महासंघाचे आदरणीय सदस्य, नेपाळ आणि श्रीलंकेचे पंतप्रधान आणि माझे सहकारी मंत्री प्रल्हाद सिंह आणि किरेन रिजीजू, आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाचे महासचिव आदरणीय डॉक्टर धम्मपियाजी, आदरणीय प्रज्ञावंत, धम्म अनुयायी, संपूर्ण जगभरातल्या भगिनी आणि बंधूंनो,

नमो बुद्धाय!

नमस्ते!!

आजच्या या विशेष वेसाक दिनी तुमच्यासमोर भाषण करण्याची मिळालेली संधी हा मला मिळालेला बहुमान आहे. भगवान बुद्धांच्या जीवनकार्याचे स्मरण करण्यासाठी वेसाक दिन आहे. आपल्या या पृथ्वीग्रहाच्या कल्याणासाठी, उन्नतीसाठी भगवान बुद्धांनी केलेले महान कार्य, त्यांचा उदात्त आदर्श आणि त्यांनी केलेला त्याग, यांचे प्रतिबिंब या दिवसाच्या रूपाने आपल्याला दिसून येते.

मित्रांनो,

गतवर्षीच्या वेसाक दिन कार्यक्रमातही मी भाषण केले होते. कोविड-19 महामारीच्याविरोधात मानवतेसाठी लढा देण्यासाठी आघाडीच्या फळीवर कार्यरत असलेल्या संपूर्ण जगभरामधल्या कामगारांना हा कार्यक्रम समर्पित करण्यात आला होता. आता एक वर्षानंतर अशीच संमिश्र स्थिती आहे आणि या काळात स्थित्यंतरे घडून आल्याचे आपण पहात आहोत. कोविड-19 महामारीने आपली साथ अजूनतरी सोडलेली नाही. भारतासह अनेक देशांमध्ये या महामारीची दुसरी लाट आली आहे. अनेक दशकांमध्ये मानवतेला भयानक त्रासदायक ठरणारे हे दुःसंकट आले आहे. गेल्या शतकामध्ये तरी आपण इतका भयावह साथीचा आजार पाहिलेला नाही. या महामारीमुळे अनेक जणांच्या आयुष्याचा शोकाकूल अंत होत असल्याचे दिसत आहे.

या महामारीचा प्रत्येक देशावर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर आर्थिक परिणामही मोठ्या प्रमाणावर झाला आहे. कोविड-19 महामारी पश्चात आपली पृथ्वी- ही वसुंधरा काही पूर्वीसारखी असणार नाही. आगामी काळाचा उल्लेख कदाचित आपल्याला कोविडपूर्व काळ किंवा कोविडनंतरचा काळ असा करावा लागेल. तरीही गेल्या वर्षभरामध्ये अनेक प्रकारचे उल्लेखनीय बदल झालेले दिसून आले आहेत. आता आपण ही महामारी नेमकी आहे तरी काय, हे थोडे चांगल्या प्रकारे समजू लागलो आहोत. त्यामुळेच आपण धोरण निश्चित करून मजबुतीने या महामारीच्या विरोधात लढा देण्यासाठी उभे राहू शकत आहोत. सर्वात महत्वाचे म्हणजे, आपल्याकडे आता या आजारावरची लस आली आहे. त्यामुळे लोकांचे प्राण वाचवण्याचे आणि साथीचा नायनाट करण्याचे महत्वाचे काम करता येत आहे. साथीचा प्रसार झाल्यानंतर एक वर्षाच्या आत तिच्यावर औषधोपचार म्हणून नव्याने आलेली लस म्हणजे मानवाचा दृढनिश्चय आणि त्याच्याकडे असलेली निर्धारशक्ती दर्शविते. कोविड-19 विरोधातल्या लसीच्या संशोधनाचे कार्य करणा-या आपल्या संशोधकांचा भारताला अभिमान आहे.

संपूर्ण जगभर आघाडीच्या फळीवर प्रतिसादकर्ते म्हणून कार्यरत असलेल्या सर्व आरोग्य सेविकांना, डॉक्टर्स, परिचारिका, स्वयंसेवक आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून गरजू रूग्णांची सेवा करणा-या सर्व स्वयंसेवकांना या व्यासपीठाच्या माध्यमातून पुन्हा एकदा नमस्कार करू इच्छितो. या महामारीमुळे ज्या लोकांना आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तींना गमवावे लागले, त्यांच्याविषयी मी सहसंवेदना व्यक्त करतो. त्यांच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे.

मित्रांनो,

भगवान गौतम बुद्धांच्या जीवनाचा अभ्यास करताना, चार गोष्टींचा उल्लेख केला जातो. या चार गोष्टींमुळे भगवान बुद्धांना मानवी दुःखांना सामोरे जावे लागले. त्याचवेळी त्यांच्या मनात मानवाचे दुःख दूर करण्यासाठी आपण स्वतःचे जीवन समर्पित करावे, अशी भावना, इच्छा जागृत झाली.

भगवान बुद्धांनी आपल्याला ‘‘भवतु सब्ब मंगलम्’’ अशी शिकवण दिली. त्याचबरोबर आशीर्वाद, करूणा आणि सर्वांचे कल्याण करायला शिकवले. गेल्या वर्षापासून आलेल्या महामारीच्या काळात अनेक व्यक्ती आणि संघटना लोकांचे त्रास कमी व्हावेत, यासाठी अनेक प्रकारची कार्ये आणि सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे आपण पाहत आहोत.

संपूर्ण जगातल्या बौद्ध संघटना, बौद्ध धर्माचे अनुयायी यांनी अनेक प्रकारची उपकरणे आणि साहित्य महामारीच्या काळात लोकांना उदारपणाने उपलब्ध करून दिल्याचे मला माहिती आहे. लोकसंख्येचा आणि भौगोलिक विस्ताराचा विचार केला तर या मदतीचे प्रमाण खूप प्रचंड आहे. माणसांमध्ये आलेल्या उदारतेच्या भावनेला सहविचारी मानवांनी पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. अशा प्रकारची कृती केली जाणे, हीच खरी भगवान बुद्धांची शिकवणूक आहे. त्यांनी घालून दिलेल्या मार्गाशी हे सुसंगत वर्तन आहे. बुद्धांनी दिलेला सर्वोत्कष्ट मंत्र म्हणजे ‘‘अप्प दीपो भवः’’ या मंत्राचे प्रकटीकरण म्हणजे उदारतेने केलेली मदत आहे.

मित्रांनो,

आपल्या  सर्वांसमोर कोविड-19 चे सर्वात मोठे आव्हान आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. मात्र हे करतानाच मानवतेसमोर असलेल्या इतर आव्हानांचीही आपण दखल घेतली पाहिजे. इतर अनेक संकटांमध्ये एक सर्वात मोठे आव्हान आहे ते हवामान बदलाचे!  आपली सध्याची बेपर्वा जीवनशैली आगामी पिढ्यांना धोका निर्माण करणारी आहे.  हवामान बदलतेय म्हणजेच ऋतूंचे चक्र बदलत आहे. प्रचंड हिमनग वितळत आहेत. नद्या आणि जंगल-वने यांना धोका निर्माण झाला आहे. आपण आपली पृथ्वी, ही वसुंधरा अशी जखमी करून चालणार नाही. निसर्गरूपी मातेचा आदर करणारी जीवनशैली आपली असावी, यावर भगवान बुद्धांनी भर दिला होता.

पॅरिस उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या मार्गावर असलेल्या काही मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारत एक आहे, हे सांगताना मला अभिमान वाटतो. आमच्यासाठी शाश्वत जीवनशैली हा काही केवळ शब्द नाही तर त्यासाठी आमच्याकडून योग्य कृतीही केली जात आहे.

मित्रांनो,

गौतम बुद्धांचे आयुष्य म्हणजे शांतता, एकोपा-समरसता, सह-अस्तित्व यांचा संदेश देणारे आहे. व्देष पसरवणे, दहशतवाद निर्माण करणे आणि मनाचा विचार न करता हिंसा पसरविण्यावर भर देणे; अशी कामे करणा-या शक्ती आजही आहेत. यासाठीच त्यांचे  अस्तित्व आहे. अशा शक्ती उदारमतवादी लोकशाही तत्वांवर विश्वासही ठेवत नाहीत. त्यामुळे मानवतेवर ज्यांचा विश्वास आहे, त्या सर्वांनी एकत्रित येऊन दहशतवादी कट्टरतेला पराभूत करणे ही आजच्या काळाची गरज आहे.

यासाठी भगवान गौतम बुद्धांनी दाखवलेला मार्ग अनुसरणे योग्य ठरणार आहे. सामाजिक न्यायाला महत्व दिले तर त्यातून जागतिक एकात्मता साधता येऊ शकते, अशी शिकवण भगवान बुद्धांनी आपल्याला दिली आहे.

त्यांनी ‘‘ नत्ती संती परण सुखं’’ असे म्हटले आहे, ते अगदी योग्यच आहे. याचा अर्थ असा की,  शांतीपेक्षा श्रेष्ठ दुसरा कशातही आनंद नाही, असे बुद्धांनी सांगितले आहे.

मित्रांनो,

या संपूर्ण विश्वासाठी भगवान गौतम बुद्ध म्हणजे एक तेजस्वी प्रकाशपूंज, ज्ञानाचे प्रचंड भांडार आहेत. त्यांच्या मूल्यांचा आधार आपण सर्वांनी वेळोवेळी घेतला पाहिजे. यामुळे करूणा, वैश्विक दायित्व आणि संपूर्ण विश्वाच्या कल्याणाचा मार्ग स्वीकारता येईल. गौतम बुद्धांविषयी महात्मा गांधी यांनी जे सांगितले होते, ते योग्य होते. गांधी यांनी नमूद केले आहे की, ‘‘ बुद्धांनी आपल्याला सत्य आणि प्रेम यांचाच अंतिम विजय होत असतो, यावर विश्वास ठेवायला शिकवले आहे.’’

आज, बुद्ध पौर्णिमेच्या दिनी आपण भगवान बुद्धांच्या आदर्शांविषयी आपली वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त करूया.

कोविड-19 या जागतिक महामारीच्या कठीण काळामध्ये सर्वांना स्वास्थ्य लाभावे, आराम मिळावा यासाठी आपल्या सर्वांबरोबर मी त्रिरत्नांच्या  प्रार्थनेत सहभागी होत आहे.

धन्यवाद!

खूप खूप आभार !!

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Mutual fund industry on a high, asset surges Rs 17 trillion in 2024

Media Coverage

Mutual fund industry on a high, asset surges Rs 17 trillion in 2024
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Chief Minister of Andhra Pradesh meets Prime Minister
December 25, 2024

Chief Minister of Andhra Pradesh, Shri N Chandrababu Naidu met Prime Minister, Shri Narendra Modi today in New Delhi.

The Prime Minister's Office posted on X:

"Chief Minister of Andhra Pradesh, Shri @ncbn, met Prime Minister @narendramodi

@AndhraPradeshCM"