पंतप्रधानांनी या प्रसंगी एक स्मृती नाणे आणि टपाल तिकिटाचे केले प्रकाशन
''आदरणीय गुरूंच्या शिकवणुकीनुसार देश पुढे वाटचाल करत आहे''
"शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन मिळालेले भारताचे स्वातंत्र्य त्याच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक प्रवासापासून वेगळे करता येणार नाही"
“औरंगजेबाच्या जुलमी विचारसरणीसमोर गुरू तेग बहादूरजींनी 'हिंद दी चादर' म्हणून कार्य केले
"आम्हाला 'नव्या भारता 'च्या तेजोवलयात सर्वत्र गुरु तेग बहादूरजींचा आशीर्वाद जाणवतो "
गुरुंचे ज्ञान आणि आशीर्वादाच्या रूपात आपल्याला ‘एक भारत’ चे सर्वत्र दर्शन होते. ”
"आजचा भारत जागतिक संघर्षाच्या काळातही संपूर्ण स्थैर्यासह शांततेसाठी प्रयत्नशील आहे आणि भारत देशाच्या संरक्षण आणि सुरक्षेसाठी तितकाच खंबीर आहे"

वाहे गुरु जी का खालसा।

वाहे गुरु जी की फ़तह॥

व्यासपीठावरील सर्व मान्यवर, कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व महिला आणि पुरुषगण आणि आभासी माध्यमांद्वारे उपस्थित जगभरातील सर्व मान्यवर!

गुरू तेग बहादूरजींच्या 400 व्या प्रकाश पर्वाला समर्पित या भव्य कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो. आता शबद-कीर्तन ऐकून जी शांती मिळाली ती शब्दात व्यक्त करणे कठीण आहे.

आज मला गुरूंना समर्पित स्मृती टपाल तिकीट आणि नाणे जारी करण्याचे भाग्यही मिळाले आहे. मी ही आपल्या गुरूंची विशेष कृपा मानतो. यापूर्वी 2019 मध्ये आपल्याला  गुरू नानक देवजींचे 550 वे प्रकाश पर्व आणि 2017 मध्ये गुरू गोविंद सिंहजी यांचे 350 वे प्रकाश पर्व साजरे करण्याचे भाग्य लाभले होते.

मला आनंद आहे की आज आपला देश आपल्या गुरुंच्या आदर्शांवर पूर्ण निष्ठा ठेवून पुढे जात आहे. या पवित्र प्रसंगी मी सर्व दहा गुरूंच्या चरणी नतमस्तक होतो. तुम्हा सर्वांना, तमाम देशवासियांना आणि गुरुवाणीवर श्रद्धा असलेल्या जगभरातील सर्व लोकांना मी प्रकाशपर्वनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो.

 

मित्रांनो,

हा लाल किल्ला अनेक महत्त्वाच्या कालखंडांचा साक्षीदार आहे. या किल्ल्याने गुरू तेग बहादूर साहिब जी यांचे हौतात्म्यही पाहिले आहे आणि देशासाठी शहीद झालेल्या लोकांच्या निर्धाराची कसोटीही पाहिली आहे. स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षात भारताच्या अनेक स्वप्नांचा प्रतिध्वनी येथूनच घुमला. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान लाल किल्ल्यावर होणारा हा कार्यक्रम विशेष आहे.

 

मित्रांनो,

आज आपण ज्या टप्प्यावर आहोत ते आपल्या लाखो-करोडो स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग आणि  बलिदानामुळे आहोत. स्वतंत्र भारत, स्वतःचे निर्णय स्वतः घेणारा भारत, लोकशाही भारत, जगात परोपकाराचा संदेश देणारा भारत, अशा भारताचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी कोट्यवधी लोकांनी आपले जीवन वेचले.

ही भारतभूमी केवळ एक देश नाही, तर आपला महान  वारसा आहे, महान परंपरा आहे. आपल्या

ऋषीमुनींनी आणि गुरूंनी शेकडो-हजारो वर्षांच्या तपश्चर्येतून ती रुजवली आहे, त्यामागचे विचार समृद्ध केले आहेत. या परंपरेचा सन्मान करण्यासाठी, तिच्या अस्तित्वाच्या संरक्षणासाठी दहा गुरूंनी आपले जीवन समर्पित केले होते.

 

म्हणूनच मित्रांनो,

शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून मिळालेली मुक्ती, भारताचे स्वातंत्र्य, भारताचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक प्रवास हे वेगवेगळे करून पाहिले जाऊ शकत नाहीत. म्हणूनच, आज देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि गुरु तेग बहादूरजींचे 400 वे प्रकाश पर्व समान संकल्पांसह एकत्र साजरे करत आहे.

