नमस्कार
या कार्यक्रमाला उपस्थित आणि आजच्या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी असलेले आमचे ज्येष्ठ सहकारी श्री व्यंकैय्या नायडू गारू, त्यांचे कुटुंबीय, विविध राज्यांचे राज्यपाल, विविध राज्यांचे मंत्री, इतर सर्व ज्येष्ठ मान्यवर, महिला आणि सज्जन हो!
उद्या 1 जुलै रोजी व्यंकैय्या नायडू यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या जीवनयात्रेला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. ही 75 वर्षे असामान्य कामगिरीने परिपूर्ण आहेत. या 75 वर्षांतील टप्पे आश्चर्यकारक आहेत. आज त्यांच्या आत्मचरित्रासह आणखी दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे. मला विश्वास आहे की ही पुस्तके लोकांना प्रेरणा देतील आणि त्यांना देशसेवेसाठी योग्य मार्गदर्शन करतील.
मित्रहो,
व्यंकैय्याजींसोबत मला खूप काळ काम करण्याची संधी मिळाली आहे. ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना… सरकारमधील मंत्रिमंडळातले ज्येष्ठ सहकारी असताना….देशाचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष असताना! जरा विचार करा, एका सामान्य गावातून आलेल्या आणि शेतकरी कुटुंबातील मुलाचा हा मोठमोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याचा हा दीर्घ प्रवास अनेक अनुभवांनी भरलेला आहे. मला आणि माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांना व्यंकैय्याजींकडून खूप काही शिकण्याची संधी मिळाली आहे.
मित्रांनो,
व्यंकैय्याजी यांचे जीवन म्हणजे, त्यांच्या विचारांची, दृष्टकोनाची आणि व्यक्तिमत्त्वाची परिपूर्ण झलक आहे. आज आंध्र आणि तेलंगणामधील आपली स्थिती खुप मजबूत आहे. मात्र, अनेक दशकांपूर्वी जनसंघ आणि भारतीय जनता पक्षाला तिथे मजबूत जनाधार नव्हता. असे असूनही, त्यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (ए बी व्हि पी) कार्यकर्ता या नात्याने नायडूजींनी राष्ट्र प्रथम या भावनेने देशासाठी काहीतरी करण्याचा निर्धार केला. नंतर ते जनसंघात दाखल झाले. आणि अवघ्या काही दिवसांपूर्वी, संविधानाची प्रतिष्ठा धुळीला मिळवत काँग्रेसने लादलेल्या आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. आणीबाणीच्या विरोधात प्राणपणाने लढा दिलेल्या आमच्या मित्रांपैकी व्यंकैय्याजी हे एक होते आणि त्यावेळी व्यंकैय्याजी सुमारे 17 महिने तुरुंगात होते. म्हणूनच मी त्यांना, आणीबाणीच्या आगीत तावून सुलाखून निघालेला माझा कडवा सहकारी मानतो.
मित्रहो,
सत्ता हे सुखाचे साधन नाही तर सेवेचे आणि संकल्पांच्या सिद्धीचे साधन आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये सामील होण्याची संधी मिळाल्यावरही व्यंकैय्याजींनी हे सिद्ध केले. व्यंकैय्याजी यांचे व्यक्तिमत्व आमच्या पक्षात खूप उत्तुंग होते आणि त्यामुळे साहजिकच मंत्रीमंडळातील खातेवाटपावेळी जगभरात सर्वांनाच हवेहवेसे वाटणारे एखादे खाते आपल्यालाही मिळावे असे त्यांना वाटले असते. मात्र ते समोरून गेले आणि म्हणाले, कृपया मला ग्रामविकास मंत्रालय मिळाले तर बरे होईल. ही काही छोटी गोष्ट नाही….आणि व्यंकैय्याजींनी असे का केले याचे कारण म्हणजे नायडूजींना गावे, गरीब आणि शेतकऱ्यांची सेवा करायची होती. आणि विशेष म्हणजे असे पहा, कदाचित ते भारतातील असे मंत्री होते, जे अटलजींच्या काळात ग्रामीण विकासासाठी काम करणारे मंत्री होते आणि आमच्या सोबत मंत्रीमंडळामध्ये ज्येष्ठ सहकाऱ्याच्या रुपात नगरविकास मंत्री म्हणून काम केले. म्हणजे एक प्रकारे ते दोन्ही विषयांत पारंगत आहेत. आणि त्यांनी ते काम ज्या पद्धतीने केले, त्यांच्या विविध उपक्रमांबद्दल, त्यामागील त्यांचे समर्पण, भारतातील आधुनिक शहरांबद्दलची त्यांची दृष्टी याबद्दल काही सांगायचे झाले तर मला बरेच तास लागतील. व्यंकैय्याजी यांच्या कार्यकाळात स्वच्छ भारत मिशन, स्मार्ट सिटी मिशन आणि अमृत योजना यांसारख्या अनेक मोहिमा सुरू झाल्या आहेत.
