नमस्कार, माझ्या कुटुंबियांनो,
विकासित भारत संकल्प यात्रेला 2 महिने पूर्ण झाले आहेत. या प्रवासात धावणारा विकासाचा रथ हा श्रद्धेचा रथ असून आता लोक त्याला हमीचा रथ देखील म्हणू लागले आहेत. योजनांच्या लाभापासून कुणीही वंचित राहणार नाही, कुणीही लाभ मिळाल्या वाचून राहणार नाही, असा विश्वास आता निर्माण होत आहे. त्यामुळे ज्या गावांमध्ये मोदींच्या हमीची गाडी अद्याप पोहोचलेली नाही, तिथे तिची आता अगदी आतुरतेने प्रतिक्षा होत आहे. आणि म्हणूनच आम्ही यापूर्वी 26 जानेवारीपर्यंत ही यात्रा सुरु ठेवण्याचा विचार केला होता, परंतु आम्हाला एवढा पाठिंबा मिळाला, एवढी मागणी वाढली, प्रत्येक गावातील लोक सांगत आहेत की मोदींची हमी असलेले वाहन आमच्या ठिकाणी यावे. तेव्हा मला हे कळल्यावर मी आमच्या सरकारी अधिकाऱ्यांना सांगितले की 26 जानेवारीपर्यंतच नाही तर आणखी थोडी मुदतवाढ द्या. लोकांना गरज आहे, लोकांची मागणी आहे तर ती आपल्याला पूर्ण करावी लागेल. आणि त्यामुळे कदाचित काही दिवसांनी हे ही निश्चित होईल की मोदींची हमीची गाडी कदाचित फेब्रुवारी महिन्यातही चालवली जाईल.
मित्रांनो,
15 नोव्हेंबरला भगवान बिरसा मुंडा यांच्या आशीर्वादाने आम्ही हा प्रवास सुरू केला तेव्हा तो इतका यशस्वी होईल याची कल्पनाही केली नव्हती. गेल्या काही दिवसांमध्ये या प्रवासात अनेकवेळा सहभागी होण्याची संधी मला मिळाली. मी वैयक्तिकरित्या अनेक लाभार्थ्यांशी बोललो. अवघ्या दोन महिन्यांत विकसित भारत संकल्प यात्रेचे लोकआंदोलनात रूपांतर झाले आहे. जिथे जिथे मोदींची हमीची गाडी पोहोचते तिथे लोक तिचे मोठ्या आपुलकीने स्वागत करत आहेत. विकसित भारत संकल्प यात्रेत आतापर्यंत 15 कोटी लोक सहभागी झाले आहेत. आणि आमचे आरोग्य मंत्री आमचे मनसुख भाई, यांनी तुम्हाला अनेक आकडे सांगितले, ही यात्रा देशातील जवळपास 70-80 टक्के पंचायतींपर्यंत पोहोचली आहे.
मित्रांनो
विकसित भारत संकल्प यात्रेचा मुख्य उद्देश अशा लोकांपर्यंत पोहोचणे हा होता की जे आजवर कोणत्या ना कोणत्या कारणाने शासकीय योजनांपासून वंचित होते. आणि मोदी अशा लोकांची पूजा करतात, मोदी अशा लोकांना विचारतात, ज्यांना अन्य कोणी विचारले नाही. आज जर कोणी बारकाईने अभ्यास केला तर त्याला असे दिसून येईल की विकसित भारत संकल्प यात्रेसारखी मोहीम लास्ट माईल डिलिव्हरीसाठी, शेवटच्या समाज घटकापर्यंत पोहोचण्याचे सर्वोत्तम माध्यम आहे. या यात्रेत 4 कोटींहून अधिक लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. या यात्रेदरम्यान अडीच कोटी लोकांची क्षयरोगाची चाचणी करण्यात आली आहे. आदिवासी भागात सिकलसेल अॅनिमियासाठी 50 लाखांहून अधिक लोकांची तपासणी करण्यात आली आहे.
विकसित भारत संकल्प यात्रेतील संपृक्ततेचा (प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा) दृष्टिकोन, सरकारला अनेक वंचितांच्या दारात घेऊन गेला. या प्रवासादरम्यान 50 लाखांहून अधिक आयुष्मान कार्ड देण्यात आली आहेत. 50 लाखांहून अधिक लोकांनी विमा योजनांसाठी अर्ज केले. पीएम किसान योजनेत 33 लाखांहून अधिक नवीन लाभार्थ्यांची भर पडली. किसान क्रेडिट कार्डमध्ये 25 लाखांहून अधिक नवीन लाभार्थ्यांची भर पडली. 22 लाखांहून अधिक नवीन लाभार्थ्यांनी मोफत गॅस जोडणीसाठी अर्ज केले. पी एम स्वनिधीचा लाभ घेण्यासाठी 10 लाखांहून अधिक लोकांनी अर्ज केले आहेत.
