भारत माता की – जय !
भारत माता की – जय !
भारत माता की – जय !
वणक्कम !
मंचावर उपस्थित, तामिळनाडूचे राज्यपाल श्री आर एन रवी जी, माझे सहकारी सर्बानंद सोनोवाल जी, श्रीपाद नाईक जी, शांतनू ठाकूर जी, एल मुरुगन जी, राज्य सरकारचे मंत्री, इथले खासदार, इतर मान्यवर आणि सभ्य स्त्री-पुरूषहो, वणक्कम!
आज तामिळनाडू थुथुकुडीमध्ये प्रगतीचा नवा अध्याय लिहित आहे. अनेक प्रकल्पांचे उद्घाटन किंवा पायाभरणी होते आहे. हे प्रकल्प विकसित भारताच्या आराखड्याचा महत्त्वाचा भाग आहेत. या घडामोडींमध्ये एक भारत श्रेष्ठ भारत ही भावनाही अनुभवता येते आहे. हे प्रकल्प थुथुकुडीमध्ये आकाराला येत असतील पण ते भारतातील अनेक ठिकाणच्या विकासाला वेग देतील.
मित्रहो,
आज देश विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी काम करत आहे. आणि विकसित भारतात, विकसित तामिळनाडूची भूमिका सुद्धा तितकीच मोठी आहे. दोन वर्षांपूर्वी मी कोईम्बतूरला आलो होतो, तेव्हा चिदंबरनार बंदराची कार्गो क्षमता वाढवण्यासाठी मी अनेक प्रकल्प सुरू केले होते. या बंदराला शिपिंगचे मुख्य केंद्र बनवण्याचे आश्वासन तेव्हा मी दिले होते. आज ती हमी पूर्ण होते आहे. 'व्ही ओ चिदंबरनार बंदरासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या 'आउटर हार्बर कंटेनर टर्मिनल'ची आज पायाभरणी करण्यात आली आहे. या एका प्रकल्पात 7 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. 900 कोटी रुपये खर्चाच्या अनेक प्रकल्पांचे आज लोकार्पण झाले आहे. याशिवाय आज विविध बंदरांवरच्या सुमारे अडीच हजार कोटी रुपये खर्चाच्या 13 नवीन प्रकल्पांची पायाभरणीही येथून करण्यात आली आहे. सागरी क्षेत्राच्या या कायापालटाचा लाभ तामिळनाडूमधील लाखो लोकांना होणार असून येथील युवा वर्गासाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत.
मित्रहो,
मला तामिळनाडूमधल्या आणि देशातल्या जनतेला एक गोष्ट सांगणे गरजेचे वाटते. आणि हे सांगताना मला दु:ख होते आहे. सत्य कडू असते पण हे सत्य सांगणेही आवश्यक आहे. यूपीए सरकारवर मला थेट आरोप करायचा आहे. आज मी आणलेले हे सर्व प्रकल्प इथल्या लोकांची अनेक दशकांपासूनची मागणी होती. आज इथे जे लोक सत्तेत आहेत तेच त्यावेळी दिल्लीत सत्तेत होते. हे विभाग चालवत होते. पण तुमच्या विकासाची काळजी त्यांना नव्हती. ते तामिळनाडूबद्दल बोलत राहिले, पण तामिळनाडूच्या कल्याणासाठी पावले उचलण्याचे धाडस त्यांच्यात नव्हते. आज तुमचा हा सेवक तामिळनाडूच्या भूमीवर तामिळनाडूचे नवे नशीब लिहिणारा एक सेवक म्हणून आला आहे.
मित्रहो,
आज भारतातील पहिली हायड्रोजन इंधन फेरी सुद्धा सुरू करण्यात आली आहे. ही फेरी लवकरच काशीमध्ये गंगा नदीत सुरू होईल. एका अर्थाने ही तामिळनाडूच्या लोकांकडून काशीच्या जनतेला मिळालेली खूप मोठी भेट आहे, आणि काशी आणि तामिळनाडू यांच्यातील नाते, काही दिवसांपूर्वी मला काशी-तमिळ संगमामध्ये जी ऊर्जा दिसली, जी भक्ती मला दिसली, भारतावरचे प्रेम मला दिसते, त्यामुळे काशीतील लोक आणि काशीला जाणारा प्रत्येक देशवासीय जेव्हा या फेरीत बसेल तेव्हा त्यांना तमिळनाडूसुद्धा आपलेसे वाटेल. आज ‘व्हीओसी पोर्ट’ वर डिसेलिनेशन प्लांट, ग्रीन हायड्रोजन उत्पादन आणि बंकरिंग सुविधांचाही शुभारंभ झाला. या प्रकल्पांमुळे थुथुकुडी आणि तामिळनाडू, हे हरित ऊर्जा आणि शाश्वत विकासाचे मोठे केंद्र बनतील. आज जग सुरक्षित भविष्यासाठी ज्या पर्यायांमध्ये पाहत आहे, त्या बाबतीत तामिळनाडू खूप पुढे जाईल.
मित्रहो,
सागरी क्षेत्रासोबतच आज या ठिकाणी रेल्वे आणि रस्त्यांशी संबंधित अनेक विकास प्रकल्पांचाही शुभारंभ झाला आहे. रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण आणि दुपदरीकरणामुळे दक्षिण तामिळनाडू आणि केरळमधील कनेक्टिव्हिटी आणखी सुधारेल. यामुळे तिरुनेलवेली-नागरकोइल क्षेत्रावरचा भारही कमी होईल. त्याचप्रमाणे तामिळनाडूच्या रस्तेसंबंधी पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी, आज मी साडेचार हजार कोटी रुपये खर्चाच्या 4 मोठ्या प्रकल्पांचेही लोकार्पण केले. यामुळे राज्याची रस्ते जोडणी सुधारेल, प्रवासाचा वेळ कमी होईल आणि पर्यटन तसेच उद्योग क्षेत्रालाही मोठी चालना मिळेल.
मित्रहो,
आज देश ‘संपूर्ण सरकार’ या दृष्टिकोनासह काम करत आहे. रेल्वे, महामार्ग आणि जलमार्ग हे वेगवेगळे विभाग दिसत असले तरी तिन्हींचे उद्दिष्ट एकच आहे - तामिळनाडूमध्ये उत्तम कनेक्टिव्हिटी, चांगल्या सुविधा आणि उद्योगासाठी चांगल्या संधी निर्माण करणे. म्हणूनच, हे सागरी प्रकल्प, रस्ते प्रकल्प, रेल्वे प्रकल्प, एकाच वेळी सुरू करण्यात आले किंवा पूर्ण केले गेले आहेत. मल्टीमोडल कनेक्टिव्हिटीचा हा दृष्टीकोन तामिळनाडूच्या विकासाला अधिक वेग देईल. आधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी सुरू करण्यात आलेल्या पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखड्याचीही या कामी मोठी मदत होणार आहे. या सर्व प्रकल्पांसाठी मी तुम्हा सर्वांचे आणि माझ्या तमिळनाडूतील सर्व बंधू-भगिनींचे अभिनंदन करतो.
मित्रहो,
मी एकदा मन की बात कार्यक्रमात म्हटले होते की देशातील प्रमुख दीपगृहे ही पर्यटन स्थळे म्हणून विकसित करता येतील. आज मला वेगवेगळ्या राज्यांमध्ये असलेल्या 75 दीपगृहांमध्ये विकसित करण्यात आलेल्या पर्यटन सुविधा देशाला समर्पित करण्याचो सौभाग्य प्राप्त झाले आहे. आणि तुम्ही बघा, एकाच वेळी 75, हा नवा भारत आहे. आगामी काळात ही देशाची मोठी पर्यटन केंद्रे बनतील, असा विश्वास मला वाटतो
मित्रांनो ,
भारत सरकारच्या प्रयत्नांमुळे आज तामिळनाडूमध्ये आधुनिक संपर्क सुविधा एका नव्या उंचीवर आहेत . गेल्या 10 वर्षात तमिळनाडूमध्ये 1300 किलोमीटर रेल्वे पायाभूत सुविधांची कामे झाली आहेत.दोन हजार किलोमीटर रेल्वे मार्गाचे विद्युतीकरणही झाले आहे. रेल्वे प्रवासी आणि सर्वसामान्यांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी शेकडो उड्डाणपूल आणि अंडरपास बांधण्यात आले आहेत.रेल्वे स्थानके आधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्यात आली आहेत. आज तमिळनाडूमध्ये जागतिक दर्जाच्या प्रवासाच्या अनुभवासाठी 5 वंदे भारत रेल्वे गाड्या देखील चालवल्या जात आहेत.भारत सरकार तमिळनाडूमध्ये रस्ते पायाभूत सुविधांमध्ये सुमारे दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे. याचाच परिणाम म्हणजे गेल्या दहा वर्षांत तमिळनाडूचे राष्ट्रीय महामार्गाचे जाळे झपाट्याने विस्तारले आहे .केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे वाढत्या संपर्क सुविधा तमिळनाडूमध्ये जीवन सुलभता वाढवत आहे. आणि मित्रांनो, मी जे काही बोलतो आहे , ते मी राजकीय पक्षाच्या विचारसरणीबद्दल बोलत नाही किंवा माझ्या विचारसरणीबद्दल देखील बोलत नाही.मी विकासकामां बद्दल बोलतो आहे . पण मला माहिती आहे की, तमिळनाडूची अनेक वर्तमानपत्र आणि अनेक टीव्ही वाहिन्यांना हे छापायचे आहे, दाखवायचे आहे पण इथे ज्या प्रकारची सत्ता आहे ती त्यांना हे करू देणार नाही. मात्र तरीही आम्ही तामिळनाडूला सेवा देणे थांबवणार नाही. विकासकामांना रखडू देणार नाही
