केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, आर्थिक विकास संस्थेचे अध्यक्ष एन.के. सिंग, या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशभरातून तसेच परदेशातून आलेले इतर मान्यवर, आणि उपस्थित सभ्य स्त्री-पुरुषहो,
कौटिल्य परिषदेचे ते तिसरे वर्ष आहे. या निमित्ताने तुम्हा सर्वांना भेटण्याची संधी मिळत आहे ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. येत्या तीन दिवसांत या परिषदेत विविध सत्रे आयोजित होणार असून त्यामध्ये अर्थव्यवस्थेशी संबंधित विविध विषयांवर साधकबाधक चर्चा होईल. भारताच्या विकासाला गती देण्यासाठी या चर्चा उपयुक्त ठरतील असा विश्वास मला वाटतो.
मित्रांनो,
यावर्षी ही परिषद आयोजित होत असताना जगातील दोन मोठे प्रदेश युद्धस्थितीत गुंतलेले आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेसाठी विशेषतः उर्जा सुरक्षेच्या संदर्भात हे दोन्ही प्रदेश महत्त्वाचे आहेत. जागतिक पातळीवरील अशा प्रचंड अनिश्चिततेच्या वातावरणात, आपण येथे भारतीय युगाची चर्चा करत आहोत. जगाला आज भारतावर वेगळ्याच प्रकारचा विश्वास वाटत आहे. आणि आज भारताचा आत्मविश्वास काही वेगळाच आहे हे यातून दिसून येत आहे.
मित्रांनो,
भारत ही आजघडीला जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या बाबतीत सध्या भारत जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. जागतिक पातळीवर फिनटेकच्या स्वीकाराच्या बाबतीत आपण प्रथम क्रमांकावर आहोत. तसेच स्मार्टफोनद्वारे डाटा वापराच्या बाबतीत आज आपण जगात प्रथम स्थानी आहोत. इंटरनेट वापरणाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत आपण जगात दुसऱ्या स्थानी आहोत. जगात होणाऱ्या वास्तव वेळातील एकूण डिजिटल व्यवहारांपैकी जवळजवळ निम्मे व्यवहार आज भारतात होत आहेत. जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्ट अप परिसंस्था आज भारतात आहे. नवीकरणीय उर्जा क्षमतेच्या बाबतीत देखील भारत जगात चौथ्या स्थानी आहे. उत्पादन क्षेत्राबद्दल बोलायचे झाले तर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाईल फोन उत्पादक देश आहे. दुचाकी वाहने आणि ट्रॅक्टर्स यांचा भारत सर्वात मोठा उत्पादक आहे. एवढेच नव्हे तर भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांचा जगातील तिसरा सर्वात मोठा संचय भारतामध्ये आहे.म्हणजेच विज्ञान असो, तंत्रज्ञान असो किंवा नवोन्मेष, भारताने प्रत्येक बाबतीत स्पष्टपणे उत्तम उंची गाठली आहे.
मित्रांनो,
सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तन हा मंत्र अवलंबत आपण सातत्याने निर्णय घेत आहोत, देशाला जलदगतीने पुढे घेऊन चाललो आहोत. याचाच परिणाम म्हणून देशातील जनतेने 60 वर्षांनंतर प्रथमच एखादे सरकार सलग तिसऱ्यांदा पुन्हा निवडून आणले आहे. जेव्हा लोकांच्या जीवनात चांगले बदल घडून येतात तेव्हा लोकांना असा विश्वास वाटू लागतो की आपला देश योग्य मार्गावरून वाटचाल करत आहे. हीच भावना भारतातील लोकांनी दिलेल्या आदेशावरून दिसून येते. देशातील 140 कोटी नागरिकांचा हा विश्वास म्हणजे या सरकारकडे असलेली प्रचंड ठेव आहे. भारताला विकसित देश म्हणून घडवण्याच्या दिशेने आम्ही सतत संरचनात्मक सुधारणा करत राहण्यासाठी कटिबद्ध असू. आमची ही कटिबद्धता, आमच्या सरकारने तिसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये केलेल्या कार्यांवरून दिसून येईल. धाडसी धोरणात्मक बदल, नोकऱ्या आणि कौशल्ये यांच्याप्रती सशक्त कटिबद्धता, शाश्वत वृद्धी आणि नवनिर्माण यांच्यावर एकाग्र केलेले लक्ष, आधुनिक पायाभूत सुविधा, जीवनमानाचा दर्जा आणि वेगवान वाढीतील सातत्य यातून आमच्या पहिल्या तीन महिन्यांमधील धोरणांचे दशन घडेल.याच तीन महिन्यांमध्ये 15 ट्रिलीयन रुपये म्हणजेच 15 लाख कोटी रुपयाहून अधिक मूल्याच्या कामांचे निर्णय घेण्यात आले. याच तीन महिन्यांमध्ये देशात पायाभूत सुविधाविषयक अनेक महाप्रचंड प्रकल्पांचे काम सुरु झाले आहे. आम्ही देशात 12 औद्योगिक नोड्सची निर्मिती करण्याचा देखील निर्णय घेतला आहे. देशात 3 कोटी नव्या घरांच्या उभारणीला देखील आम्ही मंजुरी दिली आहे.
मित्रांनो,
भारताच्या वृद्धीगाथेचा आणखी एक उल्लेखनीय घटक आहे आणि तो म्हणजे देशाचे समावेशक चैतन्य. पूर्वीच्या काळात लोकांचा असा विचार होता की विकास झाला की त्यासोबत असमानता देखील वाढत जाते. भारतात मात्र, विकासासोबत समावेशन देखील वाढत आहे. याचाच परिणाम म्हणून गेल्या दहा वर्षांत 25 कोटी म्हणजेच अडीचशे दशलक्ष लोक दारिद्यरेषेच्या बाहेर पडले आहेत. भारताच्या वेगवान प्रगतीसोबतच देशातील असमानता कमी होईल आणि विकासाचे लाभ प्रत्येकाला मिळतील याची देखील सुनिश्चिती आम्ही करून घेत आहोत.
मित्रांनो,
भारताच्या वृद्धीबाबत सध्या जे अंदाज व्यक्त होत आहेत, त्यातून व्यक्त होणारा विश्वास भारत कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे त्याकडे निर्देश करतो आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये आणि महिन्यांमध्ये झालेल्या कामांच्या आकडेवारीतून देखील तुम्हाला हे दिसून येईल. आपल्या अर्थव्यवस्थेने गेल्या वर्षी जाणकारांनी व्यक्त केलेल्या अंदाजांपेक्षा कितीतरी उत्तम कामगिरी केली. जागतिक बँक असो, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असो किंवा मूडीज ही संस्था असो, सर्वांनीच भारताशी संबंधित अंदाजांचे अद्यायावतीकरण केले आहे. या सगळ्या संस्था असे सांगतात की जागतिक पातळीवर अनिश्चिततेची परिस्थिती असूनही भारत सात टक्क्याहून अधिक दराने विकसित होत राहील. तसाही आपण भारतीयांना पूर्ण विश्वास आहे की आपण याहीपेक्षा कितीतरी अधिक उत्तम कामगिरी करून दाखवू.
मित्रांनो,
भारताच्या या आत्मविश्वासामागे काही भक्कम कारणे आहेत. निर्मिती क्षेत्र असो किंवा सेवा क्षेत्र, संपूर्ण जग आज प्रत्येक क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी भारताला प्राधान्यक्रम देत आहे. हा निव्वळ योगायोग नाही, तर गेल्या दहा वर्षांत करण्यात आलेल्या मोठ्या सुधारणांचा परिपाक आहे. या सुधारणांनी भारताची मॅक्रोइकोनॉमिक मुलभूत तत्वांमध्ये मोठा बदल घडवून आणला आहे. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे भारतातील बँकिंग क्षेत्रातील सुधारणा. बँकिंग क्षेत्रातील सुधारणांनी केवळ बँकांची आर्थिक स्थिती मजबूत केली नाही तर त्यांची कर्ज देण्याची क्षमता देखील वाढवली आहे. याच पद्धतीने, वस्तू आणि सेवा करामुळे (जीएसटी) विविध केंद्रीय आणि राज्य पातळीवरील अप्रत्यक्ष करांचे एकत्रीकरण झाले आहे. तसेच नादारी आणि दिवाळखोरी संहितेमुळे (आयबीसी)देशात जबाबदारी, पुनर्लाभ आणि निश्चय यांच्या आधारावरील नवी कर्जसंस्कृती विकसित झाली आहे. भारताने खासगी क्षेत्र तसेच देशातील तरुण उद्योजकांसाठी खनन, संरक्षण, अवकाश अशी अनेक क्षेत्रे खुली केली आहेत. आम्ही थेट परदेशी गुंतवणूक (एफडीआय)धोरणाचे उदारीकरण केले, जेणेकरून, जागतिक गुंतवणूकदारांसाठी देशात अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्या. देशात लॉजिस्टिक्सवर होणारा खर्च तसेच लागणारा वेळे यांची बचत करण्याच्या दृष्टीने आम्ही आधुनिक पायाभूत सुविधांवर अधिक लक्ष केंद्रित करत आहोत. आम्ही गेल्या दशकभरात पायाभूत सुविधा क्षेत्रात करण्यात आलेल्या गुंतवणुकीमध्ये अभूतपूर्व वाढ केली आहे.
मित्रांनो,
भारताने “प्रक्रियाविषयक सुधारणां”ना, सरकारच्या सातत्यपूर्ण उपक्रमांचा एक भाग बनवले आहे. आम्ही 40,000 हून अधिक अनुपालनविषयक नियम रद्द केले, आणि कंपनी कायद्यातील तरतुदी गुन्हेगारीच्या व्याख्येतून वगळल्या. आधी अशा डझनभर तरतुदी अस्तित्वात होत्या ज्यांच्यामुळे व्यवसाय करणे जाचक वाटत असे, आम्ही त्यात सुधारणा केल्या. कोणतीही कंपनी सुरू करताना तसेच बंद करताना आवश्यक असलेली मंजुरी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी राष्ट्रीय एक खिडकी प्रणाली सुरु करण्यात आली. आता आम्ही राज्य पातळीवर ‘प्रक्रियाविषयक सुधारणांना’ गती देण्यासाठी राज्य सरकारांना प्रोत्साहन देत आहोत.
मित्रांनो,
भारतातील निर्मिती क्षेत्राला चालना देण्यासाठी आम्ही उत्पादनावर आधारित प्रोत्साहन अनुदान योजना सुरु केली आहे.
याचा प्रभाव आज अनेक क्षेत्रांवर दिसून येत आहे. जर गेल्या 3 वर्षातील उत्पादन आधारित प्रोत्साहनाच्या प्रभावाबाबत बोलायचे झाले तर सुमारे 1.25 ट्रिलियन म्हणजेच सव्वा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. यामुळे सुमारे 11 ट्रिलियन म्हणजेच 11 लाख कोटी रुपये मूल्याचे उत्पादन आणि विक्रय झाले आहे. अंतराळ आणि संरक्षण क्षेत्रात देखील आज भारत शानदार गतीने प्रगती करत आहे. ही दोन्ही क्षेत्रे खुली केलेल्याला जास्त काळ लोटलेला नाही. अंतराळ क्षेत्रात 200 हून अधिक स्टार्ट अप्स सुरू झाले आहेत. आज आपल्या एकूण संरक्षण उत्पादनात 20% योगदान खाजगी संरक्षण कंपन्यांचे आहे.
मित्रांनो,
इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राची प्रगती गाथा तर अजूनच अद्भूत आहे. 10 वर्षांपूर्वीपर्यंत भारत मोबाईल फोनचा खूप मोठा आयातदार होता. आज 330 मिलियन म्हणजेच 33 कोटीहून अधिक मोबाईल फोन भारतात तयार होत आहेत. तुम्ही उदाहरणादाखल कोणतेही क्षेत्र घ्या, आज भारतात गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीच्या आणि गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा मिळवण्याच्या अनेक सुसंधी उपलब्ध आहेत.
