Remembers immense contribution of the ‘Utkal Keshari’
Pays tribute to Odisha’s Contribution to the freedom struggle
History evolved with people, foreign thought process turned the stories of dynasties and palaces into history: PM
History of Odisha represents the historical strength of entire India: PM

जय जगन्नाथ!

कार्यक्रमाला माझ्याबरोबर उपस्थित असलेले लोकसभेतले केवळ खासदारच नाही तर संसदीय जीवनामध्ये एक उत्तम खासदार कशा पद्धतीने काम करू शकतो, याचे आदर्श उदाहरण ज्यांना म्हणता येईल असे भाई भर्तृहरी महताब जी, धर्मेंद्र प्रधान जी, इतर वरिष्ठ मान्यवर, देवी आणि सज्जन हो! मला ‘ उत्कल केसरी’ हरेकृष्ण महताब यांच्याशी संबंधित असलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळतेय, हा माझ्यासाठी आनंदाचा विषय आहे. जवळपास दीड वर्षांपूर्वी आम्ही सर्वांनी ‘उत्कल केसरी’ हरेकृष्ण महताब जी यांची 120 वी जयंती आम्ही अतिशय प्रेरणादायी संधी म्हणून साजरी केली होती. आज आपण त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ ‘ओडिशा इतिहास’ याची हिंदी आवृत्ती लोकार्पण करीत आहोत. ओडिशाचा व्यापक आणि विविधतेने नटलेला इतिहास देशातल्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, हे काम करणे खूप आवश्यक आहे.ऊडिया आणि इंग्रजी यांच्यानंतर आता हिंदी आवृत्तीच्या माध्यमातून आपण ही आवश्यकता पूर्ण केली आहे. या नाविन्यपूर्ण प्रयत्नासाठी भाई भर्तृहरी महताब यांना, हरेकृष्ण महताब प्रतिष्ठानला आणि विशेषत्वाने शंकरलाल पुरोहित यांना त्यांनी केलेल्या या कार्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो.

 

मित्रांनो,

भर्तृहरी यांनी या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमाच्या निमंत्रणाबरोबरच मला एक ग्रंथाची प्रतीही दिली होती. हे पुस्तक संपूर्ण मी वाचू शकलो नाही, परंतु एक धावती नजर त्यावर मी टाकली त्यावेळी मनामध्ये असा विचार आला की, हा ग्रंथ हिंदीमध्ये येत आहे, खरोखरीच किती सुखद योगायोग आहे. यंदा देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे, त्याच वर्षात हे पुस्तक हिंदीतून येत आहे. ज्यावेळी हरेकृष्ण महताब जी यांनी महाविद्यालयीन शिक्षण सोडून स्वातंत्र्य आंदोलनामध्ये उडी घेतली होती. या घटनेला यंदा शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. गांधीजींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. वर्ष 2023 मध्ये ‘ओडिशा इतिहास’च्या प्रकाशनालाही 75 वर्ष पूर्ण होत आहेत, हाही एक योगायोग आहे. मला असे वाटते की, जर कोणत्याही विचाराच्या केंद्रस्थानी जर देशसेवेचे, समाजसेवेचे बीज असेल तर असे योगायोग घडून येत असतात.

