वाहे गुरु दा ख़ालसा, वाहे गुरु दी फतेह!
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, राज्यांचे मुख्यमंत्री, विविध प्रतिष्ठित संस्थांचे अध्यक्ष आणि प्रमुख, राजदूत, या कार्यक्रमाशी संबंधित विशेष करून देशभरातून आलेली मुले-मुली, इतर सर्व मान्यवर, महोदय आणि महोदया.
आज देश पहिला 'वीर बाल दिवस' साजरा करत आहे. ज्या दिवशी, ज्या बलिदानासाठी पिढ्यानपिढ्या आपण ज्या बलिदानाचे स्मरण करत आलो आहोत, आज एक राष्ट्र म्हणून एकजुटीने त्यांना वंदन करण्याची एक नवीन सुरुवात झाली आहे. शहीद सप्ताह आणि हा वीर बाल दिवस आपल्या शीख परंपरेसाठी नक्कीच भावनांनी भरलेला आहे, मात्र त्याच्याशी आकाशासारख्या चिरंतन प्रेरणा देखील जोडलेल्या आहेत. शौर्य दाखवण्यासाठी पराकाष्ठा करताना वय कमी असले तरी काही फरक पडत नाही, याची आठवण 'वीर बाल दिवस' आपल्याला करून देईल. वीर बाल दिवस' आपल्याला याची आठवण करून देईल की, दहा गुरूंचे योगदान काय आहे, देशाच्या स्वाभिमानासाठी शीख परंपरेचे बलिदान काय आहे! हा 'वीर बाल दिवस' आपल्याला सांगेल की -भारत काय आहे, भारताची अस्मिता काय आहे ! दरवर्षी वीर बाल दिवसाचा हा पुण्य सोहळा आपल्याला आपला भूतकाळ ओळखण्याची आणि भविष्यातील भविष्य घडवण्याची प्रेरणा देईल. भारताच्या तरुण पिढीचे सामर्थ्य काय आहे, भारताच्या तरुण पिढीने भूतकाळात देशाचे कशाप्रकारे संरक्षण केले आहे, आपल्या तरुण पिढीने भारताला मानवतेच्या गडद अंधारातून कसे बाहेर काढले आहे, याचा जयघोष 'वीर बाल दिवस' पुढील अनेक दशके आणि शतके करेल.
आज या निमित्ताने मी वीर साहिबजादांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना कृतज्ञतापूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. आजचा 26 डिसेंबर हा वीर बाल दिवस म्हणून घोषित करण्याची संधी मिळाली हे मी आपल्या सरकारचे भाग्य समजतो.पिता दशमेश गुरु गोविंद सिंह यांच्या चरणी आणि सर्व गुरूंच्या चरणी मी भक्तीभावाने वंदन करतो . मातृशक्तीचे प्रतिक असलेल्या माता गुजरी यांच्या चरणी मी नतमस्तक आहे.
मित्रांनो,
जगाचा हजारो वर्षांचा इतिहास हा क्रूरतेच्या भीषण अध्यायांनी भरलेला आहे.इतिहासापासून महापुरुषांपर्यंत, प्रत्येक क्रूर चेहऱ्याविरोधात शूरवीर आणि शूर वीरांगना यांसारखी अनेक महान व्यक्तिमत्व आहेत. पण हे देखील खरे आहे की, चमकौर आणि सरहिंदच्या युद्धात जे काही घडले ते 'भूतो न भविष्यति' होते. हा भूतकाळ काही हजारो वर्षांचा नाही की कालचक्राने त्याच्या रेषा अस्पष्ट केल्या आहेत, हे सगळे तीन शतकांपूर्वीच या देशाच्या मातीत घडले.एकीकडे धार्मिक कट्टरता आणि त्या कट्टरतेने आंधळी झालेली इतकी मोठी मुघल राजवट तर दुसरीकडे ज्ञान आणि तपश्चर्येमध्ये तल्लीन झालेले आपले गुरु, भारताची प्राचीन मानवी मूल्ये जगण्याची परंपरा! एकीकडे दहशतीचा कळस, तर दुसरीकडे अध्यात्माचे शिखर! एकीकडे धार्मिक उन्माद आणि दुसरीकडे प्रत्येकामध्ये देव पाहणारे औदार्य! आणि या सगळ्यात एकीकडे लाखोंची फौज, तर दुसरीकडे एकटे असतानाही निडरपणे उभे असणारे गुरूंचे वीर साहिबजादे ! हे शूर साहिबजादे कोणाच्याही धमकीला घाबरले नाहीत, कोणापुढे झुकले नाहीत.जोरावर सिंह साहब आणि फतेह सिंह साहब या दोघांनाही भिंतीत जिवंत पुरण्यात आले होते. एकीकडे क्रूरतेने सर्व मर्यादा तोडल्या, तर दुसरीकडे संयम, शौर्य आणि पराक्रमाची सर्व उदाहरणे पाहायला मिळाली. साहिबजादा अजित सिंह आणि साहिबजादा जुझार सिंह यांनीही शौर्याचे जे उदाहरण घालून दिले, जे शतकानुशतके प्रेरणादायी आहे.