 

मित्रांनो,

आपल्या गुरूंनी ज्ञान आणि अध्यात्मासोबतच समाज आणि संस्कृतीची जबाबदारीही उचलली. त्यांनी शक्तीला सेवेचे माध्यम बनवले. जेव्हा गुरू तेग बहादूरजींचा जन्म झाला तेव्हा गुरु पिता म्हणाले होते-

‘‘दीन रच्छ संकट हरन”।

म्हणजेच हे बालक महान आत्मा आहे. हा दीनदुबळ्यांचे संरक्षण करणारा, संकटहर्ता आहे. म्हणून श्रीगुरु हरगोविंद साहिब यांनी त्यांचे नाव त्यागमल ठेवले. हाच त्याग गुरू तेग बहादूरजींनी आपल्या आयुष्यात प्रत्यक्षात उतरवूनही दाखवला. गुरू गोविंद सिंग यांनी त्यांच्याबद्दल लिहिले आहे-

“तेग बहादर सिमरिए, घर नौ निधि आवै धाई।

सब थाई होई सहाई”॥

म्हणजेच, सर्व सिद्धी केवळ गुरु तेग बहादूरजींच्या स्मरणानेच आपोआप  प्रकट होऊ लागतात. गुरू तेग बहादूरजींचे इतके अद्भुत अध्यात्मिक व्यक्तिमत्त्व होते, ते अशा विलक्षण प्रतिभेचे धनी होते.

 

मित्रांनो,

येथे, लाल किल्ल्याजवळच, गुरू तेग बहादूर यांच्या अमर बलिदानाचे प्रतीक गुरुद्वारा शीशगंज साहिबदेखील आहे.  आपल्या महान संस्कृतीचे संरक्षण करण्यासाठी गुरू तेग बहादूरजी यांनी केवढे मोठे बलिदान दिले, याची आठवण हा पवित्र गुरुद्वारा आपल्याला करून देतो. त्यावेळी देशात धार्मिक कट्टरतेचे वादळ होते. धर्माला तत्त्वज्ञान, विज्ञान आणि आत्मसंशोधनाचा विषय मानणाऱ्या आपल्या हिंदुस्थानसमोर धर्माच्या नावाखाली हिंसाचार आणि अत्याचार करणारे लोक उभे ठाकले होते. त्यावेळी गुरू  तेग बहादूरजींच्या रूपाने आपली ओळख जतन करण्याची मोठी आशा भारताला वाटत होती. औरंगजेबाच्या जुलमी विचारासमोर त्यावेळी गुरू तेग बहादूरजी 'हिंद दी चादर' बनून पहाडासारखे उभे होते. इतिहास साक्षी आहे, हा वर्तमानकाळ साक्षी आहे आणि हा लाल किल्लासुद्धा साक्षी आहे की औरंगजेब आणि त्याच्यासारख्या जुलमींनी अनेकांची शिरे धडापासून तोडली असतील, पण ते आमच्या आस्थेपासून आम्हाला वेगळे करू शकले नाहीत. गुरू तेग बहादूरजींच्या बलिदानाने भारतातील अनेक पिढ्यांना त्यांच्या संस्कृतीच्या संरक्षणासाठी, सन्मानासाठी, जगण्यामरण्याची प्रेरणा दिली आहे. मोठमोठया सत्तांचा अस्त झाला, मोठमोठी वादळे शमली, पण भारत अजूनही अमर आहे, भारत आगेकूच करत आहे. आज पुन्हा एकदा जग भारताकडे पाहत आहे आणि मानवतेच्या वाटेवर मार्ग दाखवण्याची आशा बाळगून आहे. गुरू तेग बहादूरजींच्या  आशीर्वादाची अनुभूती आपण नवभारताच्या आसमंतात सर्वत्र घेऊ शकतो.

 

बंधू आणि भगिनींनो,

आपल्याकडे  प्रत्येक कालखंडात जेव्हा जेव्हा नवीन आव्हाने उभी राहतात, तेव्हा कोणीतरी महान आत्मा या प्राचीन देशाला नवीन मार्ग दाखवून दिशा देतो. भारतातील  प्रत्येक क्षेत्र, प्रत्येक कानाकोपरा आपल्या गुरूंच्या  प्रभावाने आणि ज्ञानाने उजळून निघाला आहे. गुरू नानक देवजींनी संपूर्ण देशाला एका धाग्यात बांधले. गुरू तेग बहादूर यांचे अनुयायी सर्वत्र होते. पटनामधील पटना साहिब आणि दिल्लीतील रकाबगंज साहिब, आपल्याला सर्वत्र गुरूंच्या ज्ञान आणि आशीर्वादाच्या रूपात 'एक भारताचे' दर्शन घडते.

 

बंधू आणि भगिनिंनो,

गुरूंच्या सेवेसाठी इतके काम करण्याची संधी मिळणे हे मी आमच्या  सरकारचे भाग्य समजतो. गेल्या वर्षीच आपल्या सरकारने साहिबजादांच्या महान बलिदानाच्या स्मरणार्थ 26 डिसेंबरला वीर बाल दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आमचे सरकार शीख परंपरेतील तीर्थक्षेत्रांना जोडण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. अनेक दशकांपासून प्रतीक्षेत असलेला करतारपूर साहिब कॉरिडॉर बांधून आमच्या सरकारने गुरू सेवेसाठी आपली कटिबद्धता  दाखवली आहे. आमच्या सरकारने पटना साहिबसह गुरू गोविंद सिंहजी यांच्याशी संबंधित ठिकाणांवरील रेल्वे सुविधांचेही आधुनिकीकरण केले आहे. आम्ही 'स्वदेश दर्शन योजने'द्वारे पंजाबमधील आनंदपूर साहिब आणि अमृतसरमधील अमृतसर साहिबसह सर्व प्रमुख ठिकाणांना जोडणारे तीर्थसर्किटही तयार करत आहोत. उत्तराखंडमधील हेमकुंड साहिबसाठी रोपवे बनवण्याचे कामही सुरू आहे.