आणि मित्रांनो,
कोटी-लाखांचे हे आकडे कुणासाठी कदाचित निव्वळ आकडे असू शकतात, पण माझ्यासाठी प्रत्येक आकडा फक्त एक आकडा नसतो, माझ्यासाठी तो एक जीवन आहे, तो माझा भारतीय भाऊ किंवा बहीण, माझ्या कुटुंबातील सदस्य आहे, जो आजपर्यंत योजनेच्या लाभापासून वंचित होता. आणि म्हणूनच, प्रत्येक क्षेत्रात संपृक्ततेकडे वाटचाल करण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येकाला पोषण, आरोग्य आणि उपचार यांची हमी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक कुटुंबाला कायमस्वरूपी घर मिळावे आणि प्रत्येक घरात गॅस जोडणी, पाणी, वीज आणि शौचालयाची सुविधा असावी, असा आमचा प्रयत्न आहे. स्वच्छतेची व्याप्ती वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक गल्लीबोळ, प्रत्येक भाग, प्रत्येक कुटुंब त्यात सहभागी झाले पाहिजे. प्रत्येकाचे बँक खाते असावे, स्वयंरोजगारात पुढे जाण्याची संधी मिळावी, असा आमचा प्रयत्न आहे.
मित्रांनो
जेव्हा अशा प्रकारे चांगल्या हेतूने आणि प्रामाणिकपणे काम होते तेव्हा त्याचे परिणाम देखील मिळतात. भारतातील गरिबी कमी होण्याबाबत जो नवा अहवाल आला आहे तो अतिशय उत्साहवर्धक आहे. आणि केवळ भारतातच नाही, तर जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन, राज्यकारभाराच्या व्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि जगातील गरीब देश गरिबीतून बाहेर पडण्यासाठी कोणता मार्ग शोधू शकतात, यासाठी मोठे काम झाले आहे. आणि ताजा अहवाल काय आहे, ताजा अहवाल हेच सांगतो (हा अहवाल अगदी आठवडाभरापूर्वी आला आहे). या ताज्या अहवालात असे म्हटले आहे की, आमच्या सरकारच्या गेल्या 9 वर्षात जवळपास 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. भारतात गरिबी कमी होईल याची कल्पनाही कोणी केली नसेल. पण गरिबांना साधने मिळाली, साधनसंपत्ती मिळाली तर ते गरिबीला हरवू शकतात हे भारतातील गरिबांनी करुन दाखवले आहे.
गेल्या 10 वर्षात आमच्या सरकारने ज्या प्रकारची पारदर्शक व्यवस्था निर्माण केली, प्रामाणिक प्रयत्न केले आणि लोकसहभागाला चालना दिली, त्यामुळे अशक्य गोष्टही शक्य झाली आहे. सरकार गरिबांसाठी कसे काम करत आहे हेही पंतप्रधान आवास योजनेतून समजू शकते. गेल्या 10 वर्षांत 4 कोटींहून अधिक गरीब कुटुंबांना त्यांची कायमस्वरूपी घरे मिळाली आहेत. 4 कोटी गरीब कुटुंबांना त्यांची कायमस्वरूपी घरे मिळणे हे किती मोठे यश आहे आणि गरिबांचे त्यामुळे किती मोठे आशीर्वाद मिळत आहेत. आणि विशेष म्हणजे यातील 70 टक्क्यांहून अधिक घरांची नोंदणी महिलांच्या नावावर झाली असून, आपली भगिनी आता मालकीण झाली आहे. या योजनेमुळे गरिबीतून बाहेर काढण्याबरोबरच महिला सक्षमीकरणातही मदत झाली आहे.
ग्रामीण भागातील घरांचा आकारही वाढला आहे. पूर्वी घरे कशी बांधायची यात सरकार ढवळाढवळ करायचे, आता लोक आपल्या आवडीची घरे बांधत आहेत. सरकारने गृहनिर्माण योजनां अंतर्गत घरे बांधण्याच्या कामालाही गती दिली आहे. पूर्वीच्या सरकारमध्ये घर बांधण्यासाठी 300 दिवसांपेक्षा जास्त वेळ लागत होता, आता पंतप्रधान आवास योजनेतील घरे बांधण्यासाठी सरासरी 100 दिवसांचा कालावधी लागतो. म्हणजे आम्ही पूर्वीपेक्षा तिप्पट वेगाने कायमस्वरूपी घरे बांधत आहोत आणि ती गरिबांना देत आहोत. हा वेग आहे ना, तो फक्त कामाचा वेग नाही, आमच्या हृदयात गरिबांसाठी जी जागा आहे ना, गरिबांसाठीचे जे प्रेम आहे ना, तेच आम्हाला कामासाठी पळायला लावते आणि त्यामुळे काम वेगाने होते. अशा प्रयत्नांनीच देशातील गरिबी कमी करण्यात मोठी भूमिका बजावली आहे.
