Quoteगेल्या 2 महिन्यात सहाव्या वंदे भारत एक्सप्रेसला दाखवला झेंडा
Quote“राजस्थानला आज पहिली वंदे भारत एक्सप्रेस मिळाल्यामुळे कनेक्टिव्हिटी लक्षणीयरीत्या वाढेल आणि पर्यटनाला चालना मिळेल”
Quote“वंदे भारत एक्सस्प्रेस ‘भारत प्रथम नेहमीच प्रथम’ या भावनेची जाणीव करून देणारी ”
Quote"वंदे भारत रेल्वेगाडी ही विकास, आधुनिकता, स्थैर्य आणि स्वावलंबन यांचा समानार्थी शब्द झाली आहे"
Quote‘ रेल्वेसारख्या नागरिकांच्या महत्त्वाच्या आणि मूलभूत गरजेचे दुर्दैवाने राजकारणाच्या आखाड्यात रूपांतर झाले’
Quote"राजस्थानसाठी रेल्वे अर्थसंकल्पीय तरतूद 2014 पासून 14 वेळा वाढवण्यात आली असून 2014 मधील 700 कोटींवरून यावर्षी ती 9500 कोटींहून अधिक"
Quote"भारत गौरव परिपथ रेल्वेगाड्या एक भारत -श्रेष्ठ भारतची भावना निरंतर दृढ करत आहेत"
Quote“ रेल्वेसारख्या कनेक्टिव्हिटीच्या पायाभूत सुविधा जेव्हा बळकट असतात, तेव्हा देश बलशाली होऊन त्याचा देशातील सामान्य नागरिकाला,गरीब आणि मध्यमवर्गीयांना फायदा होतो

नमस्कार.

राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्राजी, राजस्थानचे मुख्यमंत्री माझे मित्र अशोक गेहलोतजी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी, राजस्थान सरकारचे मंत्री, विरोधी पक्षातील विधानसभा आणि विधानपरिषदेतील नेते व मंचावर उपस्थित सर्व खासदार, आमदार, इतर मान्यवर आणि राजस्थानातील माझ्या प्रिय बंधू भगिनींनो,

भारत मातेला वंदन करणाऱ्या राजस्थानच्या धरणीला पहिली वंदे भारत ट्रेन मिळते आहे. दिल्ली कॅन्टोन्मेंट ते अजमेर वंदे भारत एक्सप्रेसमुळे जयपूर ते दिल्ली हा प्रवास अधिक सोपा होईल. राजस्थानच्या पर्यटन उद्योगाला खूप मदत होईल.‌ तीर्थराज पुष्कर् असो, नाहीतर अजमेर शरीफ, महत्त्वपूर्ण श्रद्धास्थळी पोहोचणे आता श्रद्धाळूंना सहजपणे जमू शकेल.

बंधू-भगिनींनो

गेल्या दोन महिन्यातील ही सहावी वंदे भारत एक्सप्रेस आहे, ज्याला हिरवा झेंडा दाखवण्याचे सौभाग्य मला मिळाले आहे. मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस, मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस, राणी कमलापती-हजरत निजामुद्दीन वंदे भारती एक्सप्रेस, सिकंदराबाद-तिरुपती बंदर एक्सप्रेस, चेन्नई-कोइंबतूर एक्सप्रेस आणि आता जयपूर ते दिल्लीमध्ये वंदे भारत एक्सप्रेस आज सुरू होत आहे. जेव्हापासून या आधुनिक रेल्वे गाड्या सुरू झाल्या आहेत, तेव्हापासून जवळपास 60 लाख लोकांनी या गाड्यांमधून प्रवास केला आहे. वेगवान वंदे भारतची सर्वात वैशिष्ट्यपूर्ण बाब ही आहे की, ही गाडी लोकांचा वेळ वाचवते आणि एका अभ्यासातून कळते की, केवळ वंदे भारत मधून केलेल्या प्रवासामुळे लोकांचे प्रत्येक प्रवासात खर्च होणारे जवळपास अडीच हजार तास वाचतात. प्रवासात वाचणारे हे अडीच हजार तास लोकांना इतर कामांसाठी उपलब्ध होत आहेत. बनावटीतील कौशल्य ते सुरक्षिततेच्या हमीसह, भरपूर वेग ते आकर्षक डिझाईनपर्यंत वंदे भारत म्हणजे सर्व वैशिष्ट्यांनी संपन्न आहे. ही सर्व वैशिष्ट्ये बघूनच आज देशभरात वंदे भारतचे गान गायले जात आहे. एक प्रकारे वंदे भारतने कितीतरी गोष्टींची सुरुवात नव्याने केली आहे. वंदे भारत पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन आहे, भारतात घडवली गेली आहे, वंदे भारत ही अशी पहिली रेल्वेगाडी आहे जी एवढी कॉम्पॅक्ट आणि एफिशियंट आहे, वंदे भारत पहिली ट्रेन आहे जी स्वदेशी सेफ्टी सिस्टीम कवचाला अनुकूल आहे. वंदे भारत भारतीय रेल्वेच्या इतिहासातील अशी पहिली रेल्वेगाडी आहे, जिने अतिरिक्त इंजिनाशिवाय सह्याद्री घाटातील उंच चढण पूर्ण केली आहे. वंदे भारत एक्सप्रेस भारताची पहिली, 'अगदी पहिली' ही भावना समृद्ध करते. वंदे भारत एक्सप्रेस आज विकास, आधुनिकता, स्थैर्य आणि आत्मनिर्भरतेचा पर्याय बनली आहे, याचा मला आनंद वाटतो. आज वंदे भारत मधून प्रवास उद्या आपल्याला विकसित भारताच्या प्रवासापर्यंत घेऊन जाणार आहे. या राजस्थानच्या लोकांचे वंदे भारत ट्रेनसाठी मी खूप खूप अभिनंदन करतो.

मित्रहो,

आपल्या देशाचं हे दुर्भाग्य आहे की रेल्वे सारखी महत्त्वपूर्ण व्यवस्था, जी सामान्य माणसाच्या जीवनाचा मोठा भाग आहे त्यालाही राजकारणाचा आखाडा करून सोडले आहे. स्वातंत्र्यानंतर भारताला एक मोठे रेल्वे जाळे मिळाले होते, पण रेल्वेच्या आधुनिकीकरणावर राजकारणाचा स्वार्थ स्वार झाला. रेल्वेमंत्री कोण होणार, कोण नाही हे राजकारणांचा स्वार्थ बघून तेव्हा ठरवले जात असे. राजकारणाचा स्वार्थच हेही ठरवत असे की, कोणती ट्रेन कोणत्या स्टेशनवरुन जाईल. राजकारण्यांच्या स्वार्थामुळेच अर्थसंकल्पात अशा रेल्वे गाड्यांची घोषणा केली गेली, ज्या प्रत्यक्ष कधी चालल्या नाहीत. रेल्वेतील भरतीसुद्धा राजकारणातून होत होती ही अवस्था होती. मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत होता. गरीब लोकांच्या जमिनी हिसकावून त्यांना रेल्वेत नोकरीचे अमिष दाखवले गेले होते, अशी परिस्थिती होती. देशात आत्ता असलेल्या हजारो मानवरहित क्रॉसिंग सुद्धा आहेत. रेल्वेतील सुरक्षा, रेल्वेतील स्वच्छता, रेल्वे फलाटांची स्वच्छता सगळं काही दुर्लक्षित केले गेले होते. 2014 नंतर या सर्व परिस्थितीमध्ये बदल येऊ लागला जेव्हा देशातील लोकांनी स्थिर सरकार आणले, जेव्हा देशातील लोकांनी पूर्ण बहुमतातले सरकार आणले, जेव्हा सरकारवर राजकारणी सौदेबाजीचा असलेला दबाव दूर झाला; तेव्हा रेल्वेने सुस्कारा सोडला आणि नवीन उंचीवर जाण्यासाठी ती धावू लागली. आज प्रत्येक भारतवासी भारतीय रेल्वेचा कायाकल्प होताना बघून अभिमानाने फुललेला आहे.

बंधू भगिनींनो,

राजस्थानच्या जनतेने नेहमीच आम्हाला सर्वांना भरपूर आशीर्वाद दिला आहे. शूरवीरांच्या या धरतीला आज आमचे सरकार नवीन शक्यता आणि नव्या संधींची भूमी बनवत आहे. राजस्थान देशातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक आहे. राजस्थानला येणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचणे खूप आवश्यक आहे, तसेच त्यांना जास्तीत जास्त सुविधा मिळणेही आवश्यक आहे. यात कनेक्टिव्हिटी सर्वात मोठी भूमिका बजावते राजस्थानच्या कनेक्टिव्हिटी बाबतीत जी कामे गेल्या वर्षात केंद्र सरकारने केली आहेत, ती बघता हे काम अभूतपूर्व आहे याचा स्वीकार केला जायला हवा. फेब्रुवारीतच मला दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाच्या काही भागाच्या  लोकार्पणासाठी दौसाला येण्याची संधी मिळाली होती. या द्रुतगती मार्गाने दौसाबरोबरच अलवर, भरतपुर, सवाई माधोपुर, टोंक, बूंदी आणि कोटा जिल्ह्यातील लोकांना खूप उपयोग होईल. केंद्र सरकार राजस्थानच्या सीमावर्ती क्षेत्रात जवळपास चौदाशे किलोमीटर रस्त्यांवरही काम करत आहे. आता राजस्थानात साधारणपणे एक हजार किलोमीटरचे रस्ते बांधण्याचा प्रस्ताव आहे.

मित्रांनो,

आमचे सरकार रस्त्यांच्या बरोबरीने राजस्थानमध्ये रेल्वे कनेक्टिव्हिटीला सर्वोच्च प्राधान्य देत आहे. तारंगाहिल येथून अंबाजी मार्गे अबू रोडपर्यंत नवीन रेल्वे मार्गिकेच्या निर्मितीचेही काम सुरू झालेले आहे. या मार्गिकेची मागणी शंभर वर्षांपेक्षाही अधिक काळापासून होत आहे जी, आता भाजपा सरकारने पूर्ण केली आहे.

उदयपूर ते अहमदाबाद यादरम्यानच्या रेल्वेमार्गीकेला ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करण्याचे कामही आपण पूर्ण केलेले आहे. यामुळे मेवाडचा भाग गुजरात बरोबर देशाच्या अन्य भागांशी मोठ्या मार्गिकेशी जोडला गेला आहे. मागच्या नऊ वर्षांमध्ये राजस्थान मधल्या जवळजवळ 75 टक्के रेल्वे मार्गिकेचे विद्युतीकरण पूर्ण झालेले आहे.

वर्ष 2014च्या आधीच्या काळाच्या तुलनेत राजस्थानच्या रेल्वे अर्थसंकल्पात, आत्ताच आमच्या अश्विनी जी यांनी विस्ताराने सांगितले की, यात 14 पटीपेक्षा अधिक पटीने वाढ केली गेलेली आहे. वर्ष 2014 पूर्वी जे मिळत होतं आणि आज जे मिळत आहे त्यात 14 पटीने वाढ. वर्ष 2014च्या आधी राजस्थानसाठीचा सरासरी रेल्वे अर्थसंकल्प हा सुमारे 700 कोटी रुपयांपर्यंतचा असायचा तोच यावर्षी साडेनऊ हजार कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे.

यादरम्यान रेल्वे मार्गिकांची संख्या दुप्पट करण्याचा वेग हा देखील दुपटीपेक्षाही अधिक आहे. रेल्वे क्षेत्रामध्ये गेज बदलांमध्ये आणि दुपटीकरणांमध्ये जी कामे मागच्या काही वर्षांमध्ये झालेली आहेत, त्याचा मोठा लाभ राजस्थानच्या मागास क्षेत्रांनाच झालेला आहे. डुंगरपुर, उदयपूर, चित्तौडगढ़, पाली आणि सिरोही जिल्ह्यांमध्ये रेल्वे सुविधांचा मोठा विस्तार झालेला आहे. रेल्वे मार्गिकांबरोबरच राजस्थानमध्ये रेल्वे स्थानकांचा सुद्धा कायापालट केला जात आहे. राजस्थानमधल्या डझनवार रेल्वे स्थानकांचा अमृत भारत स्थानक योजनेच्या माध्यमातून विकास केला जात आहे.

मित्रांनो,

पर्यटकांना देण्यात येणाऱ्या सवलती लक्षात घेता, सरकार वेगवेगळ्या, परिक्रमा (सर्किट) रेल्वे गाड्या सुद्धा सुरू करत आहे. ‘भारत गौरव परिक्रमा’ या रेल्वे गाडीने आतापर्यंत 70 पेक्षा अधिक फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. या रेल्वे गाड्यांमधून 15000 पेक्षा जास्त भाविकांनी प्रवास केलेला आहे. अयोध्या - काशी असो किंवा दक्षिणेकडील तीर्थक्षेत्रांचे दर्शन, द्वारकाजी यांचे दर्शन असेल, शीख समाजाच्या गुरु महात्म्यांचे तीर्थक्षेत्र असतील, अशा अनेक ठिकाणांसाठी भारत गौरव परिक्रमा रेल्वे गाड्या आज चालवल्या जात आहेत. आम्ही सदैव समाज माध्यमांवर पाहत असतो की, या रेल्वे गाड्यांना भाविकांचा केवढा मोठा प्रतिसाद मिळत आहे, या रेल्वे गाड्यांचे भाविकांकडून केवढे मोठे कौतुक होत आहे. या रेल्वे गाड्या 'एक भारत श्रेष्ठ भारत' ची भावना सातत्याने वृद्धिंगत करत आहे.