 

मित्रांनो,

श्री गुरू ग्रंथ साहिब जी आपल्यासाठी आत्मकल्याणाचे पथदर्शक तसेच भारताच्या विविधता आणि एकतेचे साक्षात  स्वरूपही आहेत. म्हणूनच अफगाणिस्तानात जेव्हा संकट निर्माण होते, आपल्या पवित्र गुरू ग्रंथसाहिबच्या आवृत्त्या परत आणण्याचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा भारत सरकार आपली सर्व शक्ती पणाला लावते. आम्ही गुरू ग्रंथसाहिब अत्यंत सन्मानाने आमच्या माथ्यावरून आणतोच, पण संकटात सापडलेल्या आमच्या शीख बांधवांनाही वाचवतो. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याने शेजारील देशांमधून आलेल्या  शीख आणि अल्पसंख्याक कुटुंबांना देशाचे नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे सर्व शक्य झाले कारण आपल्या गुरूंनी आपल्याला मानवतेला प्रथम स्थान देण्याची शिकवण दिली आहे. प्रेम आणि सौहार्द हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे.

मित्रांनो,

आपल्या गुरूंची वाणी आहे,

भै काहू को देत नहि,

नहि भै मानत आन।

कहु नानक सुनि रे मना,

ज्ञानी ताहि बखानि॥

म्हणजेच ज्ञानी तोच जो कोणाला घाबरवत नाही आणि  कोणाला घाबरतही नाही. भारताने कधीही कोणत्याही देशाला किंवा समाजाला धोका निर्माण केला नाही. आजही आपण संपूर्ण जगाच्या कल्याणाचा विचार करतो. एकच इच्छा ठेवतो. जेव्हा आपण आत्मनिर्भर भारताबद्दल बोलतो तेव्हा आपण संपूर्ण जगाच्या प्रगतीचे ध्येय समोर ठेवतो.  भारत जगात योगप्रसार करतो ते संपूर्ण जगाच्या आरोग्य आणि शांतीच्या इच्छेने करतो. मी कालच गुजरातहून परतलो. तेथे पारंपरिक वैद्यकीच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे. आता भारत पारंपारिक औषधांचे फायदे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवेल आणि लोकांचे आरोग्य सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.

 

मित्रांनो,

आजचा भारत जागतिक संघर्षातही पूर्ण स्थिरतेसह शांततेसाठी प्रयत्न करतो, काम करतो. आणि भारत आजही आपल्या देशाच्या संरक्षण आणि सुरक्षेसाठी तितकाच खंबीर आहे. गुरुंनी दिलेली महान शीख परंपरा आपल्यासमोर आहे. जुनी विचारसरणी, जुने रुढीवादी विचार बाजूला ठेवून गुरूंनी नवीन विचार मांडले. त्याच्या शिष्यांनी ते आत्मसात केले, अंगिकारले.

नव्या विचारांची ही सामाजिक मोहीम एक वैचारिक अभिनवत  होती. म्हणूनच नवीन विचार, सतत मेहनत आणि संपूर्ण समर्पण ही आजही आपल्या शीख समाजाची ओळख आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आज देशाचाही हा संकल्प आहे. आपल्या अस्मितेचा आपण  अभिमान बाळगायला हवा. आपल्याला स्थानिकतेचा  अभिमान असायला हवा, आत्मनिर्भर भारत आपल्याला घडवायचा आहे. आपल्याला असा भारत घडवायचा आहे ज्याचे सामर्थ्य जग पाहत राहील, जो जगाला नवीन उंचीवर घेऊन जाईल. देशाचा विकास, देशाची झपाट्याने प्रगती, हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. यासाठी 'सर्वांच्या प्रयत्नांची' गरज आहे. मला पूर्ण खात्री आहे की गुरुंच्या आशीर्वादाने भारत वैभवाच्या शिखरावर पोहोचेल. जेव्हा आपण स्वातंत्र्याची शंभर वर्षे साजरी करू तेव्हा एक नवा भारत आपल्यासमोर असेल.

गुरू तेग बहादूरजी म्हणायचे-

साधो,

गोबिंद के गुन गाओ।

मानस जन्म अमोल कपायो,

व्यर्था काहे गंवावो।

या भावनेने आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण देशासाठी समर्पित करू. आपण सर्व मिळून देशाला विकासाच्या नव्या उंचीवर नेऊ, या विश्वासाने पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना पुन्हा हार्दिक शुभेच्छा !

वाहे गुरु जी का खालसा।

वाहे गुरु जी की फ़तह॥

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world

Media Coverage

PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi