माझ्या प्रिय देशवासियांनो,
मानवतेसमोर असे फार कमी प्रसंग येतात ज्यावेळी काळाचे चक्र आपल्याला भूतकाळ सुधारून नव्या भविष्याच्या निर्मितीची संधी देत असते. आज नशीबाने आपल्या समोर असाच एक क्षण आहे.
अनेक दशकांपूर्वी जैव-विविधतेची जी साखळी खंडित झाली होती, विलुप्त झाली होती, आज आपल्याला ती साखळी पुन्हा जोडण्याची संधी मिळाली आहे.
आज भारताच्या भूमीवर चित्ते परतले आहेत आणि मी तर हे देखील म्हणेन की या चित्त्यांबरोबरच भारताची निर्सगप्रेमाची भावना संपूर्ण ताकदीनिशी जागृत झाली आहे. मी या ऐतिहासिक क्षणी सर्व देशवासियांना शुभेच्छा देत आहे.
विशेषतः आपला मित्र देश नामिबिया आणि तेथील सरकारचे देखील मी आभार मानत आहे ज्यांच्या सहकार्याने अनेक दशकांनंतर चित्ते भारताच्या भूमीवर परतले आहेत.
मला खात्री आहे, हे चित्ते आपल्याला निसर्गाप्रति आपल्या जबाबदाऱ्यांची केवळ जाणीवच करून देणार नाहीत तर आपली मानवी मूल्ये आणि परंपरांचा देखील परिचय करून देतील.
मित्रांनो,
ज्यावेळी आपण आपल्या मुळांपासून दूर जातो त्यावेळी आपण बरेच काही गमावतो. म्हणूनच स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात आपण आपल्या वारशाचा अभिमान आणि गुलामगिरीच्या मानसिकतेपासून मुक्तीसारख्या पंच प्रणांच्या महत्त्वाचा पुनरुच्चार केला आहे. गेल्या शतकांमध्ये आपण तो काळ देखील पाहिला आहे ज्या काळात निसर्गाची हानी करण्याला सामर्थ्याचे प्रदर्शन आणि आधुनिकतेचे प्रतीक मानले जात होते.
1947 मध्ये जेव्हा देशात शेवटचे तीन चित्ते शिल्लक राहिले होते, त्यांची देखील सालच्या जंगलात अतिशय निष्ठुरतेने आणि बेजबाबदारपणे शिकार करण्यात आली. ही बाब अतिशय दुर्दैवी आहे की आपण 1952 मध्ये चित्ते नामशेष झाल्याचे जाहीर केले पण त्यांच्या पुनर्वसनासाठी अनेक दशके कोणतेही योग्य प्रयत्न झाले नाहीत. आज स्वातंत्र्याच्या अमृतकाळात देश नव्या उर्जेने चित्त्यांच्या पुनर्वसनासाठी काम करत आहे. अमृतामध्ये ते सामर्थ्य असते जे मृताला देखील पुन्हा जिवंत करते. स्वातंत्र्याच्या अमृतकाळात कर्तव्य आणि विश्वासाचे हे अमृत आपल्या वारशाला, आपल्या वारसास्थळांना आणि आत्ता चित्त्यांना देखील भारताच्या भूमीवर पुनरुज्जीवित करत आहे.
यामागे आपले अनेक वर्षांचे कष्ट आहेत. एक असे काम, ज्याला राजकीय दृष्टीकोनातून कोणीही महत्त्व दिले नाही, त्याच्या मागे आम्ही खूप उर्जा लावली आहे. यासाठी एक विस्तृत चित्ता कृती आराखडा तयार करण्यात आला. आपल्या शास्त्रज्ञांनी प्रदीर्घ काळ दक्षिण आफ्रिकी आणि नामिबियन तज्ञांसोबत काम केले. आमची पथके तेथे गेली, त्यांचे तज्ञ देखील आपल्याकडे भारतात आले. संपूर्ण देशात चित्त्यांसाठी सर्वात उपयुक्त अशी जागा शोधण्यासाठी शास्त्रीय सर्वेक्षण करण्यात आले आणि त्यानंतर कुनो राष्ट्रीय उद्यानाची निवड या शुभ सुरुवातीसाठी करण्यात आली. आज आमचे ते कष्ट परिणामांच्या रुपात आपल्या समोर आहेत.
