जॉय हॉरि बोल ! जॉय हॉरि बोल ! श्री श्री हॉरिचांद ठाकुरेर, दूशो-एगारो तमो, अबिरभाब तिथि उपो-लौक्खे, शॉकोल पून्नार्थी, शाधु, गोशाईं, पागोल, दौलोपॉती, ओ मतुआ माईदेर, जानाई आनतोरीक सुभेक्षा अभिनंदन ओ नॉमोस्कार !
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि अखिल भारतीय मतुआ महासंघाचे संघाधिपति श्री शांतनु ठाकुर जी, श्री मंजुल कृष्ण ठाकुर जी, श्रीमति छबिरानी ठाकुर जी, श्री सुब्रता ठाकुर जी, श्री रविंद्रनाथ विश्वास जी, अन्य मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,
हे माझे भाग्य आहे की गेल्या वर्षी ओराकांदीमध्ये श्री श्री गुरुचांद ठाकुर जी आणि महान मतुआ परंपरेला श्रद्धापूर्वक नमस्कार करण्याचा योग आला होता. आज ठाकुरबाडीसारख्या महातीर्थावर आपणा सर्व सहकाऱ्याशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संवादाचा योग आला आहे. तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आला आहे. मी जेव्हा ओराकांडीला गेलो होतो तेव्हा अगत्यपूर्वक माझे स्वागत झाले. . भरपूर आशीर्वाद मिळाले. आणि ठाकूरबाडीने तर नेहमीच मला आपलेपणा दिला आहे, खूप स्नेह दिला आहे.
मित्रहो,
हा मतुआ धर्ममेळा मतुआ परंपरेला वंदन करण्याची संधी आहे. हा मेळा म्हणजे अश्या मूल्यांप्रति आस्था व्यक्त करण्याचा क्षण आहे ज्यांचा पाया श्री श्री हरीचांद ठाकुरजींनी रचला होता, त्याला गुरुचांद ठाकूर जी आणि बोरो माँ यांनी सशक्त केले, आणि आज शांतनुजीच्या सहकार्याने ही परंपरा आणखी समृद्ध होत आहे. एकजूट, भारतीयत्व, आपल्या आस्थेसाठी समर्पणाची भावना कायम राखत आधुनिकतेचा स्वीकार ही शिकवण आपल्याला मतुआ परंपरेतून मिळाली आहे. आज जेव्हा स्वार्थासाठी रक्तपात होताना दिसत आहे, जेव्हा समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न होत असतात, जेव्हा भाषा आणि प्रदेश यांच्या आधारे भेदाभेद करण्याची वृत्ती दिसून येते तेव्हा श्री श्री हरीचंद ठाकूरजी यांचे जीवन, त्यांचे दर्शन अधिकच महत्वाचे ठरते. म्हणून हा मेळा एक भारत श्रेष्ठ भारत या मूल्यांनाही सशक्त करणारा आहे.
बंधू-भगिनींनो
आपण नेहमीच म्हणतो की आपली संस्कृती आपली परंपरा महान आहे. महान यासाठी आहे कारण यामध्ये सातत्य आहे, ही प्रवाही आहे, तीमध्ये स्वतःला सशक्त करण्याची एक नैसर्गिक वृत्ती आहे. ही नदीसारखी आहे जी स्वतःच आपला रस्ता तयार करत जाते आणि रस्त्यात जे व्यत्यय येतात त्यानुसार स्वतःला बदलत जाते. या महानतेचे श्रेय हरीचंद ठाकूरजी यांच्यासारख्या सुधारकांना आहे. ज्यांनी समाज सुधारणेचा प्रवाह कधीही अडवला नाही. श्री श्री हरिचांद ठाकूर यांची शिकवण ज्यांना कळते, जे ‘हॉरी-लीला-अमृतो'चा पाठ करतात ते स्वतःहून म्हणतात की त्यांनी शतकांनतरचे जग आधीच पाहिले होते. नाहीतर आज जग ज्या लिंग व्यवस्थेबद्दल बोलतं त्याला अठराव्या शतकातच हरीचांद ठाकूरजींनी आपले ध्येय बनवले होते. त्यांनी शिक्षणापासून कामापर्यंत मुलींच्या अधिकारांबाबत आवाज उठवला. सामाजिक चिंतनात माता-भगिनी-लेकी यांच्या प्रतिष्ठेला पुढे आणण्याचा प्रयत्न केला. त्या काळात त्यांनी महिला न्यायालय आणि मुलींसाठी शाळा सुरु केल्या. त्यावरुन त्यांची दूरदृष्टी , त्यांचे ध्येय दिसून येते.
बंधू भगिनींनो,
आज भारत जेव्हा बेटी बचाव बेटी पढाव यासारख्या मोहिमेत यश मिळवतो , जेव्हा माता-भगिनी-मुलींना स्वच्छता आरोग्य आणि स्वाभिमान यांचा सन्मान देतो, जेव्हा शाळा-महाविद्यालयांमध्ये मुली आपले सामर्थ्य दाखवतात जेव्हा समाजाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आमच्या माता भगिनी मुलीं मुलांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून राष्ट्रनिर्माणात योगदान देताना दिसून येतात तेव्हा वाटते की आपण खऱ्या अर्थाने श्री श्री हरीचांद ठाकूरजी यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करत आहोत. जेव्हा सरकार, सबका साथ सबका विकास विकास सबका विश्वास या आधारावर सरकारी योजना माणसामाणसांपर्यंत पोचवते, जेव्हा सबका प्रयास राष्ट्राच्या विकासाची शक्ती बनते तेव्हा आपण सर्वसमावेशक समाज- निर्मितीच्या दिशेने पुढे जातो.
मित्रहो,
भारताच्या प्रगतीत मतुआ समाजाचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळेच केंद्र सरकार हरतऱ्हेने प्रयत्न करते की या समाजाशी संबंधित प्रत्येक कुटुंबाचे जीवन सुखकर होवो. केंद्र सरकारच्या प्रत्येक जनकल्याणकारक योजना वेगाने मतुआ कुटुंबांपर्यंत पोचाव्यात, म्हणून राज्य सरकारला प्रोत्साहन दिले जात आहे. पक्की घरे असोत, नळाद्वारे पाणीपुरवठा असो, मोफत धान्य असो, साठ वर्षानंतर पेन्शन असो, लाखो रुपयांचा विमा असो अशा प्रत्येक योजनेच्या कक्षेत शतप्रतिशत मतुआ कुटुंबे यावीत यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
मित्रहो
श्री श्री हरीचांद ठाकूर जी यांनी एक अजून संदेश दिला आहे जो स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात भारतातील प्रत्येक भारतीयासाठी एक प्रेरणास्रोत आहे. त्यांनी ईश्वरी प्रेमाबरोबरच आमच्या कर्तव्याबद्दल सुद्धा आम्हाला शिकवण दिली. कुटुंबा समाज यांच्याप्रती आपले दायित्व कशाप्रकारे निभवावे यावर त्यांनी विशेष भर दिला. कर्तव्याच्या या भावनेलाच आपल्याला राष्ट्राच्या विकासाचा आधार बनवायचे आहे. आपले संविधान आपल्याला भरपूर अधिकार देते त्या अधिकारांचे संरक्षण आपण तेव्हाच करू शकू जेव्हा आपण आपले कर्तव्य इमानदारीने निभावू. म्हणूनच आज मी मतुआ समाजाच्या सर्व साथीदारांना काही आग्रहाने सांगू इच्छितो. व्यवस्थेतून भ्रष्टाचार दूर करण्यासाठी समाजाच्या पातळीवर आपल्या सर्वांनाच जागरूकता वाढवली पाहिजे. जर कुठेही कोणाला अन्याय होत असेल तर तिथे जरूर आवाज उठवा. हे आपले समाजाच्या आणि राष्ट्राच्या बाबतीतील कर्तव्यच आहे . राजकीय घडामोडीत भाग घेणे हा आपला अधिकार आहे पण राजकीय विरोधामुळे जर कोणाला हिंसा, धमकी यांनी घाबरवून कोणी रोखत असेल तर ते दुसऱ्यांचे अधिकार हिसकावणे आहे. म्हणूनच आमचे हे कर्तव्य आहे की समाजात कुठे हिंसा, अराजकता यांची मानसिकता असेल तर त्याचा विरोध केला जावा. स्वच्छता आणि आरोग्य या बाबतीतही आपली कर्तव्ये आपल्याला नेहमी लक्षात ठेवली पाहिजेत. आपल्याला आपल्या घरापासून आपल्या गल्लीपासून अस्वच्छता दूर ठेवायची आहे. वोकल फोर लोकल यालासुद्धा आपल्या जीवनाचा भाग बनवायला हवा. पश्चिम बंगालच्या, भारताच्या श्रमिकांचा, शेतकऱ्यांचा, मजुरांचा घाम ज्या सामानाला लागतो ते नक्की खरेदी करा आणि सर्वात मोठे कर्तव्य आहे ते म्हणजे राष्ट्र प्रथम ही नीती. राष्ट्राहून मोठे काही नाही. आपले प्रत्येक काम राष्ट्राला समोर ठेवूनच झाले पाहिजे. कोणतेही पाऊल उचलण्याआधी यामुळे राष्ट्राचे भले व्हावे हा विचार करा.
मित्रहो मतुआ समाज आपल्या कर्तव्यांच्या बाबतीत नेहमीच जागरूक असतो . माझी खात्री आहे की स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात एक नव्या भारताच्या निर्मितीत आपला सहभाग असाच मिळत राहील . आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.