बंधू आणि भगिनींनो
ज्या देशाला अशाप्रकारचा वारसा आहे, ज्याचा इतिहास अशाप्रकारचा आहे, तो देश साहजिकच स्वाभिमान आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असला पाहिजे.पण दुर्दैवाने, इतिहासाच्या नावाखाली आपल्यात न्यूनगंड निर्माण करणारी ती बनावट कथने आपल्याला सांगितली गेली आणि शिकवली गेली ! असे असूनही आपल्या समाजाने, आपल्या परंपरांनी या गौरवगाथांना जिवंत ठेवले.
मित्रांनो,
भविष्यात भारताला यशाच्या शिखरावर घेऊन जायचे असेल, तर भूतकाळातील संकुचित दृष्टिकोनातून मुक्त व्हावे लागेल.म्हणूनच स्वातंत्र्याच्या अमृत काळामध्ये देशाने 'गुलामीच्या मानसिकतेतून मुक्ती 'चा श्वास घेतला आहे.'वीर बाल दिवस' हा देशाच्या त्या 'पंचप्रणां 'साठी प्राणवायू सारखा आहे.
मित्रांनो,
इतक्या लहान वयात साहिबजादांच्या या बलिदानामध्ये आपल्यासाठी आणखी एक मोठा उपदेश दडलेला आहे. त्या युगाची आपण कल्पना करा ! औरंगजेबाच्या दहशतीविरोधात , भारत बदलण्याच्या त्याच्या मनसुब्यांविरुद्ध, गुरु गोविंद सिंह जी पर्वतासारखे उभे राहिले.पण, जोरावर सिंह साहब आणि फतेह सिंह साहब यांसारख्या लहान मुलांशी औरंगजेब आणि त्याच्या राजवटीचे काय वैर असू शकत होते ? दोन निष्पाप मुलांना भिंतीमध्ये जिवंत गाडण्यासारखे क्रौर्य का केले गेले? कारण औरंगजेब आणि त्याच्या लोकांना तलवारीच्या जोरावर गुरु गोविंद सिंह यांच्या मुलांचा धर्म बदलायचा होता.ज्या समाजाची, देशाची नवी पिढी अत्याचाराला बळी पडते, त्याचा आत्मविश्वास आणि भविष्य आपोआप मरून जाते.पण, भारताचा तो सुपुत्र, तो शूर मुलगा मृत्यूलाही घाबरला नाही. तो भिंतीत गाडला गेला , पण त्याने त्या दहशतवादी मनसुब्यांना कायमचे गाडून टाकले.ही कोणत्याही देशाच्या सक्षम तरुणांचे सामर्थ्य असते. तरुणाई , आपल्या धैर्याने, काळाचा प्रवाह कायमचा बदलते. या निर्धाराने आज भारतातील तरुण पिढीही देशाला एका नव्या उंचीवर नेण्यासाठी निघाली आहे. त्यामुळे आता 26 डिसेंबरला होणाऱ्या वीर बाल दिवसाची भूमिका अधिक महत्त्वाची झाली आहे.
