


नमः पार्वती पतये, हर - हर महादेव!
व्यासपीठावर उपस्थित असलेल्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक, उपस्थित असलेले मंत्री, इतर लोकप्रतिनिधी, बनास दुग्धालयाचे अध्यक्ष शंकरभाई चौधरी आणि येथे इतक्या मोठ्या संख्येने आशीर्वाद देण्यासाठी आलेले माझे सर्व कुटुंबिय,
काशीच्या माझ्या परिवारातील सर्व लोकांना माझा नमस्कार! तुम्ही सर्वजण आज इथे आपला आशीर्वाद देण्यासाठी आले आहात. तुम्ही दाखवलेल्या या प्रेमाचा मी कर्जदार आहे. काशी आपली आहे आणि आपण काशीचे आहोत.
मित्रांनो,
उद्या हनुमान जयंतीचा पवित्र दिवस आहे आणि आज मला संकट मोचन महाराजांच्या काशीमध्ये तुम्हा सर्वांची भेट घेण्याचे सद्भाग्य मिळाले आहे. हनुमान जन्मोत्सवाच्या आधी, काशीची जनता आज विकासाचा उत्सव साजरा करण्यासाठी येथे एकत्र जमली आहे.
मित्रांनो,
गेल्या 10 वर्षांमध्ये बनारस शहराने विकासाचा नवीन वेग पकडला आहे. काशीला आता आधुनिक काळाशी जोडण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर आपल्या परंपरेचे जतन, संवर्धनही केले आणि या परंपरा अधिक उज्ज्वल बनविण्याच्या दिशेने आपल्या काशीने दमदार पावले टाकली आहेत. आज काशी, फक्त प्राचीन नाही, तर प्रगतिशीलही आहे. काशी आता पूर्वांचलच्या आर्थिक नकाशाच्या केंद्रस्थानी आहे. असे म्हणतात की, काशीचे महादेव स्वतःच या पूर्वांचलाच्या विकासाचा रथ पुढे नेत आहेत.
मित्रांनो,
काही वेळापूर्वीच काशी आणि पूर्वांचलच्या विविध भागासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज आहे, अशा अनेक प्रकल्पांचे लोकार्पण आणि शिलान्यास करण्यात आले. संपर्क व्यवस्था अधिक बळकट करणारे पायाभूत प्रकल्प, गावांगावांमध्ये, घरा-घरांमध्ये नळाव्दारे पाणी पोहोचविण्याचे अभियान, शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा सुविधांचा विस्तार करणे, आणि प्रत्येक क्षेत्र, प्रत्येक परिवार, प्रत्येक युवकाला अधिक चांगली सुविधा देण्याचा संकल्प आमचा आहे. या सर्व गोष्टी, या सर्व योजना, पूर्वांचलला विकसित पूर्वांचल बनविण्यच्या दिशेने मैलाचा दगड ठरणार आहेत. काशीच्या प्रत्येक रहिवाशाला या योजनांमुळे खूप लाभ होणार आहे. या सर्व विकास प्रकल्पांसाठी बनारसच्या लोकांचे, तसेच पूर्वांचलातील लोकांचे मी खूप खूप अभिनंदन करतो.
मित्रांनो,
आज सामाजिक चेतनेचे प्रतीक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंतीही आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जीवनभर स्त्री शक्तीच्या हितासाठी, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागृत करण्यासाठी आणि समाज कल्याणासाठी काम केले. आज आपण त्यांच्या विचारांना, त्यांच्या संकल्पांना, महिला सशक्तीकरणाच्या त्यांच्या आंदोलनाला पुढे नेत आहोत. नवीन चैतन्य देत आहोत.