मित्रांनो
आपले सरकार वंचितांना कसे प्राधान्य देत आहे याचे उदाहरण म्हणजे ट्रान्सजेंडर समाज, आपला किन्नर समाज.आत्ताच मी ट्रान्सजेंडर समुदायाच्या प्रतिनिधीशी तपशीलवार बोलत होतो, तुम्ही ऐकले सुद्धा असेल. स्वातंत्र्यानंतर इतकी दशके कोणीही ट्रान्सजेंडर्सची पर्वा केली नाही. हे आमचे सरकार आहे ज्यांनी पहिल्यांदाच आपल्या ट्रान्सजेंडर समुदायाच्या अडचणींबद्दल चिंता व्यक्त केली आणि त्यांचे जीवन सहज करण्यासाठी प्राधान्य दिले. 2019 मध्ये, आमच्या सरकारने ट्रान्सजेंडर समुदायाच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी एक कायदा केला. यामुळे ट्रान्सजेंडर समुदायाला फक्त समाजात सन्माननीय स्थान मिळण्यातच मदत झाली नाही तर त्यांच्याकडून होणारा भेदभाव दूर करण्यातही मदत झाली. सरकारने हजारो लोकांना ट्रान्सजेंडर ओळख प्रमाणपत्र देखील जारी केले आणि आता ट्रान्सजेंडर समुदायाच्या प्रतिनिधीने सांगितले की त्यांनी प्रत्येकाला ओळखपत्र दिले आहेत. त्यांच्यासाठी आता सरकारी योजना आहे आणि ट्रान्सजेंडर समुदायही आम्हाला मदत करत आहे. काही काळापूर्वी झालेल्या संभाषणात उघड झाल्याप्रमाणे, आपल्या ट्रान्सजेंडर समुदायालाही विविध गरीब कल्याणकारी योजनांचे लाभ आता सातत्याने मिळत आहेत.
माझ्या कुटुंबातील प्रिय सदस्यांनो,
भारत बदलतोय आणि खूप वेगाने बदलतोय. आज लोकांचा आत्मविश्वास, त्यांचा सरकारवरील विश्वास आणि नवा भारत घडवण्याची त्यांची जिद्द सर्वत्र दिसून येत आहे. दोनच दिवसांपूर्वी मी पीएम जनमन अभियानाच्या कार्यक्रमात अत्यंत मागासलेल्या आदिवासी समाजातील लोकांशी बोलत होतो. आदिवासी गावातील महिला एकत्रितपणे गावाच्या विकासाचे नियोजन कसे करतात हे मी पाहिले. या त्या गावातील महिला आहेत, जिथे स्वातंत्र्यानंतर अनेक दशके उलटूनही बहुतांश लोकांना विकास योजनांचा पूर्ण लाभ मिळाला नव्हता. मात्र या गावांतील महिला जागरूक आहेत, त्या योजनांचा लाभ आपल्या कुटुंबाला आणि समाजाला देण्यात व्यस्त आहेत.
आजच्या कार्यक्रमात बचतगटात सामील झाल्यानंतर भगिनींच्या जीवनात कसा अभूतपूर्व बदल झाला हे देखील आपण पाहिले. 2014 पूर्वी, देशात स्वयं-सहायता गट तयार करणे हा केवळ कागदावरच मर्यादित असलेला आणि मुख्यतः नेत्याच्या कार्यक्रमासाठी गर्दी जमवण्यासाठी सरकारी कार्यक्रम होता . बचतगटांनी आर्थिकदृष्ट्या मजबूत कसे व्हावे, त्यांच्या कार्याचा विस्तार कसा करता येईल, याकडे यापूर्वी लक्ष दिले जात नव्हते.
आपल्या सरकारनेच अधिकाधिक बचत गटांना बँकांशी जोडले आहे. कोणतीही हमी न घेता त्यांना कर्ज देण्याची मर्यादाही आम्ही 10 लाखांवरून 20 लाख रुपये केली आहे. आमच्या सरकारच्या गेल्या 10 वर्षाच्या कार्यकाळात सुमारे 10 कोटी भगिनी बचत गटांमध्ये सामील झाल्या आहेत. त्यांना स्वयंरोजगारासाठी बँकांकडून 8 लाख कोटी रुपयांहून अधिक मदत मिळाली आहे. हा आकडा लहान नाही, आठ लाख कोटी रुपये या गरीब मातांच्या हातात घालण्याचे धाडस आपण केले आहे. कारण माझा माझ्या या माता-भगिनींवर पूर्ण विश्वास आहे. मला विश्वास आहे की तिला संधी मिळाली तर ती मागे राहणार नाही. हजारो भगिनींनी नवनवीन उपक्रम सुरू केले आहेत. 3 कोटी महिलांना महिला शेतकरी म्हणून सक्षम केले गेले आहे. देशातील लाखो भगिनी समृद्ध आणि स्वावलंबी झाल्या आहेत.
