

नमस्कार,
माझ्या प्रिय देशबांधवांनो आणि जागतिक समुदायाच्या आपल्या कुटुंबातील सर्व लोक, काही दिवसांनी म्हणजे एक डिसेंबर नंतर भारत जी-20 चे अध्यक्षपद भूषवणार आहे. भारतासाठी ही एक ऐतिहासिक संधी आहे. आज याच संदर्भात मी या परिषदेचे संकेतस्थळ,संकल्पना आणि बोधचिन्हाचे उद्घाटन केले आहे. मी सर्व देशबांधवांचे या प्रसंगी अभिनंदन करतो.
मित्रांनो,
जी-20 हा अशा देशांचा समूह आहे, ज्याचे आर्थिक सामर्थ्य जगातील एकूण सकल उत्पादनापैकी 85 टक्के सकल उत्पादनाचे प्रतिनिधित्व करतो. जी-20 अशा 20 देशांचा समूह आहे, ज्यात जगातील 75 टक्के व्यापाराचे प्रतिनिधित्व केले जाते. जी-20 अशा 20 देशांचा समूह आहे, ज्यात जगातील दोन तृतीयांश लोकवस्ती आहे. आणि आता यावर्षी भारत या जी-20 समूहाचे नेतृत्व करणार आहे, त्याचे अध्यक्षपद भूषवणार आहे.
आपल्याला कल्पना असेल की स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात देशासाठी ही किती मोठी संधी चालून आली आहे. ही प्रत्येक भारतीयासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. आपली प्रतिष्ठा वाढवणारी बाब आहे. आणि मला अतिशय आनंद आहे की जी-20 शिखर परिषदेबाबत, भारतात होणाऱ्या या आयोजणाबाबत, उत्सुकता आणि सक्रियता सातत्याने वाढते आहे. आज या बोधचिन्हाचे उद्घाटन झाले, त्याच्या निर्मितीतही देशबांधवांची महत्वाची भूमिका होती. या बोधचिन्हासाठी आम्ही देशबांधवांकडून बहुमूल्य सूचना, सल्ले मागवले होते. आणि मला हे समजल्यावर अतिशय आनंद झाला की हजारो लोकांनी सरकारला आपल्या अभिनव कल्पना कळवल्या.
आणि आज त्याच कल्पना तसेच सूचना, इतक्या मोठ्या जागतिक आयोजनाचा चेहरा ठरल्या आहेत. या प्रयत्नांमध्ये सहभागी झालेल्या सर्वांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो.
मित्रांनो,
जी-20 चे हे बोधचिन्ह केवळ प्रतीक चिन्ह नाही. तर हा एक संदेश आहे. ही एक भावना आहे, जी आपल्या नसानसांत समावलेली आहे. “वसुधैव कुटुंबकम” या मंत्राच्या माध्यमातून, विश्वबंधुत्वाची जी भावना आपण आपल्या आयुष्याचा भाग बनवली आहे, ती भावना आणि तो विचार, या बोधचिन्हातून आणि संकल्पनेतून प्रतिबिंबित होत आहे. या बोधचिन्हांत असलेले कमळाचे फूल, भारताचा पौराणिक वारसा, आपल्या श्रद्धा, आपली बौद्धिक परंपरा याचे प्रतीक आहे.
आपल्याकडे असलेला अद्वैताचा विचार, चिंतन जीवमात्राच्या एकत्व भावनेचे दर्शन मांडणारा विचार आहे. हे दर्शन, हा विचार, आजच्या जागतिक द्वंद आणि समस्यांवर समाधान काढणारा ठरावा, असा संदेश आम्ही हे बोधचिन्ह आणि संकल्पनेच्या माध्यमातून दिला आहे. युद्धापासून मुक्तीसाठी बुद्धांचा जो संदेश आहे, हिंसेला उत्तर म्हणून महात्मा गांधी यांनी सांगितलेला जो अहिंसेचा मार्ग आहे, त्या मार्गाला जी-20 च्या माध्यमातून, भारत नवी ऊर्जा आणि जागतिक प्रतिष्ठा मिळवून देत आहे.
