"आज जगाला वाटत असेल की भारत उत्तुंग झेप घेण्यास सज्ज आहे, तर त्यामागे 10 वर्षांची प्रचंड मेहनत आहे"
"आज 21 व्या शतकात भारताने छोट्या गोष्टींचा विचार करणे सोडून दिले आहे. आज आपण जे करतो ते सर्वोत्तम आणि भव्य आहे"
"भारतात सरकार आणि व्यवस्थेवरचा विश्वास वाढत आहे"
"सरकारी कार्यालये आता समस्या नव्हे तर देशवासियांचे मित्र बनत आहेत"
"भ्रष्टाचाराला आळा घालून, विकासाचे लाभ भारतातील प्रत्येक प्रदेशात सम प्रमाणात वितरित केले जातील याकडे आम्ही लक्ष दिले "
"आमच्या सरकारने गावांचा विचार करून पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत"
"आमचा परिपूर्णतेच्या प्रशासनावर विश्वास आहे, कमतरतेच्या राजकारणावर नाही"
"आमचे सरकार राष्ट्र प्रथम हे तत्व सर्वोपरी ठेऊन पुढे मार्गक्रमण करत आहे"
"आपल्याला 21व्या शतकातील भारताला त्याच्या येणाऱ्या दशकांसाठी आजच तयार करायचे आहे"
"भारत हेच भविष्य आहे"

आपल्या इथे पूर्वीच्या काळात, युद्धात जाण्यापूर्वी खूप मोठ्या आवाजात बिगुल वाजवले जायचे, जाणाऱ्या व्यक्तीला थोडा उत्साह वाटावा, यासाठी मोठे बिगुल वाजवले जायचे, धन्यवाद दास! टीव्ही  9 च्या सर्व प्रेक्षकांना आणि इथे उपस्थित असलेल्या तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा…

मी अनेकदा भारताच्या विविधतेबद्दल बोलत असतो. टीव्ही नाईनच्या न्यूजरूममध्ये आणि तुमच्या वार्ताहरांच्या चमूमध्ये ही विविधता स्पष्टपणे दिसून येते. टीव्ही नाईनचे अनेक भारतीय भाषांमध्ये माध्यम व्यासपीठ उपलब्ध आहेत. तुम्ही भारताच्या चैतन्यशील लोकशाहीचे प्रतिनिधीही आहात. विविध राज्यांतील, विविध भाषांतील टीव्ही नाइनमध्ये काम करणाऱ्या सर्व पत्रकार सहकाऱ्यांचे आणि तुमच्या तांत्रिक टीमचे मी अभिनंदन करतो. 

 

मित्रांनो, 

आज टीव्ही नाईनच्या चमूने या शिखर परिषदेसाठी एका अतिशय मनोरंजक विषयाची निवड केली आहे. "भारत: पुढच्या मोठ्या झेपसाठी सज्ज"  आणि जेव्हा आपण उत्साही आणि उर्जेने परिपूर्ण असतो तेव्हाच आपण मोठी झेप घेऊ शकतो. हताश देश किंवा व्यक्ती मोठ्या झेप घेण्याचा विचारही करू शकत नाही. आजच्या भारताचा आत्मविश्वास कोणत्या उंचीवर आहे, त्याची आकांक्षा काय आहे, हे सांगण्यासाठी हा विषयच पुरेसा आहे. जर आज जगाला वाटत असेल की भारत एक मोठी झेप घेण्यास तयार आहे, तर त्याच्या मागे 10 वर्षांचा शक्तिशाली लॉन्चपॅड आहे. तर या 10 वर्षात काय बदलले की आज आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत? हा बदल मानसिकतेचा आहे. हा बदल आत्मविश्वास आणि विश्वासाबद्दल आहे. हा बदल सुशासनाचा आहे. 

मित्रांनो, 

हिन्दी मध्ये एक फार जुनी म्हण आहे -  "मन के हारे हार है, मन के जीते जीत."   आत्ताच मी दास यांचे भाषण ऐकत होतो पण त्यात मला जरा बदल सुचवायचा आहे. ते म्हणाले की, इतिहास हा एक प्रकारे महान व्यक्तींचे चरित्र आहे. पाश्चिमात्य देशांची ही विचारसरणी असेल, पण भारतात सामान्य माणसाचे चरित्र म्हणजे इतिहास. हीच देशाची खरी ताकद आहे आणि त्यामुळेच मोठी माणसे येतात आणि जातात… देश अमर राहतो. 

मित्रांनो, 

पराभूत मनातून विजय मिळवणे खूप कठीण आहे. त्यामुळे गेल्या 10 वर्षात मानसिकतेत जो  बदल झाला आहे, आपण जी झेप घेतली आहे, ती खरोखरच आश्चर्यकारक आहे. या आधी  अनेक दशके सरकार चालवणाऱ्यांचा भारतीयत्वाच्या ताकदीवर विश्वास नव्हता. त्यांनी भारतीयांना कमी लेखले, त्यांच्या क्षमतांना कमी लेखले. मग लाल किल्ल्यावरून सांगितले गेले की आम्ही भारतीय निराशावादी आहोत आणि पराभूत भावना स्वीकारतो. लाल किल्ल्यावरूनच, भारतीयांना आळशी आणि कठोर परिश्रमाचा तिरस्कार म्हटले जायचे. देशाचे नेतृत्व निराशेने भरलेले असताना, देशात आशा कशी पसरणार? त्यामुळे यापुढे देश असाच चालेल, हे देशातील बहुसंख्य जनतेनेही मान्य केले होते. त्यात पुन्हा  भ्रष्टाचार, हजारो कोटींचे घोटाळे, धोरण लकवा, घराणेशाही या सगळ्यांनी देशाचा पायाच उद्ध्वस्त केला होता.

गेल्या 10 वर्षात आपण देशाला त्या भीषण परिस्थितीतून बाहेर काढले आणि इथे आणले. अवघ्या 10 वर्षांत भारत जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्थांपैकी एक बनला आहे. आज देशात महत्त्वाची धोरणे वेगाने बनवली जातात आणि निर्णयही तितक्याच वेगाने घेतले जातात. मानसिकतेतील बदलाने आश्चर्यकारक काम केले आहे. 21व्या शतकात भारताने लहान विचार करणे सोडून दिले आहे. आज आपण जे काही करतो, ते सर्वोत्तम आणि सर्वात मोठे करतो. आज भारताचे यश पाहून जग आश्चर्यचकित झाले आहे. भारतासोबत वाटचाल करण्यात जगाला स्वतःचा फायदा दिसत आहे. अरे वा, भारताने हे ही हे केले आहे - ही प्रतिक्रिया, भारताने हे केले आहे? भारतात असे घडले का? ही प्रतिक्रिया असू देत, हे सर्व आजच्या जगात  सामान्य आहे. वाढती विश्वासार्हता ही आज भारताची सर्वात मोठी ओळख आहे. तुम्ही 10 वर्षांपूर्वीचे आणि आजचे थेट विदेशी गुंतवणुकीचे आकडे बघा. मागील सरकारच्या 10 वर्षात भारतात 300 अब्ज डॉलरची  थेट विदेशी गुंतवणुक केली गेली. आमच्या सरकारच्या 10 वर्षात भारतात 640 अब्ज डॉलर्सची  थेट विदेशी गुंतवणुक केली गेली. गेल्या 10 वर्षात झालेली डिजिटल क्रांती, कोरोनाच्या काळात लसीवर निर्माण झालेला विश्वास, आज करदात्यांची वाढती संख्या, या गोष्टींवरून भारतातील लोकांचा सरकारवर आणि व्यवस्थेवर असलेला विश्वास दिसून येतो. 

मी तुम्हाला आणखी एक आकडेवारी देतो. इथे या खोलीमध्ये म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणारे अनेक जन असतील. 2014 मध्ये देशातील लोकांनी म्युच्युअल फंडात सुमारे 9 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली होती. जर मी वर्ष 2024 बद्दल बोललो, तर आज देशातील लोकांनी म्युच्युअल फंडात 52 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. देश भक्कमपणे पुढे जात आहे, असा प्रत्येक भारतीयाचा विश्वास असल्यामुळे हे घडले आहे. आणि देशावर जितका विश्वास आहे तितकाच त्यांचा स्वतःवरही आहे. प्रत्येक भारतीय विचार करत असतो - मी काहीही करू शकतो, माझ्यासाठी काहीही अशक्य नाही. आणि टीव्ही नाइनचे प्रेक्षक हे देखील लक्षात घेतील की अनेकांनी जे भाकित केले होते त्यापेक्षा आम्ही खूप चांगली कामगिरी केली आहे. 

 

मित्रांनो, 

आज मानसिकता आणि विश्वासातील या बदलाचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्या सरकारची कार्यसंस्कृती आणि प्रशासन. तेच अधिकारी, तीच कार्यालये, तीच यंत्रणा, त्याच फायली, पण परिणाम वेगळे आहेत. आज सरकारी कार्यालये देशवासीयांची समस्या बनण्याऐवजी मित्र बनत आहेत. ही व्यवस्था येणाऱ्या काळासाठी शासनाचे नवे आदर्श प्रस्थापित करत आहे. 

मित्रांनो,

भारताच्या विकासाला गती देण्यासाठी आणि मोठी झेप घेण्यासाठी भारत ज्या गियरवर पूर्वी चालत होता, तो बदलणे अत्यंत आवश्यक होते. आधीच्या सरकारांच्या काळात भारत कसा रिव्हर्स गियरमध्ये होता याची काही उदाहरणे मी तुम्हाला देतो. सरयू कालवा प्रकल्पाची पायाभरणी उत्तरप्रदेशमध्ये 80 च्या दशकात झाली.

हा प्रकल्प चार दशकांपर्यंत प्रलंबित राहिला. 2014 मध्ये सरकार बनल्यानंतर आम्ही हा प्रकल्प वेगाने पूर्ण केला. सरदार सरोवर प्रकल्प, त्या प्रकल्पाचे भूमीपूजन तर पंडित नेहरुंनी 60 च्या दशकात केले होते. 60 वर्षांपर्यंत सरदार सरोवर धरणाचे काम असेच लटकत राहिले. सरकार बनल्यानंतर 2017मध्ये आम्ही या धरणाचे काम पूर्ण करून याचे लोकार्पण केले. महाराष्ट्रातील कृष्णा कोयना प्रकल्प देखील 80 च्या दशकात सुरू झाला होता. 2014 सालापर्यंत हा देखील असाच प्रलंबित राहिला होता. या धरणाचे काम देखील आमच्याच सरकारने पूर्ण केले. 

मित्रहो,

गेल्या काही दिवसात तुम्ही अटल बोगद्याच्या आजूबाजूला हिमवर्षावाची अतिशय सुंदर छायाचित्रे पाहिली आहेत. अटल बोगद्याचे भूमीपूजन झाले होते 2002 मध्ये. 2014 पर्यंत हा बोगदा प्रलंबित राहिला होता. याचे काम देखील पूर्ण केले आमच्या सरकारने आणि 2020 मध्ये याचे लोकार्पण करण्यात आले. आसामचा बोगिबील पूल तुम्हाला आठवत असेलच. हा पूल देखील 1998 मध्ये स्वीकृत झाला होता. सरकार आल्यानंतर आम्ही वेगाने तो पूर्ण केला आणि 20 वर्षांनी 2018 मध्ये याचे लोकार्पण करण्यात आले.

Eastern Dedicated Fright Corridor, 2008 साली स्वीकृत करण्यात आले. हा प्रकल्प देखील लटकत राहिला आणि 15 वर्षांनी 2023 मध्ये आम्ही तो पूर्ण केला. अशा प्रकारचे कमीत कमी 500 प्रकल्प मी तुम्हाला मोजून सांगू शकतो. अशा शेकडो प्रकल्पांना 2014 मध्ये आमचे सरकार आल्यानंतर वेगाने पूर्ण करण्यात आले.

पंतप्रधान कार्यालयात तंत्रज्ञानाच्या मदतीने आम्ही एक आधुनिक व्यवस्था विकसित केली आहे- प्रगती या नावाने. दर महिन्याला मी स्वतः एकेका प्रकल्पाची फाईल घेऊन बसतो, सर्व डेटा सोबत घेऊन बसतो, दशकांपासून अडकून पडलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतो आणि माझ्या समोर ऑनलाईन, सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि भारत सरकारचे सर्व सचिव संपूर्ण वेळ माझ्या समोर असतात. एकेका गोष्टीचे तिथे विश्लेषण केले जाते. गेल्या 10 वर्षात...मी 17 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पांचा आढावा घेतलेला आहे. 17 लाख कोटी रुपये, तेव्हा कुठे हे प्रकल्प पूर्ण झाले आहेत.

तुम्ही मला सांगा, ज्या देशात पूर्वीची सरकारे त्या गतीने काम करत राहिली असतील, तर देशाला मोठी झेप कशी घेता आली असती? आज आमच्या सरकारने लटकणे- भटकणे वाला तो दृष्टीकोन बाजूला सारला आहे. मी तुम्हाला आमच्या सरकारची काही उदाहरणे  देईन. मुंबईचा अटल सेतू, देशातील सर्वात मोठा पूल, सी ब्रिज. याचे भूमीपूजन 2016 मध्ये झाले होते. आम्ही काही आठवड्यांपूर्वीच त्याचे लोकार्पण देखील केले. संसदेची नवी इमारत. याचे भूमीपूजन 2020 मध्ये केले. मागच्या वर्षीच तिचे लोकार्पण झाले. जम्मू एम्सचे भूमीपूजन 2019 मध्ये झाले होते. गेल्या आठवड्यात 20 फेब्रुवारीला त्याचे लोकार्पण देखील झाले आहे. राजकोट एम्सचे भूमीपूजन 2020 मध्ये झाले होते. आता कालच त्याचे देखील लोकार्पण झाले आहे. याच प्रकारे आयआयएम संबळपूरचे भूमीपूजन 2021 मध्ये झाले... आणि ...  2024 या वर्षात लोकार्पण झाले. त्रिचि विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे भूमीपूजन 2019 मध्ये झाले आणि काही आठवड्यांपूर्वी त्याचे लोकार्पण देखील झाले. IIT भिलाईचे भूमीपूजन 2018 मध्ये झाले आणि काही दिवसांपूर्वी आम्ही त्याचे देखील लोकार्पण केले. गोव्याच्या नव्या विमानतळाचे भूमीपूजन 2016 मध्ये झाले आणि 2022 मध्ये त्याचे लोकार्पण देखील झाले.  लक्षद्वीपपर्यंत समुद्राखाली ऑप्टिकल फायबरचे जाळे बांधणे अतिशय आव्हानात्मक समजले जात होते. हे काम आम्ही 2020मध्ये सुरू केले आणि काही आठवड्यांपूर्वीच ते पूर्ण देखील केले. बनारसच्या बनास डेरीचे भूमीपूजन 2021 या वर्षात झाले होते आणि काही दिवसांपूर्वीच तिचे लोकार्पण झाले. कालच तुम्ही  द्वारका येथे सुदर्शन ब्रिजची आकर्षक छायाचित्रे पाहिली आहेत. भारताचा सर्वात लांब केबल ब्रिज, देशाची शान वाढवत आहे. याचे देखील भूमीपूजन आमच्या सरकारने 2017 साली केले होते. मी ज्या मोदी की गॅरंटी विषयी बोलत असतो ना, त्याचा एक पैलू हा देखील आहे. जेव्हा हा वेग असतो, वेगाने काम करण्याची इच्छाशक्ती असते.... जेव्हा करदात्यांच्या पैशांचा सन्मान होतो... तेव्हा देश पुढे जातो, तेव्हा देश मोठी झेप घेण्यासाठी तयार होत असतो.

 

मित्रहो,

भारत आज ज्या प्रमाणात काम करत आहे, ते अनपेक्षित आहे, कल्पनेच्या पलीकडचे आहे. मी तुम्हाला गेल्या आठवड्यातील काही उदाहरणे देतो... एका आठवड्याची...20 फेब्रुवारीला मी जम्मूहून एकाच वेळी देशातील डझनभर IIT-IIM, ट्रिपल IT सारख्या Higher Education Institutes चे लोकार्पण केले. 24 फेब्रुवारीला मी राजकोटहून देशातील 5 एम्सचे एकाच वेळी लोकार्पण केले. आज सकाळी मी देशाच्या 27 राज्यांच्या 500 पेक्षा जास्त रेलवे स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पांचे भूमीपूजन केले. आजच्या त्याच कार्यक्रमात देशात दीड हजारांपेक्षा जास्त ओवरब्रिज आणि अंडरपासवर एकाच वेळी काम सुरू झाले. आताच मी या कार्यक्रमात येण्यापूर्वीच सोशल मीडिया साइट- एक्स वर एक थ्रेड शेअर केला आहे. यामध्ये मी आपल्या आगामी दोन दिवसांच्या कार्यक्रमांविषयी माहिती दिली आहे. मी उद्या सकाळी केरळ, तमिळनाडू आणि महाराष्ट्रात जाणार आहे. तिथे अंतराळविषयक कार्यक्रम आहेत... MSME चे कार्यक्रम आहेत, बंदरांशी संबंधित कार्यक्रम आहेत, ग्रीन हायड्रोजनशी संबंधित कार्यक्रम आहेत... शेतकऱ्यांशी संबंधित कार्यक्रम आहेत... भारत अशा स्केल वर काम करूनच मोठी झेप घेऊ शकतो.

पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या औद्योगिक क्रांतीमध्ये आपण मागे पडलो. आता आपल्याला चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये जगाचे नेतृत्व करायचे आहे. आणि यासाठी भारतात दररोज होणाऱ्या विकासकामांनी देशाच्या वेगाला ऊर्जा मिळत आहे. भारतात दर दिवशी, तुम्ही एका पाठोपाठ एक मेंदू जरा अलर्ट ठेवा… भारतात दर दिवशी दोन नवीन महाविद्यालये सुरू झाली आहेत, दर आठवड्याला एक विद्यापीठ उघडले आहे, भारतात दर दिवशी 55 पेटंट्स आणि 600 ट्रेडमार्क रजिस्टर केले गेले आहेत. भारतात दर दिवशी सुमारे दीड लाख मुद्रा कर्जे वितरित केली गेली आहेत. भारतात दररोज 37 नवीन स्टार्टअप्स तयार होत आहेत. भारतात दररोज 16 हजार कोटी रुपयांचे यूपीआय व्यवहार झाले आहेत. भारतात दर दिवशी 3 नवीन जन औषधी केंद्रे सुरू झाली आहेत. भारतात दर दिवशी चौदा किलोमीटर रेल्वे ट्रॅक तयार झाले आहेत. भारतात दर दिवशी 50 हजारांपेक्षा जास्त एलपीजी कनेक्शन देण्यात आली आहेत. भारतात दर सेंकदाला, प्रत्येक सेकंदाला… एक नळजोडणी दिली गेली आहे. भारतात दर दिवशी 75 हजार लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात आले आहे.

आम्ही तर नेहमी गरीबी हटावचे फक्त नारे ऐकले होते. कोणी विचार केला होता की दहा वर्षात 25 कोटी लोक दारिद्र्यातून बाहेर येतील. परंतु  हे झाले आहे आणि आमच्याच सरकारच्या काळात झाले आहे.

मित्रांनो, 

भारतातील उत्पादन खपाबाबत नुकताच एक अहवाल आला आहे, त्यातून नवीन कल दिसतो आहे. भारतात गरिबी आत्तापर्यंतच्या निक्यांकी स्तरावर म्हणजेच, एक अंकी झाली आहे. या माहितीनुसार गेल्या दशकाच्या तुलनेत, खप अडीच पटीने वाढला आहे. म्हणजेच भारतीय लोकांची विभिन्न सेवा आणि सुविधांवर खर्च करण्याची क्षमता आणखी वाढली आहे. हे देखील समोर आले आहे की, गेल्या दहा वर्षात गावांमध्ये शहरांच्या तुलनेत खप खूप जास्त वेगाने वाढला आहे.

म्हणजेच, गावातील लोकांचे आर्थिक सामर्थ्य वाढत आहे. त्यांच्याजवळ खर्च करण्याकरता अधिक पैसे येत आहेत. हे असेच घडलेले नाही. हे आमच्या त्या प्रयत्नांचे फळ आहे, ज्याचे लक्ष्य गाव, गरीब आणि शेतकरी आहे. 2014 नंतर आमच्या सरकारने गावांना लक्षात ठेवून पायाभूत सुविधांचे निर्माण केले. गावे आणि शहरे यांच्या दरम्यान संपर्क व्यवस्था चांगल्या झाल्या, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यात आल्या, महिलांचे उत्पन्न वाढवण्याकरता संसाधने विकसित करण्यात आली. विकासाच्या या प्रारूपाने ग्रामीण भारत सशक्त झाला आहे. मी आपल्याला आणखी एक आकडेवारी देईन. भारतात पहिल्यांदा, एकूण खर्चातील जेवणावर होणारा खर्च 50 टक्क्यांनी देखील कमी झाला आहे. म्हणजे आधी ज्या कुटुंबाची सगळी शक्ती ही जेवणाच्या व्यवस्थेसाठी खर्च होत होती. आज ते कुटुंबिय सगळ्या वस्तूंवर पैसे खर्च करू शकत आहे.

 

मित्रांनो, 

आधीच्या सरकारांची आणखी एक विचारसरणी होती की, त्यांना देशातील जनतेला अभावात पाहणे आवडायचे. हे लोक निवडणुकीच्या वेळी अभावातील या जनतेला थोडेफार देऊन आपला स्वार्थ साधून घ्यायचे. यातूनच देशात एका मतपेढी राजकारणाचा जन्म झाला. म्हणजे सरकार केवळ त्याच लोकांचे काम करत असे, जे त्यांना मत देत असत.

परंतु मित्रांनो, 

गेल्या दहा वर्षात भारत या अभावग्रस्त मानसिकतेला मागे सोडून पुढे सरसावला आहे. भ्रष्टाचारावर चाप लावून आम्ही याची खातरजमा केली की, विकासाचा लाभ भारतातील प्रत्येक क्षेत्राला समान रूपाने मिळावा. आम्ही अभावाच्या राजकारणावर नव्हे, तर पूर्ततेच्या प्रशासनावर विश्वास ठेवतो. आम्ही तुष्टीकरण न करता, देशवासीयांच्या संतुष्टीकरणाचा मार्ग निवडला आहे. गेल्या दहा वर्षात हाच आमचा एकमेव मंत्र आहे, हीच आमची विचारधारा आहे. हाच सबका साथ-सबका विकास आहे. आम्ही मतपेढीच्या राजकारणाला, कामगिरीच्या राजकारणात बदलले आहे. जेव्हा अभाव असतो तेव्हा भ्रष्टाचार होतो. भेदभाव होतो. जेव्हा पूर्तता होते, तेव्हा संतुष्टि असते, सद्भाव असतो. सरकार आज स्वतःहून, घरोघरी जाऊन लाभार्थ्यांना सुविधा देत आहे.

गेल्या काही काळात आपण मोदी की गॅरंटीवाल्या गाडी बद्दल नक्कीच ऐकले असेल. देशात या आधी कधीच असे झाले नसेल की सरकारी अधिकारी गाडी घेऊन गावागावात गेले आणि तिथे विचारले की या योजनांचे लाभ तुम्हाला मिळाले की नाही? आमचे सरकार आज स्वतः लोकांच्या दारी जाऊन सांगतेय की सरकारी योजनांचे लाभ घ्या. म्हणून मी म्हणतो, जेव्हा पूर्तता एक मोहीम बनते, तेव्हा कोणत्याही प्रकारच्या भेदभावाची शक्यताच संपुष्टात येते.

म्हणून मी म्हणतो, की आम्ही राजकारण नाही तर राष्ट्रकारणावर विश्वास करणारे लोक आहोत.

मित्रांनो,

आमचे सरकार, राष्ट्र प्रथम या सिद्धांताला सर्वोच्च मानून अग्रेसर होत आहे. आधीच्या सरकारांसाठी, काही काम करायचे नाही… हे सर्वात सोपे काम होते. मात्र या कार्य-संस्कृतीने ना देश घडू शकतो ना देश पुढे जाऊ शकतो. यासाठी आम्ही देशहिताचे निर्णय घेतले, जुन्या आव्हानांचे निरसन केले.

कलम 370 रद्द करण्यासह.... मी चित्रपटाबद्दल बोलत नाहीए. कलम 370 रद्द करण्यासह राम मंदिराच्या निर्माणापर्यंत, ट्रिपल तलाक रद्द करण्यापासून ते महिला आरक्षणापर्यंत, एक श्रेणी एक निवृत्तीवेतनपासून लष्करप्रमुख पदापर्यंत, सरकारने राष्ट्र प्रथम विचारधारेसह अपूर्ण कामे पूर्ण केली.

 

मित्रांनो,

एकविसाव्या शतकातील भारताला येणाऱ्या शतकांसाठीही आपल्याला आजच तयार करावे लागेल. यासाठी आज भारत भविष्यातील योजनांबाबातही वेगाने पुढे जात आहे. अंतराळ ते सेमीकंडक्टर्स,  डिजिटल ते ड्रोन, कृत्रिम बुद्धीमत्ता ते स्वच्छ ऊर्जा, 5 जी ते फिनटेकपर्यंत भारत आज जगाच्या पहिल्या रांगेत पोहोचला आहे. आज भारत हा जागतिक जगात डिजिटल व्यवहारांच्या सर्वात मोठ्या शक्तींपैकी एक आहे. आज, फिनटेक स्वीकारण्याच्या बाबत भारत हा सर्वात वेगाने वाढणारा देश आहे. आज चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश आहे. आज, सौर स्थापित क्षमतेच्या बाबतीत भारत जगातील आघाडीच्या देशांपैकी एक आहे. आज भारताने 5G नेटवर्कच्या विस्तारात युरोपला देखील मागे टाकले आहे. आज भारत सेमीकंडक्टर क्षेत्रातही वेगाने पुढे जात आहे.

आज भारत हरित हायड्रोजनसारख्या भविष्यातील इंधनांवर वेगाने काम करत आहे. आज भारत आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी रात्रंदिवस काम करत आहे. भारत भविष्यवेधी आहे. आणि म्हणूनच आज प्रत्येकजण म्हणू लागला आहे - भारत हे भविष्य आहे. येणारा काळ अधिक महत्त्वाचा आहे, पुढची 5 वर्षे खूप महत्त्वाची आहेत. आणि मी हे सर्व येथे जे प्रेक्षक बसलेले आहेत आणि अतिशय जबाबदारीने सांगतो- आमच्या तिसऱ्या कार्यकाळात … आमच्या तिसऱ्या कार्यकाळात आपल्याला भारताचे सामर्थ्य नव्या शिखरावर पोहचवायचे आहे. विकसित भारताच्या संकल्पाच्या प्रवासातील पुढील पाच वर्षे ही आपल्या देशाच्या प्रगतीची आणि वैभवाची वर्षे आहेत. याच सदिच्छेने आणि पूर्ण विश्वासाने,  हे चर्चासत्र झाले असते किंवा नसते, ही मोठी झेप नक्कीच झाली असती. इतका फायदा नक्की झाला की तुम्ही Big लीपचा कार्यक्रम ठेवला, यामुळे मलाही मनोदय मांडण्याची संधी मिळाली. या उपक्रमासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ! तुम्ही सकाळपासून घनघोर विचारमंथन करत असाल, त्यात थोडे हसरे क्षणही या संध्याकाळी फुलले.

खूप खूप धन्यवाद !

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi