जय कृष्णगुरु !
जय कृष्णगुरु !
जय कृष्णगुरु !
जय जयते परम कृष्णगुरु ईश्वर !.
कृष्णगुरु सेवाश्रमात जमलेल्या सर्व संत-ऋषीजनांना आणि भक्तांना माझे विनम्र अभिवादन. कृष्णगुरु एकनाम अखंड कीर्तनाचा हा कार्यक्रम गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. मला आनंद आहे की कृष्णगुरुजींनी पुढे नेलेली ज्ञान, सेवा आणि मानवतेची प्राचीन भारतीय परंपरा आजही अखंडपणे गतीमान आहे. गुरुकृष्ण प्रेमानंद प्रभूजींच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सहकार्याने तसेच कृष्णगुरुंच्या भक्तांच्या प्रयत्नांमुळे या कार्यक्रमात ती दिव्यता स्पष्टपणे दिसून येते. या निमित्ताने आसाममध्ये येऊन तुम्हा सर्वांसह या कार्यक्रमात सहभागी व्हावे अशी माझी इच्छा होती! कृष्णगुरुजींच्या पवित्र तपोभूमीत येण्यासाठी मी यापूर्वी अनेकदा प्रयत्न केले आहेत. पण कदाचित माझ्या प्रयत्नातच काही कमतरता होती की इच्छा असूनही मी आत्तापर्यंत तिथे येऊ शकलो नाही. कृष्णगुरुंच्या आशीर्वादाने मला येणाऱ्या काळात तिथे येऊन तुम्हा सर्वांना नमन करण्याची, तुमचे दर्शन घेण्याची संधी मिळावी अशी माझी मनोकामना आहे.
मित्रांनो,
कृष्णगुरुजींनी विश्वशांतीसाठी दर 12 वर्षांनी एक महिना अखंड नामजप आणि कीर्तनाचे अनुष्ठान सुरू केले होते. आपल्या देशात 12 वर्षांच्या कालावधीत असे अनुष्ठान आयोजित करण्याची प्राचीन परंपरा आहे. आणि यांचा मुख्य भाव आहे, "कर्तव्य'. या समारंभांमुळे व्यक्ती आणि समाजात कर्तव्याची भावना जागृत होत असे. या कार्यक्रमांमध्ये देशभरातील लोक एकत्र येत असत. आधीच्या 12 वर्षांत घडलेल्या प्रत्येक गोष्टीचा आढावा घेतला जात असे, वर्तमानाचे मूल्यमापन केले जात असे आणि भविष्याची रुपरेषा आखली जात असे. दर 12 वर्षांनी होणारी कुंभ आयोजनाची परंपरा हेही याचे सशक्त उदाहरण आहे. 2019 मध्येच आसामच्या लोकांनी ब्रह्मपुत्रा नदीत पुष्करम सोहळ्याचे यशस्वी आयोजन केले होते. आता पुन्हा हा कार्यक्रम 12 व्या वर्षीच ब्रह्मपुत्रा नदीवर होणार आहे. तमिळनाडूतील कुंभकोणम येथे दर 12 वर्षांनी महामहम उत्सवही साजरा केला जातो. भगवान बाहुबलीचा महामस्तकाभिषेक देखील 12 वर्षांनीच केला जातो. निलगिरीच्या पर्वतरांगात उमलणारे नील कुरुंजीचे फूलही दर 12 वर्षांनी उगवते हाही संयोग आहे. दर 12 वर्षांनी होणारे कृष्णगुरु एकनाम अखंड कीर्तनही अशीच एक सशक्त परंपरेचे सृजन आहे. हे कीर्तन जगाला ईशान्येच्या वारशाची आणि त्याच्या आध्यात्मिक चेतनेची ओळख करून देत आहे. या कार्यक्रमासाठी मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो.
