"आपल्या संकल्पांना नवी झळाळी देण्याचा हा दिवस आहे"
"भारतात शस्त्रे केवळ शस्त्रागारात ठेवून देण्यासाठी वापरली जात नाहीत तर संरक्षणासाठी वापरली जातात"
"आम्हाला रामाने बाळगलेल्या 'मर्यादा' (सीमा) माहीत आहेत, त्याच प्रमाणे आमच्या सीमांचे रक्षण कसे करायचे हे देखील माहीत आहे"
"प्रभू रामचंद्रांच्या जन्मभूमीवर उभारले जाणारे मंदिर हे शतकानुशतकांच्या आम्हा भारतीयांच्या प्रतीक्षेसह बाळगलेल्या संयमाच्या विजयाचे प्रतीक आहे"
"भगवान श्रीरामाच्या विचारांचा भारत आपल्याला घडवायचा आहे".
"भारत आज जगातील सर्वात मोठी लोकशाही तसेच सर्वात विश्वासार्ह लोकशाही म्हणून उदयास येत आहे"
"समाजातील दुष्प्रवृत्ती आणि भेदभाव नष्ट करण्याची प्रतिज्ञा आपण केली पाहिजे"

सिया वर रामचंद्र की जय,

सिया वर रामचंद्र की जय,

मी सर्व भारतीयांना शक्तीपूजनाच्या नवरात्रीच्या आणि विजय पर्व असलेल्या विजयादशमी सणाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. विजयादशमीचा हा सण अन्यायावर न्यायाचा विजय ,  अहंकारावर नम्रतेचा विजय  आणि क्रोधावर संयमाच्या विजयाचा सण आहे. अत्याचारी रावणावर प्रभू श्रीरामाच्या विजयाचा हा सण आहे. या भावनेने आपण दरवर्षी रावण दहन करतो. पण हे इतके पुरेसे नाही. हा सण आपल्यासाठी संकल्पांचाही सण आहे, आपल्या संकल्पांची पुनरावृत्ती करण्याचाही सण आहे.

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

यावेळी आपण चंद्रावर विजय मिळवून 2 महिने पूर्ण होत असताना  विजयादशमी साजरी करत आहोत. विजयादशमीला शस्त्रांची पूजा करण्याचीही परंपरा आहे. भारतीय भूमीवर शस्त्रांची पूजा कोणत्याही भूमीवर वर्चस्व गाजवण्यासाठी नाही, तर तिचे रक्षण करण्यासाठी केली जाते. नवरात्रीच्या शक्तीपूजनाचा संकल्प सुरू करताना आपण म्हणतो- या देवी सर्वभूतेषू, शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नम: पूजा पूर्ण झाल्यावर आपण म्हणतो – देहि सौभाग्य आरोग्यं, देहि मे परमं सुखम, रूपं देहि, जयं देहि, यशो देहि, द्विषोजहि!   आपली शक्तीपूजा केवळ आपल्यासाठीच नाही, तर संपूर्ण सृष्टीचे सौभाग्य, आरोग्य, सुख , विजय आणि यश  यासाठी केली जाते. हे भारताचे तत्वज्ञान आणि विचार आहे. आपल्याला  गीतेतील  ज्ञानही अवगत आहे आणि आयएनएस विक्रांत आणि तेजसची बांधणीही  माहीत आहे. आपल्याला श्रीरामाने बाळगलेल्या  मर्यादाही  माहित आहेत  आणि आपल्या सीमांचे रक्षण कसे करावे हे देखील माहित आहे. आपल्याला शक्तीपूजेचा संकल्प देखील माहित आहे आणि आपण कोरोनामध्ये  ‘सर्वे संतु निरामया या मंत्राचे पालन देखील केले  आहे  . ही भारताची भूमी आहे. भारताची विजयादशमी देखील याच विचाराचे प्रतीक आहे

मित्रांनो,

आज आपण भाग्यवान  आहोत की, भगवान रामाचे सर्वात भव्य मंदिर बांधताना आपण पाहू शकत आहोत. अयोध्येच्या पुढील रामनवमीला रामललाच्या मंदिरात गुंजणारा प्रत्येक स्वर  संपूर्ण जगाला आनंद देणारा असेल . तो स्वर  जो  शतकानुशतके इथे प्रतिध्वनीत होत आहे - भय प्रगट कृपाला, दीनदयाला...कौसल्या हितकारी. प्रभू राम जन्मभूमीवर उभारले जाणारे मंदिर हे शतकानुशतकांच्या प्रतीक्षेनंतर आम्हा भारतीयांच्या संयमाच्या विजयाचे प्रतीक आहे. राम मंदिरात प्रभू रामाला विराजमान होण्यासाठी अवघे काही महिने उरले आहेत. प्रभू श्री राम आता  येणारच  आहेत. आणि मित्रांनो, अनेक शतकांनंतर राम मंदिरात प्रभू रामाची मूर्ती विराजमान होईल तेव्हा किती आनंद होईल याची कल्पना करा. विजयादशमीपासूनच  रामाच्या आगमनाचा उत्सव सुरू झाला होता . तुलसीबाबा रामचरित मानसमध्ये लिहितात- सगुन होहिं सुंदर सकल मन प्रसन्न सब केर। प्रभु आगवन जनाव जनु नगर रम्य चहुं फेर।  म्हणजेच जेव्हा प्रभू रामाचे आगमन होणार होते, तेव्हा अयोध्येत सर्वत्र शुभशकुन दिसू लागले.  तेव्हा सर्वांचे मन  प्रसन्न होऊ लागले ,  संपूर्ण शहर सुंदर झाले. आजही असेच काही संकेत मिळत आहेत. आज भारताने चंद्रावर विजय मिळवला आहे. आपण जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहोत. आपण  काही आठवड्यांपूर्वी संसदेच्या नवीन इमारतीत प्रवेश केला. महिला शक्तीला प्रतिनिधित्व देण्यासाठी संसदेने नारी शक्ती वंदन कायदा मंजूर केला आहे.

भारत आज जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि सर्वात विश्वासार्ह लोकशाही म्हणून उदयास येत आहे. आणि जग या लोकशाहीच्या जननीकडे  पाहत आहे. या सुखद  क्षणांमध्ये प्रभू श्रीराम अयोध्येच्या राम मंदिरात विराजमान होणार आहेत.  एक प्रकारे, स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर आता भारताचा भाग्योदय होणार आहे. पण हीच वेळ आहे जेव्हा भारताला खूप दक्ष राहावे लागेल. आज रावणाचे दहन हे केवळ पुतळ्याचे दहन  न होता समाजातील परस्पर सौहार्द बिघडवणाऱ्या प्रत्येक विकृतीचे दहन व्हायला हवे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. जातीवाद आणि प्रादेशिकवादाच्या नावाखाली भारतमातेचे विभाजन करू पाहणाऱ्या शक्तींचेही दहन होऊ द्या. हे त्या विचाराचे दहन व्हावे, ज्यात भारताचा विकास नाही तर स्वार्थ साधला आहे जात आहे. विजयादशमी हा सण केवळ रामाच्या रावणावरच्या विजयाचा सण नसावा, तर राष्ट्राच्या प्रत्येक दुष्कृत्यावर देशभक्तीच्या विजयाचा सण असावा. समाजातील दुष्कृत्ये आणि भेदभाव नष्ट करण्याचा संकल्प आपण घेतला पाहिजे.

 

मित्रांनो,

आगामी 25 वर्षे भारतासाठी खूप महत्त्वाची आहेत. आज संपूर्ण जग भारताकडे पाहत आहे आणि आपले सामर्थ्य पाहत आहे. आपल्याला थांबायचे नाही. रामचरित मानसमध्येही लिहिले आहे - राम काज कीन्हें बिनु, मोहिं कहां विश्राम. प्रभू रामाच्या विचारांचा भारत आपल्याला घडवायचा आहे. एक विकसित भारत, जो आत्मनिर्भर असेल, एक विकसित भारत, जो जागतिक शांततेचा संदेश देईल, विकसित भारत, जिथे प्रत्येकाला त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचा समान अधिकार असेल, एक विकसित भारत, जिथे लोकांमध्ये समृद्धी आणि समाधानाची भावना असेल. रामराज्याची संकल्पना अशीच आहे,  राम राज बैठे त्रैलोका, हरषित भये गए सब सोका म्हणजेच राम सिंहासनावर विराजमान झाल्यावर सर्व जगामध्ये आनंद होईल आणि सगळ्यांचे दुःख संपेल. पण, हे कसे होणार? म्हणून, आज विजयादशमीच्या दिवशी मी प्रत्येक देशवासीयांना 10 संकल्प घेण्याचे आवाहन करतो.

 

पहिला संकल्प - येणार्‍या पिढ्या लक्षात घेऊन जास्तीत जास्त पाण्याची बचत करू.

दुसरा संकल्प - आपण अधिकाधिक लोकांना डिजिटल व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहित करू.

 

तिसरा संकल्प - स्वच्छतेत आपण आपले गाव आणि शहर सर्वात आघाडीवर नेऊ.

चौथा संकल्प -  आपण व्होकल फॉर लोकल या मंत्राचा शक्य तितका अवलंब करू आणि मेड इन इंडिया (स्वदेशी) उत्पादनांचा वापर करू.

पाचवा संकल्प- आपण दर्जेदार काम करू आणि दर्जेदार उत्पादने बनवू आणि निकृष्ट दर्जामुळे देशाचा सन्मान कमी होऊ देणार नाही.

सहावा संकल्प- आपण प्रथम आपला संपूर्ण देश पाहू, प्रवास करू, भ्रमंती करू आणि संपूर्ण देश पाहिल्यानंतर वेळ मिळेल तेव्हा परदेशाचा विचार करू.

सातवा संकल्प- नैसर्गिक शेतीबाबत शेतकऱ्यांना आपण अधिकाधिक जागरूक करू.

आठवा संकल्प- आपण आपल्या आहारात पौष्टीक भरडधान्य म्हणजेच श्रीअन्न समाविष्ट करू. यामुळे आपल्या छोट्या शेतकऱ्यांना आणि आपल्या स्वतःच्या आरोग्याला खूप फायदा होईल.

नववा संकल्प- आपण सर्वजण आपल्या जीवनात वैयक्तिक आरोग्याला प्राधान्य देऊ, मग तो योग असो, खेळ असो किंवा तंदुरुस्ती असो.

आणि दहावा संकल्प- आपण किमान एका गरीब कुटुंबाच्या घरातील सदस्य बनून सामाजिक स्तर वाढवू.

 

ज्यांच्याकडे मूलभूत सुविधा नाहीत, घर-वीज-गॅस-पाणी नाही, वैद्यकीय सुविधा नाही, असा एक देखील गरीब माणूस जोपर्यंत देशात आहे तो पर्यंत आपल्याला शांत बसायचे नाही. आपण प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचून त्याला मदत केली पाहिजे. तरच देशातून गरिबी दूर होईल आणि सर्वांचा विकास होईल. तरच भारत विकसित होईल. प्रभू रामाचे नाव घेऊन आपण हे संकल्प पूर्ण करूया,   याच सदिच्छेसह विजयादशमीच्या या पवित्र सणानिमित्त देशवासियांना खूप खूप शुभेच्छा. राम चरित मानसमध्ये असे सांगितले आहे की,  बिसी नगर कीजै सब काजा, हृदय राखि कोसलपुर राजा म्हणजेच म्हणजेच प्रभू श्री रामाचे नामस्मरण मनात ठेऊन जे काही संकल्प पूर्ण करायचे असतील, त्यात नक्कीच यश मिळेल. आपण सगळे जण भारताचे संकल्प घेऊन प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करू या, आपण सर्वजण भारताला श्रेष्ठ भारताच्या ध्येयाकडे घेऊन जाऊ या. या सदिच्छेसह मी तुम्हा सर्वांना विजयादशमी  या पवित्र सणाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.

सिया वर रामचंद्र की जय,

सिया वर रामचंद्र की जय।

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Waqf Law Has No Place In The Constitution, Says PM Modi

Media Coverage

Waqf Law Has No Place In The Constitution, Says PM Modi
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM to participate in ‘Odisha Parba 2024’ on 24 November
November 24, 2024

Prime Minister Shri Narendra Modi will participate in the ‘Odisha Parba 2024’ programme on 24 November at around 5:30 PM at Jawaharlal Nehru Stadium, New Delhi. He will also address the gathering on the occasion.

Odisha Parba is a flagship event conducted by Odia Samaj, a trust in New Delhi. Through it, they have been engaged in providing valuable support towards preservation and promotion of Odia heritage. Continuing with the tradition, this year Odisha Parba is being organised from 22nd to 24th November. It will showcase the rich heritage of Odisha displaying colourful cultural forms and will exhibit the vibrant social, cultural and political ethos of the State. A National Seminar or Conclave led by prominent experts and distinguished professionals across various domains will also be conducted.