मित्रांनो,

या पुस्तकाच्या प्रकाशनाविषयी भर्तृहरी यांनी लिहिलेल्या भूमिकेमध्ये नमूद केले आहे की, ‘‘डाॅ. हरेकृष्ण महताब हे असे व्यक्ती होते की, त्यांनी इतिहास रचला आणि इतिहास घडत असताना तो पाहिलाही आहे आणि तो इतिहास लिहिला आहे.’’ वास्तविक अशी ऐतिहासिक व्यक्तिमत्व खूपच विरळा असतात. असे महापुरूष स्वतःच इतिहासातले महत्वपूर्ण अध्याय असतात. महताब जी यांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी आपले जीवन समर्पित केले, आपल्या तरूणपणाचा काळ आंदोलन कार्यासाठी खर्च केला. त्यांनी कारावासामध्ये बराच जीवनकाळ घालवला. पंरतु सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वातंत्र्याच्या लढ्याबरोबरच ते समाजासाठीही लढा देत होते. जात-पात, स्पृश्य-अस्पृश्यता यांच्याविरोधात त्यांनी आंदोलने केली. यामध्ये त्यांनी पिढीजात चालत आलेले मंदिरही सर्व जातींच्या समाजासाठी मुक्त केले आणि त्या काळामध्ये त्यांनी स्वतः कोणत्याही प्रकारे जात-पात न मानण्याचा व्यवहार ठेवून एक आदर्श उदाहरण सर्वांसमोर ठेवले. आज कदाचित हे सर्व करण्यासाठी किती मोठी शक्ती लागते, याचा अंदाज आपल्यापैकी अनेकांना येणार नाही., त्या काळाकडे पाहिल्यानंतर अंदाज येईल की, असे करण्यासाठी कितीतरी मोठे साहस अंगी असावे लागते. कुटुंबामध्ये कशा प्रकारचे वातावरण त्याकाळी होते, आणि असे निर्णय घेतल्यानंतर तो पार पाडताना कितीतरी दिव्यातून जावे लागत होते. स्वातंत्र्यानंतर त्यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री म्हणून खूप मोठे मोठे, महत्वपूर्ण निर्णय घेतले. ओडिशाच्या भविष्य निर्माणासाठी त्यांनी अथक परिश्रम केले. शहरांचे आधुनिकीकरण, बंदराचे आधुनिकीकरण, पोलाद प्रकल्प, अशा कितीतरी कार्यांमध्ये त्यांनी अतिशय महत्वपूर्ण भूमिका निभावली.

 

मित्रांनो,

सत्तेमध्ये आल्यानंतरही त्यांनी नेहमीच स्वतःला एक स्वातंत्र्य सेनानी मानले आणि ते अखेरपर्यंत स्वातंत्र्य सेनानीच राहिले. ज्या पक्षाचे ते मुख्यमंत्री बनले होते, त्याच पक्षाला विरोध करून त्यांनी कारावास पत्करला होता, ही गोष्ट कदाचित आजच्या लोकप्रतिनिधींना बुचकाळ्यात टाकू शकते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरूंगवास भोगणारे आणि देशाची लोकशाही सुरक्षित रहावी, यासाठीही त्यांनी तुरूंगामध्ये जाणे मान्य केले, ते असे विरळा नेते होते. आणीबाणीचा कालखंड संपल्यानंतर मी त्यांना भेटण्यासाठी ओडिशा येथे गेलो होतो, त्यांची त्यावेळी भेट होणे हे मी माझे भाग्य मानतो. त्यांच्या या भेटीविषयी मला सर्व काही जसेच्या तसे आठवतेय. त्यांनी मला दुपारच्या भोजनापूर्वी भेटण्याची वेळ दिली होती. जेवणाची वेळ होईपर्यंत भेट आणि बोलणे पूर्ण होईल, असा स्वाभाविक विचार त्यामागे होता. परंतु आमचे बोलणे इतका वेळ चालले की, दोन-अडीच तास ते भोजनालाही गेले नाहीत. आणि बराच वेळ मला अनेक गोष्टी तपशीलांसह सांगत होते. कारण मी कोणा एका व्यक्तीविषयी त्यावेळी संशोधन कार्य करीत होतो. काही सामुग्री जमा करीत होतो. या कामासाठीच मी त्यांची भेट घेतली होती. मोठ्या परिवारांमध्ये विशेषतः राजकीय क्षेत्रात मोठी कामगिरी करणा-या नेत्यांच्या घरामध्ये जी मुलं जन्माला येतात, त्यांच्याकडे पाहिले की असे वाटते, अरे हे इतक्या महान व्यक्तीची मुले आहेत, त्यांच्या घरात वाढतात, तरीही अशी कशी काय झाली, असा विचार माझ्या मनात नेहमी येतो. परंतु भर्तृहरी जी यांना पाहिले की मात्र असे कधीच वाटले नाही आणि याचे कारण म्हणजे हरेकृष्ण जी यांनी आपल्या परिवारामध्ये जी शिस्त लावली , जे संस्कार मुलांवर केले, या गोष्टीला खूप महत्व दिले त्यामुळेच भर्तृहरी यांच्यासारखे सहकारी मला मिळाले आहेत.

मित्रांनो,

एक मुख्यमंत्री म्हणून ओडिशाच्या भविष्याची चिंता करताना ओडिशाच्या इतिहासाविषयी त्यांना खूप  आकर्षण होते, हे आपण सर्वजण चांगलेच जाणून आहोत. त्यांनी भारतीय काँग्रेसच्या इतिहासामध्ये खूप महत्वाची भूमिका बजावली आहे. ओडिशाच्या इतिहासाला राष्ट्रीय स्तरावर ते घेऊन गेले. ओडिशामध्ये संग्रहालय व्हावे, पुराभिलेख कार्यालय व्हावे, पुराभिलेख विभाग असावा, असे त्यांना वाटत होते, त्यावरून महताब जी यांच्याकडे इतिहास जतन करण्याची दृष्टी दिसून येते. त्यांच्या बहुमूल्या योगदानामुळेच हे कार्य करणे शक्य झाले.

 

मित्रांनो,

तुम्ही महताब जी यांनी लिहिलेला ओडिशाचा इतिहास वाचला तर समजा की, तुम्ही ओडिशाला चांगले जाणून घेतले आहे आणि ओडिशा तुम्ही जगला आहात, असे मी अनेक विव्दानांकडून ऐकले आहे आणि ही गोष्ट खरीही आहे. इतिहास म्हणजे काही भूतकाळातला अध्याय असत नाही. तर भविष्याचा तो एक आरसाही असतो. हा विचार समोर ठेवून आज देश अमृत महोत्सवामध्ये स्वातंत्र्याचा इतिहास पुन्हा एकदा जीवंत करीत आहे. आज आपण स्वातंत्र्य सेनानींचा त्याग आणि बलिदान यांच्या गाथा पुनर्जीवित करीत आहोत. यामुळे आपल्या युवावर्गाला लढ्याची केवळ माहितीच होणार आहे असे नाही तर त्यांना त्याचा अनुभवही घेता येईल. ही मंडळी नवीन आत्मविश्वासाने पुढची वाटचाल करतील आणि काही तरी भव्य करण्याच्या ध्येयाने नवीन संकल्प बनवून त्यांच्या पूर्तीसाठी पुढे जातील. स्वातंत्र्य संग्रामाशी संबंधित अशा कितीतरी कथा आहेत. त्या सर्वच काही देशासमोर त्या काळामध्ये येवू शकल्या नाहीत. आणि ज्याप्रमाणे आत्ता भर्तृहरी सांगत होते की, भारताचा इतिहास म्हणजे काही केवळ राजमहालांचा इतिहास नाही. भारताचा इतिहास काही फक्त राजपथाचा इतिहास नाही. लोकांच्या जीवनाबरोबरच इतिहास आपोआप निर्माण झाला आहे आणि त्याचवेळी तर हजारों वर्षांच्या या महान परंपरा  बरोबर घेवून आपण जगत आलो आहोत. ज्यांनी राज्य केले आणि राजघराण्यांच्या आजूबाजूच्या, त्या विशिष्ट परिघातल्या घटनांनाच इतिहास मानणे ही बाहेरच्या लोकांची विचार पद्धती आहे. आपण काही हे बाहेरचे लोक नाही. संपूर्ण रामायण आणि महाभारत पहा, 80 टक्के गोष्टी सामान्य जनतेच्या आहेत. आणि म्हणूनच आपण लोकांच्या जीवनामध्ये अगदी जनसामान्यांचे एक केंद्र बिंदू म्हणून राहिलो आहोत. आज आपल्या युवकांनी इतिहासाच्या त्या विशेष अध्यायांचा शोध घेतला पाहिजे. विशेष म्हणजे आता हे काम होत आहे. नवीन पिढीपर्यंत योग्य इतिहास पोहोचवण्याचे काम आता होत आहे. या प्रयत्नांमुळे कितीतरी प्रेरणादायक घटना सामो-या येतील. देशाची विविधतेचे कितीतरी रंग आपल्याला माहिती होतील.

मित्रांनो,

हरेकृष्ण जी यांनी स्वातंत्र्य संग्रामातल्या अशा अनेक अध्यायांचा आपल्याला परिचय करून दिला आहे. त्यामुळे ओडिशाविषयी बोध आणि शोध यांचे नवीन दालन मुक्त झाले आहे. पाईक संग्राम, गंजाम आंदोलन, आणि लारजा कोल्ह आंदोलन यांच्यापासून ते संबलपूर संग्रामपर्यंत, ओडिशाच्या भूमीने विदेशी सत्तेच्या विरोधात क्रांतीची मशाला सातत्याने पेटती ठेवली आणि आंदोलनांना नव्याने बळकटी दिली. कितीतरी सेनानींना इंग्रजांनी कारागृहांमध्ये टाकले, त्यांचे छळ केले, अनेकांनी यामध्ये बलिदान दिले. परंतु स्वातंत्र्य मिळवायचेच, हा झालेला दृढनिश्चय काही डगमगला नाही. आंदोलनामध्ये कुणीही शक्तिहीन झाले नाहीत. संबलपूर संग्रामातले वीर क्रांतीकारी सुरेंद्र साय, आमच्यासाठी आजही खूप मोठे प्रेरणास्त्रोत आहेत. ज्यावेळी देशाने गांधीजींच्या नेतृत्वाखाली गुलामीच्या विरोधात आपली अखेरची निर्णायक लढाई सुरू केली, त्यावेळीही ओडिशा आणि इथल्या लोकांनी त्यामध्ये महत्वाची आणि मोठी भूमिका बजावली होती. असहकार आंदोलन आणि सविनय कायदेभंग अशा आंदोलनापासून ते मीठाच्या सत्याग्रहापर्यंत पंडित गोपबंधू, आचार्य हरिहर आणि हरेकृष्ण महताब  यांच्यासारख्या नेत्यांनी ओडिशाचे नेतृत्व केले होते. रमादेवी, मालतीदेवी, कोकिलादेवी, राणी भाग्यवती अशा कितीतरी माता-भगिनींनी स्वातंत्र्याच्या लढ्याला एक नवीन दिशा दिली होती. त्याचबरोबर, ओडिशाच्या आपल्या आदिवासी समाजाचे योगदान कोण विसरू शकेल? आपल्या आदिवासींनी त्यांचे शौर्य आणि देशप्रेमाने विदेशी सत्ताधारींना कधीच चैन पडू दिली  नाही. कदाचित तुम्हा लोकांना काही गोष्टींची माहिती असेलही, माझा प्रयत्न असतो की, हिंदुस्तानमध्ये स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी समाजाने जे नेतृत्व केले, जी महत्वाची भूमिका पार पाडली, त्याच्याविषयी त्या त्या संबंधित राज्यांमध्ये भावी पिढीसाठी एक माहिती संग्रहालय बनविले जावे. या लढ्याच्या अगणित कथा आहेत, अगणित लोकांनी त्याग केला, स्वातंत्र्यासाठी तपस्या केली, बलिदान दिले. त्यांच्या वीरगाथा आहेत. त्यांनी हा लढा कसा दिला, त्यांनी लढा कसा जिंकला, याच्या कथा आहेत. आदिवासींनी प्रदीर्घ काळ इंग्रजांना आपल्या भूमीत पाय ठेवू दिला नाही. आपल्या बळावर त्यांनी आदिवासी समाजाला एकत्र करून लढा दिला. त्यांच्या त्यागाची  आणि तपस्येची ही गौरवगाथा आगामी पिढीला सांगण्याची खूप आवश्यकता आहे. संपूर्ण देशामध्ये आदिवासी समाजाने केलेल्या स्वातंत्र्य लढ्याच्या नेतृत्वाची गाथा वेगळेपणाने लोकांच्या समोर येण्याची गरज आहे, ती पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि अनेक अगणित कथा आहेत, कदाचित त्यांच्याकडे दुर्लक्ष करून इतिहासानेही एकप्रकारे अन्याय केला आहे. आपल्याकडे लोकांचा एक स्वभाव असतो. जर काही झकपक, चकाचक गोष्ट आली की, आपण त्याकडे आकर्षले जातो. त्यामुळे अशा गोष्टींची चर्चा जास्त होते. मात्र तपस्या, त्याग यांच्याविषयीच्या गोष्टी प्रयत्नपूर्वक लोकांसमोर आणण्याची गरज असते. त्या काही एकदम सर्वांसमोर येत नाहीत. इंग्रजांविरोधातल्या भारत छोडो आंदोलनामधले महान आदिवासी नायक लक्ष्मण नायक जी यांचेही आपण सर्वांनी जरूर स्मरण केले पाहिजे. इंग्रजांनी त्यांना फासावर लटकावले होते. स्वंतत्र भारताचे स्वप्न उराशी बाळगून या महान नायकाने भारत मातेच्या पायावर चीरनीद्रा घेतली.

मित्रांनो,

स्वातंत्र्याच्या इतिहासाबरोबरच अमृत महोत्सवामागे एक महत्वपूर्ण भूमिका म्हणजे भारताची सांस्कृतिक विविधता आणि सांस्कृतिक ठेवाही आहे. ओडिशा तर आपल्या या सांस्कृतिक विविधतेचे एक संपूर्ण चित्र आहे. इथली कला, इथले अध्यात्म, इथली आदिवासी संस्कृती म्हणजे संपूर्ण देशाचा वारसा संपत्ती आहे. संपूर्ण देशाला याचा परिचय झाला पाहिजे. सर्वांनी याच्या जोडले पाहिजे. आणि नवीन पिढीला या गोष्टी माहिती झाल्या पाहिजेत. आपण ओडिशाचा इतिहास जितक्या खोलवर जाऊन समजून, जाणून घेतला, दुनियेसमोर आणला, मानवतेला समजून घेताना तितकाच व्यापक दृष्टिकोण आपला बनणार आहे. हरेकृष्ण जी यांनी आपल्या पुस्तकामध्ये ओडिशाच्या आस्था-श्रद्धा, कला आणि वास्तू यांच्यावर जो प्रकाश टाकला आहे, तो जाणून घेतला तर आपल्या युवकांना या दिशेने कार्य करण्यासाठी एक ठोस आधार मिळू शकणार आहे.

 

मित्रांनो,

ओडिशाचा भूतकाळ आपण तपासून पाहिला, खंगाळून काढला तर तुम्हाला दिसेल की, त्यामध्ये आपल्याला ओडिशाच्याबरोबरच संपूर्ण भारताचे ऐतिहासिक सामथ्र्याचे दर्शनही होते. इतिहासामध्ये लिहिलेेले हे सामर्थ्‍य वर्तमान आणि भविष्यातल्या शक्यतांशी जोडले गेले आहे. भविष्यासाठी हा इतिहासच आपल्याला पर्थदर्शक राहणार आहे. आपण पहा, ओडिशाची विशाल सागरी सीमा एकेकाळी भारतातल्या मोठमोठ्या बंदरांचे आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचे केंद्र होते. इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, म्यानमार आणि श्रीलंका यांच्यासारख्या देशांबरोबर इथूनच जो व्यापार होत होता, तो ओडिशा आणि भारताच्या  समृद्धीसाठी मोठा कारणीभूत ठरत होता. काही इतिहासकारांनी केलेल्या शोधानुसार असे सांगण्यात येते की, ओडिशाच्या  कोणार्क मंदिरामध्ये जिराफाची प्रतिमा आहे, याचा अर्थ असा होतो की, ओडिशाचे व्यापारी त्याकाळामध्ये अफ्रिकेपर्यंत व्यापार करीत होते. त्याचीच साक्ष ती जिराफाची प्रतिमा देते. आता त्या काळामध्ये तर व्हाॅटसअप नव्हते, मग तरीही जिराफाची प्रतिमा ओडिशामध्ये कशी आली, याचे उत्तर मिळते. ओडिशाचे अनेक लोक व्यापार करण्यासाठी बाहेरच्या देशामध्ये जात होते, तिकडे ते वास्तव्यही करीत होते. त्यांना ‘दरियापारी ओडिया’ असे म्हटले जात होते. ओडिया भाषेच्या जवळपास अगदी तशीच लिखावट, लिपी अनेक देशांमध्ये सापडते. इतिहासाचे जाणकार सांगतात की, सम्राट अशोक याने या सागरी व्यापारावर अधिकार मिळवण्यासाठी कलिंगवर आक्रमण केले होते. या आक्रमणामुळे सम्राट अशोक याला धम्म अशोक बनवले. आणि एका पद्धतीने, ओडिशा व्यापाराबरोबरच भारतातून बौद्ध संस्कृतीच्या प्रसाराचे एक माध्यमही बनले.

 

मित्रांनो,

त्या काळामध्ये जी नैसर्गिक साधन सामुग्री उपलब्ध होती, तीच साधनसंपत्ती  निसर्गाने आपल्याला आजही दिली आहेत. आपल्याकडे आजही इतका प्रचंड सागरी किनारा आहे. मनुष्य बळ आहे, व्यापारामध्ये अनेक शक्यता आहेत . त्याचबरोबर आज आपल्याकडे आधुनिक विज्ञानाची मोठी ताकद आहे. जर आपण आपल्या या प्राचीन अनुभवांची आणि आधुनिक शक्यतांची एकत्रित जोड दिली तर ओडिशा विकासाच्या नवीन उंचीवर जाऊन पोहोचू शकतो. आज देश या दिशेने अतिशय गांभीर्याने प्रयत्न करीत आहे आणि अधिक प्रयत्न करण्याच्या दिशेनेही आम्ही सजग, जागरूक आहोत. ज्यावेळी मी पंतप्रधान बनलो नव्हतो, निवडणुकाही जाहीर झाल्या नव्हत्या, त्यावेळचे बहुतेक 2013मध्ये मी एक भाषण केले होते. माझ्या पक्षाचाच एक कार्यक्रम त्यावेळी होता. आणि त्या भाषणात मी म्हणालो होतो की, भारताचे भविष्य कसे असेल, हे मी नेमके कसे पाहतो? त्यामध्ये मी म्हणालो होतो की, जर भारताचा समतोल विकास होत नसेल तर कदाचित आपण आपल्यामध्ये अगणित क्षमतांचा पूर्ण स्वरूपात उपयोग करू शकत नाही, हे त्यामागचे कारण असेल. आणि मला असे वाटते की, आपण जर हिंदुस्तानचा नकाशा घेतला आणि त्याच्या मधोमध एक रेषा काढली तर लक्षात येते की त्या काळापासून भारताच्या पश्चिमी भागाकडे जर आपण पाहिले तर प्रगमी, समृद्धी दिसून येईल. आर्थिक व्यवहार होत असल्याचे दिसून येईल. अगदी खालपासून वरपर्यंत हे दिसून येईल. परंतु पूर्वेकडे जिथे इतक्या मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक संपन्नता आहे, जिथे इतक्या मोठ्या प्रमाणात सर्जनशील मने आहेत, अद्भूत मनुष्य बळ आहे, आपल्याकडे पूर्वेकडे मग उडिया असो, बिहार असो, मग बंगाल असो, आसाम असो, ईशान्य भारत असो. हा संपूर्ण भाग एका अशा अद्भूत सामथ्र्यांचे भंडार आहे. एकटा हा भूभाग विकसित झाला ना, हिंदुस्तान कधीच मागे पडू शकणार नाही. इतकी प्रचंड ताकद या पूर्व भागामध्ये आहे. म्हणूनच आपण पाहिले असेल की, गेल्या सहा वर्षांचे विश्लेषण कुणीही जरूर करावे. त्यावेळी त्यांच्या लक्षात येईल, पूर्व भारताच्या विकासासाठी आणि विकास कामांसाठी खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही पुढाकार घेतला आहे. यामध्ये पूर्व भारतामध्ये पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर जास्तीत जास्त भर दिला आहे. याचे कारण म्हणजे देशामध्ये विकासाचा समतोल साधला गेला पाहिजे. पूर्व आणि पश्चिम यांच्यामध्ये जवळपास थोडाफार अगदी उन्नीस बीस असा फरक होणे समजू शकतो. यामागे नैसर्गिक, भौगोलिक कारणे असू शकतात, हे समजून येते. आणि आपण सर्वजण जाणतोच की, भारतामध्ये सुवर्ण युग कधी होते तर, ज्यावेळी भारताचे नेतृत्व पूर्व भारत करीत होता. मग ओडिशा असो, बिहार असो अगदी कोलकाता. हे भारताचे नेतृत्व करणारे केंद्र बिंदू होते. आणि त्यावेळी भारतामध्ये सुवर्णयुग होते म्हणजेच इथे एक अद्भूत, अव्दितीय सामर्थ्‍य आहे. आपल्याला हे सामर्थ्‍य घेऊनच पुढे जायचे आहे. त्यामुळेच आपण पुन्हा एकदा भारताला त्याच महान उंचीवर नेऊ शकणार आहोत .

 

मित्रांनो,

व्यापार आणि उद्योग यांच्यासाठी सर्वात पहिली गरज असते ती पायाभूत सुविधांची! आज ओडिशामध्ये हजारों किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग बनवण्यात येत आहेत. सागरी किनारी महामार्ग बनत आहेत. यामुळे बंदरांना जोडता येणार आहे. शेकडो किलोमीटरचा  नवीन  रेल्वे मार्ग गेल्या 6-7 वर्षात तयार करण्यात आले आहेत. सागरमाला प्रकल्पावरही हजारो कोटी रुपये खर्च केले जात आहेत. पायाभूत सुविधांच्या नंतरचा महत्वपूर्ण आहे तो म्हणजे उद्योग! या दिशेने उद्योग, कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काम करण्यात येत आहे. तेल आणि वायू क्षेत्र यांच्याशी संबंधित उद्योग उभारणीच्या व्यापक शक्यता ओडिशामध्ये आहेत. त्यांच्यासाठी हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ओडिशा सागरी साधन संपत्तीने समृद्ध आहे, त्यामुळे या क्षेत्रातल्या अपार संधी लक्षात घेऊन प्रकल्प तयार करण्यात येत आहेत. देशाचा प्रयत्न आहे की, नील क्रांतीच्या माध्यमातून ओडिशाची प्रगती व्हावी. नील क्रांती ओडिशाच्या विकासाचा आधार बनावी. यामुळे इथल्या मच्छिमारांचे- शेतकरी बांधवांचे जीवनमान सुधारणार आहे.

 

मित्रांनो,

आगामी काळामध्ये या व्यापक शक्यतांसाठी कुशल मनुष्य बळाची खूप मोठ्या प्रमाणावर आवश्यकता भासणार आहे. ओडिशाच्या युवकांना या विकास प्रकल्पांचा जास्तीत जास्त लाभ मिळावा, यासाठी आयआयटी भुवनेश्वर, आयआयएसईआर बहरामपूर आणि भारतीय कौशल्य संस्था या सारख्या संस्थाच्या उभारणीचे काम सुरू केले आहे. यावर्षी जानेवारीमध्ये मला ओडिशातल्या आयआयएम संबलपूरचा शिलान्यास करण्याचे भाग्य लाभले होते. या संस्थांमध्ये आगामी वर्षांत ओडिशाचे भविष्य निर्माण होणार आहे. राज्याचा विकासाला या संस्था नवीन गती देतील.

 

मित्रांनो,

उत्कलमणी गोपबंधू दास जी यांनी लिहिले आहे की -

जगत सरसे भारत कनल।

ता मधे पुण्य नीलाचल।।

आज ज्यावेळी देश स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण करीत आहे, त्या शुभ काळामध्ये या भावनेला, या संकल्पाला पुन्हा एकदा साकार करायचे आहे. आणि मी पाहिले आहे, कदाचित माझ्याकडे अगदी नेमकी आकडेवारी नाही....तरीही कधी कधी वाटते की, कोलकातानंतर कोणत्या एका शहरामध्ये उडिया लोक जास्त वास्तव्य करतात, तर ते सूरत हे शहर आहे आणि याच कारणामुळे मला त्यांच्याशी जोडले जाणे अतिशय स्वाभाविक वाटते. इतक्या सरळ पद्धतीने, आणि कमीत कमी साधनांमध्ये आणि सामान्य परिस्थितीमध्ये खूप उडिया लोकांचे आनंदी जीवन जगणे मी, खूप जवळून पाहिले आहे. त्यांनी कुठे उपद्रव दिला आहे, शांतता भंग केली आहे, असे कधीच, कुठेही नोंद नाही. इतके हे लोक शांतताप्रिय आहेत. आता ज्यावेळी पूर्व भारताविषयी मी बोलतो. आज देशामध्ये मुंबईची चर्चा होते. स्वातंत्र्यापूर्वी कराची शहराची चर्चा होत होती. लाहोरची चर्चा होत होती. हळू-हळू बंगलुरू आणि हैद्राबादची चर्चा सुरू झाली. चेन्नईची चर्चा सुरू झाली. संपूर्ण हिंदुस्तानच्या प्रगती आणि विकास आणि अर्थव्यवस्था यांच्याविषयी लिहिताना तर  सर्वांनाच  कोलकाताची आठवण खूप येते. कारण सळसळता कोलकाता, भविष्याचा विचार करणारा कोलकाता, संपूर्ण पूर्व भारतामध्ये फक्त बंगालच नाही तर पूर्व भारताच्या प्रगतीमध्ये कोलकाता खूप मोठी आणि महत्वाची भूमिका बजावून नेतृत्व देवू शकतो. आमचा प्रयत्न असा आहे की, कोलकाला पुन्हा एकदा ‘सळसळता’ जागृत बनावा. एकप्रकारे पूर्व भारताच्या विकासासाठी कोलकाता एक शक्ती बनून पुढे यावा, असा आमचा प्रयत्न आहे. आणि यासाठी एका  योजनेवर आम्ही काम करीत आहोत. मला विश्वास आहे की, फक्त आणि फक्त देशाचे भले व्हावे, असा विचार करणारेच या निर्णयाला ताकद देवू शकतात. मी आज श्रीमान हरेकृष्ण महताब प्रतिष्ठानच्या विव्दानांना आवाहन करू इच्छितो की, महताब जी यांच्या कामाला पुढे घेवून जाण्याची ही महान संधी आहे. आपल्याला ओडिशाच्या इतिहासाला, इथल्या संस्कृतीला, इथल्या वास्तू वैभवाला देश-विदेशापर्यंत घेवून जायचे आहे. चला तर मग, अमृत महोत्सवामध्ये आपण देशाने केलेल्या आवाहना प्रतिसाद देवून त्याच्याशी जोडले जावू या. या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप देवू या. मला विश्वास आहे की, ज्याप्रमाणे हरेकृष्ण महताब यांनी स्वातंत्र्य संग्रामाच्या काळामध्ये समाजामध्ये ज्याप्रमाणे वैचारिक ऊर्जेचा प्रवाह निर्माण केला, अगदी तसाच प्रवाह या अभियानामुळे निर्माण होईल. त्यांच्या संकल्पाप्रमाणेच हे अभियान प्रवाहित होईल. या शुभ-संकल्पाबरोबरच, मी पुन्हा एकदा या महत्वपूर्ण प्रसंगाला मलाही या परिवाराबरोबर जोडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी महताब प्रतिष्ठानचा आभारी आहे. भाई भर्तृहरी जी यांचा आभारी आहे. मला आपल्यामध्ये येऊन माझ्या मनातल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली, हे भाग्य मानतो. आणि ज्यांच्याविषयी माझ्या मनात श्रद्धा आहेत, ज्यांच्याविषयी मला आदर वाटतो, अशा इतिहासातल्या काही घटनांबरोबर मला जोडले जाण्याची संधी आज मिळाली.  त्याबद्दल मी खूप- खूप आभार व्यक्त करतो.

खूप - खूप धन्यवाद !!

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Mutual fund industry on a high, asset surges Rs 17 trillion in 2024

Media Coverage

Mutual fund industry on a high, asset surges Rs 17 trillion in 2024
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Chief Minister of Andhra Pradesh meets Prime Minister
December 25, 2024

Chief Minister of Andhra Pradesh, Shri N Chandrababu Naidu met Prime Minister, Shri Narendra Modi today in New Delhi.

The Prime Minister's Office posted on X:

"Chief Minister of Andhra Pradesh, Shri @ncbn, met Prime Minister @narendramodi

@AndhraPradeshCM"