मित्रांनो,
कृष्णगुरुजींची विलक्षण प्रतिभा, त्यांची अध्यात्मिक समज, त्यांच्याशी संबंधित विस्मयकारक घटना आपल्या सर्वांना प्रेरणा देत आहेत. त्यांनी आपल्या शिकवले आहे की कोणतेही काम, कोणतीही व्यक्ती लहान किंवा मोठी नसते. गेल्या 8-9 वर्षात देशाने "सर्वांच्या सोबतीने सर्वांचा विकास" या भावनेने समर्पितवृत्तीने काम केले आहे. आज विकासाच्या शर्यतीत जो जितका मागे पडला आहे, देशासाठी तो प्रथम प्राधान्यक्रमावर आहे. म्हणजेच देश वंचितांना प्राधान्य देत आहे, वंचितांना प्राधान्य देत आहे. आसाम असो, आपला ईशान्य भाग असो, तेही अनेक दशकांपासून विकासाच्या संपर्कापासून वंचित होते. आज देश आसाम आणि ईशान्येच्या विकासाला प्राधान्य देत आहे.
पूर्वोत्तर और असम को इन विकास कार्यों का बड़ा लाभ मिलेगा। वैसे आज इस आयोजन में जुटे आप सभी संतों-विद्वानों को मैं एक और जानकारी देना चाहता हूं।
यंदाच्या अर्थसंकल्पातही देशाच्या या प्रयत्नांची आणि आपल्या भविष्याची जोरदार झलक दिसून येते. ईशान्येच्या अर्थव्यवस्थेत आणि प्रगतीमध्ये पर्यटनाचा मोठा वाटा आहे. या अर्थसंकल्पात पर्यटनाशी संबंधित संधी वाढवण्यासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. विशेष मोहीम राबवून देशातील 50 पर्यटन स्थळे विकसित करण्यात येणार आहेत. त्यांच्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील, दूरदृश्य संपर्क प्रणाली सुधारली जाईल, पर्यटकांसाठीच्या सुविधाही निर्माण केल्या जातील. या विकासकामांचा ईशान्य आणि आसामला मोठा फायदा होणार आहे. तसे, आज मला या कार्यक्रमात जमलेल्या सर्व संत आणि विद्वानांना आणखी एक माहिती द्यावीशी वाटते. गंगा विलास क्रूझबद्दल तुम्ही सर्वांनी ऐकले असेलच. गंगा विलास क्रूझ ही जगातील सर्वात लांब नदी प्रवास करणारी क्रूझ आहे. यातून परदेशी पर्यटकही मोठ्या संख्येने प्रवास करत असतात. बनारसहून बिहारमधील पाटणा, बक्सर, मुंगेरमार्गे ही क्रूझ बंगालमधील कोलकात्याच्या पलीकडे प्रवास करून बांगलादेशात पोहोचली आहे. काही काळाने ही क्रूझ आसामला पोहोचणार आहे. त्यातून प्रवास करणारे पर्यटक नद्यांच्या माध्यमातून ही ठिकाणे सविस्तरपणे जाणून घेत आहेत, तेथील संस्कृती जगत आहे. आणि आपल्याला माहित आहे की भारताच्या सांस्कृतिक वारशाचे सर्वात मोठे महत्त्व, सर्वात मौल्यवान खजिना आपल्या नदीतीरांवर आहे कारण आपल्या संपूर्ण संस्कृतीचा विकास प्रवास नदीतीरांशी जोडलेला आहे. मला खात्री आहे की, आसामी संस्कृती आणि सौंदर्यही गंगाविलासच्या माध्यमातून जगासमोर नव्या पद्धतीने पोहोचेल.
मित्रांनो,
कृष्णगुरु सेवाश्रम विविध संस्थांद्वारे पारंपारिक कला आणि कौशल्यांमध्ये कार्यरत लोकांच्या कल्याणासाठी देखील कार्य करते. ईशान्येकडील पारंपारिक कौशल्यांना जागतिक बाजारपेठेशी जोडून त्यांना नवी ओळख मिळवून देण्याच्या दिशेने गेल्या काही वर्षांत देशाने ऐतिहासिक कार्य केले आहे. आज देशभरातील आणि जगभरातील लोकांना आसामची कला, आसाममधील लोकांची कौशल्ये आणि बांबूपासून बनवलेली उत्पादने माहीत होत असून आवडतही आहेत.
तुम्हाला हे देखील आठवत असेल की, पूर्वी बांबूच्या झाडांना विशेष श्रेणीमध्ये समाविष्ट करून त्यांची. तोड करण्यावर कायद्याने बंदी घालण्यात आली होती. आम्ही तो कायदा बदलला, तो गुलामगिरीच्या कालखंडातील कायदा होता. बांबूचा गवत या श्रेणीमध्ये समावेश करून पारंपरिक रोजगाराचे सर्व मार्ग खुले करण्यात आले आहेत. आता या प्रकारच्या पारंपरिक कौशल्य विकासासाठी तसेच या उत्पादनांची गुणवत्ता सुधारण्यासाठी, त्यांची उपलब्धता वाढवण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. यासारख्या उत्पादनांना विशेष ओळख प्राप्त करून देण्यासाठी अर्थसंकल्पात प्रत्येक राज्यात युनिटी मॉल - एकता मॉल उभा करण्याची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. म्हणजेच आसाममधील शेतकरी, आसाममधील कारागीर, आसाममधील युवक ज्या वस्तूंचे उत्पादन करतील त्या वस्तूंचे युनिटी मॉल - एकता मॉलमध्ये एक विशेष प्रदर्शन भरवण्यात येईल, जेणेकरून या उत्पादनांची विक्री वाढेल. इतकेच नव्हे तर, इतर राज्यांच्या राजधानीची शहरे किंवा त्या राज्यातील मोठी पर्यटन स्थळे येथेही जे युनिटी मॉल उभारण्यात येतील, त्यामध्ये देखील आसामच्या उत्पादनांचे प्रदर्शन भरवण्यात येईल. पर्यटक जेंव्हा युनिटी मॉलला भेट देतील तेंव्हा आसामच्या उत्पादनांना नवी बाजारपेठ मिळेल.
मित्रांनो,
जेव्हा आसामच्या कारागिरीची चर्चा होते तेंव्हा येथील या 'गोमोशा'चा देखील, या 'गोमोशा'चा देखील आपोआप उल्लेख केला जातो. मला स्वतःला 'गोमोशा' वापरणे खूप आवडते. प्रत्येक कलात्मक गोमोश्याच्या निर्मिती मागे आसामच्या महिला, आपल्या माता भगिनींची मेहनत असते. गेल्या आठ नऊ वर्षात देशामध्ये गोमोशा प्रति प्रचंड आकर्षण वाढले आहे, त्यामुळे त्यांची मागणी देखील वाढली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी मोठ्या संख्येने महिला बचत गट पुढाकार घेत आहेत. या गटांमधील हजारो लाखो महिलांना रोजगार मिळत आहे. आता हे गट आणखी प्रगती करत देशाच्या अर्थव्यवस्थेची ताकदही बनतील. यासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. महिलांचे उत्पन्न त्यांच्या सक्षमीकरणाचे माध्यम बनावे बनावे यासाठी 'महिला सन्मान बचत प्रमाणपत्र' योजना देखील सुरू करण्यात आली आहे. महिलांना त्यांच्या बचतीवर विशेष रूपाने जास्त व्याजाचा फायदा मिळेल. यासोबतच, प्रधानमंत्री आवास योजनेच्या निधीत वाढ करुन आता तो 70 हजा कोटी रुपये करण्यात आला आहे, यामुळे प्रत्येक कुटुंबाला, जे गरीब आहेत, ज्यांना पक्के घर नाही त्यांना पक्के घर मिळू शकेल. यातील बहुतांश घरे देखील महिलांच्या नावे केली जातील. या घरांचा मालकी हक्क कुटुंबातील महिलांकडे असतो. या अर्थसंकल्पात अशा तरतुदी करण्यात आल्या आहेत, ज्यांच्यामुळे आसाम, नागालँड, त्रिपुरा आणि मेघालय सारख्या ईशान्येकडील राज्यातील महिलांना मोठ्या प्रमाणावर लाभ होईल आणि त्यांच्यासाठी नव्या संधी निर्माण होतील.
मित्रांनो,
कृष्णगुरु उपदेश करत असत की, नित्य भक्ती कार्य करत असताना विश्वासाने आपल्या आत्म्याची सेवा करा. आपल्या आत्म्याच्या सेवेत समाजाची सेवा आहे, समाजाच्या विकासाच्या या मंत्रात मोठी शक्ती सामावलेली आहे. कृष्णगुरु सेवाश्रम समाजाशी निगडित प्रत्येक क्षेत्रात या मंत्रानुसार काम करत आहे, याचा मला आनंद आहे. सेवाश्रमाद्वारे सुरू करण्यात आलेला हा सेवा यज्ञ देशाची मोठी ताकद बनत आहे. देशाच्या विकासासाठी सरकार अनेक योजना राबवित आहे. मात्र देशाच्या कल्याणकारी योजनांचा प्राणवायू समाजाची शक्ती आणि जनसहभाग हाच आहे. आपण पाहिलेच आहे की कसे देशाने स्वच्छ भारत अभियान सुरू केले आणि मग जनसहभागाने या अभियानाला सफल बनवले. डिजिटल भारत अभियानाच्या सफलतेचे सर्वात मोठे कारण जन सहभाग हेच आहे. देशाला सशक्त बनवणाऱ्या या प्रकारच्या अनेक योजनांना पुढे नेण्यात कृष्णगुरु सेवाश्रमाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. जसे की, सेवाश्रम महिला आणि युवकांच्या उन्नतीसाठी सामाजिक कार्य करत आहे. तुम्ही 'बेटी बचाव- बेटी पढाव' आणि पोषण यासारख्या अभियानाला पुढे नेण्याची जबाबदारी घेऊ शकता. जास्तीत जास्त युवकांना खेलो इंडिया आणि फिट इंडिया सारख्या अभियानाशी जोडण्यात सेवाश्रमाची प्रेरणा फारच महत्त्वपूर्ण आहे. योग असो किंवा आयुर्वेद, यांचा प्रचार आणि प्रसार करण्यात सेवाश्रमाचा वाढता सहभाग सामाजिक शक्ती मजबूत करेल.
मित्रांनो,
आपल्या देशात पारंपरिक पद्धतीने हाताने किंवा कुठल्यातरी अवजाराच्या मदतीने काम करणाऱ्या कारागिरांना, कलाकारांना विश्वकर्मा म्हणून संबोधले जाते. देशाने आता प्रथमच या पारंपरिक कारागिरांचे कौशल्य वाढवण्यासाठी संकल्प केला आहे. यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान म्हणजेच पीएम विकास योजना सुरू करण्यात येत आहे आणि या वर्षीच्या अर्थसंकल्पात या योजनेचे विस्तारपूर्वक वर्णन करण्यात आले आहे. विश्वकर्मा मित्रांमध्ये या योजनेबाबत जागरूकता वाढवून कृष्णगुरु सेवाश्रम या कारागिरांचे हित करू शकतो.
मित्रांनो,
भारताच्या पुढाकारामुळे 2023 हे वर्ष जागतिक भरड धान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. मिलेट म्हणजे वरकस धान्य ज्याला आपण सामान्यपणे भरड धान्य म्हणून ओळखतो. यांची नावे वेगवेगळी असतात पण या सर्वांना एकत्रितरित्या भरडधान्य असे संबोधले जाते. भरड धान्याला आता एक नवीन ओळख देण्यात आली आहे. ही ओळख म्हणजे श्री अन्न. म्हणजे अन्नामध्ये जे सर्वश्रेष्ठ अन्न आहे ते आहे श्री अन्न. कृष्णगुरु सेवाश्रम आणि इतर सर्व धार्मिक संस्था श्री अन्नाच्या प्रसारामध्ये मोठी भूमिका निभावू शकतात. माझा आग्रह आहे की, आश्रमात जो प्रसाद वाटला जातो तो प्रसाद श्री अन्नापासून बनवला जावा. त्याच प्रकारे, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपल्या स्वतंत्रता संग्रामातील सैनिकांचा इतिहास युवा पिढीपर्यंत पोहोचवण्याचे अभियान सुरू आहे. यामध्ये योगदान देण्यासाठी सेवाश्रम प्रकाशन संस्थेद्वारे आसाम आणि ईशान्येकडील राज्यातील क्रांतिकारकांचा इतिहास युवा पिढीपर्यंत पोहोचवण्या संबंधात खूप काही केले जाऊ शकते. बारा वर्षानंतर जेव्हा पुन्हा एकदा अखंड कीर्तन होईल तेंव्हा आपल्या आणि देशाच्या विविध सामायिक प्रयत्नामुळे आपण आणखी सशक्त भारताचे दर्शन करू शकू. आणि हीच कामना करित मी सर्व संतांना प्रणाम करतो, सर्व पुण्य आत्म्यांना प्रणाम करतो आणि तुम्हा सर्वांना पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा देतो.
धन्यवाद!