लाभार्थ्यांना सिकलसेल जनुकीय स्थिती कार्ड केली वितरित
मध्य प्रदेश येथे सुमारे 3.57 कोटी आयुष्मान भारत-पीएम जनआरोग्य योजना कार्डच्या वितरणाचा केला प्रारंभ
राणी दुर्गावती यांची 500 वी जयंती राष्ट्रीय स्तरावर साजरी केली जाणार
सिकलसेल अॅनेमिया निर्मूलन मोहीम बनणार अमृत काळाचे प्रमुख मिशन
सरकारसाठी आदिवासी समाज हा केवळ मतदार संख्या नसून, ती अत्यंत संवेदनशील आणि भावनात्मक बाब असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन
वाईट हेतू ठेवून गरिबांना दुःख देणाऱ्यांच्या चुकीच्या आश्वासनांपासून सावध रहा: पंतप्रधान

भारत माता की जय।

भारत माता की जय।

कार्यक्रमात उपस्थित मध्यप्रदेशचे राज्यपाल श्रीमान मंगू भाई पटेल, मुख्यमंत्री भाई शिवराजजी, केंद्रातील मंत्रीमंडळामधील माझे सहकारी श्री मनसुख मांडवियाजी, फग्गन सिंह कुलस्तेजी, प्रोफेसर एस पी सिंह बघेलजी, श्रीमती रेणुका सिंह सरुताजी, डॉक्टर भारती पवारजी, श्री बीश्वेश्वर टूडूजी, खासदार श्री वी डी शर्माजी, मध्य प्रदेश सरकारातील मंत्रीगण, सर्व आमदार, देशभरातून या कार्यक्रमात जोडले जात असलेले अन्य सर्व मान्यवर, आणि इतक्या प्रचंड संख्येने आम्हा सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!

 

जय सेवा, जय जोहार. आज राणी दुर्गावतीजींच्या या पावन भूमीत तुम्हा सर्वांमध्ये उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले आहे. मी राणी दुर्गावतीजींच्या चरणी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या प्रेरणेने आज 'सिकलसेल अॅनिमिया मुक्ती अभियान' या खूप मोठ्या अभियानाची' सुरूवात होत आहे. आज मध्य प्रदेशातील 1 कोटी लाभार्थ्यांना आयुष्मान कार्डही दिले जात आहेत. या दोन्ही उपक्रमाचा सर्वात मोठा फायदा आपल्या गोंड समाज, भिल्ल समाज किंवा आपल्या इतर आदिवासी समाजातील लोकांनाच होत आहे. मी तुम्हा सर्वांचे, मध्य प्रदेशच्या डबल इंजिन सरकारचे अभिनंदन करतो.

 

मित्रांनो,

शाहडोलच्या या भूमीवर आज देश मोठा संकल्प सोडत आहे. हा संकल्प आपल्या देशातील आदिवासी बंधू-भगिनींचे जीवन सुरक्षित करण्याचा संकल्प आहे.  सिकलसेल अॅनिमिया या आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा संकल्प आहे. दरवर्षी सिकलसेल अॅनिमियाने ग्रस्त असलेल्या 2.5 लाख मुलांचे आणि त्यांच्या 2.5 लाख कुटुंबातील सदस्यांचे प्राण वाचवण्यासाठी हा संकल्प आहे.

 

मित्रांनो,

मी देशाच्या विविध भागात आदिवासी समाजामध्ये बराच काळ राहीलो आहे. सिकलसेल अॅनिमियासारखा आजार खूप वेदनादायक असतो. याच्या रुग्णांच्या सांध्यांमध्ये नेहमीच वेदना होतात, शरीरात सूज आणि थकवा येतो. पाठ, पाय आणि छातीत असह्य वेदना होतात, श्वासोच्छवासाचा त्रास होतो. दीर्घकाळ वेदना सहन करणाऱ्या रुग्णाच्या शरीरातील अंतर्गत अवयवांनाही इजा होऊ लागते. हा आजार कुटुंबांनाही उद्धवस्त करतो. आणि हा रोग हवा, पाण्याने किंवा अन्नाने पसरत नाही. तर हा आजार असा आहे की मुलाला हा आजार पालकांकडून होऊ शकतो, तो अनुवांशिक आहे. आणि हा आजार घेऊन जन्मलेली मुले आयुष्यभर आव्हानांशी झुंजत असतात.

