तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदराराजनजी, केंद्र सरकारमधील माझे सहकारी बंधू जी किशन रेड्डी जी, इथे उपस्थित सर्व मान्यवर, बंधू आणि भगिनींनो,
आज ज्या ज्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण झाले आहे, त्यासाठी मी तेलंगणाचे खूप खूप अभिनंदन करतो.
ना कुटुम्भ सभ्युल्लारा,
कोणताही देश आणि राज्याच्या विकासासाठी हे अत्यंत आवश्यक आहे की त्यांनी वीज उत्पादनाच्या क्षेत्रात जास्तीत जास्त स्वयंपूर्ण व्हावे. जेव्हा राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध असते, तेव्हा, उद्योग स्नेही वातावरण निर्मिती आणि सर्वसामान्यांचे आयुष्य सुखकर होणे, ह्या दोन्ही गोष्टीत सुधारणा होते. निर्वेध आणि अखंड वीज पुरवठा, राज्याच्या औद्योगिक विकासालाही चालना देतो.
आज पेद्दपल्ली जिल्ह्यात राष्ट्रीय औष्णिक वीज महामंडळ, एनटीपीसी च्या सुपर औष्णिक वीज प्रकल्पाच्या पहिल्या युनिटचे लोकार्पण झाले आहे. लवकरच त्याचे दुसरे युनिट देखील सुरू होणार आहे. जेव्हा या प्रकल्पाची दुसरी संयंत्र रचना सुरू होईल, त्यावेळी, स्थापित वीजक्षमता 4000 मेगावॉट इतकी होईल. मला आनंद आहे, की एनटीपीसीचे देशात जेवढे वीज निर्मिती केंद्र आहेत, त्यातला हा सर्वात आधुनिक प्रकल्प आहे. या प्रकल्पातून जेव्हा वीजनिर्मिती होईल, तेव्हा त्याचा खूप मोठा वाटा तेलंगणाच्या लोकांना मिळेल. आमचे सरकार ज्या प्रकल्पाची सुरुवात करते, तो पूर्ण देखील करून दाखवते. मला आठवते, ऑगस्ट 2016 साली मी या प्रकल्पाची पायाभरणी केली होती. आणि आता त्याच्या लोकार्पणाचे सौभाग्य देखील मलाच मिळाले आहे. ही आमच्या सरकारची नवी कार्य संस्कृती आहे.
ना कुटुम्भ सभ्युल्लारा,
तेलंगणातील लोकांच्या उर्जेशी संबंधित इतर गरजा पूर्ण करण्यासाठी आमचे सरकार काम करत आहे. दोनच दिवसांपूर्वी मला हसन-चेर्लापल्ली एलपीजी पाइपलाइनचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली होती. ही पाइपलाइन एलपीजी ट्रान्सफॉरमेशन आणि त्याची वाहतूक आणि वितरणाची सुरक्षित, किफायतशीर आणि पर्यावरणपूरक प्रणाली विकसित करण्याचा आधार ठरेल.
ना कुटुम्भ सभ्युल्लारा,
आजच मला धर्माबाद-मनोहराबाद आणि महबूबनगर-कुरनूल या रेल्वे स्थानकांवरील विद्युतीकरण प्रकल्प राष्ट्राला समर्पित करण्याची संधी मिळाली. यामुळे तेलंगणाची वाहतूक व्यवस्था सुधारेल वाढेल आणि दोन्ही गाड्यांचा सरासरी वेगही वाढेल. येत्या काही महिन्यांत सर्व रेल्वे मार्गांचे 100 टक्के विद्युतीकरण करण्याचे भारतीय रेल्वेचे उद्दिष्ट आहे. मनोहराबाद-सिद्धीपेठ या नवीन रेल्वे मार्गाचेही आज उद्घाटन करण्यात आले. यामुळे व्यवसायाला चालना मिळेल. 2016 मध्ये मला या प्रकल्पाची पायाभरणी करण्याचीही संधी मिळाली. आज हे कामही पूर्ण झाले आहे.
ना कुटुम्भ सभ्युल्लारा,
आपल्या देशात,पूर्वी बराच काळ, आरोग्य सेवा हा फक्त श्रीमंतांचा हक्क मानला जात होता.मात्र गेल्या नऊ वर्षांत, आरोग्य सेवेबाबतचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही अनेक पावले उचलली आहेत, ज्यामुळे आरोग्य सुविधा आज सर्वांना उपलब्ध आणि परवडणाऱ्या दोन्ही झाल्या आहेत. भारत सरकार वैद्यकीय महाविद्यालये आणि एम्सची संख्याही वाढवत आहे. तेलंगणातील लोकांनी, बीबीनगर इथे सुरू असलेले एम्स इमारतीच्या उभारणीची प्रगती बघत आहेत. जेव्हा रुग्णालये वाढली आहेत, त्यासोबत रुग्णांवर उपचार आणि शुश्रूषा करण्यासाठी डॉक्टर्स आणि परिचारिका यांची संख्याही वाढली आहे.
ना कुटुम्भ सभ्युल्लारा,
आज जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना आयुष्मान भारत, आपल्या देशात सुरू आहे. यामुळे एकट्या तेलंगणातील 70 लाखांहून अधिक लोकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची हमी मिळाली आहे. गरीब आणि मध्यमवर्गीयांना जनऔषधी केंद्रांवर 80 टक्के सवलतीत औषधे दिली जात आहेत. त्यामुळे या कुटुंबांची दरमहा हजारो रुपयांची बचत होत आहे.
ना कुटुम्भ सभ्युल्लारा,
प्रत्येक जिल्ह्यात आरोग्याच्या उत्तम आणि दर्जेदार पायाभूत सुविधा चांगल्या असतील हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही पंतप्रधान आयुष्मान भारत पायाभूत सुविधा अभियान सुरू केले आहे. आज, या मिशन अंतर्गत, तेलंगणामध्ये 20 क्रिटिकल केअर रुग्णालयांची (विभाग) पायाभरणी करण्यात आली आहे. हे विभाग अशाप्रकारे बांधले जातील की त्यात समर्पित विलगीकरण कक्ष, ऑक्सिजन पुरवठा, संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रणाची संपूर्ण व्यवस्था असेल. 5000 हून अधिक आयुष्मान भारत आरोग्य आणि निरामयता केंद्रे देखील तेलंगणामध्ये आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी कार्यरत आहेत.
ना कुटुम्भ सभ्युल्लारा,
ऊर्जा, रेल्वे आणि आरोग्याशी संबंधित महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी मी पुन्हा एकदा तेलंगणातील जनतेचे अभिनंदन करतो.आणि आता मला माहित आहे की लोक पुढच्या कार्यक्रमाची वाट पाहत आहेत,ते मोठ्या उत्साहाने आणि उत्सुकतेने वाट पाहत आहेत, तिथे मोकळे मैदान आहे, त्यामुळे अधिक मोकळेपणाने बोलताही येऊ शकेल.
खूप खूप धन्यवाद.