मित्रांनो,
आज जेव्हा संपूर्ण जग अस्थिरता आणि संकटाच्या विळख्यात सापडले आहे, अशा वेळी भारताकडे जी-20 चे अध्यक्षपद आले आहे. शतकात कधीतरीच येणाऱ्या महामारीच्या संकटातून, त्यामुळे निर्माण झालेल्या संघर्षातून आणि आणि फार मोठ्या आर्थिक अस्थिरतेच्या परिस्थितीतून जात आहे. अशा आशेच्या परिस्थितीत, या जी-20 च्या बोधचिन्हातील कमळ एक आशेचं प्रतीक म्हणून उदयाला आले आहे. परिस्थिती कितीही विपरीत असली तरीही कमळ फुलतच असते. जग जरी मोठ्या संकटात असले, तरीही आपण प्रगती करु शकतो, आणि जगाला निवासाची एक उत्तम जागा म्हणून नव्याने उभारणी करु शकतो.
भारतीय संस्कृतीत, ज्ञान आणि समृद्धीच्या दोन्ही देवता कमळावर विराजमान आहेत. आज जगाला याचीच सर्वात जास्त गरज आहे: सामायिक ज्ञान ज्यामुळे आपण आपली परिस्थिती बदलण्यास आणि शेवटच्या व्यक्तीविषयी असलेल्या आपल्या सामायिक जबाबदाऱ्या पार पडण्यास मदत होईल. म्हणूनच जी 20 बोधचिन्हात पृथ्वी देखील कमळावर ठेवली आहे. कमळाच्या सात पाकळ्यांचे देखील विशेष महत्व आहे. ते सात खंडांचे प्रतीक आहे. संगीताच्या जागतिक भाषेतील स्वर देखील सात आहेत. संगीतात जेव्हा सात स्वर एकत्र येतात, तेव्हा ते परिपूर्ण, सूरेल संगीतरचना तयार करतात. त्याचप्रमाणे, विविधतेचा सन्मान राखत जगभरात सर्वांमध्ये सौहार्द निर्माण करणे हा जी-20 चा उद्देश आहे.
मित्रांनो,
ही गोष्ट खरी आहे की जगात जेव्हाही जी-20 सारख्या मोठ्या मंचावर कुठले संमेलन होते, तेव्हा त्याचे स्वतःचे राजनैतिक आणि भू राजकीय अर्थ असतात. आणि हे स्वाभाविकच आहे. मात्र भारतासाठी ही शिखर परिषद केवळ एक राजनैतिक बैठक नाही. भारत याकडे आपल्यासाठी एक जबाबदारी म्हणून बघतो. भारत याकडे आपल्यावर असलेला जगाचा विश्वास या दृष्टीने बघतो. आज जगात भारताला समजून घेण्याची, भारताबद्दल माहिती मिळविण्याची एक अभूतपूर्व जिज्ञासा आहे. भारताचे आज एका नव्या प्रकाशात अध्ययन केले जात आहे. आपल्या सध्याच्या सफलतांचे आकलन केले जात आहे. आपल्या भविष्याविषयी अभूतपूर्व अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
अशा परिस्थितीत ही आपणा देशबांधवांची जबाबदारी आहे की आपण या आशा - अपेक्षांच्या पुढे जाऊन काहीतरी चांगलं करून दाखवलं पाहिजे. आपण भारताचा विचार आणि सामर्थ्याच्या बळावर, भारताच्या संस्कृती आणि समाजशक्तीची जगाला ओळख करून देणे ही आपली जबाबदारी आहे. आपले हजारो वर्ष जुनी संस्कृती आणि ज्ञान आणि त्यात सामावलेल्या आधुनिकतेचा जगाला परिचय करून देणे ही आपली जबाबदारी आहे.