मित्रांनो,
आज मी आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. महात्मा फुले यांच्यासारख्या त्यागी, तपस्वी, महापुरूषांकडून मिळालेल्या प्रेरणेनेच देशाची सेवा करणे हा आमचा मंत्र आहे. आम्ही देशासाठी ‘सबका साथ सबका विकास‘ या मंत्र जपत वाटचाल करीत आहोत. त्यामध्ये समर्पणाचा भाव आहे. एकूणच सर्वांच्या साथीने सर्वांचा विकास आम्ही साध्य करीत आहोत. जे लोक फक्त आणि फक्त सत्ता मिळवण्यासाठी, सत्ता ताब्यात घेण्यासाठी, रात्रंदिवस काही ना काही खेळी करत राहतात. त्यांचा सिद्धांत आहे की, फक्त परिवाराला बरोबर घेवून, परिवाराचा विकास करणे. आज मी ‘सबका साथ, सबका विकास’ हा मंत्र प्रत्यक्षात साकार करण्याच्या दिशेने पूर्वांचलातील पशुपालक परिवारांना, विशेष करून खूप परिश्रम करणा-या माझ्या भगिनींचे खूप खूप अभिनंदन करतो. या भगिनींनी सांगितले आहे की, जर भरवसा केला जाणार असेल तर तो भरवसाचा नवीन इतिहास घडवत असतो. या भगिनी आता संपूर्ण पूर्वांचलच्या दृष्टीने एका नवीन आदर्शाचे उदाहरण बनल्या आहेत. काही वेळापूर्वीच उत्तर प्रदेशातील बनास प्रकल्पाशी संबंधित सर्व पशुपालक सहकारी मंडळींना बोनस वितरित करण्यात आला आहे. बनारस आणि बोनस अशा गोष्टी काही भेटीदाखल मिळत नाहीत. हे तुम्ही सर्वांनी केलेल्या परिश्रमाचे फळ आहे. 100 कोटी रूपयांपेक्षा जास्त बोनसचा हा निधी म्हणजे, तुम्ही सर्वांनी केलेल्या परिश्रमाची मिळालेली भेट आहे.
मित्रांनो,
बनास दुग्धालयाने काशीमधल्या हजारो परिवारांचे भाग्य पालटले आहे. त्यामुळे त्यांची प्रतिमाही पूर्णपणे बदलली आहे. या दुग्धालयाने तुमच्या परिश्रमाला बक्षीसामध्ये परिवर्तित केले आहे आणि सर्वांच्या स्वप्नांना नवीन पंख दिले आहेत. तसेच आनंदाची गोष्ट अशी की, या प्रयत्नांमुळे पूर्वांचलच्या अनेक भगिनी आता लखपती बनल्या आहेत. आधी जिथे रोज उदरभरणाची चिंता वाटत होती, तिथे आता त्यांची पावले आनंदी जीवनाच्या दिशेने पडत आहेत. आणि ही उन्नती बनारस, उत्तर प्रदेशाबरोबरच संपूर्ण देशामध्ये दिसून येत आहे. आज भारत जगातला सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. 10 वर्षांमध्ये दूधाच्या उत्पादनामध्ये जवळपास 65 टक्के वृद्धी झाली आहे. हे यश आपल्याप्रमाणेच देशातील कोट्यवधी शेतकरी बांधवांचे आहे. माझे पशुपालक बंधू आणि भगिनी यांचे हे यश आहे. आणि असे यश काही एका दिवसात मिळत नसते. गेल्या 10 वर्षांपासून आम्ही देशातल्या संपूर्ण दुग्धालय क्षेत्राला ‘मिशन मोड’मध्ये काम करून पुढे घेवून जात आहोत.
आम्ही पशुपालकांना किसान क्रेडिट कार्डच्या सुविधेने जोडले आहे. त्यांच्यासाठी कर्जाची मर्यादा वाढविण्यात आली आहे. अनुदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. आणि सर्वात महत्वाचे, मोठे काम म्हणजे जीवदयेचे आहे.लाळया खुरकत , या जनावरांच्या तोंडाला आणि पायांना होणा-या रोगांपासून पशुधन वाचविण्यासाठी त्यांच्या मोफत लसीकरणाचा कार्यक्रम चालविण्यात येत आहे. कोविड प्रतिबंधक मोफत लसीकरणाची सर्वत्र चर्चा सर्वांनीच केली होती. परंतु आमच्या सरकारचा मंत्र आहे - ‘सबका साथ, सबका विकास’ यामध्ये आम्ही पशुधनाचेही मोफत लसीकरण करीत आहोत.