मित्रांनो,
जलमार्ग आणि सागरी क्षेत्राला आपल्या देशात दुर्लक्षित नजरेने पाहिले जात होते . मात्र हीच दुर्लक्षित क्षेत्र आज विकसित भारताचा पाया बनत आहेत.तमिळनाडू आणि दक्षिण भारताला याचा सर्वाधिक लाभ मिळत आहे. तमिळनाडूमध्ये 3 मोठी बंदरे आहेत. एक डझनहून अधिक छोटी बंदरे आहेत. आपल्या दक्षिणेकडील जवळपास सर्व राज्यांमध्ये सागरी किनाऱ्यावरील अपार संधीं उपलब्ध आहेत सागरी क्षेत्र आणि जलमार्ग क्षेत्राचा विकास याचा स्पष्ट अर्थ , तमिळनाडू सारख्या राज्याचा विकास आहे. आपण पाहिले असेल , गेल्या एक दशकात एकट्या व्हीओसी बंदरावर वाहतूक पस्तीस टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षी या बंदराने अडतीस दशलक्ष टन मालाची हाताळणी केली होती. या बंदराची वार्षिक वृद्धी देखील अकरा टक्के राहिली आहे. असेच परिणाम आज आपल्याला देशातील दुसऱ्या मोठ्या बंदरांवरही पाहायला मिळत आहेत. यांच्या यशात भारत सरकारच्या सागरमाला सारख्या प्रकल्पांचे मोठे योगदान राहिले आहे.
मित्रांनो,
केंद्र सरकारच्या प्रयत्नांनी आज भारत सागरी आणि जलमार्ग क्षेत्रात नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. गेल्या दहा वर्षात, लॉजिस्टिक कामगिरी निर्देशांकामध्ये भारताने अनेक पायऱ्या वर चढत अडतिसावे स्थान गाठले आहे.या दशकात आपल्या बंदराची क्षमता दुप्पट झाली आहे. राष्ट्रीय जलमार्ग 8 पटीने वाढले आहेत. भारतातील क्रूझ प्रवाशांच्या संख्येतही 4 पटीने वाढ झाली असून, खलाशांची संख्याही दुप्पट झाली आहे.येत्या काळात सागरी क्षेत्राची ही वृद्धी अनेक पटींनी होणार असून, किनारपट्टी लगतच्या राज्यांसह तमिळनाडूलाही त्याचा मोठा लाभ निश्चित मिळणार आहे. आणि यासह, किनारपट्टीच्या राज्यांमध्ये माझ्या तरुणांना, माझ्या देशाच्या तरुण मुला-मुलींना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.मला विश्वास आहे की , आगामी काळात तामिळनाडू विकासाच्या या मार्गावर अधिक वेगाने पुढे जाईल.आणि मी तुम्हाला हमी देतो, जेव्हा तिसऱ्या वेळी देश आम्हाला सेवेची संधी देईल, तेव्हा मी तुमचीही सेवा नव्या ताकदीने करेन . आज ज्या प्रकल्पांची पायाभरणी झाली आहे ते पूर्ण करण्यासाठी आम्ही तितक्याच ताकदीने प्रयत्न करू. आणि ही मोदींची तमिळनाडूच्या जनतेला ही हमी आहे.
मित्रांनो ,
मी दोन दिवसांपासून तामिळनाडूच्या विविध भागांना भेट देत आहे. मी तमिळनाडूच्या लोकांमध्ये जे प्रेम पाहतो आहे , त्यांच्या हृदयात जो उत्साह दिसतो आहे हे प्रेम , हे आशीर्वाद , माझ्या तामिळनाडूच्या बंधू आणि भगिनींनो लिहून ठेवा मी ते वाया जाऊ देणार नाही. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद मी विकासाच्या माध्यमातून व्याजासह परत करेन . मी स्वतःला तुमच्या सेवेत वाहून घेईन.
तमिळनाडूच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,
आजचा हा कार्यक्रम म्हणजे विकासाचा उत्सव साजरा करण्याचा प्रसंग आहे. चला, माझ्यासोबत विकासाचा हा उत्सव साजरा करण्यासाठी तुमचे मोबाईल फोन बाहेर काढा. तुमच्या मोबाईलचा फ्लॅश लाईट सुरु करा. आणि संपूर्ण देशाला दाखवा, आज भारत आणि तामिळनाडू सरकार एकत्र विकासाचा उत्सव साजरा करत आहेत.
अद्भुत, अद्भुत, अद्भुत !
भारत माता की – जय !
भारत माता की – जय !
भारत माता की – जय !
वंदे – मातरम !
वंदे – मातरम !
वंदे – मातरम !
खूप - खूप धन्यवाद !