मित्रांनो,
आज भारत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सेमीकंडक्टर सारख्या गहन तंत्रज्ञानावर देखील आपले लक्ष केंद्रित करत आहे. या क्षेत्रांमध्ये आम्ही खूप जास्त गुंतवणूक करत आहोत. आमच्या कृत्रिम बुद्धिमत्ता अभियानामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात संशोधन आणि कौशल्य या दोन्हीमध्ये वृद्धी होईल. भारतात सेमीकंडक्टर अभियानामुळे 1.5 ट्रिलियन रुपये म्हणजे दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होत आहे. लवकरच भारताचे 5 सेमीकंडक्टर प्रकल्प, भारतात तयार झालेल्या चिप्स जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवू लागतील.
मित्रांनो,
भारत माफक बौद्धिक शक्तीचा सर्वात मोठा स्रोत आहे हे आपण सर्वजण जाणताच. ज्याची साक्ष भारतात कार्यरत असणारी जगभरातील कंपन्यांची 1700 हुन अधिक जागतिक क्षमता केंद्रे देतील. याद्वारे दोन मिलियन अर्थात वीस लाखाहून अधिक भारतीय युवक जगाला अत्यंत कुशल सेवा प्रदान करत आहेत. आज भारत आपल्या या लोकसंख्या लाभांशावर अभूतपूर्व रूपाने लक्ष केंद्रित करत आहे. आणि यासाठी शिक्षण, नवोन्मेष, कौशल्य आणि संशोधनावर विशेष लक्ष दिले जात आहे. आम्ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची निर्मिती करून या क्षेत्रात खूप मोठी क्रांती घडवली आहे. गेल्या दहा वर्षात प्रत्येक आठवड्यात एक नवीन विद्यापीठ आणि दररोज दोन नवी महाविद्यालय उघडली आहेत. या दहा वर्षात आपल्या देशात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या दुप्पट झाली आहे.
आणि मित्रांनो,
केवळ परिमाणात्मक नाही तर दर्जेदार शिक्षणावर देखील आम्ही तितकाच भर देत आहोत. म्हणूनच गेल्या दहा वर्षांत क्युएस जागतिक विद्यापीठ क्रमवारीतील भारतीय संस्थांची संख्या तीपटीहून अधिक वाढली आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पात आम्ही करोडो तरुणांचे कौशल्य आणि अंतर्वासिता यासाठी विशेष निधी जाहीर केला आहे. पंतप्रधान आंतर्वासिता योजने अंतर्गत पहिल्याच दिवशी 111 कंपन्यांनी आपले नाव पोर्टलवर नोंदवले आहे. या योजनेअंतर्गत आम्ही एक कोटी युवकांना मोठ्या कंपन्यांमध्ये आंतर्वासिता मिळवून देण्यासाठी मदत करत आहोत.
मित्रांनो,
गेल्या दहा वर्षात भारताचे संशोधन निष्कर्ष आणि पेटेंट्स ची संख्या जलद गतीने वाढली आहे. दहा वर्षाहूनही कमी काळात, भारत जागतिक नवोन्वेष निर्देशांकाच्या गुणवत्ता यादीत 81 वरून 39 व्या स्थानावर पोहोचला आहे. आपल्याला येथूनही पुढे वाटचाल करायची आहे. आपल्या संशोधन परिसंस्थेला मजबूत करण्यासाठी भारताने एक ट्रिलियन म्हणजेच एक लाख कोटी रुपयांचा संशोधन फंड बनवला आहे.
मित्रांनो,
आज हरित भविष्य आणि हरित रोजगाराच्या संबंधात देखील भारतात आणि भारताकडून खूप अपेक्षा केल्या जात आहेत. तुम्हा सर्वांसाठी या क्षेत्रात देखील संधी आहेत. तुम्ही सर्वांनी भारताच्या अध्यक्षतेच्या कार्यकाळात पार पडलेल्या जी - 20 शिखर परिषदेचा आढावा घेतला असेलच. या शिखर परिषदेच्या अनेक यशोगाथांपैकी एक असणाऱ्या हरित संक्रमण संदर्भात नवा उत्साह पहायला मिळाला होता. जी - 20 शिखर परिषदेदरम्यान, भारताच्या पुढाकाराने जागतिक जैवइंधन आघाडीचा प्रारंभ करण्यात आला. जी - 20 च्या सदस्य देशांनी भारताच्या हरित हायड्रोजन ऊर्जा विकासाला जबरदस्त पाठिंबा दिला. आम्ही या वर्षाच्या शेवटपर्यंत भारतात 5 दशलक्ष टन हरित हायड्रोजनच्या उत्पादनाचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. भारतात आम्ही सौर ऊर्जा उत्पादनाला देखील सुक्ष्म स्तरावर पोहोचवणार आहोत.
