अगलेगा बेटावरील सहा सामुदायिक विकास प्रकल्पांचे केले उद्‌घाटन
“मॉरिशस हा भारताचा अनमोल मित्र आहे.आज उद्‌घाटन झालेले प्रकल्प या दोन देशांमधील भागीदारीला आणखी चालना देतील”
“मॉरिशस हा आमच्या शेजारी प्रथम धोरणातील महत्त्वाचा भागीदार आहे”
“भारताने नेहमीच मित्र देश मॉरिशसला सर्वप्रथम प्रतिसाद दिला आहे”
“भारत आणि मॉरिशस हे देश सागरी सुरक्षेच्या क्षेत्रातील नैसर्गिक भागीदार आहेत”
“मॉरिशस हा आमच्या जन औषधी उपक्रमात सहभागी होणारा पहिला देश असेल. याद्वारे मॉरिशसच्या जनतेला भारतात निर्मित दर्जेदार जेनेरिक औषधांचा लाभ घेता येईल”

महामहीम पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ, मॉरिशसच्या मंत्रिमंडळाचे उपस्थित सदस्य, भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. जयशंकर, अगालेगा येथील रहिवासी आणि आजच्या या कार्यक्रमाशी संबंधित सर्व सहकारी,

नमस्कार!

गेल्या ६ महिन्यांतील पंतप्रधान जगन्नाथ आणि माझी ही पाचवी भेट आहे. भारत आणि मॉरिशस यांच्यातील व्हायब्रंट, मजबूत आणि अद्वितीय भागीदारीचा हा पुरावा आहे. मॉरिशस हा आमच्या शेजारी प्रथम धोरणाचा महत्त्वाचा भागीदार आहे. आमच्या"सागर" या दृष्टीकोनांतर्गत मॉरिशस विशेष भागीदार आहे. ग्लोबल साऊथचे सदस्य या नात्याने आमची समान प्राधान्ये आहेत. गेल्या 10 वर्षांत आमच्या संबंधांमध्ये अभूतपूर्व गती आली आहे. आम्ही परस्पर सहकार्याने नवीन उंची गाठली आहे. सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंधांना नवा आकार दिला गेला आहे. भाषा आणि संस्कृतीच्या सोनेरी धाग्यांनी आपले लोक आधीच जोडलेले आहेत. काही दिवसांपूर्वी, आम्ही यूपीआय आणि  रुपे कार्ड सारख्या उपक्रमांद्वारे आधुनिक संपर्कव्यवस्था प्रदान केली आहे.

मित्रांनो,

विकास भागीदारी हा आमच्या धोरणात्मक संबंधांचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. आमची विकास भागीदारी मॉरिशसच्या प्राधान्यक्रमांवर आधारित आहे. ईईझेड सुरक्षेशी संबंधित मॉरिशसच्या गरजा असोत किंवा आरोग्य सुरक्षा, भारताने नेहमीच मॉरिशसच्या गरजांचा आदर केला आहे. कोविड साथीचे संकट असो किंवा तेल गळती असो, भारत नेहमीच आपल्या मित्र मॉरिशसला प्रथम प्रतिसाद देणारा राहिला आहे. मॉरिशसच्या सामान्य लोकांच्या जीवनात अर्थपूर्ण बदल घडवून आणणे हा आमच्या प्रयत्नांचा मूळ उद्देश आहे. गेल्या 10 वर्षांत, मॉरिशसच्या लोकांना अंदाजे एक हजार दशलक्ष डॉलर्सची क्रेडिट लाइन आणि $400 दशलक्ष मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. मला मॉरिशसमधील मेट्रो लाईनच्या विकासापासून ते सामुदायिक विकास प्रकल्प, सामाजिक गृहनिर्माण, ईएनटी रुग्णालये, नागरी सेवा महाविद्यालये आणि क्रीडा संकुलांपर्यंतच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याचा बहुमान मिळाला आहे.

 

मित्रांनो,

आमच्या विकास भागीदारीसाठी आजचा दिवस विशेष महत्त्वाचा आहे. अगालेगाच्या जनतेच्या विकासासाठी मी 2015 मध्ये जी वचनबद्धता व्यक्त केली होती ती आज आपण पूर्ण होताना पाहत आहोत याचा मला खूप आनंद होत आहे. आजकाल भारतात याला "मोदींची गॅरंटी" म्हटले जात आहे. मला विश्वास आहे की आम्ही संयुक्तपणे ज्या सुविधांचे उद्घाटन केले आहे त्या सुविधांमुळे राहणीमान सुलभ होईल. मॉरिशसच्या उत्तर आणि दक्षिण भागात संपर्क वाढेल. मुख्य भूभागाकडून प्रशासकीय सहकार्य सोपे होईल. सामाजिक व आर्थिक विकासाला चालना मिळेल. वैद्यकीय उपचारांसाठी ‘आणीबाणी’तून बाहेर काढणे आणि शाळकरी मुलांचा शिक्षणासाठी प्रवास करणे यात सुलभता येईल.

 

मित्रांनो,

हिंदी महासागर क्षेत्रात अनेक पारंपरिक आणि अपारंपरिक आव्हाने उभी राहत आहेत. या सर्व आव्हानांचा आपल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. त्यांना सामोरे जाण्यासाठी भारत आणि मॉरिशस हे सागरी सुरक्षेच्या क्षेत्रात नैसर्गिक भागीदार आहेत. हिंदी महासागर क्षेत्रात सुरक्षा, समृद्धी आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी आम्ही सक्रियपणे काम करत आहोत. अनन्य आर्थिक क्षेत्राचे निरीक्षण, संयुक्त गस्त, जलविज्ञान आणि मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण यासारख्या सर्व क्षेत्रात आम्ही एकत्र सहकार्य करत आहोत. आज अगालेगा येथील हवाई पट्टी आणि जेट्टीचे उद्घाटन आमचे सहकार्य आणखी वाढवेल. यामुळे मॉरिशसमधील ब्लू इकॉनॉमी देखील मजबूत होईल.

 

मित्रांनो,

मॉरिशसमध्ये जनऔषधी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी पंतप्रधान जगन्नाथजींचे कौतुक करतो. आमच्या जनऔषधी उपक्रमात सामील होणारा मॉरिशस हा पहिला देश असेल. यामुळे मॉरिशसच्या लोकांना भारतात बनवलेल्या चांगल्या दर्जाच्या जेनेरिक औषधांचा लाभ मिळणार आहे. महामहीम, पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ जी, तुमच्या दूरदृष्टी आणि गतिमान नेतृत्वासाठी मी तुमचे अभिनंदन करतो. मला विश्वास आहे की आगामी काळात आपण एकत्र येऊन भारत आणि मॉरिशस संबंधांना नवीन उंचीवर नेऊ. पुन्हा एकदा मी तुमचे मनापासून आभार मानतो!

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII

Media Coverage

PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 नोव्हेंबर 2024
November 21, 2024

PM Modi's International Accolades: A Reflection of India's Growing Influence on the World Stage