दूधाचे संघटित संग्रहण व्हावे, यासाठी देशातील 20 हजारांपेक्षा जास्त सहकारी समित्यांना पुन्हा एकदा उभे करण्यात आले आहे. यामध्ये लाखो नवीन सदस्य जोडण्यात आले आहेत. यामध्ये प्रयत्न असा आहे की, दुग्धालय क्षेत्राशी संबंधित लोकांना एकत्रित आणून सर्वांना मिळून पुढे जाता यावे. देशामध्ये गाईचे देशी वाण विकसित व्हावे, त्यांचा दर्जा उत्कृष्ट असावा. गायींच्या प्रजननाचे काम शास्त्रीय पद्धतीने केले जावे, असा दृष्टिकोन विकसित करण्यासाठी राष्ट्रीय गोकूळ मिशन सुरू करण्यात आले आहे. अशी सर्व कामे करण्यामागे मूळ उद्देशच असा आहे की, देशातल्या पशुपालक बंधू-भगिनींनी आता विकासाच्या नवीन मार्गांचा स्वीकार करावा. त्यांना चांगली बाजारपेठ मिळावी, त्यांच्या उत्पादनांमध्ये निर्माण झालेल्या अनेक शक्यतांमुळे त्यांना जोडण्याची संधी मिळावी. आणि आज बनास दुग्धालयाचे काशी संकूल, संपूर्ण पूर्वांचलमध्ये या प्रकल्पाला याच विचारधारेने पुढे नेले जात आहे. बनास दुग्धालयाने इथे गिर गाईचेही वितरण केले आहे आणि मला असे सांगण्यात आले आहे की, त्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. बनास दुग्धालयाने इथे बनारसमध्ये पशूचा-याची व्यवस्थाही सुरू केली आहे. पूर्वांचलातील जवळ-जवळ एक लाख शेतकरी बांधवांकडून आज या दुग्धालयामार्फत दूध संकलन केले जात आहे. शेतकरी बांधवांना आर्थिक दृष्ट्या सशक्त बनवत आहे.
मित्रांनो,
आज थोड्या वेळापूर्वीच मला इथे काही वयाने ज्येष्ठ असलेल्या मित्रांना आयुष्मान वय वंदना कार्डांचे वितरण करण्याची संधी मिळाली. त्यांच्या चेह-यावर मला आनंद आणि समाधानाचे भाव दिसले. माझ्यासाठी त्यांचे हे समाधान सर्वात मोठे यश आहे. वयोवृद्धांना औषधोपचार कसे करावेत, याविषयी खूप चिंता किती सतावत असते, हे आपण सर्वजण जाणून आहोत. 10-11 वर्षांपूर्वी या क्षेत्रामध्ये, संपूर्ण पूर्वांचलमध्ये औषधोपचार करण्यासंबंधी खूप चिंताजनक स्थिती होती. ही गोष्टही आपल्या सर्वांना माहिती आहे. आज मात्र ही स्थिती पूर्णपणे पालटली आहे. माझी काशी आता आरोग्याची राजधानी बनली आता दिल्ली -मुंबईमधली मोठ-मोठी रूग्णालये आता तुमच्या निवासस्थानांजवळ आली आहेत. यालाच तर विकास असे म्हणतात. ज्याठिकाणी सुविधा लोकांच्या जवळ येतात, त्याला विकास म्हणतात.
मित्रांनो,
गेल्या 10 वर्षांमध्ये आम्ही फक्त रूग्णालयांची संख्या वाढवली नाही तर आम्ही रूग्णांची प्रतिष्ठाही वाढवली आहे. आयुष्मान भारत योजना म्हणजे, माझ्या गरीब बंधू-भगिनींसाठी कोणत्याही वरदानापेक्षा कमी नाही. या योजनेतून काही फक्त औषधोपचारच केले जातात असे नाही. तर औषधोपचाराबरोबरच एक प्रकारचा विश्वास या योजनेने दिला आहे. उत्तर प्रदेशातील लक्षावधी आणि वाराणसीतील हजारो लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. प्रत्येक औषधोपचार, प्रत्येक शस्त्रक्रिया, यांच्यामुळे जी स्वस्थता मिळाली, त्यामुळे जीवनाची एक नवीन सुरूवात करता आली आहे. आयुष्मान योजनेमुळे उत्तर प्रदेशातील लक्षावधी कुटुंबांचे औषधोपचारासाठी खर्च होणारे कोट्यवधी रूपये वाचले आहेत. कारण सरकारने सांगितले आहे की, आता तुमच्या औषधोपचाराची जबाबदारी आमची आहे.
आणि सहकाऱ्यांनो,
जेव्हा तुम्ही आम्हाला तिसऱ्यांदा आशीर्वाद दिला, तेव्हा आम्हीही आपल्याला सेवकाच्या रुपात आपुलकीने आमचे कर्तव्य पार पाडले आहे आणि काहीतरी परत देण्याचा नम्र प्रयत्न केला आहे. मी हमी दिली होती ज्येष्ठ नागरिकांसाठी उपचार मोफत केले जातील, त्याचाच परिणाम म्हणजे आयुष्मान वय वंदना योजना! ही योजना ज्येष्ठ नागरिकांच्या उपचारांच्या बरोबरीनेच त्यांच्या सन्मानासाठी आहे. आता प्रत्येक कुटुंबातील 70 पेक्षा जास्त वय असलेले ज्येष्ठ नागरिक, जरी त्यांचे उत्पन्न काहीही असले, त्यांना मोफत उपचारांचा अधिकार आहे. वाराणसीमध्ये सर्वात जास्त, जवळपास 50 हजार वय वंदना कार्ड इथल्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचली आहेत. हे केवळ आकडे नाहीत, हा सेवेचा, एका सेवकाचा नम्र प्रयत्न आहे. आता उपचारांसाठी जमीन विकण्याची गरज नाही! आता उपचारांसाठी कर्ज घेण्याची गरज नाही! आता उपचारांसाठी दारोदार भटकण्याची लाचारी नाही! आपल्या उपचारांच्या पैशांची चिंता करू नका, आयुष्मान कार्डद्वारे तुमच्या उपचारांचे पैसे आता सरकार देईल!
सहकाऱ्यांनो,
आज काशीहून जो कोणी जातो, तो इथल्या पायाभूत सुविधांची, इथल्या सोयीसुविधांची खूप प्रशंसा करतो. आज दररोज लाखो लोक बनारसला येतात. बाबा विश्वनाथांचे दर्शन घेतात, माता गंगेत स्नान करतात. प्रत्येक यात्रेकरू म्हणतो, बनारस खूप बदलले आहे. कल्पना करा, जर काशीचे रस्ते, इथली रेल्वे आणि विमानतळाची स्थिती 10 वर्षांपूर्वीसारखीच राहिली असती, तर काशीची अवस्था किती वाईट झाली असती. पूर्वी तर छोट्या-छोट्या सणांच्या काळातही वाहतुक खोळंबलेली असयाची. जसे की कुणाला चुनारहून यायचे असेल आणि शिवपूरला जायचे असेल. पूर्वी त्याला पूर्ण बनारस फिरून, वाहतुकीच्या खोळंब्यात अडकून, धूळ-उन्हात तापून जावे लागत असे. आता फुलवरियाचा उड्डाणपूल बनला आहे. आता अंतरही कमी , वेळेचीही बचत, जीवनही आरामात आहे! याचप्रमाणे जौनपूर आणि गाझीपूरच्या ग्रामीण भागातील लोकांना ये-जा करण्यासाठी आणि बलिया, मउ , गाझीपूर जिल्ह्यांतील लोकांना विमानतळावर जाण्यासाठी वाराणसी शहरातून जावे लागत असे. तासन् तास लोक वाहतुकीच्या खोळंब्यात अडकून पडत असत. आता रिंगरोडमुळे काही मिनिटांत, लोक या टोकावरून त्या टोकाला पोहोचतात.
