नमो राघवाय !
नमो राघवाय !
सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित पूजनीय जगद्गुरु श्री रामभद्राचार्यजी, इथे आलेली सर्व तपस्वी ज्येष्ठ संत मंडळी, ऋषी मंडळी, मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल, मुख्यमंत्री बंधू शिवराजजी, उपस्थित इतर सर्व मान्यवर आणि सभ्य स्त्री पुरुष हो!
मी चित्रकूटच्या परम पवित्र भूमीला पुन्हा वंदन करतो. माझं सद्भाग्य आहे, आज संपूर्ण दिवस मला वेगवेगळ्या मंदिरांमध्ये प्रभू श्रीरामांच्या दर्शनाची संधी मिळाली आणि संतांचा आशीर्वाद सुद्धा मिळाला आहे. विशेष करून जगद्गुरु रामभद्राचार्यजींचे जे प्रेम मला मिळत असते ते मला भारावून टाकते. श्रद्धास्थानी असलेल्या संत मंडळीहो, मला खूप आनंद वाटतोय की आज या पवित्र स्थानी मला जगद्गुरुजींच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्याची संधी सुद्धा मिळाली आहे, अष्टाध्यायी भाष्य, रामानंदाचार्य चरित्र आणि भगवान श्रीकृष्ण की राष्ट्र लीला, हे सर्व ग्रंथ भारताची महान ज्ञान परंपरा आणखी समृद्ध करतील. मी या पुस्तकांना जगद्गुरुजींच्या आशीर्वादाचे एक रूप मानतो. आपणा सर्वांचे या पुस्तकांच्या प्रकाशनानिमित्त मी अभिनंदन करतो.
माझ्या कुटुंबियांनो,
अष्टाध्यायी हा भारताचे भाषाशास्त्र, भारताची बौद्धिकता आणि आपल्या संशोधन संस्कृतीचा हजारो वर्ष जुना ग्रंथ आहे. एकेका सूत्रात व्याकरण कसे सामावले जाऊ शकते, भाषेचे रूपांतर 'संस्कृत विज्ञानात' कसे करता येते, महर्षी पाणिनी यांची ही हजारो वर्षे जुनी निर्मिती त्याचा पुरावा आहे. आपण बघतोच की या हजारो वर्षांत जगात किती भाषा आल्या आणि गेल्या! जुन्या भाषांची जागा नवीन भाषांनी घेतली. मात्र, आजही आपली संस्कृत भाषा तितकीच अक्षय्य आणि अचल आहे. कालानुरूप संस्कृत शुद्ध तर झाली, मात्र दूषित झाली नाही. याचे कारण म्हणजे संस्कृतचे परिपक्व व्याकरणशास्त्र. केवळ 14 माहेश्वर सूत्रांवर आधारित ही भाषा, हजारो वर्षांपासून शस्त्रे आणि शास्त्र यांच्या माहितीची जननी आहे. वेदांमधील श्लोक-ऋचा, संस्कृत भाषेतच ऋषीमुनींनी निर्मिले आहेत. पतंजलीने योगशास्त्र याच भाषेत मांडले आहे. या भाषेत, धन्वंतरी, चरक या ऋषींनी आयुर्वेदाचे सार लिहिले आहे. या भाषेत कृषी पाराशरसारख्या ग्रंथांनी शेतीला श्रमाबरोबरच संशोधनाशी जोडण्याचे काम केले आहे. याच भाषेत भरतमुनींकडून नाट्य आणि संगीतशास्त्राची भेट आपल्याला मिळाली आहे. या भाषेत कालिदासांसारख्या विद्वानांनी साहित्याच्या सामर्थ्याने जगाला चकित केले आहे. आणि अंतराळ विज्ञान, धनुर्विद्या आणि युद्धकलेवरील ग्रंथही याच भाषेत लिहिले गेले आहेत. आणि मी फक्त काही उदाहरणे दिली आहेत. ही यादी इतकी मोठी आहे की, एक राष्ट्र म्हणून भारताच्या विकासाच्या कुठल्याही पैलूत आपल्याला संस्कृतचे योगदान दिसेल. आजही जगातील मोठमोठ्या विद्यापीठांमध्ये संस्कृतवर संशोधन केले जाते. अलीकडेच आपण हे देखील पाहिले आहे की लिथुआनियाच्या राजदूताने भारत समजून घेण्यासाठी कशी संस्कृत भाषा शिकून घेतली आहे. याचाच अर्थ असा की संस्कृतचा प्रसार जगभर वाढत आहे.
एक हजार वर्षांच्या गुलामगिरीच्या कालखंडात भारताचे समूळ उच्चाटन करण्याचे विविध प्रयत्न झाले. यापैकी एक म्हणजे संस्कृत भाषेचा संपूर्ण नाश करण्याचा प्रयत्न! आपण स्वतंत्र झालो, मात्र गुलामगिरीची मानसिकता मनातून न गेलेल्यांनी संस्कृतचा द्वेष कायम ठेवला. लुप्त होत चाललेल्या एखाद्या भाषेचा शिलालेख कुठेही सापडला तर हेच लोक तिचा गौरव करतात, मात्र हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या संस्कृतचा मान राखत नाहीत. इतर देशांतील लोकांनी आपापल्या मातृभाषेचा अभिमान बाळगला तर हे लोक कौतुक करतील, मात्र संस्कृत भाषा अवगत असणे हे मागासलेपणाचे लक्षण मानतात. या मानसिकतेचे लोक गेली एक हजार वर्षे पराभूत होत आले आहेत आणि भविष्यातही ते यशस्वी होणार नाहीत.