ही मोहीम अधिक तीव्र करत सरकारने तीन वर्षांत 2 कोटी लखपती दीदी तयार करण्याचे काम सुरू केले आहे. बचत गटांशी निगडित महिलांना रोजगाराचे नवे साधन उपलब्ध करून देण्यासाठी नमो ड्रोन दीदी... आता चांद्रयानाची चर्चा होईल, पण माझ्या बचत गटाची बहीण गावात ड्रोन चालवून शेतीच्या कामात मदत करत असेल तेव्हा कसे होईल? काय होईल याची तुम्ही कल्पना करू शकता... या अंतर्गत नमो ड्रोन दीदींना 15 हजार ड्रोन उपलब्ध करून दिले जातील. आता त्यांना प्रशिक्षण देण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. आणि मला आनंद आहे की आत्तापर्यंत एक हजाराहून अधिक नमो ड्रोन दीदींचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. नमो ड्रोन दीदी मुळे बचतगटांचे उत्पन्न वाढेल, त्यांचं स्वावलंबन वाढेल, गावातील भगिनींना एक नवा आत्मविश्वास मिळेल, शिवाय ते आपल्या शेतकर्यांसाठी खूप उपयुक्त ठरेल.
माझ्या कुटुंबियांनो,
ग्रामीण अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे आणि शेतकऱ्यांना सक्षम करणे हे आमच्या सरकारचे प्राधान्य आहे. त्यामुळे लहान शेतकऱ्यांची शक्ती वाढवणे, त्यांचा शेतीवरील खर्च कमी करणे, त्यांना बाजारात चांगला भाव मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. हे लक्षात घेऊन देशात 10 हजार नवीन शेतकरी उत्पादक संघ म्हणजेच एफपीओ स्थापन करण्याची मोहीम सुरू करण्यात आली. आज यापैकी सुमारे 8 हजार एफपीओ तयार झाले आहेत.
पशुधनाच्या सुरक्षेसाठी सरकारही तेवढेच प्रयत्न करत आहे. आपण पाहिले आहे की कोविडच्या काळात मानवांना लस मिळते, जीव वाचतात; त्यांनी याबद्दल ऐकले आणि प्रशंसा केली की मोदींनी लस मोफत दिली, जीव वाचला... कुटुंब वाचले. पण यापलीकडे मोदींची विचारसरणी काय आहे, मोदी काय काम करतात? दरवर्षी आपल्या जनावरांना तोंडाच्या आणि पायाच्या आजारामुळे हजारो कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.
त्यामुळे दूध उत्पादनावरही परिणाम होत आहे. या आव्हानाला तोंड देण्यासाठी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत आतापर्यंत 50 कोटींहून अधिक जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. यावरही सरकारने 15 हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च केला आहे. या मोहिमेचा परिणाम म्हणजे देशातील दूध उत्पादनात 50 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्याचा फायदा पशुपालक, पशुपालक शेतकरी आणि देशाला झाला आहे.
मित्रांनो,
आज भारत हा जगातील सर्वात तरुण देशांपैकी एक आहे. युवाशक्तीची क्षमता वाढवण्यासाठी देशात सातत्याने काम केले जात असून यात विकास भारत संकल्प यात्रेचीही मदत होत आहे. या काळात अनेक प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. याशिवाय देशाच्या कानाकोपऱ्यात आपल्या गुणवान खेळाडूंचाही गौरव होत आहे. मी विकसित भारत संकल्प यात्रेत मोठ्या संख्येने आमचे तरुण 'माझे भारत स्वयंसेवक' म्हणून नोंदणी करत आहेत याचा मला आनंद आहे. या यात्रेत करोडो लोकांनी भारताला विकसित करण्याचा संकल्प केला आहे. हे संकल्प देशाला विकसित राष्ट्र बनवण्याची ऊर्जा देत आहेत. 2047 पर्यंत विकसित भारताचा प्रवास पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. या मोहिमेत तुम्हीही सहभागी व्हाल असा मला विश्वास आहे. पुन्हा एकदा, मी त्या सर्वांचा आभारी आहे ज्यांच्याशी मला संवाद साधण्याची संधी मिळाली आणि तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने मोदींच्या गॅरेटी वाल्या वाहनाचे स्वागत केले आणि त्यांचा आदर केला, म्हणून तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.