नमस्कार!
आज आपल्या सर्वांबरोबर संवाद साधण्याची संधी मिळाली आणि माझ्यासाठी आनंदाची गोष्ट अशी आहे की, आता थोड्या दिवसांतच राखी पौर्णिमेचा सणही येतोय. आज मला या सणाच्या आधीच, ॲडव्हान्समध्ये माता-भगिनींचे आशीर्वाद मिळत आहेत. आणि त्याचबरोबर या काळात देशातल्या कोट्यवधी गरीब, दलित, वंचित, मागास, आदिवासी कुटुंबातल्या भगिनींना आज आणखी एक भेट देण्याची संधी मिळाली आहे. आज उज्ज्वला योजनेच्या पुढच्या टप्प्यामध्ये अनेक भगिनींना मोफत गॅस जोडणी आणि गॅस शेगडी मिळत आहे. या सर्व लाभार्थींचे मी पुन्हा एकदा खूप-खूप अभिनंदन करतो.
महोबामध्ये उपस्थित असलेले केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी हरदीप सिंह पुरी जी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, मंत्रिमंडळातले माझे आणखी एक सहकारी रामेश्वर तेली जी, उत्तर प्रदेशचे उप-मुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्या जी, डॉ. दिनेश शर्मा जी, राज्य सरकारचे इतर सर्व मंत्रिगण, सर्व खासदार, माझे सहकारी, सर्व आदरणीय आमदारगण, आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो,
उज्ज्वला योजनेने देशातल्या जितक्या लोकांचे, जितक्या महिलांचे जीवन उजळून टाकले आहे, ते अभूतपूर्व आहे. या योजनेचा प्रारंभ स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये जे अग्रदूत होते त्या मंगल पांडे जींच्या पवित्र भूमीवर म्हणजे उत्तर प्रदेशातल्या बलियामधून 2016 मध्ये सुरू झाली. आज उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पाही उत्तर प्रदेशातल्याच महोबाच्या वीरभूमीमध्ये सुरू होत आहे. महोबा असो, बुंदेलखंड असो, हा प्रदेश तर स्वातंत्र्य लढ्याच्या काळामध्ये एकप्रकारे ऊर्जास्थाने होती. इथल्या कणाकणांमध्ये राणी लक्ष्मीबाई, राणी दुर्गावती, महाराज छत्रसाल, वीर आल्हा आणि ऊदल यांच्यासारख्या अनेक शूरवीरांच्या-वीरांगनांच्या शौर्यगाथांचा सुगंध आहे. आज ज्यावेळी देश आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे, त्यावेळी हे आयोजन या महान व्यक्तित्वांचे स्मरण करण्याचीही संधी घेऊन आला आहे.
मित्रांनो,
आज मी बुंदेलखंडच्या आणखी एका महान पुत्राचे स्मरण करीत आहे. मेजर ध्यानचंद आपले सन्माननीय ध्यानचंद! देशाच्या सर्वोच्च क्रीडा पुरस्काराचे नाव आता मेजर ध्यानचंद क्रीडारत्न पुरस्कार असे केले आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, ऑलिंपिकमधील आपल्या युवक सहका-यांच्या अभूतपूर्व प्रदर्शनाबरोबरच क्रीडारत्नाबरोबर ध्यानचंदांचे जोडलेले हे नाव, लाखो-कोट्यवधी युवकांना प्ररेणा देत राहील. यावेळी तुम्ही पाहिले की, आपल्या खेळाडूंनी पदके तर जिंकली आहेतच, त्याचबरोबर अनेक क्रीडाप्रकारांमध्ये दमदार प्रदर्शन करून भविष्याचा संकेतही दिला आहे.