सहकाऱ्यांनो,
कुणाला गाझीपूरला जायचे असेल तर पूर्वी कितीतरी तास लागत होते. आता गाझीपूर, जौनपूर, मिर्झापूर, आझमगड प्रत्येक शहरात जाण्याचा रस्ता, पोहोचण्याचा रस्ता रुंद झाला आहे. जिथे पूर्वी वाहतूक खोळंबलेली असायची, आज तिथे विकासाच्या वेगाने गती घेतली आहे! मागील दशकात वाराणसी आणि आसपासच्या क्षेत्रांची कनेक्टिव्हिटी, त्यावर जवळपास 45 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हे पैसे केवळ काँक्रीटमध्ये गेले नाहीत, ते विश्वासात परिवर्तीत झाले आहेत. या गुंतवणुकीचा लाभ आज संपूर्ण काशी आणि आसपासच्या जिल्ह्यांना मिळत आहे.
सहकाऱ्यांनो,
काशीच्या पायाभूत सुविधांवर होत असलेल्या या गुंतवणुकीची व्याप्ती आजही वाढवली गेली आहे. हजारो कोटींच्या प्रकल्पांचे आज भूमिपूजन झाले आहे. आपले जे लाल बहादूर शास्त्री विमानतळ आहे, त्याच्या विस्तारीकरणाचे कामही वेगाने सुरू आहे. जेव्हा विमानतळ मोठे होत आहे, तेव्हा त्याला जोडणाऱ्या सुविधांचा विस्तारही आवश्यक होता. म्हणून आता विमानतळाजवळ 6 मार्गिकांचा भूमिगत बोगदा बनणार आहे. आज भदोही, गाझीपूर आणि जौनपूरच्या रस्त्यांशी जोडलेल्या प्रकल्पांवरही काम सुरू झाले आहे. भिखारीपूर आणि मंडुवाडीह इथे उड्डाणपुलाची मागणी बऱ्याच दिवसांपासून होत होती. आम्हाला आनंद आहे की ही मागणी पूर्ण होत आहे. बनारस शहर आणि सारनाथला जोडण्यासाठी नवीन पूलही बनणार आहे. यामुळे विमानतळ आणि इतर जिल्ह्यांतून सारनाथला जाण्यासाठी शहरातून जाण्याची गरज भासणार नाही.
सहकाऱ्यांनो,
पुढील काही महिन्यांत, जेव्हा ही सर्व कामे पूर्ण होतील, तेव्हा बनारसमध्ये ये-जा करणे आणखी सोपे होईल. वेगही वाढेल आणि व्यापारही वाढेल. यासोबतच, कमवण्यासाठी - उपचारांसाठी बनारसला येणाऱ्यांनाही खूप सोयीचे होईल. आणि आता तर काशीमध्ये सिटी रोपवेची चाचणीही सुरू झाली आहे, बनारस आता जगातील निवडक अशा शहरांमध्ये असेल, जिथे अशी सुविधा असेल.
सहकाऱ्यांनो,
वाराणसीमध्ये विकास आणि पायाभूत सुविधांचे कोणतेही काम होते, तेव्हा त्याचा लाभ संपूर्ण पूर्वांचलच्या युवा वर्गालाही मिळतो. आमच्या सरकारने यावरही खूप भर दिला आहे की काशीच्या युवा वर्गाला क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याच्या सातत्याने संधी मिळाव्यात. आणि आता तर 2036 मध्ये, ऑलिम्पिक भारतात व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पण ऑलिम्पिकमध्ये पदकं मिळवण्यासाठी माझ्या काशीच्या युवांनो तुम्हाला आतापासूनच तयारी करावी लागेल. आणि म्हणूनच आज, बनारसमध्ये नवीन स्टेडियम बनत आहेत, युवा सहकार्यांसाठी चांगल्या सुविधा बनत आहे. नवीन क्रीडा संकुल सुरू झाले आहे. वाराणसीचे शेकडो खेळाडू त्यात प्रशिक्षण घेत आहेत. खासदार क्रीडा स्पर्धेतील सहभागींनाही या क्रीडांगणावर आपली क्षमता दाखवण्याची संधी मिळाली आहे.
