राजकोट, भटिंडा, रायबरेली, कल्याणी आणि मंगलगिरी ही पाच एम्स राष्ट्राला समर्पित
23 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 11,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 200 हून अधिक आरोग्य सेवा पायाभूत सुविधा प्रकल्पांची केली पायाभरणी आणि राष्ट्राला समर्पित
पुण्यातल्या ‘निसर्ग ग्राम’ या राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेचे केले उद्घाटन
कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या सुमारे 2280 कोटी रुपयांच्या 21 प्रकल्पांचे उद्घाटन आणि राष्ट्रार्पण
विविध नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांची केली पायाभरणी
9000 कोटी रुपयांच्या नवीन मुंद्रा-पानिपत पाइपलाइन प्रकल्पाची केली पायाभरणी
"आम्ही प्रमुख विकास कार्यक्रमांचे उद्घाटन दिल्लीबाहेरही करत असून महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम दिल्लीबाहेर आयोजित करण्याचा रिवाज वाढत आहे"
“नवभारत आपली कामे वेगाने पूर्ण करत आहे”
"मी पाहतोय की पिढ्या बदलल्या तरी मोदींबद्दलची आपुलकी कोणत्याही वयोमर्यादेच्या पलीकडे आहे"
"पाण्याखाली गेलेल्या द्वारकेच्या दर्शनाने, विकास आणि वारसा या माझ्या संकल्पाला नवे बळ मिळाले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील राजकोट इथे, 48,100 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी केली आणि काही राष्ट्राला समर्पित केले. या प्रकल्पांमध्ये आरोग्य, रस्ते, रेल्वे, ऊर्जा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, तसेच पर्यटन यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे.
"मी पाहतोय की पिढ्या बदलल्या तरी मोदींबद्दलची आपुलकी कोणत्याही वयोमर्यादेच्या पलीकडे आहे" असे पंतप्रधान कृतज्ञतेने म्हणाले.

भारत माता की जय!

भारत माता की जय!

मंचावर उपस्थित गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी मनसुख मांडविया, गुजरात प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि संसदेतील माझे सहकारी सी. आर. पाटील, मंचावर विराजमान अन्य सर्व मान्यवर आणि राजकोटच्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, नमस्कार!

आजच्या या कार्यक्रमात देशातील अनेक राज्यांमधून इतर लोकही मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल, आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री, हे सर्वजण दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. त्या सर्वांचेही मी मनापासून अभिनंदन करतो.

एक काळ होता, जेव्हा देशातील सर्व प्रमुख कार्यक्रम दिल्लीतच व्हायचे. मी भारत सरकारला दिल्लीतून बाहेर आणून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवले आणि आज राजकोटला पोहोचले आहे. आजचा कार्यक्रमही याचाच साक्षीदार आहे. आज या एकाच कार्यक्रमातून देशातील अनेक शहरांमध्ये विकासकामांचे लोकार्पण  आणि पायाभरणी होणे , एक नवी परंपरा सुरु होत आहे. काही दिवसांपूर्वी मी जम्मू-काश्मीरला भेट दिली होती. तिथून जम्मू येथून मी एकाच वेळी आयआयटी भिलाई, आयआयटी तिरुपती, ट्रिपल आयटी डीएम कुर्नूल, आयआयएम बोधगया, आयआयएम जम्मू, आयआयएम विशाखापट्टणम आणि आयआयएस कानपूरच्या संकुलाचे उद्घाटन केले. आणि आता आज राजकोटमधून - एम्स राजकोट , एम्स रायबरेली, एम्स मंगलगिरी, एम्स भटिंडा, एम्स कल्याणी चे लोकार्पण  झाले आहे. पाच एम्स, विकसित होत असलेला भारत , अशाच जलद गतीने काम करत आहे आणि कामे पूर्ण करत आहे.

 

मित्रहो,

आज मी राजकोटला आलो आहे , तर मला खूप जुन्या गोष्टी आठवत आहेत. कालचा दिवस माझ्या आयुष्यातील एक खास दिवस होता. माझ्या निवडणूक प्रवासाच्या प्रारंभात राजकोटची मोठी भूमिका आहे. 22 वर्षांपूर्वी, 24 फेब्रुवारी रोजी राजकोटने मला पहिल्यांदा आशीर्वाद दिला आणि मला आमदार म्हणून निवडून दिले. आणि आजच्या  25 फेब्रुवारी या दिवशी मी आयुष्यात प्रथमच राजकोटचा आमदार म्हणून गांधीनगर विधानसभेत शपथ घेतली होती . तेव्हा तुम्ही अपार प्रेम आणि विश्वास देऊन मला तुमचा ऋणी बनवलेत . मात्र आज 22 वर्षांनंतर मी राजकोटमधील प्रत्येक कुटुंबातील सदस्यांना अभिमानाने सांगू शकतो की मी तुमचा विश्वास सार्थ ठरवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. आज संपूर्ण देश इतके प्रेम देत आहे , इतके आशीर्वाद देत आहे, तर या यशात राजकोटचा  देखील वाटा आहे. आज जेव्हा संपूर्ण देश तिसऱ्यांदा रालोआ सरकारला  आशीर्वाद देत आहे, आज जेव्हा संपूर्ण देशाला अबकी बार-400 पार हा विश्वास वाटत असताना मी पुन्हा नतमस्तक होऊन राजकोटमधील प्रत्येक कुटुंबातील सदस्यांना वंदन करतो. मी पाहतोय की पिढ्या बदलल्या तरी मोदींबद्दलची आपुलकी कोणत्याही वयोमर्यादेच्या पलीकडे आहे.  हे जे तुमचे ऋण आहे, ते व्याजासह , विकासाच्या माध्यमातून फेडण्याचा मी प्रयत्न करतो.

मित्रहो,

मी तुम्हा सर्वांचीही माफी मागतो, तसेच विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आणि तिथे जे नागरिक बसले आहेत त्यांचीही माफी मागतो कारण आज मला यायला थोडा उशीर झाला, तुम्हाला थांबावे लागले. मात्र त्यामागचे कारण हे होते की आज द्वारका येथे भगवान द्वारकाधीशांचे दर्शन घेऊन आणि त्यांना नमन करून मी राजकोटला आलो आहे.  द्वारका ते बेट द्वारका यांना जोडणाऱ्या सुदर्शन सेतूचे उद्घाटनही मी केले आहे. द्वारकेच्या या सेवेसोबतच आज मला एका अद्भुत आध्यात्मिक साधनेचा लाभही मिळाला आहे. प्राचीन द्वारका, ज्याबाबत म्हटले जायचे की स्वतः भगवान श्रीकृष्णाने ती वसवली होती आणि आज ती समुद्रात पाण्याखाली गेली आहे.आज मला खोल समुद्रात जाण्याचे भाग्य लाभले आणि आत खोलवर गेल्यावर मला त्या समुद्रात बुडालेल्या श्रीकृष्णाच्या  द्वारकेचे दर्शन घडले, जे अवशेष आहेत, त्यांना स्पर्श करून, त्यांची पूजा करून जीवन धन्य बनवण्याचे आणि तिथे काही क्षण भगवान श्रीकृष्णाचे स्मरण करण्याचे सौभाग्य मला लाभले. माझ्या मनात खूप दिवसांपासून ही इच्छा होती की भगवान श्रीकृष्णाने वसवलेली  द्वारका जरी पाण्याखाली असली तरी एक दिवस मी तिथे जाऊन नतमस्तक होईन आणि आज मला ते भाग्य लाभले. द्वारकेबद्दल प्राचीन ग्रंथांमध्ये वाचून, पुरातत्वशास्त्रज्ञांचे शोध जाणून घेतल्यावर आपल्याला आश्चर्य वाटते. आज समुद्रात खोलवर गेल्यावर मी तेच दृश्य स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आणि त्या पवित्र भूमीला स्पर्श केला. मी तिथे प्रार्थना केली आणि ‘मोरपीस अर्पण केले. त्या अनुभवाने मला किती भावनाविवश केले आहे हे शब्दात व्यक्त करणे माझ्यासाठी कठीण आहे. समुद्राच्या खोल पाण्यात, मी आपल्या भारताच्या वैभवाचा आणि त्याच्या विकासाचा स्तर किती उंचावला आहे याचा विचार करत होतो.  मी समुद्रातून जेव्हा बाहेर आलो तेव्हा भगवान श्रीकृष्णाच्या आशिर्वादाबरोबरच  द्वारकेची प्रेरणा माझ्यासोबत घेऊन आलो आहे. ‘विकास आणि वारसा ’ या माझ्या संकल्पनेला एक नवीन शक्ती मिळाली आहे , नवी ऊर्जा मिळाली आहे, आज माझ्या विकसित भारताच्या ध्येयाशी दैवी शक्ती जोडली गेली आहे.