मित्रांनो,
ही गोष्ट खरी आहे की ज्यावेळी निसर्गाचे आणि पर्यावरणाचे रक्षण होते त्यावेळी आपले भविष्य देखील सुरक्षित होते. विकास आणि समृद्धीचे मार्ग देखील खुले होत जातात. कुनो राष्ट्रीय उद्यानात जेव्हा चित्ते पुन्हा धावू लागतील त्यावेळी येथील grassland eco-system पुन्हा प्रस्थापित होईल, जैव-विविधता आणखी वाढेल. येणाऱ्या काळात या ठिकाणी इको-टुरीझम देखील वाढेल, विकासाच्या नव्या शक्यता निर्माण होतील, रोजगाराच्या संधी वाढतील. पण मित्रांनो, मी तुम्हा सर्वांना, सर्व देशवासियांना एक विनंती करत आहे. कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आलेले चित्ते पाहण्यासाठी देशवासियांना काही महिन्यांचा संयम दाखवावा लागेल, वाट पहावी लागेल. आज हे चित्ते पाहुणे म्हणून आले आहेत, हा भाग त्यांच्या परिचयाचा नाही, कुनो राष्ट्रीय उद्यानाला आपले घर बनवता यावे यासाठी या चित्त्यांना काही महिन्यांचा कालावधी द्यावा लागेल. आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक नियमांचे पालन करत या चित्त्यांचे पुनर्वसन करण्याचे पुरेपूर प्रयत्न भारत करत आहे. आपल्याला आपले प्रयत्न अयशस्वी होऊ द्यायचे नाही आहेत.
मित्रांनो,
जग आज ज्यावेळी निसर्ग आणि पर्यावरणाकडे पाहते त्यावेळी शाश्वत विकासाविषयी बोलले जात असते. मात्र, निसर्ग आणि पर्यावरण, पशू आणि पक्षी हे भारतासाठी केवळ शाश्वत आणि security चे विषय नाहीत. आपल्यासाठी हा आपल्या sensibility आणि spirituality चा देखील हा आधार आहे. आपण ते लोक आहोत ज्यांचे सांस्कृतिक अस्तित्व 'सर्वम् खल्विदम् ब्रह्म' या मंत्रावर टिकलेले आहे.
म्हणजेच प्राणी-पक्षी, झाडे - झुडपे, देह -भान, जगात जे काही आहे, ते भगवंताचे रूप आहे, आपला स्वतःचाच विस्तार आहे आपण असे लोक आहोत जे म्हणतात-
'परम् परोपकारार्थम्
यो जीवति स जीवति'।
म्हणजेच स्वतःचा फायदा लक्षात घेऊन जगणे हे खरे जीवन नाही. खरे जीवन तेच जगतात जे परोपकारासाठी जगतात. म्हणूनच, स्वतः जेवण्यापूर्वी, आपण प्राणी आणि पक्ष्यांसाठी अन्न बाजूला काढून ठेवतो. आजूबाजूला राहणार्या अगदी लहान प्राण्यांचीही काळजी घ्यायला आपल्याला शिकवले जाते. आपले संस्कारच असे आहेत की, विनाकारण कोणाला जीव गमवावा लागला तर आपल्यामध्ये अपराधीपणाची भावना निर्माण होते. मग जर आपल्यामुळे कोणत्याही एका प्राणी प्रजातीचे संपूर्ण अस्तित्वच नष्ट झाले तर हे आपण कसे स्वीकारू शकतो?
तुम्ही विचार करा, इथल्या कितीतरी मुलांना हे माहीतही नसेल की, ज्या चित्त्याबद्दल ते ऐकून मोठे होत आहेत, तो गेल्या शतकातच त्यांच्या देशातून नाहीसा झाला आहे. आज आफ्रिकेतील काही देशांमध्ये, इराणमध्ये चित्ते आढळतात, पण त्या यादीतून भारताचे नाव फार पूर्वीच काढून टाकण्यात आले आहे. येत्या काही वर्षांत मुलांना या उपरोधाचा सामना करावा लागणार नाही. मला विश्वास आहे की, ही मुले कुनो राष्ट्रीय प्राणी संग्रहालयामध्ये, त्यांच्याच देशात चित्त्याला धावताना बघू शकतील. आज आपल्या जंगलातील आणि जीवनातील एक मोठी पोकळी चित्त्याच्या माध्यमातून भरून काढली जात आहे.
मित्रांनो,
अर्थव्यवस्था आणि पर्यावरण हे परस्परविरोधी क्षेत्र नाहीत, हा संदेश आज 21 व्या शतकात भारत संपूर्ण जगाला देत आहे. पर्यावरण संरक्षणासोबतच देशाची प्रगतीही होऊ शकते, हे भारताने जगाला दाखवून दिले आहे. आज आपण जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहोत. त्याचबरोबर देशातील वनक्षेत्रही झपाट्याने विस्तारत आहे.
मित्रांनो,
अर्थव्यवस्था आणि पर्यावरण हे परस्परविरोधी क्षेत्र नाहीत, हा संदेश आज 21 व्या शतकात भारत संपूर्ण जगाला देत आहे. पर्यावरण संरक्षणासोबतच देशाची प्रगतीही होऊ शकते, हे भारताने जगाला दाखवून दिले आहे. आज आपण जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहोत. त्याचबरोबर देशातील वनक्षेत्रही झपाट्याने विस्तारत आहे.
मित्रांनो,
2014 मध्ये आमचे सरकार स्थापन झाल्यापासून देशात सुमारे 250 नवीन संरक्षित क्षेत्रे निर्माण झाली आहेत. आपल्या येथे आशियाई सिंहांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. आज गुजरात हा आशियाई सिंहांचे मोठे क्षेत्र म्हणून देशात उदयाला आले आहे. यामागे अनेक दशकांची मेहनत, संशोधनावर आधारित धोरणे आणि लोकसहभाग यांचे मोठे योगदान आहे. मला आठवते की, आम्ही गुजरातमध्ये एक संकल्प घेतला होता - आपण वन्य प्राण्यांबद्दलचा आदर वाढवू आणि संघर्ष कमी करू. त्या विचाराचे फलित आज आपल्यासमोर आहे. देशातही वाघांची संख्या दुप्पट करण्याचे जे उद्दिष्ट आपण निर्धारित केले होते, आपण ते वेळेच्या आधीच साध्य केले आहे.एकेकाळी आसाममध्ये एकशिंगी गेंड्यांचे अस्तित्व धोक्यात आले होते, पण आज त्यांची संख्याही वाढली आहे. गेल्या काही वर्षांत हत्तींची संख्याही वाढून 30 हजारांहून अधिक झाली आहे.
बंधू आणि भगिनींनो,
निसर्ग आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून देशात आणखी एक मोठे काम केले गेले आहे ते म्हणजे पाणथळ क्षेत्राचा विस्तार. केवळ भारतातच नाही तर जगभरातील कोट्यवधी लोकांचे जीवन आणि गरजा पाणथळ क्षेत्राच्या पर्यावरणावर अवलंबून आहेत. आज देशातील 75 पाणथळ क्षेत्र रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आली आहेत, त्यापैकी 26 स्थळांची गेल्या 4 वर्षांत भर पडली आहे.देशाच्या या प्रयत्नांची निष्पत्ती पुढील शतकांपर्यंत दिसून येईल आणि प्रगतीचे नवे मार्ग प्रशस्त करेल.
मित्रांनो,
आज आपल्याला जागतिक समस्यांकडे, उपायांकडे आणि आपल्या आयुष्याकडेही सर्वसमावेशक दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे. म्हणूनच, आज भारताने जगाला लाइफ म्हणजेच पर्यावरणस्नेही जीवनपद्धती असा जीवन-मंत्र दिला आहे. आज आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसारख्या प्रयत्नांतून भारत जगाला एक व्यासपीठ, दृष्टीकोन देत आहे. या प्रयत्नांचे यश जगाची दिशा आणि भविष्य निश्चित करेल. त्यामुळे आज जागतिक आव्हानांचा केवळ जगाचीच नाहीत तर आपली वैयक्तिक आव्हाने म्हणून विचार करण्याची वेळ आली आहे. आपल्या जीवनातील एक छोटासा बदल संपूर्ण पृथ्वीच्या भविष्याचा आधार बनू शकतो. मला विश्वास आहे की, भारताचे प्रयत्न आणि परंपरा संपूर्ण मानवतेला या दिशेने मार्गदर्शन करतील, एका चांगल्या जगाच्या स्वप्नाला बळ देतील.
याच विश्वासाने, या बहुमूल्य प्रसंगी, ऐतिहासिक प्रसंगी मी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मानतो, खूप खूप अभिनंदन करतो.