मित्रांनो,
शिख गुरु परंपरा ही केवळ श्रद्धा आणि अध्यात्म यांची परंपरा नाही आहे. ही 'एक भारत श्रेष्ठ भारत' या विचाराची प्रेरणा स्रोत आहे.आपला पवित्र गुरुग्रंथ साहिब यापेक्षा आणखी मोठे याचे काय उदाहरण असू शकते? या ग्रंथात शीख गुरूंच्या सोबत भारताच्या वेगवेगळ्या भागातील 15 संत आणि 14 रचनाकारांची वाणी समाविष्ट आहे. याचप्रमाणे, तुम्ही गुरु गोविंद सिंह यांच्या जीवन प्रवासाकडे पाहू शकता. त्यांचा जन्म भारताच्या पूर्वेकडे पटना येथे झाला होता.त्यांचे कार्यक्षेत्र हे उत्तर पश्चिम अर्थात वायव्य भारताच्या पर्वतीय प्रदेशात होते. आणि त्यांचा जीवन प्रवास महाराष्ट्रात पूर्ण झाला. गुरूंचे पाच शिष्य हे सुद्धा देशातल्या विविध भागातले होते आणि मला तर अभिमान आहे की पहिल्या पाच शिष्यांमधले एक शिष्य त्या भूमीतून होते, द्वारिका येथील, गुजरात येथून, जिथे मला जन्म घेण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. व्यक्ती पेक्षा मोठा विचार, विचारा पेक्षा मोठे राष्ट्र,' राष्ट्र प्रथम' चा हा मंत्र गुरु गोविंद सिंह जी यांचा अटळ संकल्प होता. जेव्हा ते बालक होते तेव्हा हा प्रश्न उपस्थित झाला की राष्ट्र धर्माच्या रक्षणासाठी एका मोठ्या बलिदानाची आवश्यकता आहे, तेंव्हा ते आपल्या वडिलांना म्हणाले की आपल्यापेक्षा महान आज कोण आहे? हे बलिदान आपण द्यावे. जेव्हा ते स्वतः वडील बनले, तेव्हा सुद्धा त्याच तत्परतेने त्यांनी आपल्या पुत्रांचे राष्ट्रधर्मासाठी बलिदान देताना कोणताच संकोच केला नाही. जेव्हा त्यांच्या पुत्रांचे बलिदान झाले, तेव्हा ते आपल्या बरोबर असलेल्या शिष्यांकडे बघत म्हणाले, ‘चार मूये तो क्या हुआ, जीवत कई हज़ार' अर्थात माझे चार पुत्र मरण पावले म्हणून काय झाले? हे हजारो देशवासी माझे पुत्रच आहेत.देश प्रथम, नेशन फर्स्ट Nation First या विचाराला सर्वोपरि अर्थात सर्वात श्रेष्ठ ठेवण्याची ही परंपरा आपल्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे. या परंपरेला अधिक मजबूत बनवण्याची जिम्मेदारी आज आपल्या खांद्यांवरती आहे.
मित्रांनो,
भारताची भावी पिढी कशी असेल हे या गोष्टींवर निर्भर ठरते की ती पिढी कोणापासून प्रेरणा घेत आहे. भारताच्या भावी पिढीच्या प्रेरणेचे प्रत्येक स्रोत याच भूमीवरती आहे. म्हटले जाते की, आपल्या देशाचे नाव ज्या बालक भारत याच्या नावावरून पडले, ते सिंह आणि दानव यांचा नायनाट करताना कधीही थकत न्हवते. आपण आज सुद्धा धर्म आणि भक्ती यांची चर्चा करतो तेव्हा भक्तराज प्रल्हाद यांची आठवण करतो. आपण धैर्य आणि विवेक याची चर्चा करतो तेव्हा बालक ध्रुव यांचे उदाहरण देतो.आपण मृत्यूची देवता यमराज यांना सुद्धा आपल्या तपशक्तीने प्रसन्न करणाऱ्या नचिकेत यांचे सुद्धा नमन करतो. ज्या नचिकेत याने आपल्या बालक अवस्थेत असताना यमराज यांना विचारले होते, व्हॉट इज डेथ ? मृत्यू काय असतो? आपण बालक राम यांच्या ज्ञानापासून त्यांच्या शौर्यापर्यंत, वशिष्ठ मुनींच्या आश्रमापासून विश्वामित्र यांच्या आश्रमापर्यंत, त्यांच्या जीवनात आपण पावला पावलांवर आदर्श पाहतो. प्रभू राम यांचे पुत्र लवकुश यांच्या कथासुद्धा प्रत्येक आई आपल्या बालकांना ऐकवत असते. श्रीकृष्ण यांची सुद्धा आम्हाला जेव्हा आठवण येते, तेव्हा सर्वात आधी त्यांची कान्हा, ही त्यांची छबी आठवणीत येते,ज्यांच्या बासरीमध्ये प्रेमाचे स्वर होते आणि ते मोठमोठ्या राक्षसांचा संहार देखील करत होते. त्या पौराणिक युगापासून आजच्या आधुनिक काळातले शूर बालक -बालिका, हे भारताच्या परंपरेचे एक प्रतिबिंब राहिले आहेत.
मात्र मित्रांनो,
आज एक खरी गोष्ट मी देशाच्या समोर पुन्हा मांडू इच्छितो. साहेबजाद्यानी एवढे मोठे बलिदान दिले आणि त्याग केला, आपलं संपुर्ण आयुष्य समर्पित करून टाकले, परंतु आजच्या पिढीतल्या मुलांना विचारले तर त्यांच्यामधील जास्तीत जास्त मुलांना त्यांच्याविषयी माहितीच नाही आहे. जगातल्या कोणत्याही देशात असं होत नाही की एवढ्या मोठ्या शौर्यगाथेला अशाप्रकारे विस्मरणात टाकले जाईल. मी आजच्या या पवित्र दिनी या विवादामध्ये जाणार नाही की याआधी आपल्याकडे का वीर बाल दिवस याचा विचार सुद्धा केला गेला नाही. परंतु एवढे मात्र सांगू इच्छितो की आता नवा भारत कित्येक दशकांपूर्वी झालेल्या आपल्या जुन्या चूका सुधारत आहे. कोणत्याही देशाची ओळख ही त्या देशांचे सिद्धांत, मूल्ये आणि आदर्शांवरून ठरत असते. आपण इतिहासामध्ये पाहिले आहे की ,जेव्हा कोणत्या देशाचे मुल्ये बदलली जातात तेव्हा काही काळातच त्या देशाचे भविष्यही बदलले जाते. आणि ही मूल्ये तेव्हा सुरक्षित राहतात जेव्हा वर्तमानातल्या पिढीसमोर त्यांच्या भूतकाळातले आदर्श प्रतीत होत असतात.