मित्रहो,

आजही तुम्हाला आणि संपूर्ण देशाला 48 हजार कोटींहून अधिक किमतीचे प्रकल्प मिळाले आहेत. आज न्यू मुंद्रा-पानिपत पाईपलाईन प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. त्यामुळे गुजरातमधील कच्चे तेल पाइपद्वारे थेट हरियाणाच्या रिफायनरीपर्यंत पोहोचेल. आज राजकोटसह संपूर्ण सौराष्ट्राला रस्ते, पूल, रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, वीज, आरोग्य, शिक्षण अशा अनेक सुविधा मिळाल्या आहेत.आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर आता एम्स देखील राजकोटला समर्पित केली आहे आणि त्यासाठी राजकोटचे , संपूर्ण सौराष्ट्रचे आणि संपूर्ण गुजरातचे खूप खूप अभिनंदन! आणि आज देशात ज्या ज्या भागांमध्ये एम्सचे लोकार्पण होत आहे तेथील सर्व नागरिक,  बंधू-भगिनींचे मी  मनःपूर्वक अभिनंदन करतो.

 

मित्रहो,

आजचा दिवस केवळ राजकोट आणि गुजरातसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक दिवस आहे. जगातील 5 व्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचे आरोग्य क्षेत्र कसे असायला हवे ? विकसित भारतात आरोग्य सुविधांचा स्तर कसा असेल? याची एक झलक आज आपण राजकोटमध्ये पाहत आहोत. स्वातंत्र्यानंतर 50 वर्षांपर्यंत देशात एकच एम्स होते आणि ते देखील दिल्लीत होते . स्वातंत्र्याच्या 7 दशकांमध्ये केवळ 7 एम्सना मंजुरी देण्यात आली . मात्र त्याही कधी पूर्ण झाल्या नाहीत. आणि आज बघा, गेल्या 10 दिवसात , अवघ्या 10 दिवसात 7 नवीन एम्सची  पायाभरणी आणि लोकार्पण झाले आहे. म्हणूनच मी म्हणतो की गेल्या 6-7 दशकात जे झाले नाही ,  त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक वेगाने आम्ही देशाचा विकास करत आहोत आणि तो देशवासीयांच्या चरणी समर्पित करत आहोत. आज, 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 200 हून अधिक आरोग्य सेवा संबंधी पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण झाले आहे. यामध्ये वैद्यकीय महाविद्यालये, मोठमोठ्या रुग्णालयांची सॅटेलाईट सेंटर, गंभीर आजारांवर उपचार करणारी मोठी रुग्णालये यांचा समावेश आहे.

मित्रहो,

आज देश म्हणत आहे , मोदी की गॅरंटी  म्हणजे आश्वासनांच्या पूर्ततेची गॅरंटी आहे . मोदी की गॅरंटी वर हा अतूट विश्वास का आहे, याचे उत्तरही एम्समध्ये मिळेल. मी राजकोटला गुजरातमधील पहिल्या एम्सचे आश्वासन दिले होते.  3 वर्षांपूर्वी पायाभरणी केली आणि आज उद्घाटन केले - तुमच्या सेवकाने आश्वासन पूर्ण केले.  मी पंजाबला एम्सचे आश्वासन दिले होते , भटिंडा एम्सची पायाभरणीही मीच केली होती आणि आज मी त्याचे लोकार्पण देखील करत आहे  - तुमच्या सेवकाने आश्वासन  पूर्ण केले.