बंधू आणि भगिनींनो,
आपण स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात प्रवेश करणार आहोत. अशावेळी गेल्या साडेसात दशकांच्या प्रगतीकडे आपण पाहिले तर, आपल्या जरूर लक्षात येते की, काही स्थिती, परिस्थिती अशी आहे की, ज्यांच्यामध्ये अनेक दशकांपूर्वीच बदल करणे, परिवर्तन घडवून आणणे शक्य होते. घर, वीज, पाणी, शौचालय, गॅस, रस्ते, रूग्णालये, शाळा-विद्यालये, अशा अनेक मूलभूत गरजा आहेत. त्यांच्या पूर्तीसाठी देशवासियांना काही दशके वाट पहायला लागली. ही गोष्ट दुःखद आहे. यामुळे सर्वात जास्त नुकसान कोणी सोसलं असेल तर आमच्या मातांनी, भगिनींनी सोसलं आहे. विशेष करून गरीब माता-भगिनींना या संकटांना सामोरे जावे लागले. झोपडीमध्ये टपकणारे पाणी सर्वात जास्त घरातल्या मातेला त्रासदायक ठरते. विजेच्या अभावी सर्वात जास्त त्रास आईला होतो. घाण पाण्याच्या त्रासाच्या संकटाने संपूर्ण कुटुंब आजारी पडते. त्यावेळीही सर्वात जास्त त्रास घरातल्या मातेला होतो. शौचालयाच्या अभावामुळे अंधार पडण्याची वाट पहावी लागते. हा त्रासही आपल्या माता-भगिनींना सहन करावा लागतो. शाळेमध्ये जर शौचालय नसेल तर समस्या आपल्या कन्यांना होते. आपल्या अनेक पिढ्यांनी तर माता चुलीच्या धुरांनी डोळे चोळत आहेत, भीषण उकाड्यामध्ये आगीसारखे तापत राहून स्वयंपाक केल्याचे दृष्य पाहिले आहे. अशाच या अनेक पिढ्या मोठ्या झाल्या आहेत.
मित्रांनो,
अशा स्थितीमध्ये आपण स्वातंत्र्याचा 100 वर्धापन दिन साजरा करण्यासाठी पुढची वाटचाल करू शकतो का? आपली संपूर्ण शक्ती मूलभूत गरजांच्या पूर्तीसाठीच खर्च करावी लागणार आहे का? ज्यावेळी मूलभूत सुविधांसाठी एखादे कुटुंब, एखादा समाज संघर्ष करीत राहिला, तर ते म्हणजे आपली मोठी स्वप्नपूर्ती झाली, असे कसे होऊ शकेल? स्वप्न पूर्ण होऊ शकते, याचा विश्वास जोपर्यंत समाजाला मिळत नाही, तोपर्यंत त्यांच्या पूर्तीसाठी आत्मविश्वास कसा येणार? आणि आत्मविश्वासच नसेल तर कोणताही देश आत्मनिर्भर तरी कसा बनू शकणार आहे?
बंधू आणि भगिनींनो,
2014 मध्ये ज्यावेळी देशाने आम्हाला सेवेची संधी दिली, त्यावेळी असेच प्रश्न आम्ही स्वतःला विचारले होते. त्यावेळी एकदम स्पष्ट होते की, या सर्व समस्यांना उत्तर आपल्याला एक निश्चित समयसीमेच्या आत शोधले पाहिजे. आपल्या कन्यांनी घर आणि स्वयंपाक घर या सीमित परिघातून बाहेर पडून राष्ट्रनिर्माणामध्ये व्यापक योगदान दिले पाहिजे. मात्र हे कधी शक्य आहे? तर सर्वात आधी त्यांच्यापुढे घर आणि स्वयंपाकघर यांच्याशी संबंधित समस्या सोडवल्या तरच शक्य होणार आहे. म्हणूनच गेल्या 6-7 वर्षांमध्ये या समस्यांवर तोडगे शोधण्यासाठी आम्ही मिशन मोडवर काम केले आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशभरामध्ये कोट्यवधी शौचालयांचे निर्माण करण्यात आले. प्रधानमंत्री घरकुल योजनेमध्ये दोन कोटींपेक्षा जास्त अधिक गरीब कुटुंबांसाठी पक्की घरकुले बनवण्यात आली. यापैकी बहुतांश घरांवर मालकी हक्क भगिनींच्या नावे आहे. आम्ही ग्रामीण भागामध्ये हजारो किलोमीटर रस्ते बनवले, तर सौभाग्य योजने अंतर्गत जवळपास तीन कोटी परिवारांना विजेची जोडणी दिली. आयुष्मान भारत योजनेतून 50 कोटींपेक्षा जास्त लोकांना 5 लाख रूपयांपर्यंत मोफत औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. मातृवंदना योजनेअंतर्गत गर्भावस्थेच्या काळात लसीकरण आणि पोषक आहारासाठी हजारों रूपये थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहेत. जनधन योजनेमधून आम्ही कोट्यवधी भगिनींची बँकांमध्ये खाती उघडली. या खात्यांमध्ये कोरोना काळात जवळपास 30 हजार कोटी रुपये सरकारने जमा केले आहेत. आता आम्ही जल जीवन मिशनच्या माध्यमातून ग्रामीण परिवारांतल्या आमच्या भगिनींसाठी नळाव्दारे शुद्ध, स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचे काम सुरू केले आहे.