भारत सरकारने प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजना सुरू केली आहे. ही रूफटॉप सौर ऊर्जा योजना आहे, पण या योजनेची व्याप्ती मात्र खूप मोठी आहे. रूफटॉप सौर ऊर्जा यंत्रणेसाठी आम्ही प्रत्येक कुटुंबाला निधी देत आहोत, सोलर इंफ्राची जुळवणी करण्यासाठी देखील आम्ही मदत करत आहोत. आजवर 13 मिलियन म्हणजेच एक कोटी तीस लाखाहून अधिक कुटुंबांनी या योजनेच्या लाभासाठी आपले नाव नोंदवले आहे. म्हणजे इतके लोक सौर ऊर्जेचे निर्माते बनले आहेत. यामुळे प्रत्येक कुटुंबाला सर्वसाधारणपणे 25,000 रुपयांची बचत करता येणार आहे. प्रत्येक 3 किलो वॅट सौर ऊर्जेच्या उत्पादनामागे 50-60 टन कार्बन डाय-ऑक्साइड उत्सर्जन कमी होणार आहे. या योजनेमुळे सुमारे 17 लाख रोजगार निर्माण होतील आणि कौशल्यपूर्ण तरुणांची देखील एक मोठी फळी तयार होईल. तुमच्यासाठी या क्षेत्रात देखील गुंतवणूक करण्याच्या नवीन संधी निर्माण होत आहेत.
मित्रांनो,
आज भारतीय अर्थव्यवस्था खूप मोठ्या स्थित्यंतराचा काळ अनुभवत आहे. मजबूत आर्थिक मूलभूत तत्वांच्या आधारावर भारतीय अर्थव्यवस्था शाश्वत उच्च वाढीच्या मार्गावर वाटचाल करत आहे. भारत आज केवळ शिर्ष स्थानावर पोहोचण्यासाठी मेहनत करत नाही तर ते शिर्ष स्थान कायम राखण्यासाठी मेहनत करत आहे. प्रत्येक क्षेत्रात आज जगासाठी अनेक संधी आहेत. भविष्यात तुमच्या चर्चेतून अनेक अमुल्य निष्कर्ष निघतील याचा मला विश्वास आहे. मी या प्रयत्नांसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि तुम्हाला यांची खात्री देऊ इच्छितो की हा काही वादविवाद मंच नाही. येथे ज्या कोणत्या मुद्यावर चर्चा होतात, त्यातून जी बाब अधोरेखित होते, किंवा काय करावे आणि काय टाळावे हे सांगितले जाते, त्यातून जे आमच्यासाठी उपयोगाचे असते त्याचे सरकारी व्यवस्थेत आम्ही मन:पूर्वक पालन करतो. आम्ही त्या बाबींचा समावेश आमच्या धोरणांमध्ये करतो, आमच्या प्रशासकीय प्रणालीत समाविष्ट करून घेतो, आणि म्हणूनच तुम्ही तुमचा अमुल्य वेळ देऊन जे विचार मंथन करता ते अमृतासमान आहे. तुमच्या मंथनातील निष्कर्षांचा उपयोग आम्ही आपल्या देशात आपले भविष्य अधिक ओजस्वी बनवण्यासाठी करतो, म्हणूनच तुमचे योगदान आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तुमचा प्रत्येक शब्द आमच्यासाठी मौल्यवान आहे. तुमचे विचार आणि तुमचे अनुभव हेच आमचे धन आहे. मी पुन्हा एकदा तुमच्या या योगदानासाठी तुम्हा सर्वांचे आभार मानतो, या प्रयत्नांसाठी मी एन. के. सिंह आणि त्यांच्या संपूर्ण चमूला खूप खूप शुभेच्छा देतो. खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद!