जय जोहार।
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय जी, छत्तीसगड राज्य सरकारमधील मंत्री, इतर लोकप्रतिनिधी आणि मला असे सांगण्यात आले आहे की 90 पेक्षा जास्त ठिकाणांहून हजारो लोक आपल्याशी जोडले गेले आहेत, तर छत्तीसगडच्या अशा कानाकोपऱ्यातून जोडल्या गेलेल्या माझ्या कुटुंबियांनो! सर्वप्रथम मी छत्तीसगडच्या सर्व विधानसभा मतदारसंघांशी जोडल्या गेलेल्या लाखो कुटुंबियांचे अभिनंदन करतो. विधानसभा निवडणुकांमध्ये तुम्ही आम्हा सर्वांना खूप-खूप आशीर्वाद दिले आहेत. आम्ही आज विकसित छत्तीसगडच्या संकल्पासह तुमच्यात उपस्थित आहोत हा तुमच्या याच आशीर्वादाचा परिणाम आहे. भाजपाने घडवले आहे, भाजपाच सजवेल देखील, ही गोष्ट आज या आयोजनाने अधिकच सिद्ध झाली आहे.
मित्रांनो,
गरीब, शेतकरी, युवक आणि नारीशक्ती यांच्या सक्षमीकरणाने विकसित छत्तीसगडची निर्मिती होणार आहे. आधुनिक पायाभूत सुविधांमुळे विकसित छत्तीसगडचा पाया मजबूत होणार आहे. आणि म्हणून आज छत्तीसगडच्या विकासाशी संबंधित सुमारे 35 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी तसेच लोकार्पण झाले आहे. यामध्ये कोळशाशी संबंधित. सौर ऊर्जेशी संबंधित, वीजनिर्मितीशी संबंधित तसेच संपर्कव्यवस्थेशी संबंधित प्रकल्पांचा समावेश आहे. यातून छत्तीसगडच्या युवकांसाठी रोजगाराच्या नवनव्या संधी उपलब्ध होतील. या प्रकल्पांसाठी छत्तीसगडमधील माझ्या सर्व बंधू-भगिनींचे, तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन.
मित्रांनो,
आज एनटीपीसीच्या सोळाशे मेगावॉट क्षमतेच्या उच्च-औष्णिक उर्जानिर्मिती केंद्राच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले आहे. त्यासोबतच, या आधुनिक केंद्रातील सोळाशे मेगावॉट क्षमतेच्या दुसऱ्या टप्प्याची पायाभरणी देखील झाली आहे. या ऊर्जानिर्मिती केंद्रांमुळे देशवासियांना कमीतकमी खर्चात वीज उपलब्ध होऊ शकेल. आम्ही छत्तीसगड राज्याला सौर उर्जेचे देखील एक फार मोठे केंद्र बनवू इच्छितो. आजच राजनांदगाव आणि भिलई येथे फार मोठ्या सौर उर्जा केंद्रांचे लोकार्पण करण्यात आले आहे. या केंद्रांमध्ये अशा प्रकारची यंत्रणा बसवण्यात आली आहे ज्यामुळे रात्री देखील त्या परिसरातील रहिवाशांना वीजपुरवठा होत राहील. सौर उर्जेचा वापर करून देशातील जनतेला वीजपुरवठा करण्यासोबतच त्यांचे विजेचे बिल पूर्णपणे शून्यावर आणणे हे भारत सरकारचे उद्दिष्ट आहे. मोदी प्रत्येक घराला सूर्यघर बनवू इच्छितात. प्रत्येक कुटुंबाने वीज निर्माण करून, त्या विजेची विक्री करून उत्पन्नाचे आणखी एक साधन उपलब्ध करून घ्यावे अशी
मोदींची इच्छा आहे. याच उद्देशाने आम्ही पंतप्रधान सूर्यघर- मोफत वीज योजना सुरु केली आहे. सध्या देशातील 1 कोटी घरांसाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत घराच्या छतावर सौर उर्जा पॅनल बसवण्यासाठी सरकार मदत देणार आहे, ही मदत थेट बँक खात्यामध्ये जमा होईल. या योजनेत सहभागी नागरिकांना 300 युनिट वीज मोफत मिळेल आणि त्याहून अधिक प्रमाणात निर्माण झालेली वीज सरकार खरेदी करेल. यातून या कुटुंबांना दर वर्षी हजारो रुपयांचे उत्पन्न मिळेल. आपल्या अन्नदात्याला उर्जादाता बनवण्यावर देखील आपल्या सरकारने भर दिला आहे. सौर कृषी पंपासाठी शेताच्या कडेला किंवा पडीक जमिनीवर लहान लहान सौर उर्जा संयंत्रे बसवण्यासाठी देखील सरकारतर्फे मदत दिली जात आहे.
बंधू आणि भगिनींनो,
छत्तीसगडमध्ये दुहेरी इंजिन सरकार ज्या पद्धतीने दिलेला शब्द पूर्ण करत आहे ते अत्यंत कौतुकास्पद आहे. छत्तीसगडच्या लाखो शेतकऱ्यांना दोन वर्षांचा थकीत बोनस देण्यात आला आहे. निवडणुकीच्या वेळी मी तेंदूपत्ता गोळा करणाऱ्यांना पैसे वाढवून देण्याची गॅरंटी दिली होती. दुहेरी इंजिन सरकारने ही गॅरंटी देखील पूर्ण केली आहे. गरिबांसाठी घरे बांधण्याचे काम पूर्वीचे काँग्रेस सरकार थांबवत होते, त्या कार्यात अडथळे निर्माण करत होते. आता भाजपा सरकार गरिबांची घरे बांधण्याचे काम वेगाने करत आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये झालेल्या गोंधळाच्या चौकशीचे आदेश देखील देण्यात आले आहेत.मी छत्तीसगडमधील भगिनींचे महतारी वंदन योजनेसाठी देखील अभिनंदन करतो. लाखो भगिनींना या योजनेचा लाभ होणार आहे. हे सगळे निर्णय हेच सिद्ध करतात की भाजपा जे बोलते ते करुन दाखवते. म्हणूनच लोक म्हणतात, मोदी की गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याचीच गॅरंटी.
मित्रांनो,
छत्तीसगड राज्याकडे मेहनती शेतकरी, प्रतिभावंत तरुण आणि निसर्गाचा मोठा खजिना आहे. विकसित होण्यासाठी ज्या गोष्टींची गरज आहे त्या छत्तीसगडमध्ये आधीपासूनच उपलब्ध होत्या आणि आजही त्या आहेत. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्यांनी देशावर दीर्घकाळ राज्य केले त्यांची मानसिकताच संकुचित होती. ते केवळ 5 वर्षांच्या राजकीय स्वार्थाचा विचार करून निर्णय घेत राहिले. काँग्रेसने एकामागोमाग एक सरकारे तर स्थापन केली, पण ते भविष्यातील भारत घडवायचे विसरूनच गेले कारण त्यांच्या मनात केवळ सरकार बनवणे हेच ध्येय होते, देशाची प्रगती करावी हा मुद्दा त्यांच्या कार्यक्रमपत्रिकेत कधीच नव्हता. आजही काँग्रेसच्या राजकारणाची दशा आणि दिशा तीच आहे. काँग्रेस पक्ष घराणेशाही, भ्रष्टाचार आणि लांगुलचालन याच्या पलीकडे विचारच करू शकला नाही. जे केवळ स्वतःच्या कुटुंबासाठीच काम करतात ते तुमच्या कुटुंबांचा कधीच विचार करू शकत नाहीत. जे फक्त स्वतःच्या मुला-मुलीचे भविष्य घडवण्यात मग्न आहेत ते तुमच्या मुलामुलींच्या भविष्याची काळजी कधीच करणार नाहीत. मोदींसाठी मात्र, तुम्ही सर्वजण, तुम्हीच मोदींचे कुटुंबीय आहात. तुमची स्वप्ने हाच मोदींचा निर्धार आहे. म्हणूनच मी आज विकसित भारत-विकसित छत्तीसगडची चर्चा करत आहे.140 कोटी देशवासियांना त्यांच्या या सेवकाने स्वतःच्या परिश्रमाची, स्वतःच्या निष्ठेची हमी दिली आहे. संपूर्ण जगात प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंच होईल असे आपले सरकार असेल अशी गॅरंटी 2014 मध्ये मोदींनी दिली होती. ही गॅरंटी पूर्ण करण्यासाठी मी स्वतःला झिजवले. 2014 मध्ये मी अशी हमी दिली होती की, सरकार गरिबांना काहीही कमी पडू देणार नाही. गरिबांना लुटणाऱ्या लोकांना गरीबांचा पैसा त्यांना परत करावा लागेल. आज बघा गरिबांचे पैसे लुटणाऱ्या लोकांवर कडक कारवाई होत आहे. गरीबांचा जो पैसा लुबाडण्यापासून वाचला आहे, तोच पैसा आज गरिबांसाठीच्या कल्याणकारी योजनांसाठी उपयोगी पडतो आहे. मोफत अन्नधान्य, मोफत उपचार, स्वस्त दरात औषधे, गरिबांसाठी घरे, प्रत्येक घरात नळाने पाणी, प्रत्येक घरात गॅसची जोडणी, प्रत्येक घरात शौचालय, या सुविधांची सोय होत आहे. ज्या गरिबांनी कधी या सोयी मिळण्याची कल्पना देखील केली नव्हती, त्यांच्या घरी देखील आता या सोयी होत आहेत. याकरिताच विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान मोदी की गॅरंटीवाली गाडी गावागावात पोहोचत आहे. आणि आताच माननीय मुख्यमंत्र्यांनी गॅरंटीवाल्यागाडीमुळे कोणकोणती कामे झाली याची आकडेवारी सांगितली, आपला उत्साह वाढवणारी माहिती दिली.
मित्रांनो,
दहा वर्षांपूर्वी मोदींनी आणखी एक गॅरंटी दिली होती. मी तेव्हा म्हटले होते की आपल्या आधीच्या पिढ्यांनी अत्यंत आशेने, ज्या भारताचे स्वप्न बघितले होते, त्या भारताविषयी अनेक स्वप्ने बघितली होती, तशा भारताची उभारणी करू. आज चोहीकडे बघा, आपल्या पूर्वजांनी जी स्वप्ने पाहिली होती अगदी तसाच नवा भारत निर्माण होतो आहे. 10 वर्षांपूर्वी कोणी विचार तरी केला होता की, गावागावात सुद्धा डिजिटल पद्धतीने पैशांची देवाणघेवाण होऊ शकेल. बँकेचे काम असो, एखादे बिल भरायचे असो, कुठे अर्ज पाठवायचा असो, हे सगळं घरातून करणे शक्य होऊ शकते? राहत्या भागाच्या बाहेर मजुरी करण्यासाठी गेलेला एखाद्या घरातला मुलगा, पापणी लवायच्या आत गावातल्या कुटुंबाला पैसे पाठवू शकेल असा विचार तरी कोणी कधी केला होता का? कोणी कधी विचार तरी केला होता कि, केंद्रातले भाजपा सरकार गरीब व्यक्तीला पैसे पाठवेल आणि त्या गरीबाच्या मोबाईलवर लगेचच हा संदेश येईल की खात्यात पैसे जमा झाले आहेत. आज हे शक्य झाले आहे. तुमच्या लक्षात असेल काँग्रेस पक्षाचे एक पंतप्रधान होते त्या पंतप्रधानांनी स्वतःच्याच काँग्रेस सरकारबद्दल असे म्हटले होते, की दिल्लीहून एक रुपया पाठवला तर गावातील गरजूपर्यंत केवळ 15 पैसे पोहोचतात, 85 पैसे मधल्यामध्ये गायब होतात. जर अजूनही अशीच परिस्थिती राहिली असती तर कल्पना करा, काय स्थिती झाली असती?आता तुम्हीच हिशोब करा, गेल्या दहा वर्षांत भाजपा सरकारने 34 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम........ 34 लाख कोटी रुपयांहून अधिक..ही रक्कम साधीसुधी नाही, एवढी प्रचंड रक्कम थेट लाभ डीबीटी म्हणजेच हस्तांतरणाच्या माध्यमातून थेट दिल्लीहून तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचते आहे. लाभार्थ्यांच्या खात्यात भरले आहेत. डीबीटीच्या माध्यमातून देशातील जनतेच्या बँक खात्यांमध्ये 34 कोटी रुपये पाठवण्यात आले आहेत. तुम्हीच विचार करा, आता काँग्रेसचे सरकार असते, आणि 1 रुपयातून 15 पैसेच पोहोचण्याची पद्धत सुरु असती तर काय झाले असते, 34 लाख कोटी रुपयांतील 29 लाख कोटी रुपये मधल्यामध्ये कुठेतरी एखाद्या मध्यस्थाच्या घशात पडले असते. भाजपा सरकारने मुद्रा योजनेतून देखील युवकांना रोजगार-स्वयं रोजगारासाठी 28 लाख कोटी रुपयांची मदत केली आहे. जर काँग्रेस सरकारची सत्ता असती तर त्यांच्या मध्याथांनी यातले देखील 24 कोटी रुपये लांबवले असते. भाजपा सरकारने पंतप्रधान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पावणेतीन लाख कोटी रुपयांचा निधी हस्तांतरित केला आहे. जर काँग्रेस सरकार असते तर यातले देखील सव्वादोन लाख कोटी रुपये स्वतःच्याच घरी घेऊन गेले असते, शेतकऱ्यांना मिळालेच नसते.आज या भाजपा सरकारने गरिबांना त्यांचा हक्क मिळवून दिला आहे, त्यांचा अधिकार मिळवून दिला आहे. जेव्हा भ्रष्टाचार थांबतो तेव्हा विकासाच्या योजना सुरु होतात, रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. त्यासोबतच आजूबाजूच्या परिसरासाठी शिक्षण, आरोग्य यांच्या आधुनिक सोयी निर्माण होतात. आज हे जे रुंद रस्ते तयार होत आहेत, नवे रेल्वेमार्ग बनत आहेत, तो देखील भाजपा सरकारच्या सुशासनाचाच परिणाम आहे.
बंधू आणि भगिनींनो,
21 व्या शतकातील आधुनिक गरजांची पूर्तता करणाऱ्या अशाच प्रकल्पांमुळे विकसित छत्तीसगडचे स्वप्न पूर्ण होणार आहे. छत्तीसगड विकसित झाले की भारताला विकसित होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. येत्या 5 वर्षांमध्ये जेव्हा भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी आर्थिक सत्ता बनेल तेव्हा छत्तीसगड देखील विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचलेला असेल. विशेषतः पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदात्यांसाठी,शाळा-महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या युवा मित्रांसाठी ही फार मोठी संधी आहे. विकसित छत्तीसगड त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करेल या विकास प्रकल्पांबद्दल, पुन्हा एकदा, तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन.
धन्यवाद !