मित्रांनो,

भारतीय रेल्वेने मागच्या काही वर्षांपासून आणखी एक प्रयत्न केलेला आहे, ज्या माध्यमातून राजस्थान मधल्या स्थानिक उत्पादनांना सुद्धा संपूर्ण देशात पोहोचवण्यासाठी मदत होत आहे. हे आहे ‘एक स्थानक एक उत्पादन अभियान’ (वन स्टेशन वन प्रॉडक्ट अभियान). भारतीय रेल्वेने राजस्थानमध्ये जवळजवळ 70 असे (वन स्टेशन वन प्रॉडक्ट) ‘एक स्थानक एक उत्पादन’ स्टॉल्स सुरू केलेले आहेत. या स्टॉलच्या माध्यमातून जयपुरी चटया, सांगानेरी ब्लॉक, नक्षीकाम केलेल्या चादरी, गुलाब फुलांपासून बनवलेली उत्पादने, आणि इतरही काही हस्तशिल्प यांची जोमाने विक्री होत आहे. याचाच अर्थ राजस्थानमधले लहान शेतकरी, कारागीर, हस्तशिल्प कारागीर यांना आता बाजारापर्यंत पोहोचण्याकरीता हे एक नवीन व्यासपीठ उपलब्ध झालेले आहे. हा विकासामध्ये सर्वांची भागीदारी अर्थात सर्वांचा विकास यासाठीचा प्रयत्न आहे.

जेव्हा रेल्वे सारख्या कनेक्टिव्हिटीचा, यासारख्या पायाभूत सुविधा सक्षम होत असतात तेव्हा देश सुद्धा सक्षम होत असतो. यामुळे देशातल्या सामान्य नागरिकांना लाभ मिळत असतो, देशातल्या गरीब आणि मध्यम वर्गालाही लाभ मिळत असतो. मला विश्वास आहे की, ही आधुनिक वंदे भारत रेल्वे गाडी राजस्थानच्या विकासाला गती देण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल आणि मला गहलोतजी यांचे विशेष रूपाने आभार मानायचे आहेत, की या दिवसात ते राजकीय कुरघोडीच्या संकटांमधून जात आहेत, असे असतानाही ते विकासाच्या या कार्यात वेळात वेळ काढून उपस्थित राहिले; या रेल्वेच्या कार्यक्रमात सहभागी झाले. याप्रसंगी मी त्यांचे स्वागत करत आहे आणि अभिनंदनही करत आहे आणि मी गहलोतजीना सांगू इच्छितो की, गहलोतजी, आपल्या तर दोन हातामध्ये दोन लाडू आहेत, आपले रेल्वेमंत्री हे राजस्थानचेच आहेत आणि रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष हे सुद्धा राजस्थानचेच आहेत, याचाच अर्थ आपल्या दोन हातांमध्ये दोन लाडू आहेत; आणि दुसरे एक काम आहे जे स्वातंत्र्यानंतर लगेचच व्हायला हवे होते, परंतु आतापर्यंत ते होऊ शकले नाही. पण आपला माझ्यावरती एवढा विश्वास आहे की, आज ती कामेसुद्धा तुम्ही माझ्यापुढे मांडलेली आहेत. तुमचा हा विश्वास हीच आपल्या मैत्रीची खरी ताकद आहे आणि एका मित्राच्या नात्याने तुम्ही जो विश्वास ठेवत आहात, यासाठी सुद्धा मी आपला खूप खूप आभारी आहे. आपल्या सर्वांना मी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो, राजस्थानलाही शुभेच्छा देतो, खूप खूप आभार!!  

 

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
‘India has every right to defend itself’: Germany backs New Delhi after Operation Sindoor

Media Coverage

‘India has every right to defend itself’: Germany backs New Delhi after Operation Sindoor
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Administrator of the Union Territory of Dadra & Nagar Haveli and Daman & Diu meets Prime Minister
May 24, 2025

The Administrator of the Union Territory of Dadra & Nagar Haveli and Daman & Diu, Shri Praful K Patel met the Prime Minister, Shri Narendra Modi in New Delhi today.

The Prime Minister’s Office handle posted on X:

“The Administrator of the Union Territory of Dadra & Nagar Haveli and Daman & Diu, Shri @prafulkpatel, met PM @narendramodi.”