 

मित्रांनो,

जगभरातील सिकलसेल अॅनिमिया प्रकरणांपैकी निम्मे, 50 टक्के एकट्या आपल्या देशात आहेत. पण दुर्दैव म्हणजे गेल्या 70 वर्षात त्याची कधी चिंताच करण्यात आली नाही, त्याला सामोरे जाण्यासाठी कोणतीही ठोस योजना आखली गेली नाही! याचा सर्वाधिक फटका आदिवासी समाजाला बसला. आदिवासी समाजाप्रती असलेल्या उदासीनतेमुळे पूर्वीच्या सरकारांसाठी हा मुद्दा नव्हता. मात्र आता भाजप सरकार, आमच्या सरकारने आदिवासी समाजाचे हे सर्वात मोठे आव्हान सोडविण्याचे काम हाती घेतले आहे. आमच्यासाठी आदिवासी समाज हा केवळ सरकारी आकडा नाही. हा आमच्यासाठी संवेदनशीलतेचा विषय आहे, भावनिक विषय आहे. मी पहिल्यांदाच गुजरातचा मुख्यमंत्री होण्याच्या खूप आधीपासून या दिशेने प्रयत्न करत होतो. आपले राज्यपाल श्री. मंगूभाई हे आदिवासी परिवाराचे एक आश्वासक नेते आहेत. मंगूभाई आणि मी जवळपास 50 वर्षांपासून आदिवासी भागात एकत्र काम करत आहोत. आणि आम्ही आदिवासी कुटुंबात जाऊन या आजारापासून मुक्ती कशी मिळवायची, जनजागृती कशी करायची यावर सतत काम करायचो. मी गुजरातचा मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यासंबंधीच्या अनेक मोहिमा तिथे सुरू केल्या. पंतप्रधान झाल्यानंतर मी जपानला गेलो होतो, तेव्हा तिथे एका नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञाला भेटलो. मला कळले की त्या शास्त्रज्ञांनी सिकलसेल आजारावर बरेच संशोधन केले आहे. मी त्या जपानी शास्त्रज्ञालाही सिकलसेल अॅनिमिया बरा करण्यासाठी मदत करण्याविषयी विचारणा केली.

 

मित्रांनो,

सिकलसेल अॅनिमियापासून मुक्ती मिळवण्यासाठीचे हे अभियान अमृतकाळाचे प्रमुख अभियान बनणार आहे. आणि मला खात्री आहे की, 2047 पर्यंत जेव्हा देश स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करेल, तेव्हा आपण सर्वजण मिळून युद्धपातळीवर अभियान राबवून आपल्या आदिवासी कुटुंबांना सिकलसेल अॅनिमियापासून मुक्त करू आणि देशाला या पासून मुक्त करू. आणि यासाठी आपण सर्वांनी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. शासन, आरोग्य कर्मचारी, आदिवासी या सर्वांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. सिकल सेल अॅनिमिया असलेल्या रुग्णांना रक्त चढवणे आवश्यक असते. त्यामुळे त्यांच्यासाठी रक्तपेढ्या उघडल्या जात आहेत. त्यांच्यावरील उपचारासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांटची सुविधा वाढवली जात आहे. सिकलसेल अॅनिमियाच्या रुग्णांची तपासणी किती महत्त्वाची आहे हे देखील तुम्हाला माहीत आहे. कोणतीही बाह्य लक्षणे नसलेला कोणीही सिकलसेलचा वाहक असू शकतो.  असे लोक नकळत आपल्या मुलांना हा आजार देऊ शकतात. म्हणूनच सिकल सेल आजाराचे निदान करण्यासाठी चाचणी घेणे आणि तपासणी करणे खूप महत्वाचे आहे. जर चाचणी केली नाही, तर असे होऊ शकते की आपल्याला हा आजार आहे हे रुग्णाला बराच काळ माहीत पडत नाही. जसे आता बोलण्याच्या ओघात आपले मनसुखभाई अनेकदा कुंडलीचा उल्लेख करत होते, लग्नापूर्वी कुंडली जुळवण्याची, जन्माक्षरे जुळवण्याची अनेक कुटुंबात परंपरा आहे, हे सुद्धा त्यांनी सांगितले. ते म्हणाले, पत्रिका जुळवा न जुळवा, मात्र सिकलसेल चाचणीचा अहवाल, जे कार्ड दिलंय ते जुळलं पाहिजे आणि ते जुळले तरच मग लग्न करा.