मित्रांनो,
भगिनींचे आरोग्य, त्यांना सुविधा देणे आणि त्यांचे सशक्तीकरण या संकल्पाला उज्ज्वला योजनेने खूप मोठे, चांगले बळ दिले आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात 8 कोटी गरीब, दलित, वंचित, मागास, आदिवासी कुटुंबातल्या भगिनींना मोफत गॅस जोडण्या दिल्या आहेत. याचा किती लाभ झाला हे आपण कोरोना काळात पाहिले आहे. जेव्हा बाहेर जाणे-येणे बंद होते , काम-धंदे बंद होते , तेव्हा कोट्यवधी गरीब कुटुंबांना अनेक महिने मोफत गॅस सिलिंडर्स देण्यात आली. कल्पना करा, उज्ज्वला योजना नसती तर संकटकाळात आपल्या या गरीब भगिनींची स्थिती काय झाली असती?
मित्रांनो ,
उज्ज्वला योजनेचा आणखी एक परिणाम असा झाला की संपूर्ण देशात एलपीजी गॅसशी संबंधित पायाभूत सुविधांचा कित्येक पटीने विस्तार झाला आहे. गेल्या 6-7 वर्षात देशभरात 11 हजार पेक्षा अधिक नवीन एलपीजी वितरण केंद्र उघडण्यात आली आहेत. एकट्या उत्तर प्रदेशमध्ये 2014 मध्ये 2 हज़ार पेक्षा कमी वितरण केंद्र होती. आज उत्तर प्रदेशमध्ये ही संख्या 4 हजारहून अधिक झाली आहे. यामुळे एकतर हजारो युवकांना नवीन रोजगार मिळाले आणि दुसरे, जी कुटुंबे यापूर्वी उत्तम सुविधांच्या अभावामुळे गॅस जोडणीपासून वंचित होती ती देखील जोडली गेली. अशाच प्रयत्नामुळे आज भारतात गॅस जोडणी शंभर टक्क्यांच्या जवळ पोहचली आहे. 2014 पर्यंत देशात जेवढ्या गॅस जोडण्या होत्या त्यापेक्षा अधिक मागील 7 वर्षात देण्यात आल्या आहेत. सिलेंडर आरक्षण आणि वितरणाबाबत ज्या समस्या उद्भवायच्या त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
बंधू आणि भगिनींनो,
उज्ज्वला योजनेमुळे या ज्या सुविधा वाढल्या आहेत, त्यात आज आणखी एका सवलतीची भर पडत आहे. बुंदेलखंड सह संपूर्ण उत्तर प्रदेश आणि अन्य राज्यांचे आपले अनेक सहकारी कामासाठी गावांमधून शहरात जातात, परराज्यात जातात. मात्र तिथे त्यांच्यासमोर निवासाच्या पत्त्याच्या प्रमाणीकरणाची समस्या उदभवते. अशाच लाखो कुटुंबांना उज्ज्वला दुसऱ्या टप्प्यातील योजना सर्वात जास्त दिलासा देणारी आहे. आता माझ्या कामगार मित्रांना निवासस्थानाच्या प्रमाणीकरणासाठी इथे तिथे भटकावे लागणार नाही. सरकारचा तुमच्या प्रामाणिकपणावर पूर्ण विश्वास आहे. तुम्हाला तुमच्या पत्त्याचे केवळ एक स्व-घोषणापत्र द्यायचे आहे आणि तुम्हाला गॅस जोडणी मिळेल.
मित्रांनो ,
सरकार आता तुमच्या स्वयंपाकघरात पाण्याप्रमाणे गॅस देखील पाईपद्वारे येईल या दिशेने देखील प्रयत्न करत आहे. हा पाईप गॅस सिलेंडरच्या तुलनेत खूप स्वस्त देखील असतो. उत्तर प्रदेश सह पूर्व भारताच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पीएनजी जोडण्या देण्याचे काम वेगाने सुरु आहे . पहिल्या टप्प्यात उत्तर प्रदेशच्या 50 हून अधिक जिल्ह्यांमध्ये सुमारे 21 लाख घरांना याच्याशी जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अशाच प्रकारे सीएनजी आधारित वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत.
बंधू आणि भगिनींनो,
जेव्हा स्वप्ने मोठी असतात तेव्हा ती साकार करण्याचे प्रयत्न देखील तेवढेच मोठे असायला हवेत. आज जागतिक जैवइंधन दिनी आपण आपल्या उद्दिष्टांचे पुन्हा स्मरण करायला हवे. आता आपण एक छोटासा लघुपट देखील पहिला. जैव इंधन क्षेत्रात काय काम होत आहे . जैव इंधन हे केवळ स्वच्छ इंधन नाही , तर इंधनातील स्वयंपूर्णतेच्या इंजिनला , देशाच्या विकासाच्या इंजिनला , गावांच्या विकास इंजिनला गती देण्याचे एक माध्यम देखील आहे. जैव इंधन एक अशी ऊर्जा आहे जी आपण घरातील आणि शेतातील कचरा , झाडे , खराब झालेली धान्ये यापासून प्राप्त करु शकतो. असेच एक जैव इंधन -इथेनॉल यावर देशात खूप मोठ्या उद्दिष्टासह काम सुरु आहे. मागील 6-7 वर्षात आपण पेट्रोलमध्ये 10 टक्के मिश्रणाच्या लक्ष्याच्या जवळ पोहचलो आहोत. आगामी 4-5 वर्षात आपण 20 टक्के मिश्रणाचे लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने पुढे वाटचाल करत आहोत. तसेच देशात शंभर टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या बनवण्याचे लक्ष्य देखील आहे.
मित्रांनो ,
इथेनॉलमुळे येणे-जाणे देखील स्वस्त होईल, पर्यावरण देखील सुरक्षित राहील. मात्र सर्वात जास्त लाभ आपल्या शेतकऱ्यांना होईल, आपल्या युवकांना होईल. यातही विशेषतः उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना -युवकांना मोठा लाभ होईल. ऊसापासून जेव्हा इथेनॉल बनवण्याचा पर्याय मिळेल तेव्हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्त पैसेही मिळतील. आणि वेळेवर मिळतील. गेल्याच वर्षी उत्तर प्रदेशात इथेनॉल उत्पादकांकडून 7 हजार कोटी रुपयांचे इथेनॉल खरेदी करण्यात आले. मागील वर्षांमध्ये इथेनॉल, जैव इंधन याच्याशी संबंधित अनेक कारखाने उत्तर प्रदेशात उभारण्यात आले. ऊसाच्या चिपाडांपासून कंप्रेस्ड बायोगॅस बनवण्यासाठी उत्तर प्रदेशच्या 70 जिल्ह्यांमध्ये सीबीजी संयंत्र बनवण्याची प्रक्रिया सुरु आहे. आता तर पीक कापणीनंतर उरलेले अवशेष पराली पासून जैव इंधन बनवण्यासाठी 3 मोठी संकुले उभारण्यात येत आहेत. यापैकी 2 उत्तर प्रदेशच्या बदायूं आणि गोरखपुर इथे आणि एक पंजाबमधील भटिंडा इथे उभारले जाणार आहे. या प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना कचऱ्याचे देखील पैसे मिळतील. हजारो युवकांना रोजगार मिळेल, आणि पर्यावरणाचे देखील रक्षण होईल.
मित्रांनो ,
अशीच आणखी एक दूसरी महत्वपूर्ण योजना आहे , गोबरधन योजना. ही योजना गाईच्या शेणापासून बायोगॅस बनवायला प्रोत्साहन देते.. यामुळे गावांमध्ये स्वच्छता देखील होईल आणि अशी जनावरे जी दुग्ध उत्पादन क्षेत्रासाठी उपयोगी नाहीत, जी दूध देत नाहीत ती देखील कमाई करून देतील. योगी यांच्या सरकार ने अनेक गौशाळा देखील उभारल्या आहेत. गायी आणि अन्य गोवंशची देखभाल आणि शेतकऱ्यांच्या पिकांच्या संरक्षणासाठी हा महत्वपूर्ण प्रयत्न आहे.
मित्रांनो ,
आता देश मूलभूत सुविधांची पूर्तता, उत्तम जीवनाचे स्वप्न साकारण्याच्या दिशेने पुढे जात आहे. पुढील 25 वर्षात हे सामर्थ्य आपल्याला कित्येक पटींनी वाढवायचे आहे. समर्थ आणि सक्षम भारताचा हा संकल्प आपल्याला एकत्रितपणे सिद्ध करायचा आहे. यात आपल्या भगिनींची विशेष भूमिका असेल. मी उज्ज्वला योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि रक्षा बंधनच्या पवित्र सणाच्या पूर्वी माता-भगिनींची ही सेवा करण्याची संधी मिळाली. मी स्वतःला धन्य समजतो. तुमचे आशीर्वाद कायम राहोत जेणेकरून आपण एका नव्या उर्जेसह भारतमातेच्या सेवेसाठी, 130 कोटी देशवासियांच्या सेवेसाठी , गाव, गरीब, शेतकरी, दलित, पीडित , मागास सर्वांच्या सेवेसाठी सहभागी होऊ याच इच्छेसह खूप-खूप शुभेच्छा. तुम्हाला खूप-खूप धन्यवाद !