ज्या प्रमाणे आपण शतकानुशतके ‘जय जगत’ या विचारावर जगत आलो आहोत, आज ते जिवंत करून आधुनिक जगापुढे सदर करावे लागेल. आपल्याला सर्वांना जोडून घ्यावे लागेल. सर्वांना जागतिक कर्तव्यांची जाणीव करून द्यावी लागेल. जगाच्या भविष्यात त्यांना आपली सहभागाविषयी जागृत करावे लागेल, प्रेरित करावे लागेल.
मित्रांनो,
आज जेव्हा भारत जी 20 चे अध्यक्षपद भूषवतो आहे, तेव्हा आज हे आयोजन आमच्यासाठी 130 कोटी भारतीयांच्या शक्तीचे आणि सामर्थ्याचे प्रतीक ठरले आहे. आज भारत या ठिकाणी पोहोचला आहे. मात्र, यामागे आपला हजारो वर्षांचा फार मोठा प्रवास आहे, अनंत अनुभव आहेत. आपण हजारो वर्षांचा उत्कर्ष आणि वैभव बघितले आहे. आपण जगातला सर्वात जास्त अंधःकार देखील बघितला आहे. आपण शेकडो वर्ष गुलामी आणि अंधःकारात जगण्याचे हतबल दिवस बघितले आहेत. कितीतरी आक्रमणे आणि अत्याचारांचा सामना करत, भारत एक जिवंत इतिहास आपल्यासोबत घेऊन इथवर पोहोचला आहे.
हे अनुभवच आज भारताच्या विकास यात्रेत आपली सर्वात मोठी शक्ती आहेत. स्वातंत्र्यानंतर आपण शून्यातून सुरवात करून, शिखराचे लक्ष्य ठेऊन, एक मोठा प्रवास सुरु केला. यात गेल्या 75 वर्षांत जितकी सरकारं आली, त्या सर्वांचे प्रयत्न यात अंतर्भूत आहेत. सर्व नागरिकांनी आपापल्या पद्धतीने मिळून भारताला पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला याच भावनेतून आज एका नवीन उर्जेच्या जोरावर संपूर्ण जगाला सोबत घेऊन पुढे जायचे आहे.
मित्रांनो,
भारताच्या हजारो वर्षे प्राचीन संस्कृतीने आपल्याला आणखी एक गोष्ट शिकवली आहे. जेंव्हा आपण आपल्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असतो तेंव्हा आपण वैश्विक प्रगतीची कल्पना देखील करतो. आज भारत जगातील इतका समृद्ध आणि सजीव लोकशाही असलेला देश आहे. आपल्या जवळ लोकशाहीचे संस्कारही आहेत आणि लोकशाहीची जननी या रुपात गौरवशाली परंपरा देखील आहे. भारताकडे जितकी वैशिष्ट्ये आहेत तितकीच विविधता देखील आहे. ही लोकशाही, ही विविधता, हा स्वदेशी दृष्टीकोन, हा सर्व समावेशी विचार, ही स्थानिक जीवन पद्धती, हा जागतिक विचार, आज जग याच संकल्पनांच्या आधाराने आपल्या पुढील आव्हानांची उत्तरे शोधत आहे.
आणि, जी -20 अध्यक्षपद यासाठी एका मोठ्या संधीच्या रुपात कामी येऊ शकते. आपण जगाला हे दाखवून देऊ शकतो की जेंव्हा लोकशाही ही शासन प्रणाली सोबतच एक संस्कार आणि संस्कृती बनते तेंव्हा संघर्षाच्या संधी समाप्त होऊन जातात.
आपण जगातील प्रत्येक मानवाला आश्वस्त करु शकतो की प्रगती आणि प्रकृती दोन्ही एकमेकांच्या सोबतीने वाटचाल करु शकतात. आपल्याला शाश्वत विकासाला केवळ सरकारच्या कार्यप्रणालीचा भागच नव्हे तर व्यक्तीगत आयुष्याचा अविभाज्य अंग बनवायचे आहे, याचा विस्तारही करायचा आहे. पर्यावरण आपल्यासाठी जागतिक कारण असण्याबरोबरच व्यक्तीगत जबाबदारी देखील असली पाहिजे.