मित्रांनो,
व्यंकैय्याजींबद्दल बोलत असताना, त्यांचे वक्तृत्व-भाषा, वाक्पटूत्व, त्यांच्या हजरजबाबीपणावर चर्चा केली नाही, तर कदाचित आपले बोलणे अधुरे राहील. व्यंकैय्याजींचा सजगपणा, त्यांची उत्स्फूर्तता, त्यांची त्वरीत उत्तर देण्याची बुद्धीक्षमता, त्यांच्या मिश्किल कोट्या….मला वाटते त्यांच्या या सगळ्या गुणांना तोड नाही. मला आठवते, जेव्हा वाजपेयीजींचे युतीचे सरकार होते, तेव्हा व्यंकैय्याजींची घोषणा होती - एका हातात भाजपाचा झेंडा आणि दुसऱ्या हातात एनडीएचा अजेंडा (राष्ट्रीय लोकशाही आघाडीची विषयपत्रिका) आणि 2014 मध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर काही दिवसातच ते म्हणाले - 'मेकिंग ऑफ डेव्हलप्ड इंडिया'(विकसित भारताची निर्मिती) म्हणजेच मोदी(M O D I). व्यंकैय्याजी इतका विचार कसा करू शकतात याचे मला स्वतःलाच आश्चर्य वाटले. व्यंकैय्या गारू, म्हणूनच व्यंकैय्याजींच्याच शैलीत मी एकदा राज्यसभेत म्हणालो होतो - व्यंकैय्याजींच्या बोलण्यात खोली आणि गांभीर्य असते. त्यांच्या बोलण्यात दृष्टी असते तसेच बुद्धीचातुर्य असते. जिव्हाळा असतो आणि शहाणपण देखील असते.
मित्रहो,
तुमच्या याच विशेष सकारात्मकतेमुळे तुम्ही जेवढा काळ राज्यसभेचे सभापती राहिलात, सदनात कायम सकारात्मकता राहिली. तुमच्या कार्यकाळात सदनाने कितीतरी ऐतिहासिक निर्णय घेतले, हे साऱ्या देशाने पाहिले आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचे विधेयक लोकसभेऐवजी राज्यसभेत पहिल्यांदा मांडण्यात आले. आणि त्यावेळी राज्यसभेत आमच्याकडे बहुमत नव्हते. तरीही, कलम 370 हटवण्याचे विधेयक राज्यसभेत मोठ्या दिमाखात बहुमताने पारित करण्यात आले. यात नक्कीच अनेक सहकाऱ्यांची, पक्षांची, खासदारांची महत्वाची भूमिका होती! पण, अशा संवेदनशील प्रसंगी सभागृह सुरळीत चालवण्यासाठी व्यंकय्याजींसारखे अनुभवी नेतृत्वही तेवढेच आवश्यक होते. तुम्ही या देशासाठी आणि लोकशाहीसाठी अशा अगणित सेवा केल्या आहेत. व्यंकय्या गारू, मी देवाला प्रार्थना करतो की, तुम्ही असेच निरोगी आणि सक्रिय राहून आम्हा सर्वांना दीर्घकाळ मार्गदर्शन करत रहावे. आणि तुम्ही बघितलेच असेल, फार कमी लोकांना माहित असेल की व्यंकय्याजी खूप संवेदनशील व्यक्ती आहेत. जेव्हा आम्ही गुजरातमध्ये काम करायचो तेव्हा व्यंकय्याजी यायचे. त्यावेळी काही संवेदनशील घटनांच्या प्रसंगी ते सर्वात जास्त व्यथित दिसायचे. ते निर्णायक राहिले आणि आज भारतीय जनता पक्षाचा जो विशाल वटवृक्ष दिसत आहे ना, त्यामध्ये व्यंकय्या गारू यांच्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांनी, तीन-तीन, चार-चार पिढ्यांनी ‘भारत माँ की जय’ या एकाच संकल्पाने स्वतःला समर्पित केले आहे. तेव्हा कुठे आज हा विशाल वटवृक्ष उभा राहिला आहे. वेंकय्याजी यांच्यासारखे विशेष लक्ष वेधून घेतात. तसे आमच्या व्यंकय्याजी यांना दुसऱ्याला खिलवण्याचीही तेवढीच आवड आहे. दिल्ली मध्ये त्यांच्या निवासस्थानी, मकर संक्रांतीच्या दिवशी, सर्व तेलगु सणांच्या दिवशी, कधी कधी संपूर्ण दक्षिण भारतीय सणांच्या दिवशी आपण पाहिले आहे. एखाद्या वर्षी हे शक्य झाले नाही, तर सर्वजण विचारतात, व्यंकय्याजी कुठे बाहेर तर गेले नाहीत ना, मकर संक्रांतीचा सण प्रत्येकाच्या स्मरणात राहतो, म्हणजेच व्यंकय्याजी यांच्या जीवन शैलीशीही सर्वजण परिचित आहेत.
मी तर पाहतो की आजही त्यांच्यापर्यंत एखादी चांगली बातमी पोहोचली, एखादी चांगली घटना त्यांनी पाहिली, तर ते फोन करायला कधीच विसरत नाहीत. ते एवढे मनापासून आनंद व्यक्त करतात, की आपल्यासारख्यांना त्यातून खूप प्रेरणा, उत्साह आणि आशा मिळते. आणि म्हणूनच व्यंकय्याजी यांचे जीवन येणाऱ्या पिढ्यांना आणि सार्वजनिक क्षेत्रात ज्यांना काम करायचे आहे, अशा तरुणांसाठी मोठे प्रेरणादायक आहे, चांगले मार्गदर्शन देणारे आहे. आणि ही जी तीन पुस्तके आहेत, ही तीनही पुस्तके त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास उलगडतात. आपणही त्यांच्या प्रवासातले सोबती बनतो. एकामागोमाग येणाऱ्या सर्व घटना आपल्याला गुंतवून ठेवतात.
मित्रांनो,
तुम्हाला आठवत असेल, एकदा मी राज्यसभेत व्यंकय्या गारू यांच्यासाठी काही ओळी म्हटल्या होत्या. राज्यसभेत जे बोललो, ते आज त्यांच्यासाठी पुन्हा सांगायचे आहे... अमल करो ऐसा अमन में...जहां से गुजरें तुम्हारीं नजरें...उधर से तुम्हें सलाम आए...तुमचे व्यक्तिमत्व असेच आहे. तुमचा हा 75 वर्षाचा प्रवास, आणि मला आठवते, माझा एक मित्र आहे, मी त्याला एकदा फोनवर विचारले, किती वर्ष सरली, कारण त्याचाही 75 वा वाढदिवस होता. त्या मित्राने मला हे सांगितले नाही की तो 75 वर्षांचा झाला, माझ्या प्रश्नावर किती वर्षे झाली, हे न सांगता, तो म्हणाला, अजून 25 शिल्लक आहेत. हा बघण्याचा दृष्टीकोन आहे. आज 75 वर्षांचा तुमचा हा प्रवास या टप्प्यावर पोहोचला आहे, आणि जेव्हा तुम्ही शंभरी साजरी कराल, तेव्हा 2047 या वर्षात आपला देश, विकसित भारत, स्वातंत्र्याचा शताब्दी महोत्सव साजरा करत असेल. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! मनःपूर्वक शुभेच्छा! तुमच्या यशात तुमच्या कुटुंबाचेही मोठे योगदान राहिले आहे. खांद्याला खांदा लावून एक प्रमुख सेवक म्हणून सर्वांनी काम केले आहे. मी तुमच्या कुटुंबीयांनाही खूप खूप शुभेच्छा देतो, मनःपूर्वक शुभेच्छा!
धन्यवाद!