भारत माता की जय!
भारत माता की जय!
कार्यक्रमाला उपस्थित त्रिपुराचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य जी, येथील लोकप्रिय मुख्यमंत्री माणिक साहा जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझ्या सहकारी प्रतिमा भौमिक जी, त्रिपुरा विधानसभेचे अध्यक्ष रतन चक्रवर्ती जी, उपमुख्यमंत्री जिष्णु देव वर्मा जी, माझे मित्र खासदार बिप्लब देव जी, त्रिपुरा सरकारचे सर्व आदरणीय मंत्री आणि माझ्या प्रिय त्रिपुरावासीयांनो!
नॉमॉश्कार!
खुलुमखा!
माता त्रिपुरासुन्दरीर पून्यो भुमिते
एशे आमि निजेके धोंनयो मोने कोरछी।
माता त्रिपुरासुन्दरीर ऐइ पून्यो भूमिके अमार प्रोनाम जानाइ॥
सर्वात आधी मी नतमस्तक होऊन तुम्हा सर्वांची माफी मागतो, कारण मला यायला जवळजवळ दोन तास उशीर झाला आहे. मी मेघालयमध्ये होतो, तिथे थोडा जास्त वेळ गेला आणि मला सांगण्यात आले की काही लोक 11-12 वाजल्यापासून बसले आहेत. तुम्ही सर्वांनी हे कष्ट घेतले आणि इतके आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही थांबून राहिलात, त्याबद्दल मी तुमचे कितीही आभार मानले तरी कमी आहेत. सर्वात आधी मी त्रिपुराच्या जनतेचे अभिनंदन करतो कारण तुमच्या सर्वांच्या प्रयत्नांच्या माध्यमातून तुम्ही येथे स्वच्छतेशी संबंधित एक मोठी मोहीम सुरू केली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये तुम्ही स्वच्छतेची लोकचळवळ हाती घेतली आहे. परिणामी यावेळी देशातील लहान राज्ये विचारात घेता त्रिपुरा हे सर्वात स्वच्छ राज्य म्हणून उदयाला आले आहे.
मित्रहो,
माता त्रिपुरा सुंदरीच्या आशीर्वादाने त्रिपुराच्या विकासाचा प्रवास आज नवी उंची गाठत आहे. कनेक्टिव्हिटी, कौशल्य विकास आणि गरीबांच्या घरांशी संबंधित सर्व योजनांबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. आज त्रिपुराला पहिले दंत महाविद्यालय मिळाले आहे. यामुळे त्रिपुरातील तरुणांना याच ठिकाणी डॉक्टर व्हायची संधी मिळणार आहे. आज त्रिपुरामधील 2 लाखांपेक्षा जास्त गरीब कुटुंबे आपल्या घरात नवीन पक्क्या घरांमध्ये प्रवेश करत आहेत. यातील बहुतांश घरे आमच्या माता-भगिनींच्या मालकीची आहेत. आणि तुम्हा सर्वांना माहित आहे की प्रत्येक घर लाखो रुपये खर्चून बांधण्यात आले आहे. या निमित्ताने अनेक भगिनींच्या नावावर पहिल्यांदाच मालमत्तेची नोंद झाली आहे. लाखो रुपयांच्या घरांच्या मालक असणाऱ्या या सर्व बहिणींचे, या त्रिपुराच्या भूमीवरील, आगरतळ्याच्या भूमीवरील, त्रिपुरामधील माझ्या माता-भगिनींचे लखपती झाल्याबद्दल आज मी मनापासून अभिनंदन करतो.
