूल आहेत आणि त्या सहज स्वीकारल्या जाऊ शकतात. आता आपल्याला ते केलेच पाहिजे. ‘मेक इन इंडिया’ हे जागतिक स्तरावर गेम चेंजर ठरले आहे आणि त्याचा आपल्याला खूप फायदा झाला आहे. नवीन विचार, नवा उत्साह, नवीन उर्जा आणि नव्या जोमाने आपण पुढे जाऊ शकतो आणि महान गोष्टी साध्य करू शकतो, असे मी या आधीच सांगितले आहे.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

आज नवीन संसद भवन देशासाठी एका महत्त्वाच्या ऐतिहासिक निर्णयाचे साक्षीदार ठरले आहे. लोकसभेत एक विधेयक मांडण्यात आले असून तिथे त्यावर चर्चा झाल्यानंतर ते इथे देखील येईल. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने गेल्या अनेक वर्षांत अनेक महत्त्वाची पावले उचलली गेली आहेत. आज आपण एकत्रितपणे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलत आहोत. राहणीमान आणि जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. जेव्हा आपण राहणीमानाच्या सुलभतेबद्दल आणि जीवनाच्या दर्जाविषयी बोलतो, तेव्हा या प्रयत्नाच्या योग्य लाभार्थी आपल्या बहिणी, आपल्या महिला आहेत, कारण त्यांना खूप अडचणी सहन कराव्या लागतात. त्यामुळे त्यांना राष्ट्र उभारणीत सहभागी करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि ती आपली जबाबदारी देखील आहे. अनेक नवीन क्षेत्रे आहेत जिथे महिलांचे सामर्थ्य, महिलांचा सहभाग याची सतत खात्री केली जात आहे. महिला खाणकाम काम करू शकतात हा निर्णय आमच्या खासदारांमुळेच शक्य झाला. आपल्या मुलींमध्ये क्षमता आहे म्हणून आपण मुलींसाठी सर्व शाळांचे दरवाजे खुले केले आहेत. या क्षमतेला आता संधी मिळायला हवी. आता त्यांच्या आयुष्यातले किंतु परंतु चे युग संपले पाहिजे.

आपण जितक्या जास्त सुविधा पुरवू तितक्या आपल्या मुली आणि बहिणी अधिक क्षमता दाखवतील. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा केवळ सरकारी कार्यक्रम नसून तो समाजाचा एक भाग बनला आहे, त्यामुळे समाजात मुली आणि महिलांबद्दल आदराची भावना निर्माण झाली आहे. मुद्रा योजना असो की जन धन योजना, या उपक्रमांचा महिलांनी सक्रियपणे फायदा घेतला आहे. आर्थिक समावेशनाच्या बाबतीत भारत महिलांचा सक्रिय सहभाग पाहू इच्छित आहे. हे स्वतःच, मला वाटते, त्यांच्या कौटुंबिक जीवनातून त्यांची क्षमता प्रकट होते. आता हीच क्षमता राष्ट्रीय जीवनातही प्रकट होण्याची वेळ आली आहे. आपल्या माता-भगिनींच्या आरोग्याचा विचार करून आपण उज्ज्वला योजना सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी गॅस सिलिंडरसाठी अनेक वेळा खासदारांच्या घरी फेऱ्या माराव्या लागायच्या हे आपल्याला माहितीच आहे. मला ठाऊक आहे की गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलेंडर पोहोचवणे हा एक मोठा आर्थिक भार आहे, परंतु महिलांचे आयुष्य लक्षात घेता ते मी केले. तिहेरी तलाकचा मुद्दा प्रदीर्घ काळ प्रलंबित राहिला होता आणि हा मुद्दा राजकीय हितसंबंधांचा बळी ठरला होता. असे हे महत्त्वाचे पाऊल उचलणे केवळ आपल्या सर्व माननीय संसद सदस्यांच्या मदतीने शक्य होऊ शकले. महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे बनवण्याचे कामही आम्ही केले आहे. जी -20 चर्चेदरम्यान महिलांच्या नेतृत्वाखालील विकास हा विषय आघाडीवर होता आणि जगात असे अनेक देश आहेत ज्यांच्यासाठी महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचा विषय काहीसा नवीन अनुभव देणारा होता. जेव्हा या विषयावर प्रत्यक्ष चर्चा झाली तेव्हा त्यांची मते जुळली नाहीत. मात्र, जी 20 जाहीरनाम्यात भारताच्या माध्यमातून महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचा विषय आता जगभर पोहोचला आहे आणि ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

याच पार्श्‍वभूमीवर, आरक्षणाच्या माध्यमातून भगिनींचा थेट विधानसभा आणि संसदेच्या निवडणुकांमध्ये सहभाग सुनिश्चित करण्याबाबतची चर्चा बराच काळ सुरू होती. यापूर्वीही सर्वांनीच प्रयत्न केले आहेत. हे सर्व 1996 मध्ये सुरू झाले आणि अटलजींच्या काळात अनेक वेळा विधेयक आणली गेली. पण मतांचा आकडा कमी पडला आणि विधेयकाच्या विरोधात प्रतिकूल वातावरण निर्माण झाले, त्यामुळे हे फार महत्त्वाचे काम पार पाडणे आव्हानात्मक बनले. तथापि, आता आपण नवीन सभागृहात आलो आहोत, त्यातही नावीन्य जाणवत आहे आणि मला विश्वास आहे की आपल्या देशाच्या विकासाच्या प्रवासात कायद्याच्या माध्यमातून महिला शक्तीचा सहभाग निश्चित करण्याची वेळ आता आली आहे. आणि त्यामुळेच सरकारने घटनादुरुस्तीद्वारे ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ लागू करण्याचा विचार केला आहे. तो आज लोकसभेत मांडण्यात आला, उद्या लोकसभेत त्यावर चर्चा होईल, त्यानंतर राज्यसभेत त्यावर विचार होईल. आज, मी आज तुम्हा सर्वांना अत्यंत प्रामाणिकपणे विनंती करतो की हा एक असा विषय आहे जो आपण एकमताने पुढे नेल्यास, त्यामधून एकजुटीची शक्ती दिसून येईल. जेव्हा कधी हे विधेयक आपल्या सर्वांसमोर येईल, तेव्हा मी राज्यसभेतील माझ्या सर्व आदरणीय सहकाऱ्यांना आवाहन करतो की, येणाऱ्या काळात संधी आल्यावर त्यावर सहमतीने विचार करावा. एवढे शब्द बोलून मी माझ्या भाषणाला विराम देतो.

खूप खूप धन्यवाद.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII

Media Coverage

PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi visits the Indian Arrival Monument
November 21, 2024

Prime Minister visited the Indian Arrival monument at Monument Gardens in Georgetown today. He was accompanied by PM of Guyana Brig (Retd) Mark Phillips. An ensemble of Tassa Drums welcomed Prime Minister as he paid floral tribute at the Arrival Monument. Paying homage at the monument, Prime Minister recalled the struggle and sacrifices of Indian diaspora and their pivotal contribution to preserving and promoting Indian culture and tradition in Guyana. He planted a Bel Patra sapling at the monument.

The monument is a replica of the first ship which arrived in Guyana in 1838 bringing indentured migrants from India. It was gifted by India to the people of Guyana in 1991.