मी उत्तर प्रदेशातील रायबरेलीयमध्ये एम्सची गॅरंटी दिली होती. कॉंग्रेसच्या राजघराण्याने रायबरेलीयमध्ये केवळ राजनिती केली, काम तर मोदीने केले. मी 5 वर्षांपूर्वी रायबरेलीमध्ये एम्सचे भूमिपूजन केले होते आणि आज लोकार्पण केले. तुमच्या या सेवकाने आपली गॅरंटी पूर्ण केली आहे. मी पश्चिम बंगालला पहिल्या एम्सची गॅरंटी दिली होती, आज कल्याणी एम्सचे लोकार्पण देखील झाले, तुमच्या या सेवकाने आपली गॅरंटी पूर्ण केली आहे. मी आंध्र प्रदेशाला पहिल्या एम्सची गॅरंटी दिली होती, आज मंगलगीरी एम्सचे लोकार्पण देखील झाले, तुमच्या या सेवकाने आपली गॅरंटी पूर्ण केली आहे. मी हरियाणातली रेवाडीला एम्सची गॅरंटी दिली होती, काही दिवसांपूर्वीच, 16 फेब्रुवारीला याचे भूमिपूजन करण्यात आले होते. म्हणजेच तुमच्या सेवकाने ही गॅरंटी देखील पूर्ण केली आहे. गेल्या 10 वर्षात आमच्या सरकारने 10 नव्या एम्सना देशातील वेगवेगळ्या राज्यात मंजुरी दिली आहे. कधी काळी राज्यातील लोक केंद्राकडे एम्सची मागणी करता करता थकून जात होते. आज देशात एका मागून एक एम्ससारखी आधुनिक रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली जात आहेत. म्हणूनच तर देश म्हणतो - जिथे दुसऱ्यांकडून अपेक्षांचा अंत होतो तेथूनच मोदींची गॅरंटी सुरू होते. 

मित्रांनो,

भारताने कोरोनावर कशी मात केली याची चर्चा संपुर्ण जगात होत आहे. आपण हे करू शकलो कारण गेल्या 10 वर्षात भारताची आरोग्य सेवा प्रणाली अमुलाग्र बदलली आहे. गेल्या दशकात एम्स, वैद्यकीय महाविद्यालये आणि अतिदक्षता पायाभूत सुविधा यांच्या जाळ्याचा अभूतपूर्व विस्तार झाला आहे. आम्ही छोट्या छोट्या आजारांसाठी गावागावात दीड लाखाहून अधिक आयुष्मान आरोग्य मंदिरे बनवली आहेत, दीड लाखाहून अधिक. दहा वर्षांपूर्वी देशामध्ये जवळपास 380 ते 390 वैद्यकीय महाविद्यालये होती, आज देशात सातशे सहा वैद्यकीय महाविद्यालये आहेत. दहा वर्षांपूर्वी एमबीबीएस या अभ्यासक्रमासाठी केवळ 50 हजार सीट होते, आज एक लाखाहून अधिक आहेत. दहा वर्षांपूर्वी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या स्नातकोत्तर पदवीसाठी जवळपास 30 हजार सीट होते, आज ते 70 हजाराहून अधिक आहेत. येत्या काही वर्षात भारतात जितके तरुण डॉक्टर बनणार आहेत तितके स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षांच्या काळात देखील बनले नव्हते. आज देशात 64 हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा मिशन राबवले जात आहे. आज या कार्यक्रमात देखील अनेक वैद्यकीय महाविद्यालये, क्षयरोगाच्या उपचारासंबंधीत रुग्णालये आणि संशोधन केंद्र, पीजीआय चे सॅटॅलाइट सेंटर, क्रिटिकल केअर ब्लॉक्स अशा अनेक उपक्रमांची पायाभरणी आणि लोकार्पण करण्यात आले आहे. आज कर्मचारी राज्य विमा प्राधिकरणाचे डझनावारी रुग्णालये राज्यांना मिळाली आहेत.

 

मित्रांनो,

आजारापासून संरक्षण आणि आजारांशी लढण्याची क्षमता वाढवणे याला देखील आमचे सरकार  प्राधान्य देत आहे. आम्ही पोषणावर भर दिला आहे, योग, आयुष आणि स्वच्छतेवर देखील भर दिला आहे, यामुळे सर्वांना आजारापासून संरक्षण मिळेल. आम्ही पारंपरिक भारतीय उपचार पद्धती आणि आधुनिक उपचार पद्धती दोन्हींना प्रोत्साहन दिले आहे. आजच महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये योग आणि निसर्ग उपचाराशी संबंधित दोन मोठ्या रुग्णालयांचे आणि संशोधन केंद्रांचे देखील उद्घाटन झाले आहे. आणि, इथे गुजरातमध्येच पारंपरिक उपचार पद्धतीशी संबंधित जागतिक आरोग्य संघटनेचे जागतिक केंद्र तयार होत आहे.

मित्रांनो,

एखादी व्यक्ती गरीब असो किंवा मध्यम वर्गातील, तिला गुणवत्ता पूर्ण उपचार मिळाले पाहिजेत आणि त्यांच्या खर्चात बचतही झाली पाहिजे यासाठी आमचे सरकार निरंतर प्रयत्न करत आहे. जन औषधी केंद्रांमध्ये 80 टक्के सवलतीच्या दरात औषधे मिळू लागल्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांचे 30 हजार कोटी रुपये खर्च होण्यापासून वाचले आहेत. म्हणजेच सरकारने सर्वसामान्यांचा जीव तर वाचवला आहे सोबतच आजाराच्या उपचाराचे ओझे देखील गरीब आणि मध्यमवर्गीयावर पडण्यापासून वाचवले आहे. उज्वला योजनेमुळे देखील गरीब कुटुंबांची 70 हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेची बचत झाली आहे.

मित्रांनो,

आता आमचे सरकार एक अशी योजना घेऊन येत आहे ज्यामुळे येणाऱ्या काही वर्षात अनेक कुटुंबांची बचत आणखी वाढणार आहे. आम्ही विजेचे बिल शून्य करण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि विजेमुळे कुटुंबांची कमाई होईल याची तरतूद करत आहोत. प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेच्या माध्यमातून आम्ही देशातील लोकांची बचत घडेल आणि कमाई देखील होईल यासाठी प्रयत्न करत आहोत. या योजनेचा लाभ घेणाऱ्या लोकांना 300 युनिट पर्यंत मोफत वीज पुरवली जाईल आणि उरलेली वीज सरकार खरेदी करेल आणि त्या बदल्यात तुम्हाला पैसे देईल.

मित्रांनो,

एकीकडे आम्ही प्रत्येक कुटुंबाला सौर ऊर्जेचा उत्पादक बनवत आहोत तर दुसरीकडे सूर्य आणि पवन ऊर्जेचे मोठमोठे प्रकल्प सुरू करत आहोत. आजच कच्छमध्ये दोन मोठ्या सोलार प्रकल्पांची आणि एका पवन ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी झाली आहे. यामुळे नवीकरणीय ऊर्जा उत्पादनात गुजरातच्या क्षमतेचा आणखी विस्तार होईल.

 

मित्रांनो,

आपले राजकोट उद्योजकांचे, श्रमिकांचे आणि कारागिरांचे शहर आहे. हे तेच साथीदार आहेत जे आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीमध्ये खूप मोठी भूमिका निभावत आहेत. यापैकी असे अनेक साथीदार आहेत ज्यांची खबर पहिल्यांदा मोदीने घेतली आहे, मोदीने त्यांची पूजा केली आहे. आपल्या विश्वकर्मा साथीदारांसाठी देशाच्या इतिहासात प्रथमच एक राष्ट्रव्यापी योजना बनवण्यात आली आहे. 13000 कोटी रुपयांच्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेशी आतापर्यंत लाखो लोक जोडले गेले आहेत. या योजनेमुळे त्यांना आपले कौशल्य आणखी सुधारण्यासाठी आणि आपल्या व्यापारात उत्तरोत्तर प्रगती करण्यासाठी मदत मिळत आहे. या योजनेच्या मदतीने गुजरातमध्ये वीस हजाराहून अधिक लोकांनी आपले प्रशिक्षण पूर्ण केले आहे. यामधील प्रत्येक विश्वकर्मा लाभार्थ्याला पंधरा हजार रुपयांपर्यंतची मदत देखील देण्यात आली आहे.

मित्रांनो,

आपल्या राजकोट येथे सुवर्ण व्यवसाय किती जोरात चालतो हे तर तुम्हाला माहितीच आहे. या विश्वकर्मा योजनेचा लाभ सराफा व्यवसायाशी संबंधित लोकांना देखील मिळाला आहे.

मित्रांनो,

आपल्या लाखो फेरीवाल्या साथीदारांसाठी प्रथमच प्रधानमंत्री स्वनिधी योजना बनवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजवर सुमारे दहा हजार कोटी रुपयांची मदत या साथीदारांना देण्यात आली आहे. इथे गुजरात मध्ये देखील फेरीवाल्या साथीदारांना जवळपास 800 कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. तुम्ही कल्पना करू शकता की पूर्वी ज्या फेरीवाल्यांचा तिरस्कार केला जायचा, त्यांना आज भाजपा कशाप्रकारे सन्मानित करत आहे. 

 

मित्रांनो, 

जेव्हा आपले हे साथीदार सशक्त होतील तेव्हाच विकसित भारताची मोहीम देखील सशक्त होईल. जेव्हा मोदी भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता बनवण्याची गॅरंटी देतो तेव्हा त्याचे उद्दिष्ट सर्वांना आरोग्य आणि सर्वांची समृद्धी हेच आहे. आज देशाला जे हे मोठे मोठे प्रकल्प मिळत आहेत, ते प्रकल्प आमचा हा संकल्प पूर्ण करतील, याच कामनेसह, तुम्ही जे माझे भव्य स्वागत केले, विमानतळापासून इथे पोहोचेपर्यंत संपूर्ण रस्ताभर आणि येथे देखील कार्यक्रम स्थळी येऊन तुम्हाला भेटण्याची संधी मला मिळाली. जुन्या अनेक साथीदारांचे चेहरे आज अनेक वर्षानंतर पाहायला मिळाले, सगळ्यांना नमस्कार केला, सगळ्यांना प्रणाम केला. मला खूप आनंद वाटत आहे. मी भाजपच्या राजकोट मधील माझ्या साथीदारांचे हृदयपूर्वक अभिनंदन करतो. इतक्या मोठ्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी आणि पुन्हा एकदा या सगळ्या विकास कामांसाठी सर्वांचे अभिनंदन. आणि, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण एकजुटीने मार्गक्रमण करत राहू. तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा. माझ्यासोबत म्हणा -

भारत माता की जय!

भारत माता की जय! 

भारत माता की जय!

खुप खुप धन्यवाद!

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India’s Biz Activity Surges To 3-month High In Nov: Report

Media Coverage

India’s Biz Activity Surges To 3-month High In Nov: Report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM to participate in ‘Odisha Parba 2024’ on 24 November
November 24, 2024

Prime Minister Shri Narendra Modi will participate in the ‘Odisha Parba 2024’ programme on 24 November at around 5:30 PM at Jawaharlal Nehru Stadium, New Delhi. He will also address the gathering on the occasion.

Odisha Parba is a flagship event conducted by Odia Samaj, a trust in New Delhi. Through it, they have been engaged in providing valuable support towards preservation and promotion of Odia heritage. Continuing with the tradition, this year Odisha Parba is being organised from 22nd to 24th November. It will showcase the rich heritage of Odisha displaying colourful cultural forms and will exhibit the vibrant social, cultural and political ethos of the State. A National Seminar or Conclave led by prominent experts and distinguished professionals across various domains will also be conducted.