मित्रांनो,
आज जग उपचारांऐवजी आरोग्याच्या शोधात आहे. आपले आयुर्वेद, आपला योग, ज्याच्या बाबतीत जगात एक नवा विश्वास आणि उत्साह आहे, आपण त्याच्या विस्तारासाठी एक जागतिक प्रणाली बनवू शकतो. पुढच्या वर्षी जग आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे करणार आहे, पण आपण मात्र शेकडो वर्षांपासून अशा अनेक भरड धान्यांना आपल्या स्वयंपाकघरात स्थान दिलेले आहे.
मित्रांनो,
भारताने अनेक क्षेत्रात जे यश संपादित केले आहे ते जगातील इतर देशांच्या देखील कामी येऊ शकते. उदाहरणच द्यायचे झाले तर भारताने विकासासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर ज्याप्रकारे केला आहे, अंतर्भाव करण्यासाठी केला आहे, भ्रष्टाचार संपविण्यासाठी केला आहे, व्यवसाय सुलभीकरण आणि जीवन सुविधा वाढवण्यासाठी केला गेला, हे सर्व विकसनशील देशांसाठी आदर्श आहेत, उदाहरण आहेत.
याच प्रकारे आज भारत महिला सक्षमीकरण, या क्षेत्रात उन्नती करत महिला नेतृत्व विकासात प्रगती करत आहे. आपले जनधन खाते आणि मुद्रा योजना सारख्या योजनांमुळे महिलांचा आर्थिक विकास अंतर्भाव सुनिश्चित झाला आहे. याच प्रकारे विविध क्षेत्रातील आपला अनुभव जगाची मोठी मदत करु शकतो. आणि जी -20 मध्ये भारताची अध्यक्षता या सर्व सफल अभियानांना जगापर्यंत पोहचवण्याचे एक महत्वपूर्ण माध्यम बनून येत आहे.
मित्रांनो,
आजचे जग सामुहिक नेतृत्वाकडे आशादायी नजरेने पाहत आहे. मग ते जी-7 असो, जी-77 असो किंवा UNGA असो. अशा परिस्थितीत जी-20 चा अध्यक्ष म्हणून भारताची महत्वपूर्ण भूमिका आहे. भारत एकीकडे विकसित देशांशी घनिष्ठ संबंध ठेवून आहे ,आणि सोबतच विकसनशील देशांचा दृष्टिकोन देखील योग्य प्रकारे समजून घेत आहे, त्याची अभिव्यक्ती करत आहे. याच आधारावर आपण आपली जी-20 अध्यक्षतेची रूपरेखा जागतिक दक्षिण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'ग्लोबल साउथ'च्या देशांच्या सर्व मित्रांसोबत मिळून बनवणार आहोत, जे विकास पथावर गेली अनेक दशके भारताचे सहप्रवासी होते.
आपला हाच प्रयत्न राहील की जगात कोणीही फर्स्ट वर्ल्ड किंवा थर्ड वर्ल्डचे न राहता सर्व जण एकाच जगातले असतील. भारत संपूर्ण जगाला एका सामायिक उद्देशासाठी, एका उज्ज्वल भविष्यासाठी, सोबत आणण्याच्या दृष्टीकोनातुन काम करत आहे. भारताने ' एक सुर्य, एक जग, एक उर्जा ' मंत्राचा अवलंब करत जगात नवीकरणीय ऊर्जा क्रांतीचे आवाहन केले आहे. भारत एक पृथ्वी आणि एक आरोग्य या मंत्रासह जागतिक आरोग्याला मजबूत करण्याचे अभियान राबवत आहे. आणि आता जी-२० मध्ये देखील आपला मंत्र आहे 'एक पृथ्वी, एक कुटुंब,एक भविष्य'. भारताचे हेच विचार, हेच संस्कार विश्व कल्याणाचा मार्ग प्रशस्त बनवत आहेत.