संस्कृत केवळ परंपरांची भाषा नाही तर ती आपल्या प्रगतीची आणि आपला परिचय करून देणारी भाषा आहे. गेल्या 9 वर्षात आम्ही संस्कृत भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी व्यापक प्रयत्न केले आहेत. आधुनिक संदर्भात अष्टाध्यायी भाष्य सारखे ग्रंथ या प्रयत्नांना सफल बनवण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावतील.
माझ्या कुटुंबीयांनो,
रामभद्राचार्य जी आपल्या देशातील असे संत आहेत, ज्यांच्याकडे असलेल्या ज्ञानाच्या भांडारावर जगातील अनेक विद्यापीठे अभ्यासपूर्ण संशोधन करु शकतील. लहानपणापासूनच भौतिक दृष्टी नसून देखील त्यांचे प्रज्ञा चक्षु इतके विकसित आहेत की संपूर्ण वेद - वेदांग त्यांना मुखोद्गत आहेत. त्यांनी शेकडो ग्रंथांची रचना केली आहे. भारतीय ज्ञान आणि दर्शनात 'प्रस्थानत्रयी' या ग्रंथाला मोठमोठ्या विद्वानांनीसाठी देखील कठीण असल्याचे मानले गेले आहे. जगद्गुरू जी नी आपले भाष्य देखील आधुनिक भाषेमध्ये लिहिले आहे. या स्तरावरचे ज्ञान, अशी बुद्धिमत्ता व्यक्तिगत असु शकत नाही. ही बुद्धीमत्ता संपूर्ण राष्ट्राचा अमुल्य ठेवा असते. आणि म्हणूनच आमच्या सरकारने 2015 साली स्वामीजीना पद्मविभुषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.
धर्म आणि अध्यात्माच्या क्षेत्रात स्वामीजी जितके सक्रिय असतात तितकेच ते समाज आणि राष्ट्राच्या मुद्द्यांबाबत स्पष्टवादी आहेत. मी जेव्हा आपल्याला स्वच्छ भारत अभियानच्या 9 रत्नांमध्ये सामिल केले होते तेव्हा ती जबाबदारी देखील आपण तितक्याच समर्थपणे आणि निष्ठेने पेलली होती. स्वामीजीनी देशाचा गौरव वर्धित करण्यासाठी जे निर्णय घेतले होते ते पूर्णत्वास जात आहेत, यांचा मला आनंद आहे. आपला भारत आता स्वच्छ बनत आहे आणि स्वस्थ देखील बनत आहे. गंगा मातेचा प्रवाह देखील आता निर्मल होतो आहे. प्रत्येक देशवासीयाचे आणखी एक स्वप्न पूर्ण करण्यात जगद्गुरू रामभद्राचार्य यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. ज्या राम मंदिरासाठी आपण न्यायालयात आणि न्यायालयाबाहेर इतके योगदान दिले ते देखील बांधून पूर्ण होत आहे. आणि आता अगदी दोन दिवसांपूर्वीच मला श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाकडून प्राण प्रतिष्ठा समारंभात उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण मिळाले आहे. यालाही मी आपले खुप मोठे भाग्य समजतो. सर्व संतगण , स्वातंत्र्याच्या 75 वर्षांपासून स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपर्यंतच्या सर्वात महत्वपूर्ण कालखंडात म्हणजेच 25 वर्ष , देश ज्याला अमृत काळाच्या रुपात पाहतो आहे. या अमृत काळात देश विकास आणि आपला वारसा सोबत घेवून पुढे वाटचाल करत आहे. आम्ही आपल्या तिर्थक्षेत्रांच्या विकासाला देखील प्राधान्य देत आहोत. चित्रकुट तर असे स्थान आहे जिथे आध्यात्मिक आभा देखील आहे आणि निसर्ग सौंदर्य देखील आहे. 45 हजार कोटी रुपयांचा केन बेतवा जोडणी प्रकल्प असो, बुंदेलखंड द्रुतगती महामार्ग असो, संरक्षण कॉरिडॉर असो, अशा प्रयत्नांमुळे या भागात नव्या संधी निर्माण होतील. चित्रकुट प्रदेश विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचावा अशी माझी कामना आणि प्रयत्न आहेत. पुज्य जगद्गुरू श्री रामभद्राचार्य जी यांना मी पुन्हा एकदा आदरपूर्वक नमस्कार करतो. त्यांच्या आशीर्वादातून आपल्या सर्वांना प्रेरणा मिळो, शक्ती मिळो आणि त्यांच्या ज्ञानाचा प्रसाद आपल्याला निरंतर मार्गदर्शनच्या रुपात मिळत राहो. हीच भावना प्रकट करत मी तुम्हा सर्वांचे हृदयपूर्वक खूप खूप आभार मानतो.
जय सिया राम.