सहकाऱ्यांनो,
भारत आज विकास आणि वारसा, दोन्ही एकत्र घेऊन वाटचाल करत आहे. याचे सर्वोत्तम प्रारुप, आपली काशी बनत आहे. इथे गंगाजीचा प्रवाह आहे आणि भारताच्या चेतनेचाही प्रवाह आहे. भारताचा आत्मा त्याच्या विविधतेत वसलेला आहे आणि काशी त्याचे सर्वात सुंदर चित्र आहे. काशीच्या प्रत्येक मोहल्ल्यात एक वेगळी संस्कृती, प्रत्येक गल्लीत भारताचा एक वेगळा रंग दिसतो. मला आनंद आहे की काशी-तमिळ संगमम् सारख्या आयोजनातून, एकतेचे हे बंध निरंतर दृढ होत आहेत. आता तर इथे एकता मॉलही बनणार आहे. या एकता मॉलमध्ये भारताच्या विविधतेचे दर्शन होईल. भारतातील वेगवेगळ्या जिल्ह्यांचे उत्पादन, इथे एकाच छताखाली मिळतील.
सहकाऱ्यांनो,
मागील वर्षांमध्ये, उत्तर प्रदेशाने आपला आर्थिक चेहरामोहरा बदलला आहे, दृष्टिकोनही बदलला आहे. उत्तर प्रदेश, आता केवळ शक्यतांची भूमी राहिली नाही, आता ती सामर्थ्य आणि सिद्धींची संकल्प भूमी बनत आहे! आता जसे आजकल मेड इन इंडियाचा उद्घोष सर्वत्र आहे. भारतात बनलेल्या वस्तू, आता जागतिक ब्रँड बनत आहेत. आज इथे अनेक उत्पादनांना GI टॅग देण्यात आला आहे. GI टॅग, हा काही केवळ एक टॅग नाही, हे त्या त्या जमिनीच्या ओळखीचे प्रमाणपत्र आहे. हे सांगते की ही वस्तू, याच मातीतले उत्पादन आहे. जिथे GI टॅग पोहोचतो, तिथून बाजारात झेप घेण्याचा मार्ग खुला होतो.
सहकाऱ्यांनो,
आज उत्तर प्रदेश संपूर्ण देशात GI टॅगिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे! म्हणजेच आपली कला, आपल्या वस्तू, आपल्या कौशल्याची आता वेगाने आंतरराष्ट्रीय ओळख बनत आहे. आतापर्यंत वाराणसी आणि त्याच्या आसपासच्या जिल्ह्यांमध्ये 30 पेक्षा जास्त उत्पादनांना GI टॅग मिळाला आहे. वाराणसीचा तबला, शहनाई, भिंतीवरची चित्रे, थंडाई, लाल भरलेली मिरची, लाल पेढा, तिरंगा बर्फी, प्रत्येक गोष्टीला मिळाली आहे ओळखीचा नवीन पासपोर्ट, GI टॅग. आजच, जौनपूरची इमरती, मथुराची सांझी कला, बुंदेलखंडचा कठिया गहू, पीलीभीतची बासरी, प्रयागराजची मुंज कला, बरेलीची जरदोजी, चित्रकूटची काष्ठ कला, लखीमपूर खीरीची थारू जरदोजी, अशा अनेक शहरांच्या उत्पादनांना GI टॅग वितरित करण्यात आले आहेत. म्हणजेच उत्तर प्रदेशच्या मातीमध्ये जो सुगंध आहे, तो आता केवळ हवेत नाही, तर सीमांच्या पलीकडेही जाईल.
सहकाऱ्यांनो,
जो काशीला जपतो, तो भारताच्या आत्म्याला जपतो. आपल्याला काशीला निरंतर बळकट करत राहायचे आहे. आपल्याला काशीला, सुंदर आणि स्वप्नवत राखायचे आहे. काशीच्या पुरातन आत्म्याला, आधुनिक शरीराशी जोडत राहायचे आहे. याच संकल्पाने, माझ्यासोबत एकदा पुन्हा, हात उंचावून म्हणा, नमः पार्वती पतये, हर हर महादेव. खूप खूप धन्यवाद.