तरुण पिढीला पुढे ढकलण्यासाठी नेहमीच रोल मॉडेल्स अर्थात आदर्श व्यक्तींची गरज असते. तरुण पिढीला नवीन शिकण्यासाठी आणि प्रेरणा घेण्यासाठी आदर्श व्यक्तिमत्व असणारे नायक नायिकांची गरज असते. आणि एवढ्यासाठी आपण श्रीराम यांच्या आदर्शा़ंवर देखील श्रद्धा ठेवतो, आपण भगवान गौतम बुद्ध आणि भगवान महावीर यांच्यापासून प्रेरणा घेतो, आपण गुरुनानक देव जी यांच्या वाणीला जीवन जगण्याचे सार म्हणतो, आपण महाराणा प्रताप आणि छत्रपती वीर शिवाजी महाराज यांच्यासारख्या शुरांबाबत देखील अभ्यास करतो. याच कारणासाठी, आपण विविध जयंत्या साजऱ्या करतो, शेकडो हजारो वर्षांपूर्वीच्या घटनांवर आधारित विविध सोहळ्यांचे( पर्वाचे) आयोजन करतो. आपल्या पूर्वजांनी समाजाच्या या गरजेला समजून घेतलं होतं आणि भारताला अशा एका देशांमध्ये रचले की, ज्या देशाची संस्कृती ही विविध पर्व आणि मान्यता यांच्याशी जोडलेली आहे. येणाऱ्या पिढ्यांसाठी हीच जिम्मेदारी आपली सुद्धा असणार आहे. आपल्याला सुद्धा तेच विचार आणि तीच भावना यापुढेही चिरंतर जागृत ठेवायची आहे. आपणाला आपला वैचारिक दृष्टिकोन सदैव अक्षय ठेवायचा आहे.
याच कारणास्तव स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी काळात देश स्वतंत्रता संग्रामाच्या इतिहासाला पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या स्वातंत्र्यसंग्रामातले वीरपुरुष, विरांगणा, आदिवासी समाजाचे योगदान हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वजण काम करत आहोत. 'वीर बाल दिवस' यासारखी पवित्र तिथी या दिशेने एक प्रभावी प्रकाश स्तंभा सारखी भूमिका निभावेल.
मित्रांनो,
मला आनंद आहे की वीर बाल दिवसाशी नवीन पिढीला जोडण्यासाठी जी प्रश्नमंजुषा घेण्यात आली, जी निबंध लेखन स्पर्धा झाली, त्याच्यामध्ये हजारो युवकांनी सहभाग नोंदवला. जम्मू काश्मीर असेल, दक्षिणेकडील पद्दुच्चरी असेल, पूर्वेकडील नागालँड असेल, पश्चिमेकडील राजस्थान असेल देशातला कोणताही कोपरा असा नाही आहे जिथल्या मुलांनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन साहिबजाद्यांच्या जीवन कार्याविषयी माहिती घेतली नसेल, निबंध लिहिला नसेल. देशातल्या विविध शाळांमधून देखील साहेबजाद्यांशी निगडित विविध स्पर्धा घेण्यात आल्या. आता तो दिवस दूर नाही जेव्हा केरळ मधल्या मुलांना वीर साहेबजादे यांच्या विषयी माहिती असेल, ईशान्ये कडील मुलांना वीर साहेबजादे यांच्या विषयी माहिती असेल.
मित्रांनो,
आपल्याला एकत्र येऊन वीर बाल दिवसाचा हा संदेश देशाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जायचा आहे. आपल्या साहेबजाद्यांचे जीवन कार्य, त्यांचे विचार देशातल्या प्रत्येक मुलापर्यंत पोचावा, ते त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन देशासाठी समर्पित नागरिक बनतील, आपल्याला यासाठी देखील प्रयत्न करायचे आहेत. मला विश्वास आहे की आपले हे एकत्रित प्रयत्न समर्थ आणि विकसित भारताच्या आपल्या उद्दिष्टांना नवीन ऊर्जा प्रदान करतील. मी पुन्हा एकदा वीर साहेबजाद्यांच्या चरणी नमन करत याच संकल्पासह आपल्या सर्वांना हृदयापासून खूप खूप धन्यवाद देतो !