देशात गरीबांसाठी घरे बांधणाऱ्या राज्यांमध्ये त्रिपुरा हे आघाडीचे राज्य आहे. माणिक जी आणि त्यांचा चमू कौतुकास्पद काम करत आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्याला एका रात्रीसाठी कोणी आश्रय दिला तरी त्यासाठी आयुष्यभर आशीर्वाद मिळतो. इथे तर प्रत्येकाच्या डोक्यावर पक्के छत मिळाले आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना त्रिपुराचे भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. आणि मी विमानतळावरून इथे आलो, थोडा जास्त वेळ लागला कारण तुम्हाला माहित आहे की विमानतळ किती लांब आहे. रस्त्याच्या दुतर्फा आशीर्वाद देण्यासाठी लोक मोठ्या संख्येने येत होते. जेवढे लोक इथे आहेत, त्याच्या दहापट जास्त लोक रस्त्यावर आशीर्वाद द्यायला आले असावेत. मी त्यांना सुद्धा वंदन करतो. मी आधी सांगितले त्याप्रमाणे मी इथे येण्यापूर्वी मेघालयमध्ये ईशान्य परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी बैठकीत होतो. या बैठकीत आम्ही, येत्या काही वर्षांमध्ये त्रिपुरासह ईशान्येच्या विकासाच्या आराखड्याबाबत चर्चा केली. तिथे मी अष्टलक्ष्मी अर्थात ईशान्येच्या 8 राज्यांच्या विकासासाठीचे अष्ट आधार असणाऱ्या आठ मुद्यांवर चर्चा केली. त्रिपुरामध्ये दुहेरी इंजिनाचे सरकार आहे. त्यामुळे विकासाचा हा आराखडा वेगाने साकार होत असून, त्याला गती देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
मित्रहो,
दुहेरी इंजिन सरकार स्थापन होण्यापूर्वी त्रिपुरा आणि ईशान्येबाबत फक्त दोन वेळा चर्चा होत असे. एक, निवडणुका झाल्या की चर्चा व्हायची आणि दुसरे म्हणजे हिंसाचार घडला की चर्चा व्हायची. आता काळ बदलला आहे, आज त्रिपुरामधल्या स्वच्छतेची चर्चा होते आहे आणि इथल्या पायाभूत सुविधांच्या विकासाची चर्चा केली जाते आहे. गरिबांना लाखो घरे मिळत आहेत, अशी चर्चा होते आहे. जोडणीशी संबंधित पायाभूत सुविधांसाठी केंद्र सरकार त्रिपुराला हजारो कोटी रुपये देत आहे आणि येथील सरकार त्या सुविधा साकार करण्यासाठी वेगाने काम करत आहे. आज त्रिपुरामध्ये राष्ट्रीय महामार्गाचा किती विस्तार झाला आहे, ते बघा. गेल्या ५ वर्षांमध्ये कितीतरी नवीन गावे रस्त्याने जोडली गेली आहेत. आज त्रिपुरामधील प्रत्येक गाव रस्त्यांनी जोडण्याचे काम वेगाने सुरू आहे. ज्या रस्त्यांची आज पायाभरणी झाली त्या रस्त्यांमुळे त्रिपुरामधील रस्त्यांचे जाळे आणखी मजबूत होणार आहे. आगरतळा बायपासमुळे राजधानीमधील वाहतूक व्यवस्था सुधारेल आणि जगणे सोपे होईल.
मित्रहो,
आता त्रिपुरामधून ईशान्य आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी एक प्रवेशद्वारही तयार होते आहे. आगरतळा-अखौरा रेल्वेमार्गामुळे व्यापाराचा नवा मार्ग खुला होणार आहे. त्याचप्रमाणे, भारत-थायलंड-म्यानमार महामार्गासारख्या रस्त्यांच्या पायाभूत सुविधांमुळे ईशान्य क्षेत्र इतर देशांसोबतच्या संबंधांचे प्रवेशद्वार होऊ लागले आहे. आगरतळा येथील महाराजा बीर बिक्रम विमानतळावरसुद्धा आंतरराष्ट्रीय टर्मिनल बांधण्यात आले आहे, त्यामुळे देश-परदेशासोबतचा संपर्क सुलभ झाला आहे. त्याचबरोबर त्रिपुरा हे ईशान्य क्षेत्रासाठी एक महत्त्वाचे लॉजिस्टिक हब म्हणून विकसित होते आहे. त्रिपुरामध्ये इंटरनेट आणण्यासाठी आम्ही घेतलेल्या मेहनतीचा फायदा आज लोकांना, विशेषतः माझ्या युवा वर्गाला मिळतो आहे. दुहेरी इंजिन सरकारच्या स्थापनेनंतर, त्रिपुरामधील अनेक पंचायतींमध्ये ऑप्टिकल फायबर पोहोचले आहे.
मित्रहो,
भाजपाचे दुहेरी इंजिन असणारे सरकार फक्त भौतिक आणि डिजिटल पायाभूत सुविधांवरच नाही तर सामाजिक पायाभूत सुविधांवरही भर देते आहे. व्याधींवरचे उपचार हे घराजवळ असावेत, स्वस्त असावेत आणि प्रत्येकासाठी उपलब्ध असावेत, याला भाजपा सरकारने प्राधान्य दिले आहे. या कामी आयुष्मान भारत योजना अतिशय उपयुक्त ठरते आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ईशान्येकडील गावांमध्ये सात हजारांपेक्षा जास्त आरोग्य आणि वेलनेस केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. यापैकी सुमारे 1000 केंद्रे त्रिपुरामध्ये स्थापन केली जात आहेत. या केंद्रांमध्ये कर्करोग, मधुमेह अशा अनेक गंभीर आजारांसाठी हजारो रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आयुष्मान भारत-पीएम जेएवाय योजनेंतर्गत त्रिपुरामधील हजारो गरीबांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळाली आहे.