मित्रांनो,
देशातील सर्व राज्य सरकारे आणि सर्व राजकीय पक्षांना मी एक आग्रह करत आहे. हा कार्यक्रम केवळ केंद्र सरकारचा नाही. हा सर्व भारतीयांचा कार्यक्रम आहे. जी-20 आपल्यासाठी 'अतिथि देवो भव' या आपल्या परंपरेचे दर्शन घडविण्याची संधी आहे. जी-20 संबंधित कार्यक्रमाचे आयोजन केवळ दिल्ली आणि काही मोठ्या ठीकाणापर्यंत मर्यादित राहणार नाही. या अंतर्गत देशाच्या कानाकोपऱ्यात कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. आपल्या देशातील प्रत्येक राज्याची स्वतःची अशी वैशिष्ट्ये आहेत, परंपरा आहेत. प्रत्येक राज्याची स्वतःची अशी संस्कृती आहे, आपली सौंदर्य स्थळे आहेत, स्वतःची आभा आहे आणि पाहुणचाराची पद्धत आहे.
राजस्थानात पाहुणचाराचे आमंत्रण देताना- पधारो म्हारे देस! असे म्हणतात तर गुजरातचे प्रेमपूर्वक निमंत्रण - तमारु स्वागत छे! असे असते. हेच प्रेम केरळच्या मल्याळी भाषेतही - एल्लावर्क्कुम् स्वागतम्! असे दिसते. पश्चिम बंगालच्या गोड बांग्ला भाषेत - अपना के स्वागत ज़ानाई! असे स्वागत केले जाते, तर तामिळनाडू - कदएगल मुडि-वदिल्ऐ, थंगल वरव नल-वर-वाहुहअ! म्हणतो. यूपीचा आग्रह असतो की युपी नही देखा तो भारत नही देखा! हिमाचल प्रदेश तर आपणा सर्वांना प्रत्येक ऋतूत प्रत्येक कारणासाठी आमंत्रण देत असतो. उत्तराखंड तर स्वर्गासमान आहे. हे आतिथ्य, ही विविधता जगाला आश्चर्य चकित करते. जी-20 च्या माध्यमातून आपल्याला हे प्रेम जगापर्यंत पोहोचवायचे आहे.
मित्रांनो,
पुढच्या आठवड्यात मी इंडोनेशियाला जाणार आहे. तिथे औपचारिक रूपाने भारताला जी-20 चे अध्यक्षपद दिल्याची घोषणा केली जाणार आहे. मी देशातील सर्व राज्ये आणि राज्य सरकारांना आग्रह करतो की त्यांनी यामध्ये आपल्या राज्याचा जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा. या संधीचा आपल्या राज्यासाठी लाभ करून घ्यावा. देशातील सर्व नागरिक आणि बुद्धिवंतांनी या कार्यक्रमाचा भाग बनण्यासाठी पुढाकार घ्यावा. आत्ताच सुरु करण्यात आलेल्या संकेतस्थळावर तुम्ही सर्वजण आपले विचार व्यक्त करू शकता तसेच सूचना मांडू शकता.
भारत विश्व कल्याणात आपले योगदान कसे वाढवू शकतो ? या संबंधित आपल्या सूचना आणि सहभाग जी-20 सारख्या कार्यक्रमाच्या आयोजनाला सफलतेला नव्या उंचीवर पोहोचवेल. हे अध्यक्षपद केवळ भारतासाठीच स्मरणीय ठरेल असे नाही तर भविष्य देखील जगाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण यजमानत्व म्हणून याची नोंद करेल, असा मला विश्वास आहे.
या कामनेसह तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा!
खुप खुप धन्यवाद!