 

मित्रहो,

ही खबरदारी घेतली तरच आपण या आजाराला एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जाण्यापासून रोखू शकतो. म्हणूनच माझा असा आग्रह आहे की प्रत्येक व्यक्तीने आपली तपासणी करून घेतली पाहिजे, आपलं सिकलसेल कार्ड (पत्रिका) बनवलं पाहिजे आजाराची चाचणी केली पाहिजे. या जबाबदारीचे पालन करण्यासाठी समाज स्वतःहून जेवढा पुढाकार घेईल, तेवढंच सिकलसेल ऍनिमिया या रोगाचे निर्मूलन करणे सोपे होईल.

 

मित्रांनो,

आजार एखाद्या व्यक्तीवरच नाही, एखाद्या आजार झालेल्या रुग्णावरच नाही, तर आजार झालेल्या व्यक्तीच्या संपूर्ण कुटुंबावर परिणाम करतो. जर एखादी व्यक्ती आजारी पडली तर तिचं संपूर्ण कुटुंब गरिबी आणि असहाय्यतेच्या दुष्टचक्रात अडकते आणि मीही तुमच्यापेक्षा खूप काही वेगळ्या अशा कुटुंबातून आलेलो नाही. तुमच्यातूनच मी इथपर्यंत पोहोचलो आहे.  म्हणूनच मला तुमची समस्या चांगलीच कळते आणि समजते. म्हणूनच असे गंभीर आजार दूर करण्यासाठी आमचे सरकार अहोरात्र झटत आहे. या प्रयत्नांमुळे आज देशात क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे.  आता देश 2025 पर्यंत क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी काम करत आहे.

 

मित्रहो,

आमचे सरकार स्थापन होण्यापूर्वी 2013 मध्ये, काळ्या आजाराचे 11,000 रुग्ण आढळले होते. आज हे प्रमाण घटून रुग्णसंख्या एक हजारापेक्षा कमी झाली आहे.  2013 मध्ये मलेरियाचे 10 लाख रुग्ण होते, 2022 मध्ये हे प्रमाण 2 लाखांपेक्षा कमी झाले आहे. 2013 मध्ये कुष्ठरोगाचे 1.25 लाख रुग्ण होते, मात्र आता त्यांची संख्या 70-75 हजारांवर आली आहे. मेंदूज्वराने केलेला कहर सुद्धा आपणा सर्वांना आधीच माहीत आहे. गेल्या काही वर्षांत मेंदूज्वराच्या रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. हा फक्त काही आकडेवारीचा खेळ नाही. जेव्हा आजाराचे प्रमाण कमी होते, तेव्हा लोकांची दुःख, वेदना, त्रास आणि मृत्यूच्या कचाट्यातून सुटका होते.

 

बंधू आणि भगिनींनो,

आमच्या सरकारचा हा प्रयत्न आहे की आजाराचे प्रमाण तर कमी झाले पाहिजेच, सोबतच आजारपणावर होणारा खर्च सुद्धा कमी व्हायला हवा. यासाठीच आम्ही आयुष्मान भारत योजना घेऊन आलो आहोत, या योजनेमुळे लोकांवर पडणारा आजारपणाचा भार कमी झाला आहे. आज इथे मध्य प्रदेशात एक कोटी लोकांना आयुष्मान पत्रिका देण्यात आल्या. जर एखाद्या गरिबाला कधी रुग्णालयात जायची वेळ आली तर त्याच्यासाठी ही पत्रिका, जणू पाच लाख रुपये असलेल्या एटीएम कार्डचे काम करेल. आपण हे लक्षात ठेवा आज आपल्याला ही जी आयुष्मान पत्रिका मिळाली आहे, रुग्णालयात तिची किंमत पाच लाख रुपयांच्या समान आहे. आपल्याकडे हे कार्ड असेल तर कुणीही आपल्याला उपचारांसाठी मनाई करणार नाही, रोख पैसे मागू शकणार नाही आणि हिंदुस्थानच्या पाठीवर कुठल्याही भागात आपल्याला आरोग्यविषयक कोणतीही समस्या निर्माण झाली, तर तिकडच्या रुग्णालयामध्ये जाऊन‌, मोदींची ही कार्ड रुपी हमी दाखवा, त्या रुग्णालयालासुद्धा तुमच्यावर उपचार करावेच लागतील. ही आयुष्मान पत्रिका गरिबांवरील उपचारांसाठी पाच लाख रुपयांची हमी आहे आणि ही मोदींनी दिलेली हमी आहे.

 

बंधु भगिनींनो,

देशभरात आयुष्मान योजनेअंतर्गत, रुग्णालयांमध्ये जवळजवळ पाच कोटी गरिबांवर उपचार झाले आहेत. आयुष्मान भारत ही पत्रिका नसती तर या सर्व गरिबांना, एक लाख कोटी रुपयांहून जास्त खर्च करुन आजारांवर उपचार करावे लागले असते. आपण कल्पना करा यात असे किती लोक असतील ज्यांनी जगण्याची अशाच सोडून दिली असेल!

औषधोपचार करण्यासाठी ज्यांना आपले घर, आपली शेती,  कदाचित विकावी लागली असेल, अशी  कितीतरी कुटुंबे असतील. मात्र आमचे सरकार अशा कठीण परिस्थितीमध्ये त्या गरीबांबरोबर उभे रहात असल्याचे दिसून येत आहे. पाच लाख रूपयांची ही आयुष्मान योजना म्हणजे हमी कार्ड आहे.  गरीबाची सर्वात मोठी काळजी असल्याची हमी देणारी  आहे. आणि इथे जे आयुष्मानचे काम करत आहेत, ते म्हणतात, - जरा तुमचे कार्ड द्या बरं, तुम्हाला हे जे कार्ड मिळाले आहे ना, त्यामध्ये लिहिले आहे की, 5 लाख रूपयांपर्यंत निःशुल्क औषधोपचार केला जाईल. या देशामध्ये कधीही कोणत्याही गरीबाला 5 लाख रूपयांची हमी कुणीही दिलेली नाही. हे काम माझ्या गरीब परिवारांसाठी या भाजपा सरकारने केले आहे. हे मोदी आहेत, ज्यांनी तुम्हाला 5 लाख रूपयांपर्यंत औषधोपचाराची हमी देणारे कार्ड दिले आहे.

 

मित्रांनो,

हमीविषयीच्या या चर्चेमध्ये तुम्हाला जे कोणी खोटी हमी देतात, त्यांच्यापासून सावध रहायचे आहे. आणि ज्या लोकांची स्वतःचीच काही हमी नाही, तेच लोक तुमच्याकडे हमी देणा-या नव-नवीन योजना घेऊन येत आहेत. त्यांच्या हमीमध्ये लपलेला खोटा मुद्दा तुम्ही ओळखला पाहिजे. खोट्या हमीच्या नावाखाली त्यांचा धोका देण्याचा जो खेळ आहे, तो तुम्ही आधीच ओळखला पाहिजे.

 

मित्रांनो,

ज्यावेळी ते मोफत वीजेची हमी देतात, त्याचा अर्थ आहे की ते वीजेच्या दरामध्ये वाढ करणार आहेत. ज्यावेळी ते मोफत प्रवासाची हमी देतात, त्याचा अर्थ आहे की, त्या  राज्याची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ढासळणार आहे. ज्यावेळी ते निवृत्ती वेतन वाढविण्याची हमी देतात, त्याचा अर्थ आहे की, त्या राज्यामधील कर्मचा-यांना नियमित आणि  वेळेवर वेतन मिळू शकणार नाही. ज्यावेळी ते पेट्रोल स्वस्त करण्याची  हमी देतात, त्याचा अर्थ आहे की, ते कर वाढवून तुमच्याच खिशातून पैसे काढण्याची तयारी करीत  आहेत. ज्यावेळी ते रोजगार वाढविण्याची हमी देतात, त्याचा अर्थ आहे की, तिथले उद्योग-धंदे पूर्णपणे बंद करण्याचे धोरण ते घेऊन येणार आहेत. कॉंग्रेस सारख्या पक्षांची हमी याचा अर्थ, त्यांच्या मनात काही काळेबेरे आहे. आणि गरीबांवर वार करणे, हाच तर त्यांचा खेळ आहे. ते 70 वर्षांमध्ये गरीबाला पोटभर जेवण देण्याची हमी देऊ शकले नाहीत. परंतु प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून 80 कोटींपेक्षा जास्त लोकांना मोफत स्वस्त धान्य मिळू शकते, ही हमी आहे. सर्वांना मोफत अन्नधान्य मिळत आहे. ते 70 वर्षांमध्ये  महागडे औषधोपचार कसे करायचे, या चिंतेतून गरीबांची   सुटका करण्याची हमी देऊ शकले नाहीत. मात्र आयुष्मान योजनेमुळे 50 कोटी लाभार्थींना आरोग्य विम्याची हमी मिळाली आहे. ते 70 वर्षांत महिलांची धुराच्या त्रासातून मुक्तता करण्याची हमी देऊ शकले नाहीत. परंतु उज्ज्वला योजनेतून जवळपास 10 कोटी महिलांना धूरमुक्त जीवनाची हमी आता मिळाली आहे. ते 70 वर्षांमध्ये गरीबांना स्वतःच्या पायावर उभे राहता येईल, याची हमी देऊ शकले नाहीत. मात्र मुद्रा योजनेमुळे साडे आठ कोटी लोकांना सन्मानाने स्वयंरोजगाराची हमी मिळाली आहे.

त्यांची हमी म्हणजेच, कुठे ना कुठे काहीतरी गडबड जरूर आहे. आज जी मंडळी एकत्रित येण्याचा दावा करीत आहेत, समाज माध्यमांवर त्यांची वक्तव्ये सगळीकडे पसरली आहेत. वास्तविक,  ही मंडळी एकमेकांना वारंवार दूषणे देत आली आहेत. याचा अर्थ विरोधकांची एकजुटीची काही हमी नाही. या घराणेशाही चालवणा-या पक्षांनी फक्त आपल्या कुटुंबाच्या भलाईचे काम केले आहे. याचा अर्थ, त्यांच्याकडे देशातील सामान्य जनतेच्या कुटुंबाना पुढे घेऊन जाण्याची कोणतीही हमी योजना नाही. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, जे जामिनावर बाहेर  फिरत आहेत, जे घोटाळ्यांच्या आरोपाखाली शिक्षा भोगत आहेत, ते एका व्यासपीठावर जमलेले दिसत आहेत. याचा अर्थ, त्यांच्याकडे भ्रष्टाचार मुक्त शासन देण्याची कोणतीही हमी नाही. ते अगदी एका सुरामध्ये देशाच्या विरोधात वक्तव्ये करीत आहेत. ते ज्यांची देशविरोधी तत्वे आहेत, अशा लोकांबरोबर बसले आहेत. याचा अर्थ दहशतवाद मुक्त भारताची हमी नाही. ते तर फक्त हमी देऊन निघून जातील आणि त्याचे परिणाम मात्र तुम्हाला भोगावे लागतील. ते हमी देऊन आपले खिसे भरतील, मात्र नुकसान तुमच्या मुलांचे होईल. ते हमी देऊन आपल्या परिवाराला पुढे घेऊन जातील, मात्र त्याची किंमत देशाला मोजावी लागेल. म्हणूनच तुम्हाला काँग्रेससह अशा प्रत्येक राजकीय पक्षाच्या हमीविषयी सावध रहायचे आहे.

 

मित्रांनो,

अशी खोटी  हमी देणाऱ्या लोकांचे मत नेहमीच आदिवासींच्या विरोधात असते. आधी आदिवासी समुदायातील युवकांसमोर भाषेचे खूप मोठे आव्हान होते. मात्र नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये आता स्थानिक भाषेमध्ये शिक्षणाची सुविधा दिलेली आहे. मात्र खोटी हमी देणारे, पुन्हा एकदा या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला विरोध करत आहेत.

आमच्या आदिवासी बांधवांच्या मुलांना त्यांच्याच भाषेत शिक्षण घेता यावे, असे या लोकांना वाटत नाही. आदिवासी, दलित, मागास, गरीबांची मुले पुढे गेली तर त्यांच्या मतपेढीचे राजकारण संपून जाईल, हे त्यांना माहीत आहे. आदिवासी भागातील शाळा आणि महाविद्यालयांचे महत्त्व मला माहीत आहे. म्हणूनच आमच्या सरकारने 400 हून अधिक नवीन एकलव्य शाळांमध्ये आदिवासी मुलांना निवासी शिक्षणाची संधी दिली आहे. असे 24 हजार विद्यार्थी एकट्या मध्य प्रदेशातील शाळांमध्ये शिकत आहेत.

 

मित्रांनो,

पूर्वीच्या सरकारांनी आदिवासी समाजाकडे सातत्याने दुर्लक्ष केले. स्वतंत्र आदिवासी मंत्रालय निर्माण करून आम्ही आदिवासी समाजाला प्राधान्य दिले आहे. या मंत्रालयासाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत तिप्पट वाढ केली आहे. पूर्वी जंगल आणि जमीन लुटणाऱ्यांना संरक्षण मिळायचे. आम्ही वन हक्क कायद्यांतर्गत 20 लाखांहून अधिक अधिकारपत्रांचे वितरण केले आहे.

या लोकांनी पेसा कायद्याच्या नावाखाली इतकी वर्षे राजकीय स्वार्थ साधला. पण आम्ही पेसा कायदा लागू करून आदिवासी समाजाला त्यांचे हक्क मिळवून दिले. पूर्वी आदिवासी परंपरा आणि कला-कौशल्यांची खिल्ली उडवली जायची. आम्ही आदि महोत्सवासारखे कार्यक्रम सुरू केले.

 

मित्रांनो,

गेल्या 9 वर्षांत आदिवासींचा स्वाभिमान जतन करून समृद्ध करण्याचे काम सातत्याने केले जात आहे. आता भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देश 15 नोव्हेंबर रोजी आदिवासी गौरव दिन साजरा करतो. आज देशातील विविध राज्यांमध्ये आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांना वाहिलेली संग्रहालये उभारली जात आहेत. हे प्रयत्न करत असतानाच आपण आधीच्या सरकारांचे वर्तन विसरता कामा नये.

देशात अनेक दशके सरकार चालवणाऱ्यांचा, आदिवासी समाज, गरिबांबाबतचा दृष्टिकोन असंवेदनशील आणि अपमानास्पद होता. जेव्हा एका आदिवासी महिलेला देशाच्या राष्ट्रपती बनवण्याचा विचार समोर आला तेव्हा अनेक पक्षांनी घेतलेला पवित्रा आपण पाहिला आहे. आपल्या मध्य प्रदेशातील लोकांनीही ही वृत्ती बघितली आहे. शहडोल विभागात केंद्रीय आदिवासी विद्यापीठ सुरू झाले तेव्हा त्या विद्यापीठाचे नाव त्यांनी आपल्या कुटुंबाच्या नावावर ठेवले. तर शिवराज यांच्या सरकारने छिंदवाडा विद्यापीठाला महान गोंड क्रांतिकारक राजा शंकर शाह यांचे नाव दिले आहे. त्यांनी तंटया मामा सारख्या नायकाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले, पण आम्ही पाताळपाणी स्थानकाचे नाव तंटया मामा असे ठेवले. त्या लोकांनी गोंड समाजाचे मोठे नेते दलवीर सिंह जी यांच्या कुटुंबाचाही अपमान केला. त्याचीही आम्ही भरपाई केली, त्यांचा सन्मान केला. आमच्यासाठी आदिवासी वीरांचा आदर म्हणजे आमच्या आदिवासी तरुणांचा आदर, तुम्हा सर्वांचा आदर.

 

मित्रांनो,

हे प्रयत्न यापुढेही सुरू ठेवायचे आहेत, त्यांना आणखी गती द्यायची आहे. आणि हे फक्त तुमच्या सहकार्याने, तुमच्या आशीर्वादानेच शक्य होईल. मला खात्री आहे, तुमचे आशीर्वाद आणि राणी दुर्गावतीची प्रेरणा आम्हाला असेच मार्गदर्शन करत राहील. आता शिवराजजी यांनी सांगितले की राणी दुर्गावतीजींची 500वी जयंती 5 ऑक्टोबरला येत आहे. राणी दुर्गावती यांच्या पराक्रमाने पावन झालेल्या या भूमीवर आज मी तुमच्यासमोर उभा आहे. भारत सरकार राणी दुर्गावती यांची 500वी जन्मशताब्दी देशभरात साजरी करणार आहे असे मी आज देशवासीयांसमोर जाहीर करतो.

राणी दुर्गावती यांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार केला जाणार आहे, राणी दुर्गावतींचे चांदीचे नाणेही प्रसिद्ध होणार आहे, राणी दुर्गावतींचे टपाल तिकीटही प्रसिद्ध होणार आहे. 500 वर्षांपूर्वी जन्मलेल्या या पवित्र मातेकडून आपल्याला मिळालेल्या प्रेरणेची गोष्ट जगाला समजावी आणि भारतातील प्रत्येक घरापर्यंत ती पोहोचावी यासाठी मोहीम राबवली जाणार आहे.

मध्य प्रदेश विकासाच्या नव्या उंचीला स्पर्श करेल आणि आपण सर्व मिळून विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करू. आता मी येथे काही आदिवासी कुटुंबांना भेटणार आहे, त्यांच्याशी बोलण्याची संधी आज मिळणार आहे. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आला आहात. सिकलसेल, आयुष्मान कार्ड म्हणजे तुमच्या भावी पिढ्यांची काळजी घेण्यासाठी मी राबवत असलेली मोठी मोहीम आहे.

मला तुमची साथ हवी आहे. देशाला सिकलसेलपासून मुक्त करायचे आहे, माझ्या आदिवासी कुटुंबांना या संकटातून मुक्त करायचे आहे. माझ्यासाठी हे माझ्या हृदयाच्या जवळचे काम आहे आणि यामध्ये मला तुमच्या मदतीची गरज आहे, मला माझ्या आदिवासी कुटुंबांच्या पाठिंब्याची गरज आहे. हीच माझी तुम्हाला विनंती आहे. निरोगी राहा, समृद्ध व्हा. या इच्छेसह, तुम्हा सर्वांचे अनेकानेक आभार!

भारत माता की जय!

भारत माता की जय!

भारत माता की जय!

खूप खूप धन्यवाद।

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII

Media Coverage

PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...

Prime Minister Shri Narendra Modi paid homage today to Mahatma Gandhi at his statue in the historic Promenade Gardens in Georgetown, Guyana. He recalled Bapu’s eternal values of peace and non-violence which continue to guide humanity. The statue was installed in commemoration of Gandhiji’s 100th birth anniversary in 1969.

Prime Minister also paid floral tribute at the Arya Samaj monument located close by. This monument was unveiled in 2011 in commemoration of 100 years of the Arya Samaj movement in Guyana.