मित्रहो,
शौचालय असो, वीज जोडणी वा गॅस जोडणी असो, पहिल्यांदाच याबाबत खूप मोठ्या प्रमाणात काम करण्यात आलं आहे. आता गॅस ग्रीडही बनवण्यात आलं आहे. त्रिपुरातील घराघरांत स्वस्त पाईप गॅस पोहोचवण्यासाठी दुहेरी इंजिन सरकार वेगानं काम करत आहे. प्रत्येक घरापर्यंत पाइपद्वारे पाणी पोहोचवण्यासाठी सुद्धा, दुहेरी इंजिन सरकार दुप्पट वेगानं काम करत आहे. त्रिपुरातील 4 लाख नवीन कुटुंबांना अवघ्या 3 वर्षात पाईपद्वारे पाण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 2017 पूर्वी त्रिपुरात गरिबांच्या हक्काच्या शिध्यावर सुद्धा डल्ला मारला जात होता. आज दुहेरी इंजिन सरकार प्रत्येक गरिबाला आपल्या वाट्याचा शिधा तर देत आहेच, गेली 3 वर्षं मोफत शिधा देखील देत आहे.
मित्रांनो,
अशा सर्व योजनांच्या सर्वात मोठ्या लाभार्थी आपल्या माता-भगिनी आहेत. त्रिपुरातील १ लाखाहून अधिक गरोदर मातांनाही प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजने अंतर्गत पोषण आहारासाठी प्रत्येक मातेच्या बँक खात्यात हजारो रुपये थेट जमा करण्यात आले आहेत. अधिकाधिक प्रसूती आज रुग्णालयांमध्ये होत आहेत आणि त्यामुळे आई आणि बाळ दोघांचेही प्राण वाचत आहेत. त्रिपुरातील भगिनी आणि मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार इथे ज्या प्रकारे पावले उचलत आहे तेही कौतुकास्पद आहे. मला सांगण्यात आलं आहे की सरकारनं महिलांच्या रोजगारासाठी शेकडो कोटी रुपयांचं विशेष पॅकेज दिलं आहे. दुहेरी इंजिन सरकार आल्यानं त्रिपुरामध्ये महिला बचत गटांची संख्या 9 पटीने वाढली आहे.
बंधू आणि भगिनींनो,
त्रिपुरामध्ये अनेक दशकांपासून अशा राजकीय पक्षांनी राज्य केलं आहे ज्यांच्या विचारसरणीचं महत्त्व आता संपलं आहे आणि ज्यांचं राजकारण संधिसाधू आहे. त्यांनी त्रिपुराला विकासापासून वंचित ठेवलं. त्रिपुराकडे असलेल्या साधनसंपत्तीचा वापर त्यांनी स्वार्थासाठी केला. यामुळे सर्वात जास्त नुकसान माझ्या गरीब, युवावर्ग, शेतकरी आणि माता भगिनींचं झालं आहे. या प्रकारची विचारसरणी, या प्रकारच्या मानसिकतेनं जनतेचं भलं होऊ शकत नाही. त्यांना फक्त नकारात्मकता पसरवायचीच तेवढी माहीत असते. त्यांच्याकडे कोणताही सकारात्मक कार्यक्रम नाही. दुहेरी इंजिन सरकारकडेच संकल्प असू शकतो आणि संकल्प सिद्धीचा सकारात्मक मार्ग सुद्धा असू शकतो. त्रिपुरामध्ये अॅक्सलरेटरची गरज असताना, निराशा पसरवणारे नैराश्यग्रस्त, रिव्हर्स गियरमध्ये म्हणजे उलट्या दिशेनं चालत असतात.
मित्रहो,
सत्तापिपासेच्या राजकारणामुळे आपल्या आदिवासी समाजाची मोठी हानी झाली आहे. आदिवासी समाज, आदिवासी भाग विकासापासून दूर ठेवण्यात आला. भाजपानं हे राजकारण बदललं आहे. यामुळेच आज आदिवासी समाजाची पहिली पसंती भाजपाला आहे. गुजरातमध्ये नुकत्याच निवडणुका झाल्या. गुजरातमध्ये 27 वर्षांनंतरही भाजपाला जो प्रचंड विजय मिळाला, त्यात आदिवासी समाजाचं मोठं योगदान आहे. आदिवासींसाठी राखीव असलेल्या २७ पैकी २४ जागा भाजपानं जिंकल्या आहेत.
मित्रहो,
अटलजींच्या सरकारनं सर्वप्रथम, आदिवासींसाठी स्वतंत्र मंत्रालय आणि स्वतंत्र आर्थिक तरतुदींची व्यवस्था केली. तुम्ही आम्हाला दिल्लीत संधी दिल्यापासून, आम्ही आदिवासी समाजाशी संबंधित प्रत्येक प्रश्नाला प्राधान्य दिलं आहे. आदिवासी समाजासाठी असलेली 21 हजार कोटी रुपयांची तरतूद, आज 88 हजार कोटी रुपये एवढी केलीआहे. अशाच तऱ्हेनं आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीतही दुपटीनं वाढ करण्यात आली आहे. याचा लाभ त्रिपुरातील अनुसूचित जमातींनाही झाला आहे. 2014 पूर्वी आदिवासी भागात 100 पेक्षा कमी एकलव्य मॉडेल शाळा होत्या, तर आज ही संख्या 500 च्या वर पोहोचली आहे. त्रिपुरासाठीही अशा 20 हून अधिक शाळांना मान्यता देण्यात आली आहे. पूर्वीची सरकारं फक्त 8-10 वन उत्पादनांवर किमान आधारभूत मूल्य (MSP) देत असत. भाजपा सरकार 90 वन उत्पादनांवर एमएसपी देत आहे. आज आदिवासी भागात 50 हजारां हून जास्त वन-धन केंद्र आहेत आणि त्यांच्याद्वारे सुमारे 9 लाख आदिवासींना रोजगार मिळत आहे. त्यापैकी बहुतेक आपल्या भगिनी आहेत. भाजपा सरकारनच आदिवासी समाजासाठी बांबूचा वापर आणि व्यापार, सहज सोपा केला आहे.
मित्रांनो,
आदिवासी गौरव दिनाचं महत्त्व, भाजपा सरकारनच सर्वप्रथम ओळखलं आहे. 15 नोव्हेंबरला भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस देशभरात आदिवासी गौरव दिन म्हणून साजरा करायला, भाजपा सरकारनं सुरुवात केली. देशाच्या स्वातंत्र्यात आदिवासी समाजानं दिलेलं योगदानही, आज देशासह जगभरात माहीत करुन दिलं जात आहे. आज देशभरात 10 आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयं उभारली जात आहेत. त्रिपुरामध्येही अलीकडेच राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू जी यांनी महाराजा बिरेंद्र किशोर माणिक्य संग्रहालय आणि सांस्कृतिक केंद्राची पायाभरणी केली. आदिवासींचं योगदान आणि संस्कृती यांच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्रिपुरा सरकार देखील सतत प्रयत्न करत आहे. त्रिपुरातील आदिवासी कला-संस्कृती पुढे नेणाऱ्या महनीय व्यक्तिंना पद्म सन्मान देण्याचा बहुमानही भाजपा सरकारलाच मिळाला आहे. अशा अनेक प्रयत्नांची फलनिष्पत्ती म्हणूनच त्रिपुरासह संपूर्ण देशातील आदिवासी समाज भाजपावर सर्वाधिक विश्वास दाखवत आहे.
बंधू आणि भगिनींनो,
त्रिपुरातील छोटे शेतकरी आणि लघु उद्योजकांना उत्तमोत्तम संधी मिळाव्यात यासाठी दुहेरी इंजिन सरकार प्रयत्नशील आहे. येथील लोकल ग्लोबल म्हणजेच स्थानिक वैशिष्ट्यांना उत्पादनांना जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज त्रिपुराचे अननस परदेशात पोहोचले आहेत. एवढच नाही तर शेकडो मेट्रिक टन इतर फळे आणि भाजीपालाही इथून बांगलादेश, जर्मनी आणि दुबईला निर्यात करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला जादा भाव मिळणं शक्य होत आहे. त्रिपुरातील लाखो शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 500 कोटी रुपयांहून जास्त रक्कम मिळाली आहे. त्रिपुरातील आगर-लाकूड उद्योगाला आज भाजपा सरकार ज्या प्रकारे पाठबळ देत आहे, त्याचे अर्थपूर्ण परिणाम येत्या काही वर्षांत दिसून येतील. यामुळे त्रिपुरातील युवावर्गाला नवनवीन संधी आणि उपजीविकेचं नवीन साधन मिळेल.
मित्रांनो,
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्रिपुराची वाटचाल आता शांतता आणि विकासाच्या मार्गावरुन होत आहे. आता विकासाचं दुहेरी इंजिन त्रिपुरामध्ये चांगली फळं देत आहे. मला त्रिपुरातील लोकांच्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास आहे. आपण विकासाचा वेग वाढवू याच आत्मविश्वासासह, त्रिपुराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आज पायाभरणी आणि लोकार्पण झालेल्या योजनांबद्दल, मी पुन्हा एकदा त्रिपुराच्या जनतेला शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीत त्रिपुरा नवी शिखरं गाठेल अशी अपेक्षा व्यक्त करत आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो!
भारत मातेचा विजय असो!
भारत मातेचा विजय असो!